वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
एखाद्या व्यक्तीला बाप्तिस्मा घेण्याची इच्छा आहे परंतु ती अपंग आहे किंवा तिची अतिशय नाजूक तब्येत आहे तेव्हाही तिला पाण्यात पूर्णपणे बुडून बाप्तिस्मा घ्यावा लागेल का?
“बाप्तिस्मा” हा शब्द, ग्रीक क्रियापद बॅप्टो या शब्दाचे भाषांतर आहे, ज्याचा अर्थ ‘बुचकळणे’ असा होतो. (योहान १३:२६) बायबलमध्ये, ‘बाप्तिस्मा देणे’ म्हणजेच ‘बुडवणे.’ फिलिप्पाने इथियोपियन षंढाला बाप्तिस्मा दिला, त्याविषयी रॉदरहॅमच्या द एम्फसाईझ्ड बायबल यात म्हटले आहे: “फिलिप्प व षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले; आणि त्याने त्याला बुडविले.” (प्रेषितांची कृत्ये ८:३८) याचा अर्थ, एखाद्याला बाप्तिस्मा देताना त्याला पाण्याखाली पूर्णपणे बुडवून काढले जाते.—मत्तय ३:१६; मार्क १:१०.
येशूने आपल्या शिष्यांना सांगितले: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यांस . . . बाप्तिस्मा द्या.” (मत्तय २८:१९, २०) या निर्देशनानुसार यहोवाचे साक्षीदार तलावांमध्ये, तळ्यांत, नद्यांत किंवा पूर्णपणे डुंबण्याइतके पाणी जेथे असेल अशा इतर ठिकाणी बाप्तिस्मा देतात. पाण्याखाली पूर्णपणे डुंबण्याची आज्ञा शास्त्रवचनावर आधारित असल्यामुळे, बाप्तिस्मा न घेण्यास एखाद्याला सूट देण्याचा मानवांना अधिकार नाही. यास्तव, एखाद्याच्या परिस्थितीमुळे त्याला आवश्यक ती पावले उचलता येत नसली तरी त्याला बाप्तिस्मा दिला पाहिजे. उदाहरणार्थ, वृद्धांना किंवा अतिशय नाजूक तब्येत असलेल्यांना मोठ्या बाथटबमध्ये बाप्तिस्मा देणे सोयीस्कर पडते असे दिसून आले आहे. टबमधले पाणी थोडे कोमट करता येईल; तसेच बाप्तिस्मा घेणाऱ्या व्यक्तीला अगदी हळूवारपणे पाण्यात उतरवले जाऊ शकते आणि उतरवल्यावर थोडा वेळ पाण्याच्या तापमानाची सवय झाल्यावर मग बाप्तिस्मा दिला जाऊ शकतो.
गंभीर अपंगत्व असलेल्या व्यक्तींनाही बाप्तिस्मा देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, श्वासनलिकेचे ऑपरेशन झाल्यामुळे घशाला कायमचे छिद्र असलेल्या व्यक्तींना किंवा कृत्रिम श्वासोच्छवासाचे यंत्र असलेल्या व्यक्तींना बाप्तिस्मा देण्यात आला आहे. अशा सर्व बाप्तिस्म्यांसाठी अतिशय चांगली तयारी करावी लागेल. अशाप्रसंगी, एखादी प्रशिक्षित नर्स किंवा डॉक्टर सोबत असल्यास उत्तम. पण, खास काळजी किंवा सावधगिरी बाळगल्यास जवळजवळ सर्व प्रकारच्या लोकांना बाप्तिस्मा देणे शक्य आहे. यास्तव, एखाद्या अपंग व्यक्तीची पाण्यात बाप्तिस्मा घेण्याची मनापासून इच्छा आहे व यांत संभावणारे धोके ती स्वीकारू इच्छित असेल तर तिने पाण्यात बाप्तिस्मा घेण्यासाठी शक्य तितका प्रयत्न केला पाहिजे.