व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिस्ती नैतिकता शिका व शिकवा

ख्रिस्ती नैतिकता शिका व शिकवा

ख्रिस्ती नैतिकता शिका व शिकवा

“तर मग दुसऱ्‍याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय?”—रोमकर २:२१.

१, २. तुम्ही कोणत्या उद्देशाने बायबलचा अभ्यास करता?

तुम्ही निरनिराळ्या उद्देशांनी बायबलचा अभ्यास करत असाल. त्यात लोकांविषयी, घटनांविषयी, ठिकाणांविषयी व इतर गोष्टींविषयी दिलेली माहिती कदाचित तुम्हाला जाणून घ्यायची असेल. तसेच त्रैक्य किंवा नरक यांसारख्या चुकीच्या धार्मिक शिकवणुकींऐवजी खरे धार्मिक सिद्धान्त तुम्हाला जाणून घ्यायचे असतील. (योहान ८:३२) यासोबतच बायबल वाचण्याचा आणखी एक उद्देश असला पाहिजे आणि तो म्हणजे यहोवाला आणखी चांगल्याप्रकारे ओळखणे; जेणेकरून तुम्ही त्याचे अधिकाधिक अनुकरण करू शकाल आणि त्याच्यासमोर सात्विकतेने चालू शकाल.—१ राजे १५:४, ५.

याशिवाय देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यामागचा एक समर्पक व महत्त्वाचा उद्देश म्हणजे इतरांना, अर्थात आपली जवळची माणसे, ओळखीचे लोक आणि अद्याप अनोळखी असलेल्यांना देखील त्यातून शिकवता यावे म्हणून स्वतःला तयार करणे. खऱ्‍या ख्रिस्ती लोकांकरता हा वैयक्‍तिक आवडीचा प्रश्‍न नाही. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”—मत्तय २८:१९, २०.

३, ४. येशूने आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्ही शिकवता तेव्हा हा तुमच्याकरता एक बहुमान का ठरतो?

इतरांना शिकवण्याच्या इच्छेने बायबलचा अभ्यास करणे एक बहुमान असून यामुळे एका व्यक्‍तीला चिरस्थायी समाधान मिळू शकते. जुन्या काळापासून शिक्षकांना समाजात मानाचे स्थान दिले गेले आहे. एन्कार्टा एन्सायक्लोपिडिया यात असे विधान आढळते: “यहुदी समाजात प्रौढजन शिक्षकांना तारणाचा मार्ग दाखवणारे मार्गदर्शक मानत होते; आणि लहान मुलांना आईवडिलांपेक्षा आपल्या शिक्षकांना अधिक मान द्यायला शिकवले जायचे.” ख्रिस्ती लोकांनी बायबलचा अभ्यास करण्याद्वारे स्वतःला आधी शिकवून मग इतरांना शिकवणे हा त्यांच्याकरता एक खास बहुमान आहे.

“इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा अधिक लोक शिक्षकी पेशा निवडतात. सबंध जगात जवळजवळ ४.८ कोटी स्त्रीपुरुष शिक्षक आहेत.” (द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया) कोवळ्या वयातील मुलांची मने जणू शिक्षकांच्या हातात असतात आणि येत्या कित्येक वर्षांपर्यंत ते त्यांच्या जीवनाला आकार देतात. येशूने इतरांना शिकवण्याची जी आज्ञा दिली होती, तिचे पालन केल्यामुळे याहीपेक्षा अधिक दूरगामी परिणाम घडून येतात; तुम्ही दिलेल्या शिक्षणामुळे त्यांच्या सार्वकालिक भविष्यावर प्रभाव पडेल. तीमथ्याला पुढील सल्ला देताना प्रेषित पौलाने याच गोष्टीवर भर दिला: “आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव; त्यातच टिकून राहा; कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्‍यांचेहि तारण साधिशील.” (तिरपे वळण आमचे.) (१ तीमथ्य ४:१६) होय, तुमचे शिक्षण तारण मिळवण्याशी संबंधित आहे.

५. ख्रिस्ती शिक्षण सर्वात उच्चकोटीचे का आहे?

स्वतःला शिकवून मग इतरांना शिकवण्याचा अधिकार आपल्याला विश्‍वाचा सार्वभौम सर्वश्रेष्ठ देव यहोवा याने दिला आहे. त्यामुळे हे शिकवण्याचे काम, प्रापंचिक शिक्षकी व्यवसायात सर्वसामान्य मूलभूत विषय, विशिष्ट हुन्‍नर किंवा वैद्यकीय क्षेत्रातील खास विषय शिकवण्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आदरणीय आहे. ख्रिस्ती शिक्षण देणारा स्वतः एक विद्यार्थी असून तो देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याचे अनुकरण करण्यास स्वतः आधी शिकतो, आणि मग इतरांनाही असेच करण्यास शिकवतो.—योहान १५:१०.

स्वतः का शिकवावे?

६, ७. (अ) आपण आधी स्वतःला का शिकवले पाहिजे? (ब) पहिल्या शतकातील यहुदी इतरांना शिक्षण देण्यात का अपयशी ठरले?

आपण स्वतःला आधी शिकवले पाहिजे असे का म्हटले आहे? कारण आपण स्वतःला शिकवले नसेल तर साहजिकच आपण इतरांना चांगल्याप्रकारे शिकवू शकणार नाही. पौलाने ही गोष्ट कशाप्रकारे स्पष्ट केली हे पुढील उताऱ्‍यावरून कळून येते; हा उतारा त्या काळातील यहुद्यांकरता तर अर्थपूर्ण होताच पण आज ख्रिस्ती लोकांकरताही यात एक महत्त्वाचा धडा आहे. पौलाने असे विचारले: “तर मग दुसऱ्‍याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करितोस काय? व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करितोस काय? मूर्तीचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय? नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करितोस काय?”—रोमकर २:२१-२३.

उत्तरे अभिप्रेत असणारे हे प्रश्‍न विचारण्याद्वारे पौलाने दहा आज्ञांमध्ये स्पष्ट उल्लेख असलेल्या दोन बाबींकडे लक्ष वेधले: चोरी करू नको, आणि व्यभिचार करू नको. (निर्गम २०:१४, १५) पौलाच्या काळात काही यहुद्यांना आपल्याकडे देवाचे नियमशास्त्र असण्याचा खूपच अभिमान होता. त्यांना ‘नियमशास्त्रातले शिक्षण मिळाल्यामुळे ते आंधळ्यांचे वाटाडी, अंधारात असलेल्यांचा प्रकाश, बाळकांचे गुरू आहेत, अशी त्यांची खात्री झाली होती.’ (रोमकर २:१७-२०) पण यांपैकी काहीजण ढोंगी होते कारण दुसरीकडे ते चोरी किंवा व्यभिचारही करत होते. हे नियमशास्त्राचा आणि ज्याने ते दिले त्या स्वर्गातील देवाचाही अनादर करण्यासारखे होते. इतरांना शिकवण्यास ते पात्र नव्हते हे तर उघड होते आणि खरे पाहता ते स्वतःलाही शिकवत नव्हते.

८. पौलाच्या काळातील काही यहुदी कोणत्या अर्थाने ‘देवळे लुटत’ होते?

पौलाने देवळे लुटण्याविषयी उल्लेख केला. काही यहुदी खरोखर असे करत होते का? मग पौलाच्या मनात काय होते? स्पष्ट सांगायचे झाल्यास, या उताऱ्‍यातील मर्यादित माहितीवरून यहुदी कोणत्या अर्थाने ‘देवळे लुटत’ होते हे आपण निश्‍चितपणे सांगू शकत नाही. याआधी नगराच्या शिरस्तेदाराने असे घोषित केले होते की पौलाचे साथीदार ‘देवळे लुटणारे’ नव्हते, यावरून काही प्रमाणात यहुद्यांविषयी निदान काही लोक असा आरोप करत होते असे भासते. (प्रेषितांची कृत्ये १९:२९-३७) विजयी सैन्याने किंवा धार्मिक जहालमतवाद्यांनी मूर्तिपूजक देवळांमधून लुटलेल्या वस्तूंचा ते वैयक्‍तिक वापर किंवा व्यापार करत असावेत का? देवाच्या नियमशास्त्रानुसार मूर्तींवरील सोनेरूपे नष्ट करायचे होते, वैयक्‍तिक वापराकरता त्यांचा मोह धरू नका असे यहुद्यांना सांगण्यात आले होते. (अनुवाद ७:२५) * तेव्हा, पौल कदाचित अशा यहुद्यांविषयी बोलत असावा जे देवाच्या या आज्ञेकडे दुर्लक्ष करत होते आणि मूर्तिपूजक देवळांतून आलेल्या वस्तूंचा एकतर वापर करत होते किंवा त्यांतून नफा मिळवत होते.

९. जेरूसलेमच्या मंदिरात कोणत्या अयोग्य गोष्टी चालत होत्या ज्या एका अर्थाने मंदिर लुटण्यासारख्या होत्या?

दुसरीकडे पाहता जोसीफसने रोममध्ये घडलेल्या एक निंद्य घटनेचा अहवाल दिला; या घटनेमागे चार यहुद्यांचा हात होता आणि त्यांचे नेतृत्व करणारा नियमशास्त्राचा शिक्षक होता. या चार यहुद्यांनी यहुदी मतानुसारी असणाऱ्‍या एका रोमी स्त्रीला तिच्या मालकीचे सोने आणि इतर मौल्यवान वस्तू जेरूसलेममधील मंदिराला देणगी देण्याकरता पटवले. या सर्व वस्तू तिच्याकडून मिळवल्यानंतर त्यांनी ते धन स्वतःत वाटून घेतले. हे एका अर्थाने मंदिर लुटण्यासारखेच होते. * इतर काहीजण दोषपूर्ण अर्पणे वाहून व मंदिराच्या परिसरात व्यापार करून मंदिराला “लुटारूंची गुहा” बनवण्याद्वारे देवाचे मंदिर लुटत होते.—मत्तय २१:१२, १३; मलाखी १:१२-१४; ३:८, ९.

ख्रिस्ती नैतिकता शिकवा

१०. पौलाने रोमकर २:२१-२३ यात मांडलेल्या कोणत्या मुख्य मुद्द्‌याकडे आपले दुर्लक्ष होता कामा नये?

१० पौलाने उल्लेख केल्याप्रमाणे चोरी, व्यभिचार व देवळे लुटणे यांसारखे प्रकार पहिल्या शतकात नेमके कशाप्रकारे आचरले जात होते हे जरी आपल्याला निश्‍चित माहीत नसले तरीसुद्धा, पौल नेमके काय सांगू इच्छित होता याकडे आपले दुर्लक्ष होता कामा नये. त्याने विचारले: “दुसऱ्‍याला शिकविणारा तू स्वतःलाच शिकवीत नाहीस काय?” लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे पौलाने उल्लेख केलेली उदाहरणे नैतिकतेशी संबंधित होती. येथे पौलाने बायबलचे सिद्धान्त अथवा इतिहास शिकवण्याविषयी उल्लेख केला नाही. पौलाने ख्रिस्ती नैतिकतेच्या संदर्भात स्वतःला व इतरांना शिकवण्याविषयी उल्लेख केला.

११. देवाच्या वचनाचा अभ्यास करत असताना तुम्ही ख्रिस्ती नैतिकतेकडे का लक्ष दिले पाहिजे?

११ रोमकर २:२१-२३ यात पौलाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करण्याकरता आपण देवाच्या वचनातून ख्रिस्ती नैतिकता आत्मसात केली पाहिजे, शिकलेल्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत आणि मग इतरांनाही असे करण्याचे मार्गदर्शन केले पाहिजे. म्हणूनच, बायबलचा अभ्यास करत असताना यहोवाच्या आदर्शांकडे संकेत करणाऱ्‍या गोष्टींकडे लक्ष द्या कारण त्यांवरच ख्रिस्ती नैतिकता आधारलेली आहे. बायबलमधून स्पष्ट होणाऱ्‍या सल्ल्यावर व मार्गदर्शनावर मनन करा. मग, निर्भयपणे त्या सल्ल्याचे पालन करा. यासाठी खरोखरच निर्भय व निश्‍चयी वृत्तीची आवश्‍यकता आहे. कारण अपरिपूर्ण मानवाची सबबी सांगण्याची वृत्ती असते; विशिष्ट परिस्थितीत ख्रिस्ती नैतिकतेकडे दुर्लक्ष करणे चालण्यासारखे आहे, इतकेच काय तर असे करणे आवश्‍यक आहे असे पटवून देण्याचा तो प्रयत्न करतो. कदाचित पौलाने ज्यांविषयी उल्लेख केला ते यहुदी देखील आपण चूक केलीच नाही हे पटवून देण्याकरता व इतरांची फसवणूक करण्याकरता अशाप्रकारचा तर्कवाद करण्यात पटाईत असावेत. पौलाच्या शब्दांवरून दिसून येते की आपल्याला स्वतःच्या मताप्रमाणे ख्रिस्ती नैतिकतेचे गांभीर्य कमी करण्याची किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करण्याची मुभा नाही.

१२. चांगल्या अथवा वाईट आचरणाचा देवाच्या नावावर काय परिणाम होतो आणि ही गोष्ट सतत मनात बाळगणे कशाप्रकारे सहायक ठरते?

१२ बायबलमधील नैतिकता शिकून त्यानुसार आचरण करण्यामागच्या एका महत्त्वाच्या कारणाकडे प्रेषित पौलाने लक्ष वेधले. यहुद्यांच्या गैरवागणुकीमुळे यहोवाच्या नावावर कलंक आला: “नियमशास्त्राचा अभिमान बाळगणारा तू स्वतःच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करितोस काय? ‘तुम्हामुळे परराष्ट्रीयांमध्ये देवाच्या नावाची निंदा होत आहे.’” (रोमकर २:२३, २४) आजही ही गोष्ट तितकीच खरी आहे. आपण ख्रिस्ती नैतिकतेकडे डोळेझाक केली तर आपण ही नैतिकता स्थापन करणाऱ्‍याचा अपमान करतो. त्याउलट जर आपण दृढनिर्धाराने देवाच्या आदर्शांना जडून राहिलो तर यामुळे त्याचे गौरव व सन्मान होतो. (यशया ५२:५; यहेज्केल ३६:२०) या गोष्टीची तुम्ही जाणीव बाळगली तर जेव्हा तुमच्यासमोर मोह येतील किंवा एखाद्या प्रसंगी ख्रिस्ती नैतिकतेकडे डोळेझाक करणे हा सर्वात सोपा आणि सोयीस्कर मार्ग तुम्हाला वाटेल तेव्हा असे न करण्याचा तुमचा निर्धार अधिक दृढ होईल. शिवाय, पौलाचे शब्द आपल्याला आणखी काही शिकवतात. आपल्या आचरणामुळे देवाच्या नावाचा एकतर अनादर किंवा गौरव होतो याची वैयक्‍तिकरित्या जाणीव ठेवणे महत्त्वाचे आहे; त्या व्यतिरिक्‍त, इतरांना शिकवताना देखील तुम्ही त्यांना हे समजून घेण्यास मदत केली पाहिजे की ते शिकत असलेल्या नैतिक आदर्शांचे पालन केल्यामुळे किंवा न केल्यामुळे यहोवाच्या नावाचा एकतर गौरव किंवा अनादर होईल. ख्रिस्ती नैतिकतेमुळे एका व्यक्‍तीला समाधान प्राप्त होते किंवा तिच्या आरोग्याचे रक्षण होते एवढ्यापुरतेच हे मर्यादित नाही. तर ही नैतिकता ज्याने स्थापित केली व जो तिची शिफारस करतो त्या देवाचे नाव यात गोवलेले आहे.—स्तोत्र ७४:१०; याकोब ३:१७.

१३. (अ) बायबल आपल्याला नैतिकता राखण्यासाठी कशाप्रकारे मदत करते? (ब) १ थेस्सलनीकाकर ४:३-७ यातील सल्ल्याचे सार सांगा.

१३ नैतिकतेचा इतरांवरही परिणाम होतो. देवाच्या वचनात त्याच्या नैतिक आदर्शांचे पालन केल्यामुळे आणि न केल्यामुळे होणारे परिणाम स्पष्ट करणाऱ्‍या उदाहरणावरून हे दिसून येते. (उत्पत्ति ३९:१-९, २१; यहोशवा ७:१-२५) तसेच नैतिकतेसंबंधी अगदी सुस्पष्ट सल्ला देखील देण्यात आला आहे, उदाहरणार्थ: “देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. देवाला न ओळखणाऱ्‍या परराष्ट्रीयांप्रमाणे कामवासनेने नव्हे, तर पवित्रतेने व अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा ठेवावा ते समजून घ्यावे. कोणी ह्‍या गोष्टीचे उल्लंघन करून [“हक्कांचे उल्लंघन करून,” NW] आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; . . . कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे.”—१ थेस्सलनीकाकर ४:३-७.

१४. पहिले थेस्सलनीकाकर ४:३-७ यातील सल्ल्याविषयी तुम्ही स्वतःला कोणते प्रश्‍न विचारू शकता?

१४ लैंगिक अनैतिकता ख्रिस्ती नैतिकतेविरुद्ध आहे हे कोणीही या उताऱ्‍यावरून समजू शकतो. तरीसुद्धा या अगदीच स्पष्ट निष्कर्षाच्या पलीकडे आपण जाऊ शकतो. काही वचनांवर बराच अभ्यास व मनन करणे शक्य असते व यामुळे त्या वचनाचा गहन अर्थ आपल्याला कळून येतो. उदाहरणार्थ, जारकर्म करणारा ‘आपल्या बंधूच्या हक्कांचे उल्लंघन करून त्याचा गैरफायदा घेतो’ असे म्हणताना पौलाचे काय तात्पर्य होते यावर तुम्ही मनन करू शकता. एक व्यक्‍ती कशाप्रकारे आपल्या बंधूच्या हक्कांचे उल्लंघन करतो आणि हे समजून घेतल्यामुळे ख्रिस्ती नैतिकता कायम ठेवण्याकरता तुम्हाला कशाप्रकारे अधिक प्रोत्साहन मिळेल? अशा संशोधनामुळे इतरांना शिकवून त्यांनाही देवाचे गौरव करण्यास मदत करायला कशी मदत मिळू शकेल?

शिकवण्याच्या उद्देशाने शिकणे

१५. वैयक्‍तिक अभ्यासाद्वारे स्वतःला शिकवण्याकरता तुम्ही कोणत्या साधनांचा उपयोग करू शकता?

१५ स्वतः शिकून इतरांना शिकवण्याच्या उद्देशाने अभ्यास करताना जे प्रश्‍न उद्‌भवतात त्यांविषयी संशोधन करण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांजवळ निरनिराळी साधने आहेत. बऱ्‍याच भाषांतून उपलब्ध असलेले एक प्रकाशन म्हणजे इंग्रजीतील टेहळणी बुरूज प्रकाशन संदर्भसूची. तुमच्याजवळ हे प्रकाशन असल्यास यहोवाच्या साक्षीदारांच्या बायबल आधारित प्रकाशनांतील माहिती शोधण्याकरता तुम्ही याचा उपयोग करू शकता. तुम्ही विषयांच्या अथवा बायबलमधील वचनांच्या यादीत शोधू शकता. यहोवाच्या साक्षीदारांकडे अनेक मुख्य भाषांतून उपलब्ध असलेले आणखी एक साधन म्हणजे वॉचटावर लायब्ररी. सीडी-रॉम वरील हा कम्प्युटर प्रोग्रॅम म्हणजे संस्थेच्या प्रकाशनांचा इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील संग्रह. या प्रोग्रॅमच्या साहाय्याने आपण वेगवेगळ्या विषयांवर व वचनांवर संशोधन करू शकतो. यांपैकी एक किंवा दोन्ही साधने तुमच्याजवळ असल्यास देवाच्या वचनाचा इतरांना शिकवण्याकरता अभ्यास करत असताना त्यांचा नियमित उपयोग करा.

१६, १७. (अ) पहिले थेस्सलनीकाकर ४:६ यात उल्लेख केलेल्या हक्कांविषयी उद्‌बोधक माहिती आपल्याला कोठे सापडेल? (ब) जारकर्मामुळे इतरांच्या हक्कांचे कशाप्रकारे उल्लंघन होऊ शकते?

१६ वरील उदाहरण घेऊ या. १ थेस्सलनीकाकर ४:३-७ या वचनांच्या संबंधाने हक्कांचा प्रश्‍न उद्‌भवतो. कोणाचे हक्क? आणि या हक्कांचे उल्लंघन करण्याचा कशाप्रकारे संभव आहे? अभ्यासाच्या साधनांच्या साहाय्याने, तुम्हाला या वचनांवर आणि पौलाने उल्लेख केलेल्या हक्कांविषयी बरीच उद्‌बोधक माहिती सापडेल. ही माहिती तुम्ही शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी (इंग्रजी) खंड १, पृष्ठे ८६३-४; खरी शांती व सुरक्षितता—ती तुम्हाला कशी मिळू शकेल?, (इंग्रजी) पृष्ठ १४५; टेहळणी बुरूज (इंग्रजी) नोव्हेंबर १५, १९८९, पृष्ठ ३१ वर वाचू शकता.

१७ अशाप्रकारे सखोल अभ्यास करताना, ही प्रकाशने पौलाच्या शब्दांची सत्यता कशाप्रकारे पटवून देतात हे तुम्हाला समजून येईल. जारकर्म करणारा देवाच्या विरोधात पाप करतो आणि नाना प्रकारच्या रोगांचा धोका पत्करतो. (१ करिंथकर ६:१८, १९; इब्री लोकांस १३:४) जारकर्म करणारा, ज्या स्त्रीसोबत पाप करतो तिच्या अनेक हक्कांचे तो उल्लंघन करतो. तो तिला शुद्ध नैतिक स्थिती व विवेकापासून वंचित करतो. ती अविवाहित असल्यास, कुमारी अवस्थेत विवाहित होण्याच्या तिच्या हक्काचे आणि तिच्याकडून अशी अपेक्षा करण्याच्या तिच्या भावी पतीच्या हक्काचे देखील तो उल्लंघन करतो. तो त्या स्त्रीच्या आईवडिलांना आणि ती विवाहित असल्यास तिच्या पतीला दुखावतो. अनैतिक पुरुष शुद्ध नैतिक नावलौकिक राखण्याच्या स्वतःच्या कुटुंबाच्या हक्काचेही उल्लंघन करतो. तो ख्रिस्ती मंडळीचा सदस्य असल्यास, तिची बदनामी करतो आणि तिचे चांगले नाव खराब करतो.—१ करिंथकर ५:१.

१८. ख्रिस्ती नैतिकतेविषयी बायबल अभ्यास केल्यामुळे तुम्हाला कशाप्रकारे फायदा होतो?

१८ हक्कांविषयी ही माहिती वाचल्यानंतर त्या वचनाचा अर्थ तुमच्या डोळ्यांपुढे अधिक स्पष्टपणे उलगडत नाही का? अशाप्रकारचा अभ्यास अत्यंत मोलाचा आहे. हा अभ्यास करत असताना तुम्ही स्वतःला शिकवत असता. देवाच्या संदेशाचे सत्य तुमच्या मनात अधिक खोलवर बिंबवले जाते आणि ते तुमच्यावर पूर्वीपेक्षा अधिक जोरदारपणे परिणाम करते. कोणताही मोह आला तरीसुद्धा ख्रिस्ती नैतिकतेला जडून राहण्याचा तुमचा निर्धार तुम्ही अधिकच पक्का करता. शिवाय एक शिक्षक या नात्याने तुम्ही किती निपुण बनता याचा विचार करा! उदाहरणार्थ, इतरांना बायबलमधील सत्य शिकवत असताना तुम्ही त्यांना १ थेस्सलनीकाकर ४:३-७ याचे अधिक खोलात शिरून स्पष्टीकरण देऊ शकता आणि ख्रिस्ती नैतिकतेविषयी त्या व्यक्‍तीची समज व गुणग्राहकता वाढवू शकता. अशाप्रकारे तुमच्या अभ्यासामुळे तुमच्यासोबतच इतर अनेक जणांनाही देवाचे गौरव करण्यास मदत मिळते. आणि आम्ही येथे थेस्सलनीकाकरांना लिहिलेल्या पौलाच्या पत्रातील केवळ एका उदाहरणाचा उल्लेख केला आहे. ख्रिस्ती नैतिकतेचे इतर अनेक पैलू आहेत आणि अनेक समर्पक उदाहरणे व मार्गदर्शक मुद्दे आहेत ज्यांचा तुम्ही अभ्यास करू शकता, त्यांचे पालन करू शकता व इतरांना ते शिकवू शकता.

१९. ख्रिस्ती नैतिकतेला जडून राहणे का आवश्‍यक आहे?

१९ असे करणे सुज्ञतेचे आहे यात शंका नाही. याकोब ३:१७ म्हणते की “वरून येणारे ज्ञान” स्वतः यहोवा देवाकडून येते आणि ते “मुळात शुद्ध” असते. याचा स्पष्टपणे देवाच्या नैतिक आदर्शांचे पालन करण्याकडे संकेत आहे. किंबहुना, बायबल शिकवण्यात जे यहोवाचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात अशांकडून यहोवा ‘शुद्धतेच्या’ बाबतीत अनुकरणीय असण्याची अपेक्षा करतो. (१ तीमथ्य ४:१२) पौल व तीमथ्य यांसारख्या सुरवातीच्या शिष्यांचा जीवनक्रम या गोष्टीची ग्वाही देतो की त्यांनी अनैतिकतेचा पाश टाळला; पौलाने तर असेही लिहिले: “पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्‍यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये, तसेच अमंगळपण बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्‍यांचाहि उच्चार न होवो.”—इफिसकर ५:३, ४.

२०, २१. योहानाने १ योहान ५:३ येथे जे लिहिले त्याजशी तुम्ही का बरे सहमत आहात?

२० देवाच्या वचनातील नैतिक आदर्श सडेतोड व सुस्पष्ट असले तरीसुद्धा ते जाचक ओझ्याप्रमाणे नाहीत. सर्वात जास्त काळ जिवंत राहिलेल्या प्रेषित योहानाला याची प्रचिती आली होती. अनेक दशकांपर्यंत त्याने जे अनुभवले त्याच्या आधारावर त्याला माहीत होते की ख्रिस्ती नैतिकता हानीकारक नव्हती. उलट ती श्रेयस्कर, हितकारक व एक आशीर्वाद होती. यावर जोर देऊन त्याने असे लिहिले: “देवावर प्रीती करणे म्हणजे: त्याच्या आज्ञा पाळणे. आणि त्याच्या आज्ञा आपल्यावर दडपण आणत नाहीत.”—१ योहान ५:३, न्यू इंग्लिश ट्रान्सलेशन.

२१ पण ख्रिस्ती नैतिकतेच्या रूपाने देवाच्या आज्ञा पाळल्यामुळे आपले अनेक समस्यांपासून संरक्षण होते, किंवा तसे न केल्यामुळे होणाऱ्‍या दुष्परिणामांपासून आपला बचाव होतो म्हणून हा सर्वात उत्तम मार्ग आहे असे योहानाने म्हटले नाही याकडे लक्ष द्या. योहानाने योग्य मनोवृत्ती स्पष्ट केली. त्याने आधी हे कबूल केले की देवाच्या आज्ञांचे पालन करणे हे त्याच्याविषयी असलेल्या प्रेमाचा पुरावा आहे, त्याच्याबद्दल आपल्याला किती प्रेम आहे हे दाखवण्याची ती एक मोलवान सुसंधी आहे. खरोखर स्वतःला व इतरांना देवावर प्रीती करण्यास शिकवण्याकरता त्याच्या उदात्त आदर्शांचा स्वीकार करणे व त्यांचे पालन करणे आवश्‍यक आहे. होय, याचा अर्थ स्वतःला व इतरांनाही ख्रिस्ती नैतिकता शिकवणे होय.

[तळटीपा]

^ परि. 8 यहुदी लोक पवित्र वस्तूंचा अनादर करत नव्हते असे त्यांच्याविषयीचे चित्र रेखाटताना जोसीफसने देवाचा हा विशिष्ट नियम अशाप्रकारे विदित केला: “इतर शहरांत पुजल्या जाणाऱ्‍या देवांची कोणीही निंदा करू नये, परदेशीयांची देवळे लुटू नये किंवा कोणत्याही देवाला वाहिलेल्या खजिन्याचा मोह धरू नये.” (तिरपे वळण आमचे.)—ज्युइश ॲन्टीक्विटीज, ४ था ग्रंथ, अध्याय ८, परिच्छेद १०.

^ परि. 9 ज्युइश ॲन्टिक्विटीज, १८ वा ग्रंथ, अध्याय ३, परिच्छेद ५.

तुम्हाला आठवते का?

• इतरांना शिकवण्याआधी आपण स्वतःला शिकवणे का आवश्‍यक आहे?

• आपल्या वर्तनामुळे यहोवाच्या नावावर कशाप्रकारे परिणाम होतो?

• व्यभिचार करणारा कोणाच्या हक्कांचे उल्लंघन करण्याची शक्यता आहे?

• ख्रिस्ती नैतिकतेच्या संदर्भात तुमचा काय निर्धार आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२२ पानांवरील चित्र]

“त्याच्या आज्ञा आपल्यावर दडपण आणत नाहीत”