व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगव्याप्त बंधूवर्गामुळे माझा विश्‍वास मजबूत झाला

जगव्याप्त बंधूवर्गामुळे माझा विश्‍वास मजबूत झाला

जीवन कथा

जगव्याप्त बंधूवर्गामुळे माझा विश्‍वास मजबूत झाला

थॉम्सन कान्गाले यांच्याद्वारे कथित

एप्रिल २४, १९९३ रोजी मला, एका नवीन शाखा कार्यालय संकुलाच्या समर्पण कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाले. झांबीयातील लुसाका येथील या संकुलात १३ इमारती होत्या. मला चालताना त्रास होत असल्यामुळे, गाईड असलेल्या एका ख्रिस्ती भगिनीने मला अगदी प्रेमळपणे विचारले, “मी सोबत तुमच्यासाठी एक खुर्ची घेऊ का, म्हणजे तुम्हाला अधूनमधून थोडं बसता येईल?” मी आफ्रिकी वंशाचा आहे आणि ही भगिनी गौरवर्णीय आहे; पण तिला त्याचं काही वाटत नव्हतं. मी अगदी मनापासून तिचे आभार मानले कारण तिनं दाखवलेल्या दयेमुळे मी संपूर्ण शाखा दफ्तर फिरून पाहू शकलो.

माझ्या जीवनात आलेल्या अशा कैक दयाळुपणाच्या अनुभवांमुळे माझी पक्की खात्री झाली आहे, की यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती बंधूवर्गात तेच प्रेम दिसून येते जे आपल्या खऱ्‍या अनुयायांचे ओळख चिन्ह असेल, असे ख्रिस्त म्हणाला होता. (योहान १३:३५; १ पेत्र २:१७) १९३१ साली या ख्रिश्‍चनांबरोबर माझी ओळख कशी झाली ते मी तुम्हाला सांगू इच्छितो; त्याच वर्षी या ख्रिश्‍चनांनी, यहोवाचे साक्षीदार हे बायबल आधारित नाव धारण करण्याचं जाहीरपणे घोषित केलं होतं.—यशया ४३:१२.

आफ्रिकेतील आरंभीची सेवा

१९३१ सालच्या नोव्हेंबर महिन्यात मी २२ वर्षांचा होतो तेव्हा उत्तर ऱ्‍होडेशिया (आता झांबिया) याच्या कॉपरबेल्ट भागात असलेल्या किट्‌वी येथे राहत होतो. माझ्याबरोबर सॉकर खेळणाऱ्‍या एका मित्रानं साक्षीदारांबरोबर माझी ओळख करून दिली. मी त्यांच्या काही सभांना उपस्थित राहिलो आणि दक्षिण आफ्रिका येथील केप टाऊनमध्ये असलेल्या शाखा दफ्तराला पत्र लिहून, मला देवाची वीणा (इंग्रजी) नावाचे बायबल अभ्यासाचे साधन पाठवावे अशी विनंती केली. * हे पुस्तक इंग्रजीत होते आणि मला इंग्रजी चांगल्याप्रकारे येत नसल्यामुळे या पुस्तकातली माहिती मला पूर्णपणे समजली नाही.

बँगव्युलू सरोवराच्या नैर्‌ऋत्यापासून सुमारे २४० किलोमीटर दूर असलेल्या कॉपरबेल्ट भागात मी लहानाचा मोठा झालो आणि इथल्या तांब्याच्या खाणीत कामासाठी इतर प्रांतातून अनेक लोक होते. साक्षीदारांचे अनेक गट इथं बायबल अभ्यासासाठी नियमितरीत्या एकत्र जमायचे. काही काळानंतर मी किट्‌वीहून, जवळपासच्या न्डोला शहरात राहायला गेलो आणि तेथील साक्षीदारांच्या एका गटाबरोबर सहवास करू लागलो. त्या वेळी मी, प्रिन्स ऑफ वेल्स असे नाव असलेल्या एका सॉकर संघाचा कप्तान होतो. त्याचबरोबर मी, आफ्रिकन लेक्स कॉर्पोरेशनच्या गौरवर्णीय व्यवस्थापकांच्या घरात घरगडी म्हणून काम करत होतो; मध्य आफ्रिकेत या कॉर्पोरेशनची अनेक दुकाने होती.

माझं फारसं शिक्षण झालेलं नव्हतं; मी ज्यांच्याकडे काम करत होतो त्या युरोपीय लोकांबरोबर राहत असल्यामुळे मला थोडीफार इंग्रजी बोलता येत होती. पण मला आणखी शिकायची खूप इच्छा असल्यामुळे मी, दक्षिण ऱ्‍होडेशियाच्या (आता झिंबाब्वे) प्लमट्री येथील एका शाळेत माझं नाव दाखल केलं. आणि त्याच वेळेस केप टाऊन शाखेला मी दुसऱ्‍यांदा पत्र पाठवलं. मी त्यांना सांगितलं, की मला देवाची वीणा हे पुस्तक मिळालं आणि मला यहोवाची पूर्ण-वेळ सेवा करायची आहे.

त्यांचं उत्तर वाचून मला खूप आश्‍चर्य वाटलं; त्यात म्हटलं होतं: “यहोवाची सेवा करण्याची तुझी इच्छा पाहून आम्हाला तुझे कौतुक वाटते. याबाबतीत तू यहोवाला प्रार्थना करावी असे आम्ही उत्तेजन देतो; यहोवा तुला सत्याची योग्य समज मिळण्यास मदत करेल आणि त्याची सेवा करण्यासाठी तुला योग्य ठिकाणही मिळवून देईल.” हे पत्र खूप वेळा वाचून काढल्यावर मी अनेक साक्षीदारांना, मी काय करावं असं विचारलं. ते मला म्हणाले: “तुला यहोवाची सेवा करायची खरोखरच इच्छा असेल तर जरूर ती पूर्ण कर आणि लगेच सुरवात कर.”

एक संपूर्ण आठवडा मी या गोष्टीबद्दल प्रार्थना केली आणि मग, माझं शिक्षण सोडून साक्षीदारांबरोबर बायबल अभ्यास पूर्ण करण्याचा सरतेशेवटी निर्णय घेतला. पुढील वर्षी म्हणजे जानेवारी १९३२ साली मी यहोवा देवाला माझं जीवन समर्पित करून पाण्यानं बाप्तिस्मा घेतला. न्डोला शहरातून मी जवळच्या लुआनशा शहरात राहायला गेल्यावर सहउपासक असलेली जनेट हिला भेटलो आणि १९३४ सालच्या सप्टेंबर महिन्यात आम्ही लग्न केलं. जनेटला आधीपासूनच एक मुलगा व मुलगी होती.

हळूहळू मी आध्यात्मिक प्रगती करीत गेलो आणि १९३७ साली पूर्ण-वेळेच्या सेवेत उतरलो. त्यानंतर काही काळानं मला प्रवासी सेवक म्हणून नियुक्‍त करण्यात आलं; आता प्रवासी सेवकांना विभागीय पर्यवेक्षक म्हटलं जातं. प्रवासी पर्यवेक्षक यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांना आध्यात्मिकरीत्या मजबूत करण्याकरता भेटी देतात.

सुरवातीच्या काळात प्रचार

१९३८ सालच्या जानेवारी महिन्यात, मला सोकोनट्‌वी नावाच्या एका आफ्रिकन प्रमुखाची भेट घेण्यास सांगण्यात आले; सोकोनट्‌वी यांनी यहोवाच्या साक्षीदारांना आपल्याकडे पाठवण्याची विनंती केली होती. त्याच्याकडे जाण्यासाठी मला सायकलने तीन दिवस लागले. केप टाऊन कार्यालयाला आपण पाठवलेल्या पत्राच्या उत्तरादाखल मी आपल्याला भेटायला आलो असं मी त्यांना सांगितलं, तेव्हा त्यांनी खरोखरच अगदी मनापासून आभार मानले.

सोकोनट्‌वी यांच्या लोकांच्या प्रत्येक झोपडीत जाऊन मी त्यांना इन्साका (सार्वजनिक केंद्र) इथं यायला सांगितलं. लोक जमल्यावर मी त्यांच्याशी बोललो. यामुळे, अनेक बायबल अभ्यास सुरू करण्यात आले. गावातील प्रमुख आणि त्यांचा कारकून हे दोघं सर्वात आधी तेथील मंडळ्यांचे पर्यवेक्षक बनले. आज, त्या भागात ५० पेक्षा अधिक मंडळ्या आहेत; त्या भागाला साम्फ्या जिल्हा असे म्हटले जाते.

१९४२ पासून १९४७ पर्यंत मी बँगव्युलू सरोवराच्या भागात सेवा केली. प्रत्येक मंडळीत मी १० दिवस राहायचो. आध्यात्मिक कापणीच्या हंगामात कामगार फार कमी असल्यामुळे, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला जसे वाटले होते तसेच आम्हालाही वाटले; त्याने म्हटले होते: “पीक फार आहे खरे, पण कामकरी थोडे आहेत; ह्‍यास्तव पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्तय ९:३६-३८) पूर्वी, प्रवास करणं खूप कठीण असायचं; त्यामुळे जनेट बहुतेकदा मुलांबरोबर लुआनशातच राहायची आणि मी मंडळ्यांना भेटी द्यायला जायचो. एव्हाना जनेट आणि मला आणखी दोन मुलं झाली; पण त्यातला एक मुलगा दहा महिन्यांचा होता तेव्हा वारला.

त्या दिवसांत, खूप कमी गाड्या होत्या आणि रस्तेसुद्धा कमी. एकदा मी, जनेटची सायकल घेऊन २०० पेक्षा अधिक किलोमीटरच्या प्रवासाला निघालो. कधीकधी मला, लहानशी नदी पार करावी लागायची तेव्हा मी सायकल खांद्यावर घ्यायचो आणि एका हातानं तिला धरून दुसऱ्‍या हातानं पोहत पोहत किनाऱ्‍यावर यायचो. लुआनशातील साक्षीदारांची संख्या फार झपाट्याने वाढली; १९४६ साली ख्रिस्ताच्या मृत्यूच्या स्मारकविधीला १,८५० लोक उपस्थित राहिले होते.

विरोधाचा सामना

दुसऱ्‍या महायुद्धाच्या वेळी एकदा, कवाम्ब्वातील जिल्हा अधिकाऱ्‍याने मला बोलवून म्हटलं: “तुम्ही वॉचटावर संस्थेची पुस्तकं आतापासून वापरू नका कारण त्यांच्यावर आता बंदी आली आहे. पण तुमच्या कामात वापरता येतील अशी इतर पुस्तकं लिहिण्यासाठी मी तुम्हाला काही संदर्भ पुस्तकं देतो.”

मी त्यांना म्हणालो: “माझ्याजवळ जी पुस्तकं आहेत त्यात मी समाधानी आहे. मला आणखी पुस्तकांची आवश्‍यकता नाही.”

ते म्हणाले: “तुम्हाला अमेरिकन लोक कसे असतात ते माहीत नाही. (तेव्हा आमची सर्व प्रकाशने अमेरिकेत छापली जायची). ते तुम्हाला फसवतील.”

मी म्हणालो: “नाही, मी ज्यांच्याबरोबर असतो ते फसवणार नाहीत.”

मग त्यांनी मला विचारलं: “दुसऱ्‍या धर्मांप्रमाणे तुम्ही तुमच्या मंडळ्यांना युद्धासाठी पैसे दान करायला सांगू शकत नाही का?”

मी म्हणालो: “हे तर सरकारी दूतांचं काम आहे.”

“तुम्हाला करायला काय हरकत आहे? घरी जा आणि शांतपणे विचार करा,” असं ते मला म्हणाले.

मी त्यांना म्हणालो: “निर्गम २०:१३ आणि २ तीमथ्य २:२४ मध्ये बायबल आपल्याला, खून करू नका व लढू नका अशी आज्ञा देतं.”

त्यानंतर मला जायला सांगण्यात आलं पण, फोर्ट रोझबेरीतील (सध्या मनसा हे नाव असलेले नगर) जिल्हा अधिकाऱ्‍याने मला बोलवलं. ते मला म्हणाले: “तुमच्या पुस्तकांवर बंदी आहे हे सांगायला मी तुम्हाला इथं बोलवलं आहे.”

मी त्यांना म्हणालो: “हो, मी ऐकलंय त्याबद्दल.”

“मग, तुमच्या मंडळ्यांकडे जा आणि तुमच्याबरोबर उपासना करणाऱ्‍या सर्व लोकांना त्यांच्याजवळ असलेली सर्व पुस्तकं इथं आणून द्यायला सांगा. समजलं?”

मी म्हणालो: “हे माझं काम नाही. सरकारी दूतांचं काम आहे.”

अचानक घडलेल्या भेटीचे परिणाम

युद्ध संपल्यानंतर आम्ही प्रचार करीत राहिलो. १९४७ साली, म्वान्झा गावातील एका मंडळीला भेट देऊन झाल्यावर, मला चहाचा एक कप कुठं मिळेल का असं मी एकाला विचारलं. मला मि. न्कोन्डी नावाच्या एका गृहस्थाच्या घरी जाण्यास सांगण्यात आलं; त्यांच्या घरात चहा विकत मिळायचा. न्कोन्डी पतीपत्नीनं माझं अगदी प्रेमानं स्वागत केलं. चहा पीत असताना मी, मि. न्कोन्डी यांना, “देव सत्य होवो,” पुस्तकातून “नरक—आशायुक्‍त विश्रांतीची जागा” हा अध्याय मला वाचून दाखवाल का, असं विचारलं.

चहा पिऊन झाल्यावर मी त्यांना विचारलं: “नरकाविषयी तुम्हाला काय समजलं?” ते साहित्य वाचून त्यांना खूप आश्‍चर्य वाटलं; त्यानंतर त्यांनी साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास सुरू केला आणि आपल्या पत्नीसह बाप्तिस्मा घेतला. अर्थात काही काळानंतर ते साक्षीदार राहिले नाहीत; पण त्यांची पत्नी आणि अनेक मुलं मात्र सत्यात टिकून राहिली. त्यांची एक मुलगी, पिलनी अजूनही झांबियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात सेवा करत आहे. पिलनीची आई आता खूप वयस्कर झाली आहे पण तरीसुद्धा ती एक विश्‍वासू साक्षीदार आहे.

पूर्व आफ्रिकेला संक्षिप्त भेट

१९४८ साली लुसाका येथे स्थापन करण्यात आलेल्या परंतु सध्या उत्तर ऱ्‍होडेशियात असलेल्या आपल्या शाखा कार्यालयानं मला टांगांयिका (आता टांझानिया) इथं नेमलं. जनेट, मी व आमच्याबरोबर आणखी एका साक्षीदार बांधवानं डोंगराळ भागातून पायीच प्रवास केला. हा प्रवास करायला आम्हाला तीन दिवस लागले आणि आम्ही अगदी गळून गेलो होतो. माझ्याकडे पुस्तकांचा गठ्ठा होता, जनेटकडे आमच्या कपड्यांची बॅग होती आणि त्या बांधवाकडे आमचा बिछाना होता.

मार्च १९४८ मध्ये आम्ही एम्बेआ इथं पोहंचलो तेव्हा, आम्हाला तेथील बांधवांना बायबलच्या शिकवणुकींच्या सामंजस्यात आपले जीवन जगण्यासाठी खूप मदत करावी लागली. आम्हाला त्या भागात सर्व लोक वॉचटावरचे लोक म्हणून ओळखत होते. बांधवांनी यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारलं होतं तरीसुद्धा तशी कोणी ओळख देत नव्हतं. शिवाय, काही साक्षीदारांना मृतांना आदर देण्याच्या प्रथेशी संबंधित असलेल्या विशिष्ट प्रथा सोडण्याची गरज होती. परंतु बांधवांना कदाचित जो सर्वात कठीण बदल करावा लागला तो म्हणजे, सर्वांच्या नजरेत आदरणीय असावे म्हणून त्यांना आपल्या विवाहाची कायदेशीररीत्या नोंद करावी लागली.—इब्री लोकांस १३:४.

नंतर, मला पूर्व आफ्रिकेतील इतर भागांमध्ये आणि युगांडा येथे सेवा करण्याचा सुहक्क मिळाला. एन्टेबी आणि कंपाला इथं मी सहा आठवडे होतो; तिथंही अनेक लोकांना बायबलमधील सत्य शिकण्यास मदत करण्यात आली.

न्यूयॉर्क सिटीला येण्याचे आमंत्रण

काही काळ युगांडात सेवा केल्यानंतर १९५६ सालाच्या सुरवातीला मी टांगांयिकाची राजधानी दा एस सलाम इथं आलो. तिथं यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयातून माझ्यासाठी एक पत्र आलं होतं. पत्रात, जुलै २७ ते ऑगस्ट ३, १९५८ पर्यंत होणाऱ्‍या एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी न्यूयॉर्कला येण्याची तयारी करण्यासाठी काही सूचना दिल्या होत्या. साहजिकच, पत्र वाचून मला अत्यानंद झाला.

जाण्याचा दिवस उजडला तेव्हा, लूका म्वान्गो नावाचे आणखी एक प्रवासी पर्यवेक्षक बांधव आणि मी, असे आम्ही दोघं न्डोलाहून दक्षिण ऱ्‍होडेशिया येथील सॅलीसबरीला (आता हरारे) आणि तिथून केन्यातील नायरोबी इथं विमानानं गेलो. तिथून मग इंग्लडमधील लंडनला पुन्हा विमानानं गेलो; तिथं पोहंचल्यावर आमचं अगदी प्रेमानं स्वागत करण्यात आलं. इंग्लडला आम्ही ज्या दिवशी पोहंचलो त्या रात्री, आम्हाला खूप आनंद झाला होता; आपण आफ्रिकन असतानासुद्धा गोऱ्‍या लोकांनी आपलं किती प्रेमानं स्वागत केलं होतं याबद्दल आम्ही बोलत होतो. या अनुभवानं आम्हाला खूप उत्तेजन मिळालं होतं.

मग, जिथं अधिवेशन होणार होतं तिथं म्हणजे न्यूयॉर्कला आम्ही पोहंचलो. अधिवेशनातील एका दिवशी मी, उत्तर ऱ्‍होडेशियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याचा अहवाल दिला. त्या दिवशी न्यूयॉर्क सिटीच्या पोलो ग्राऊंड्‌सवर व यांकी स्टेडियममध्ये जवळजवळ २,००,००० लोक उपस्थित होते. मला किती मोठा बहुमान मिळाला होता या विचारानं तर त्या दिवशी माझी झोपच उडाली होती!

अधिवेशन खूप लवकर संपले आणि आम्ही घरी परतलो. परतीच्या प्रवासाच्या वेळीसुद्धा आम्ही इंग्लडमधील आपल्या प्रेमळ बंधूभगिनींच्या आदरातिथ्याचा पुन्हा एकदा अनुभव घेतला. यहोवाच्या लोकांमधल्या, मग ते कोणत्याही जातीचे किंवा राष्ट्राचे असोत, त्यांच्यामधल्या ऐक्याची प्रचिती आम्हाला या भेटीदरम्यान मिळाली; आम्ही हा अनुभव कधीच विसरू शकत नाही.

सेवाही चालू आणि परीक्षाही चालू

१९६७ साली, मला प्रांतीय सेवक—एका विभागातून दुसऱ्‍या विभागात प्रवास करणारा सेवक—म्हणून नेमण्यात आलं. या वेळेपर्यंत, झांबियात साक्षीदारांची संख्या ३५,००० पेक्षा अधिक झाली होती. नंतर, माझ्या ढासळत चाललेल्या तब्येतीमुळे मला पुन्हा कॉपरबेल्टमध्ये विभागीय पर्यवेक्षक म्हणून नेमण्यात आलं. कालांतरानं, जनेटची तब्येत बिघडली आणि १९८४ सालच्या डिसेंबर महिन्यात ती गेली; ती शेवटपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहिली होती.

तिच्या मृत्यूनंतर, माझ्या सत्यात नसलेल्या सासरकडच्या लोकांनी माझ्यावर असा आरोप केला की, मी चेटूक करून जनेटला मारलं होतं; तेव्हा मला खूप वाईट वाटलं. पण ज्यांना जनेटच्या आजाराविषयीची माहिती होती व जे तिच्या डॉक्टरांशी बोलले होते त्यांनी नातेवाईकांना सत्य काय ते सांगितलं. यानंतर आणखी एक परीक्षा माझ्यासमोर आली. काही नातेवाईकांची इच्छा होती की मी उकूप्यानिका म्हटली जाणारी पारंपरिक प्रथा पाळावी. मी ज्या भागातून आहे, तिथं ही प्रथा पाळली जाते; विवाहसोबती मरतो तेव्हा जिवंत असलेल्या विवाहसोबत्यानं मृत व्यक्‍तीच्या जवळच्या नातेवाईकाबरोबर लैंगिक संबंध ठेवण्याची ही प्रथा आहे. अर्थातच, मी याला विरोध केला.

कालांतरानं, नातेवाईकांकडून येणारा हा दबाव थांबला. स्थिर राहण्यासाठी मला शक्‍ती दिल्याबद्दल मी यहोवाचे आभार मानले. जनेटला जाऊन एक महिना झाल्यावर एक बांधव माझ्याकडे आला आणि मला म्हणाला: “बंधू कान्गाले, तुमच्या बायकोच्या मृत्यूच्या वेळी तुमच्याकडे पाहून आम्हाला खूप उत्तेजन मिळालं, कारण तुम्ही बायबलच्या विरुद्ध असलेल्या एकाही प्रथेमध्ये सामील झाला नाहीत. आम्ही तुमचे खूप आभार मानू इच्छितो.”

उत्तम कापणी

यहोवाच्या साक्षीदारांची पूर्ण वेळेची सेवा मी गेल्या ६५ वर्षांपासून करत आहे. या वर्षांमध्ये प्रवासी पर्यवेक्षक म्हणून मी सेवा केलेल्या भागात आता शेकडो मंडळ्या आहेत व अनेक राज्य सभागृहे बांधण्यात आली आहेत; हे सर्व पाहून मला खूप आनंद होतो. झांबियात १९४३ साली २,८०० साक्षीदार होते आणि आता त्यांची संख्या १,२२,००० पेक्षा अधिक झाली आहे. होय, १ कोटी दहा लाखांपेक्षा थोडी जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात गेल्या वर्षी ५,१४,००० लोक स्मारक विधीला उपस्थित होते!

आताही यहोवा माझी काळजी घेतो. मला, डॉक्टरांकडे जायचे असते तेव्हा एक बांधव मला दवाखान्यात नेतो. अजूनही मला जाहीर भाषणे देण्यासाठी अनेक मंडळ्या आमंत्रण देत असतात; यामुळे मलाही अनेक उभारणीकारक अनुभव मिळतात. मी ज्या मंडळीत आहे, तेथील ख्रिस्ती भगिनींना आळीपाळीनं माझं घर स्वच्छ करायला आणि बांधवांना, दर आठवडी माझ्यासोबत सभांना जाण्या-येण्यासाठी नेमण्यात आलं आहे. मी यहोवाची सेवा करत नसतो तर माझी इतक्या प्रेमळपणे कोणी काळजी घेतली नसती हे मला माहीत आहे. पूर्ण वेळेच्या सेवेत माझा उपयोग करून घेतल्याबद्दल व आतापर्यंत अनेक जबाबदाऱ्‍या सांभाळण्यास मला शक्‍ती दिल्याबद्दल मी यहोवाचे आभार मानतो.

आता माझ्या डोळ्यांना अंधुक दिसतं आणि राज्य सभागृहापर्यंत चालत जाताना मला वाटेत पुष्कळदा थांबावं लागतं. मी सभांना जी बॅग नेतो तीसुद्धा मला आजकाल वजनदार वाटू लागली आहे त्यामुळे सभांना जी पुस्तकं लागणार नाहीत ती पुस्तकं मी नेत नाही. बायबल अभ्यास घेणे हीच माझी क्षेत्र सेवा बनली आहे व ते विद्यार्थी माझ्या घरी शिकायला येत असतात. पण, मी माझ्या सरलेल्या आयुष्याकडे पाहतो तेव्हा मला खूप आनंद वाटतो; शिवाय, साक्षीदारांमध्ये झालेली उत्तम वाढ पाहूनही मला आनंद वाटतो. यशया ६०:२२ मधील यहोवाच्या शब्दांची उल्लेखनीय पूर्णता ज्या क्षेत्रात झाली आहे त्या क्षेत्रात मी सेवा केली आहे. त्या वचनात म्हटलं आहे: “जो सर्वात लहान त्याचे सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे बलाढ्य राष्ट्र होईल; मी परमेश्‍वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन.” खरंच, ही गोष्ट फक्‍त झांबियातच नव्हे तर संपूर्ण जगात पूर्ण होताना मी पाहिली आहे. *

[तळटीपा]

^ परि. 7 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले; परंतु सध्या ते छापले जात नाही.

^ परि. 50 दुःखाची गोष्ट म्हणजे, हा लेख प्रकाशनासाठी तयार होत असतानाच बंधू कान्गाले यांची तब्येत ढासळली आणि मृत्यूने त्यांना कवटाळले; ते आपल्या मृत्यूपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहिले.

[२४ पानांवरील चित्रे]

बंधू थॉम्सन आणि मागे झांबिया शाखेचा फोटो

[२६ पानांवरील चित्रे]

आजची झांबिया शाखा