व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धार्मिक चित्रांचा प्राचीन इतिहास

धार्मिक चित्रांचा प्राचीन इतिहास

धार्मिक चित्रांचा प्राचीन इतिहास

“चित्रांद्वारे देवाच्या व त्याच्या संतांच्या चांगुलपणाशी व पवित्रतेशी आपण जोडले जातो.”—ऑस्ट्रेलियातील आर्चबिशपचा ग्रीक ऑर्थोडॉक्स विभाग.

ऑगस्ट महिन्यातील या उकाड्याच्या दिवशी, आयजियन समुद्रातील टीनॉस बेटावरील “देवाची परमपवित्र माता” या देवळाच्या सिमेंटच्या पायऱ्‍यांवर सूर्य झळाळत आहे. २५,००० हून अधिक उत्सुक ग्रीक ऑर्थोडॉक्स यात्रेकरू येशूच्या मातेच्या शोभवलेल्या चित्रापर्यंत पोहंचण्यासाठी गोगलगाईच्या गतीने पुढे सरकरत आहेत आणि कडक उन्हाचा त्यांच्या उत्सुकतेवर जराही परिणाम झालेला नाही.

चेहऱ्‍यावर अधीरतेचा भाव असलेली एक अपंग तरुण मुलगी, असह्‍य वेदना होत असताही रक्‍तबंबाळ झालेल्या गुडघ्यांनी पुढे फरफटत चालली आहे. तिच्याच शेजाराहून एक म्हातारी बाई देशाच्या दुसऱ्‍या टोकाहून प्रवास करून आल्यामुळे थकून गेली आहे, तरी कशीबशी पावले पुढे टाकत राहायचा प्रयत्न करत आहे. गर्दीतून वाट काढत पुढे जाणारे एक मध्यमवयीन गृहस्थसुद्धा घामाने डबडबलेले आहेत. सर्वांची एकच इच्छा आहे: मरियेच्या चित्राचे चुंबन घेऊन त्यापुढे दंडवत घालणे.

हे श्रद्धाळू लोक देवाची उपासना प्रामाणिकपणाने करू इच्छितात यात शंका नाही. परंतु, यांपैकी किती जणांना हे ठाऊक आहे की, धार्मिक चित्रांची भक्‍ती मूलतः ख्रिस्ती धर्म सुरू होण्याच्या कित्येक शतकांआधीची प्रथा आहे?

चित्रांची व्याप्ती

ऑर्थोडॉक्स जगात, चित्रांचा सर्वत्र वापर केला जातो. चर्चच्या इमारतींमध्ये येशू, मरिया आणि अनेक “संत” यांची चित्रे प्रामुख्याने पाहायला मिळतात. सहसा भक्‍त या चित्रांची चुंबने घेतात, त्यांच्यासमोर धूप जाळतात, मेणबत्त्या लावतात. शिवाय, जवळजवळ प्रत्येक ऑर्थोडॉक्स घरात चित्रांचा एक देव्हारा असतो जेथे प्रार्थना म्हटल्या जातात. सहसा ऑर्थोडॉक्स ख्रिस्ती लोकांचे असे म्हणणे असते की, चित्रांची भक्‍ती करताना त्यांना देवाच्या समीप असल्यासारखे वाटते. पुष्कळांचा असा विश्‍वास आहे की, चित्रांमध्ये दैवी व चमत्कारिक शक्‍ती असते.

अशा लोकांना हे ऐकून आश्‍चर्य वाटेल की, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना उपासनेत चित्रांचा उपयोग करणे मान्य नव्हते. बायझंटियम हे पुस्तक म्हणते: “यहुदी धर्माकडून मूर्तिपूजेचा तिटकारा मानण्याची प्रवृत्ती मिळालेल्या प्रारंभिक ख्रिश्‍चनांना पवित्र व्यक्‍तींच्या चित्रांना पूज्य मानणे मुळीच मान्य नव्हते.” त्याच पुस्तकात पुढे म्हटले आहे: “पाचव्या शतकापासून पुढे, चित्रे किंवा प्रतिमा यांचा . . . सार्वजनिक तसेच खासगी उपासनेत अधिकाधिक उपयोग होऊ लागला.” जर धार्मिक चित्रांचा उपयोग पहिल्या शतकातील ख्रिस्ती धर्मातून सुरू झाला नाही तर मग ही प्रथा आली कोठून?

मूळ उगमाचा मागोवा

संशोधक व्हीताली इव्हानयिच पेत्रेन्को यांनी लिहिले: “प्रतिमांचा उपयोग व त्याची परंपरा ख्रिस्ती युगाच्या आधीपासून असून तिचे ‘मूळ मूर्तिपूजेत’ सापडते.” अनेक इतिहासकारांचे याबद्दल एकमत आहे की, चित्रांच्या उपासनेचे मूळ प्राचीन बॅबिलोन, ईजिप्त आणि ग्रीसच्या धर्मांमध्ये आढळते. उदाहरणार्थ, प्राचीन ग्रीसमध्ये धार्मिक प्रतिमा मूर्तींच्या रूपात होत्या. या मूर्तींमध्ये दैवी शक्‍ती असल्याचा विश्‍वास केला जात होता. लोकांचा असा विचार होता की, यातील काही प्रतिमा हातांनी बनवलेल्या नव्हत्या तर थेट स्वर्गातून खाली पडल्या होत्या. खास सणांदरम्यान, पूज्य मानल्या जाणाऱ्‍या या प्रतिमांची शहरातून मिरवणूक काढली जात व त्यांना अर्पणे वाहिली जात होती. “दैवते आणि त्यांच्या प्रतिमा यात फरक करायचा . . . प्रयत्न करूनही धार्मिक लोक या पूज्य प्रतिमांनाच दैवत मानत होते,” असे पेत्रेन्को म्हणतात.

या कल्पनांचा आणि प्रथांचा ख्रिस्ती धर्मात कसा शिरकाव झाला? त्याच संशोधकाने असे निरीक्षण केले की, ख्रिस्ताच्या प्रेषितांच्या मृत्यूनंतरच्या शतकांमध्ये, खासकरून ईजिप्त येथे, “ख्रिस्ती विश्‍वासांना ‘मूर्तिपूजक कल्पनांच्या मिश्रणाचा’ सामना करावा लागला; ख्रिस्ती विश्‍वास व प्रथांसोबत ईजिप्शियन, ग्रीक, यहुदी, पौर्वात्य आणि रोमन प्रथा व विश्‍वास देखील पाळले जात होते.” परिणामस्वरूप, “ख्रिस्ती कारागीरांनी [मिश्र विश्‍वासाची] पद्धत अनुसरली व मूर्तिपजक प्रतीकांना मूर्तिपूजक प्रभावापासून पूर्णतः शुद्ध केले नसले तरी त्यांना नवीन अर्थ देऊन ते त्यांचा वापर करू लागले.”

पाहता पाहता, सार्वजनिक तसेच खासगी धार्मिक विधींमध्ये चित्रांना जास्त महत्त्व दिले जाऊ लागले. विश्‍वासाचे युग (इंग्रजी) या पुस्तकात, इतिहासकार विल ड्यूरंट, हे कसे घडले त्याचा खुलासा देतात: “पूज्य मानल्या जाणाऱ्‍या संतांची संख्या वाढत गेली तसे त्यांना ओळखण्याची व आठवणीत ठेवण्याची गरज भासू लागली; त्यांची व मरियेची असंख्य चित्रे बनवण्यात येऊ लागली; आणि ख्रिस्ताचे केवळ काल्पनिक स्वरूप नव्हे तर त्याच्या क्रूसाचीही उपासना केली जाऊ लागली—सामान्य माणसे तर या वस्तूंमध्ये जादुई शक्‍ती आहे असेही मानू लागले. लोकांच्या कल्पकतेने पवित्र स्मारक, चित्र आणि मूर्तींना पूज्य वस्तूंचे स्वरूप दिले; लोक त्यांच्यापुढे नमस्कार करू लागले, त्यांचे चुंबन घेऊ लागले, मेणबत्त्या आणि अगरबत्त्या लावू लागले, त्यांना फुले वाहू लागले व त्यांच्या अलौकिक शक्‍तींमुळे चमत्कार घडण्याची अपेक्षा करू लागले. . . . पाळक आणि चर्चच्या मंडळाचे सभासद वारंवार समजावून सांगत होते की, या प्रतिमा दैवत नसून फक्‍त त्यांची आठवण करून देण्यासाठी होत्या; पण लोकांनी हा भेद मानला नाही.”

आज, धार्मिक चित्रांचा उपयोग करणारे पुष्कळजण अशाचप्रकारे म्हणतील की, प्रतिमा केवळ आदराच्या वस्तू आहेत—त्यांची भक्‍ती आम्ही करत नाही. त्यांचा दावा असेल की, देवाची उपासना करण्यासाठी धार्मिक चित्रे योग्य आहेत—इतकेच नव्हे तर आवश्‍यक आहेत. कदाचित तुम्हालाही असेच वाटत असावे. पण प्रश्‍न असा आहे की, देवाला याबद्दल काय वाटते? एखाद्या चित्राला पूज्य मानणे हे त्याची उपासना करण्यासारखे आहे का? या प्रथांमध्ये काही धोके दडलेले असावेत का?

[४ पानांवरील चौकट/चित्र]

धार्मिक चित्र म्हणजे काय?

रोमन कॅथोलिक उपासनेत सर्रास वापरल्या जाणाऱ्‍या मूर्तींसारखी ही धार्मिक चित्रे नसतात तर ती द्विमिती असतात; ख्रिस्त, मरिया, “संत,” देवदूत, बायबलमधील व्यक्‍ती व घटना किंवा ऑर्थोडॉक्स चर्चच्या इतिहासातील घटना यांची ही चित्रे असतात. सहसा ही चित्रे, वाहून नेण्यासारख्या लाकडी तक्‍त्‌यांवर रंगवलेली असतात.

ऑर्थोडॉक्स चर्चच्या मते, “संतांच्या चित्रांमध्ये, ही चित्रे सर्वसाधारण रक्‍त-मांसाच्या चित्रांसारखी दिसत नाहीत.” त्याचप्रमाणे या धार्मिक चित्रांमध्ये “चित्रे मागून पुढे याप्रमाणे” असतात, म्हणजे, चित्रातल्या दूरच्या गोष्टी लहान होत जात नाहीत. सहसा, “छायेचा वापर केलेला नसतो, किंवा रात्र आणि दिवस यांच्यातील फरक स्पष्ट करण्याची पद्धत नसते.” असाही विश्‍वास केला जातो की, चित्रातील रंगात व लाकडात “देव उतरू शकतो.”

[४ पानांवरील चित्र]

प्रतिमांचा उपयोग मूर्तिपूजक प्रथांमधून सुरू झाला

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

© AFP/CORBIS