‘आपण सर्वांचे बरे करावे’
“माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन”
‘आपण सर्वांचे बरे करावे’
देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करणे आणि तिच्याविषयी लोकांना शिकवणे हे येशूचे सर्वात महत्त्वाचे कार्य होते. (मार्क १:१४; लूक ८:१) ख्रिस्ताचे अनुयायी त्याचे अनुकरण करू इच्छित असल्यामुळे देवाच्या राज्याच्या बायबलमधील संदेशाविषयी शिकवण्याच्या कार्याला ते जीवनातले सर्वात महत्त्वाचे कार्य समजतात. (लूक ६:४०) जे लोक राज्याचा संदेश स्वीकारतात त्यांना तजेला मिळतो (ज्याप्रमाणे येशू पृथ्वीवर असताना इतरांना त्यापासून तजेला मिळाला होता) हे पाहून यहोवाच्या साक्षीदारांना मनस्वी आनंद होतो.—मत्तय ११:२८-३०.
देवाचे वचन शिकवण्याशिवाय, येशूने इतर चांगली कृत्ये केली; जसे की, त्याने रोग्यांना बरे केले आणि उपाशी असलेल्यांना जेवू घातले. (मत्तय १४:१४-२१) त्याचप्रमाणे यहोवाचे साक्षीदारही बायबल शिकवण्याचे कार्य करण्याव्यतिरिक्त गरजवंत लोकांची मदत करतात. कारण, शास्त्रवचने ख्रिश्चनांना “प्रत्येक चांगल्या कामासाठी” सज्ज करतात व ‘सर्वांचे बरे करण्यास’ उत्तजेन देतात. (तिरपे वळण आमचे.)—२ तीमथ्य ३:१६, १७; गलतीकर ६:१०.
“आपले बांधव मदतीला धावून आले”
सप्टेंबर १९९९ साली, तायवानला एका विध्वंसक भूकंपाचा हादरा बसला. काही महिन्यांनंतर, मूसळधार पाऊस आणि भूघसरणीमुळे व्हेनेझुएलाच्या इतिहासात कधीही घडली नव्हती अशी भयंकर नैसर्गिक विपत्ती घडली. अगदी अलीकडे, मोझांबिक हा देश तीव्र रीतीने पूरग्रस्त होता. या तिन्ही प्रसंगी, यहोवाचे साक्षीदार विपत्तीग्रस्त लोकांसाठी अन्न, पाणी, औषधे, कपडालत्ता, तंबू आणि स्वयंपाकाची सामग्री घेऊन तत्काळ घटनास्थळी पोहंचले. वैद्यकीय कौशल्ये असलेल्या स्वयंसेवकांनी जखमी लोकांवर उपचार करण्यासाठी तात्पुरत्या दवाखान्यांची सोय केली आणि स्वयंसेवेने बांधकामाचे काम करणाऱ्यांनी बेघर झालेल्यांना नवीन घरे बांधून दिली.
विपत्तीग्रस्तांना वेळेवर मदत मिळाल्यामुळे त्यांचे अंतःकरण भरून आले. व्हेनेझुएलातील भूघसरणीत जिचे घर नष्ट झाले ती माल्योरी म्हणते: “आम्हाला जास्त गरज होती तेव्हा आपले बांधव मदतीला धावून आले.” स्वयंसेवकांनी तिच्या कुटुंबासाठी *
एक नवीन घर बांधून दिल्यावर माल्योरीने असे उद्गार काढले: “यहोवाने आमच्यासाठी जे काही केले आहे त्याचे पूर्णपणे आभार आम्ही कधीच मानू शकणार नाही!” आणि मोझांबिकमधील पूरग्रस्तांना त्यांच्या नवीन घरांच्या चाव्या देण्यात आल्या तेव्हा सगळ्यांनी एकदम “यहोवा आपुला आसरा” हे राज्य गीत गायला सुरवात केली.गरजू लोकांची मदत केल्यामुळे स्वयंसेवकांनाही तजेला मिळाला. “इतका त्रास सहन केलेल्या या बांधवांची मदत केल्यावर किती बरं वाटलं,” असे मोझांबिकच्या एका निर्वासितांच्या छावणीत नर्स म्हणून काम करत असलेल्या मार्सेलोने म्हटले. तायवानमधील एक स्वयंसेवक, ह्वांग म्हणाला: “गरजू बांधवांना अन्नसामग्री व तंबू देत असताना मला खूप आनंद वाटला. यामुळे माझा विश्वास बळकट झाला.”
यशस्वी ठरलेला स्वयंसेवी कार्यक्रम
स्वयंसेवी कार्यामुळे जगभरातील हजारो कैद्यांनाही आध्यात्मिक तजेला मिळाला आहे. तो कसा? अलीकडील वर्षांमध्ये, यहोवाच्या साक्षीदारांनी केवळ अमेरिकेतील सुमारे ४,००० तुरुंगांमध्ये ३०,००० हून अधिक व्यक्तींना बायबलचे साहित्य पुरवले. शिवाय, शक्य तेथे साक्षीदार व्यक्तिशः, तुरुंगांमध्ये जाऊन कैद्यांसोबत बायबलचा अभ्यास करतात किंवा ख्रिस्ती सभा चालवतात. कैद्यांना याचा लाभ होतो का?
बायबलचा अभ्यास करणारे काही कैदी, इतर कैद्यांना देवाच्या वचनातील तजेलादायक शिकवणींविषयी सांगतात. त्यामुळे, जगभरात सध्या अनेक तुरुंगांमध्ये कैद्यांचे काही गट आहेत जे एकत्र मिळून यहोवाची उपासना करतात. २००१ साली, अमेरिकेतील ओरेगॉन येथील एका कैद्याने म्हटले, “आमच्या गटात भरभराट होऊ लागली आहे. आमच्यामध्ये ७ जण राज्य प्रकाशक आहेत आणि आम्ही ३८ बायबल अभ्यास चालवत आहोत. २५ हून अधिक लोक जाहीर भाषणाला व टेहळणी बुरूज अभ्यासाला उपस्थित राहतात आणि [ख्रिस्ताच्या मृत्यूच्या] स्मारक विधीसाठी आमच्याकडची उपस्थिती ३९ इतकी होती. आणखी तीन व्यक्तींचा बाप्तिस्मा लवकरच होणार आहे!”
फायदे आणि आनंद
तुरुंग अधिकाऱ्यांना हे दिसू लागले आहे की, या स्वयंसेवी कार्यक्रमाचा खरोखर परिणाम होतो. परंतु, या स्वयंसेवी कार्यक्रमाचा परिणाम दीर्घकाळापर्यंत टिकतो यामुळे अधिकारी खरे तर प्रभावित होतात. एका अहवालानुसार: “हा कार्यक्रम १० वर्षांआधी सुरू झाला तेव्हापासून तुरुंगात यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतलेला एकही कैदी सुटल्यावर तुरुंगात पुन्हा आला नाही—पण, इतर गटातील ५०-६० टक्के कैदी तुरुंगात पुन्हा आले.” साक्षीदार स्वयंसेवकांना मिळालेल्या परिणामांनी प्रभावित होऊन इडाहो येथील एका तुरुंगातल्या पाळकांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयाला पत्र लिहून असे म्हटले: “मला स्वतःला तुमचे धार्मिक विश्वास मान्य नसले तरी तुमच्या सुव्यवस्थेने मी प्रभावित झालो आहे.”
तुरुंगातील लोकांना मदत केल्याचा फायदा स्वयंसेवकांनाही होतो. कैद्यांच्या एका समूहाबरोबर सभा घेऊन त्यांनी पहिल्याच वेळी राज्य गीत गायिले त्याविषयी एका स्वयंसेवकाने लिहिले: “२८ पुरुषांनी मिळून यहोवाचे गुणगान केले हे पाहून आम्हाला खूप उत्तेजन मिळालं. आणि ते सगळे मोठ्याने गात होते! अशा प्रसंगी आम्ही तिथं होतो हा किती मोठा सुहक्क!” ॲरिझोनातील तुरुंगांना भेटी देणाऱ्या एका स्वयंसेवकाने म्हटले: “या खास कार्यात सामील व्हायला मिळालं हा किती मोठा आशीर्वाद म्हणायचा!”
येशूने म्हटले: “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे;” जगभरातल्या साक्षीदार स्वयंसेवकांचे याजशी सहमत असेल. (प्रेषितांची कृत्ये २०:३५) ते या गोष्टीलाही पुष्टी देतात की, सर्वांचे चांगले करण्याविषयी बायबलचा सल्ला अनुसरल्याने निश्चितच तजेला मिळतो.—नीतिसूत्रे ११:२५.
[तळटीप]
^ परि. 7 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या यहोवाचे गुणगान करा पुस्तिकेतील गीत क्रमांक ११ पाहा.
[८ पानांवरील चित्र]
व्हेनेझुएला
[८ पानांवरील चित्र]
तायवान
[८ पानांवरील चित्र]
मोझांबिक