व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ते सत्यात चालत राहतात

ते सत्यात चालत राहतात

ते सत्यात चालत राहतात

“माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्‍या कशानेहि होत नाही.”—३ योहान ४.

१. ‘सुवार्तेचे सत्य’ कशावर केंद्रित आहे?

यहोवा केवळ अशा लोकांना आपली संमती देतो जे त्याची उपासना “आत्म्याने व सत्याने” करतात. (योहान ४:२४, NW) ते सत्याचे पालन करतात, म्हणजेच देवाच्या वचनावर आधारित असलेल्या सर्व ख्रिस्ती शिकवणुकींचा ते स्वीकार करतात. हे ‘सुवार्तेचे सत्य’ आहे जे येशू ख्रिस्तावर आणि राज्याच्या माध्यमाने यहोवाच्या सार्वभौमत्वाच्या दोषनिवारणावर केंद्रित आहे. (गलतीकर २:१४) जे खोट्या शिकवणुकी पसंत करतात “त्यांच्या ठायी [देव] भ्रांतीचे कार्य” चालू देतो, पण तारण हे सुवार्तेवर विश्‍वास ठेवून सत्यात चालत राहण्यावर अवलंबून आहे.—२ थेस्सलनीकाकर २:९-१२; इफिसकर १:१३, १४.

२. प्रेषित योहान खासकरून कशाविषयी कृतज्ञ होता आणि गायससोबत त्याचा कशाप्रकारचा नातेसंबंध होता?

राज्य उद्‌घोषक ‘सत्यामध्ये सहकारी’ आहेत. प्रेषित योहान व त्याचा मित्र गायस यांच्याप्रमाणे ते खंबीरपणे सत्याला जडून राहतात व त्यात चालत राहतात. गायसविषयी योहानाने लिहिले: “माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्‍या कशानेहि होत नाही.” (३ योहान ३-८) वयोवृद्ध योहानाने स्वतः गायसला सत्याची ओळख करून दिली नव्हती तरीसुद्धा, प्रेषित योहानाचे वय, ख्रिस्ती जीवनातील अनुभव आणि पितृतुल्य प्रीतीमुळे गायससारख्या वयाने लहान असलेल्या व्यक्‍तीला योहानाच्या आध्यात्मिक मुलांमध्ये गणणे उचितच होते.

सत्य व ख्रिस्ती उपासना

३. सुरवातीच्या ख्रिश्‍चनांच्या सभांचा उद्देश व लाभ काय होता?

सत्य शिकण्याकरता, सुरवातीचे ख्रिस्ती सहसा खासगी घरांमध्ये मंडळी या नात्याने एकत्रित होत असत. (रोमकर १६:३-५) या सभांद्वारे त्यांना प्रोत्साहन आणि प्रीती व सत्कर्मे करण्याची प्रेरणा मिळत असे. (इब्री लोकांस १०:२४, २५) नंतरच्या काळातील ख्रिश्‍चनांच्या बाबतीत टर्टुलियनने (सा.यु. १५५-२२० च्या सुमारास) असे लिहिले: “आम्ही देवाची पुस्तके वाचण्याकरता एकत्रित होतो . . . त्या पवित्र वचनांकरवी आम्ही आमच्या विश्‍वासास पुष्टी देतो, आमची आशा प्रज्वलित करतो आणि आमची खात्री अधिक दृढ करतो.”—अपॉलॉजी, अध्याय ३९.

४. ख्रिस्ती सभांमध्ये गीत गाणे कितपत अंतर्भूत आहे?

बहुधा गीत गाणे देखील सुरवातीच्या ख्रिस्ती सभांमध्ये समाविष्ट असावे. (इफिसकर ५:१९; कलस्सैकर ३:१६) प्राध्यापक हेन्री कॅडविक यांनी लिहिले की दुसऱ्‍या शतकातील समीक्षक सेल्सस याला तथाकथित ख्रिस्ती लोकांची सुरेल गीते इतकी “मोहक वाटायची की आपल्या भावनांवर होणाऱ्‍या या गीतांच्या प्रभावामुळे त्याला अक्षरशः राग येत असे.” कॅडविक पुढे म्हणतात की “ख्रिस्ती लोकांकरता कोणत्या प्रकारचे संगीत उचित आहे याविषयी चर्चा करणारा सर्वात पहिला ख्रिस्ती लेखक क्लेमेंट ऑफ ॲलेक्झांड्रिया हा होता. त्याने असे मार्गदर्शन दिले की प्रक्षोभक नृत्याच्या संगीताशी संबंधित असलेले संगीत ते असू नये.” (दी अर्ली चर्च, पृष्ठे २७४-५) मूळ ख्रिश्‍चन ज्याप्रमाणे त्यांच्या सभांमध्ये गात होते त्याचप्रमाणे यहोवाचे साक्षीदार बायबलवर आधारित असलेली गीते गातात; यात देवाची व त्याच्या राज्याची स्तुती करण्याकरता उत्साही स्तोत्रांचा समावेश आहे.

५. (अ) सुरवातीच्या ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये आध्यात्मिक मार्गदर्शन कशाप्रकारे पुरवले जात होते? (ब) खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी मत्तय २३:८, ९ येथील येशूचे शब्द कशाप्रकारे लागू केले आहेत?

सुरवातीच्या ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये, पर्यवेक्षक सत्य शिकवायचे आणि सेवा सेवक वेगवेगळ्या मार्गांनी सहविश्‍वासू बांधवांना मदत करायचे. (फिलिप्पैकर १:१) देवाच्या वचनावर व पवित्र आत्म्यावर अवलंबून राहणारे एक नियमन मंडळ आध्यात्मिक मार्गदर्शन पुरवायचे. (प्रेषितांची कृत्ये १५:६, २३-३१) धार्मिक पदव्या वापरल्या जात नव्हत्या कारण येशूने आपल्या शिष्यांना स्पष्टपणे आज्ञा दिली होती: “आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका; कारण तुमचा गुरु एक आहे व तुम्ही सर्व भाऊभाऊ आहा. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे, तो स्वर्गीय आहे.” (मत्तय २३:८, ९) या व इतर अनेक बाबतीत सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांत व यहोवाच्या साक्षीदारांत साम्य आहे.

सत्याचा प्रचार केल्यामुळे छळ

६, ७. ख्रिस्ती लोक एक शांतीदायक संदेश घोषित करतात तरीसुद्धा त्यांना कशाप्रकारची वागणूक देण्यात आली आहे?

सुरवातीच्या ख्रिश्‍चनांनी राज्याचा शांतीदायक संदेश घोषित केला तरीसुद्धा येशूप्रमाणेच त्यांचा देखील छळ करण्यात आला. (योहान १५:२०; १७:१४) इतिहासकार जॉन एल. वॉन मोशीम याने पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचे अशाप्रकारे वर्णन केले: “सर्वात निरुपद्रवी, अबाधक स्वभावाचे लोक, ज्यांच्या मनात राष्ट्राच्या कल्याणाला बाधक ठरेल अशाप्रकारची इच्छा किंवा विचारही स्पर्शला नाही.” डॉ. मोशीम यांनी असे म्हटले की “रोमनांना ख्रिश्‍चनांच्या साध्या उपासना पद्धतीमुळे त्यांचा राग येत असे. कारण त्यांची उपासना इतर धर्मांच्या पवित्र रितीरिवाजांपेक्षा अगदीच वेगळी होती.” त्यांनी पुढे म्हटले: “त्यांच्या उपासनेत बलिदाने नव्हती, मंदिर, मूर्ती, कौल घेण्याचे स्थान किंवा पुरोहित नव्हते; आणि ज्यात अशाप्रकारचे पवित्र विधी नाहीत तो कसला धर्म असे समजणाऱ्‍या अशिक्षित जनसामान्यांकरता, त्यांना तुच्छ लेखण्यासाठी हे कारण पुरेसे होते. त्यामुळे ख्रिश्‍चनांना नास्तिक समजले जात होते आणि रोमी कायद्यांनुसार नास्तिक लोक मानवी समाजाकरता त्रासदायक समजले जात होते.”

मूर्तिपूजेवर ज्यांचा उदरनिर्वाह चालायचा ते याजक, शिल्पकार आणि इतरजण लोकांना ख्रिश्‍चनांविरुद्ध चिथवू लागले कारण ते मूर्तिपूजक प्रथांमध्ये सहभाग घेत नव्हते. (प्रेषितांची कृत्ये १९:२३-४०; १ करिंथकर १०:१४) टर्टुलियनने लिहिले: “राष्ट्रावर येणाऱ्‍या प्रत्येक संकटाकरता, लोकांच्या सर्व दुर्दैवांकरता ख्रिश्‍चनांना जबाबदार धरले जाते. टायबर नदीला पूर येवो, नाईल नदीचे पाणी आटो, पाऊस पडायचा राहो नाहीतर भूकंप होवो, दुष्काळ येवो किंवा मरी पसरो, लगेच लोक ओरड करतात: ‘ख्रिश्‍चनांना सिंहापुढे फेका!’” परंतु, परिणाम काहीही होवो, खरे ख्रिस्ती मात्र ‘स्वतःस मूर्तींपासून दूर राखतात.’—१ योहान ५:२१.

सत्य व धार्मिक प्रथा

८. सत्यात चालणारे नाताळ का साजरा करत नाहीत?

सत्यात चालणारे बायबलच्या विरोधात असलेल्या प्रथा टाळतात कारण “उजेड व अंधार यांचा मिलाफ” होऊ शकत नाही. (२ करिंथकर ६:१४-१८) उदाहरणार्थ, २५ डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा नाताळ ते पाळत नाहीत. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया यात कबूल केले आहे, की “ख्रिस्ताच्या जन्माची नेमकी तिथी कोणालाही माहीत नाही.” एन्सायक्लोपिडिया अमेरिकाना (१९५६ ची आवृत्ती) यात म्हटले आहे: “डिसेंबर महिन्यात साजरी केली जाणारी रोमी मेजवानी सॅटर्नालिया नाताळाच्या अनेक प्रथांकरता एक नमुना ठरली.” मॅक्लिंटॉक व स्ट्राँग यांच्या सायक्लोपिडियामध्ये असे सांगितले आहे: “नाताळाचा सण साजरा करण्याची आज्ञा देवाने दिलेली नाही, शिवाय नव्या करारातून या प्रथेची उत्पत्ती झाली नाही.” डेली लाईफ इन द टाईम ऑफ जीझस यात असे म्हटले आहे, ‘हिवाळ्यादरम्यान कळप बाहेर जात नसत; आणि यावरूनच असे कळून येते की नाताळाची हिवाळ्यात येणारी पारंपरिक तिथी योग्य असू शकतच नाही कारण शुभवर्तमानांत असे म्हटले आहे की मेंढपाळ तेव्हा शेतात होते.’—लूक २:८-११.

९. गतकाळातील व सध्याचे यहोवाचे सेवक ईस्टर सण का साजरा करत नाहीत?

ईस्टर ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो असे म्हणतात, पण विश्‍वसनीय सूत्रे याचा संबंध खोट्या उपासनेशी लावतात. वेस्टमिन्सटर डिक्शनरी ऑफ द बायबल यात म्हटले आहे की ईस्टर हा “मुळात अँग्लो सॅक्सन भाषेत प्रकाश व वसंत ऋतूची जर्मेनिक जमातीची देवी ईस्ट्रे (किंवा इऑस्ट्रे) हिच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा वसंत ऋतूतील सण होता.” काहीही असो, एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका यातील (११ व्या आवृत्तीत) असे म्हटले आहे: “ईस्टर सण पाळण्याविषयी नव्या करारात काहीही संकेत आढळत नाही.” ईस्टर हा सुरवातीच्या ख्रिस्ती धर्मातील सण नव्हता आणि आज यहोवाचे लोक तो साजरा करत नाहीत.

१०. येशूने कोणता समारंभ स्थापित केला आणि कोण तो उचितपणे साजरा करतात?

१० येशूने आपल्या अनुयायांना त्याचा जन्म अथवा त्याच्या पुनरुत्थानाच्या प्रीत्यर्थ सण साजरा करण्याची आज्ञा दिली नव्हती, पण त्याच्या बलिदानरूपी मृत्यूचा स्मारकविधी मात्र त्याने स्थापित केला होता. (रोमकर ५:८) किंबहुना ही एकच घटना त्याने आपल्या शिष्यांना पाळण्यास सांगितली. (लूक २२:१९, २०) या विधीला प्रभूचे सांज भोजन असेही म्हणतात आणि आजपर्यंत यहोवाचे साक्षीदार ही वार्षिक घटना साजरी करतात.—१ करिंथकर ११:२०-२६.

सबंध पृथ्वीवर घोषित केलेले सत्य

११, १२. सत्यात चालणाऱ्‍यांनी पूर्वीपासून कशाच्या साहाय्याने प्रचार कार्यास हातभार लावला?

११ ज्यांना सत्याचे ज्ञान मिळाले आहे ते सुवार्तेच्या प्रचाराकरता स्वतःचा वेळ, शक्‍ती व इतर साधनसंपत्ती खर्च करणे यास एक बहुमान समजतात. (मार्क १३:१०) सुरवातीचे ख्रिस्ती प्रचार कार्य ऐच्छिक अनुदानांच्या साहाय्याने केले जात होते. (२ करिंथकर ८:१२; ९:७) टर्टुलियनने लिहिले: “दानपेटी असली तरीसुद्धा, ही पेटी प्रवेश मिळण्याकरता दिलेले पैसे गोळा करण्यासाठी नव्हती; धर्म हा व्यापार नाही. दर महिन्यात किंवा आपली इच्छा असेल तेव्हा आणि इच्छा असेल तर प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार लहानमोठे दान आणायचा; कोणावरही जबरदस्ती केली जात नसे; हे ऐच्छिक अनुदान होते.”—अपॉलॉजी, अध्याय ३९.

१२ यहोवाच्या साक्षीदारांचे राज्य प्रचाराचे जगव्याप्त कार्य देखील ऐच्छिक अनुदानांकरवी चालते. साक्षीदारांव्यतिरिक्‍त कृतज्ञ मनोवृत्तीचे आस्थेवाईक लोक देखील या कार्याला आर्थिक हातभार लावण्यास आपला बहुमान समजतात. या बाबतीतसुद्धा, आरंभीच्या ख्रिस्ती लोकांत व यहोवाच्या साक्षीदारांत साम्य आहे.

सत्य व वैयक्‍तिक आचरण

१३. आचरणासंबंधी पेत्राच्या कोणत्या सल्ल्याचे यहोवाचे साक्षीदार पालन करतात?

१३ सत्यात चालणारे या नात्याने प्रारंभिक ख्रिस्ती, प्रेषित पेत्राच्या पुढील सल्ल्याच्या अनुसार वागले आहेत: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्‍यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हांविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.” (१ पेत्र २:१२) यहोवाचे साक्षीदार हे शब्द अतिशय गांभीर्याने घेतात.

१४. अनैतिक मनोरंजनाविषयी ख्रिश्‍चनांचा काय दृष्टिकोन आहे?

१४ धर्मत्यागाचा शिरकाव झाल्यानंतरही नाममात्र ख्रिस्ती अनैतिक कार्ये टाळत होते. धर्मोपदेशकीय इतिहासाचे प्राध्यापक डब्ल्यू. डी. किलन यांनी लिहिले: “दुसऱ्‍या व तिसऱ्‍या शतकात प्रत्येक मोठ्या शहरातील मनोरंजनगृह आकर्षणाचे केंद्र होते; आणि येथे अभिनय करणारे सहसा अतिशय चारित्र्यहीन असले तरीसुद्धा त्यांच्या अभिनयकृती त्या कालाखंडातील लोकांच्या हीन वासना सदैव पुऱ्‍या करत होत्या. . . . सर्व खरे ख्रिस्ती नाट्यसृष्टीचा मनापासून तिरस्कार करत होते. . . . तेथील बीभत्सपणा त्यांना घृणास्पद वाटायचा; आणि गैरख्रिस्ती देव देवतांची सतत विनवणी करणे त्यांच्या धार्मिक विश्‍वासांच्या विरोधात होते.” (प्राचीन चर्च, इंग्रजी, पृष्ठे ३१८-१९) आज येशूचे खरे अनुयायी देखील बीभत्स व नैतिकरित्या हीन दर्जाचे मनोरंजन टाळतात.—इफिसकर ५:३-५.

सत्य व ‘वरिष्ठ अधिकारी’

१५, १६. ‘वरिष्ठ अधिकारी’ कोण आहेत आणि सत्यात चालणारे त्यांना कोणत्या दृष्टीने पाहतात?

१५ आरंभीच्या ख्रिश्‍चनांचे उत्तम आचरण असूनही बहुतेक रोमी सम्राटांनी त्यांच्याविषयी वाईट मत बनवले. इतिहासकार ई. जी. हार्डी म्हणतात की सम्राटांच्या दृष्टीने ते “काहीसे तुच्छ असणारे धर्मवेडे” होते. बिथिनियाचा सुभेदार प्लिनी द यंग आणि सम्राट ट्राजन यांच्यातील पत्रव्यवहारातून असे स्पष्ट होते की शासक वर्गाला ख्रिस्ती धर्माच्या खऱ्‍या स्वरूपाची कल्पना नव्हती. ख्रिस्ती लोकांचा सरकारकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे?

१६ येशूच्या सुरवातीच्या अनुयायांप्रमाणे यहोवाचे साक्षीदार देखील सरकारच्या “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या” सापेक्ष अधीनतेत आहेत. (रोमकर १३:१-७) मनुष्याची मागणी आणि देवाची इच्छा या दोन्हींतून एक निवडण्याची पाळी आल्यास ते अशाप्रकारची मनोवृत्ती अवलंबतात: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रेषितांची कृत्ये ५:२९) येशूनंतर—ख्रिस्ती धर्माचा उत्कर्ष (इंग्रजी), या पुस्तकात असे म्हटले आहे: “ख्रिस्ती, सम्राटाच्या उपासनेत सहभागी होत नसले तरीसुद्धा ते उपद्रवी नव्हते आणि त्यांचा धर्म मूर्तिपूजक धर्मांच्या दृष्टीने काहीसा विचित्र आणि काहीवेळा चीड आणणारा असला तरीसुद्धा, साम्राज्याला त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा धोका नव्हता.”

१७. (अ) सुरवातीचे ख्रिस्ती कोणत्या सरकारचे समर्थक होते? (ब) ख्रिस्ताच्या खऱ्‍या अनुयायांनी यशया २:४ येथील शब्दांचे आपल्या जीवनात कशाप्रकारे पालन केले आहे?

१७ अब्राहाम, इसहाक आणि याकोब या कुलपित्यांनी ज्याप्रमाणे प्रतिज्ञेनुसार ‘देवाने बांधलेल्या नगराविषयी’ विश्‍वास बाळगला त्याचप्रमाणे सुरवातीचे ख्रिस्ती देखील देवाच्या राज्याचे समर्थक होते. (इब्री लोकांस ११:८-१०) आपला धनी येशू याच्याप्रमाणे ते ‘जगाचे नव्हते.’ (योहान १७:१४-१६) मानवी युद्धे व लढायांच्या संबंधाने पाहिल्यास, त्यांनी ‘आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करण्याद्वारे’ शांतीचा मार्ग धरला होता. (यशया २:४) एका रोचक साम्यतेकडे लक्ष वेधत चर्च इतिहासाचे प्राध्यापक जेफ्री एफ. नटॉल यांनी म्हटले: “आम्हाला कबूल करण्यास तितके सोपे जात नाही, परंतु सुरवातीच्या ख्रिश्‍चनांची युद्धांसंबंधीची भूमिका ही स्वतःला यहोवाचे साक्षीदार म्हणणाऱ्‍या लोकांशी मिळतीजुळती होती.”

१८. कोणत्याही सरकारने यहोवाच्या साक्षीदारांना घाबरण्याचे कारण का नाही?

१८ “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या” अधीन राहणारे व कोणाचाही पक्ष न घेणारे ख्रिस्ती कोणत्याही राजकीय गटाकरता धोकेदायक नव्हते—आणि यहोवाचे साक्षीदार देखील नाहीत. एका उत्तर अमेरिकन संपादकाने असे लिहिले: “यहोवाचे साक्षीदार कोणत्याही राजकीय सरकारला काही नुकसान करतील असे मानणे अतिशय दुराग्रही आणि संशयखोर विचारसरणी असलेल्यांनाच शक्य आहे. ते इतर कोणत्याही धार्मिक गटापेक्षा अधिक एकनिष्ठ आणि शांतताप्रिय आहेत.” सुजाण अधिकारी जाणतात की यहोवाच्या साक्षीदारांकडून त्यांना कसलाही धोका नाही.

१९. कर भरण्याच्या बाबतीत, सुरवातीच्या ख्रिश्‍चनांबद्दल व यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काय म्हणता येईल?

१९ एक मार्ग ज्याद्वारे सुरवातीच्या ख्रिश्‍चनांनी ‘वरिष्ठ आधिकाऱ्‍यांना’ आदर दाखवला तो म्हणजे कर भरण्याद्वारे. रोमी सम्राट ॲन्टोनियस पायस याला लिहिताना जस्टिन मार्टर याने ठामपणे सांगितले की ख्रिस्ती लोक “इतर सर्वांच्या तुलनेत कर भरण्याच्या बाबतीत तत्पर आहेत.” (फर्स्ट अपॉलॉजी, अध्याय १७) आणि टर्टुलियनने रोमी अधिकाऱ्‍यांना सांगितले की त्यांचे करवसूली करणारे खरेतर प्रामाणिकपणे कर भरणाऱ्‍या ‘ख्रिश्‍चनांचे ऋणी’ आहेत. (अपॉलॉजी, अध्याय ४२) पॅक्स रोमाना अर्थात रोमी शांतीचा ख्रिश्‍चनांना फायदा झाला कारण त्याअंतर्गत कायदा व सुव्यवस्था, चांगले रस्ते, आणि तुलनात्मकरित्या सुरक्षित समुद्र प्रवासाच्या सोयी उपलब्ध होत्या. समाजाप्रती आपल्या कर्तव्याची जाण ठेवून त्यांनी येशूच्या पुढील शब्दांचे पालन केले: “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” (मार्क १२:१७) आज यहोवाचे साक्षीदार देखील याच सल्ल्याचे पालन करतात आणि त्यांच्या प्रामाणिकतेबद्दल, उदाहरणार्थ कर भरण्याच्या बाबतीत, त्यांची स्तुती करण्यात आली आहे.—इब्री लोकांस १३:१८.

सत्य—एकतेचे बंधन

२०, २१. एका शांतीमय बंधूसमाजाच्या संदर्भात सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांविषयी व यहोवाच्या सध्याच्या काळातील सेवकांविषयी काय म्हणता येईल?

२० सत्यात चालल्यामुळे सुरवातीच्या ख्रिश्‍चनांमध्ये एक शांतीमय बंधुत्व होते, जसे आज यहोवाच्या साक्षीदारांमध्ये देखील पाहायला मिळते. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) मॉस्को टाईम्स यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका पत्रात असे म्हटले होते: “[यहोवाचे साक्षीदार] मनमिळाऊ, प्रेमळ आणि विनयशील म्हणून सर्वदूर ओळखले जातात. त्यांच्याशी व्यवहार करणे सोपे आहे, ते कधीही कोणावरही दबाव टाकत नाहीत आणि इतरांसोबत नेहमी शांतीपूर्ण संबंध कायम करण्याचा प्रयत्न करतात . . . ते लाच घेत नाहीत, त्यांच्यामध्ये कोणीही दारूडा किंवा ड्रग्स घेणारा सापडणार नाही, आणि याचे कारण अगदी स्पष्ट आहे: ते जे काही करतात किंवा बोलतात ते बायबलवर आधारित असलेल्या त्यांच्या विश्‍वासांनुसार आहे याची खात्री करण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात. जगातल्या सर्व लोकांनी यहोवाच्या साक्षीदारांप्रमाणे बायबलचे पालन करण्याचा फक्‍त प्रयत्न केला तरीसुद्धा आपल्या या क्रूर जगाचा कायापालट होईल.”

२१ सुरवातीच्या ख्रिस्ती धर्माचा ज्ञानकोष (इंग्रजी), यात म्हटल्याप्रमाणे: “सुरवातीचे चर्च स्वतःला एक नवा मानव समाज समजत होते ज्यात यहुदी आणि विदेशी जे पूर्वी एकमेकांचे शत्रू होते ते शांतीने एकत्र राहू शकत होते.” यहोवाच्या साक्षीदारांचा देखील एक प्रेमळ आंतरराष्ट्रीय बंधूसमाज—जणू एका नव्या जगाचा समाज आहे. (इफिसकर २:११-१८; १ पेत्र ५:९; २ पेत्र ३:१३) दक्षिण आफ्रिकेच्या प्रेटोरिया शो ग्राऊंड्‌सच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्‍याने जेव्हा अधिवेशनाकरता प्रतिनिधी म्हणून आलेल्या सर्व वंशांच्या साक्षीदारांना पाहिले, तेव्हा त्याने म्हटले: “सर्वजण अतिशय सभ्य होते, नव्हे आहेत; सर्व लोक एकमेकांशी अतिशय शालीनतेने बोलतात; मागील काही दिवसांतील तुमची वागणूक तुमच्या समाजातील सदस्यांच्या चारित्र्याविषयी ग्वाही देते की तुम्ही सर्वजण एका मोठ्या आनंदी कुटुंबाप्रमाणे प्रेमाने राहता.”

सत्य शिकवणारे आशीर्वादित

२२. ख्रिश्‍चनांनी सत्य प्रगट केल्यामुळे काय घडले आहे?

२२ आपल्या आचरणामुळे व प्रचार कार्यामुळे पौल व इतर ख्रिस्ती “सत्य प्रगट” करत होते. (२ करिंथकर ४:२) यहोवाचे साक्षीदार देखील त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून सर्व राष्ट्रांना सत्य शिकवत आहेत, याच्याशी तुम्ही सहमत नाही का? सबंध पृथ्वीवरील लोक सत्य उपासनेचा स्वीकार करून वाढत्या संख्येने ‘परमेश्‍वराच्या मंदिराच्या डोंगराकडे’ येत आहेत. (यशया २:२, ३) दर वर्षी, हजारो लोकांचा त्यांच्या समर्पणाच्या संकेतार्थ बाप्तिस्मा होतो आणि परिणामस्वरूप अनेक नव्या मंडळ्यांची स्थापना होत आहे.

२३. सर्व राष्ट्रांना सत्य शिकवणाऱ्‍यांविषयी तुमचे काय मत आहे?

२३ वेगवेगळ्या पार्श्‍वभूमींचे असूनही यहोवाचे लोक खऱ्‍या उपासनेत एकजूट आहेत. त्यांच्यात दिसणारे प्रेम येशूचे खरे शिष्य म्हणून त्यांची ओळख करून देते. (योहान १३:३५) ‘त्यांच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे’ हे तुम्हालाही जाणवले आहे का? (१ करिंथकर १४:२५) सर्व राष्ट्रांना सत्य शिकवणाऱ्‍यांना तुम्हीही आपला पाठिंबा दिला आहे का? असल्यास, तुम्ही सत्याबद्दल सदैव कृतज्ञ राहावे आणि त्यात सर्वकाळ चालत राहण्याचा बहुमान तुम्हाला मिळावा हीच आमची सदिच्छा.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• उपासनेच्या संबंधाने सुरवातीचे ख्रिस्ती व यहोवाचे साक्षीदार यांच्यात कोणते साम्य आहे?

• सत्यात चालणारे कोणता एकमात्र धार्मिक समारंभ पाळतात?

• ‘वरिष्ठ अधिकारी’ कोण आहेत आणि त्यांच्याकडे ख्रिस्ती कोणत्या दृष्टीने पाहतात?

• सत्य एकतेचे बंधन कशाप्रकारे आहे?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२१ पानांवरील चित्र]

सत्यात चालणाऱ्‍यांकरता ख्रिस्ती सभा पूर्वीपासूनच एका आशीर्वादाप्रमाणे ठरल्या आहेत

[२३ पानांवरील चित्रे]

येशूने आपल्या अनुयायांना त्याच्या बलिदानरूपी मृत्यूचा स्मारक पाळण्याची आज्ञा दिली

[२४ पानांवरील चित्र]

सुरवातीच्या ख्रिश्‍चनांप्रमाणे यहोवाचे साक्षीदार देखील ‘वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना’ आदर दाखवतात