व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

धार्मिकतेची पेरणी आणि देवाच्या प्रेम-दयेची कापणी

धार्मिकतेची पेरणी आणि देवाच्या प्रेम-दयेची कापणी

धार्मिकतेची पेरणी आणि देवाच्या प्रेम-दयेची कापणी

“परक्याला जामीन राहील तो पस्तावेल, पण हातावर हात देणाऱ्‍यांचा ज्याला तिटकारा आहे तो निर्भय राहतो.” (नीतिसूत्रे ११:१५) मोजक्या शब्दांत असलेल्या या नीतिसूत्रात, जबाबदारीची जाणीव बाळगून कार्य करण्याचे महत्त्व किती खात्रीलायकपणे पटवून देण्यात आले आहे! परतफेड करण्याची ऐपत नसलेल्या व्यक्‍तीला जामीन राहिल्यामुळे आपण स्वतःहून पीडेला आमंत्रण देतो. हातावर हात देण्याचे टाळा म्हणजे पैशाच्या व्यवहारांतील समस्यांत अडकण्यापासून तुमचा बचाव होईल; प्राचीन इस्राएलमध्ये हातावर हात देण्याची पद्धत, करारावर सही केल्याप्रमाणे समजली जायची.

येथे अवलंबलेले तत्त्व हे आहे: “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल.” (गलतीकर ६:७) संदेष्टा होशेयने म्हटले: “तुम्ही आपणासाठी धार्मिकतेची पेरणी करा म्हणजे प्रेमाची कापणी कराल.” (होशेय १०:१२) होय, देवाच्या मार्गाने सर्वकाही करण्याद्वारे धार्मिकतेची पेरणी करा आणि त्याच्या प्रेम-दयेची कापणी करा. या तत्त्वाचा वारंवार उपयोग करून इस्राएलचा शलमोन राजा, योग्य कार्य, प्रामाणिक भाषण आणि उचित मनोवृत्ती यांवर जोर देतो. त्याच्या बुद्धीच्या शब्दांचे जवळून परीक्षण केल्याने आपल्याला, धार्मिकतेची पेरणी करण्यास उत्तेजन मिळू शकते.—नीतिसूत्रे ११:१५-३१.

‘सौंदर्याची’ पेरणी आणि ‘सन्मानाची’ कापणी

“कृपाळू [“सुंदर,” NW] स्त्री सन्मान संपादिते, आणि बलात्कारी इसम धन संपादितात,” असे सुज्ञ राजा म्हणतो. (नीतिसूत्रे ११:१६) या वचनात, सुंदर अर्थात कृपाळू स्त्रीला सतत मिळणारा आदर आणि एका जुलमी व्यक्‍तीला तात्पुरते मिळणारे धन यांतील फरक दाखवण्यात आला आहे.

एक व्यक्‍ती स्वतःला सन्मानास पात्र ठरवणारे सौंदर्य कशाप्रकारे मिळवू शकते? शलमोनाने असा सल्ला दिला: “तू चातुर्य व विवेक ही संभाळून ठेव. म्हणजे ती तुझ्या आत्म्याला जीवन व तुझ्या कंठाला भूषण [“सौंदर्य,” NW] अशी होतील.” (नीतिसूत्रे ३:२१, २२) आणि स्तोत्रकर्त्याने म्हटले, की ‘राजाच्या मुखात प्रसाद [“सौंदर्य,” NW] भरला आहे.’ (स्तोत्र ४५:१, २) होय, व्यावहारिक बुद्धी, विचारशक्‍ती आणि जीभेचा योग्य वापर यामुळे एखाद्याचे मूल्य व सौंदर्य आणखी वाढते. सुज्ञ स्त्रीच्या बाबतीत ही गोष्ट खरी ठरू शकते. मूर्ख नाबालाची पत्नी अबीगईल हिचे याबाबतीत चांगले उदाहरण आहे. ती “बुद्धिमती व रूपवती होती” आणि राजा दावीदाने तिच्या “दूरदर्शीपणाची” प्रशंसा केली.—१ शमुवेल २५:३, ३३.

खरे सौंदर्य असलेल्या देवभीरू स्त्रीचा निश्‍चितच आदर केला जाईल. लोकांमध्ये तिचा नावलौकिक असेल. ती विवाहित असेल तर आपल्या पतीकडून ती आदर मिळवेल. वास्तविक पाहता, ती आपल्या संपूर्ण कुटुंबाला आदर मिळवून देईल. हा आदर तात्पुरता नसेल. “चांगले नाव विपुल धनाहून इष्ट होय; प्रेमयुक्‍त कृपा सोन्यारुप्यापेक्षा उत्तम आहे.” (नीतिसूत्रे २२:१) देवासमोर तिने कमावलेले चांगले मूल्यवान नाव कायमचे राहते.

परंतु बलात्कारी अर्थात “क्रूर” व्यक्‍तीच्या बाबतीत उलट घडते. (नीतिसूत्रे ११:१६, सुबोध भाषांतर) जुलमी व्यक्‍तीला दुष्ट लोकांमध्ये गणले जाते आणि हे सर्व दुष्ट लोक यहोवाच्या उपासकांचे विरोधक आहेत. (ईयोब ६:२३; २७:१३) जुलमी व्यक्‍ती ‘देवाकडे लक्ष लावत नाही.’ (स्तोत्र ५४:३) प्रामाणिक लोकांवर दबाव आणून व स्वार्थापोटी त्यांचा गैरफायदा घेऊन जुलमी मनुष्य “रुप्याचा संचय धुळीसारखा” करतो. (ईयोब २७:१६) परंतु, मग असा एक क्षण येतो जेव्हा तो झोपी जातो, ते कधी न उठण्यासाठी. (ईयोब २७:१९) मग, त्याची संपत्ती आणि त्याने साध्य केलेल्या गोष्टी शून्यात जमा होतात.—लूक १२:१६-२१.

नीतिसूत्रे ११:१६ किती महत्त्वपूर्ण धडा शिकवते! सौंदर्य आणि जुलूम कशाची कापणी करणार आहेत हे स्पष्टपणे सांगितल्यावर इस्राएलचा राजा आपल्याला धार्मिकतेची पेरणी करण्याचे प्रोत्साहन देतो.

‘प्रेम-दयेमुळे’ प्रतिफळ मिळते

मानवी नातेसंबंधाच्या अनुषंगाने आणखी एक धडा देताना शलमोन म्हणतो: “दयाळू मनुष्य आपल्या जिवाचे हित करितो, पण निर्दय स्वतःवर संकट आणितो.” (नीतिसूत्रे ११:१७) एक विद्वान म्हणतात: “एखाद्या व्यक्‍तीचे इतरांबरोबरच्या चांगल्या अथवा वाईट व्यवहारांमुळे त्या व्यक्‍तीवर अजाणतेत किंवा अनपेक्षितपणे परिणाम घडू शकतात, हा या नीतिसूत्राचा मुद्दा आहे.” लिसा नावाच्या एका तरुणीचे उदाहरण पाहा. * तिला कुणाला भेटायचे असते तेव्हा ती नेहमीच ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा जात असते; अर्थात ती मुद्दाम असे करत नव्हती. प्रचार कार्यासाठी इतर राज्य प्रचारकांबरोबर जाण्याची ती व्यवस्था करते तेव्हा ती नेहमीच ३० किंवा त्याहूनही अधिक मिनिटे उशीर लावते. यामुळे तिला स्वतःला निश्‍चित फायदा होत नाही. तिची वाट पाहत थांबलेल्यांना, त्यांचा बहुमूल्य वेळ वाया जात असल्यामुळे कंटाळा येऊ लागतो आणि भविष्यात ते तिच्याबरोबर कसल्याही प्रकारच्या योजना न करण्याचे ठरवतात तेव्हा तिला त्यांच्यावर नाराज होण्याचा काही हक्क उरतो का?

ध्येयासक्‍त व्यक्‍ती—ध्येय साध्य करण्याचा अतिउच्च स्तर बाळगणारी व्यक्‍ती—स्वतःशी देखील निष्ठुर असते. साध्य करता येणार नाहीत अशी ध्येये सतत ठेवण्याचा प्रयत्न करून ती थकून जाते आणि तिच्या पदरी केवळ निराशाच पडते. परंतु दुसरीकडे पाहता, आपण साध्य करता येण्याजोगे व व्यवहारी ध्येय ठेवतो तेव्हा आपल्याला फायदा होतो. कदाचित आपण इतरांप्रमाणे चलाक नसू. किंवा कदाचित आजारपणामुळे किंवा उतार वयामुळे आपल्याला अधिक कार्य करता येऊ शकत नसेल. पण आपल्या आध्यात्मिक प्रगतीच्या बाबतीत आपण केव्हाही वैतागू नये तर समजूतदारपणा दाखवून आपल्या मर्यादा ओळखू या. आपल्या कुवतीप्रमाणे आपण “होईल तितके” करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यात आपल्याला आनंद मिळतो.—२ तीमथ्य २:१५; फिलिप्पैकर ४:५.

धार्मिक व्यक्‍ती स्वतःचा फायदा कसा करून घेते आणि क्रूर व्यक्‍ती स्वतःचा तोटा कसा करून घेते याचे अधिक स्पष्टीकरण देताना सुज्ञ राजा म्हणतो: “दुष्ट नकली वेतन मिळवतो, पण जो न्यायीपण पेरतो त्याला सत्य वेतन असते. जो न्यायीपणात स्थिर राहतो त्याला जीवन मिळेल, परंतु जो दुष्कर्माला अनुसरतो तो आपले मरण साधतो. जे कुटिल हृदयाचे आहेत त्यांचा यहोवाला वीट वाटतो, पण जे यथार्थ मार्गाचे आहेत ते त्याचा आनंद आहेत. खचित, [“हाताला हात” लावून, समास संदर्भ] दुष्कर्मी, दंडावाचून असणार नाही, परंतु न्यायींची संतती सोडवली जाईल.”नीतिसूत्रे ११:१८-२१, पं.र.भा.

ही सर्व वचने विविध मार्गांनी एकाच मुद्द्‌यावर भर देतात: धार्मिकतेची पेरणी करा आणि तिची कापणी करा. दुष्ट व्यक्‍ती फसवेगिरी करून किंवा जुगार खेळून, मग तिला त्यातून काहीच लाभ होत नसला तरी एखादी गोष्ट साध्य करू पाहते. अशाप्रकारचे वेतन बेभरवशाचे असल्यामुळे तिच्या पदरी निराशा पडते. परंतु, प्रामाणिकपणे काम करणाऱ्‍या व्यक्‍तीला खात्रीचे वेतन मिळते ज्यात ती सुरक्षित राहू शकते. निर्दोष व्यक्‍तीवर देवाची कृपादृष्टी असल्यामुळे तिला सार्वकालिक जीवनाची आशा आहे. परंतु दुर्जनांचे काय होईल? कट रचण्यात त्यांचा “हाताला हात” असला तरी, शिक्षेपासून ते स्वतःला वाचवू शकणार नाहीत. (नीतिसूत्रे २:२१, २२) यास्तव धार्मिकतेची पेरणी करण्याचा सल्ला खरोखरच किती उत्तम आहे!

शहाण्या व्यक्‍तीचे खरे सौंदर्य

“डुकराच्या नाकात जशी सोन्याची नथ, तशी तारतम्य [“शहाणपण,” NW] नसलेली सुंदर स्त्री समजावी.” (नीतिसूत्रे ११:२२) बायबल काळात, नथ एक लोकप्रिय अलंकार होता. एखाद्या स्त्रीने नाकात बाजूला किंवा मधोमध घातलेली नथ सहज दिसणारी होती. इतका सुंदर अंलकार डुकराच्या नाकात शोभला असता का? हीच गोष्ट, बाहेरून सुंदर परंतु ‘शहाणपण’ नसलेल्या व्यक्‍तिलाही लागू होते. अशा व्यक्‍तीला, मग ती स्त्री असो अथवा पुरुष, साजशृंगार शोभणारच नाही. तो अनुचित वाटेल.

अर्थात, स्वतःच्या स्वरूपाबद्दल इतरांचे काय मत आहे हे जाणून घ्यायची इच्छा स्वाभाविक असते. परंतु आपल्या चेहऱ्‍याविषयी किंवा शरीराच्या सुडौलतेविषयी अनावश्‍यक चिंता का करावी किंवा असमाधानी का राहावे? आपल्या स्वरूपाच्या अनेक पैलूंविषयी आपण काही करू शकत नाही. आणि शारीरिक स्वरूप म्हणजे सर्वकाही नसते. आपल्याला आवडणारे बहुतेक लोक दिसायला साधेसुधेच असतात, हे खरे नाही का? शारीरिक आकर्षकता आनंदाची गुरूकिल्ली नाही. परंतु ईश्‍वरी गुणांनी संपन्‍न असलेले आंतरिक सौंदर्य खरे तर जास्त महत्त्वाचे आहे. यास्तव आपण बुद्धिमान होऊन असे गुण विकसित करूया.

“उदार मनाचा समृद्ध होतो”

“धार्मिकांची इच्छा शुभच असते; दुर्जनांची अपेक्षा रोषरूप आहे,” असे शलमोन राजाने म्हटले. ते कसे, हे दाखवताना तो पुढे म्हणाला: “एक इसम व्यय करितो तरी त्याची वृद्धीच होते, एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करितो, तरी तो भिकेस लागतो.”नीतिसूत्रे ११:२३, २४.

देवाच्या वचनातील ज्ञान आपण मनःपूर्वकपणे पसरवण्याचा अर्थात इतरांना सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याही ज्ञानाची “रुंदी, लांबी, उंची व खोली,” निश्‍चितच वाढते. (इफिसकर ३:१८) पण जो आपल्या ज्ञानाचा उपयोग करीत नाही त्याला, त्याच्याजवळ जितके ज्ञान आहे तेही गमवण्याचा धोका आहे. होय, “जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील.”—२ करिंथकर ९:६.

राजा पुढे म्हणतो: “उदार मनाचा समृद्ध होतो; जो पाणी पाजितो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल.” (नीतिसूत्रे ११:२५) खऱ्‍या उपासनेची वृद्धी होण्याकरता आपण आपल्या वेळेचा आणि आपल्या साधनसंपत्तीचा सढळ हाताने उपयोग करतो तेव्हा यहोवा आपल्यामुळे संतुष्ट होतो. (इब्री लोकांस १३:१५, १६) तो, ‘आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद आपल्याकरिता वर्षितो.’ (मलाखी ३:१०) हे किती खरे आहे ते त्याच्या सेवकांच्या आध्यात्मिक समृद्धतेकडे पाहूनच कळते!

धार्मिक लोकांच्या आणि दुष्ट लोकांच्या इच्छांमध्ये किती फरक आहे त्याचे आणखी एक उदाहरण देताना शलमोन म्हणतो: “जो धान्य अडकवून ठेवितो त्याला लोक शाप देतात; जो ते विकितो त्याच्या मस्तकी आशीर्वाद येईल.” (नीतिसूत्रे ११:२६) भाव घटतात तेव्हा भरपूर प्रमाणात माल विकत घेऊन तो साठवून मग भाव वाढतात तेव्हा तो विकल्याने बराच फायदा होऊ शकतो. शिवाय, आपल्या जवळील वस्तू काटकसरीने वापरणे व त्यांचा साठा करणे उचित असले तरी, स्वार्थापोटी जी व्यक्‍ती असे करते तिची लोक सहसा अवहेलना करतात. परंतु तातडीच्या परिस्थितीचा फायदा घेऊन जी व्यक्‍ती आर्थिक लाभ करीत नाही तिला लोक पसंत करतात.

जे उचित किंवा धार्मिक आहे ते करीत राहण्याची इच्छा सतत बाळगण्याचे उत्तेजन देऊन इस्राएलचा राजा म्हणतो: “जो झटून हित साधू पाहतो तो कृपाप्रसाद साधितो; जो अरिष्टाच्या शोधांत असतो त्याला तेच प्राप्त होईल. जो आपल्या धनावर भरवसा ठेवितो तो पडेल, पण धार्मिक नव्या पालवीप्रमाणे टवटवीत होतील.”—नीतिसूत्रे ११:२७, २८.

धार्मिक जिवास वश करितो

निर्बुद्ध कार्यामुळे वाईट परिणाम कसे घडतात याविषयी शलमोन म्हणतो: “जो घरच्यांस दुःख देतो त्याच्या वाट्याला वारा येईल.” (नीतिसूत्रे ११:२९अ) आखानाच्या पातकामुळे त्याच्या ‘घराण्यावर दुःख आले,’ व त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दगडमार करून ठार मारण्यात आले. (यहोशवा अध्याय ७) आज, एखादा ख्रिस्ती कुटुंब प्रमुख किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्य पाप करत असतील तर त्यांना ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत करावे लागेल. देवाच्या आज्ञांनुसार स्वतः न वागून व कुटुंबातील इतर सदस्यांची गंभीर पातके सहन करून एक कुटुंब प्रमुख आपल्या स्वतःच्या घराण्यावर दुःख ओढवतो. त्याला व कदाचित त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अपश्‍चात्तापी अपराधी म्हणून ख्रिस्ती मंडळीतून बहिष्कृत केले जाईल. (१ करिंथकर ५:११-१३) अशा व्यक्‍तीच्या वाट्याला काय येईल? केवळ वारा—ठोस किंवा मौल्यवान असे काहीच येणार नाही.

वचन पुढे म्हणते: “मूर्ख मनुष्य शहाण्याचा चाकर होईल.” (नीतिसूत्रे ११:२९ब) मूर्ख मनुष्याकडे व्यावहारिक बुद्धी नसल्यामुळे त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवता येऊ शकत नाही. शिवाय, त्याच्या व्यक्‍तिगत बाबी तो व्यवस्थितरीत्या सांभाळू शकत नसल्यामुळे इतर मार्गाने तो इतर व्यक्‍तीला जबाबदार ठरू शकतो. अशी मूर्ख व्यक्‍ती “शहाण्याचा चाकर” होऊ शकते. स्पष्टतः मग, आपल्या सर्व व्यवहारांमध्ये आपण योग्य अंदाज आणि व्यावहारिक बुद्धीचा उपयोग केला पाहिजे.

सुज्ञ राजा आपल्याला अशाप्रकारे आश्‍वासन देतो: “धार्मिकाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जिवांस वश करितो.” (नीतिसूत्रे ११:३०) असे केव्हा घडते? आपल्या बोलण्याने व आपल्या कृतीने एक धार्मिक व्यक्‍ती इतरांना आध्यात्मिक अर्थाने पोषण ठरू शकते. यामुळे या लोकांना यहोवाची सेवा करण्याचे उत्तेजन मिळते आणि कालांतराने देव देत असणारे जीवन त्यांना मिळेल.

“पातक्याला किती तरी जास्त मिळेल”

वरील नीतिसूत्रे आपल्याला धार्मिकतेची पेरणी करायला खरोखरच किती आर्जवतात! “माणूस जे काही पेरितो त्याचेच त्याला पीक मिळेल” हे तत्त्व एका वेगळ्या प्रकारे लागू करून शलमोन म्हणतो: “पाहा, धार्मिकाला पृथ्वीवर त्याच्या कर्माचे फळ मिळते. तर मग दुर्जनाला व पातक्याला किती तरी जास्त मिळेल!”नीतिसूत्रे ११:३१.

धार्मिक व्यक्‍ती योग्य ते करण्याचा प्रयत्न करत असताना कधीकधी मात्र तीही चुका करते. (उपदेशक ७:२०) आणि तिच्या चुकांबद्दल वाग्दंडाद्वारे तिला “फळ” मिळेल. परंतु जाणूनबुजून वाईट मार्ग निवडणाऱ्‍या व धार्मिक मार्गाकडे वळण्याचा कसलाही प्रयत्न न करणाऱ्‍या दुष्ट व्यक्‍तीबद्दल काय? ती, मोठे “फळ,” अर्थात कडक वाग्दंडास पात्र ठरत नाही का? प्रेषित पेत्राने लिहिले: “नीतिमान जर कष्टाने तरतो तर भक्‍तिहीन व पापी ह्‍याला ठिकाण कोठे मिळेल?” (१ पेत्र ४:१८) तेव्हा, आपला लाभ व्हावा म्हणून नेहमी धार्मिकतेची पेरणी करण्याचा आपण दृढनिश्‍चय करूया.

[तळटीप]

^ परि. 11 नाव बदलण्यात आले आहे.

[२८ पानांवरील चित्र]

‘सौंदर्यामुळे’ अबीगईलचा “आदर” करण्यात आला

[३० पानांवरील चित्रे]

‘दुर्जनाचे वेतन बेभरवशाचे असते; परंतु नीतीचे वेतन खात्रीचे असते’

[३१ पानांवरील चित्र]

‘सढळ हाताने पेरणी करा आणि त्याच मानाने कापणी करा’