नरकाग्नीची आज काय स्थिती?
नरकाग्नीची आज काय स्थिती?
“नरक” या शब्दाने तुमच्या मनात कोणते चित्र उभे राहते? नरक म्हणजे, अग्नी-गंधकाचे सरोवर, जेथे अनंत यातना आणि पीडा दिल्या जातात असे एक खरोखरचे स्थान, असे तुम्हाला वाटते का? की, नरक कदाचित एका स्थितीचे, अवस्थेचे लाक्षणिक वर्णन आहे?
अनेक शतकांपासून, पापी लोकांसाठी भयंकर यातनांचे अग्निमय नरक हे एक निश्चित ठिकाण असल्याची कल्पना ख्रिस्ती धर्मजगताच्या धर्मगुरूंनी केली आहे. आजही अनेक धर्मांमध्ये ही कल्पना मानली जाते. यु.एस.न्यूझ ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट यानुसार, “ख्रिस्ती धर्मजगताने नरक हा शब्द घराघरात अवगत करून दिला असेल परंतु [नरकाग्नीच्या] शिकवणीवर केवळ त्याचीच मक्तेदारी नाही. जगाच्या जवळजवळ प्रत्येक मोठ्या धर्मात आणि लहान धर्मांमध्येही, मृत्यूपश्चात जीवनातील यातनामय शिक्षेची भीती, ही कल्पना आढळतेच.” हिंदू, बौद्ध, मुस्लिम, जैन आणि ताओ धर्माचे लोक कोणत्यातरी प्रकारे नरकावर विश्वास करतात.
परंतु, आधुनिक विचारात नरकाला एक वेगळी प्रतिमा मिळाली आहे. वर उल्लेखलेल्या मासिकाने म्हटले, “पारंपरिक अग्निमय नरकावर आजही काहींचा विश्वास असला तरी सर्वकाळाची नरक शिक्षा म्हणजे कठोर प्रकारचा एकान्तवास आहे अशा आधुनिक कल्पना वर येऊ लागल्या आहेत ज्यावरून असे सुचवले जात आहे की, नरक हे लोकांच्या कल्पनेइतके अग्निमय ठिकाण नसावे.”
ला सिव्हिल्टा कॅटोलिका या जेसूट नियतकालिकाने म्हटले: “देव दुरात्म्यांद्वारे दोषी लोकांना अग्निमय यातना देऊन पीडितो असा विचार करणे . . . चुकीचे आहे.” पुढे त्यात म्हटले आहे: “नरक आहे, परंतु ते एक स्थळ नसून एक स्थिती आहे; देवापासून दुरावलेल्या मानसिक यातना भोगत असलेल्या व्यक्तीची अवस्था.” १९९९ मध्ये पोप जॉन पॉल दुसरे यांनी म्हटले: “नरक एक स्थळ असण्याऐवजी ते अशा लोकांची एक अवस्था आहे ज्यांनी जीवनाचा आणि आनंदाचा स्रोत असलेल्या देवापासून स्वेच्छेने व पूर्णपणे स्वतःला वेगळे केले आहे.” नरक एक अग्निमय स्थळ आहे या कल्पनांविषयी ते म्हणाले: “[या कल्पना] देवापासून दुरावलेल्या स्थितीतले जीवन किती निराशापूर्ण आणि निरर्थक असते हे दाखवून देतात.” चर्च इतिहासकार मार्टिन मार्टी म्हणाले, पोपने नरकाचे वर्णन, “ज्वालामय स्थळ आणि हातात लांब दांड्याचा काटा घेऊन लाल रंगाचे वस्त्र घातलेला दियाबल” असे केले असते तर “लोकांनी त्यावर विश्वास केला नसता.”
इतर पंथांमध्येही असेच बदल होत आहेत. चर्च ऑफ इंग्लंडच्या सिद्धान्त मंडळाने म्हटले: “नरक ही अनंत यातना नाही तर देवाच्या पूर्ण विरोधात असलेल्या मार्गाक्रमणाची अखेरची व ठाम निवड आहे ज्याच्या शेवटी संपूर्ण विनाश आहे.”
संयुक्त संस्थानांच्या एपिस्कोपल चर्चच्या प्रश्नोत्तरावलीनुसार नरकाची व्याख्या “देवाला त्यागल्यामुळे आलेले अनंत मरण” अशी केली आहे. यु.एस.न्यूझ ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट यानुसार, अधिकाधिक लोक ही कल्पना स्वीकारत आहेत की, “दुष्टांचा शेवट नाशाने होईल, अनंत यातनेने
नव्हे. . . . [ते] असा युक्तिवाद करतात की, जे देवाला पूर्णतः नाकारतात त्यांचा नरकाच्या ‘नष्ट करणाऱ्या अग्नीत’ सर्वनाश होईल.”अलीकडे, अग्नि-गंधकाची कल्पना लोक स्वीकारत नाहीत तरीपण पुष्कळजण असा विश्वास करतात की, नरक हे यातनेचे शब्दशः स्थळ आहे. अमेरिकेतील केन्टक्की, लुइसवील येथील सदर्न बॅप्टिस्ट थिओलॉजिकल सेमिनरीचे ॲल्बर्ट मोलर म्हणतात, “शास्त्रवचनांमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, नरक हे अग्निमय यातनेचे खरोखरचे स्थान आहे.” तसेच, इव्हॅन्जेलिकल अलायन्स कमिशनने तयार केलेले वृत्त, द नेचर ऑफ हेल्ल यात म्हटले आहे: “नरक म्हणजे नकार आणि यातनेचा एक शुद्ध अवस्थेतील अनुभव आहे.” त्यात पुढे म्हटले आहे: “पृथ्वीवर केले जाणारी पातके किती गंभीर आहेत त्यानुसार नरकात शिक्षा आणि यातनेचेही प्रमाण आहे.”
पुन्हा प्रश्न येतोच की, नरक हे अनंत यातनेचे स्थळ आहे की सर्वनाशाचे? की ही केवळ देवापासून दुरावल्याची स्थिती आहे? नरक नेमके काय आहे?
[४ पानांवरील चौकट/चित्रे]
नरकाग्नीचा संक्षिप्त इतिहास
तथाकथित ख्रिश्चनांनी नरकाग्नीचा विश्वास केव्हापासून स्वीकारला? येशू ख्रिस्त व त्याच्या प्रेषितांच्या काळानंतर. “पेत्राचे प्रकटीकरण (इंग्रजी), (सा.यु. दुसरे शतक) हे नरकात पापी लोकांना मिळणारी शिक्षा आणि यातना यांचे वर्णन करणारे पहिले [काल्पनिक] ख्रिस्ती साहित्य होते,” असे फ्रेंच एन्सायक्लोपेडिया युनिव्हर्सलिस यात म्हटले आहे.
परंतु, प्रारंभिक चर्चच्या धर्मगुरूंमध्ये नरकाच्या बाबतीत मतभेद होते. जस्टिन मार्टर, ॲलेक्झांड्रियाचा क्लेमेंट, टर्टुलियन आणि सायप्रियन यांचा विश्वास होता की, नरक एक अग्निमय स्थळ आहे. ओरिजन आणि निसाचा वेदान्ती, ग्रेगरी यांच्या मते नरक हे देवापासून दुरावलेले ठिकाण अर्थात आध्यात्मिक यातना होते. याउलट, हिप्पोचा ऑगस्टीन याच्या मते, नरकातील यातना आध्यात्मिक त्याचप्रमाणे शारीरिक होत्या—हा दृष्टिकोन अत्यंत प्रचलित झाला. “पाचव्या शतकापर्यंत पापी लोकांना या जीवनानंतर दुसरी संधी दिली जाणार नाही आणि त्यांचा नाश करणारा अग्नी कधी विझणार नाही हा कठोर सिद्धान्त प्रचलित झाला,” असे प्राध्यापक जे.एन.डी. केली यांनी लिहिले.
सोळाव्या शतकात, मार्टिन ल्यूथर आणि जॉन कॅल्व्हिनसारख्या प्रोटेस्टंट धर्मसुधारकांच्या समजेनुसार, नरकाची अग्निमय यातना, अनंतकाळासाठी देवापासून दुरावलेल्या स्थितीत असण्याचे लाक्षणिक चिन्ह होते. परंतु, नरक हे यातना देण्याचे स्थळ आहे ही कल्पना पुढच्या दोन शतकांमध्ये पुन्हा आली. प्रोटेस्टंट प्रचारक जॉनथन एडवड्र्स, नरकाचे भयंकर वर्णन करून १८ व्या शतकातील वसाहती अमेरिकन लोकांना घाबरून सोडत असे.
परंतु, त्यानंतर काही काळातच नरकाच्या ज्वाला विझू लागल्या. “२० व्या शतकात नरकाचा जवळजवळ अंतच झाला होता,” असे यु.एस.न्यूझ ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट म्हणते.
[चित्रे]
जस्टिन मार्टरचा असा विश्वास होता की, नरक हे अग्निमय स्थळ आहे
हिप्पोच्या ऑगस्टीनने शिकवले की, नरकातील यातना आध्यात्मिक आणि शारीरिक होती