व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नरक नेमके काय आहे?

नरक नेमके काय आहे?

नरक नेमके काय आहे?

“नरक” म्हटले, की तुमच्या मनात कोणतेही चित्र उभे राहत असले तरी सहसा पापी लोकांना शिक्षा देण्याचे ठिकाण म्हणजे नरक असाच लोकांचा समज आहे. पाप आणि त्याच्या परिणामाविषयी बायबल म्हणते: “एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.” (रोमकर ५:१२) शास्त्रवचनांत असेही म्हटले आहे: “पापाचे वेतन मरण आहे.” (रोमकर ६:२३) पापाची शिक्षा मृत्यू असल्याकारणाने नरक नेमके काय आहे हे शोधण्यामागील मूळ प्रश्‍न असा आहे: आपण मरतो तेव्हा आपले काय होते?

मृत्यूनंतर जीवनात कोणत्याही प्रकारे, कोणत्याही रूपात अस्तित्व राहते का? नरक काय आहे आणि कसले लोक तेथे जातात? नरकातल्या लोकांकरता काही आशा आहे का? बायबल या प्रश्‍नांची सत्य आणि समाधानकारक उत्तरे देते.

मृत्यूपश्‍चात जीवन?

आपल्यामध्ये आत्मा नावाचे असे काही आहे का, जे शरीराच्या मृत्यूनंतर जिवंत राहते? पहिला मानव, आदाम हा कसा जिवंत झाला ते आधी आपण विचारात घेऊ या. बायबल म्हणते: “परमेश्‍वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्‍वास फुंकिला; तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला.” (उत्पत्ति २:७) लक्ष द्या की, मनुष्याला आत्मा देण्यात आला नव्हता; त्यामुळे जिवंत व्यक्‍ती होण्याकरता त्याच्यामध्ये आत्मा असण्याची गरज नाही. श्‍वसनामुळे तो जिवंत राहू शकला तरी त्याच्या नाकपुड्यात “जीवनाचा श्‍वास” फुंकला गेला म्हणजे फक्‍त त्याच्या फुफ्फुसांत हवा फुंकली गेली नाही. तर याचा अर्थ होतो की, देवाने आदामाच्या निर्जीव शरीरात जीवनाची ठिणगी—“जीवनी शक्‍ती” घातली जी सर्व पार्थिव प्राण्यांमध्ये सक्रिय आहे. (उत्पत्ति ७:२२, NW) त्या ठिणगीची किंवा जीवनी शक्‍तीची तुलना विद्युतशक्‍तीशी करता येईल जिच्यामुळे एखादे यंत्र किंवा उपकरण चालू होते व कार्य करते. ज्याप्रमाणे विद्युतशक्‍तीवर चालणाऱ्‍या उपकरणाची वैशिष्ट्ये त्या विद्युतशक्‍तीत उतरत नाहीत त्याचप्रमाणे जीवनी शक्‍तीने जिवंत झालेल्या प्राण्यांचे गुणही त्या जीवनी शक्‍तीत उतरत नाहीत. तिला व्यक्‍तिमत्त्व नाही आणि विचार क्षमता नाही.

पण मग स्तोत्र १४६:४ (पं.र.भा.) मधील “श्‍वास” काय आहे आणि मनुष्य मेल्यावर त्याचे काय होते? तेथे म्हटले आहे: “त्याचा श्‍वास निघून जातो, तो आपल्या मातीत परत जातो, त्याच दिवशी त्याचे संकल्प नष्ट होतात.” अशा तऱ्‍हेने बायबल लेखकांनी “श्‍वास” या शब्दाचा उपयोग केला तेव्हा त्यांच्या मनात शरीर नष्ट झाल्यावरही जिवंत राहणारा देहभिन्‍न आत्मा नव्हता; तर ते जीवनी शक्‍तीविषयी बोलत होते जी आपल्या निर्माणकर्त्याकडून आपल्याला मिळते. मनुष्य मरतो तेव्हा त्याचा “श्‍वास” (जीवनी शक्‍ती) मानवी शरीराला जिवंत ठेवण्यात उणा पडतो आणि अशारितीने संपूर्ण मनुष्य मरतो. (स्तोत्र १०४:२९) पण मग, उपदेशक १२:७ येथे म्हटले आहे: “देवाने दिलेला आत्मा त्याजकडे परत जाईल;” याचा काय अर्थ आहे? येथे “आत्मा” यासाठी असलेला इब्री शब्द जीवनी शक्‍तीला सूचित करतो. मृत्यूच्या वेळी तो ‘देवाकडे परत जातो’ याचा अर्थ त्या व्यक्‍तीच्या भावी जीवनाची आशा आता फक्‍त देवावर अवलंबून आहे.

मग मेलेल्या व्यक्‍तींची स्थिती काय आहे? आदामाला शिक्षा सुनावताना यहोवा म्हणाला होता: “तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” (उत्पत्ति ३:१९) जमिनीतल्या मातीपासून आदामाला तयार करून त्याला जीवन देण्याआधी तो कोठे होता? तो अस्तित्वातच नव्हता! आणि आदाम मेला तेव्हा, त्याची पुन्हा एकदा तीच अस्तित्वहीन स्थिती झाली. उपदेशक ९:५, १० या वचनांमध्ये, मृतांच्या स्थितीचा खुलासा दिला आहे; तेथे असे म्हटले आहे: “मेलेल्यांना काहीच माहीत नसते. . . . कबरेत काम नसते, तिथे विचार नसतात, ज्ञान नसते आणि शहाणपणही नसते. आणि आपण सर्व त्या मृत्युलोकात जाणार आहोत.” (ईझी-टू-रीड व्हर्शन) बायबलनुसार, मृत्यू ही अस्तित्वहीन असण्याची स्थिती आहे. मृतांना जाणीव नसते, भावना नसतात, विचार नसतात.

अनंत यातना की सामान्य कबर?

मृत लोकांचे कसलेही जाणीवपूर्ण अस्तित्व नसल्यामुळे नरक असे यातनेचे अग्निमय स्थळ असू शकत नाही जेथे दुष्टांना मरणानंतर त्रास दिला जातो. हा गोंधळ निर्माण होण्याचे कारण म्हणजे, बायबलच्या लेखकांनी वापरलेला हेडीस हा ग्रीक शब्द प्राचीन ग्रीक लोक सहसा नरकासमान मृत्यूलोकाच्या संदर्भात वापरत होते; येथे मृतांच्या आत्म्यांना शिक्षा दिली जाते असा त्यांचा समज होता. काही ठिकाणी तर या शब्दाचा अनुवाद नरक असा करण्यात आला आहे. परंतु, बायबल लेखकांनी हेडीस हा शब्द वापरला तेव्हा त्यांचा काय अर्थ होता? मराठी बायबलमध्ये या शब्दाचा अनुवाद कशारितीने करण्यात आला आहे त्याचे परीक्षण केल्याने आपल्याला या प्रश्‍नाचे उत्तर मिळेल. बायबल लेखक लूक याने येशू मेल्यावर त्याचे काय झाले याविषयी म्हटले: “[येशूला] अधोलोकांत [ग्रीक “हेडीस”] सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही.” * (प्रेषितांची कृत्ये २:३१) हे अधोलोक किंवा हेडीस कोठे होते जेथे येशू गेला होता? प्रेषित पेत्राने लिहिले: “मी तुम्हांस सांगून टाकले . . . की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांबद्दल मरण पावला; तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसऱ्‍या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले.” (१ करिंथकर १५:३, ४) तर येशू अधोलोक किंवा हेडीस अर्थात कबर यात होता, पण त्याला तेथेच राहू देण्यात आले नाही तर त्याला उठवण्यात आले किंवा पुनरुत्थित करण्यात आले.

त्याचप्रमाणे, ईयोब या धार्मिक मनुष्याचेही उदाहरण घ्या ज्याने पुष्कळ यातना सहन केल्या. आपल्या दुरावस्थेतून सुटका मिळावी म्हणून त्याने विनवणी केली: “तू मला अधोलोकात [इब्री, “शिओल”, ग्रीक “हेडीस”] लपविशील, तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टिआड ठेविशील . . . तर किती बरे होईल!” (ईयोब १४:१३) * सुटका मिळवण्यासाठी ईयोबाने एका अग्निमय स्थळी जाण्याची इच्छा करावी ही किती तर्कहीन गोष्ट! ईयोबाकरता, “शिओल” किंवा “हेडीस” केवळ अधोलोक किंवा सामान्य कबर होते जेथे गेल्यावर त्याचा त्रास संपणार होता. त्याअर्थी, बायबलमध्ये, शिओल किंवा हेडीस हे मानवजातीच्या सामान्य कबरेला सूचित करतात जेथे चांगली त्याचप्रमाणे वाईट माणसेही जातात.

नरकाग्नी—विनाशकारी?

नरकातील अग्नी विनाशाचे किंवा संपूर्ण नाशाचे चिन्ह असावे का? प्रकटीकरण २०:१३ येथे अग्नीचा वापर कसा केला आहे ते पाहा; तेथे म्हटले आहे: “मरण व अधोलोक (ग्रीक, हेडीस) ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली.” येथे म्हटलेले ‘सरोवर’ लाक्षणिक आहे कारण त्यामध्ये टाकलेले मरण आणि अधोलोक (हेडीस) हे शब्दशः अर्थाने जळू शकत नाहीत. त्यामुळे, “अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय”—ज्यातून पुन्हा जिवंत बाहेर येण्याची काहीच आशा नाही.—प्रकटीकरण २०:१४.

अग्नीच्या सरोवराचा अर्थ, येशूने म्हटलेल्या ‘नरकाग्नीच्या [ग्रीक गेहेन्‍ना]’ अर्थासारखाच आहे. (मत्तय ५:२२; मार्क ९:४७, ४८) गेहेन्‍ना हा शब्द ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांमध्ये १२ वेळा आढळतो आणि तो जेरूसलेमच्या भिंतीपलीकडे असलेल्या हिन्‍नोम दरीला सूचित करतो. येशू पृथ्वीवर होता त्या काळात, या दरीत सगळा केरकचरा टाकला जाई; “गुन्हेगारांचे मृतदेह, प्राण्यांचे शव व इतर सर्व प्रकारची घाण येथे टाकली जात असे.” (स्मिथ्स डिक्शनरी ऑफ द बायबल) येथील कचरा नष्ट करण्यासाठी अग्नी सतत जळत राहावा म्हणून तेथे गंधक टाकले जाई. येशूने सार्वकालिक नाशाचे चिन्ह म्हणून या दरीचा वापर केला तो योग्यच होता.

गेहेन्‍नाप्रमाणे अग्नीचे सरोवरही सार्वकालिक नाशाला सूचित करते. मरण आणि अधोलोक (हेडीस) त्यात “टाकली गेली” याचा अर्थ मानवजात पापापासून व मृत्यूच्या दंडापासून मुक्‍त होईल तेव्हा मरण व अधोलोक पूर्णपणे काढून टाकले जातील. ते सरोवर बंडखोर, पश्‍चात्ताप न करणाऱ्‍या पापी लोकांच्या “वाट्यास” देखील येईल. (प्रकटीकरण २१:८) त्यांचाही सर्वनाश होईल. दुसऱ्‍या बाजूला पाहता, अधोलोकात (हेडीस)—मानवजातीच्या सामान्य कबरेत—असलेले जे लोक देवाच्या स्मरणात आहेत त्यांच्यापुढे एक अद्‌भुत भवितव्य आहे.

अधोलोक रिकामे करण्यात येते!

प्रकटीकरण २०:१३ म्हणते: “तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत मनुष्यांस बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक (हेडीस) ह्‍यांनी आपल्यातील मृतांस बाहेर सोडले.” होय, बायबलमधले अधोलोक (हेडीस) रिकामे करण्यात येईल. येशूने असे वचन दिले, “[“स्मृती,” NW] कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील. . . अशी वेळ येत आहे.” (योहान ५:२८, २९) सध्या कोणत्याही रूपात अस्तित्वात नसलेले लाखो मृत जन जे यहोवा देवाच्या स्मृतीत आहेत त्यांचे पृथ्वीवरील परादीसात पुनरुत्थान होईल म्हणजेच ते पुन्हा जिवंत केले जातील.—लूक २३:४३; प्रेषितांची कृत्ये २४:१५.

देवाच्या नवीन जगात, त्याच्या नीतिमान नियमांनुसार वागणाऱ्‍या पुनरुत्थित मानवांना पुन्हा कधीही मरावे लागणार नाही. (यशया २५:८) यहोवा “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.” किंबहुना, “पहिल्या गोष्टी होऊन गेल्या” असतील. (प्रकटीकरण २१:४) जे अधोलोकात (हेडीस) अर्थात ‘स्मृती कबरेत’ आहेत त्यांच्याकरता हा केवढा मोठा आशीर्वाद! हा आशीर्वादच यहोवाविषयी आणि त्याचा पुत्र, येशू ख्रिस्त याच्याविषयी अधिक ज्ञान घेण्यास पुरेसे कारण आहे.—योहान १७:३.

[तळटीपा]

^ परि. 9 द होली बायबल मराठी—आर.व्ही. रेफरेन्समध्ये, ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत दहा वेळा आलेल्या हेडीस या ग्रीक शब्दाचा बहुतेक वेळा “अधोलोक” असा अनुवाद करण्यात आला आहे. लूक १६:१९-३१ येथे अधोलोकात यातना असल्याचे म्हटले आहे, परंतु तो संपूर्ण अहवाल लाक्षणिक अर्थाने आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य या पुस्तकाचा ८८ वा अध्याय पाहा.

^ परि. 10 शिओल हा इब्री शब्द मूळ इब्री शास्त्रवचनांमध्ये ६५ वेळा आढळतो आणि द होली बायबल मराठी—आर.व्ही. रेफेरन्समध्ये त्याचा अनुवाद “अधोलोक” असा करण्यात आला आहे.

[५ पानांवरील चित्र]

ईयोबाने अधोलोकात संरक्षण मिळण्याकरता प्रार्थना केली

[६ पानांवरील चित्र]

नरकाग्नी—सार्वकालिक नाशाचे प्रतीक

[७ पानांवरील चित्र]

‘स्मृती कबरेतील सर्व बाहेर येतील’