व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंधविश्‍वासांचे तुमच्या जीवनावर नियंत्रण आहे का?

अंधविश्‍वासांचे तुमच्या जीवनावर नियंत्रण आहे का?

अंधविश्‍वासांचे तुमच्या जीवनावर नियंत्रण आहे का?

अंधविश्‍वास जगभर आढळतात. काही वेळा हे अंधविश्‍वास सांस्कृतिक वारसा म्हणून जपले जातात. तर काही वेळा, केवळ जीवनात विविधता आणणारी कुतूहलाची गोष्ट असे समजून ते बाळगले जातात. पाश्‍चिमात्य जगात, सर्वच अंधविश्‍वास खरे मानले जात नाहीत. इतर ठिकाणी मात्र—जसे की, आफ्रिकेत, अंधविश्‍वासांचा लोकांच्या जीवनावर जबरदस्त पगडा आहे.

आफ्रिकन संस्कृती अंधविश्‍वासांवरच आधारलेली आहे. आफ्रिकेतील चित्रपट, रेडिओ कार्यक्रम आणि साहित्य सहसा अंधश्रद्धा आणि गूढ शक्‍तींविषयी असतात जसे की, जादूटोणा, पूर्वजांची उपासना आणि मंतरलेल्या वस्तू वगैरे. अंधविश्‍वासांवर लोक इतका भरवसा का ठेवतात आणि अंधविश्‍वास कोठून सुरू झाले?

अंधविश्‍वासांचा उगम

पुष्कळसे अंधविश्‍वास, मृतात्म्यांच्या किंवा भुतांच्या भीतीमुळे सुरू झालेले असतात. कोणत्याही घटनांचा असा अर्थ काढला जातो की, हे आत्मे जिवंत लोकांना धोका देण्यासाठी, संकटाचा पूर्वसंकेत देण्यासाठी किंवा आशीर्वाद देण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात.

बरे करण्याशी व औषधांशी देखील अंधविश्‍वासांचा संबंध जोडला जातो. विकसनशील देशांतील अनेकांना पाश्‍चिमात्य औषध महाग वाटते शिवाय ते मिळवणेही कठीण असते. त्यामुळे, अनेकजण पूर्वजांचे विधी, भूतविद्या आणि अंधविश्‍वासांद्वारे उपचार करायचा किंवा धोका टाळण्याचा प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे, एखाद्या वैद्यकीय डॉक्टरांऐवजी आपले विधी आणि आपली पोटभाषा जाणणाऱ्‍या मांत्रिकाशी बोलायला त्यांना अधिक सोपे वाटते. अशाप्रकारे, अंधविश्‍वासांचा वारसा चालू राहतो.

अंधविश्‍वासी परंपरांनुसार आजारपण आणि अपघात हे केवळ योगायोग नव्हेत तर आत्मिक दुनियेतील शक्‍ती या घटना घडवून आणतात. मांत्रिक कदाचित सांगेल की, एखादा मृत पूर्वज अप्रसन्‍न झाला आहे. किंवा भुतांशी संवाद करणारे असे सुचवतील की आजारी व्यक्‍तीवर एखाद्या प्रतिस्पर्धी जादुगाराच्या मदतीने कोणीतरी करणी केल्यामुळे आजारपण आले असावे किंवा अपघात घडला असावा.

अंधविश्‍वास हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असतात आणि त्यांचा विस्तार स्थानीय लोककथा, पुराणकथा आणि परिस्थितींवर अवलंबून असतो. परंतु, यात एक सामान्य विश्‍वास असा असतो की, अदृश्‍य आत्मिक जगातील कोणाला तरी किंवा कशाला तरी प्रसन्‍न करायची गरज आहे.

निरुपद्रवी की धोकेदायक?

बहुतेक कुटुंबांमध्ये जुळी जन्मण्याची घटना असाधारणपणे आनंदाची समजली जाते. परंतु, अंधविश्‍वासू लोकांसाठी मात्र ही घटना एक चिन्ह असते. पश्‍चिम आफ्रिकेच्या काही भागांमध्ये जुळे जन्मले म्हणजे देव जन्मले आहेत असे समजून त्यांची पूजा केली जाते. जुळ्यांपैकी कोणी एक मेले तरीसुद्धा जुळ्यांच्या लहान मूर्ती तयार करून त्या मूर्तींपुढे कुटुंबातले लोक नैवेद्य ठेवतात. इतर ठिकाणी, जुळ्यांचा जन्म हा शाप मानला जातो; काही पालक तर जुळ्यांपैकी एकाला ठार मारून टाकतात. का तर, दोन्ही बाळे जिवंत राहिली तर एक दिवशी ती आपल्या आईवडिलांचा खून करतील असा त्यांचा समज आहे.

यांसारखी उदाहरणे दाखवतात की, काही अंधविश्‍वास कुतूहलजनक आणि निरुपद्रवी वाटत असले तरी इतर अपायकारक, इतकेच नव्हे तर घातकही असू शकतात. अशुभ अर्थ लावल्यावर निरुपद्रवी वाटणारी गोष्ट देखील अपायकारक प्रकरणात बदलू शकते.

होय, वास्तविक पाहता, अंधश्रद्धा हा एक प्रकारचा विश्‍वास किंवा धर्म आहे. अंधश्रद्धेचे अपायकारक पैलू लक्षात घेता हा प्रश्‍न विचारणे योग्य आहे: अंधविश्‍वासांद्वारेव अंधविश्‍वासी प्रथांद्वारे कोणाचा फायदा होत असतो?

अंधविश्‍वासांचा उगम

आज पुरावा असूनही सैतान किंवा दुरात्मे अस्तित्वात आहेत हे लोक मान्य करत नाहीत. परंतु, युद्धाच्या काळात भयंकर शत्रूचे अस्तित्व अमान्य केल्याने संकट अटळ असेल. मानवांपेक्षा श्रेष्ठ असलेल्या आत्मिक प्राण्यांशी असलेल्या संघर्षात हीच गोष्ट खरी ठरू शकते कारण प्रेषित पौलाने लिहिले: “आपले झगडणे . . . आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.” (तिरपे वळण आमचे.)—इफिसकर ६:१२.

आपण दुरात्म्यांना पाहू शकत नसलो तरी ते अस्तित्वात आहेत. बायबलमध्ये सांगितले आहे की, एका आत्मिक व्यक्‍तीने, एक सूत्रधार जसे कळसूत्री बाहुलीचा उपयोग करून ती बाहुली बोलत असल्याचे भासवतो तसेच सर्पाचा उपयोग करून पहिली स्त्री हव्वा हिच्याशी संवाद साधला आणि तिला देवाविरुद्ध बंड करण्यास भाग पाडले. (उत्पत्ति ३:१-५) या आत्मिक व्यक्‍तीची ओळख बायबलमध्ये, “मोठा अजगर . . . सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप” अशी करण्यात आली आहे. (प्रकटीकरण १२:९) ती व्यक्‍ती अर्थात सैतान इतरही देवदूतांना बंडाळीत सामील करण्यात यशस्वी ठरली. (यहूदा ६) हे दुष्ट देवदूत दुरात्मे, देवाचे शत्रू बनले.

येशूने आणि त्याच्या शिष्यांनीही लोकांमधून भुते काढली. (मार्क १:३४; प्रेषितांची कृत्ये १६:१८) हे आत्मे मृत पूर्वज नाहीत कारण मृत व्यक्‍तींना “तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९:५) तर ते बंडखोर देवदूत आहेत ज्यांना सैतानाने मार्गभ्रष्ट केले होते. त्यांच्याशी संपर्क साधणे किंवा त्यांना वश होणे ही क्षुल्लक गोष्ट समजली जाऊ नये कारण ते त्यांचा पुढारी, दियाबल सैतान याच्याप्रमाणे आपल्याला गिळून टाकण्याची संधी शोधत आहेत. (१ पेत्र ५:८) त्यांचे एकच ध्येय आहे—मानवजातीची एकमेव आशा असलेल्या देवाच्या राज्यापासून आपल्याला परावृत्त करणे.

सैतान आणि त्याचे दुरात्मे वापरत असलेल्या एका युक्‍तीविषयी बायबल सांगते: “सैतानहि स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.” (२ करिंथकर ११:१४) आपल्याला सैतान एक उत्तम जीवन देईल असा आपण विश्‍वास करावा म्हणून तो प्रयत्न करतो. त्यामुळे, दुरात्म्यांच्या मध्यस्थीने काही तात्पुरते फायदे होत असल्याचे भासवले जाईल. पण ते कायमचे उपाय देऊ शकणार नाहीत. (२ पेत्र २:४) ते कोणालाही सार्वकालिक जीवन देऊ शकत नाहीत आणि त्यांचा लवकरच नाश होणार आहे. (रोमकर १६:२०) केवळ आपला निर्माणकर्ता आपल्याला अनंतकालिक जीवन आणि खरा आनंद तसेच दुरात्मिक शक्‍तींपासून सर्वोत्तम संरक्षण देऊ शकतो.—याकोब ४:७.

जादूटोण्याद्वारे मदत घेण्याला देव मान्यता देत नाही. (अनुवाद १८:१०-१२; २ राजे २१:६) ते शत्रूशी हातमिळवणी करण्यासारखे अर्थात देवाशी विश्‍वासघात करणाऱ्‍यांशी सलोखा करण्यासारखे आहे. जन्मकुंडली पाहणे, मांत्रिकाकडून उपचार करणे, किंवा कोणताही अंधविश्‍वास पाळणे म्हणजे तुमच्या जीवनातील निर्णयांवर दुरात्म्यांना नियंत्रण ठेवायला तुम्ही परवानगी देता. ही गोष्ट, देवाविरुद्धच्या बंडाळीत सामील होण्यासारखी आहे.

दुरात्म्यांपासून संरक्षण—शक्य आहे का?

नायजर येथील आडे * नामक एक मनुष्य, यहोवाच्या साक्षीदारांच्या एका पूर्ण-वेळ प्रचारकासोबत बायबलचा अभ्यास करत होता. आडेने आपल्या दुकानात एक ताईत लावले होते आणि त्याचे स्पष्टीकरण त्याने असे दिले: “शत्रू पुष्कळ आहेत.” आडेला बायबल शिकवणाऱ्‍याने त्याला सांगितले की, केवळ यहोवाकडून खरे संरक्षण मिळू शकते. त्याने आडेला स्तोत्र ३४:७ वाचून दाखवले; त्यात म्हटले आहे: “परमेश्‍वराचा दूत त्यांचे भय धरणाऱ्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करितो.” त्यावर आडे म्हणाला: “यहोवा मला खरोखर संरक्षण देत असेल तर मग मी ते ताईत काढून टाकीन.” या गोष्टीला कित्येक वर्षे होऊन गेलीत. आज तो वडील आणि पूर्ण-वेळेचा एक सेवक आहे. त्याच्या एकाही शत्रूला त्याचे काही बिघडवता आले नाही.

बायबल दाखवते की, समय व प्रसंग हे सर्वांना घडतात; अंधविश्‍वास बाळगणाऱ्‍यांना आणि न बाळगणाऱ्‍यांनासुद्धा. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) पण वाईट गोष्टींद्वारे देव कधीही आपली परीक्षा घेत नाही. (याकोब १:१३) मृत्यू आणि अपरिपूर्णता हे आदामाकडून वारशात मिळालेल्या पापाचे परिणाम आहेत. (रोमकर ५:१२) यामुळेच, सगळेजण अधूनमधून आजारी पडतात, तसेच चुका करतात ज्यामुळे संकटमय परिणाम ओढवतात. म्हणून, सगळ्याच आजारांना किंवा समस्यांना दुरात्मे कारणीभूत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. उलट असा विश्‍वास धरल्यामुळे आपण कोणत्या तरी मार्गाने आत्म्यांना प्रसन्‍न करायचा प्रयत्न करू. * आपण आजारी पडतो तेव्हा “लबाड व लबाडीचा बाप” दियाबल सैतान याचा सल्ला घेण्याऐवजी योग्य वैद्यकीय उपचार केला पाहिजे. (योहान ८:४४) आकडेवारी दाखवते की, पूर्वजांचे अंधविश्‍वास ज्या देशांमध्ये प्रचलित आहेत तेथील लोक इतर देशांमधील लोकांपेक्षा दीर्घकाळाचे किंवा निरोगी जीवन जगत नाहीत. यावरून हे स्पष्ट होते की, अंधविश्‍वासांमुळे आरोग्याला कसलाही फायदा होत नाही.

कोणत्याही दुरात्म्यापेक्षा देव अधिक शक्‍तिशाली आहे आणि त्याला आपल्या कल्याणाची काळजी आहे. “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात.” (१ पेत्र ३:१२) संरक्षण आणि बुद्धीकरता त्याच्याजवळ प्रार्थना करा. (नीतिसूत्रे १५:२९; १८:१०) त्याचे पवित्र वचन, बायबल समजण्याचा प्रयत्न करा. बायबलबद्दलचे अचूक ज्ञान आपल्याला सर्वोत्तम संरक्षण देऊ शकते. त्यामुळे, वाईट गोष्टी का घडतात आणि सर्वशक्‍तिमान देवाची कृपापसंती कशी प्राप्त करता येईल हे समजायला आपल्याला मदत मिळेल.

देवाच्या ज्ञानाचे फायदे

अज्ञान आणि अंधविश्‍वासाच्या अगदी उलट यहोवा आणि त्याच्या उद्देशांविषयीच्या अचूक ज्ञानामुळे खरे संरक्षण मिळू शकते. बेनिनमधील झाँ नावाच्या मनुष्याच्या उदाहरणावरून हे दिसून येते. झाँच्या कुटुंबामध्ये अंधविश्‍वास खोलवर मुळावलेले होते. जमातींच्या अंधविश्‍वासी रूढींनुसार, पुत्राला जन्म देणाऱ्‍या बाळंतिणीला नऊ दिवसांकरता एका विशिष्ट प्रकारच्या झोपडीत राहावे लागत होते. पण मुलीला जन्म दिल्यास तिला त्या झोपडीत सात दिवस राहावे लागत होते.

१९७५ साली, झाँच्या पत्नीला एक गोंडस मुलगा जन्मला; त्याचे नाव त्यांनी मार्क ठेवले. बायबलचे ज्ञान असल्यामुळे झाँ आणि त्याच्या पत्नीला दुरात्म्यांशी संबंधित असलेली कसलीही गोष्ट करायची नव्हती. पण त्यांनी घाबरून किंवा दबावाखाली येऊन अंधविश्‍वासाप्रमाणे आईला झोपडीत राहायला लावले का? नाही. त्यांनी जमातीच्या या अंधविश्‍वासाचे मुळीच पालन केले नाही.—रोमकर ६:१६; २ करिंथकर ६:१४, १५.

मग झाँच्या कुटुंबावर काही संकट ओढवले का? आज या गोष्टीला अनेक वर्षे होऊन गेलीत आणि मार्क सध्या यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय मंडळीत सेवा सेवक आहे. संपूर्ण कुटुंबाला उलट आनंद वाटतो की, त्यांनी अंधविश्‍वासाचा प्रभाव आपल्या जीवनावर पडू दिला नाही आणि आपले आध्यात्मिक कल्याण धोक्यात घातले नाही.—१ करिंथकर १०:२१, २२.

खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी अंधःकाराच्या अंधविश्‍वासी प्रथांपासून दूर राहावे आणि निर्माणकर्ता यहोवा व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याकडील आध्यात्मिक प्रकाश स्वीकारावा. अशाप्रकारे, आपण देवाच्या नजरेत योग्य ते करत आहोत या जाणीवेमुळे त्यांच्या मनाला खरी शांती लाभू शकेल.—योहान ८:३२.

[तळटीपा]

^ परि. 20 नावे बदलण्यात आली आहेत.

^ परि. 21 सप्टेंबर १, १९९९, टेहळणी बुरूज मासिकातील “सैतान आपल्याला आजारी पाडतो का?” हा लेख पाहा.

[५ पानांवरील चौकट/चित्र]

जगातील काही सर्वसामान्य अंधविश्‍वास

• भाताच्या वाटीत उभ्या चॉपस्टिक्स मृत्यूचे चिन्ह आहे

• भर उन्हात घुबड पाहणे अशुभ आहे

• एखाद्या सोहळ्यादरम्यान मेणबत्ती विझणे म्हणजे दुष्टात्मे जवळपास आहेत

• जमिनीवर छत्री पाडणे म्हणजे घरात कोणाचा तरी खून होणार

• पलंगावर टोपी ठेवणे अशुभ आहे

• घंट्यांच्या निनादाने भुते पिटाळून लावली जातात

• एका दमात वाढदिवसाच्या केकवरच्या सगळ्या मेणबत्त्या विझवल्याने आपली इच्छा पूर्ण होते

• पलंगाला केरसुणी टेकवून ठेवल्यास केरसुणीतली भुते पलंगावर जादू करतात

• काळी मांजर आडवी जाणे अशुभ आहे

• काटा चमचा खाली पाडणे म्हणजे पाहुणा येणार आहे

• हत्तींचे चित्र दरवाजाच्या दिशेने लावल्यास भाग्य उजळते

• दरवाजाच्या चौकटीवर घोड्याचा नाल ठोकल्यास भाग्य उजळते

• घरावर आयव्हीचा वेल चढवल्यास दुष्ट गोष्टींपासून संरक्षण होते

• शिडीच्या खालून जाणे दुर्भाग्य समजले जाते

• आरसा फोडणे म्हणजे सात वर्षांचे दुर्भाग्य

• मिरी सांडणे म्हणजे तुमच्या खास मित्रासोबत अथवा मैत्रिणीसोबत तुमचे बिनसणार आहे

• मीठ सांडते तेव्हा जोपर्यंत चिमूटभर मीठ डाव्या खांद्यावरून फेकले जात नाही तोपर्यंत अशुभ मानले जाते

• डोलखुर्ची मोकळी असताना डोलत ठेवल्यास भुते त्यात येऊन बसतात

• बुटे उलटी ठेवणे दुर्भाग्याचे चिन्ह मानले जाते

• कोणी मरते तेव्हा, आत्म्याला बाहेर जाण्याकरता खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत

[६ पानांवरील चौकट]

अंधविश्‍वासाच्या तावडीतून सुटका

यहोवाचे साक्षीदार दक्षिण आफ्रिकेतील एका भागात प्रचार करत होते. त्यांनी ठोठावलेले दार उघडल्यावर त्यांच्यासमोर सांगोमाचा (मांत्रिक उपचार करणारी) वेश धारण केलेली एक स्त्री उभी राहिली. साक्षीदारांना तेथून निघून जावेसे वाटले पण त्या स्त्रीने तिला संदेश सांगावा अशी विनंती केली. एका साक्षीदाराने अनुवाद १८:१०-१२ हे वचन वाचून जादूटोण्याविषयी देवाचा काय दृष्टिकोन आहे हे तिला दाखवले. जादूटोणा करणाऱ्‍या या स्त्रीने संदेश स्वीकारला आणि ती बायबल अभ्यास करायला तयार झाली. तिने म्हटले की, बायबलच्या अभ्यासातून सांगोमाचे काम करणे यहोवाच्या इच्छेविरुद्ध आहे अशी तिला खात्री पटल्यास ती ते सोडून देईल.

बायबलच्या आधारे तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल पुस्तकातील १० वा अध्याय अभ्यासल्यावर तिने जादूटोण्याशी संबंधित असलेल्या सर्व वस्तू जाळून टाकल्या आणि राज्य सभागृहात सभांना उपस्थित राहू लागली. ती १७ वर्षांपासून आपल्या पतीपासून वेगळी राहत होती, तरीपण तिने आपल्या विवाहाची कायदेशीर नोंद करवली. आज ते दोघेही यहोवाचे समर्पित, बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार आहेत.

[६ पानांवरील चित्र]

जादूच्या माध्यमाने रुग्णाच्या समस्यांचे कारण जाणण्यासाठी “सांगोमा” हाडे फेकते

[७ पानांवरील चित्रे]

देवाविषयी अचूक ज्ञान मिळवल्याने खरे संरक्षण आणि आनंद मिळतो