व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ईश्‍वरी अधिकाराला एकनिष्ठपणे अधीन राहणे

ईश्‍वरी अधिकाराला एकनिष्ठपणे अधीन राहणे

ईश्‍वरी अधिकाराला एकनिष्ठपणे अधीन राहणे

“परमेश्‍वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्‍वर आमचा नियंता आहे, परमेश्‍वर आमचा राजा आहे; तो आम्हास तारील.”यशया ३३:२२.

१. कोणत्या कारणांमुळे प्राचीन इस्राएल इतर राष्ट्रांमध्ये अद्वितीय होते?

सा.यु.पू. १५१३ साली, इस्राएल राष्ट्र जन्मास आले. त्या वेळी, या राष्ट्राला राजधानी नव्हती, मायदेश नव्हता आणि दृश्‍य राजा देखील नव्हता. त्याची प्रजा म्हणजे पूर्वीचे गुलाम होते. पण हे नवे राष्ट्र दुसऱ्‍याही एका कारणामुळे अद्वितीय होते. याचा अदृश्‍य न्यायाधीश, नियंता आणि राजा खुद्द यहोवा देव होता. (निर्गम १९:५, ६; यशया ३३:२२) दुसरे कोणतेही राष्ट्र असा दावा करू शकत नव्हते!

२. इस्राएल राष्ट्राच्या संघटनेविषयी कोणता प्रश्‍न उद्‌भवतो आणि या प्रश्‍नाचे उत्तर विचारात घेणे का महत्त्वाचे आहे?

यहोवा हा व्यवस्थेचा व शांतीचा परमेश्‍वर असल्यामुळे त्याच्या शासनाधीन असलेले राष्ट्र साहजिकच सुसंघटित असेल अशी आपण अपेक्षा करू शकतो. (१ करिंथकर १४:३३) इस्राएलच्या बाबतीत हे नक्कीच खरे होते. पण पृथ्वीवरील दृश्‍य संस्था अदृश्‍य देवाकडून निर्देशित केली जाणे कसे शक्य होते? यहोवाने त्या प्राचीन राष्ट्रावर कशाप्रकारे शासन केले होते, आणि खासकरून इस्राएलशी त्याच्या व्यवहारांतून ईश्‍वरी अधिकाराला एकनिष्ठपणे अधीन राहण्याचे महत्त्व कशाप्रकारे दिसून येते यावर विचार करणे आपल्या हिताचे ठरेल.

प्राचीन इस्राएलातील शासन

३. यहोवाने आपल्या लोकांच्या मार्गदर्शनाकरता कोणत्या व्यावहारिक तरतुदी केल्या?

यहोवा इस्राएलचा अदृश्‍य राजा असला तरीसुद्धा त्याने विश्‍वासू पुरुषांना आपले दृश्‍य प्रतिनिधी म्हणून नेमले होते. लोकांकरता सल्लागार व न्यायाधीश म्हणून सेवा करण्यासाठी सरदार, पितृप्रधान घराण्यांचे प्रमुख, आणि अनुभवी पुरुष होते. (निर्गम १८:२५, २६; अनुवाद १:१५) पण, हे जबाबदार पुरुष देवाच्या मार्गदर्शनाशिवाय लोकांच्या समस्या बिनचूकपणे समजून त्यांना परिपूर्ण न्याय देऊ शकत होते असा निष्कर्ष आपण काढू नये. ते परिपूर्ण नव्हते आणि आपल्या सह उपासकांच्या अंतःकरणात काय आहे हे ते जाणू शकत नव्हते. तरीसुद्धा, देवाला भिणारे हे न्यायाधीश आपल्या सह उपासकांना हितावह मार्गदर्शन देऊ शकत होते कारण त्यांचे मार्गदर्शन यहोवाच्या नियमशास्त्रावर आधारित होते.—अनुवाद १९:१५; स्तोत्र ११९:९७-१००.

४. इस्राएलचे विश्‍वासू न्यायी कशाप्रकारच्या प्रवृत्ती टाळू इच्छित होते आणि का?

पण न्यायाधीशाला केवळ देवाच्या नियमशास्त्राविषयीचे ज्ञान असणे पुरेसे नव्हते. अपरिपूर्ण असल्यामुळे या वडिलजनांना—स्वार्थीपणा, पक्षपातीपणा आणि लोभीपणा—यांसारख्या न्यायास भ्रष्ट करू शकणाऱ्‍या स्वतःच्या प्रवृत्ती नियंत्रणात ठेवण्याची खास काळजी घ्यावी लागत होती. मोशेने त्यांना सांगितले: “न्याय करिताना पक्षपात करू नका, लहानमोठ्यांचे सारखेच ऐकून घ्या; कोणाचे तोंड पाहून भिऊ नका; कारण न्याय करणे देवाचे काम आहे.” (तिरपे वळण आमचे.) होय, इस्राएली न्यायी देवाच्या वतीने न्याय करत होते. खरोखर हा किती मोठा बहुमान!अनुवाद १:१६, १७.

५. न्यायाधीश नेमण्याव्यतिरिक्‍त यहोवाने आपल्या लोकांची काळजी वाहण्याकरता इतर कोणत्या तरतुदी केल्या?

यहोवाने आपल्या लोकांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्याकरता इतर तरतुदी केल्या होत्या. प्रतिज्ञात देशात येण्याआधीच त्याने त्यांना निवासमंडप बांधण्याची आज्ञा दिली; हे खऱ्‍या उपासनेचे केंद्रस्थान होते. त्याने नियमशास्त्र शिकवण्याकरता, पशूबली अर्पण करण्याकरता आणि सकाळचा व संध्याकाळचा धूप जाळण्याकरता एका याजकगणाचीही व्यवस्था केली. देवाने मोशेचा मोठा भाऊ अहरोन याला इस्राएलचा पहिला मुख्य याजक म्हणून नेमले आणि अहरोनच्या पुत्रांना आपल्या वडिलांना त्यांच्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करण्यास मदत करण्याकरता नेमले.—निर्गम २८:१; गणना ३:१०; २ इतिहास १३:१०, ११.

६, ७. याजक आणि गैरयाजकीय लेवी यांच्यात काय संबंध होता? (ब) लेव्यांना विविध प्रकारची कामे सोपवण्यात आली होती यावरून आपण काय शिकू शकतो? (कलस्सैकर ३:२३)

लाखोंच्या संख्येतील लोकांच्या आध्यात्मिक गरजा तृप्त करणे हे फार मोठे कार्य होते आणि त्या मानाने याजक मोजकेच होते. तद्‌नुसार, त्यांना लेवीय वंशाच्या इतर सदस्यांनी मदत करावी अशी तरतूद करण्यात आली. यहोवाने मोशेला सांगितले: “लेवी लोकांना अहरोन व त्याचे मुलगे ह्‍यांच्या हवाली कर; इस्राएल लोकांच्या तर्फे ते अहरोनाला पूर्णपणे देण्यात आले आहेत.”—गणना ३:९, ३९.

लेव्यांना सुसंघटित करण्यात आले होते. त्यांना गेर्षोन, कहाथ व मरारी या तीन कुळांनुसार विभाजित करण्यात आले व प्रत्येक कुळाला एक विशिष्ट कार्य सोपवण्यात आले. (गणना ३:१४-१७, २३-३७) काही कार्ये इतर कार्यांच्या तुलनेत अधिक महत्त्वाची भासत असली तरीसुद्धी सगळीच कामे आवश्‍यक होती. कहाथी लेव्यांना सोपवलेल्या कामामुळे ते कराराच्या पवित्र कोशाच्या आणि निवासमंडपातील इतर सामानसुमानाच्या संपर्कात येत होते. पण प्रत्येक लेव्याला मग तो कहाथी वंशाचा असो वा नसो, अद्‌भुत विशेषाधिकार होते. (गणना १:५१, ५३) दुःखाची गोष्ट म्हणजे, काहींना आपल्या विशेषाधिकारांची जाणीव नव्हती. ईश्‍वरी अधिकाराला एकनिष्ठपणे अधीन होण्याऐवजी ते असमाधानी बनले आणि गर्विष्ठपणा, महत्त्वाकांक्षा आणि ईर्ष्या यांसारख्या दुर्गुणांना बळी पडले. यांपैकी एक होता कोरह.

“याजकपदहि तुम्ही मिळवू पाहता काय?”

८. (अ) कोरह कोण होता? (ब) याजकांविषयी कोरह पूर्णपणे मानवी दृष्टिकोनातून विचार करू लागण्यास काय कारणीभूत ठरले असावे?

कोरह हा लेवीय वंशातील वाडवडिलांच्या घराण्याचा मुख्य नव्हता किंवा तो कहाथी घराण्यांचाही प्रमुख नव्हता. (गणना ३:३०, ३२) पण तो इस्राएलातील एक आदरणीय सरदार होता. कोरहला आपल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करताना कदाचित अहरोन व त्याच्या पुत्रांच्या संपर्कात यावे लागले असेल. (गणना ४:१८, १९) या पुरुषांच्या अपरिपूर्णता स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे कोरहने कदाचित असा विचार केला असावा: ‘हे याजक तर इतक्या चुका करतात, तरी मला त्यांच्या अधीन राहावे लागते! काही काळाआधी अहरोनाने सोन्याचे वासरू तयार केले होते. त्या वासराची उपासना केल्यामुळे आमचे लोक मूर्तिपूजेच्या पाशाला बळी पडले. आता तोच अहरोन, मोशेचा भाऊ, मुख्य याजक म्हणून सेवा करतो! हा पक्षपात नाही तर काय? आणि अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहू, त्यांच्याविषयी काय? त्यांनी तर आपल्या सेवा विशेषाधिकारांबद्दल इतका घोर अनादर दाखवला की यहोवाने त्यांना ठार मारले!’ * (निर्गम ३२:१-५; लेवीय १०:१, २) कोरहने नेमका काय विचार केला असेल हे आपल्याला माहीत नसले तरी एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, की तो याजकगणाकडे मानवी दृष्टिकोनातून पाहू लागला होता. यामुळे कालांतराने त्याने मोशे व अहरोनाविरुद्ध आणि शेवटी यहोवाविरुद्ध विद्रोह केला.—१ शमुवेल १५:२३; याकोब १:१४, १५.

९, १०. कोरह व त्याच्यासोबत बंड करणाऱ्‍यांनी मोशेविरुद्ध काय आरोप केला आणि त्यांनी असे करण्याआधी कशाचा विचार करायला हवा होता?

कोरह अधिकाराच्या पदावर असल्यामुळे त्याच्यासारखाच विचार करणाऱ्‍या इतरांना आपल्या बाजूने करणे त्याच्याकरता फार कठीण नव्हते. दाथान व अबीराम यांच्यासह त्याला असे २५० जण सापडले—हे सर्व मंडळीचे सरदार होते. हे सर्वजण मिळून मोशे व अहरोनाकडे आले व त्याला म्हणाले: “सबंध मंडळी पवित्र आहे तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्‍वर त्यांच्याठायी आहे; तर मग तुम्ही परमेश्‍वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता?”—गणना १६:१-३.

१० या बंडखोरांनी मोशेच्या अधिकाराला ललकारण्याआधी थोडा विचार करायला हवा होता. काही काळाआधीच अहरोन व मिर्याम यांनी हीच चूक केली होती. किंबहुना, त्यांचा युक्‍तिवाद कोरहने केला त्याप्रमाणेच होता. गणना १२:१, २ या वचनानुसार त्यांनी म्हटले: “परमेश्‍वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला?” यहोवा त्यांचे बोलणे ऐकत होता. त्याने मोशे, अहरोन व मिर्याम या तिघांनाही दर्शनमंडपाच्या दारापाशी येण्याची आज्ञा केली. आपल्या पसंतीचा नेता कोण आहे हे तो त्यांना येथे दाखवणार होता. यहोवाने अगदी सडेतोडपणे सांगितले: “तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टांतात प्रगट होत असतो आणि स्वप्नांत त्याच्याशी भाषण करीत असतो. पण माझा सेवक मोशे ह्‍याच्या बाबतीत तसे नाही; माझ्या सर्व घराण्यात तो विश्‍वासू [“माझे सबंध घराणे त्याच्या स्वाधीन आहे,” NW] आहे.” यानंतर यहोवाने काही काळापुरते मिर्यामला कोडी केले.—गणना १२:४-७, १०.

११. कोरहसंबंधी घडलेल्या घटनेची मोशेने कशाप्रकारे शहानिशा केली?

११ कोरह व त्याच्या साथीदारांना या घटनेविषयी माहीतच असेल. त्यामुळे त्यांचा विद्रोह अक्षम्य होता. तरीसुद्धा मोशेने त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना त्यांच्या स्वतःच्या विशेषाधिकारांची कदर करण्याचा सल्ला दिला व म्हटले: “परमेश्‍वराने तुम्हाला आपल्याजवळ येऊ दिले; ह्‍या कार्यासाठी इस्राएलाच्या देवाने तुम्हाला इस्राएल लोकांच्या मंडळीतून वेगळे केले हे काय थोडे झाले?” नाही हे निश्‍चितच “थोडे” नव्हते! लेव्यांना आधीच अतिशय मोठा बहुमान प्राप्त झाला होता. ते आणखी कशाची अपेक्षा करू शकत होते? पण, “याजकपदहि तुम्ही मिळवू पाहता काय?” या मोशेच्या पुढील शब्दांतून त्यांच्या हृदयातील कुटीलता उजेडात आली. * (गणना १२:३; १६:९, १०) देवाने नेमलेल्या अधिकाराविरुद्ध केलेल्या बंडखोरीविषयी यहोवाची काय प्रतिक्रिया होती?

इस्राएलचा न्यायाधीश हस्तक्षेप करतो

१२. देवासोबत इस्राएलचा शांतीपूर्ण नातेसंबंध कशावर अवलंबून होता?

१२ यहोवाने इस्राएलला नियमशास्त्र दिले तेव्हा त्याने आपल्या लोकांना सांगितले की ते आज्ञाधारक राहिल्यास त्यांच्यापासून एक “पवित्र राष्ट्र” तयार होईल; आणि जोपर्यंत ते यहोवाच्या व्यवस्थेच्या अधीन राहतील तोपर्यंत हे राष्ट्र पवित्र राहील. (अनुवाद १९:५, ६) पण आता मंडळीत उघड बंडखोरी होत होती, त्यामुळे इस्राएलच्या न्यायाधीशाने व नियंत्याने हस्तक्षेप करण्याची वेळ आली होती! मोशेने कोरहला म्हटले: “उद्या तू आपल्या साऱ्‍या साथीदारांबरोबर परमेश्‍वरासमोर हजर हो; तू, ते व अहरोन, तुम्ही सर्व आपली धुपाटणी घेऊन त्यात धूप घाला; प्रत्येकी एक धुपाटणे ह्‍याप्रमाणे दोनशे पन्‍नास धुपाटणी परमेश्‍वरासमोर आणावी. तू व अहरोन ह्‍यांनीहि आपआपले धुपाटणे आणावे.”—गणना १६:१६, १७.

१३. (अ) बंडखोरांचे यहोवापुढे धूप जाळणे हे गर्विष्ठपणाचे लक्षण का होते? (ब) यहोवाने बंडखोरांचा कसा न्याय केला?

१३ देवाच्या नियमशास्त्रानुसार, केवळ याजक धूप जाळू शकत होते. तेव्हा, गैरयाजकीय लेवी वंशीयाने यहोवासमोर धूप जाळण्याच्या कल्पनेनेसुद्धा या बंडखोरांचे डोळे उघडायला हवे होते. (निर्गम ३०:७; गणना ४:१६) पण कोरह व त्याच्या साथीदारांच्या बाबतीत असे घडले नाही! दुसऱ्‍या दिवशी “कोरहाने [मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध] सगळी मंडळी दर्शनमंडपाच्या दारापाशी जमविली.” अहवाल पुढे सांगतो, “परमेश्‍वर मोशे व अहरोन ह्‍यांना म्हणाला, ‘तुम्ही ह्‍या मंडळीतून अलग व्हा, म्हणजे एका क्षणात मी त्यांना भस्म करितो.’” पण त्या लोकांचा जीव जाऊ नये म्हणून मोशे व अहरोन यांनी यहोवाकडे याचना केली. यहोवाने त्यांची विनंती स्वीकारली. कोरह व त्याच्या साथीदारांचे काय झाले? “परमेश्‍वरापासून अग्नि निघाला व त्याने त्या धूप जाळणाऱ्‍या दोनशे पन्‍नास पुरुषांना भस्म केले.”—गणना १६:१९-२२, ३५. *

१४. यहोवाने इस्राएलच्या मंडळीविरुद्ध कठोर पाऊल का उचलले?

१४ आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, बंडखोरांना यहोवाने कशी शिक्षा दिली हे प्रत्यक्ष पाहूनही इस्राएल लोकांनी त्यातून धडा घेतला नाही. “दुसऱ्‍या दिवशी इस्राएल लोकांची सर्व मंडळी मोशे व अहरोन ह्‍यांच्याविरुद्ध कुरकुर करीत म्हणाली, तुम्ही परमेश्‍वराच्या लोकांना मारून टाकिले आहे.” इस्राएल लोक मोशे व अहरोनाविरुद्ध कट करणाऱ्‍यांची बाजू घेत होते! शेवटी यहोवाची सहनशक्‍ती संपली. या वेळेला कोणीही, अगदी मोशे किंवा अहरोनसुद्धा या लोकांसाठी यहोवाला दयेची भीक मागू शकत नव्हते. यहोवाने आज्ञाभंजक लोकांवर पीडा आणण्याकरता मरी पाठवली आणि “कोरहाच्या प्रकरणात जे मेले त्यांच्याव्यतिरिक्‍त मरीने चौदा हजार सातशे लोक मेले.”—गणना १६:४१-४९.

१५. (अ) कोणत्या कारणांचा विचार करून इस्राएल लोकांनी मोशे व अहरोनाचे नेतृत्व आनंदाने स्वीकारायला हवे होते? (ब) या अहवालातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळाले?

१५ त्या सर्व लोकांनी नाहक आपले जीव गमावले. त्यांनी थोडा विचार करायला हवा होता. त्यांनी स्वतःला पुढील प्रश्‍न विचारायला हवे होते, जसे की ‘स्वतःचा जीव धोक्यात घालून कोण फारोसमोर हजर झाले होते? इस्राएली लोकांना मुक्‍त करण्याची मागणी कोणी केली होती? इस्राएल राष्ट्राला सोडवल्यानंतर देवाच्या स्वर्गदूताशी समोरासमोर बोलण्याकरता यहोवाने कोणाला होरेब पर्वतावर बोलवले होते?’ मोशे व अहरोनाने गतकाळात केलेली उल्लेखनीय कार्ये खरोखर यहोवाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा व लोकांबद्दल त्यांना वाटणाऱ्‍या प्रेमाचा पुरावा होती. (निर्गम १०:२८; १९:२४; २४:१२-१५) यहोवाला त्या बंडखोरांना ठार मारण्यात आनंद वाटला नाही. पण लोक आपला विद्रोही मार्ग सोडायला तयार नाहीत असे दिसल्यावर त्याने विधायक पाऊल उचलले. (यहेज्केल ३३:११) हे सर्वकाही आपल्याकरता अत्यंत अर्थसूचक आहे. का?

आजच्या काळातील माध्यम ओळखणे

१६. (अ) कोणत्या पुराव्यामुळे पहिल्या शतकातील यहुद्यांना याची खात्री पटायला हवी होती की येशू हा यहोवाचाच प्रतिनिधी होता? (ब) यहोवाने लेवीय याजकगणाला का बदलले आणि त्याऐवजी त्याने काय अस्तित्वात आणले?

१६ आज एक नवे “राष्ट्र” स्थापन करण्यात आले आहे ज्याचा अदृश्‍य न्यायाधीश, नियंता आणि राजा यहोवा आहे. (मत्तय २१:४३) हे “राष्ट्र” सा.यु. पहिल्या शतकात अस्तित्वात आले. एव्हाना मोशेच्या काळातील निवासमंडपाऐवजी जेरूसलेममध्ये एक सुंदर मंदिर बांधण्यात आले होते आणि येथे लेवी अजूनही सेवा करत होते. (लूक १:५, ८, ९) पण सा.यु. २९ साली दुसरे मंदिर, एक आत्मिक मंदिर अस्तित्वात आले; येशू ख्रिस्त या मंदिराचा मुख्य याजक होता. (इब्री लोकांस ९:९, ११) पुन्हा एकदा ईश्‍वरी अधिकाराचा प्रश्‍न उद्‌भवला. या नव्या ‘राष्ट्राचे’ नेतृत्व करण्याकरता यहोवा कोणाचा उपयोग करणार होता? येशूने देवाप्रती आपली परिपूर्ण निष्ठा सिद्ध केली होती. त्याचे लोकांवर प्रेम होते. त्याने अनेक अद्‌भुत चिन्हे देखील दाखवली होती. पण आपल्या हटखोर पूर्वजांप्रमाणेच बहुतेक लेव्यांनी येशूला स्वीकारण्यास नकार दिला. (मत्तय २६:६३-६८; प्रेषितांची कृत्ये ४:५, ६, १८; ५:१७) शेवटी, यहोवाने लेवीय याजकगणाच्या ठिकाणी एक अतिशय वेगळा—राजकीय याजकगण निर्माण केला. हा राजकीय याजकगण आजपर्यंत कार्यरत आहे.

१७. (अ) आज राजकीय याजकगणात कोणत्या समूहाचा समावेश आहे? (ब) यहोवा राजकीय याजकगणाचा कशाप्रकारे उपयोग करतो?

१७ आज या राजकीय याजकगणात कोण सामील आहेत? प्रेषित पेत्र त्याच्या पहिल्या प्रेरित पत्रात त्या प्रश्‍नाचे उत्तर देतो. ख्रिस्ताच्या देहातील अभिषिक्‍त सदस्यांना पेत्राने असे लिहिले: “तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहां; ह्‍यासाठी की, ज्याने तुम्हांस अंधकारांतून काढून आपल्या अद्‌भुत प्रकाशात पाचारण केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे.” (१ पेत्र २:९) या शब्दांतून स्पष्ट होते की एक समूह या नात्याने येशूच्या पावलांचे अनुकरण करणारे अभिषिक्‍त जन या ‘राजकीय याजकगणात’ सामील आहेत ज्याला पेत्राने “पवित्र राष्ट्र” देखील म्हटले. यहोवा त्याच्या लोकांना शिक्षण व आध्यात्मिक मार्गदर्शन पुरवण्याकरता ज्याचा उपयोग करतो ते हेच माध्यम आहे.—मत्तय २४:४५-४७.

१८. नेमलेले वडील आणि राजकीय याजकगण यांत काय संबंध आहे?

१८ राजकीय याजकगणाचे प्रतिनिधीत्व नियुक्‍त वडिलांकरवी केले जाते; हे वडील सबंध पृथ्वीवर असलेल्या यहोवाच्या लोकांच्या मंडळ्यांत जबाबदारीच्या पदांवर आहेत. अभिषिक्‍तांपैकी असोत वा नसोत, ते आपला आदर आणि मनःपूर्वक पाठिंबा मिळवण्यास योग्य आहेत. का? कारण पवित्र आत्म्याद्वारे, स्वतः यहोवाने या वडिलांना नेमले आहे. (इब्री लोकांस १३:७, १७) हे कसे शक्य आहे?

१९. वडिलांना कोणत्या अर्थाने पवित्र आत्म्याद्वारे नियुक्‍त केले जाते?

१९ हे वडील देवाच्या वचनात दिलेल्या अपेक्षा पूर्ण करतात, जे देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने लिहिण्यात आले आहे. (१ तीमथ्य ३:१-७; तीत १:५-९) त्यामुळे त्यांची नेमणूक पवित्र आत्म्याद्वारे केली जाते असे म्हणता येते. (प्रेषितांची कृत्ये २०:२८) वडिलांनी देवाच्या वचनाशी पूर्णपणे परिचित असले पाहिजे. त्यांना नियुक्‍त करणाऱ्‍या सर्वश्रेष्ठ न्यायाधीशाप्रमाणे त्यांनी देखील न्याय करताना, पक्षपाताचा लवलेश असलेल्या कोणत्याही गोष्टीचा मनापासून तिरस्कार केला पाहिजे.—अनुवाद १०:१७, १८.

२०. कष्टाळू वडिलांविषयी तुम्हाला कदर का वाटते?

२० वडिलांच्या अधिकाराविषयी शंका घेण्याऐवजी आपण आपल्या कष्टाळू वडिलांची मनःपूर्वक कदर करतो! बऱ्‍याच वर्षांची, काहींच्या बाबतीत तर अनेक दशकांची विश्‍वासू सेवा आपल्याला त्यांच्यावर पूर्ण भरवसा ठेवण्यास प्रवृत्त करते. ते विश्‍वासूपणे मंडळ्यांच्या सभांकरता तयारी करतात, या सभा चालवतात, ‘राज्याच्या सुवार्तेच्या’ प्रचारात आपल्यासोबत कार्य करतात आणि गरज पडेल तेव्हा आपल्याला शास्त्रवचनांतून सल्ला देखील पुरवतात. (मत्तय २४:१४; इब्री लोकांस १०:२३, २५; १ पेत्र ५:२) आपण आजारी पडल्यास ते आपल्याला येऊन भेटतात आणि आपल्यावर दुःखाचा प्रसंग आल्यास आपले सांत्वन करतात. एकनिष्ठपणे आणि निःस्वार्थपणे ते राज्याच्या कार्यांना पाठिंबा देतात. यहोवाचा आत्मा त्यांच्यावर आहे; आणि तो त्यांना आपली संमती देतो.—गलतीकर ५:२२, २३.

२१. वडिलांनी कशाविषयी जाणीव ठेवली पाहिजे आणि का?

२१ अर्थात, वडील देखील परिपूर्ण नाहीत. आपल्या मर्यादांची जाणीव ठेवून ते कळपावर अर्थात देवाने ‘त्यांच्या हाती सोपवलेल्या लोकांवर’ धनीपण करण्याचा प्रयत्न करत नाहीत. तर ते आपण बांधवांच्या “आनंदात साहाय्यकारी आहो” अशी मनोवृत्ती बाळगतात. (१ पेत्र ५:३; २ करिंथकर १:२४) नम्र, परिश्रमी वडील यहोवावर प्रीती करतात आणि त्यांना जाणीव आहे की ते जितक्या जवळून यहोवाचे अनुकरण करतील तितका मंडळीला त्यांच्या कार्याचा फायदा होईल. हे ध्यानात ठेवून ते सदोदित प्रीती, सहानुभूती व सहनशीलता यांसारखे ईश्‍वरी गुण विकसित करण्याचा प्रयत्न करतात.

२२. कोरहच्या अहवालावर पुनर्विचार केल्यामुळे यहोवाच्या दृश्‍य संघटनेवरील तुमचा विश्‍वास कशाप्रकारे बळकट झाला?

२२ आपण खरोखर किती आशीर्वादित आहोत, कारण यहोवा आपला अदृश्‍य शासक आहे, येशू ख्रिस्त आपला मुख्य याजक आहे, अभिषिक्‍त राजकीय याजकगणातील सदस्य आपले शिक्षक आहेत आणि विश्‍वासू ख्रिस्ती वडील आपले मार्गदर्शक आहेत! मानवांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारी कोणतीही संस्था परिपूर्ण असू शकत नाही, तरीसुद्धा आपण ईश्‍वरी अधिकाराला आनंदाने अधीन राहणाऱ्‍या आपल्या विश्‍वासू बांधवांसोबत देवाची सेवा करण्यास किती आनंदित आहोत!

[तळटीपा]

^ परि. 8 अहरोनाचे दुसरे दोन पुत्र, एलाजार आणि इथामार यांनी यहोवाच्या सेवेत अतिशय अनुकरणीय आदर्श मांडला होता.—लेवीय १०:६.

^ परि. 11 कोरहबरोबर कटात सामील झालेले दाथान व अबीराम रुबेनवंशीय होते. त्यांना कदाचित याजकपदाची हाव नसेल. पण त्यांना मोशेचे नेतृत्व नको होते, शिवाय प्रतिज्ञात देशात जाण्याची अपेक्षा अद्याप पूर्ण न झाल्याबद्दल त्यांना नाराजी होती.—गणना १६:१२-१४.

^ परि. 13 कुलपित्यांच्या काळात प्रत्येक घराण्याचा प्रमुख देवापुढे आपल्या पत्नी व मुलांचा प्रतिनिधी होता; त्यांच्यावतीने तो बलिदानेही अर्पण करत असे. (उत्पत्ति ८:२०; ४६:१; ईयोब १:५) पण नियमशास्त्र स्थापित करण्यात आल्यानंतर यहोवाने अहरोनाच्या घराण्यातील पुरुषांना याजक नेमले आणि लोकांना त्यांच्याद्वारे बलिदाने अर्पण करण्यास सांगण्यात आले. सदर घटनेतील २५० बंडखोर हा फेरबदल अंमलात आणण्यास तयार नव्हते असे दिसते.

तुम्ही काय शिकला?

• यहोवाने इस्राएल लोकांची काळजी वाहण्याकरता कोणत्या प्रेमळ तरतुदी केल्या होत्या?

• मोशे व अहरोनाविरुद्ध कोरहचे बंड का अक्षम्य होते?

• यहोवाने बंडखोरांशी केलेल्या व्यवहारातून आपल्याकरता कोणता धडा आहे?

• आज आपण यहोवाच्या तरतुदींची कदर करतो हे कसे दाखवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

यहोवाच्या सेवेत तुम्हाला दिलेल्या कोणत्याही कामाला तुम्ही एक बहुमान समजता का?

[१० पानांवरील चित्र]

“तर मग तुम्ही परमेश्‍वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजविता?”

[१३ पानांवरील चित्र]

नियुक्‍त वडील राजकीय याजकगणाचे प्रतिनिधी आहेत