व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘देवाचे वचन सक्रिय आहे’

‘देवाचे वचन सक्रिय आहे’

राज्य घोषकांचा वृत्तान्त

‘देवाचे वचन सक्रिय आहे’

जमेकाच्या उष्ण कॅरिबियन बेटावर बहुतेक लोक बायबलशी परिचित आहेत. किंग जेम्स व्हर्शन हे बायबल तर घराघरात सापडू शकते आणि काही लोकांना “देवाचे वचन सजीव, सक्रिय” असल्याचा प्रत्ययही आला आहे. (इब्री लोकांस ४:१२) ते सक्रिय असल्यामुळे लोकांच्या जीवनात बदल घडू शकतो हे पुढील अनुभवावरून दिसून येईल.

क्लिव्हलंड नावाचा एक मनुष्य नुकताच कामावरून घरी आला होता, तेवढ्यात एका यहोवाच्या साक्षीदाराने त्याला भेट दिली. शास्त्रवचनांवर काही माहिती सांगितल्यावर साक्षीदाराने त्याला सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान हे बायबल अभ्यासाचे साधन दिले. देवाच्या वचनाचा आपल्या जीवनात किती प्रभाव पडेल याची क्लिव्हलंडला त्या वेळी जराही कल्पना नव्हती.

क्लिव्हलंड दिवसातून तीन वेळा प्रार्थना करायचा; देवाची योग्य मार्गाने उपासना करण्यासाठी तो देवाला मदत मागायचा. आपले आईवडील योग्य मार्गाने उपासना करत नाहीत याची क्लिव्हलंडला खात्री पटली होती; पण इतरही धर्मांचे परीक्षण केल्यावर त्याची घोर निराशा झाली होती. यहोवाच्या साक्षीदारांविषयी तो ऐकून होता परंतु त्यांच्याजवळ खरोखरच सत्य आहे का याची त्याला शंका वाटत होती. मनात शंका असतानाही त्याच्या घरी आलेल्या साक्षीदाराने बायबल अभ्यासाचा प्रस्ताव मांडला तेव्हा क्लिव्हलंडने होकार दिला. का? कारण ते चुकीच्या मार्गाने जात आहेत हे त्याला त्यांना सिद्ध करून दाखवायचे होते!

पण स्वतःच्या अभ्यासात त्याला माहीत पडले की, दोन वेगवेगळ्या स्त्रियांसोबत त्याचे असलेले अनैतिक संबंध देवाला नापसंत करणारे आहेत. (१ करिंथकर ६:९, १०) दोनच वेळा अभ्यास केल्यावर त्याने धैर्य एकवटून या स्त्रियांसोबत आपले संबंध तोडले. तो राज्य सभागृहात ख्रिस्ती सभांनाही उपस्थित राहू लागला. पण ही त्याच्याकरता आणखी एक परीक्षा ठरली.

क्लिव्हलंड त्या परिसरातील सॉकर संघामध्ये होता आणि त्याचे खेळ सभांच्या उपस्थितीच्या आड येत होते. त्याने काय करावे? संघातील खेळाडूंकडून, कोचकडून आणि मित्रांकडून जबरदस्त दबाव असतानाही क्लिव्हलंडने सॉकर संघ सोडण्याचा निर्णय घेतला. होय, देवाच्या वचनाची सक्रिय शक्‍ती त्याच्यावर प्रभाव पाडू लागली होती आणि त्याचे भले होत होते.

क्लिव्हलंड, बायबलमधील ज्ञान इतरांना सांगू लागला तेव्हा देवाचे वचन सक्रिय आहे याची त्याला आणखी प्रचिती मिळाली. (प्रेषितांची कृत्ये १:८) याचा परिणाम असा झाला की, त्याच्या संघातील आधीचे खेळाडू यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहू लागले. क्लिव्हलंड सुवार्तेचा प्रकाशक बनला तेव्हा त्याला सेवेतून पुष्कळ आनंद मिळू लागला आणि तो इतरांना मदत करण्यासाठी देवाच्या वचनाचा उपयोग करू लागला.

देवाच्या वचनाचा स्वतःवर असाच प्रभाव होऊ दिल्यामुळे क्लिव्हलंडने सरतेशेवटी पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन यहोवाला आपले समर्पण चिन्हांकित केले आणि आता त्याला मंडळीत पूर्ण-वेळेचा सेवक आणि सेवा सेवक या नात्याने सेवा करण्याचा बहुमान मिळाला आहे.

जमेकामध्ये तसेच संपूर्ण जगभरात, हजारो लोकांना असाच प्रत्यय आला आहे की, “देवाचे वचन सजीव, सक्रिय” आहे.

[८ पानांवरील नकाशा/चित्र]

जमेका

[चित्राचे श्रेय]

नकाशा आणि पृथ्वी: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.