व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मनापासून केलेल्या प्रयत्नांना यहोवा केव्हा आशीर्वादित करतो?

मनापासून केलेल्या प्रयत्नांना यहोवा केव्हा आशीर्वादित करतो?

मनापासून केलेल्या प्रयत्नांना यहोवा केव्हा आशीर्वादित करतो?

“पहाट होत आहे, मला जाऊ दे.”

“तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ द्यावयाचा नाही.”

“तुझे नाव काय?”

“याकोब.”

“यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्त्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”उत्पत्ति ३२:२६-२८.

हे रोचक संभाषण, ९७ वर्षीय याकोबाच्या असाधारण शक्‍तीप्रदर्शनाचा परिणाम होते. बायबलमध्ये याकोबाला पैलवान म्हटलेले नसले तरी, एका देवदूताबरोबर त्याने रात्रभर झोंबी, किंवा झुंज केली. का? कारण, यहोवाने आपल्या कुलपित्याला दिलेल्या अभिवचनाची अर्थात वारशाची त्याला खात्री करून घ्यायची होती.

पुष्कळ वर्षांआधी, याकोबाचा भाऊ, एसाव याने वाटीभर वरणासाठी आपला जन्मसिद्ध हक्क याकोबाला विकला होता. आता, याकोबाला खबर मिळते, की एसाव ४०० लोकांना घेऊन येत आहे. चिंतातूर याकोब, त्याच्या कुटुंबाची यार्देन नदीच्या पलीकडे वृद्धी होईल असे यहोवाने त्याला दिलेल्या अभिवचनाची खात्री करू इच्छितो. आपल्या प्रार्थनांच्या एकवाक्यतेत याकोब निर्णायक कार्य करतो. त्याच्याकडे येणाऱ्‍या एसावाला तो उदारपणे भेटी पाठवतो. तो संरक्षक कार्यही करतो; आपल्याबरोबर असलेल्या लोकांच्या दोन टोळ्या बनवतो आणि आपल्या पत्नींना व मुलांना यब्बोक नदीच्या उताराने पाठवतो. अथक प्रयत्नांनंतर व अश्रू गाळून तो आता एका देवदूताबरोबर रात्रभर झोंबी करतो जेणेकरून त्याला ‘स्वतःसाठी करुणा भाकता’ येईल.—होशेय १२:४; उत्पत्ति ३२:१-३२.

याआधीच्या आणखी एका उदाहरणाचा विचार करा; याकोबाची दुसरी परंतु अतिप्रिय पत्नी राहेल हिचा. राहेलला, यहोवाने याकोबाला दिलेल्या आशीर्वादाबद्दलची चांगली माहिती आहे. तिची बहीण म्हणजे याकोबाची पहिली पत्नी लेआ हिला चार पुत्र होतात पण राहेल मात्र वांझ आहे. (उत्पत्ति २९:३१-३५) स्वतःची कीव करत बसण्यापेक्षा ती यहोवाला प्रार्थनेद्वारे सतत विनवणी करीत राहते आणि आपल्या प्रार्थनांच्या एकवाक्यतेत निर्णायक कार्यही करते. तिची पूर्वज सारा हिने हागाराबरोबर जसे केले होते तसे राहेलही आपली दासी बिल्हा हिला दुय्यम पत्नी म्हणून याकोबापाशी पाठवते जेणेकरून तिच्यामुळे, “माझे घर नांदते होईल,” असे राहेल म्हणते. * बिल्हाला याकोबाकडून दोन पुत्र होतात, दान आणि नफताली. नफतालीच्या जन्माच्या वेळी राहेल अगदी कळकळीने म्हणते: “मी आपल्या बहिणीशी प्रचंड झोंबी करून यश मिळविले आहे!” नंतर मग राहेललासुद्धा दोन पुत्र होतात, योसेफ व बन्यामीन.—उत्पत्ति ३०:१-८; ३५:२४.

याकोबाने व राहेलने केलेली कार्ये व त्यांच्या शारीरिक तसेच मानसिक प्रयत्नांवर यहोवाने आशीर्वाद का दिला? कारण त्यांनी यहोवाच्या इच्छेला प्राधान्य दिले आणि आपला वारसा जपून ठेवला. आपल्या जीवनावर यहोवा आशीर्वाद देवो म्हणून ते कळकळीने प्रार्थना करीत राहिले आणि देवाची इच्छा व स्वतःच्या विनवण्यांच्या एकवाक्यतेत त्यांनी आवश्‍यक ती कार्ये केली.

याकोब आणि राहेलप्रमाणे आजही पुष्कळ लोक सांगू शकतात, की यहोवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना अथक प्रयत्न करावे लागले. प्रयत्नांबरोबर त्यांना अश्रू गाळावे लागले असतील, ते निरुत्साहित व निराश झाले असतील. एलिझाबेथ नावाच्या एका ख्रिस्ती आईला, पुष्कळ काळ ख्रिस्ती सभांना अनुपस्थित राहिल्यानंतर पुन्हा एकदा सभांना जायला सुरवात करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागले होते, हे ती आठवून सांगते. पाच लहान मुलगे, सत्यात नसलेला नवरा आणि जवळच्या राज्य सभागृहाला जाण्याकरता ३० किलोमीटरचा प्रवास, या अडचणी तिच्यासमोर होत्या. ती म्हणते: “सभांना नियमितरीत्या जाण्यासाठी स्वतःला शिस्त लावण्याची गरज होती; पण यानं माझं आणि माझ्या मुलांचं भलं होणार आहे हे मला माहीत होतं. यामुळे, या मार्गाक्रमणाचा मला केव्हाही पस्तावा होणार नाही हे मी पाहू शकले.” यहोवाने तिच्या प्रयत्नांवर आशीर्वाद दिला. ख्रिस्ती मंडळीत सक्रिय असलेल्या तिच्या तीन मुलांपैकी दोघे पूर्ण वेळेच्या सेवेत आहेत. त्यांची आध्यात्मिक प्रगती पाहून ती म्हणते: “त्यांनी माझ्याही पुढे जाऊन आध्यात्मिक प्रगती केली आहे.” तिच्या अथक प्रयत्नांचे किती सुंदर प्रतिफळ!

मनापासून केलेल्या प्रयत्नांवर यहोवा आशीर्वाद देतो

आपण मनापासून झटलो व परिश्रम घेतले तर आपल्याला निश्‍चितच चांगले प्रतिफळ मिळेल. एखाद्या कामात किंवा एखाद्या नेमणुकीत आपण स्वतःला जितके झोकून देतो तितके अधिक समाधान आपल्याला मिळते. कारण यहोवाने आपली घडणच त्याप्रकारे केली आहे. शलमोन राजाने लिहिले: “प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.” (उपदेशक ३:१३; ५:१८, १९) परंतु देवाकडून आपल्याला आशीर्वाद हवे असतील तर आपले प्रयत्न योग्य दिशेने आहेत याची आपण खात्री केली पाहिजे. जसे की, आध्यात्मिक गोष्टींना दुय्यम स्थान देणारे आपले राहणीमान असेल तर आपण यहोवाच्या आशीर्वादाची अपेक्षा करू शकतो का? एखाद्या समर्पित ख्रिश्‍चनाने स्वीकारलेल्या नोकरी किंवा बढतीमुळे त्याला, विश्‍वासवर्धक व प्रशिक्षण पुरवणाऱ्‍या ख्रिस्ती सभा नियमितपणे चुकवाव्या लागत असतील, तर तो यहोवाच्या स्वीकृतीची अपेक्षा करू शकतो का?—इब्री लोकांस १०:२३-२५.

आधात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करून प्रापंचिक करिअर किंवा भौतिक संपत्ती मिळवण्यासाठी, आयुष्यभर केलेल्या प्रयत्नांमुळे एखाद्याला “सुख” मिळेलच असे आपण खात्रीनिशी सांगू शकत नाही. येशूने पेरणाऱ्‍याच्या दाखल्यात, चुकीच्या प्रयत्नांच्या परिणामांचे वर्णन दिले. ‘काटेरी झाडांमध्ये पेरलेल्या’ बीजाविषयी येशूने म्हटले, की “तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात आणि तो निष्फळ होतो.” (मत्तय १३:२२) पौलाने देखील अशाप्रकारच्या पाशाविषयी इशारा देताना म्हटले, की भौतिक गोष्टींच्या मागे लागणारे “परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात.” मग, आध्यात्मिकरीत्या घातक ठरणाऱ्‍या अशा मार्गाक्रमणापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी काय उपाय आहे? पौल म्हणतो: ‘ह्‍यापासून पळा, आणि चंचल धनावर आशा ठेवू नका, तर जो जिवंत देव आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवा.’—१ तीमथ्य ६:९, ११, १७.

आपले कितीही वयोमान असले किंवा आपण कितीही वर्षांपासून यहोवाची सेवा करत असलो तरी, आपण याकोब व राहेलप्रमाणे मनापासून प्रयत्न करून लाभ मिळवू शकतो. त्यांची परिस्थिती कितीही भयानक किंवा निराशाजनक असली तरीही, देवाची मर्जी प्राप्त करण्यासाठी झटत असताना, ते आपला वारसा विसरले नाहीत. आज, आपल्याला तोंड द्यावे लागणारे दबाव आणि अडचणीसुद्धा अशाचप्रकारे भयानक, निराशाजनक किंवा दुःखदायक असतील. अशा वेळी झटायाचे सोडून देण्याचा आपल्याला मोह होऊ शकतो पण यामुळे सैतानाला आणखी एका व्यक्‍तीचा बळी मिळू शकतो. आपले उद्देश साध्य करण्यासाठी तो, मनोरंजन, करमणूक, खेळ, छंद, करिअर, भौतिक संपत्ती, यांपैकी कशाचाही उपयोग करू शकतो. चांगले परिणाम मिळतील असे केवळ आपल्याला वाटत राहते पण सर्वच वेळी हे वास्तविकतेत उतरत नाही. अशाप्रकारे ज्यांची भुलवणूक होते त्यांच्या किंवा वरील गोष्टींच्या मागे लागण्याच्या मोहात पडलेल्यांच्या पदरी बहुतेकदा घोर निराशाच पडते. तेव्हा, प्राचीन काळच्या याकोब व राहेलप्रमाणे आपणही मनापासून प्रयत्न करणारे होऊन सैतानाच्या कुयुक्‍त्‌यांवर मात करू या.

सैतानाची हीच इच्छा आहे, की आपण निराश होऊन हार मानावी. ‘परिस्थिती आशाहीन झाली आहे; आता काहीही केले तरी त्याचा उपयोग होणार नाही,’ असा आपण विचार करावा असेच सैतानाला वाटते. त्यामुळे आपण सर्वांनी सावधगिरी बाळगून, अशाप्रकारची हार मानण्याची मनोवृत्ती विकसित करण्याचे टाळणे खरोखरच किती गरजेचे आहे; ‘माझ्यावर कोणाचे प्रेम नाही,’ किंवा ‘यहोवा आम्हाला विसरून गेला आहे,’ असा आपण केव्हाही विचार करता कामा नये. असे करणे म्हणजे, स्वतःवर संकट ओढवून घेणे होय. यावरून असे सूचित होणार नाही का, की आपण हार मानली आहे आणि आशीर्वाद मिळेपर्यंत आपण झटण्यास तयार नाही? मनापासून केलेल्या आपल्या प्रयत्नांवर यहोवा आशीर्वाद देतो, ही गोष्ट आपण सदोदित आठवणीत ठेवावी.

यहोवाच्या आशीर्वादांसाठी झटत राहा

यहोवाचा सेवक या नात्याने जीवन जगण्याच्या बाबतीत असलेली दोन मूलभूत सत्ये समजण्यावरच आपले आध्यात्मिक आरोग्य अधिक प्रमाणावर अवलंबून आहे. (१) जीवनांतील समस्यांवर, दुखण्यांवर किंवा अडचणींवर कोणाचीही मक्‍तेदारी नाही. (२) मदतीसाठी व आशीर्वादासाठी कळकळीने विनवणी करणाऱ्‍या सर्वांची प्रार्थना यहोवा ऐकतो.—निर्गम ३:७-१०; याकोब ४:८, १०; १ पेत्र ५:८, ९.

तुमची परिस्थिती कितीही कठीण असली किंवा तुम्हाला जास्त करता येत नाही असे सारखेच वाटत असले तरी ‘सहज गुंतविणाऱ्‍या पापाला’ बळी पडू नका अर्थात, विश्‍वासात कमकुवत होऊ नका. (इब्री लोकांस १२:१) आशीर्वाद मिळेपर्यंत झटत राहा. धीर धरून आशीर्वाद मिळवण्यासाठी संपूर्ण रात्र झोंबी केलेल्या वृद्ध याकोबाची आठवण करा. वसंत ऋतूत पेरणी करून कापणीची वाट पाहणाऱ्‍या शेतकऱ्‍याप्रमाणे, तुम्ही करत असलेल्या आध्यात्मिक कार्यांवर यहोवाच्या आशीर्वादांसाठी थांबून राहा; आपण जास्त करू शकत नाही, असे तुम्हाला कितीही वाटत असले तरी थांबून राहा. (याकोब ५:७, ८) आणि स्तोत्रकर्त्याच्या या शब्दांची नेहमी आठवण ठेवा: “जे अश्रूपूर्ण नेत्रांनी पेरणी करितात ते हर्षाने कापणी करितील.” (स्तोत्र १२६:५; गलतीकर ६:९) दृढ व झटणाऱ्‍यांमध्येच राहा.

[तळटीपा]

^ परि. 9 उपपत्नी ठेवण्याची प्रथा, नियमशास्त्राचा करार अस्तित्वात येण्याआधीपासूनच आचरली जात होती व ती नियमशास्त्रानुसार मान्य होती व त्याच्या आधारे नियंत्रणात ठेवली जात होती. एदेन बागेत एकपत्नीच्या संबंधाने देवाने स्थापित केलेला मूळ दर्जा, येशूचे आगमन होईपर्यंत पुनर्स्थापित करण्याचा उचित समय नाही असे देवाला वाटत होते, पण कायद्यानुसार त्याने उपपत्नींसाठी संरक्षण पुरवले. उपपत्नी ठेवण्याच्या प्रथेमुळे इस्राएलच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत गेली.