व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

योग केवळ व्यायाम की आणखी काही?

योग केवळ व्यायाम की आणखी काही?

योग केवळ व्यायाम की आणखी काही?

सुडौल, स्वस्थ शरीर हे आज बहुतेक लोकांचे स्वप्न आहे. आणि त्यामुळे बरेच लोक जिम आणि हेल्थ क्लब्समध्ये जातात. याच कारणामुळे पाश्‍चात्त्य देशांतील हजारो लोक पौर्वात्य योगसाधनेकडे आकर्षित झाले आहेत.

तणाव, औदासिन्य आणि निराशेने ग्रस्त असणाऱ्‍यांनी देखील मनःशांती आणि आपल्या समस्यांवर उपाय मिळवण्याकरता योगाभ्यासाचा मार्ग धरला आहे. खासकरून १९६० या हिप्पी व “फ्लावर चिल्ड्रन” संस्कृतीच्या दशकापासून पौर्वात्य धर्मांविषयी व त्यांतील गूढ प्रथांविषयी पाश्‍चात्त्य देशांतील अधिकाधिक लोकांना कुतूहल वाटू लागले आहे. योगसाधनेशीच निगडीत असलेल्या, मंत्र जपून ध्यान करण्याच्या प्रकारालाही चित्रपट अभिनेते आणि रॉक कलाकारांनी लोकप्रियता आणली आहे. योगाभ्यासाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन आपण कदाचित असा विचार करू: ‘योग म्हणजे केवळ व्यायाम आहे का, ज्याद्वारे त्याचा अभ्यास करणाऱ्‍याला निरोगी, सडपातळ शरीरयष्टी आणि काही प्रमाणात मनःशांती प्राप्त होते? यात कोणतेही धार्मिक अर्थ गोवलेले नाहीत का? योगसाधना ख्रिश्‍चनांकरता योग्य आहे का?’

योगाची पार्श्‍वभूमी

ज्या मूळ संस्कृत शब्दापासून ‘योग’ हा शब्द बनला आहे त्याचा अर्थ जोडणे, एकत्र आणणे किंवा जुवाखाली जुंपणे अथवा ताब्यात ठेवणे असा होतो. हिंदू व्यक्‍तीकरिता योग हा एका महान अलौलिक परमात्म्याशी जुळण्याचा मार्ग अथवा साधना आहे. त्याचे वर्णन “शरीर, मन व आत्म्याच्या सर्व इंद्रियांना जुंपून देवापर्यंत पोचणे” अशाप्रकारे करण्यात आले आहे.

योगाचा इतिहास किती जुना आहे? योगासनांच्या स्थितीत असलेल्या लोकांच्या आकृती सध्याच्या पाकिस्तानात असलेल्या सिंधू खोऱ्‍यात सापडलेल्या शिक्क्यांवर आढळतात. पुरातत्त्ववेत्त्यांच्या मते सिंधू संस्कृती सा.यु.पू. तिसऱ्‍या व दुसऱ्‍या सहस्रकाच्या मधल्या काळातली आहे; हा कालखंड मेसोपोटेमियन संस्कृतीच्या अगदी जवळचा आहे. दोन्ही प्रदेशांतून सापडलेल्या वस्तू एका माणसाला चित्रित करतात ज्याला देवता मानत असावेत; त्याच्या डोक्यावर प्राण्यांच्या शिंगाचा मुकुट असून त्याच्या अवतीभवती प्राणी आहेत. ही चित्रकृती “बलवान पारधी” निम्रोद याची आठवण करून देते. (उत्पत्ति १०:८, ९) हिंदूंच्या मते योगासनांच्या स्थितीत असलेल्या आकृत्या शिवाच्या प्रतिकृती आहेत; त्याचे प्राण्यांवर प्रभुत्व असून त्याला योगांचा राजा मानले आहे आणि पुरुषाच्या जननेंद्रियाचे प्रतिक असलेल्या लिंगाच्या माध्यमाने त्याची उपासना करतात. हिंदू वर्ल्ड हे पुस्तक असे म्हणते की योग “अनेक आदिम संकल्पनांचे आणि विधींचे अवशेष असलेली, आर्यपूर्व काळात उत्पत्तीस आलेली तपश्‍चर्येची संहिता आहे.”

सुरवातीला योगत्वाचे शास्त्र मौखिक स्वरूपात पोचते करण्यात आले. कालांतराने भारतीय योगिक मुनी पतंजलीने हे शास्त्र सविस्तर लेखी स्वरूपात उतरवले; योगसूत्र नावाचा हा ग्रंथ आजही योगशास्त्राचे मुख्य पाठ्यपुस्तक मानले जाते. पतंजली यांच्यानुसार “मानवी शरीर व मनाच्या सर्व चित्तवृत्तींवर नियंत्रण आणून सिद्धी प्राप्त करण्याचा पद्धतशीर प्रयत्न” म्हणजे योग. सुरवातीपासून आजपर्यंत योग पौर्वात्य धर्मांतील, खासकरून आता हिंदू, जैन व बौद्ध धर्मांतील अविभाज्य अंग आहे. योगाभ्यास करणाऱ्‍या काहींचे असे मत आहे की योगसाधनेमुळे त्यांना एका सर्वव्यापी आत्म्याचा साक्षात्कार प्राप्त होऊन मोक्ष किंवा मुक्‍ती प्राप्त होईल.

तेव्हा पुन्हा एकदा प्रश्‍न उद्‌भवतो: ‘धर्मात न गुंतता, केवळ निरोगी शरीर व शांत मन विकसित करण्याच्या उद्देशाने शारीरिक व्यायाम म्हणून योगाभ्यास करता येईल का?’ वरील पार्श्‍वभूमीचा विचार केल्यास, या प्रश्‍नाचे उत्तरही नाही असेच द्यावे लागेल.

योग तुम्हाला कोठे नेऊ शकते?

योगशास्त्राचा उद्देश एका व्यक्‍तीला एका अलौकिक आत्म्याशी “जुळण्याचा” आध्यात्मिक अनुभव घडवून देणे. पण हा आत्मा म्हणजे काय?

हिंदू वर्ल्ड यात बेन्जमिन वॉकर यांनी योगासंबंधाने असे म्हटले आहे: “ही आदिम काळातील पिशाच्चविद्या असावी; आजही योगाचा अर्थात गूढवाद आणि चेटूक यांचा अप्रत्यक्ष का होईना, संदर्भ आहेच.” हिंदू तत्त्वज्ञानी कबूल करतात की योगाभ्यासामुळे व्यक्‍तीला अतिमानवीय शक्‍ती प्राप्त होते, पण त्यांचे म्हणणे आहे की हा योगशास्त्राचा अंतिम उद्देश नाही. उदाहरणार्थ, भारतीय तत्त्वज्ञान या पुस्तकात भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. एस. राधाकृष्णन यांनी योगाभ्यास करणाऱ्‍याविषयी असे म्हटले की “वेगवेगळ्या आसनांद्वारे शरीरावर नियंत्रण मिळवल्यामुळे एक वेळ अशी येते की उष्ण व शीत अशा टोकाच्या तापमानांचाही व्यक्‍तीवर काहीच परिणाम होत नाही. . . . योगी दूरच्या अंतराहून पाहू व ऐकू शकतो . . . सर्वसामान्य संपर्काच्या पद्धतींचा अवलंब न करताही दोन व्यक्‍तींमध्ये विचारांची देवाणघेवाण सहज शक्य होते. . . . योगी स्वतःचे शरीर अदृश्‍य करण्यासही समर्थ होतो.”

खिळ्यांवर झोपण्याचे किंवा जळत्या कोळशांवर अनवाणी चालण्याचे प्रकार काहींना कदाचित थोतांड आणि इतरांना हास्यास्पद वाटतील. पण भारतात अशा घटना सर्रास घडतात; याशिवाय, तासन्‌तास एका पायावर उभे राहून सूर्याकडे एकटक पाहणे तसेच श्‍वसनेंद्रियांवर नियंत्रण केल्यामुळे वाळूत पुरलेल्या अवस्थेत अनेक तास राहणे देखील सामान्य आहे. १९९५ साली जूनमध्ये, द टाईम्स ऑफ इंडिया यात एका साडेतीन वर्षांच्या मुलीविषयी वृत्त होते. ही मुलगी ध्यानस्थ असताना ७५० पेक्षा अधिक किलोग्राम वजनाची कार तिच्या पोटावरून नेण्यात आली. ती उठली तेव्हा तिला काहीही झालेले नव्हते, हे पाहून जमाव स्तंभित झाला. वृत्तात असे म्हटले होते की “हा निव्वळ योगशक्‍तीचा चमत्कार होता.”

कोणताही सर्वसामान्य मनुष्य अशाप्रकारची कार्ये करण्यास समर्थ नाही हे निर्विवाद आहे. त्यामुळे ख्रिस्ती व्यक्‍तीने विचार करावा: हे अद्‌भुत पराक्रम काय सूचित करतात? ते “सर्व पृथ्वीवर परात्पर” असलेल्या यहोवा देवाकडून आहेत की दुसऱ्‍या कोणत्या उगमाकडून? (स्तोत्र ८३:१८) बायबलची या बाबतीत अगदी स्पष्ट भूमिका आहे. इस्राएली लोक (कनानी लोकांची वस्ती असलेल्या) प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याच्या बेतात असताना यहोवाने मोशेच्याद्वारे इस्राएलच्या संतानांस असे सांगितले: “तुझा देव परमेश्‍वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा त्यातल्या राष्ट्रांप्रमाणे अमंगल कृत्ये करावयाला शिकू नको.” कोणती ‘अमंगळ कृत्ये’? ‘चेटूक करणे, शकुनमुहूर्त पाहणे, मंत्रतंत्र करणे, व जादू करणे’ इत्यादि गोष्टींविषयी मोशेने ताकीद दिली. (अनुवाद १८:९, १०) ही कृत्ये देवाला अमंगल वाटतात कारण की ती पिशाच्चांची व पतित शरीराची कामे आहेत.—गलतीकर ५:१९-२१.

ख्रिस्ती लोकांकरता नाही

आरोग्यविषयक सल्लागार काहीही म्हणोत, पण योग केवळ शारीरिक व्यायामापुरते मर्यादित नाही. हिंदू पद्धती, रूढी व विधी (इंग्रजी) यात एका गुरूच्या मार्गदर्शनाखाली योगशास्त्र शिकणाऱ्‍या दोन नवशिक्यांचे अनुभव दिले आहेत. त्यांपैकी एक असे म्हणतो: “मी जास्तीतजास्त वेळ श्‍वास रोखून ठेवण्याचा मनुष्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रयत्न करायचो; आपण बेशुद्ध होऊ असे वाटू लागले तेव्हाच पुन्हा श्‍वास घ्यायचो. . . . एकदा भर दुपारी मला मोठा चंद्र दिसला जो दोन्ही बाजूला हेलकावे खात आहे असे भासत होते. दुसऱ्‍या वेळी मला असे भासले जणू भरदुपारी माझ्या अवतीभवती गुडूप अंधार आहे. माझ्या गुरुंना मी या दृश्‍यांचे वर्णन केले तेव्हा त्यांना खूप आनंद वाटला. . . . त्यांनी मला आश्‍वासन दिले की याहीपेक्षा अद्‌भुत अनुभव मला थोड्याच काळात येऊ लागतील.” दुसरा माणूस असे सांगतो: “ते मला दररोज पापणी न हलवता किंवा काहीही हालचाल न करता आकाशाकडे एकटक पाहायला लावायचे. . . . कधीकधी मला हवेत ठिणग्या दिसायच्या; तर कधी आगीचे गोळे किंवा इतर उल्का दिसायच्या. माझे प्रयत्न यशस्वी होत असल्याचे पाहून माझे गुरू अतिशय संतुष्ट होते.”

या गुरूंच्या मते योगिक आसनांच्या खऱ्‍या लक्ष्यापर्यंत पोचण्याकरता या असाधारण दृश्‍यांसारखे परिणाम अपेक्षित होते. होय योगाचे अंतिम ध्येय आहे मोक्ष, ज्याचा अर्थ एका अमूर्त परमात्म्याशी जुळणे असा असल्याचे सांगितले जाते. याचे वर्णन “स्वाभाविक मानसिक क्रिया (मुद्दामहून) थांबवणे” अशाप्रकारे करण्यात आले आहे. हे ख्रिस्ती लोकांकरता सांगितलेल्या ध्येयाच्या स्पष्टपणे विपरीत आहे; त्यांना असे सांगण्यात आले आहे की “तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या.”—रोमकर १२:१, २.

कोणत्या प्रकारचे व्यायाम करावेत हा प्रत्येकाचा वैयक्‍तिक प्रश्‍न आहे. पण खरे ख्रिस्ती मात्र कशाचाही—मग ते शारीरिक व्यायाम, खाणेपिणे, पेहराव, करमणूक अथवा इतर काहीही असो—ते त्याचा परिणाम यहोवा देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर होऊ देणार नाहीत. (१ करिंथकर १०:३१) जे केवळ आपल्या आरोग्याकरता व्यायाम करू इच्छितात, त्यांच्याजवळ असे करण्याचे इतर अनेक मार्ग आहेत, ज्यांत भूतविद्या व पिशाच्चवाद यातील धोक्यांच्या संपर्कात येण्याची गरज पडत नाही. खोट्या धर्मांत मुळावलेल्या प्रथा व विश्‍वासांपासून दूर राहिल्याने आपण एका नीतिमान नव्या जगात देवाचे आशीर्वाद उपभोगण्याची आशा बाळगू शकतो जेथे आपण सर्वकाळ परिपूर्ण शारीरिक व मानसिक आरोग्याचा आनंद लुटू.—२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:३, ४.

[२२ पानांवरील चित्रे]

बरेच जण भूतविद्येशी संबंध नसलेल्या मार्गांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतात