व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

वाचकांचे प्रश्‍न

देवाची मर्जी संपादण्यासाठी पशूचे अर्पण करणे आवश्‍यक आहे, हे हाबेलाला माहीत होते का?

काइन व हाबेल यांनी केलेल्या अर्पणांचा बायबलचा अहवाल अगदी त्रोटक आहे. उत्पत्ति ४:३-५ येथे आपण असे वाचतो: “काही काळ लोटल्यावर असे झाले की काइनाने परमेश्‍वराला शेताच्या उत्पन्‍नापैकी काही अर्पण आणिले. हाबेलानेहि आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यांतून, म्हणजे त्यातल्या पुष्टांतून काही अर्पण आणले. परमेश्‍वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला; पण काइन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही.”

या घटनेआधी यहोवाने अर्पणांविषयी किंवा कोणत्या प्रकारची अर्पणे त्याला स्वीकारयोग्य आहेत यांविषयीची ठराविक माहिती दिल्याचा उल्लेख बायबलमध्ये कोठेही आढळत नाही. त्यामुळे, काइन व हाबेलाने केवळ आपल्या निवडीनुसार अर्पणे केली, हे स्पष्ट आहे. त्यांना आपल्या पालकांचे मूळ घर अर्थात परादीस येथे जाण्याची परवानगी नव्हती; त्यांना पापाचे परिणामही जाणवू लागले होते; आणि ते देवापासून दुरावले गेले होते. त्यांच्या पापी व दयनीय स्थितीमुळे मदतीसाठी देवाकडे वळावे असे तीव्रपणे त्यांना वाटले असावे. देवाची मर्जी संपादण्यासाठी त्यांनी स्वतःहून देवाला भेट चढवण्याचे ठरवले असावे.

परंतु झाले असे, की देवाने हाबेलाचे अर्पण स्वीकारले, काइनाचे नाही. का बरे? हाबेलाने योग्य गोष्टी अर्पिल्या आणि काइनाने तसे केले नाही म्हणून की काय? कोणत्या प्रकारचे अर्पण महत्त्वाचे होते, याची आपल्याला खात्री नाही कारण, दोघांपैकी कोणालाही, काय स्वीकारयोग्य आहे आणि काय अस्वीकारयोग्य आहे हे सांगितलेले नव्हते. परंतु, कदाचित दोन्ही अर्पणे स्वीकारयोग्य असू शकतात. कालांतराने इस्राएल राष्ट्राला यहोवाने दिलेल्या नियमशास्त्रात स्वीकारयोग्य अर्पणांमध्ये, केवळ प्राणी किंवा प्राण्यांचे अवयवयच नव्हे तर भाजलेले धान्य, सातूच्या पेंढ्या, सपीठ, भट्टीत भाजलेले अन्‍न आणि द्राक्षारस यांचा समावेश होता. (लेवीय ६:१९-२३; ७:११-१३; २३:१०-१३) तर मग, यावरून हे स्पष्ट होते, की काइन व हाबेल यांनी देवाला ज्या वस्तूंचे अर्पण वाहिले केवळ तेच, एकाचे अर्पण स्वीकारल्याचे व दुसऱ्‍याचे अर्पण नाकारल्याचे कारण नव्हते.—पडताळा यशया १:११; आमोस ५:२२.

अनेक शतकांनंतर, प्रेषित पौलाने म्हटले: “विश्‍वासाने हाबेलाने काइनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, तेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानांच्या वेळी दिली.” (इब्री लोकांस ११:४) म्हणजेच, हाबेलाच्या विश्‍वासामुळे देवाने त्याला धार्मिक ठरवले. पण कशावर विश्‍वास? यहोवाच्या या अभिवचनावर विश्‍वास, की यहोवा एक संतान पुरवणार आहे, जो ‘सर्पाचे डोके फोडून’ मानवजातीला ती शांती व परिपूर्णता पुन्हा मिळवून देणार होता जी तिने गमावली होती. संतानाची ‘टाच फोडली’ जाईल या विधानावरून हाबेलाने कदाचित असा तर्क केला असावा, की रक्‍त सांडले जाईल अशा एका अर्पणाची गरज होती. (उत्पत्ति ३:१५) याचे कारण काहीही असो, इतके मात्र खरे आहे, की हाबेलाच्या विश्‍वासाच्या प्रदर्शनामुळेच त्याचा यज्ञ “काइनापेक्षा अधिक चांगला” ठरला.

तसेच, काइनाने चुकीच्या प्रकारचे अर्पण केले म्हणून त्याला नाकारण्यात आले नाही तर त्याच्यात विश्‍वासाची कमतरता होती; हे त्याच्या कार्यांवरून दिसून आले. यहोवाने काइनाला अगदी स्पष्टपणे म्हटले होते, की “तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्‍न होणार नाही काय?” (उत्पत्ति ४:७) देवाने काइनाच्या अर्पणावर असंतुष्ट होऊन त्याला नाकारले नाही. तर, “काइनाची कृत्ये दुष्ट होती,” म्हणजे त्याला हाबेलाविषयी मत्सर, द्वेष होता आणि सरतेशेवटी त्याने त्याचा वध केला; आणि म्हणूनच यहोवाने त्याला झिडकारले.—१ योहान ३:१२.