व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वृद्ध व पुऱ्‍या वयाचे संतोषी जीवन

वृद्ध व पुऱ्‍या वयाचे संतोषी जीवन

जीवन कथा

वृद्ध व पुऱ्‍या वयाचे संतोषी जीवन

म्यूरीयल स्मिथ यांच्याद्वारे कथित

माझ्या समोरच्या दारावर कोणीतरी जोरानं थाप मारल्यामुळे दार अक्षरशः हादरलं. सकाळच्या प्रचार कार्याहून मी नुकतीच घरी दुपारच्या जेवणासाठी आले होते. सवयीप्रमाणे मी चहासाठी अधण ठेवलं आणि अर्धा तास निवांत पडणार होते. दारावरची थाप काही थांबायला तयार नव्हती; म्हणून मी लागोलाग दाराजवळ जात विचार केला की या वेळेला कोण आलं असावं बरं. दार उघडल्यावर समजलं कोण आलं होतं. पोलिस अधिकारी म्हणवणारे दोन पुरुष माझ्या दारासमोर उभे होते. ते मला म्हणाले, की बंदी असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या संस्थेनं प्रकाशित केलेली प्रकाशने शोधण्यासाठी त्यांना माझ्या घराची झडती घ्यायची आहे.

ऑस्ट्रेलियातील यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी का होती आणि मी यहोवाची साक्षीदार कशी झाले होते? या सर्व गोष्टींची सुरवात १९१० मध्ये माझ्या आईनं दिलेल्या एका बक्षीसापासून झाली होती; त्या वेळी मी दहा वर्षांची होते.

आमचं कुटुंब क्रोझ नेस्टच्या उत्तर सिडनी उपनगरीत, एका लाकडाच्या घरात राहत होतं. एक दिवशी मी शाळेवरून घरी आले तेव्हा मी आईला आमच्या घराच्या समोरच्या दारावर एका मनुष्याबरोबर बोलत असलेलं पाहिलं. पुस्तकांनी भरलेली बॅग घेऊन आलेला सूटाबुटातला हा मनुष्य कोण असावा हे मला माहीत करून घ्यायचं होतं. लाजतच मी, एक्सक्यूझ मी, म्हणत घरात गेले. पण थोड्या वेळानं आईनं मला बाहेर बोलवलं. ती मला म्हणाली: “यांच्याकडे खूप चांगली चांगली पुस्तकं आहेत, सर्व शास्त्रवचनांबद्दलची आहेत. तुझा वाढदिवस जवळ येतोय; तुला नवीन ड्रेस हवा की ही पुस्तकं? ते ठरंव.”

“ही पुस्तकं, थँक्यू!” असं मी आईला म्हणाले.

अशाप्रकारे, वयाच्या दहाव्या वर्षीच मला चार्ल्स टेझ रस्सल यांनी लिहिलेल्या शास्त्रवचनांचा अभ्यास (इंग्रजी), या खंडाचे पहिले तीन खंड मिळाले. आमच्या घरी आलेल्या त्या मनुष्यानं आईला सांगितलं, की ही पुस्तकं समजण्यासाठी तुमच्या मुलीला तुम्हाला मदत करावी लागेल कारण त्यातील माहिती तिला समजणे अवघड आहे. आई म्हणाली, मी जरूर तिला मदत करेन. पण दुःखाची गोष्ट अशी घडली की माझी आई काही दिवसांतच मरण पावली. बाबांनी, आम्हा भावंडांची म्हणजे माझा धाकटा भाऊ, बहीण आणि मी, आमची खूप चांगली काळजी घेतली; पण माझ्यावर कामाचं जास्त ओझं पडलं; सर्व कामं करता करता मी खूप थकून जायचे. त्यानंतर आणखी एक संकट आमच्या कुटुंबावर कोसळणार होतं.

१९१४ साली पहिल्या महायुद्धाची सुरवात झाली आणि बरोबर एक वर्षांनंतर आमचे प्रेमळ बाबा त्यात ठार मारले गेले. आम्ही भावंडं अनाथ झालो; माझ्या लहान भावाला आणि बहिणीला नातेवाईकांकडे पाठवण्यात आलं; आणि मला एका कॅथलिक बोर्डिंग कॉलेजमध्ये टाकण्यात आलं. कधीकधी मी एकाकीपणामुळे खूप खचून जायचे. पण, मला संगीताची आणि विशेषकरून पियानो वाजवायची आवड असल्यामुळे, या क्षेत्रात मला पुढं जाण्याची संधी दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे. एकामागून एक वर्षे सरत गेली आणि बोर्डिंग कॉलेजमधून मी पदवीधर झाले. १९१९ साली, संगीत-वाद्य विक्रेता, रॉय स्मीथ याच्याबरोबर माझं लग्न झालं. १९२० साली आम्हाला मूल झालं; पुन्हा एकदा मी दररोजच्या कामात व्यस्त झाले. पण त्या पुस्तकांचं काय झालं?

एका शेजारणीकडून आध्यात्मिक सत्य मिळते

इतक्या वर्षांपासून ती “बायबलची पुस्तकं” माझ्याजवळच होती. तसं पाहिलं तर ती पुस्तकं मी वाचली नव्हती पण त्यात एक महत्त्वपूर्ण संदेश होता एवढी मात्र माझी खात्री होती. मग १९२० च्या दशकाच्या शेवटी, एके दिवशी लिल बिमसन नावाची आमच्या शेजारी राहणारी एक बाई आमच्या घरी आली. आम्ही हॉलमध्ये बसून चहा घेत होतो.

आणि अचानक ती म्हणाली: “अरे, तुमच्याकडे ही पुस्तकं आहेत!”

“कोणती पुस्तकं?” मी जरा गोंधळूनच विचारलं.

पुस्तकांच्या मांडणीवर ठेवलेल्या शास्त्रवचनांचा अभ्यास (इंग्रजी) पुस्तकांकडे तिने बोट दाखवलं. लीलनं ती पुस्तकं मागून घरी नेली आणि अगदी उत्साहानं वाचून काढली. पुस्तकं वाचून तिला खूप आनंद झाला होता हे स्पष्ट दिसत होतं. लीलनं यहोवाच्या साक्षीदारांकडून म्हणजे बायबल विद्यार्थ्यांकडून आणखी पुस्तकं मागवली. शिवाय, ती शिकत असलेल्या गोष्टी आम्हाला सांगितल्याशिवाय तिला राहावत नव्हते. तिनं मिळवलेलं एक पुस्तक होतं, देवाची वीणा (इंग्रजी); ते शेवटी माझ्याचकडे आलं. हे बायबल आधारित प्रकाशन वाचण्यासाठी मी वेळ काढला तेव्हापासून खरं तर यहोवाच्या सेवेतील माझ्या करिअरची सुरवात झाली. चर्चला मला देता आली नव्हती त्या सर्व मूलभूत प्रश्‍नांची उत्तरं सरतेशेवटी मला मिळाली.

आनंदाची गोष्ट म्हणजे, रॉयनंही बायबलच्या संदेशाकडे गंभीरपणे लक्ष दिलं आणि आम्ही दोघंही बायबलचे उत्साही विद्यार्थी झालो. रॉय आधी फ्रीमेसन्सचा एक सदस्य होता. आता आमचं संपूर्ण कुटुंब ऐक्याने खरी उपासना करू लागलं; आठवड्यातून दोनदा एक बांधव आमच्या कुटुंबाचा बायबल अभ्यास घ्यायला यायचा. बायबल विद्यार्थी चालवत असलेल्या सभांना आम्ही जेव्हा उपस्थित राहायला लागलो तेव्हाही आम्हाला आणखी उत्तेजन मिळू लागलं. सिडनीत, न्यूटाऊनच्या उपनगरातील एका लहानशा भाड्याच्या सभागृहात होणाऱ्‍या सभांसाठी आम्ही जमायचो. त्या वेळी संपूर्ण देशात ४०० पेक्षा कमी साक्षीदार होते त्यामुळे बहुतेक बंधूभगिनींना सभांना उपस्थित राहण्याकरता बराच प्रवास करावा लागायचा.

आम्हाला मात्र सभांना उपस्थित राहण्याकरता, नेहमी सिडनी बंदर पार करावं लागायचं. १९३२ साली सिडनी बंदरावर पूल बांधण्यात आला; पण त्याआधी प्रत्येक क्रॉसींग आम्हाला होडीनं पार करावं लागायचं. यात आमचा बराच पैसा आणि वेळ खर्च व्हायचा तरीपण, आम्ही यहोवाकडून मिळणारं आध्यात्मिक अन्‍न कधीही न चुकवण्याचा सतत प्रयत्न केला. सत्यात भक्कम होण्यासाठी आम्ही केलेले प्रयत्न उचित होते कारण तेव्हा दुसऱ्‍या महायुद्धाचे वारे वाहण्यास सुरू झाले होते आणि तटस्थतेच्या वादाचा आमच्या कुटुंबावर थेट परिणाम होणार होता.

परीक्षा आणि प्रतिफळांचा समय

१९३० च्या दशकाचा सुरवातीचा काळ माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी आनंदाचा काळ होता. १९३० साली माझा बाप्तिस्मा झाला आणि १९३१ च्या ज्या अधिवेशनात यहोवाचे साक्षीदार हे सुंदर नाव स्वीकारण्यात आलं त्या संस्मरणीय अधिवेशनात मीही उपस्थित होते. रॉय आणि मी, संस्थेनं उत्तेजन दिल्याप्रमाणे प्रचारकार्याच्या सर्व प्रकारच्या पद्धतींत व मोहिमांत भाग घेऊन त्या नावानुसार जगायचा प्रयत्न केला. जसे की, १९३२ साली, आम्ही एका खास मोहिमेत भाग घेतला; सिडनी बंदर पुलाचे उद्‌घाटन पाहायला झुंडीने आलेल्या लोकांना एका पुस्तिकेचे वाटप करण्यासाठी या मोहिमेची योजना केली होती. साउण्ड कारचं आम्हाला खूप अप्रूप वाटायचं; इतकंच नव्हे तर, आम्हीही आमच्या कारला साउण्ड सिस्टम बसवून घेतली. मग काय, बंधू रदरफोर्ड यांच्या रेकॉर्ड केलेल्या बायबल आधारित भाषणांनी आम्ही सिडनीचे रस्ते दणाणून सोडले!

परंतु, काळ पुन्हा बदलू लागला होता आणि खूपच कठीण होत चालला होता. १९३२ सालापर्यंत ऑस्ट्रेलियावर महामंदीचे दाट सावट पसरले होते; त्यामुळे रॉय आणि मी आमचं राहणीमान साधंच ठेवण्याचा निर्णय घेतला. एक मार्ग म्हणजे, आम्ही मंडळीच्या जवळपास राहायला गेलो; यामुळे आमचा प्रवासाचा खर्च बराच वाचला. पण, जेव्हा दुसऱ्‍या महायुद्धाच्या भयाने संपूर्ण विश्‍वाला आपल्या विळख्यात खेचले तेव्हा आर्थिक दबाव याच्यापुढे अगदी फिका पडला.

जगाचा भाग न होण्यासंबंधी येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करून संपूर्ण जगभरातील यहोवाचे साक्षीदार छळाचे लक्ष्य बनले; ऑस्ट्रेलियात काही वेगळी परिस्थिती नव्हती. युद्धकाळामुळे चिथावलेल्या काही लोकांनी आम्हाला कम्युनिस्ट नाव दिलं. त्यांनी आमच्यावर असा खोटा आरोप लावला की यहोवाचे साक्षीदार ऑस्ट्रेलियातील आपल्या मालकीच्या चार रेडिओ केंद्रांचा उपयोग जपानी सैन्यांना संदेश पाठवण्यासाठी करत आहेत.

सैन्यासाठी बोलवण्यात आलेल्या तरुण बांधवांवर हातमिळवणी करण्यासाठी पुष्कळ दबाव आणण्यात आला. पण मला हे सांगायला आनंद वाटतो, की आमची तिन्ही मुले विश्‍वासात खंबीर राहिलीत आणि ते तटस्थ राहिले. आमच्या थोरल्या मुलाला, रिचर्डला १८ महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली. आमचा दुसरा मुलगा केवीन यानं, धार्मिक कारणामुळे मी सैन्यात भाग घेऊ शकत नाही अशी, आपल्या नावाची नोंद केली. पण, आमचा धाकटा मुलगा, स्टुअर्ट तटस्थतेच्या संबंधाने न्यायालयात आपली बाजू मांडण्यासाठी जात असताना एका मोटारसायकलच्या अपघातात मरण पावला. हा घाला खरोखरच अतिशय वेदनादायक होता. तरीपण, राज्यावर आणि पुनरुत्थानाच्या यहोवानं दिलेल्या आशेवर आमचं लक्ष केंद्रित ठेवल्यामुळे आम्ही स्वतःला सावरू शकलो.

त्यांनी अस्सल चीज गमावली

१९४१ सालच्या जानेवारी महिन्यात, ऑस्ट्रेलियातील यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी घालण्यात आली. पण येशूच्या प्रेषितांनी केले त्याप्रमाणे मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा मानून रॉय व मी अडीच वर्ष भूमिगत कार्य करू लागलो. याच वेळेला, मी लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे, साध्या वेशात आलेले पोलिस माझ्या दारावर जोरजोरानं थाप मारत होते. मग पुढे काय झालं?

मी त्यांना आत बोलवलं. आत आल्यावर मी त्यांना विचारलं: “तुमची काही हरकत नसेल तर, घराची झडती घ्यायला तुम्ही सुरवात करण्याआधी मी माझा चहा संपवू का?” आश्‍चर्य म्हणजे, ते मला हो म्हणाले; मग मी स्वयंपाक घरात गेले, यहोवाला प्रार्थना केली आणि मनातल्या मनात पुढे काय करायचं त्याचा विचार करू लागले. चहा पिऊन मी आले तेव्हा मी पाहिलं, की एक पोलिस आम्ही अभ्यास करतो त्या भागात गेला होता आणि वॉचटावरचं चित्र असलेलं त्याला जे जे दिसत होतं ते सर्व तो गोळा करू लागला होता; माझ्या साक्षकार्याच्या बॅगेतली प्रकाशनं आणि माझं बायबलही त्यानं घेतलं होतं.

मग तो मला म्हणाला: “याव्यतिरिक्‍त, खोक्यांमध्ये तुम्ही इतर प्रकाशने लपवून ठेवलेली नाहीत ना? आम्हाला समजलं आहे, की तुम्ही दर आठवडी या रस्त्याच्या शेवटी असलेल्या सभागृहात सभेला जाता आणि तिथून पुष्कळ प्रकाशनं घेता.”

मी म्हणाले: “हो, पण ते आता तिथं नाही.”

तो म्हणाला: “आम्हाला ते माहीत आहे, मिसेस स्मिथ. आम्हाला हेही माहीत आहे, की सर्व प्रकाशनं संपूर्ण प्रांतातील तुमच्या लोकांच्या घरांत दडवून ठेवली आहेत.”

त्यांना आमच्या मुलाच्या बेडरूममध्ये स्वातंत्र्य की रोमन धर्म? (इंग्रजी), या पुस्तिकेची पाच खोकी मिळाली.

“तुमच्या गॅरेजमध्ये नक्की काही नाही ना?” त्यानं विचारलं.

मी म्हणाले: “नाही, तिथं काही नाही.”

मग त्यानं डायनिंग रूममधलं एक कपाट उघडलं. त्यात त्याला मंडळीचे अहवाल भरायचे कोरे फॉर्म मिळाले. त्यानं ते सर्व घेतले आणि मग गॅरेजची झडती घ्यायची आहे असं सारखं बोलू लागला.

मी म्हणाले: “बरं, चला इथून.”

ते माझ्या पाठोपाठ गॅरेजमध्ये आले आणि गॅरेजची झडती घेतल्यावर निघून गेले.

त्या पोलिसांना वाटलं होतं, की वा! आपल्याला पाच खोकी मिळाली! पण अस्सल चीज तर ते मागेच सोडून गेले होते. त्या दिवसांत, मी मंडळीची सचिव म्हणून काम पाहत होते आणि माझ्याजवळ घरात मंडळीतल्या प्रचारकांची यादी आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती होती. पण बांधवांनी आम्हाला अशा शोधांच्या तयारीत राहण्याबद्दल आधीच जागरूक केलं होतं त्यामुळे मी ते सर्व अगदी काळजीपूर्वक लपवून ठेवलं होतं. वेगवेगळ्या पाकीटात ही कागदपत्रं घालून मी ती पाकीटं चहाच्या, साखरेच्या आणि पिठाच्या डब्यांमध्ये अगदी खाली ठेवली होती. आणि काही पाकीटं तर मी गॅरेजजवळ असलेल्या एका पिंजऱ्‍यात ठेवली होती. पोलिस मात्र त्यांना हव्या असलेल्या माहितीच्या अगदी जवळून गेले होते, पण त्यांच्या ती हाती लागली नाही!

पूर्ण वेळेची सेवा सुरू करणे

१९४७ सालापर्यंत तर, आमच्या मुलांची लग्न होऊन त्यांना मुलं झाली. तेव्हा, रॉय आणि मी असं ठरवलं, की पूर्ण वेळेची सेवा आपण करू शकतो. दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या क्षेत्रात गरज होती; मग आम्ही आमचं घर विकलं आणि एक कॅरव्हॅन किंवा ट्रेलर विकत घेतले; त्याचं नाव आम्ही मिस्पा, म्हणजे “टेहळणी बुरूज” असं ठेवलं. या राहणीमानामुळे आम्ही दूरदूरच्या क्षेत्रात प्रचाराला जाऊ शकलो. पुष्कळदा आम्ही, न नेमलेल्या ग्रामीण क्षेत्रात कार्य केलं. त्या वेळच्या पुष्कळ गोड आठवणींचं गाठोडं मी जवळ बाळगून आहे. माझ्या बायबल अभ्यासांपैकी एक, बेव्हर्ली नावाची एक तरुण स्त्री होती. बाप्तिस्मा घेण्याआधीच ती दुसरीकडे राहायला गेली. पण, पुष्कळ वर्षांनंतर एका अधिवेशनात एक भगिनी माझ्याजवळ आली आणि तिनं स्वतःची ओळख बेव्हर्ली अशी दिली तेव्हा मला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! इतक्या वर्षांनंतर मी तिला पाहिलं होतं; ती तिचा पती आणि मुलं यांच्यासोबत यहोवाची सेवा करत आहे हे पाहून तर मला किती आनंद झाला!

१९७९ साली मला पायनियर सेवा प्रशालेत उपस्थित राहण्याचा सुयोग मिळाला. या प्रशालेत एका गोष्टीवर खूप जोर देण्यात आला होता; पायनियर सेवेत टिकून राहायचे असेल तर व्यक्‍तिगत अभ्यासाची चांगली सवय असणे जरूरीचे आहे. मला या गोष्टीची सत्यता पटली होती. अभ्यास, सभा आणि सेवा हेच माझे जीवन होते. ५० पेक्षा अधिक वर्षे मला सामान्य पायनियर म्हणून सेवा करायला मिळाली हा मी माझा बहुमानच समजते.

आरोग्याच्या समस्यांशी झुंजणे

पण, गेल्या अनेक दशकांपासून माझ्यासमोर पुष्कळ समस्या आल्या आहेत. १९६२ साली मला काचबिंदू आहे असं सांगण्यात आलं. पूर्वी, उपलब्ध असलेले उपचार मर्यादितच होते आणि माझी दृष्टी अगदी तेजीनं कमी होत गेली. रॉयचीही तब्येत ढासळली आणि १९८३ साली त्यांना पक्षाघाताचा जोराचा झटका आल्यामुळे त्यांचे अर्धे अंग लुळे पडले आणि त्यानंतर त्यांना बोलताही येईना. शेवटी १९८६ साली त्यांनी या जगाचा निरोप घेतला. माझ्या पूर्णवेळेच्या सेवेत त्यांनी मला खूप व्यावहारिक पाठिंबा दिला होता; मला त्यांची खूप आठवण येते.

माझ्यासमोर इतकी अडखळणं आली तरी मी चांगला आध्यात्मिक नित्यक्रम ठेवण्याचा प्रयत्न केला. मी एक दणकट कार घेतली जी आमच्या अर्धग्रामीण भागात क्षेत्र सेवेत जायला उचित होती आणि माझी मुलगी जॉईस हिच्या मदतीनं माझी पायनियर सेवा चालू ठेवली. हळूहळू माझी दृष्टी कमी झाली आणि मग एक डोळा तर शेवटी निकामीच झाला. डॉक्टरांनी त्या डोळ्याऐवजी काचेचा डोळा बसवला. तरीपण, भिंगाच्या साहाय्यानं आणि मोठ्या टाईपच्या अक्षराच्या प्रकाशनांच्या साहाय्यानं मी दिवसाला तीन ते पाच तास माझ्या अंधुक दृष्टीनं अभ्यास करू शकत होते.

अभ्यासाची वेळ मला नेहमी महत्त्वाची वाटते. त्यामुळे, एकदा दुपारची मी अभ्यास करत बसले होते आणि अचानक मला काहीच दिसेनासे झाले, तेव्हा मला धक्काच बसला! मला असं वाटलं, जणू कोणीतरी लाईट बंद केली. माझी दृष्टी पूर्णपणेच गेली होती. मग आता मी अभ्यास कसा करणार? आता तर मला ऐकायलाही कमी येऊ लागलं आहे, तरीपण मी ऑडिओ कॅसेट ऐकत असल्यामुळे आणि माझ्या कुटुंबाच्या प्रेमळ सहकार्यामुळे मला आध्यात्मिक अर्थानं दृढ राहायला मदत मिळाली आहे.

शेवटपर्यंत टिकून राहणे

मी शंभरी ओलांडली आहे; मला इतरही काही आरोग्याच्या समस्या आहेत आणि पहिल्यापेक्षा आता मी बरीच थकले आहे. कधीकधी मला गोंधळून गेल्यासारखं वाटतं. खरं तर आता मला काहीच दिसत नसल्यामुळे कधीकधी मी खरोखरच हरवून जाते. मला बायबल अभ्यास घ्यायला अजूनही आवडतो, पण माझ्या तब्येतीमुळे मी बाहेर जाऊन अभ्यास शोधू शकत नाही. सुरवातीला मी निराश व्हायचे. मला आता पूर्वीसारखं करता येत नाही आणि जे करता येतं त्यातच संतुष्ट राहायचं, असं मला स्वतःला शिकवावं लागलं. हे इतकं सोपं नव्हतं. तरीपण, आपला महान देव यहोवा याच्याविषयी बोलून दर महिन्याला मी सेवा अहवाल घालू शकते. नर्सेस, विक्रेते किंवा दुसरं कोणी घरी येतं तेव्हा मला संधी मिळते; मी, आलेल्या संधीवर जणू काय लगेच ताव मारते आणि घरी आलेल्या लोकांबरोबर बायबलविषयी विचारपूर्वक बोलते.

माझ्या सर्व समाधानकारक आशीर्वादांपैकी एक आशीर्वाद म्हणजे, माझ्या कुटुंबाच्या चार पिढ्यांना मी यहोवाची विश्‍वासूपणे उपासना करताना पाहिलं आहे. यांतील काही पुढे गेले आणि आज ते गरज असलेल्या ठिकाणी पायनियर सेवक, वडील, सेवा सेवक म्हणून सेवा करतात तर काही बेथेलमध्येही सेवा करत आहेत. अर्थात माझ्या पिढीच्या अनेकांप्रमाणे मला असे वाटायचे, की या युगाच्या समाप्तीचा अंत लवकरच येणार आहे. पण सात दशकांच्या सेवेदरम्यान मी किती मोठी वाढ पाहिली आहे! इतक्या महान कार्यात माझाही हातभार लागला म्हणून मी आता खूप समाधानी आहे.

मला भेट द्यायला येणाऱ्‍या नर्सेसचं म्हणणं आहे, की माझ्या विश्‍वासामुळेच मी आतापर्यंत जिवंत राहिले आहे. मलाही त्यांचं बोलणं पटतं. यहोवाच्या सेवेत सक्रिय राहिल्यामुळेच आपल्या जीवनाचे सार्थक होते. राजा दावीदाप्रमाणे मीही म्हणू शकते, की आयुष्याने संपन्‍न होऊन मी वृद्ध झाले आहे.—१ इतिहास २९:२८.

(हा लेख पूर्णपणे तयार होत होता तेव्हा म्हणजे एप्रिल १, २००२ रोजी भगिनी म्यूरियल स्मिथचा मृत्यू झाला. त्यांना १०२ वर्षे पूर्ण व्हायला केवळ एक महिना उरला होता; त्या विश्‍वास आणि सहनशीलतेचे अत्यंत उत्तम उदाहरण होत्या.)

[२४ पानांवरील चित्रे]

मी पाच वर्षांची होते तेव्हा आणि १९ वर्षांची असताना रॉयला भेटले तेव्हा

[२६ पानांवरील चित्र]

आमची कार आणि कॅरव्हॅन जिला आम्ही मिस्पा नाव ठेवलं

[२७ पानांवरील चित्र]

रॉय बरोबर १९७१ साली