तुम्ही कोणाला एकनिष्ठ असावे?
तुम्ही कोणाला एकनिष्ठ असावे?
“आपला देश: . . . नेहमी बरोबर असो; तो चुकत असला किंवा नसला तरी आपला देश असो.”—स्टीव्हन डेकाटुर, अमेरिकेचे नौदल अधिकारी, १७७९-१८२०.
आपल्या देशाला पूर्णपणे एकनिष्ठ असणे ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे असे पुष्कळांना वाटते. इतरजण स्टीव्हन डेकाटुर यांच्या शब्दांमध्ये फेरबदल करून असे म्हणतील, ‘माझा धर्म नेहमी बरोबर असो; तो चूक असला किंवा नसला तरी माझा धर्म असो.’
वास्तविक पाहता, आपल्याकडून एकनिष्ठ असण्याची मागणी करणारा देश किंवा धर्म सहसा आपल्या जन्मस्थळावर ठरवला जातो, पण एकनिष्ठपणा दाखवण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे; तो अशाप्रकारे योगायोगाच्या हवाली सोडून देता येणार नाही. परंतु, लहानपणापासून मानत आलेल्या गोष्टींना एकनिष्ठपणा दाखवण्याविषयी शंका व्यक्त करण्यास धैर्य लागते आणि अनेक अडचणीही निर्माण होतात.
एकनिष्ठपणाची परीक्षा
झांबियात बालपण घालवलेल्या एका स्त्रीने म्हटले: “मला लहानपणापासूनच धर्माची ओढ होती. देवघरात दररोज पूजा करणे, सणवार पाळणे, मंदिरात नियमितपणे जाणे हे सगळे
मी लहानपणापासूनच करत होते. माझा धर्म आणि उपासना यांचा आमच्या संस्कृतीशी, समाजाशी आणि कुटुंबाशी फार जवळचा संबंध होता.”परंतु ती किशोरावस्थेच्या शेवटल्या वर्षांत असताना यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागली आणि नंतर तिने आपला धर्म बदलण्याचा निर्णय घेतला. याला विश्वासघात म्हणता येईल का?
झ्लॉटको, बॉस्नियात लहानाचा मोठा झाला आणि काही काळापर्यंत त्याने त्याच्या मायदेशातील युद्धात भाग घेतला होता. तो देखील यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागला. आता तो कोणत्याही युद्धात भाग घ्यायला तयार नाही. हा विश्वासघात झाला का?
या प्रश्नांचे उत्तर तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असेल. आधी उल्लेखिलेली स्त्री म्हणते: “माझ्या समाजात धर्म बदलणे म्हणजे एक गुन्हा होता; हा विश्वासघात आहे, कुटुंब आणि समाजासोबत अविश्वासूपणा आहे असे समजले जाई.” त्याचप्रमाणे, झ्लॉटकोचे पूर्वीचे सहकारी, त्यांच्या बाजूने युद्धात भाग घ्यायला नकार देणाऱ्यांना गद्दार समजत होते. ती स्त्री आणि झ्लॉटको या दोघांनाही वाटते की, त्यांच्या कार्यांना प्रेरित करणारी एक श्रेष्ठ प्रकारची एकनिष्ठा आहे—देवाप्रती असलेली एकनिष्ठा. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे, देवाला एकनिष्ठा दाखवणाऱ्या लोकांविषयी खुद्द त्याला काय वाटते?
खरी एकनिष्ठा—प्रेमाची अभिव्यक्ती
राजा दावीदाने यहोवा देवाला म्हटले: “दयाळू [“निष्ठावान”, NW] जनांशी तू दयेने [“निष्ठेने”, NW] वागतोस.” (२ शमुवेल २२:२६, NW) येथे “दयेने” असे भाषांतरित केलेल्या इब्री शब्दातून दयाळुपणाचा अर्थ व्यक्त होतो जो स्वतःला एखाद्या गोष्टीशी तोपर्यंत प्रेमळपणे जोडतो जोपर्यंत त्या गोष्टीचा उद्देश पूर्ण होत नाही. दूध पाजणाऱ्या आईप्रमाणे यहोवा प्रेमळपणे स्वतःला अशांशी जोडतो जे त्याला निष्ठावान आहेत. प्राचीन इस्राएलमधील आपल्या निष्ठावान सेवकांविषयी यहोवा म्हणाला: “स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुम्हाला विसरणार नाही.” (यशया ४९:१५) देवाप्रती असलेल्या एकनिष्ठेला अधिक महत्त्व देणारे त्याच्या प्रेमळ काळजीबद्दल आश्वस्त राहू शकतात.
यहोवाप्रती असलेली एकनिष्ठा प्रेमावर आधारलेली आहे. ती एखाद्या व्यक्तीला, यहोवाला आवड असलेल्या गोष्टींची आवड धरण्यास आणि यहोवाला वीट असलेल्या दुष्ट गोष्टींचा वीट बाळगण्यास प्रवृत्त करते. (स्तोत्र ९७:१०) प्रीती हा यहोवाचा सर्वात मुख्य गुण असल्यामुळे, देवाला एकनिष्ठ असलेली व्यक्ती इतरांसोबत वाईट वागणार नाही. (१ योहान ४:८) त्यामुळे देवाप्रती एकनिष्ठ असल्यामुळे एखाद्या व्यक्तीने आपले धार्मिक विश्वास बदलले तर तिला आपल्या कुटुंबाबद्दल प्रेम नाही असा त्याचा अर्थ होत नाही.
देवाप्रती एकनिष्ठपणा—हितकारक प्रेरणा
आधी जिचा उल्लेख केला आहे ती स्त्री आपल्या निर्णयाचे स्पष्टीकरण अशाप्रकारे देते: “बायबलचा अभ्यास केल्यावर यहोवा हा खरा देव असल्याचे मला कळाले आणि त्याच्यासोबत माझे व्यक्तिगत नाते जुळले. मी पूर्वी पूजा करत होते त्यापैकी कोणत्याही देवतांसारखा यहोवा नाही; त्याच्या व्यक्तिमत्त्वात प्रीती, न्याय, बुद्धी आणि शक्ती या सर्व गुणांचा अगदी योग्य समतोल आहे. आणि यहोवाला अनन्य भक्ती देण्याची गरज असल्यामुळे मला इतर देवांना सोडणे भाग होते.
“माझे आईवडील मला वारंवार सांगायचे की, त्यांना हे बिलकुल पटलेले नाही; त्यांचे म्हणणे होते, की मी त्यांना निराश करत आहे. मला खूप वाईट वाटलं कारण माझ्या आईवडिलांचे मन राखणे मला फार महत्त्वाचे वाटत होते. पण बायबलच्या सत्याविषयी मी अधिक जाणून घेऊ लागले तसे, माझ्या मनात कसलीच अनिश्चितता राहिली नाही. मी यहोवाकडे पाठ फिरवू शकत नव्हते.
“धार्मिक परंपरांऐवजी यहोवाला एकनिष्ठ असल्यामुळे मी माझ्या कुटुंबाशी अविश्वासू आहे असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांच्या भावना मला समजतात हे मी माझ्या बोलण्याद्वारे व कार्यांद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करते. पण यहोवाला मी एकनिष्ठ राहिले नाही तर माझ्या कुटुंबाला त्याला जाणून घ्यायला मी अटकाव आणेन आणि तो खरा अविश्वासूपणा होईल.”
त्याचप्रमाणे, देवाला एकनिष्ठ राहण्यासाठी एक व्यक्ती राजकीयदृष्ट्या तटस्थ राहते आणि इतरांविरुद्ध ती शस्त्र उचलत नाही तेव्हा ती देशद्रोही ठरत नाही. झ्लॉटको देखील असेच म्हणतो: “मी एक नाममात्र ख्रिश्चन होतो पण माझं लग्न ख्रिस्ती नसलेल्या एका मुलीशी झालं. युद्ध सुरू झालं तेव्हा दोन्ही बाजूने एकनिष्ठ राहायची माझ्याकडून अपेक्षा केली जाऊ लागली. कोणत्याही एक बाजूची निवड करायला मला भाग पाडण्यात आले. मी साडेतीन वर्षांसाठी युद्धात लढलो. शेवटी माझ्या पत्नीसोबत मी क्रोएशियाला पलायन केलं आणि तिथं यहोवाच्या साक्षीदारांशी आमची भेट झाली.
“बायबलच्या अभ्यासातून आम्हाला हे कळालं की, सर्वात प्रथम यहोवाला एकनिष्ठा दाखवली पाहिजे तसेच आमचा शेजारी कोणत्याही धर्माचा किंवा जातीचा असला तरी त्याच्यावर आम्ही प्रेम करावे अशी यहोवा अपेक्षा करतो. आता माझी पत्नी व मी एकत्र मिळून यहोवाची उपासना करतो आणि मला हे कळून चुकले आहे की, देवाला एकनिष्ठ राहून मी माझ्या शेजाऱ्याशी लढू शकत नाही.”
अचूक ज्ञानावर आधारलेला एकनिष्ठपणा
यहोवा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे, इतर कशालाही दाखवल्या जाणाऱ्या एकनिष्ठपणापेक्षा देवाप्रती असलेली एकनिष्ठा सर्वात महत्त्वाची ठरते. (प्रकटीकरण ४:११) परंतु देवाप्रती असलेली एकनिष्ठा, धर्मवेडेपणा किंवा नाशकारक प्रवृत्ती बनू नये म्हणून ती अचूक ज्ञानावर आधारलेली असली पाहिजे. बायबल आपल्याला उत्तेजन देते: ‘तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे, आणि सत्यापासून निर्माण होणाऱ्या पवित्रतेने युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.’ (इफिसकर ४:२३, २४) हे प्रेरित शब्द ज्याने लिहिले त्या सुप्रसिद्ध मनुष्याने लहानपणापासून बाळगलेल्या एकनिष्ठपणाची शहानिशा करण्याचे धाडस केले. परीक्षण केल्यामुळे त्याने केलेल्या परिवर्तनाचा त्याला फायदा झाला.
होय, आपल्या काळातील अनेकांप्रमाणे एकनिष्ठपणा दाखवण्यासंबंधी शौलाचीही परीक्षा झाली होती. शौल परंपरांचे काटेकोर पालन केल्या जाणाऱ्या घरात लहानाचा मोठा झाला होता आणि आपल्या बालपणाच्या धर्माशी तो अत्यंत एकनिष्ठ बनला. त्याच्या एकनिष्ठपणामुळे त्याच्याशी सहमत नसलेल्या लोकांविरुद्ध हिंसा करण्यासही तो प्रवृत्त झाला. ख्रिश्चनांच्या घरांमध्ये घुसून शौल त्यांना शिक्षेसाठी, एवढेच नव्हे तर मृत्यूदंड देण्यासाठी फरफरटून बाहेर नेत असे.—प्रेषितांची कृत्ये २२:३-५; फिलिप्पैकर ३:४-६.
तरीपण, शौलाने बायबलचे अचूक ज्ञान घेतल्यावर असे कार्य केले जे त्याच्या सहकाऱ्यांच्या नजरेत अशक्य होते. त्याने आपला धर्म बदलला. प्रेषित पौल या नावाने नंतर ओळखल्या जाणाऱ्या शौलाने परंपरांना एकनिष्ठपणा दाखवण्याऐवजी देवाला एकनिष्ठपणा दाखवण्याची निवड केली. अचूक ज्ञानाच्या आधारे देवाप्रती एकनिष्ठ असल्यामुळे शौल आपल्या पूर्वीच्या विनाशकारी, धर्मवेड्या वर्तनाच्या विरोधात सहनशील, प्रेमळ आणि उभारणीकारक होण्यास प्रवृत्त झाला.
एकनिष्ठ का असावे?
देवाच्या दर्जांनुसार एकनिष्ठपणा दाखवल्यास फायदे स्पष्ट दिसतात. उदाहरणार्थ, कौटुंबिक अभ्यासांच्या ऑस्ट्रेलियन संस्थेच्या १९९९ च्या वृत्तानुसार दीर्घकालीन,
समाधानकारक विवाहांसाठी “भरवसा आणि विश्वासूपणा . . . [आणि] आध्यात्मिकतेची भावना” या मूलभूत गोष्टींपैकी आहेत. त्याच अभ्यासात असे निष्पन्न झाले की, “स्थिरस्थावर, समाधानकारक विवाहांमुळे” स्त्री-पुरुष आनंदी, स्वस्थ बनतात, त्यांचे आयुष्यमान वाढते आणि त्यांच्या मुलांनाही आनंदी जीवन जगण्याची जास्त शक्यता असते.आजच्या अनिश्चित जगात, एकनिष्ठपणा हा जीवनदोरासमान आहे जो जीव वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या व्यक्तीला बचाव बोटीशी जोडतो. पण “पोहणाऱ्याने” एकनिष्ठपणा दाखवला नाही तर तो लाटांनी व वाऱ्याने हेलकावे खाईल. पण त्याने चुकीचा एकनिष्ठपणा दाखवला तर बुडणाऱ्या जहाजाला जोडलेल्या जीवनदोराला धरल्यासारखी त्याची गत असेल. शौलाप्रमाणे, तो स्वतः नाशकारक परिस्थितीत ओढला जाऊ शकतो. परंतु, अचूक ज्ञानावर आधारलेली यहोवाप्रती एकनिष्ठा आपल्याला स्थैर्य देणारा आणि तारणाच्या मार्गावर नेणारा जीवनदोर आहे.—इफिसकर ४:१३-१५.
आपल्याला एकनिष्ठ असलेल्यांना यहोवा हे वचन देतो: “परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांस [“एकनिष्ठ जनांस,” NW] सोडीत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते.” (स्तोत्र ३७:२८) लवकरच यहोवाला एकनिष्ठ असलेल्या सर्वांना परादीस पृथ्वीमध्ये प्रवेश दिला जाईल जेथे त्यांना दुःख, कष्ट यांपासून मुक्ती मिळेल आणि धार्मिक तसेच राजकीय कारणांमुळे फूट न पडता चिरकाल नातेसंबंधांचा आनंद लुटता येईल.—प्रकटीकरण ७:९, १४; २१:३, ४.
आज देखील, जगभरातील लाखो व्यक्तींना हे कळाले आहे की, केवळ यहोवाला एकनिष्ठ असल्यामुळे खरा आनंद मिळू शकतो. बायबल सत्याच्या प्रकाशात एकनिष्ठपणाबद्दल तुमचा दृष्टिकोन काय आहे ते पाहायला यहोवाचे साक्षीदार तुम्हाला मदत करू शकतील. बायबल म्हणते: “तुम्ही विश्वासात आहा किंवा नाही ह्याविषयी आपली परीक्षा करा; आपली प्रतीति पाहा.”—२ करिंथकर १३:५.
आपल्या विश्वासाची शहानिशा करण्यासाठी आणि त्याप्रती आपण एकनिष्ठ का आहोत याचे परीक्षण करण्यासाठी धैर्य लागते, पण असे केल्याने यहोवा देवाच्या आपण समीप आल्यामुळे आपल्या प्रयत्नांचे चीज होईल. आधी उल्लेखिलेल्या स्त्रीच्या उद्गारातून अनेकांचे मनोगत व्यक्त होते: “यहोवाला आणि त्याच्या दर्जाला एकनिष्ठ राहिल्याने आपल्या कुटुंबाशी संतुलित व्यवहार राखायला आणि समाजाचे उत्कृष्ट सदस्य व्हायला मदत होते. आपल्यावर येणाऱ्या परीक्षा कितीही कठीण असल्या तरी आपण यहोवाला एकनिष्ठ असलो तर तो आपल्याला एकनिष्ठ राहील.”
[६ पानांवरील चित्रे]
अचूक ज्ञानामुळे शौल एकनिष्ठपणा दाखवण्याबाबत फेरबदल करू शकला
[७ पानांवरील चित्र]
बायबल सत्याच्या प्रकाशात आपण दाखवत असलेली एकनिष्ठा योग्य गोष्टीप्रती आहे किंवा नाही याचे परीक्षण करूया.
[४ पानांवरील चित्राचे श्रेय]
चर्चिल, वरती डावीकडे: U.S. National Archives photo; जोझफ गॉबल्स, एकदम उजवीकडे: Library of Congress