वाचकांचे प्रश्न
वाचकांचे प्रश्न
एक पालक यहोवाचा साक्षीदार असतो आणि दुसरा नसतो तेव्हा मुलांना प्रशिक्षण देण्याबाबतीत शास्त्रवचने काय मार्गदर्शन देतात?
साक्षीदार पालकाचा सोबती साक्षीदार नसतो अशावेळी मुलांना प्रशिक्षण देण्याबाबतीत दोन प्रमुख शास्त्रवचनीय तत्त्वे मार्गदर्शन देतात. एक तत्त्व म्हणजे: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रेषितांची कृत्ये ५:२९) आणि दुसरे तत्त्व म्हणजे: “जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे.” (इफिसकर ५:२३) हे दुसरे तत्त्व ज्यांचे पती साक्षीदार आहेत अशा पत्नींनाच नव्हे तर ज्यांचे पती साक्षीदार नाहीत अशांनाही लागू होते. (१ पेत्र ३:१) मग साक्षीदार पालक, या दोन तत्त्वांत संतुलन बाळगून आपल्या मुलाला प्रशिक्षण कसे देऊ शकेल?
पती यहोवाचा साक्षीदार असला तर आपल्या कुटुंबासाठी आध्यात्मिक आणि शारीरिक अशा दोन्ही तरतुदी पुरवण्याची त्याची जबाबदारी आहे. (१ तीमथ्य ५:८) सत्यात नसलेली आई खरे तर मुलांबरोबर अधिक वेळ घालवत असते तरीसुद्धा साक्षीदार असलेल्या पित्याने आपल्या मुलांना घरी असताना आध्यात्मिक शिक्षण दिले पाहिजे आणि त्यांना ख्रिस्ती सभांना नेले पाहिजे जेणेकरून त्यांना सभांतील नैतिक प्रशिक्षणाचा व हितकारक संगतीचा लाभ होईल.
परंतु, सत्यात नसलेली पत्नी जर मुलांना तिच्या उपासनेच्या ठिकाणी घेऊन जाण्याची किंवा त्यांना तिचे विश्वास शिकवण्याचा अट्टहास करत असेल तर? ती ज्या देशात राहते त्या देशात कदाचित तिला तो हक्क असेल. अशा ठिकाणी मुलांना त्या उपासनेत भाग घेण्याचा मोह होतो की नाही हे पिता त्यांना कशाप्रकारचे आध्यात्मिक प्रशिक्षण देतो यावर अवलंबून आहे. मुले जसजशी मोठी होऊ लागतात तसतसे आपल्या वडिलांकडून मिळालेल्या शास्त्रवचनांच्या शिक्षणामुळे त्यांना देवाच्या वचनातील सत्याचे अनुकरण करण्यास मदत मिळाली पाहिजे. आपल्या मुलांनी सत्याची बाजू घेण्याचा निर्णय घेतल्यास सत्यात असलेल्या पतीला किती आनंद होईल!
आई यहोवाची साक्षीदार असेल तर तिने आपल्या मुलांच्या चिरकालिक हिताचाही विचार करत असताना मस्तकपदाचा देखील आदर केला पाहिजे. (१ करिंथकर ११:३) पुष्कळ वेळा, साक्षीदार असलेल्या पत्नीने आपल्या मुलांना नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षण दिले तर सत्यात नसलेला तिचा पती याला हरकत घेणार नाही; अशाप्रकारची मदत यहोवाच्या लोकांच्या सभांमध्ये देखील उपलब्ध आहे. साक्षीदार असलेली पत्नी, आपल्या मुलांना यहोवाच्या संघटनेकडून मिळणाऱ्या उभारणीकारक शिक्षणाचा फायदा कसा होत आहे हे पाहण्यास सत्यात नसलेल्या आपल्या पतीला समजावून सांगू शकते. व्यवहारज्ञान वापरून ती, नैतिकरीत्या रसातळाला चाललेल्या जगात राहत असताना बायबलमधील नैतिक तत्त्वे आपल्या मुलांच्या मनांवर बिंबवण्याच्या महत्त्वावर जोर देऊ शकते.
परंतु, सत्यात नसलेला पती कदाचित असा अट्टाहास धरेल की त्याच्या मुलांनी त्याच्या धर्माचे आचरण करावे म्हणून तो त्यांना त्याच्या उपासनेच्या ठिकाणी नेईल व त्याच्या विश्वासानुसार त्यांना धार्मिक शिक्षण देईल. किंवा एखाद्या पतीला कोणताच धर्म आवडत नाही व आपल्या मुलांनाही कोणत्याच धर्माचे शिक्षण मिळू नये असा ठाम विचार तो करेल. कुटुंबाचे मस्तक या नात्याने, त्याने घेतलेल्या निर्णयासाठी तोच स्वतः प्रामुख्याने जबाबदार असतो. *
आपल्या पतीच्या मस्तकपदाचा आदर करत असताना, समर्पित ख्रिस्ती या नात्याने, सत्यात असलेल्या पत्नीने प्रेषित पेत्र आणि योहान यांनी धारण केलेली मनोवृत्ती लक्षात प्रेषितांची कृत्ये ४:१९, २०) आपल्या मुलांच्या आध्यात्मिक कल्याणाचा विचार करून साक्षीदार असलेली आई आपल्या मुलांना नैतिक मार्गदर्शन देण्यासाठी संधी शोधेल. सत्य गोष्टी इतरांना शिकवण्याची जबाबदारी तिला यहोवाकडून मिळाल्यामुळे तिच्या मुलांनाही तिने प्रशिक्षण दिले पाहिजे. (नीतिसूत्रे १:८; मत्तय २८:१९, २०) साक्षीदार असलेली आई येणाऱ्या पेचप्रसंगाना कसे तोंड देऊ शकते?
ठेवावी; त्यांनी म्हटले होते: “जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही.” (देवावर विश्वास ठेवण्याच्या मुद्द्याचा विचार करा. पतीच्या बंधनांमुळे साक्षीदार पत्नी आपल्या मुलांबरोबर बायबलचा अभ्यास घेऊ शकत नसेल. पण मग तिने आपल्या मुलांना यहोवाविषयी काहीच सांगायचे टाळावे का? नाही. तिला सृष्टीकर्त्यावर विश्वास आहे हे तिच्या बोलण्याद्वारे व कार्यांद्वारे स्पष्टपणे दिसेल. याबद्दल तिच्या मुलांच्या मनात नक्कीच प्रश्न उद्भवतील. धर्माच्या स्वातंत्र्याचा उपयोग करून तिने मुक्तपणे सृष्टीकर्त्यावरील आपला विश्वास इतरांना आणि आपल्या मुलांना सांगावा. तिला आपल्या मुलांबरोबर बायबलचा अभ्यास घेता येत नसला किंवा नियमितरीत्या त्यांना सभांना नेता येत नसले तरी, ती त्यांना यहोवा देवाविषयीचे ज्ञान देऊ शकते.—अनुवाद ६:७.
साक्षीदार असलेल्या सोबत्याचे सत्यात नसलेल्या आपल्या विवाह सोबत्याशी असलेल्या नातेसंबंधाविषयी प्रेषित पौलाने लिहिले: “पत्नीच्या द्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे; असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती; परंतु आता ती पवित्र आहेत.” (१ करिंथकर ७:१४) यहोवा, सत्यात असलेल्या सोबत्यामुळे वैवाहिक नात्याला पवित्र समजतो आणि मुलेही यहोवाच्या नजरेत पवित्र आहेत. साक्षीदार पत्नीने, होणारा परिणाम यहोवाच्या हाती सोपवून आपल्या मुलांना सत्य समजण्यासाठी शक्य ते सर्व केले पाहिजे.
मुले मोठी झाल्यावर, आपल्या पालकांकडून त्यांना मिळालेल्या प्रशिक्षणाच्या आधारावर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. येशूच्या शब्दांच्या अनुषंगाने ते कदाचित कार्य करू इच्छितील; त्याने म्हटले: “जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करितो तो मला योग्य नाही.” (मत्तय १०:३७) मुलांना अशी देखील आज्ञा देण्यात आली आहे: “मुलांनो, प्रभूमध्ये तुम्ही आपल्या आई-बापांच्या आज्ञेत राहा, कारण हे योग्य आहे.” (इफिसकर ६:१) पुष्कळ मुले, सत्यात नसलेल्या पालकाचे ऐकण्याऐवजी ‘देवाची आज्ञा मानण्याची’ निवड करतात. विरोध असूनही आपली मुले यहोवाची सेवा करत आहेत हे पाहून सत्यात असलेल्या पालकाला आपल्या प्रयत्नांचे चीज झाल्यासारखे वाटेल!
[तळटीप]
^ परि. 7 धर्माचे आचरण करण्याविषयी पत्नीला असलेल्या स्वातंत्र्यात तिला ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याचा देखील हक्क समाविष्ट आहे. काही वेळा, सत्यात नसलेला पती आपल्या लहान मुलांची काळजी घेण्यास इच्छुक नसल्यामुळे प्रेमळ आईला आपल्या मुलांनाही सभांना सोबत न्यावे लागले.