वाचायला शिकल्यामुळे आनंदी
वाचायला शिकल्यामुळे आनंदी
सॉलोमन आयलंड्सच्या काही भागांमध्ये, सध्या यहोवाचे साक्षीदार असलेल्यांपैकी ८० टक्के लोक निरक्षर होते. यामुळे आठवड्याच्या सभांमध्ये तर त्यांचा सहभाग मर्यादित होताच परंतु इतरांना राज्याच्या सत्यांविषयी सांगणे देखील त्यांच्याकरता आव्हानात्मक होते. आयुष्यात कधी एक पेन्सिल हातात न धरलेल्या प्रौढांना साक्षर होणे शक्य होते का?
यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले साक्षर होण्याचा ध्यास (इंग्रजी) हे माहितीपत्रक, सॉलोमन आयलंड्समधील यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रत्येक मंडळीत साक्षरतेच्या वर्गांमध्ये उपयोगात आणले गेले आहे. या कार्यक्रमाद्वारे शेकडो लोकांना कार्यक्षमतेची नवीन पातळी गाठण्यास कशी मदत मिळाली हे पुढील अनुभवांवरून आपल्याला कळेल. आणखी महत्त्वाचे म्हणजे, वाचता येऊ लागल्यामुळे आपल्या विश्वासाबद्दल चांगली साक्ष देणे त्यांना शक्य झाले आहे.—१ पेत्र ३:१५.
एका मिशनरीला शंभर राज्य प्रचारक असलेल्या एका मंडळीत नेमले होते; तिने पाहिले की, टेहळणी बुरूजच्या आधारे आठवड्याचा बायबल अभ्यास करतेवेळी मंडळीत फार कमी लोकांकडे मासिके होती आणि त्याहीपेक्षा कमी लोक उत्तर देत होते. याचे कारण? निरक्षरता. साक्षरतेचे वर्ग चालवले जाणार आहेत अशी मंडळीत घोषणा करताच या मिशनरीने लागलीच शिक्षिकेसाठी आपले नाव दिले. सुरवातीला, मोजकेच लोक आले; नंतर मात्र सर्व वयोगटातील ४० हून अधिक लोक येऊ लागले.
याचा काय परिणाम झाला? ती मिशनरी म्हणते: “साक्षरतेचा वर्ग अलीकडेच सुरू झाला होता आणि मी एकदा सकाळी सहा वाजता मिशनरी होमसाठी सामानसुमान भरायला बाजारात गेले होते. तिकडे काही विद्यार्थी, अगदी लहान मुलेसुद्धा नारळ आणि भाज्या विकत होते. का तर, त्यांना साक्षरतेच्या वर्गासाठी पेन आणि पुस्तक विकत घ्यायला पुरेसे पैसे हवे होते म्हणून! त्या वर्गाला
आल्यामुळे लोक टेहळणी बुरूज मासिकाची व्यक्तिगत प्रत देखील वापरू लागले.” ती पुढे म्हणते: “आता, मंडळीतल्या टेहळणी बुरूज अभ्यासादरम्यान, लहानमोठे असे सगळेजण सहभाग घेतात आणि चर्चेतही सगळेजण सामील होतात.” वर्गातल्या चार विद्यार्थ्यांनी, “आता आम्हाला कशाचीही भीती नाही” असे म्हणून जाहीर प्रचाराच्या कार्यात आपल्याला सामील होता येईल का असे विचारले तेव्हा या मिशनरीला अत्यानंद झाला.साक्षरता वर्गामुळे विद्यार्थ्यांना लिहिता वाचता तर आलेच शिवाय यामुळे इतरही सकारात्मक परिणाम त्यांच्यावर झाले. उदाहरणार्थ, अनेक वर्षांपासून एका साक्षीदाराची विश्वासात नसलेली पत्नी मंडळीला चिंतेचे एक कारण होती. लहानसहान कारणांवरून चिडून ती लोकांवर दगडे फेकायची आणि इतर स्त्रियांवरही लाकडाचे तुकडे फेकून त्यांना मारायची. कधी कधी ती आपल्या पतीबरोबर ख्रिस्ती सभांमध्ये यायची. पण ती फार संशयी होती; तिचा पती इतर स्त्रियांकडे पाहतो असे तिने म्हणू नये म्हणून तिचा पती काळा चष्मा घालून यायचा.
पण साक्षरतेचे वर्ग सुरू झाल्यावर ही स्त्री एकदा गुपचूप आली आणि म्हणाली: “मीसुद्धा या वर्गात बसू शकते का?” तिला होकार देण्यात आला. तेव्हापासून तिने एकदाही वर्ग चुकवला नाही किंवा सभा देखील चुकवली नाही. ती मेहनतीने अभ्यास करायची आणि पाहता पाहता तिने खूप चांगली प्रगती केली; त्याचा तिला फार आनंद वाटला. त्यानंतर तिने विचारले: “मला बायबलचा अभ्यास करता येईल का?” मग तिचा पती तिच्याबरोबर अभ्यास करायला तयार झाला आणि ती आजही लिहिण्या-वाचण्याच्या अभ्यासात तसेच बायबलचे ज्ञान घेण्यात प्रगती करत आहे.
आयुष्यात कधीही पेन्सिल न धरलेल्या ५० वर्षांच्या व्यक्तीला केवळ पेन धरणे आणि अक्षर गिरवणे देखील आव्हानात्मक वाटू शकते. काही जण अगदी सुरवातीला पेन्सिल घट्ट धरून पेपरवर लिहायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या बोटांवर फोड येतात. बऱ्याच आठवड्यांच्या प्रयत्नांनंतर पेन्सिल धरून लिहायला शिकल्यावर काही विद्यार्थी प्रफुल्लित होऊन म्हणतात: “आता मला पेपरवर अगदी अलगद लिहिता येतं!” विद्यार्थ्यांची प्रगती पाहून शिक्षकांनाही आनंद होतो. एक शिक्षिका म्हणाली: “मला वर्गात शिकवताना खूप आनंद वाटतो, आणि यहोवाने केलेल्या या तरतूदीविषयी विद्यार्थी सहसा वर्गाच्या शेवटी टाळ्या वाजवून मनापासून कृतज्ञता व्यक्त करतात.”
आज लिहायला-वाचायला शिकलेले हे साक्षीदार देखील मिशनरींसोबत आनंदी आहेत. का? कारण आता ते लिहिण्या-वाचण्याच्या क्षमतेचा यहोवाला आदर देण्यासाठी उपयोग करू शकतात.
[८, ९ पानांवरील चित्रे]
लहानमोठे सगळेजण साक्षरतेच्या वर्गांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात