विचारशक्ती कशाप्रकारे तुमचे संरक्षण करू शकते?
विचारशक्ती कशाप्रकारे तुमचे संरक्षण करू शकते?
उंच उसळत्या लाटांचा देखावा नेत्रसुखद वाटतो पण खलाशांकरता हा धोक्याचा संकेत असतो. उफाळत्या समुद्राच्या पाण्यात त्यांचा जीवही जाऊ शकतो.
त्याचप्रकारे देवाच्या सेवकांसमोर येणाऱ्या समस्या उंच उसळत्या लाटांप्रमाणे असू शकतात; या समस्यांमुळे ते पूर्णपणे खचून जाऊ शकतात. ख्रिस्ती लोकांवर एकामागोमाग एक परीक्षा व मोहांच्या लाटा कशा येऊ शकतात हे कदाचित तुम्हीही ओळखले असेल. निश्चितच तुम्ही या लाटांवर मात करून आपले आध्यात्मिक जहाज फुटू न देण्याचा निर्धार केला असेल. (१ तीमथ्य १:१९) स्वतःचा बचाव करण्याकरता विचारशक्ती अतिशय महत्त्वाची आहे. पण विचारशक्ती म्हणजे काय आणि ती कशाप्रकारे विकसित करता येते?
“विचारशक्ती” असे भाषांतर केलेला हिब्रू शब्द मेझिम्माह, “योजना किंवा बेत करणे” या अर्थाच्या मूळ शब्दापासून बनला आहे. (नीतिसूत्रे १:४, NW) म्हणूनच बायबलची काही भाषांतरे मेझिम्माह या शब्दाचे भाषांतर “चातुर्य” किंवा “दूरदृष्टी” असेही करतात. बायबल अभ्यासक जेमसन, फॉसट आणि ब्राउन मेझिम्माहचे वर्णन “वाईटापासून पळ काढून चांगले ते प्राप्त करण्यासाठी लागणारी धूर्तता” असे करतात. यामध्ये, आपल्या कृत्यांचे दीर्घकालीन तसेच तात्कालिक परिणाम लक्षात घेऊन वागण्याचा अर्थ अंतर्भूत आहे. विचारशक्ती असल्यास आपण कोणतेही पाऊल उचलण्याआधी, विशेषतः महत्त्वाचे निर्णय घेण्याआधी आपल्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत हे काळजीपूर्वक पडताळून पाहू.
विचारशक्ती असलेली व्यक्ती भविष्यासंबंधी अथवा वर्तमानातील परिस्थितीसंबंधी निर्णय घेते तेव्हा ती आधी सर्व संभाव्य धोक्यांचे व अडचणींचे मनोमन विश्लेषण करते. एकदा का हे संभाव्य धोके निश्चित केले, की मग ते कसे टाळता येतील, तसेच वातावरणाचा आणि सोबत्यांचा आपल्यावर होणारा परिणाम या सर्व बाबींविषयी ही चाणाक्ष व्यक्ती विचार करते. अशारितीने ही व्यक्ती स्वतःकरता असा एक मार्ग योजू शकते ज्यामुळे तिला चांगला परिणाम आणि कदाचित देवाकडून आशीर्वाद देखील प्राप्त होईल. हे प्रत्यक्षात कशाप्रकारे केले जाते हे समजून घेण्याकरता काही व्यावहारिक उदाहरणे पाहू या.
लैंगिक अनैतिकतेचा पाश टाळा
वाऱ्याच्या जोरामुळे कधीकधी लाटा जहाजाच्या पुढच्या भागावर येऊन आदळतात. खलाशांनी या लाटांचा सामना करण्याकरता योग्यप्रकारे जहाजाची दिशा न बदलल्यास ते उलटू शकते.
आजच्या या लैंगिक हव्यासाने पछाडलेल्या जगात राहताना आपणही काहीशा अशाच स्थितीत आहोत. लैंगिक भावनांना उत्तेजित करणाऱ्या कल्पनांच्या व चित्रांच्या लाटा जणू दररोज आपल्या दिशेने येत असतात. यांमुळे आपल्या नैसर्गिक लैंगिक भावनांवर होणाऱ्या परिणामाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. धोकेदायक प्रसंगांत अविचारीपणे वाहवत जाण्याऐवजी, विचारशक्तीचा उपयोग करून आपण या मोहांचा निर्णायक प्रतिकार केला पाहिजे.
उदाहरणार्थ, ख्रिस्ती पुरुष बऱ्याचदा अशा इतर पुरुषांसोबत काम करतात ज्यांना स्त्रियांविषयी आदर नसतो. त्यांच्या दृष्टीने स्त्रिया म्हणजे केवळ लैंगिक उपभोगाच्या वस्तू असतात. या सहकर्मचाऱ्यांच्या गप्पागोष्टींमध्ये सहसा अश्लील विनोद आणि लैंगिक आशयाचे शेरे असतात. अशा वातावरणात
ख्रिस्ती व्यक्तीच्या मनातही सहज अनैतिक कल्पना घर करू शकतात.एखाद्या ख्रिस्ती स्त्रीला देखील कदाचित नोकरी करणे आवश्यक असेल आणि त्यामुळे तिला कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागू शकते. ती कदाचित अशा पुरुष व स्त्रियांसोबत काम करत असेल जे तिच्या नैतिक दर्जांना मान देत नसतील. कदाचित तिच्या पुरुष सहकाऱ्यांपैकी एखादा तिच्याकडे आकर्षित झाला असेल. सुरवातीला तो तिच्याबद्दल काळजी दाखवेल, कदाचित तिच्या धार्मिक विश्वासांबद्दलही आदर दाखवेल. त्याच्या सतत तिच्याकडे लक्ष देण्यामुळे आणि त्याच्या सहवासात काम करणे भाग असल्यामुळे हळूहळू तिच्या मनातही त्याच्याशी जवळीक वाढवण्याची इच्छा उत्पन्न होऊ शकते.
ख्रिस्ती या नात्याने अशा परिस्थितीत विचारशक्ती कशाप्रकारे आपल्याकरता सहायक ठरू शकते? पहिली गोष्ट म्हणजे ती आपल्याला आध्यात्मिक धोक्यांविषयी सावध करू शकते आणि दुसरी म्हणजे एक योग्य मार्ग योजण्याकरता ती आपल्याला प्रवृत्त करू शकते. (नीतिसूत्रे ३:२१-२३) वर उल्लेख केलेल्या परिस्थितीत सह कर्मचाऱ्यांना हे स्पष्टपणे सूचित करणे आवश्यक आहे की आपल्या बायबल आधारित विश्वासांमुळे आपले आदर्श वेगळे आहेत. (१ करिंथकर ६:१८) आपले बोलणे आणि वागणे या गोष्टीला पुष्टी देऊ शकतात. शिवाय, विशिष्ट सहकर्मचाऱ्यांशी मर्यादित संबंध ठेवणे श्रेयस्कर ठरेल.
पण अनैतिक दबाव केवळ कामाच्या ठिकाणीच येतात अशातला भाग नाही. एखाद्या विवाहित जोडप्याने जीवनातल्या समस्यांमुळे आपसांतील घनिष्ठ संबंध कमकुवत होऊ दिल्यास हे घडू शकते. एका प्रवासी पर्यवेक्षकाने असे निरीक्षण केले: “वैवाहिक संबंध एका रात्रीत तुटत नाहीत. पती व पत्नी हळूहळू एकमेकांपासून दुरावतात, एकमेकांशी क्वचितच बोलतात किंवा क्वचितच एकमेकांच्या सहवासात वेळ घालवतात. वैवाहिक जीवनातील पोकळी भरून काढण्यासाठी ते भौतिक ध्येयांच्या मागे लागतात. आणि एकमेकांत त्यांना काहीही चांगले दिसत नसल्यामुळे ते इतर विरुद्धलिंगी व्यक्तींकडे आकर्षित होतात.”
या अनुभवी सेवकाने पुढे म्हटले: “वेळोवेळी वैवाहिक सोबत्यांनी एकमेकांसोबत बसून आपला नातेसंबंध कशामुळे कमकुवत तर होत नाही ना याविषयी विचार विनिमय करावा. एकमेकांसोबत अभ्यास, प्रार्थना आणि प्रचार कार्य करण्याच्या योजना त्यांनी आखाव्यात. आईवडील व मुलांप्रमाणेच “घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता” एकमेकांशी बोलत राहिल्यास त्यांना लाभ होईल.—अनुवाद ६:७-९.
बांधवांच्या गैरवागणुकीला योग्य प्रतिक्रिया दाखवणे
अनैतिक स्वरूपाच्या मोहांना तोंड देण्यास साहाय्य करण्याव्यतिरिक्त विचारशक्ती आपल्याला बांधवांशी व्यवहार करताना येणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासही मदत करू शकते. वाऱ्याच्या जोरामुळे कधीकधी लाटा जहाजाच्या मागच्या बाजूला आदळतात. या लाटा इतक्या जोरदार असतात की त्यांमुळे जहाजाचे मागचे टोक उचलले जाऊन ते आडव्या दिशेला कलू लागते. यामुळे जहाजाची एक बाजू लाटांच्या दिशेला होते आणि त्यावर लाटा आदळून जहाज फुटण्याची भीती असते.
कधीकधी आपल्यावरही अनपेक्षित दिशेने धोकेदायक प्रसंग येतो. आपण अनेक ख्रिस्ती बंधू व भगिनींच्या सोबतीने यहोवाची सेवा “एकचित्ताने” करतो. (सफन्या ३:९) त्यांपैकी एखादजण ख्रिस्ती व्यक्तीला न शोभणाऱ्या पद्धतीने वागल्यास आपल्या विश्वासाला तडा जातो आणि खूप दुःख होते. अशा प्रसंगांचे खूपच मनाला लावून घेतल्यामुळे, आपण स्वतःचे संतुलन गमावून बसू शकतो. हे आपण कसे टाळू शकतो?
“पाप करीत नाही असा कोणीच नाही,” हे विसरू नका. (१ राजे ८:४६) त्यामुळे, एखाद्या वेळेस एखाद्या ख्रिस्ती बांधवाच्या वागण्याबोलण्यामुळे आपल्याला राग आल्यास किंवा आपल्या भावना दुखावल्यास आश्चर्य वाटण्यासारखे खरे तर काहीच नाही. असे घडले तर आपण काय करू शकतो याविषयी मनन करून आपण त्या प्रसंगासाठी आधीच तयारी करू शकतो. काही ख्रिस्ती बांधवांनी प्रेषित पौलाबद्दल अपमानास्पद, तिरस्कारयुक्त उद्गार काढले तेव्हा त्याने काय केले? आपले आध्यात्मिक संतुलन गमवण्याऐवजी त्याने हे ओळखले की कोणत्याही माणसाचे मन जिंकण्यापेक्षा यहोवाची संमती प्राप्त करणे जास्त महत्त्वाचे आहे. (२ करिंथकर १०:१०-१८) अशी मनोवृत्ती बाळगल्यास, इतरांनी आपल्याला चिडवले तरीसुद्धा त्वरित काही प्रतिक्रिया दाखवण्याचे आपल्याला टाळता येईल.
पायाला ठेच लागण्याशी याची तुलना करता येईल. पाय ठेचकाळल्यावर एखाददोन मिनिटे आपल्याला काहीच सुचत नाही. पण दुखणे थोडे कमी झाल्यावर आपण नीट विचार करू शकतो व योग्य पाऊल उचलू शकतो. त्याचप्रकारे, कोणी अविचारीपणे बोलल्यास किंवा वागल्यास आपण लगेच भावना व्यक्त करू नयेत. त्याऐवजी, आपणही जर अविचारीपणे प्रतिक्रिया दाखवली तर काय दुष्परिणाम होऊ शकतात याविषयी थोडे थांबून आपण विचार करावा.
कोणी आपल्या भावना दुखावल्यास आपण काय करतो याविषयी अनेक वर्षांपासून मिशनरी म्हणून सेवा करणारे माल्कम सांगतात. “सर्वात आधी मी काही प्रश्नांवर विचार करतो. आमच्या दोघांच्या व्यक्तिमत्त्वांत फरक असल्यामुळे मला या बांधवाचा राग आला आहे का? त्याने मला काय म्हटले हे खरोखरच महत्त्वाचे आहे का? मलेरियामुळे मनःस्थितीवर होणाऱ्या परिणामामुळे तर माझ्या भावना अधिकच दुखावल्या नाहीत ना? काही तासांनंतर मी या घटनेबद्दल वेगळ्याप्रकारे विचार करेन का?” सहसा माल्कमना असे आढळले आहे, की झालेला मतभेद क्षुल्लक असतो आणि त्याकडे दुर्लक्ष करणेच उत्तम असते.माल्कम पुढे सांगतात: “कधीकधी परिस्थिती सुधारण्याचा माझ्याकडून सर्व प्रयत्न केल्यावरही त्या बांधवाची मनोवृत्ती तशीच, अमैत्रिपूर्ण राहते. या गोष्टीमुळे मी स्वतःची मनःस्थिती बिघडू देत नाही. आपल्या परीने प्रयत्न केल्यानंतर मी या समस्येकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून पाहतो. मी ती समस्या वैयक्तिक फाईलमध्ये ठेवण्याऐवजी एका काल्पनिक ‘पेन्डिंग फाईलमध्ये’ टाकून देतो. अशा समस्यांमुळे मी स्वतःला खचून जाऊ देणार नाही किंवा यहोवासोबतचा व माझ्या बांधवांसोबतचा नातेसंबंध मी यामुळे बिघडू देणार नाही.”
माल्कमप्रमाणे आपणही इतरांच्या गैरवागणुकीमुळे आवश्यकतेपेक्षा जास्त अस्वस्थ होऊ नये. प्रत्येक मंडळीत कित्येक आनंदी, विश्वासू बंधू व भगिनी आहेत. त्यांच्यासोबत “एकत्र” मिळून ख्रिस्ती मार्गावर चालणे अतिशय समाधानदायक आहे. (फिलिप्पैकर १:२७) आपल्या स्वर्गीय पित्याच्या प्रेमळ आधाराची आठवण ठेवल्यामुळेही आपल्याला सर्व गोष्टींविषयी योग्य दृष्टिकोन राखण्यास मदत होईल.—स्तोत्र २३:१-३; नीतिसूत्रे ५:१, २; ८:१२.
जगातल्या गोष्टींवर प्रीती न करणे
विचारशक्ती आपल्याला आणखी एका अप्रत्यक्ष दबावाला तोंड देण्यास मदत करते. वाऱ्याच्या जोरामुळे लाटा जहाजाच्या एका बाजूला आदळतात. सामान्य हवामानात समुद्राच्या अशा हालचालीमुळे हळूहळू जहाज वेगळ्याच दिशेला लागू शकते. आणि वादळात तर यामुळे जहाज उलटण्याचीही भीती असते.
२ तीमथ्य ४:१०) आवश्यक पावले न उचलल्यास, जगातल्या गोष्टींची प्रीती शेवटी आपल्याला ख्रिस्ती मार्ग कायमचा सोडून देण्यास प्रवृत्त करू शकते. (१ योहान २:१५) विचारशक्ती याबाबतीत कशाप्रकारे सहायक ठरू शकते?
त्याचप्रकारे, या दुष्ट जगात उपलब्ध असणारे सुखविलास उपभोगण्याच्या दबावाला आपण बळी पडलो तर ही भौतिकवादी जीवनशैली आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या वेगळ्याच दिशेने नेऊ शकते. (सर्वप्रथम, आपल्यासमोर कोणकोणते धोके आहेत याचा अंदाज लावण्यास ती आपल्याला मदत करू शकते. हे जग आपल्याला भुरळ पाडण्याकरता निरनिराळ्या विक्रितंत्रांचा वापर करते. श्रीमंत, उच्चभ्रू आणि तथाकथित “यशस्वी” लोकांच्या दिखाऊ जीवनशैलीचे अंधानुकरण करण्याचे ते सर्वांना प्रोत्साहन देते. (१ योहान २:१६) असे केल्यामुळे सर्वजण, खासकरून आपले मित्र आणि शेजारी आपले कौतुक आणि आदर करू लागतील अशी हमी दिली जाते. विचारशक्ती आपल्याला अशा या मतप्रसाराचा प्रतिकार करण्यास मदत करेल. ती आपल्याला याची आठवण करून देईल की आपली ‘वागणूक द्रव्यलोभावाचून असणे’ महत्त्वाचे आहे कारण ‘मी तुला सोडणार नाही’ असे यहोवाने आपल्याला आश्वासन दिले आहे.—इब्री लोकांस १३:५.
दुसरे म्हणजे विचारशक्ती आपल्याला जे “सत्याविषयी चुकले आहेत” अशांचे अनुकरण करण्यापासून आवरेल. (२ तीमथ्य २:१८) जे आपल्याला आवडत होते, ज्यांच्यावर आपल्याला विश्वास होता त्यांच्या मतांचा विरोध करणे अतिशय कठीण आहे. (१ करिंथकर १५:१२, ३२-३४) ज्यांनी ख्रिस्ती मार्ग सोडून दिला आहे त्यांचा थोडाही प्रभाव आपल्यावर पडल्यास आपल्या आध्यात्मिक प्रगतीत अडखळण निर्माण होऊन शेवटी आपणही संकट ओढवू शकतो. योग्य मार्गावरून केवळ एक डिग्री विचलित होणाऱ्या जहाजाप्रमाणे आपण होऊ शकतो. लांब पल्ल्याच्या प्रवासात एवढ्याशा चुकीमुळे देखील जहाज आपल्या ध्येयापासून बऱ्याच मोठ्या अंतराने विचलित होऊ शकते.—इब्री लोकांस ३:१२.
आपली आध्यात्मिक स्थिती सध्या कशी आहे आणि आपण कोणत्या दिशेने वाटचाल करत आहोत हे निश्चित करण्यास विचारशक्ती आपल्याला मदत करू शकते. कदाचित आपण ख्रिस्ती कार्यांत अधिक सक्रिय सहभाग घेतला पाहिजे असे आपल्याला दिसून येईल. (इब्री लोकांस ६:११, १२) एका तरुण साक्षीदाराने आपली आध्यात्मिक ध्येये गाठण्याकरता विचारशक्तीचा कसा उपयोग केला याकडे लक्ष द्या: “मला पत्रकारितेच्या क्षेत्रात करियर करण्याची संधी होती. हे क्षेत्र मला आकर्षक वाटत होते पण ‘हे जग नाहीसे होत आहे’ आणि ‘देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो’ हे बायबलमधील वचन मला आठवले. (१ योहान २:१७) मी जीवनात जे निर्णय घेतो त्यांतून माझे विश्वास प्रतिबिंबित झाले पाहिजेत असा मी विचार केला. माझ्या आईवडिलांनी ख्रिस्ती विश्वास त्यागला होता, आणि मला त्यांचे अनुकरण करायचे नव्हते. त्यामुळे मी एक उद्देशपूर्ण जीवन जगण्याचा निर्धार केला आणि नियमित पायनियर या नात्याने पूर्ण वेळेची सेवा करण्याकरता नाव नोंदवले. चार समाधानदायक वर्षे या सेवेत घालवल्यानंतर मला खात्री झाली आहे की मी निवडलेला मार्ग योग्य होता.”
आध्यात्मिक वादळांना यशस्वीपणे तोंड देणे
आजच्या काळात विचारशक्तीचा उपयोग करणे अतिशय महत्त्वाचे का आहे? खलाशांना धोक्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवावे लागते, खासकरून वादळी वारे वाहत असतात तेव्हा. तापमानात अचानक घट झाली आणि वारे जोराने वाहू लागले की ते जहाजाच्या तळाची दारे लाकडाच्या पट्ट्या मारून व त्यावर ताडपत्री बसवून पक्की बंद करतात आणि वादळाला तोंड द्यायची तयारी करतात. त्याचप्रकारे, या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत जवळ येत असता आपणही अतिशय जोरदार वादळांना तोंड देण्याची तयारी केली पाहिजे. समाजाची नैतिकता रसातळाला गेली आहे आणि ‘दुष्ट माणसे दुष्टपणात अधिक सरसावत’ आहेत. (२ तीमथ्य ३:१३) खलाशी ज्याप्रमाणे हवामान अंदाज नियमित ऐकतात त्याचप्रमाणे आपणही देवाच्या प्रेरित वचनातील भविष्यसूचक इशाऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे.—स्तोत्र १९:७-११.
विचारशक्तीचा उपयोग करण्याद्वारे आपण सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान लागू करत असतो. (योहान १७:३) आपण संभाव्य समस्यांविषयी विचार करून त्यांवर कशी मात करता येईल हे निश्चित करू शकतो. अशाप्रकारे आपण ख्रिस्ती मार्गातून कधीही न भटकण्याचा निर्धार करू शकतो आणि डोळ्यापुढे आध्यात्मिक ध्येये ठेवून ती ध्येये गाठण्याचा प्रयत्न करण्याद्वारे ‘पुढील काळासाठी चांगला आधार’ स्थापित करू शकतो.—१ तीमथ्य ६:१९.
व्यवहारबुद्धी आणि विचारशक्ती यांस सांभाळून ठेवल्यास आपल्याला ‘अकस्मात आलेल्या धोक्याला भिण्याची’ गरज उरणार नाही. (नीतिसूत्रे ३:२१, २५, २६) उलट आपण देवाच्या या आश्वासनातून सांत्वन मिळवू शकतो: “ज्ञान तुझ्या चित्तांत प्रवेश करील, आणि विद्या तुझ्या जिवाला रम्य वाटेल; विवेक [“विचारशक्ती,” NW] तुझे रक्षण करील.”—नीतिसूत्रे २:१०, ११.
[तळटीप]
^ परि. 19 ख्रिश्चनांनी मत्तय ५:२३, २४ यांतील सल्ल्यानुसार शांती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा. गंभीर पाप झालेले असल्यास, मत्तय १८:१५-१७ यानुसार त्यांनी आपल्या बांधवास परत मिळवण्याचा प्रयत्न करावा. ऑक्टोबर १५, १९९९ टेहळणी बुरूज, पृष्ठे १७-२२ पाहा.
[२३ पानांवरील चित्र]
विचारांची नियमित देवाणघेवाण केल्याने वैवाहिक संबंध बळकट होतो