“कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही”
“कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही”
“तेव्हा सर्व त्याची वाहवा करू लागले आणि जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्याविषयी आश्चर्य करू लागले.”—लूक ४:२२.
१, २. (अ) येशूला धरून आणण्याकरता पाठवलेले कामदार रिकाम्या हाती का परतले? (ब) येशूच्या शिकवणुकीने केवळ ते कामदारच प्रभावित झाले नव्हते हे कशावरून दिसून येते?
कामदारांचे काम अपूर्ण राहिले. त्यांना येशू ख्रिस्ताला धरून आणायला पाठवण्यात आले होते, पण ते रिकाम्या हाती परतले. मुख्य याजक आणि परुशी यांनी त्यांना स्पष्टीकरण मागितले: “तुम्ही त्याला का आणले नाही?” प्रश्न रास्तच होता, कारण आपल्या बचावासाठीही जो माणूस काहीच प्रतिकार करणार नव्हता त्याला धरून आणण्यात काय अडचण असू शकत होती? कामदारांनी उत्तर दिले: “कोणीहि मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” येशूच्या शिकवणुकीने ते इतके प्रभावित झाले होते की या शांतीप्रिय माणसाला ताब्यात घ्यावेसे त्यांना वाटलेच नाही. *—योहान ७:३२, ४५, ४६.
२ येशूच्या शिकवणुकीने केवळ हे अधिकारीच प्रभावित झाले नव्हते. बायबल आपल्याला सांगते की मोठ्या संख्येने लोक त्याच्याकडे केवळ त्याचे ऐकण्यासाठी येत असत. जेथे तो लहानाचा मोठा झाला त्या गावातले लोकही “जी कृपावचने त्याच्या मुखातून निघत होती त्यांविषयी आश्चर्य करू लागले.” (लूक ४:२२) एकापेक्षा अधिक वेळा तो नावेत बसून गालील समुद्राच्या तटावर जमलेल्या जमावांना उद्देशून बोलला. (मार्क ३:९; ४:१; लूक ५:१-३) एके प्रसंगी, लोकांचा “मोठा समुदाय” कितीतरी दिवस त्यांच्याजवळ काहीही खायला नसूनही त्याच्यासोबत राहिला.—मार्क ८:१, २.
३. येशू इतका उल्लेखनीय शिक्षक असण्याचे मुख्य कारण कोणते होते?
३ येशू इतका उल्लेखनीय शिक्षक कशाप्रकारे बनला? सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे प्रीती. * येशूने ज्या सत्यांविषयी शिकवले त्यांवर आणि ज्या लोकांना त्याने शिकवले त्यांच्यावर त्याला प्रीती होती. पण यासोबतच, काही उत्तम शिक्षण पद्धतींवरही त्याला असाधारण प्रभुत्व होते. या अंकातील अभ्यास लेखांत, त्याने उपयोगात आणलेल्या काही परिणामकारक पद्धतींविषयी आणि आपण त्यांचे कशाप्रकारे अनुकरण करू शकतो याविषयी चर्चा करू.
साधेपणा आणि सुस्पष्टता
४, ५. (अ) येशूने शिकवताना साधी भाषा का वापरली आणि विशेषतः त्याने असे करणे इतके उल्लेखनीय का आहे? (ब) येशूच्या साध्या शिक्षण पद्धतीचे एक उत्तम उदाहरण डोंगरावरील प्रवचन हे आहे असे का म्हणता येईल?
४ उच्च शिक्षित लोक सहसा अशी भाषा वापरतात जी ऐकणाऱ्यांच्या डोक्यावरून जाते. पण आपले बोलणे इतरांना समजलेच नाही तर आपल्या ज्ञानाचा त्यांना फायदा कसा होणार? येशूने लोकांना शिकवताना कधीही अशा डोक्यावरून जाणाऱ्या भाषेचा वापर केला नाही. त्याचा शब्दसंचय किती विशाल असू शकत होता याची कल्पना करा. पण त्याच्याजवळ असीमित ज्ञान असूनही त्याने स्वतःचा नव्हे तर आपल्या ऐकणाऱ्यांचा विचार केला. त्याला माहीत होते की त्यांच्यापैकी अनेकजण “निरक्षर व अज्ञानी” होते. (प्रेषितांची कृत्ये ४:१३) त्यांच्या मनाचा ठाव घेण्याकरता, त्यांना समजू शकेल अशीच भाषा येशूने वापरली. त्याने वापरलेले शब्द साधे असतील, पण त्यांतून व्यक्त होणारी सत्ये अतिशय प्रगल्भ होती.
५ उदाहरणार्थ, डोंगरावरील प्रवचन पाहा; मत्तय ५:३-७:२७ येथे आपण ते वाचू शकतो. हे प्रवचन द्यायला येशूला अवघी २० मिनिटे लागली असतील. पण यातील तत्त्वे अतिशय अर्थपूर्ण आहेत; ती जारकर्म, घटस्फोट आणि भौतिकवाद यांसारख्या विषयांच्या खोलात शिरतात. (मत्तय ५:२७-३२; ६:१९-३४) आणि तरीसुद्धा कोठेही आपल्याला अवघड अथवा बोजड शब्द आढळत नाहीत. किंबहुना यात एकही शब्द असा नसेल जो अगदी लहान मुलांनासुद्धा कळणार नाही! म्हणूनच, त्याचे बोलून झाले तेव्हा लोकसमुदाय, ज्यात अनेक शेतकरी, मेंढपाळ आणि मच्छिमार होते, ते “त्याच्या शिक्षणावरून थक्क झाले”!—मत्तय ७:२८.
६. येशूने काढलेल्या साध्याच पण अर्थभरीत उद्गारांचे एखादे उदाहरण द्या.
६ बऱ्याचदा लहानसे सुस्पष्ट वाक्यांश वापरून येशूने अगदी साध्याच पण अर्थभरीत म्हणी उच्चारल्या. असे करण्याद्वारे त्याने मुद्रित पुस्तकांचा शोध लागण्याच्या कितीतरी काळाआधीच आपल्या श्रोत्यांच्या मनावर व हृदयांवर आपला संदेश कायमचा मुद्रित केला. काही उदाहरणे पाहा: “कोणीहि दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, . . . तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका.” “तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.” “निरोग्यांना वैद्याची गरज नाही तर दुखणाइतांना आहे.” “तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील.” “कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्या.” “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे.” * (मत्तय ६:२४; ७:१, २०; ९:१२; २६:५२; मार्क १२:१७; प्रेषितांची कृत्ये २०:३५) येशूने बोललेल्या या गोष्टींना आता जवळजवळ २,००० वर्षे होऊन गेली आहेत, तरीसुद्धा त्याची ही प्रभावशाली वाक्ये सहज आठवणीत येतात.
प्रश्नांचा वापर
७. येशू प्रश्न का विचारायचा?
७ येशूने केलेला प्रश्नांचा वापरही वैशिष्ठ्यपूर्ण आहे. बऱ्याचदा, ऐकणाऱ्यांना एखादा मुद्दा सरळसरळ सांगून वेळेची बचत करणे शक्य असतानाही येशूने प्रश्न विचारण्याचा मार्ग निवडला. तो प्रश्न का विचारायचा? कधीकधी त्याच्या विरोधकांचे पितळ उघडे पाडून त्यांचे तोंड बंद करण्यासाठी तो भेदक प्रश्न विचारायचा. (मत्तय १२:२४-३०; २१:२३-२७; २२:४१-४६) पण बऱ्याचदा एखादे सत्य सांगताना, ते लगेच न सांगता येशू प्रश्न विचारत असे; अशारितीने तो ऐकणाऱ्यांना आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्यास प्रवृत्त करत असे. तसेच आपल्या शिष्यांच्या विचारांना चालना देण्याकरता आणि त्यांना विशिष्टप्रकारे विचार करायला शिकवण्याकरता तो प्रश्नांचा उपयोग करायचा. आपण दोन उदाहरणांचे परीक्षण करू; या दोन्ही उदाहरणांत प्रेषित पेत्राचा समावेश आहे.
८, ९. मंदिराचा कर भरण्यासंबंधी योग्य निष्कर्षावर येण्याकरता पेत्राला मदत करण्यासाठी येशूने कशाप्रकारे प्रश्नांचा वापर केला?
८ पहिल्यांदा, ती घटना आठवा जेव्हा कर घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी पेत्राला विचारले की येशू मंदिराचा कर भरतो किंवा नाही. * पेत्र, जो कधीकधी थोडा उतावीळपणे वागायचा, त्याने उत्तर दिले, “हो.” पण काही वेळानंतर येशूने त्याच्यासोबत पुढीलप्रमाणे तर्कवाद केला: “शिमोना, तुला काय वाटते? पृथ्वीवरील राजे जकात किंवा पट्टी कोणापासून घेतात? स्वतःच्या मुलांपासून की परक्यांपासून? परक्यांपासून, असे त्याने म्हटल्यावर येशू त्याला म्हणाला, तर मुले मोकळी आहेत.” (मत्तय १७:२४-२७) येशूच्या प्रश्नांतून त्याचा मुद्दा पेत्राला अगदी स्पष्टपणे कळला असेल. का?
९ येशूच्या काळात, राजघराण्यातील सदस्यांना कर भरावे लागत नव्हते आणि हे सर्वज्ञात होते. त्याअर्थी, मंदिरात ज्याची उपासना केली जात होती, त्या स्वर्गीय राजाचा एकुलता एक पुत्र या नात्याने येशूकडून कर भरण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नव्हती. पण येशूने पेत्राला सरळ उत्तर दिले नाही याकडे लक्ष द्या. तर त्याने अतिशय परिणामकारकपणे पण सौम्यतेने प्रश्नांचा वापर केला ज्यामुळे पेत्र योग्य निष्कर्षावर पोचू शकला; तसेच, काहीही बोलण्याआधी नीट विचार केला पाहिजे याचीही कदाचित त्याला जाणीव झाली असेल.
१०, ११. पेत्राने सा.यु. ३३ सालच्या वल्हांडणाच्या रात्री एका माणसाचा कान कापून टाकला तेव्हा येशूची काय प्रतिक्रिया होती आणि येशूला प्रश्नांचे महत्त्व माहीत होते हे यावरून कसे दिसून येते?
१० दुसरे उदाहरण सा.यु. ३३ सालच्या वल्हांडण सणाच्या रात्री घडलेल्या घटनेसंबंधी आहे. याप्रसंगी एक जमाव येशूला अटक करण्याकरता आला होता. शिष्यांनी येशूला विचारले की त्यांनी त्याचा बचाव करण्यासाठी लढावे का? (लूक २२:४९) पण उत्तरासाठी न थांबता, पेत्राने तरवारीने एका माणसाचा कान कापला (कदाचित पेत्राचा यापेक्षा गंभीर दुखापत करण्याचा इरादा असू शकतो). पेत्र त्याच्या धन्याच्या इच्छेविरुद्ध वागला कारण येशू स्वतःला त्यांच्या हाती देण्यास पूर्णपणे तयार होता. येशूची यावर काय प्रतिक्रिया होती? सदैव सहनशील असलेल्या येशूने पेत्राला तीन प्रश्न विचारले: “पित्याने जो प्याला मला दिला आहे तो मी पिऊ नये काय?” “तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण व्हावे?”—योहान १८:११; मत्तय २६:५२-५४.
११ या अहवालाविषयी थोडा विचार करा. येशूच्या सभोवती एक संतप्त जमाव होता, आपला मृत्यू अटळ आहे हे त्याला माहीत होते, शिवाय, आपल्या पित्याच्या नावाचे दोषनिवारण आणि मानव कुटुंबाच्या तारणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे याची त्याला जाणीव होती. तरीसुद्धा त्याने तशाही परिस्थितीत पेत्राच्या मनावर महत्त्वपूर्ण सत्ये बिंबवण्याकरता प्रश्नांचा उपयोग केला. येशूला प्रश्नांचे महत्त्व माहीत होते हे यावरून अगदी स्पष्ट होत नाही का?
वर्णनात्मक अतिशयोक्ती
१२, १३. (अ) अतिशयोक्ती म्हणजे काय? (ब) आपल्या बांधवांच्या लहानमोठ्या चुकांची टीका करणे किती मूर्खपणाचे आहे हे येशूने अतिशयोक्तीच्या साहाय्याने कशाप्रकारे स्पष्ट केले?
१२ आपल्या सेवाकार्यात येशूने बऱ्याचदा आणखी एका शिक्षण पद्धतीचा उपयोग केला—अतिशयोक्ती. एखाद्या गोष्टीवर जोर देण्याकरता ती गोष्ट मुद्दामहून फुगवून सांगण्याचे हे तंत्र आहे. अतिशयोक्तीच्या माध्यमाने येशू ऐकणाऱ्यांच्या डोळ्यांपुढे चित्र उभे करायचा जे सहजासहजी विसरता येणार नाही. याची काही उदाहरणे पाहू या.
१३ डोंगरावरील प्रवचनात, इतरांचे ‘दोष न काढण्याविषयी’ सांगताना येशूने म्हटले: “तू आपल्या डोळ्यातली तुळई ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कस्पट का पाहतोस?” (मत्तय ७:१-३, पं.र.भा.) तुम्ही या दृश्याची कल्पना करू शकता का? इतरांची टीका करण्याची सवय असलेली एखादी व्यक्ती आपल्या भावाच्या ‘डोळ्यातले’ लहानसे कस्पट काढण्याचा प्रयत्न करते. या टीका करणाऱ्या व्यक्तीचे असे म्हणणे असेल की डोळ्यात कस्पट असल्यामुळे आपला हा भाऊ योग्य निर्णय घेऊ शकत नाही. पण ही व्यक्ती स्वतःच निर्णय घेण्यास असमर्थ आहे कारण तिच्या डोळ्यात “तुळई”—छपराला आधार देण्याकरता वापरला जाणारा मोठा लाकडी ओंडका आहे. स्वतःत मोठमोठे दोष असताना आपल्या बांधवांच्या लहानमोठ्या चुकांची टीका करणे किती मूर्खपणाचे आहे हे येशूने किती अविस्मरणीय पद्धतीने स्पष्ट केले.
१४. मुरकुट गाळून उंट गिळण्यासंबंधी येशूचे शब्द अतिशय जोरदार अतिशयोक्तीचे उदाहरण का म्हणता येईल?
१४ दुसऱ्या एका प्रसंगी येशूने परूशांना “अहो आंधळ्या वाटाड्यांनो, तुम्ही मुरकुट गाळून काढता व उंट गिळून टाकिता!” असे म्हणून दोषी ठरवले. (मत्तय २३:२४) ही तर अतिशय जोरदार अतिशयोक्ती होती. का? एक लहानसे मुरकुट आणि येशूच्या श्रोत्यांच्या माहितीतला सर्वात मोठा प्राणी म्हणजे उंट यांच्यातली तुलना फारच प्रभावकारी होती. एका सर्वसाधारण आकाराच्या उंटाचे वजन भरून काढण्यासाठी अंदाजे सात कोटी मुरकुट लागतील! तसेच येशूला माहीत होते की परूशी लोक द्राक्षारसाचा वस्त्रगाळ करत असत. नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या या परूशांना मुरकुट गिळून अशुद्ध व्हायचे नव्हते. पण लाक्षणिकरित्या ते उंट गिळून टाकत होते; उंट देखील अशुद्ध प्राणी होता. (लेवीय ११:४, २१-२४) येशूचा मुद्दा अगदी स्पष्ट होता. परूशी नियमशास्त्रातील लहानातल्या लहान नियमाचे काटेकोर पालन करत होते पण “न्याय, दया व विश्वास” यांसारख्या अधिक महत्त्वाच्या गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष केले. (मत्तय २३:२३) येशूने त्यांचे खरे रूप किती स्पष्टपणे उघडकीस आणले!
१५. अतिशयोक्तीचे तंत्र वापरून येशूने कोणते काही धडे शिकवले?
१५ सबंध सेवाकार्यादरम्यान येशूने अनेकदा अतिशयोक्तीचे तंत्र उपयोगात आणले. काही उदाहरणे लक्षात घ्या. “मोहरीच्या [बारीक] दाण्याएवढा विश्वास” जो डोंगराला सरकवू शकेल—थोडा विश्वासही बरेच काही साध्य करू शकतो यावर जोर देण्याकरता यापेक्षा अधिक प्रभावी मार्ग कोणता असता? (मत्तय १७:२०) सुईच्या नाकातून निघण्याचा प्रयत्न करणारा मोठा उंट—एकीकडे भौतिकवादी जीवनशैलीला धरून ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि दुसरीकडे देवाची सेवाही करू पाहणाऱ्या श्रीमंत व्यक्तीची अडचण या उदाहरणातून किती सुरेखपणे चित्रित होते! (मत्तय १९:२४) येशूने वापरलेले रंगतदार भाषालंकार आणि कमीतकमी शब्दांतून जास्तीत जास्त परिणाम साध्य करण्याची त्याची कसब पाहून तुम्हाला आश्चर्य वाटत नाही का?
बिनतोड तर्कवाद
१६. येशूने आपल्या कुशाग्र बौद्धिक क्षमतेचा नेहमी कशाप्रकारे वापर केला?
१६ परिपूर्ण बुद्धी असलेला येशू, लोकांशी तर्कशुद्धपणे युक्तिवाद करण्यात सराईत होता. तरीसुद्धा या निपुणतेचा त्याने कधीही दुरुपयोग केला नाही. लोकांना शिकवताना त्याने आपल्या विलक्षण कुशाग्र बौद्धिक क्षमतेचा वापर सत्याचा प्रसार करण्याकरताच केला. कधीकधी त्याच्या धार्मिक विरोधकांच्या खोट्या आरोपांचे खंडन करण्याकरता त्याने जबरदस्त तर्कवादाचा वापर केला. बऱ्याचदा त्याने आपल्या शिष्यांना महत्त्वपूर्ण धडे शिकवण्याकरता तर्कशुद्ध युक्तिवादाचा उपयोग केला. तर्कवाद करण्याच्या येशूच्या नैपुण्याचे आपण परीक्षण करू या.
१७, १८. परूशांच्या एका खोट्या आरोपाचे खंडन करण्याकरता येशूने कशाप्रकारे जबरदस्त तर्कवादाचा वापर केला?
१७ येशूने एका अंधळ्या व मुक्या भूतग्रस्त माणसाला मत्तय १२:२२-२६) दुसऱ्या शब्दांत येशू म्हणत होता: ‘तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी सैतानाचा हस्तक असूनही सैतानाचेच कार्य निष्फळ करत असतो, तर सैतान स्वतःच्या हिताविरुद्ध कार्य करतो असा याचा अर्थ झाला असता आणि अशाने सैतानाचा लवकरच नाश होईल.’ हा खरोखर जबरदस्त तर्कवाद होता, नाही का?
बरे केले तेव्हाच्या प्रसंगाचा विचार करा. या घटनेविषयी ऐकल्यावर परूशांनी म्हटले: “भुतांचा अधिपति जो बालजबूल [सैतान] त्याच्या साहाय्याशिवाय हा भुते काढीत नाही.” सैतानाच्या दुरात्म्यांना काढण्याकरता अतिमानवीय शक्तीची गरज आहे हे परूशांनी कबूल केले याकडे लक्ष द्या. पण लोकांनी येशूवर विश्वास ठेवू नये म्हणून त्यांनी त्याची शक्ती सैतानाकडील आहे असा दावा केला. पण त्यांनी पूर्ण विचार करून हा वाद मांडला नव्हता हे दाखवून येशूने त्यांना उत्तर दिले: “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि आपसात फूट पडलेले प्रत्येक नगर किंवा घर टिकणार नाही. सैतान जर सैतानाला काढीत असेल तर त्याच्यात फूट पडली आहे; मग त्याचे राज्य कसे टिकणार?” (१८ नंतर येशूने याच विषयावर आणखी थोडा वादविवाद केला. परूशांपैकी काही जणांनी दुरात्मे काढले होते हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने हा साधाच पण त्यांना चित करणारा प्रश्न टोलवला: “मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढीत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढितात?” (मत्तय १२:२७) एका अर्थाने येशूचे असे म्हणणे होते की: ‘जर मी खरच सैतानाच्या शक्तीने दुरात्मे काढत असेन तर मग तुमचे स्वतःचे शिष्य देखील याच शक्तीने कार्य करत असतील.’ याला परूशी काय उत्तर देऊ शकत होते? त्यांचे स्वतःचे शिष्य सैतानाच्या सामर्थ्याने कार्य करत होते हे तर ते कधीही कबूल करणार नव्हते. तर अशाप्रकारे बिनतोड तर्कवाद करून त्यांनी केलेल्या आरोपाला येशूने हास्यास्पद ठरवले.
१९, २०. (अ) येशूने कशाप्रकारे सकारात्मक पद्धतीने तर्कवाद केला? (ब) शिष्यांनी प्रार्थना करण्यास शिकवण्याची विनंती केली तेव्हा, येशूने ‘अमुक इतके तर तमुक किती’ या आशयाच्या युक्तिवादाचा कशाप्रकारे उपयोग केला?
१९ विरोधकांना शांत करण्यासाठी तर्कवादाचा उपयोग करण्याशिवाय, येशूने यहोवाविषयी सकारात्मक, आनंददायक सत्ये शिकवण्याकरताही तर्कशुद्ध, मनाला पटण्याजोगा युक्तिवाद उपयोगात आणला. बऱ्याचदा त्याने ‘अमुक इतके तर तमुक किती’ या आशयाचा युक्तिवाद केला; आणि याच्या साहाय्याने त्याने ऐकणाऱ्यांना आधीच माहीत असलेल्या सत्यावरून एक नवीन विश्वास बळकट करण्यास मदत केली. याची केवळ दोन उदाहरणे पाहू या.
२० शिष्यांनी प्रार्थना करायला शिकवण्याची विनंती केली तेव्हा येशूने एका माणसाचे उदाहरण दिले ज्याच्या “आग्रहामुळे” त्याने आपली मागणी पूर्ण करण्यास कचरत असलेल्या एका मित्राला ती पूर्ण करण्याकरता पटवले. येशूने आईवडिलांचेही उदाहरण दिले, जे आपल्या मुलांना “चांगल्या देणग्या” देण्यास सदैव तयार असतात. मग त्याने असा निष्कर्ष काढला: “तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?” (लूक ११:१-१३) येशूने सांगितलेला मुद्दा साम्यावर नव्हे तर विरोधावर आधारित आहे. कां कूं करणाऱ्या मित्राला जर शेजाऱ्याला लागणारी वस्तू द्यायला प्रवृत्त करणे शक्य आहे आणि जर अपरिपूर्ण आईवडील आपल्या मुलांच्या गरजा भागवू शकतात तर मग आपला प्रेमळ स्वर्गीय पिता, त्याला नम्रपणे प्रार्थना करणाऱ्या त्याच्या एकनिष्ठ सेवकांना पवित्र आत्मा किती मुबलकपणे देईल!
२१, २२. (अ) भौतिक गोष्टींची चिंता टाळण्याविषयी सल्ला देताना येशूने कशाप्रकारे युक्तिवाद केला? (ब) येशूच्या काही शिक्षण पद्धतींवर पुनर्विचार केल्यावर आपण कोणत्या निष्कर्षावर येतो?
२१ भौतिक गोष्टींविषयी चिंता टाळण्याविषयी सल्ला देत असतानाही येशूने अशाच प्रकारचा युक्तिवाद केला. लूक १२:२४, २७, २८) स्पष्टच आहे, जर यहोवा पक्ष्यांची आणि फुलांची काळजी घेतो तर मग आपल्या सेवकांची तो कितीतरी पटीने जास्त काळजी घेईल! असा कोमल पण प्रभावी युक्तिवाद निश्चितच येशूच्या श्रोत्यांच्या अंतःकरणाला भिडला असेल.
त्याने म्हटले: “कावळ्यांचा विचार करा; ते पेरीत नाहीत व कापणीहि करीत नाहीत; त्यांस कणगी नाही व कोठारहि नाही; तरी देव त्यांचे पोषण करितो; पांखरांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहां! फुले कशी वाढतात ह्याचा विचार करा; ती कष्ट करीत नाहीत व कातीत नाहीत; . . . जे गवत रानांत आज आहे व उद्या भट्टीत टाकले जाते त्याला जर देव असा पोषाख घालतो, तर अहो अल्पविश्वासी जनहो, तो तुम्हाला किती विशेषेकरून पोषाख घालील?” (तिरपे वळण आमचे.) (२२ येशूच्या काही शिक्षण पद्धतींवर पुनर्विचार केल्यावर आपण साहजिकच या निष्कर्षावर येतो की येशूला धरायला आलेल्या कामदारांनी “कोणीही मनुष्य कधीही त्याच्यासारखा बोलला नाही” असे म्हटले तेव्हा ते अतिशयोक्ती करत नव्हते. पण येशूची जी शिकवण्याची पद्धत सर्वात सुप्रसिद्ध आहे ती म्हणजे दाखल्यांचा किंवा दृष्टान्तांचा वापर. या पद्धतीचा त्याने वापर का केला? त्याचे दाखले इतके परिणामकारक का होते? या प्रश्नांची पुढच्या लेखात चर्चा केली जाईल.
[तळटीपा]
^ परि. 1 हे कामदार कदाचित यहुदी न्यायसभेतील कारभारी आणि मुख्य याजकांच्या अधिकाराखाली असावेत.
^ परि. 3 टेहळणी बुरूजच्या ऑगस्ट १५, २००२ अंकातील “मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे” आणि “मला अनुसरावे” हे लेख पाहा.
^ परि. 6 प्रेषितांची कृत्ये २०:३५ येथे सापडणारा हा शेवटला वाक्यांश केवळ पौलानेच उद्धृत केला आहे, पण याच आशयाची माहिती शुभवर्तमानांतही सापडते. पौलाने हे वाक्य (येशूच्या तोंडून ऐकलेल्या एखाद्या शिष्याकडून किंवा पुनरुत्थित येशूकडून) ऐकले असेल किंवा देवाने ते त्याला प्रकट केले असेल.—प्रेषितांची कृत्ये २२:६-१५; १ करिंथकर १५:६, ८.
^ परि. 8 यहुद्यांना मंदिराचा वार्षिक कर म्हणून दोन ड्राखमा (साधारण दोन दिवसांचे वेतन) भरावे लागत. कराचा हा पैसा मंदिराला सुस्थितीत ठेवण्याकरता, तेथे केल्या जाणाऱ्या सेवेकरता आणि राष्ट्राकरता अर्पण केल्या जाणाऱ्या दररोजच्या बलिदानांकरता वापरला जात असे.
तुम्हाला आठवते का?
• येशूने साध्या पण स्पष्ट पद्धतीने शिकवले हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?
• येशूने शिकवताना प्रश्नांचा वापर का केला?
• अतिशयोक्ती म्हणजे काय आणि येशूने शिकवताना या पद्धतीचा कसा वापर केला?
• यहोवाविषयी आनंददायक सत्ये शिकवण्याकरता येशूने तर्कशुद्ध युक्तिवादाचा कसा वापर केला?
[अभ्यासाचे प्रश्न]
[९ पानांवरील चित्र]
येशूने सामान्य लोकांना समजेल अशी साधी भाषा वापरली
[१० पानांवरील चित्र]
परूशी ‘मुरकुट गाळून उंट गिळायचे’