व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

थोर शिक्षकाचे अनुकरण करा

थोर शिक्षकाचे अनुकरण करा

थोर शिक्षकाचे अनुकरण करा

“तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा . . . जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.”—मत्तय २८:१९, २०.

१, २. (अ) आपण सर्वचजण एका अर्थाने शिक्षक आहोत असे का म्हणता येते? (ब) शिकवण्याच्या संदर्भात, खऱ्‍या ख्रिश्‍चनांवर कोणती अद्वितीय जबाबदारी सोपवण्यात आली आहे?

तुम्ही एक शिक्षक आहात का? एका अर्थाने आपण सर्वजण आहोत. एखाद्या रस्ता चुकलेल्या वाटाड्याला आपण योग्य सूचना देतो, सोबत काम करणाऱ्‍या व्यक्‍तीला विशिष्ट काम कसे करायचे ते दाखवतो किंवा लहानशा मुलाला बुटाची लेस कशी बांधायची ते दाखवतो तेव्हा आपण शिकवतच असतो. इतरांना अशारितीने मदत करताना आपल्याला एकप्रकारचे समाधान मिळते, नाही का?

शिकवण्याविषयी बोलायचे झाल्यास, खऱ्‍या ख्रिश्‍चनांवर एक आगळीवेगळी जबाबदारी आहे. आपल्याला ‘लोकांस शिष्य करण्याची, त्यांना शिकवण्याची’ आज्ञा देण्यात आली आहे. (मत्तय २८:१९, २०) मंडळीतसुद्धा आपल्याला शिकवण्याची संधी असते. मंडळीच्या उभारणीकरता योग्यताप्राप्त पुरुषांना “पाळक व शिक्षक” म्हणून सेवा करण्याकरता नेमण्यात आले आहे. (इफिसकर ४:११-१३) तसेच, दररोजच्या ख्रिस्ती कार्यांत प्रौढ स्त्रियांनी “तरूण स्त्रियांना” सुशिक्षण द्यावे असे सांगण्यात आले आहे. (तीत २:३-५) शिवाय आपल्या सर्वांनाच सहविश्‍वासू बांधवांना प्रोत्साहन देण्याचे आर्जवण्यात आले आहे आणि आपण इतरांच्या उभारणीकरता बायबलचा वापर करण्याद्वारे या सल्ल्याचे पालन करू शकतो. (१ थेस्सलनीकाकर ५:११) देवाचे वचन शिकवणे आणि दीर्घकालीन लाभाच्या आध्यात्मिक गोष्टी एकमेकांना देणे हा किती मोठा बहुमान आहे!

३. शिक्षक या नात्याने आपण अधिक परिणामकारक कसे होऊ शकतो?

पण शिक्षक या नात्याने आपण अधिक परिणामकारक कसे बनू शकतो? सर्वप्रथम, थोर शिक्षक येशू याचे अनुकरण करण्याद्वारे. पण काहीजण कदाचित विचार करतील, आपण येशूचे अनुकरण कसे करू शकतो? ‘तो तर परिपूर्ण होता.’ आपण परिपूर्ण शिक्षक होऊ शकत नाही हे कबूल आहे. तरीसुद्धा, आपल्याजवळ असलेल्या क्षमतेतच आपण येशूने शिकवलेल्या पद्धतीचे अनुकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू शकतो. त्याच्या शिकवण्याच्या चार वैशिष्ठ्यपूर्ण पद्धती—साधेपणा, परिणामकारक प्रश्‍न, तर्कशुद्ध युक्‍तिवाद आणि सुयोग्य दाखले—आपण कशाप्रकारे उपयोगात आणू शकतो याविषयी पाहू या.

साधेपणाने शिकवणे

४, ५. (अ) साधेपणा हे बायबलमधील सत्याचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ठ्य आहे असे का म्हणता येईल? (ब) साधेपणाने शिकवण्याकरता आपण कोणते शब्द वापरतो याकडे लक्ष देणे का महत्त्वाचे आहे?

देवाच्या वचनातील मूलभूत शिकवणुकी क्लिष्ट नाहीत. येशूने प्रार्थना करताना एकदा म्हटले: “हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करितो; कारण ज्ञानी व विचारवंत ह्‍यांच्यापासून ह्‍या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रगट केल्या.” (मत्तय ११:२५) यहोवाने आपले उद्देश प्रामाणिक आणि नम्र अंतःकरणाच्या लोकांना प्रकट केले आहेत. (१ करिंथकर १:२६-२८) त्याअर्थी, बायबल सत्याचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ठ्य म्हणजे त्याचा साधेपणा.

गृह बायबल अभ्यास चालवताना किंवा आस्था दाखवलेल्यांसोबत पुनर्भेट करताना तुम्ही साधेपणाने कसे शिकवू शकता? याबाबतीत थोर शिक्षकाकडून आपण काय शिकलो? आपल्या ऐकणाऱ्‍यांच्या, ज्यांपैकी अनेकजण “निरक्षर व अज्ञानी” होते, अंतःकरणापर्यंत पोचण्याकरता येशूने त्यांना समजेल अशी सुस्पष्ट भाषा वापरली. (प्रेषितांची कृत्ये ४:१३) साधेपणाने शिकवण्याकरता, पहिला नियम म्हणजे तुम्ही कोणते शब्द वापरता त्यांविषयी दक्ष असा. देवाच्या वचनातील सत्य इतरांना अधिक पटण्याजोगे वाटावे म्हणून मोठमोठे ग्रांथिक शब्द वापरण्याची गरज नाही. अशा ‘वक्‍तृत्वाच्या श्रेष्ठतेमुळे’ समोरची व्यक्‍ती घाबरून जाण्याची शक्यता आहे; विशेषतः ज्यांचे फारसे शिक्षण झालेले नाही किंवा जे फार हुशार नाहीत अशांच्या बाबतीत असे घडू शकते. (१ करिंथकर २:१, २) येशूच्या उदाहरणावरून असे दिसून येते की विचारपूर्वक निवडलेले साधे शब्द इतरांच्या मनावर सत्याची अधिक शक्‍तिशाली छाप पाडू शकतात.

६. बायबल विद्यार्थ्याला एकदाच खूप माहिती देऊन भांबावून सोडण्याचे आपण कसे टाळू शकतो?

साधेपणाने शिकवण्याकरता आपण बायबल शिकणाऱ्‍या व्यक्‍तीला एकदाच खूप माहिती देऊन भारावून न टाकण्याची काळजी घेतली पाहिजे. येशूने त्याच्या शिष्यांच्या मर्यादित बुद्धीची दखल घेतली. (योहान १६:१२) आपणही आपल्या विद्यार्थ्याच्या मर्यादांबद्दल विचारशील असले पाहिजे. उदाहरणार्थ, सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातून अभ्यास करताना, प्रत्येक बारीकसारीक गोष्ट समजावून सांगण्याची गरज नाही. * तसेच, विशिष्ट भाग संपवण्याचा अट्टाहास करून घाईघाईने अभ्यास घेण्याचीही गरज नाही. उलट, विद्यार्थ्याच्या गरजांनुसार व क्षमतेनुसारच अभ्यासाचा वेग ठरवणे शहाणपणाचे आहे. आपले ध्येय त्या विद्यार्थ्याला ख्रिस्ताचा शिष्य आणि यहोवाचा उपासक बनायला मदत करण्याचे आहे. शिकत असलेल्या गोष्टी स्पष्टपणे समजून घेण्याकरता आस्थेवाईक विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी जितका वेळ लागेल तितका देण्याची आपली तयारी असली पाहिजे. असे केल्यास, सत्य त्याच्या अंतःकरणापर्यंत पोचेल आणि त्याला योग्य कृती करण्यास प्रवृत्त करेल.—रोमकर १२:२.

७. मंडळीत भाषण देताना साधेपणाने शिकवण्याकरता कोणत्या सूचना सहायक ठरतील?

आपण मंडळीत भाषण देतो तेव्हा, खासकरून श्रोत्यांमध्ये काही नवीन लोक असल्यास आपण “सहज समजेल अशा” भाषेत कशाप्रकारे बोलू शकतो? (१ करिंथकर १४:९) तीन सूचनांवर विचार करणे सहायक ठरू शकेल. पहिले म्हणजे, कोणतेही अनोळखी शब्द वापरावे लागल्यास, ते स्पष्ट करा. आपल्याला देवाच्या वचनाची समज मिळाल्यामुळे एक खास शब्दसंग्रह आपल्याला मिळाला आहे. पण नवीन लोकांशी बोलताना, “विश्‍वासू व बुद्धिमान दास,” “दुसरी मेंढरे” आणि “मोठी बाबेल” यांसारखे शब्द वापरल्यास सोप्या शब्दांत त्यांचे स्पष्टीकरण कदाचित आपल्याला द्यावे लागेल. दुसरी गोष्ट, पाल्हाळीक बोलणे टाळा. खूप अनावश्‍यक शब्दांचा वापर, लांबलचक स्पष्टीकरणे यांमुळे श्रोत्यांना तुमच्या बोलण्यात रस उरणार नाही. स्पष्ट बोलण्याकरता अनावश्‍यक शब्द व शब्दप्रयोग तुम्हाला छाटावे लागतील. तिसरे म्हणजे, फार जास्त साहित्य विचारात घेण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या संशोधनातून आपल्याला अनेक रोचक मुद्दे शिकायला मिळाले असतील. पण सर्वात उत्तम मार्ग म्हणजे, साहित्याचे दोन किंवा तीन मुख्य मुद्द्‌यांत विभाजन करा आणि केवळ या मुद्द्‌यांवर प्रकाश टाकणारी आणि दिलेल्या वेळेत स्पष्टपणे समजवता येईल इतकीच माहिती द्या.

प्रश्‍नांचा परिणामकारक वापर

८, ९. आपण घरमालकाच्या आवडीच्या विषयांशी जुळलेला प्रश्‍न कसा निवडू शकतो? उदाहरणे द्या.

शिष्यांना त्यांच्या मनातल्या खऱ्‍या भावना व्यक्‍त करण्यास प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी आणि विशिष्टप्रकारे विचार करायला शिकवण्यासाठी प्रश्‍नांचा वापर करण्यात येशू अत्यंत निपुण होता, हे तुम्हाला आठवत असेल. प्रश्‍नांच्या साहाय्याने येशू अगदी हळूवारपणे त्यांच्या हृदयापर्यंत पोचून त्यांस स्पर्श करत असे. (मत्तय १६:१३, १५; योहान ११:२६) येशूसारखे आपणही प्रश्‍नांचा परिणामकारक रितीने वापर कसा करू शकतो?

घरोघर प्रचार करताना आपण लोकांची आस्था वाढवण्याकरता आणि अशारितीने देवाच्या राज्याबद्दल त्यांच्याशी बोलण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठी प्रश्‍नांचा वापर करू शकतो. आपण घरमालकाच्या आवडीच्या विषयांशी जुळलेला प्रश्‍न कसा निवडू शकतो? निरीक्षण करण्याची वृत्ती ठेवा. घराजवळ येताना अवतीभवती नजर ठेवा. अंगणात खेळणी आहेत का, म्हणजे कदाचित घरात मुले असतील का? असे असल्यास आपण विचारू शकतो: ‘तुमची मुले मोठी होतील तेव्हा या जगात कशी परिस्थिती असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का?’ (स्तोत्र ३७:१०, ११) घराच्या दाराला बरीच कुलुपे लावली आहेत का किंवा सुरक्षेसाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बसवलेली आहे का? आपण हा प्रश्‍न विचारू शकतो, ‘तुमच्या माझ्यासारख्या लोकांना आपापल्या घरात आणि रस्त्यावर सुरक्षित वाटेल असा काळ कधी येईल असे तुम्हाला वाटते का?’ (मीखा ४:३, ४) व्हीलचेअर जाण्यासाठी उतार बनवलेला आहे का? तेव्हा आपण विचारू शकतो: ‘सर्वांचे उत्तम आरोग्य असेल असा काळ कधी येईल का?’ (यशया ३३:२४) पवित्र शास्त्रीय चर्चा कशा सुरू कराव्या व त्या कशा चालू ठेवाव्या या पुस्तिकेत अनेक प्रस्तावना सुचवल्या आहेत. *

१०. बायबल विद्यार्थ्याच्या मनातील विचार व भावना ‘बाहेर काढण्यासाठी’ आपण प्रश्‍नांचा कशाप्रकारे उपयोग करू शकतो, पण आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे?

१० बायबल अभ्यास चालवताना आपण प्रश्‍नांचा कशाप्रकारे चांगला उपयोग करू शकतो? येशूप्रमाणे आपण लोकांच्या हृदयात काय आहे हे जाणू शकत नाही. पण व्यवहारबुद्धीचा वापर करून समर्पक प्रश्‍न विचारल्यास आपण विद्यार्थ्याचे विचार व भावना ‘बाहेर काढण्यात’ यशस्वी होऊ. (नीतिसूत्रे २०:५) उदाहरणार्थ, आपण ज्ञान पुस्तकातील “ईश्‍वरी जीवन जगणे का आनंद देते” हा अध्याय शिकत आहोत असे समजा. यात बेईमानी, व्यभिचार आणि इतर विषयांवर देवाच्या दृष्टिकोनाची चर्चा केली आहे. विद्यार्थी पुस्तकातल्या प्रश्‍नाचे कदाचित अचूक उत्तर देईल, पण तो स्वतः त्याच्याशी सहमत आहे का? तेव्हा आपण असा प्रश्‍न विचारू शकतो: ‘या विषयावरील यहोवाचा दृष्टिकोन तुम्हाला वाजवी वाटतो का?’ ‘या बायबल तत्त्वांचे तुम्ही आपल्या जीवनात कसे पालन करू शकता?’ पण कोणतेही प्रश्‍न विचारताना आदरणीय पद्धतीने, विद्यार्थ्याच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने विचारा. बायबल विद्यार्थ्याला लाजिरवाणे वाटेल किंवा त्याचा अपमान होईल अशाप्रकारचे प्रश्‍न आपण विचारू इच्छित नाही.—नीतिसूत्रे १२:१८.

११. जाहीर भाषण देणारे वक्‍ते कशाप्रकारे प्रश्‍नांचा परिणामकारक उपयोग करू शकतात?

११ जाहीर भाषण देणारे देखील प्रश्‍नांचा उत्तम उपयोग करू शकतात. उत्तराची अपेक्षा नसलेले प्रश्‍न श्रोत्यांना विचार व तर्क करण्यास उद्युक्‍त करू शकतात. येशूने काहीप्रसंगी अशा प्रश्‍नांचा वापर केला होता. (मत्तय ११:७-९) तसेच, प्रस्तावनेनंतर जाहीर भाषण देणारे वक्‍ता भाषणातील मुख्य मुद्द्‌यांकडे लक्ष वेधण्याकरताही प्रश्‍नांचा उपयोग करू शकतात. ते असे म्हणू शकतात: “आजच्या आपल्या चर्चेत आपल्याला खालील प्रश्‍नांची उत्तरे मिळतील . . . ” मग भाषणाच्या शेवटी ते सुरवातीला विचारलेल्या या प्रश्‍नांचा उल्लेख करून मुख्य मुद्द्‌यांची उजळणी करू शकतात.

१२. ख्रिस्ती वडील प्रश्‍नांच्या साहाय्याने एखाद्या सहविश्‍वासू बांधवाला कशाप्रकारे देवाच्या वचनातून सांत्वन मिळवण्यास मदत करू शकतात त्याचे एक उदाहरण द्या.

१२ मेंढपाळकत्वाचे कार्य करताना ख्रिस्ती वडील ‘अल्पधीराच्या’ व्यक्‍तींना यहोवाच्या वचनातून सांत्वन मिळवण्यास मदत करतानाही प्रश्‍नांचा उपयोग करू शकतात. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) उदाहरणार्थ, एखाद्या खिन्‍न व्यक्‍तीला मदत करण्यासाठी वडील स्तोत्र ३४:१८ या वचनाकडे कदाचित तिचे लक्ष वेधतील. यात म्हटले आहे: “परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो.” हे व्यक्‍तिगतरित्या आपल्याला कशाप्रकारे लागू होते हे निरुत्साहित व्यक्‍तीला समजावे म्हणून वडील विचारू शकतात: ‘यहोवा कोणाच्या सन्‍निध असतो? तुम्हालाही कधीकधी “भग्नहृदयी” किंवा ‘अनुतप्त मनाचे’ असल्यासारखे वाटते का? बायबल म्हणते त्याप्रमाणे, यहोवा अशा व्यक्‍तीच्या सन्‍निध असतो, याचा अर्थ तो तुमच्याही जवळ नाही काय?’ अशाप्रकारे कोमलतेने दिलासा दिल्याने खचलेल्या व्यक्‍तीला धीर येऊ शकतो.—यशया ५७:१५.

तर्कशुद्ध युक्‍तिवाद

१३, १४. (अ) आपण ज्याला पाहू शकत नाही अशा देवावर आपला विश्‍वास नाही असे म्हणणाऱ्‍यांसोबत आपण कशाप्रकारे युक्‍तिवाद करू शकतो? (ब) सर्वांची खात्री पटेलच अशी अपेक्षा आपण का करू शकत नाही?

१३ आपल्या सेवाकार्यात आपण अर्थपूर्ण, पटण्याजोगा युक्‍तिवाद करून लोकांच्या मनापर्यंत पोचू इच्छितो. (प्रेषितांची कृत्ये १९:८; २८:२३, २४) याचा अर्थ, इतरांना देवाच्या वचनातील सत्याविषयी पटवून सांगण्याकरता गुंतागुंतीचे तर्कवितर्क करायला आपण शिकले पाहिजे का? मुळीच नाही. अर्थपूर्ण युक्‍तिवाद क्लिष्ट असावा असे नाही. साध्या पद्धतीने मांडलेले तर्कशुद्ध वाद सहसा सर्वात परिणामकारक असतात. एक उदाहरण लक्षात घ्या.

१४ एखादी व्यक्‍ती देवाला पाहता येत नाही म्हणून आपला त्याच्यावर विश्‍वास नाही असे म्हणते तेव्हा आपण कसे उत्तर देऊ शकतो? अशा व्यक्‍तीला आपण कारण व परिणामाच्या नैसर्गिक सिद्धान्ताविषयी सांगू शकतो. विशिष्ट परिणाम आपण पाहतो तेव्हा त्या गोष्टीला काहीतरी कारण असले पाहिजे हे आपण मान्य करतो. आपण असे म्हणू शकतो: ‘एखाद्या निर्मनुष्य प्रदेशातून भटकताना तुम्हाला एक उत्तमरित्या बांधलेले घर, आणि त्यात अन्‍नधान्य इत्यादी मुबलक प्रमाणात साठवलेले (परिणाम) आढळल्यास, तुम्ही सहज हे मान्य कराल की कोणी न कोणी (कारण) निश्‍चितच हे घर बांधले आणि त्यात आवश्‍यक वस्तूंचा साठा ठेवला. तसेच निसर्गातील उत्तम रचना आणि पृथ्वीतील ‘कोठारांत’ मुबलक अन्‍नधान्य असल्याचे (परिणाम) पाहतो तेव्हा या सर्व गोष्टींना निश्‍चितच कोणी न कोणी (कारण) जबाबदार असेल हे मान्य करणे तर्कशुद्ध वाटत नाही का?’ बायबलमध्ये याविषयी हे सरळसोट विधान आढळते: “प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते; पण सर्व काही बांधणारा देवच आहे.” (इब्री लोकांस ३:४) पण कितीही पटण्याजोगा युक्‍तिवाद केला तरीसुद्धा सर्वांची खात्री पटेलच असे नाही. बायबल आपल्याला आठवण करून देते की केवळ ज्यांची “योग्य मनोवृत्ती” आहे तेच सत्य स्वीकारतील.—प्रेषितांची कृत्ये १३:४८, NW; २ थेस्सलनीकाकर ३:२.

१५. यहोवाच्या गुणांवर व त्याच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकण्यासाठी आपण कशाप्रकारचा युक्‍तिवाद करू शकतो आणि हे कसे करता येईल हे कोणत्या दोन उदाहरणांवरून स्पष्ट होते?

१५ सेवाकार्यात शिकवताना असो वा मंडळीत, आपण तर्कशुद्ध युक्‍तिवादाच्या साहाय्याने यहोवाच्या गुणांवर व त्याच्या कार्य करण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकू शकतो. खासकरून, ‘अमुक इतके तर तमुक किती’ या धर्तीवर येशूने काहीप्रसंगी केला त्याप्रमाणे युक्‍तिवाद करणे अतिशय परिणामकारक ठरेल. (लूक ११:१३; १२:२४) दोन गोष्टींतील विरोध दाखवणारा या प्रकारचा युक्‍तिवाद, ऐकणाऱ्‍याच्या मनावर अमिट छाप पाडू शकतो. नरकाग्नीचा सिद्धान्त किती अर्थशून्य आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण असे म्हणू शकतो: ‘कोणताही प्रेमळ वडील आपल्या मुलाचा हात विस्तवावर धरून त्याला त्याच्या चुकीबद्दल शिक्षा करणार नाही. मग नरकाग्नीची कल्पना देखील आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याला किती घृणास्पद वाटत असेल!’ (यिर्मया ७:३१) यहोवाला त्याच्या सेवकांपैकी प्रत्येकाची काळजी आहे हे शिकवण्याकरता आपण असे म्हणू शकतो: ‘जर यहोवाला अब्जावधी ताऱ्‍यांपैकी प्रत्येकाचे नाव माहीत आहे, तर मग मानव जे त्याच्यावर प्रेम करतात आणि ज्यांना त्याच्या पुत्राच्या बहुमोल रक्‍ताने विकत घेण्यात आले त्यांच्याबद्दल त्याला किती काळजी वाटत असेल!’ (यशया ४०:२६; प्रेषितांची कृत्ये २०:२८) अशा पटण्याजोग्या युक्‍तिवादामुळे आपण इतरांच्या हृदयापर्यंत पोचू शकतो.

समर्पक दाखले

१६. शिकवताना दाखल्यांचा वापर करणे लाभदायक का आहे?

१६ परिणामकारक दाखले आपण शिकवत असलेल्या साहित्याला इतरांकरता अधिक रुचकर बनवू शकतात. शिकवताना दाखले देणे लाभदायक का आहे? एका शिक्षकाने म्हटले: “अमूर्त कल्पनांविषयी विचार करणे सर्वात कठीण काम आहे.” दाखले मात्र आपल्या मनात अर्थपूर्ण चित्रे उभी करतात आणि अशारितीने नवीन कल्पना पूर्णपणे समजून घ्यायला आपल्याला मदत करतात. दाखले वापरण्याच्या बाबतीत येशू अतिशय उल्लेखनीय होता. (मार्क ४:३३, ३४) या शिक्षण तंत्राचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो यावर विचार करू या.

१७. कोणत्या चार गोष्टींमुळे दाखला परिणामकारक ठरतो?

१७ दाखला परिणामकारक केव्हा ठरतो? सर्वप्रथम, तो आपल्या श्रोत्यांकरता योग्य असला पाहिजे, अर्थात ऐकणाऱ्‍यांना चटकन समजू शकेल अशा परिस्थितीवरून तो घेतलेला असावा. येशूने दिलेले अनेक दाखले त्याच्या ऐकणाऱ्‍यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित गोष्टींवर आधारित होते हे आपल्याला आठवते. दुसरी गोष्ट म्हणजे, जो मुद्दा स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याच्याशी तो दाखला पुरेसा मिळताजुळता असला पाहिजे. तुलना खूपच ओढून ताणून केलेली असेल तर मुद्दा स्पष्ट होण्याऐवजी ऐकणाऱ्‍यांचे लक्ष भलतीकडेच जाईल. तिसरी गोष्ट, दाखल्यात अनावश्‍यक तपशील देऊन तो अस्पष्ट करण्याची गरज नाही. तुम्हाला आठवत असेल, येशूने आवश्‍यक माहिती दिली पण अनावश्‍यक गोष्टी त्याने सांगितल्या नाहीत. चवथी गोष्ट अशी की दाखला देताना त्याचा अर्थ स्पष्ट करण्यास विसरू नये. नाहीतर काहीजणांना मुद्दा कळणार नाही.

१८. समर्पक दाखले आपल्याला कसे सापडतील?

१८ समर्पक दाखले आपल्याला कोठून मिळतील? यासाठी लांबलचक, पाल्हाळीक गोष्ट बनवण्याची गरज नाही. संक्षिप्त दाखले अतिशय परिणामकारक ठरू शकतात. फक्‍त, ज्या मुद्द्‌याची चर्चा केली जात आहे त्याच्याशी संबंधित उदाहरणांचा विचार करा. उदाहरणार्थ, आपण देवाच्या क्षमाशीलतेविषयी चर्चा करत आहोत असे समजा. आपल्याला प्रेषितांची कृत्ये ३:१९ येथे सांगितल्याप्रमाणे यहोवा कशाप्रकारे आपल्या चुका ‘पुसून टाकतो’ हे स्पष्ट करायचे आहे. या शब्दप्रयोगातच खरे तर तो अर्थ अभिप्रेत आहे, पण एखाद्या वस्तूचे उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करता येईल का—जसे खोडरबर? किंवा स्पंज? आपण म्हणू शकतो: ‘यहोवा आपली पापे क्षमा करतो तेव्हा जणू तो एखाद्या स्पंजने (किंवा खोडरबर घेऊन) ती पुसून टाकतो.’ अशा साध्या उदाहरणातून ज्याला मुद्दा कळणार नाही असा विरळाच असेल.

१९, २०. (अ) उत्तम दाखले आपल्याला कोठे सापडतील? (ब) आपल्या साहित्यात प्रकाशित करण्यात आलेल्या परिणामकारक दाखल्यांची काही उदाहरणे द्या. (पेटी पाहा.)

१९ समर्पक दाखले, तसेच जीवनातले खरे अनुभव तुम्हाला कोठे मिळतील? स्वतःच्या जीवनातील अनुभवांतून तसेच सहविश्‍वासू बांधवांच्या निरनिराळ्या अनुभवांतून तुम्ही हे निवडू शकता. इतरही अनेक गोष्टींवरून, जसे की सजीव व निर्जीव वस्तू, गृहोपयोगी वस्तू, किंवा अलीकडेच घडलेली आणि परिसरातल्या लोकांना माहीत असलेली घटना यांवरून दाखले घेतले जाऊ शकतात. उत्तम दाखले शोधण्याचा चांगला मार्ग म्हणजे दररोज आपल्या अवतीभवती असलेल्या गोष्टींकडे लक्षपूर्वक ‘पाहणे.’ (प्रेषितांची कृत्ये १७:२२, २३) जाहीर वक्‍तृत्वावरील एका संदर्भ ग्रंथात असा खुलासा करण्यात आला आहे: “जो मानवी जीवन आणि त्यात चालणाऱ्‍या निरनिराळ्या उद्योगांवर लक्ष ठेवतो, जो सर्व प्रकारच्या माणसांशी बोलतो, जो प्रत्येक गोष्टीचे जवळून निरीक्षण करतो आणि कोणतीही गोष्ट नीट समजत नाही तोपर्यंत प्रश्‍न विचारतो असा वक्‍ता आपल्या ज्ञानभंडारात भरपूर साहित्य साठवतो आणि आवश्‍यकता पडते तेव्हा ते अवश्‍य कामी पडेल.”

२० भरपूर परिणामकारक दाखले सापडण्याचे आणखी एक ठिकाण म्हणजे—टेहळणी बुरूज, सावध राहा! आणि यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेली अन्य साहित्ये. या प्रकाशनांत दाखल्यांचा कशाप्रकारे उपयोग करण्यात आला आहे याकडे लक्ष दिल्यास तुम्हाला बरेच काही शिकायला मिळेल. * उदाहरणार्थ ज्ञान पुस्तकातील १७ व्या अध्यायातील ११ व्या परिच्छेदात वापरलेल्या दाखल्याचे उदाहरण घ्या. यात मंडळीतल्या वेगवेगळ्या व्यक्‍तिमत्त्वांची तुलना रस्त्यावर एकाच वेळी चालणाऱ्‍या निरनिराळ्या वाहनांशी करण्यात आली आहे. हा दाखला परिणामकारक का आहे? एकतर, तो दैनंदिन जीवनावर आधारित आहे, चर्चेतील मुद्द्‌याशी तो जवळून संबंधित आहे आणि त्याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. अशाप्रकारचे, प्रकाशनांत आलेले दाखले आपण शिकवताना उपयोगात आणू शकतो; गरज पडल्यास, बायबल विद्यार्थ्याच्या गरजांनुसार किंवा एखाद्या भाषणात वापरण्याकरता आपण त्यात आवश्‍यक फेरबदलही करू शकतो.

२१. देवाच्या वचनाचे परिणामकारक शिक्षक असल्यामुळे कोणती प्रतिफळे मिळतात?

२१ परिणामकारक शिक्षक असण्याची प्रतिफळे अनेकविध आहेत. आपण इतरांना शिकवतो तेव्हा त्यांना आपल्याजवळचे काहीतरी देत असतो, त्यांना मदत करण्यासाठी आपल्यातला काही भाग त्यांना देत असतो. अशाप्रकारे इतरांना दिल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो, कारण बायबल म्हणते: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) देवाच्या वचनाच्या शिक्षकांकरता हा आनंद हे जाणण्याचा आहे की आपण कोणालातरी खरोखरच्या आणि कायमच्या लाभाचे काहीतरी देत आहेत—यहोवाबद्दलचे सत्य. तसेच आपण थोर शिक्षक येशू ख्रिस्त याचे अनुकरण करत आहोत याचेही समाधान अनुभवू शकतो.

[तळटीपा]

^ परि. 6 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

^ परि. 9 “क्षेत्र सेवेत वापरण्यासाठी प्रस्तावना” या शीर्षकाखाली पृष्ठे २-७ पाहा.—यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित.

^ परि. 20 उदाहरणे शोधण्याकरता टेहळणी बुरूज प्रकाशन सूची १९८६-२००० (इंग्रजी), यात “दाखले” या शीर्षकाखाली पाहा.—यहोवाच्या साक्षीदारांद्वारे अनेक भाषांत प्रकाशित.

तुम्हाला आठवते का?

• गृह बायबल अभ्यास चालवताना आणि मंडळीत भाषणे देताना आपण साधेपणाने कसे शिकवू शकतो?

• घरोघर प्रचार करताना आपण प्रश्‍नांचा परिणामकारकरित्या कसा उपयोग करू शकतो?

• यहोवाच्या गुणांवर व कार्य करण्याच्या पद्धतीवर प्रकाश टाकण्यासाठी आपण तर्कशुद्ध युक्‍तिवादाचा कसा उपयोग करू शकतो?

• समर्पक दाखले आपल्याला कोठे सापडतील?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[२३ पानांवरील चौकट/चित्र]

हे दाखले तुम्हाला आठवतात का?

खालील उदाहरणे केवळ काही परिणामकारक दाखल्यांची आहेत. सोबत दिलेला संदर्भ उघडून या विशिष्ट दाखल्यातून कोणता मुद्दा स्पष्ट करण्यात आला आहे हे पाहण्यास तुम्हाला आवडेल का?

• उडत्या झुल्यावर कसरती करणाऱ्‍या किंवा बर्फावर स्केटिंग करणाऱ्‍या कसरतपटूंप्रमाणे उत्तम वैवाहिक संबंध कायम करू इच्छिणाऱ्‍यांचे प्रयत्न एक चांगला जोडीदार असल्याशिवाय यशस्वी होऊ शकत नाहीत.—टेहळणी बुरूज, मे १५, २००१, पृष्ठ १६.

• भावना व्यक्‍त करणे काहीसे चेंडू फेकण्यासारखे आहे. तुम्ही तो हळूवारपणे फेकू शकता किंवा कोणाला दुखापत होईल इतक्या जोराने फेकू शकता.—सावध राहा!, एप्रिल-जुलै २००१, पृष्ठ १०.

• प्रेम व्यक्‍त करायला शिकणे एक नवी भाषा शिकण्यासारखे आहे.—टेहळणी बुरूज, फेब्रुवारी १५, १९९९, पृष्ठे १८, २२-३.

• शिकाऱ्‍याकरता एखादे आमिष जसे काम करते तसेच भूतविद्या दुरात्म्यांकरता काम करते: ती भक्ष्याला आकर्षित करते.—सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान, पृष्ठ १११.

• जशी वीज ज्या उपकरणाला शक्‍ती देते त्याचे गुणधर्म धारण करीत नाही; तसेच जीवनी शक्‍तीला देखील, ती सचेतन करणाऱ्‍या कोणत्याही प्राण्यांचे गुणधर्म नसतात.—सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान, पृष्ठ ८२.

• डोंगरावरील एखाद्या दीपगृहाप्रमाणे देवाचे नियम स्थिर आणि अविचल आहेत.—टेहळणी बुरूज, एप्रिल १, २००२, पृष्ठ २५.

• शस्त्रक्रियेनंतर, जखमेवरील टाके जरी शरीरासोबत संयोग होणारे नसले तरी ते काही काळाकरता विशिष्ट हेतू साध्य करतात. त्यांना वेळेआधी काढून टाकणे धोकादायक ठरू शकेल. याचप्रमाणे मानवी सरकारी अधिकारी देवाच्या मूळ उद्देशाचा भाग नव्हते. तथापि, ही मानवी सरकारे समाजाला एकत्र बांधून ठेवतात. त्यांना विरोध करणे जखमेवरील टाके वेळेआधीच काढून टाकण्यासारखे ठरेल.—सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान, पृष्ठ १३३.

[२० पानांवरील चित्रे]

खरे ख्रिस्ती देवाच्या वचनाचे शिक्षक आहेत

[२१ पानांवरील चित्र]

वडील सहविश्‍वासू बांधवाना देवाच्या वचनातून सांत्वन मिळवण्याकरता मदत करण्यासाठी प्रश्‍नांचा उपयोग करू शकतात