व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही”

“दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही”

“दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही”

“ह्‍या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही.”—मत्तय १३:३४.

१, २. (अ) परिणामकारक उदाहरणांचा सहजासहजी विसर का पडत नाही? (ब) येशूने कशाप्रकारच्या उदाहरणांचा वापर केला आणि त्याने वापरलेल्या उदाहरणांसंबंधी कोणते प्रश्‍न उद्‌भवतात? (तळटीपही पाहा.)

तुम्हाला अनेक वर्षांपूर्वी एखाद्या जाहीर भाषणात देण्यात आलेले एखादे उदाहरण आठवते का? परिणामकारक उदाहरणांचा सहजासहजी विसर पडत नाही. एका लेखकाने म्हटल्याप्रमाणे उदाहरणे दिली जातात तेव्हा “कानांचे रूपांतर जणू डोळ्यांत होते आणि श्रोते अगदी मुक्‍तपणे डोळ्यापुढे चित्र उभे करून विचार करू लागतात.” सहसा चित्रांच्या रूपात एखाद्या गोष्टीविषयी विचार केल्यास ती आपल्याला लगेच समजते, त्यामुळे उदाहरणांच्या साहाय्याने एखादी संकल्पना समजून घेणे आपल्याला सोपे जाते. उदाहरणे निर्जीव शब्दांत जणू जीव ओततात आणि त्यांच्या साहाय्याने शिकवलेले धडे आपल्या स्मृती पटलावर कायमचे कोरले जातात.

येशू ख्रिस्ताने दाखल्यांचा जितक्या निपुणतेने वापर केला तितका आजपर्यंत कोणत्याही शिक्षकाने केला नाही. येशूने दिलेले अनेक दाखले आज दोन हजार वर्षे होऊन गेल्यावरही अगदी सहज आठवतात. * या विशिष्ट शिक्षण तंत्राचा येशूने इतका सर्रास वापर का केला? आणि त्याने दिलेले दाखले इतके परिणामकारक का होते?

येशूने दाखल्यांच्या साहाय्याने का शिकवले

३. (अ) मत्तय १३:३४, ३५ यात सांगितल्यानुसार येशूने दाखले देण्यामागचे एक कारण कोणते आहे? (ब) यहोवा या शिक्षण तंत्राला बहुमोल जाणतो हे कशावरून सूचित होते?

येशूने दाखल्यांचा वापर का केला याची दोन उल्लेखनीय कारणे बायबलमध्ये सापडतात. पहिले म्हणजे असे करण्याद्वारे त्याने भविष्यवाणीची पूर्तता केली. प्रेषित मत्तयने लिहिले: “ह्‍या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्यावाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही; ह्‍यासाठी की, संदेष्ट्यांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे; ते असे की, ‘मी आपले तोंड उघडून दाखले देईन.’” (मत्तय १३:३४, ३५) मत्तयने ज्या ‘संदेष्ट्याचे’ शब्द उद्धृत केले तो स्तोत्र ७८:२ चा लेखक होय. या स्तोत्रकर्त्याने देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने येशूच्या जन्माच्या कितीतरी शतकांआधी हे शब्द लिहिले. आपला पुत्र दाखल्यांच्या साहाय्याने शिकवील हे यहोवाने शेकडो वर्षांआधीच निश्‍चित करावे हे खरोखर आश्‍चर्यकारक नाही का? निश्‍चितच यहोवा या शिक्षण तंत्राला बहुमोल लेखतो!

४. येशूने आपण दाखल्यांचा का उपयोग करतो हे कसे समजावून सांगितले?

दुसरे म्हणजे येशूने स्वतःच स्पष्ट केले की त्याचा संदेश ग्रहण न करू इच्छिणाऱ्‍यांना इतरांपासून वेगळे करण्यासाठी तो दाखल्यांचा उपयोग करत असे. ‘लोकांच्या थव्यांना’ बी पेरणाऱ्‍याचा दाखला दिल्यावर त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले: “आपण त्यांच्याबरोबर दाखल्यांनी का बोलता?” येशूने उत्तर दिले: “स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. ह्‍यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत, आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतहि नाही. यशयाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की, ‘तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हाला समजणारच नाही व पहाल तर खरे परंतु तुम्हाला दिसणारच नाही; कारण ह्‍या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे.’”—मत्तय १३:२, १०, ११, १३-१५; यशया ६:९, १०.

५. येशूच्या दाखल्यांनी नम्र लोकांना गर्विष्ठांपासून कसे वेगळे केले?

येशूच्या दाखल्यांत असे काय होते ज्याने लोकांना एकमेकांपासून वेगळे केले? कधीकधी त्याच्या बोलण्याचा पूर्ण अर्थ अधिक खोलवर शिरल्याशिवाय समजून घेणे शक्य नव्हते. नम्र अंतःकरणाच्या व्यक्‍ती आपोआपच त्याला अधिक माहिती देण्याची विनंती करण्यास प्रवृत्त होत. (मत्तय १३:३६; मार्क ४:३४) अशारितीने सत्याच्या भुकेल्या लोकांना येशूच्या दाखल्यांतून सत्य कळून यायचे पण त्याच वेळेस गर्विष्ठ अंतःकरणाच्या लोकांवर ते प्रकट केले जात नसे. येशू खरोखर किती उत्कृष्ट शिक्षक होता! आता आपण अशा काही कारणांचे परीक्षण करू ज्यामुळे त्याचे दाखले परिणामकारक ठरले.

निवडक तपशीलांचा उपयोग

६-८. (अ) येशूच्या पहिल्या शतकातील श्रोत्यांना कोणती सोय उपलब्ध नव्हती? (ब) येशू तपशील पुरवण्याच्या बाबतीत निवडक होता हे कोणत्या उदाहरणांवरून दिसून येते?

प्रत्यक्ष येशूकडून ज्यांना शिकायला मिळाले त्या पहिल्या शतकातील शिष्यांचा अनुभव कसा असावा याचा तुम्ही कधी विचार केला का? येशूचा आवाज ऐकण्याची अपूर्व संधी त्यांना मिळाली असली तरीसुद्धा, त्याने बोललेल्या गोष्टींची पुन्हा आठवण करून देणारा लिखित अहवाल त्यांच्याजवळ अद्याप नव्हता. त्यामुळे येशूचे शब्द त्यांना आपल्या मनात व हृदयात जपून ठेवणे भाग होते. दाखल्यांचा प्रविणतेने वापर करण्याद्वारे येशूने त्यांच्यासाठी हे काम सोपे केले. कशाप्रकारे?

तपशील देण्याच्या बाबतीत येशू निवडक होता. एखाद्या गोष्टीला विशिष्ट तपशील समर्पक असेल आणि जोर देण्याकरता आवश्‍यक असतील तर तो येशू अवश्‍य पुरवायचा. म्हणूनच, एका हरवलेल्या मेंढराला शोधायला मेंढपाळ गेला तेव्हा मागे नेमकी किती मेंढरे राहिली होती तसेच मजूरांनी द्राक्षमळ्यात किती तास काम केले, दासांना धन्याने किती रुपये दिले इत्यादी माहिती त्याने अचूक पुरवली.—मत्तय १८:१२-१४; २०:१-१६; २५:१४-३०.

त्याच वेळेस, दाखल्यांचा अर्थ समजून घेण्यात बाधा ठरू शकतील अशा अनावश्‍यक बारीकसारिक गोष्टी सांगण्याचे येशूने टाळले. उदाहरणार्थ, क्षमा करायला तयार नसलेल्या दासाच्या दाखल्यात या दासाने लक्षावधी रुपयांचे (६,००,००,००० दिनार) कर्ज कसे साठवले याविषयी काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. येशू या ठिकाणी क्षमाशील असण्याच्या महत्त्वावर जोर देत होता. त्यामुळे हा दास कर्जात कसा बुडाला हे सांगणे महत्त्वाचे नव्हते, तर त्याला कशाप्रकारे ते माफ करण्यात आले पण आपल्याकडून तुलनेत कमी पैशाचे कर्ज घेऊन ते परत न केलेल्या दुसऱ्‍या एका दासाशी तो कसा वागला हे सांगणे अधिक महत्त्वाचे होते. (मत्तय १८:२३-३५) त्याचप्रकारे, उधळ्या पुत्राच्या दाखल्यात, धाकट्या मुलाने अचानक मालमत्तेतला आपला हिस्सा का मागितला आणि तो का उधळून टाकला याविषयी येशूने काहीही स्पष्टीकरण दिले नाही. पण मुलाचे मन बदलले आणि तो घरी परतला तेव्हा त्याच्या पित्याला कसे वाटले आणि त्याने काय केले याविषयी मात्र येशूने सविस्तर वर्णन केले. पित्याच्या प्रतिक्रियेविषयी हे तपशीलवार वर्णन आवश्‍यक होते कारण या दाखल्यातून, यहोवा कसा “भरपूर क्षमा” करतो हे येशू सांगू इच्छित होता.—यशया ५५:७; लूक १५:११-३२.

९, १०. (अ) आपल्या दाखल्यांतील पात्रांचे चित्रण करताना येशूने कशावर लक्ष केंद्रित केले? (ब) आपल्या श्रोत्यांना व इतरांना आपण सांगितलेले दाखले आठवणीत ठेवणे सोपे जावे म्हणून येशूने काय केले?

दृष्टान्तांतील पात्रांचे चित्रण करतानाही येशूने दक्षता बाळगली. पात्रांच्या बाह्‍य स्वरूपाचे लांबलचक वर्णन करण्याऐवजी येशूने सहसा त्यांनी काय केले किंवा त्याने सांगितलेल्या घटनेप्रती त्यांची काय प्रतिक्रिया होती यावर लक्ष केंद्रित केले. म्हणूनच, चांगला शोमरोनी कसा दिसत होता याचे वर्णन करण्याऐवजी येशूने अधिक महत्त्वाची गोष्ट सांगितली—की तो कशाप्रकारे रस्त्यावर घायाळ होऊन पडलेल्या यहुदी माणसाच्या मदतीला धावून आला. शेजाऱ्‍यांचे प्रेम हे आपल्या जाती किंवा राष्ट्राच्या लोकांच्या पलीकडे गेले पाहिजे हा धडा शिकवण्याकरता आवश्‍यक असलेली माहिती येशूने पुरवली.—लूक १०:२९, ३३-३७.

१० अशाप्रकारे विचारपूर्वक तपशील पुरवल्यामुळे येशूचे दाखले संक्षिप्त आणि सुस्पष्ट असायचे. त्यामुळे त्याच्या पहिल्या शतकातील श्रोत्यांना आणि नंतर ज्यांनी प्रेरित शुभवर्तमान वाचले अशा असंख्य लोकांना ते दाखले व त्यांतून शिकायला मिळणारे धडे आठवणीत ठेवणे सोपे गेले.

दररोजच्या जीवनातून घेतले

११. येशूने गालीलात लहानपणी निरीक्षण केलेल्या गोष्टी त्याच्या दृष्टान्तांतून कशाप्रकारे डोकावतात याची उदाहरणे द्या.

११ लोकांच्या जीवनाशी जुळलेले दाखले वापरण्याच्या बाबतीत येशूच्या तोडीचा कोणीही नाही. त्याने दिलेले बरेच दृष्टान्त, साहजिकच गालीलात लहानाचा मोठा होताना त्याने पाहिलेल्या विविध गोष्टींवर आधारित होते. त्याच्या लहानपणच्या काळाचा विचार करा. त्याने कित्येकदा आपल्या आईला, भाकऱ्‍या करताना आधीच्या पीठातून राखून ठेवलेले थोडेसे आंबलेले पीठ खमीर म्हणून वापरताना पाहिले असेल? (मत्तय १३:३३) गालील समुद्राच्या निळ्याशार पाण्यात जाळे टाकताना कितीदा त्याने मासेमारांना पाहिले असेल? (मत्तय १३:४७) कितीदा त्याने मुलांना बाजारात खेळताना पाहिले असेल? (मत्तय ११:१६) इतरही अनेक सर्वसामान्य गोष्टींचे येशूने निरीक्षण केले आणि या गोष्टी त्याच्या दाखल्यांत त्याने उपयोगात आणल्या—बी पेरणे, लग्न समारंभांसारखे आनंदाचे प्रसंग, आणि उन्हात पिकणारे शेतातील धान्य.—मत्तय १३:३-८; २५:१-१२; मार्क ४:२६-२९.

१२, १३. स्थानिक परिस्थितीशी येशू परिचित होता हे गहू व निदणाच्या दाखल्यावरून कशाप्रकारे दिसून येते?

१२ साहजिकच, येशूच्या अनेक दृष्टान्तांत दररोजच्या जीवनातील परिस्थिती व प्रसंगांचे चित्रण केलेले आढळते. या शिक्षण तंत्राचा उपयोग करण्याचे त्याचे नैपुण्य नीट समजून घेण्याकरता त्याचे शब्द त्याच्या यहुदी श्रोत्यांकरता कितपत अर्थपूर्ण होते याचा विचार केला पाहिजे. दोन उदाहरणे पाहू या.

१३ पहिला गहू व निदणाचा दाखला. येशूने एका मनुष्याविषयी सांगितले ज्याने आपल्या शेतात चांगले बी पेरले पण “त्याचा वैरी” येऊन गव्हामध्ये निदण पेरून गेला. येशूने अशा वैरभावाच्या कृत्याचे उदाहरण का निवडले? हा दाखला त्याने गालील समुद्राच्या जवळ असताना सांगितला हे ध्यानात ठेवा. या परिसरात, शेती हाच गालील लोकांचा प्रमुख उद्योग होता. शेतकऱ्‍यासाठी, वैऱ्‍याने गुपचूप येऊन शेतात निदण पेरण्यापेक्षा अधिक नुकसान कशामुळे होऊ शकत होते? त्या काळातील कायद्यांचा अभ्यास केल्यास असल्या घटना घडत होत्या असे आढळते. ऐकणाऱ्‍यांना समजू शकेल अशाच परिस्थितीचा येशूने वापर केला हे स्पष्टच नाही का?—मत्तय १३:१, २, २४-३०.

१४. चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्यात, येशूने आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ‘यरूशलेमेहून यरीहोस’ जाणाऱ्‍या रस्त्याचा उल्लेख केला हे वैशिष्ठ्यपूर्ण का आहे?

१४ दुसरा दाखला चांगल्या शोमरोन्याचा. येशूने या दाखल्याची अशी सुरवात केली: “एक मनुष्य यरूशलेमेहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला; त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारहि दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले.” (लूक १०:३०) विशेष म्हणजे येशूने आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ‘यरुशलेमेहून यरीहोस’ जाणाऱ्‍या रस्त्याचा उल्लेख केला. हा दाखला देताना तो यहुदियात होता; हा प्रदेश यरूशलेमहून फार दूर नव्हता, त्यामुळे त्याच्या श्रोत्यांना हा रस्ता माहीत असावा. हा विशिष्ट रस्ता खासकरून एकटे प्रवास करताना अतिशय धोक्याचा म्हणून कुप्रसिद्ध होता. त्यावर अनेक निर्मनुष्य वळणे आणि लुटारूंना लपण्यासाठी अनेक मोक्याची स्थाने होती.

१५. चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्यातील याजक व लेव्याने त्याच्याकडे केलेल्या दुर्लक्षाविषयी कोणीही रास्त सबब का देऊ शकत नव्हता?

१५ येशूने “यरूशलेमेहून खाली यरीहोस” जाणाऱ्‍या रस्त्याविषयी सांगितले, यात आणखी एक उल्लेखनीय गोष्ट आहे. दाखल्यात, आधी एक याजक आणि मग एक लेवी या रस्त्यावरून प्रवास करत असतात—पण दोघेही त्या शोमरोन्याला मदत करण्यासाठी थांबत नाहीत. (लूक १०:३१, ३२) याजक यरूशलेम येथील मंदिरात सेवा करायचे आणि लेवी त्यांना मदत करायचे. बरेच याजक व लेवी मंदिरात सेवेचा काळ संपल्यावर यरीहोत राहायचे कारण यरीहो यरूशलेमपासून केवळ २३ किलोमीटरच्या अंतरावर होते. त्यामुळे साहजिकच त्यांना या रस्त्यावरून प्रवास करावा लागत असे. दाखल्यातील याजक व लेवी हे “यरूशलेमेहून” जाणाऱ्‍या रस्त्यावर प्रवास करत होते, याचा अर्थ ते मंदिराच्या विरूद्ध दिशेला जात होते. * त्याअर्थी, त्यांनी शोमरोन्याकडे केलेल्या दुर्लक्षाविषयी कोणीही असे म्हणून सबब देऊ शकत नव्हता, की ‘तो घायाळ माणूस मेला आहे असे वाटत असल्यामुळे त्यांनी त्याला स्पर्श करण्याचे टाळले असावे कारण मृतदेहाला स्पर्श केल्यास ते मंदिरात सेवा करण्यास काही काळापर्यंत अशुद्ध ठरले असते.’ (लेवीय २१:१; गणना १९:११, १६) येशूच्या दाखल्यांत लोकांच्या ओळखीच्या गोष्टींचा समावेश होता हे यावरून स्पष्ट होत नाही का?

सृष्टीवरून प्रेरित

१६. येशूला सृष्टीच्या बारीकसारीक गोष्टींविषयी ज्ञान होते हे आश्‍चर्याचे का नाही?

१६ येशूच्या अनेक दृष्टान्तात व दाखल्यांत, त्याला वनस्पती, पशूपक्षी आणि नैसर्गिक तत्त्वांविषयी असलेले ज्ञान प्रकट होते. (मत्तय ६:२६, २८-३०; १६:२, ३) त्याला हे ज्ञान कोठून मिळाले? गालीलात लहानपणी त्याला निश्‍चितच यहोवाच्या सृष्टीचे निरीक्षण करण्याची अनेक वेळा संधी मिळाली असावी. त्याहीपेक्षा, येशू हा “सर्व उत्पतीत ज्येष्ठ” आहे आणि यहोवाने सर्व गोष्टी निर्माण करताना एक “कुशल कारागीर” म्हणून त्याचा उपयोग केला. (कलस्सैकर १:१५, १६; नीतिसूत्रे ८:३०, ३१) तेव्हा, सृष्टीच्या बारीकसारीक गोष्टींविषयीही येशूला ज्ञान होते यात आश्‍चर्य ते काय? लोकांना शिकवताना त्याने या ज्ञानाचा कसा निपुणतेने उपयोग केला याविषयी आता पाहू या.

१७, १८. (अ) योहान १० व्या अध्यायातील येशूच्या शब्दांवरून त्याला मेंढरांच्या सवयींचे ज्ञान होते हे कसे दिसून येते? (ब) बायबल प्रदेशांना भेट देणाऱ्‍यांनी मेंढपाळ व त्यांच्या मेंढरांमध्ये असलेल्या खास नात्यासंबंधी काय निरीक्षण केले आहे?

१७ येशूचा सर्वात संवेदनशील असा दृष्टान्त आपल्याला योहानाच्या शुभवर्तमानातील १० व्या अध्यायात वाचायला मिळतो. यात तो आपल्या शिष्यांसोबत असलेल्या जवळच्या नात्याची तुलना मेंढपाळ व त्याच्या मेंढरांशी करतो. येशूच्या शब्दांवरून दिसून येते की त्याला पाळीव मेंढरांच्या सवयींविषयी चांगली माहिती होती. मेंढरे सहसा तुम्ही न्याल तेथे जातात आणि विश्‍वासूपणे आपल्या मेंढपाळाच्या मागोमाग चालतात असे येशूच्या शब्दांवरून सूचित होते. (योहान १०:२-४) बायबल प्रदेशांना भेट देणारे सहसा मेंढपाळ व मेंढरांमध्ये असलेल्या वैशिष्ठ्यपूर्ण नातेसंबंधाचे निरीक्षण करतात. १९ व्या शतकात निसर्गतज्ज्ञ एच. बी. ट्रिस्ट्रॅम यांनी असे सांगितले: “एकदा मी एका मेंढपाळाला त्याच्या मेंढरांसोबत खेळताना पाहिले. तो उगाच त्यांच्यापासून पळून जाण्याचे ढोंग करायचा; पण ती मेंढरे त्याचा पाठलाग करून त्याच्या भोवती गराडा घालायची. . . . शेवटी पूर्ण कळप त्याच्या भोवती आला व सगळी मेंढरे त्याच्या भोवती उड्या मारू लागली.”

१८ मेंढरे मेंढपाळाच्या मागे का चालतात? येशू उत्तर देतो, “कारण ती त्याची वाणी ओळखतात.” (योहान १०:४) मेंढरे खरोखरच आपल्या मेंढपाळाचा आवाज ओळखतात का? स्वतः निरीक्षण केल्यावर जॉर्ज ए. स्मिथ यांनी पवित्र भूमीचा ऐतिहासिक भूप्रदेश (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात असे लिहिले: “कधीकधी आम्ही यहुदीयातील वैशिष्ठ्यपूर्ण विहिरींजवळ दुपारी थोडी डुलकी घ्यायला यायचो. येथे तीन चार मेंढपाळ आपल्या कळपांना घेऊन यायचे. सर्व कळपांतील मेंढरे एकमेकांत मिसळायची तेव्हा आम्ही विचार करायचो की प्रत्येक मेंढपाळ आपल्या मेंढरांना कसा बरे वेगळा करेल? पण पाणी पिणे आणि खेळणे उरकले की मेंढपाळ एक एक करून खोऱ्‍यात वेगवेगळ्या दिशेने चालू लागायचे आणि प्रत्येकजण आपल्या खास पद्धतीने मेंढरांना हाक मारायचा. प्रत्येक मेंढपाळाची मेंढरे आपोआप त्या मोठ्या कळपातून वेगळी होऊन आपापल्या मेंढपाळामागून चालू लागायची आणि सगळे कळप जसे पद्धतशीरपणे आले होते तसेच निघून जायचे.” येशूचा हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग कोणता असू शकत होता? आपण त्याच्या शिकवणुकी मान्य करून त्यांचे पालन केले आणि त्याच्या नेतृत्वाचे अनुसरण केले तर आपण या ‘उत्तम मेंढपाळाच्या’ कोमल व प्रेमळ काळजीचा अनुभव घेऊ शकतो.—योहान १०:११.

ऐकणाऱ्‍यांच्या माहितीतल्या घटनांवरून

१९. एका खोट्या कल्पनेचे खंडन करण्यासाठी येशूने एका स्थानिक दुर्घटनेचा कशाप्रकारे परिणामकारक उपयोग केला?

१९ परिणामकारक दाखल्यांचा आणखी एक प्रकार म्हणजे अनुभव किंवा अशी उदाहरणे ज्यांवरून धडा शिकता येईल. एकदा येशूने अलीकडेच घडलेल्या एका घटनेविषयी सांगून त्या दुःखद घटनेत बळी पडलेले लोक त्या शिक्षेस पात्र होते या लोकांच्या चुकीच्या विचाराचे खंडन केले. त्याने म्हटले: “ज्या अठरा जणांवर शिलोहातील बुरूज पडला आणि ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणाऱ्‍या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी [पापी] होते असे तुम्हांस वाटते काय?” (लूक १३:४) दैववादी विचारसरणीची येशूने कडाडून टीका केली. त्या १८ जणांनी काही पाप केल्यामुळे देवाचा कोप त्यांच्यावर भडकला अशातला भाग नव्हता. उलट त्यांचा दुःखद मृत्यू, समय व प्रसंग यांच्या परिणामस्वरूप घडला. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) अशारितीने त्याने आपल्या श्रोत्यांना चांगल्याप्रकारे माहीत असलेल्या घटनेवरून एका खोट्या शिकवणुकीचे खंडन केले.

२०, २१. (अ) परूशांनी येशूच्या शिष्यांना का दोषी ठरवले? (ब) शब्बाथ नियमाचे अवाजवीपणे काटेकोर पालन केले जावे असा यहोवाचा हेतू नव्हता हे दाखवण्यासाठी येशूने शास्त्रवचनांतील कोणता अहवाल उपयोगात आणला? (क) पुढील लेखात कशाविषयी चर्चा करण्यात येईल?

२० शिकवताना, येशूने शास्त्रवचनातील उदाहरणांचाही उपयोग केला. त्याच्या शिष्यांनी शब्बाथाच्या दिवशी शेतातली कणसे तोडून खाल्ली तेव्हा परूशांनी त्यांना दोषी ठरवले होते तो प्रसंग आठवा. खरे तर शिष्यांनी देवाच्या नियमशास्त्राचे नव्हे तर शब्बाथाच्या दिवशी कोणती कामे नियमबाह्‍य आहेत याविषयी परूशांच्या कर्मठ नियमावलीचे उल्लंघन केले होते. शब्बाथाच्या नियमांचे इतके अवाजवीपणे काटेकोर पालन केले जावे असा देवाचा मुळी उद्देशच नव्हता हे स्पष्ट करण्यासाठी येशूने १ शमुवेल २१:३-६ यातील घटनेचा उल्लेख केला. दावीद व त्याच्या माणसांना भूक लागली तेव्हा त्यांनी दर्शनमंडपाजवळ थांबून परमेश्‍वरासमोर ठेवण्याकरता वापरली जाणारी पवित्र भाकर खालली, जी नुकतीच बदलण्यात आली होती. जुनी भाकर सहसा याजक नंतर खात असत. पण या परिस्थितीत दावीद व त्याच्या माणसांना ती भाकर खाण्याबद्दल दोषी ठरवण्यात आले नाही. उल्लेखनीय गोष्ट अशी की याजक नसलेल्या व्यक्‍तींनी जुनी भाकर खाल्ल्याचा उल्लेख असलेली ही एकमेव घटना आहे. नेमक्या कोणत्या अहवालाचा संदर्भ द्यावा हे येशूला अचूक माहीत होते आणि त्याचे यहुदी श्रोते देखील साहजिकच या अहवालाशी परिचित होते.—मत्तय १२:१-८.

२१ खरोखर येशू एक महान शिक्षक होता! महत्त्वपूर्ण सत्ये, ऐकणाऱ्‍यांच्या अंतःकरणाला भिडतील अशा पद्धतीने मांडण्याचे त्याचे बिनतोड कौशल्य पाहून आपण अचंबित झाल्याशिवाय राहात नाही. पण आपण इतरांना शिकवताना त्याचे अनुकरण कसे करू शकतो? याविषयी पुढील लेखात चर्चा केली जाईल.

[तळटीपा]

^ परि. 2 येशूने दिलेले दाखले अनेक प्रकारचे होते यात उदाहरणे, तुलना, रूपक इत्यादींचा समावेश होता. येशू दृष्टान्त देण्यासाठीही सुप्रसिद्ध आहे; दृष्टान्ताची व्याख्या “एक संक्षिप्त, सहसा काल्पनिक कथा ज्यातून नैतिक अथवा आध्यात्मिक निष्कर्ष काढला जातो” अशी केली आहे.

^ परि. 15 यरूशलेम यरीहोपेक्षा उंचावर वसलेले होते. त्यामुळे दाखल्यात सांगितल्याप्रमाणे ‘यरूशलेमेहून यरीहोस’ जाणारा प्रवासी “खाली” जात होता असे म्हणणे योग्यच होते.

तुम्हाला आठवते का?

• येशू दाखल्यांच्या साहाय्याने का शिकवत होता?

• पहिल्या शतकातील श्रोत्यांना समजू शकतील अशाप्रकारचे दाखले येशूने वापरले हे कोणत्या उदाहरणावरून दिसून येते?

• सृष्टीविषयीच्या ज्ञानाचा येशूने दाखले देताना निपुणतेने उपयोग केला हे कशावरून दिसून येते?

• येशूने ऐकणाऱ्‍यांच्या माहितीतल्या घटनांचा कशाप्रकारे वापर केला?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्रे]

येशूने एका अशा दासाविषयी सांगितले ज्याने तुलनात्मकरित्या थोडेसे कर्ज माफ करण्यास नकार दिला आणि एका अशा पित्याविषयी ज्याने मालमत्तेतील आपला संपूर्ण वाटा उधळणाऱ्‍या पुत्राला क्षमा केली

[१६ पानांवरील चित्र]

चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्यातून येशू काय शिकवण्याचा प्रयत्न करत होता?

[१७ पानांवरील चित्र]

मेंढरे खरोखरच मेंढपाळाचा आवाज ओळखून त्याला प्रतिसाद देतात का?