व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परीक्षांबद्दल आपला काय दृष्टिकोन असावा?

परीक्षांबद्दल आपला काय दृष्टिकोन असावा?

परीक्षांबद्दल आपला काय दृष्टिकोन असावा?

कसोटी, परीक्षा! सर्वांवरच येतात. वेगळे स्वभाव, आर्थिक अडचणी, आजारपण, मोह, चूक करण्यासाठी समवयस्कांकडून येणारे दबाव, छळ, तटस्थता किंवा मूर्तीपूजेविरुद्ध आपण घेतलेल्या भूमिकेमुळे येणारी आव्हाने किंवा इतर अनेक गोष्टींमुळे आपल्यावर परीक्षा येऊ शकतात. परीक्षा कोणत्याही स्वरुपाच्या असोत पण त्यांमुळे आपण चिंताग्रस्त होतोच. तर मग या परीक्षांना आपण यशस्वीरीत्या तोंड कसे देऊ शकतो? आणि या परीक्षांमुळे आपल्याला काही फायदा होतो का?

उत्तम आधार

प्राचीन काळातील राजा दाविदाने संपूर्ण आयुष्यभर परीक्षांचा सामना केला; तरीसुद्धा तो शेवटपर्यंत विश्‍वासू राहिला. कशामुळे तो टिकून राहिला? परीक्षेत टिकून राहण्याची शक्‍ती त्याला कोठून मिळाली ते सांगताना तो म्हणाला: “परमेश्‍वर माझा मेंढपाळ आहे; मला काही उणे पडणार नाही.” पुढे तो म्हणाला: “मृत्युच्छायेच्या दरीतूनहि मी जात असलो तरी कसल्याहि अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आंकडी व तुझी काठी मला धीर देतात.” (स्तोत्र २३:१,) होय, यहोवा अखंड आधाराचा स्रोत आहे. त्याने दाविदाला जीवनाच्या अतिशय काळोख्या समयीसुद्धा सांभाळून नेले आणि आपल्यालाही तो, आवश्‍यकता असते तेव्हा असेच सांभाळण्यास तयार आहे.

आपण यहोवाचा आधार कसा मिळवू शकतो? बायबल म्हणते: “परमेश्‍वर किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेऊन पाहा.” (स्तोत्र ३४:८) हे आमंत्रण खरोखरच प्रेमळ आमंत्रण आहे; परंतु याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो, की आपल्याला यहोवाची सेवा करण्याचे व आपले संपूर्ण जीवन त्याची इच्छा पूर्ण करण्यास वाहण्याचे उत्तेजन दिले जात आहे. परंतु अशा जीवनशैलीसाठी आपल्याला काही प्रमाणात आपले स्वातंत्र्य गमवावे लागेल, त्याग करावे लागतील. काही वेळा तर यांमुळे आपल्यावर परीक्षा—छळ आणि दुःख, हेही येतील. पण, यहोवाचे आमंत्रण पूर्ण मनाने स्वीकारणाऱ्‍यांना केव्हाही पस्तावा होणार नाही. यहोवा त्यांची प्रेमळपणे काळजी घेईल. तो त्यांना वाट दाखवील आणि आध्यात्मिकरीत्या काळजी घेईल. आपले वचन, आपला पवित्र आत्मा आणि ख्रिस्ती मंडळी यांद्वारे तो त्यांना परीक्षांत टिकवून ठेवील. आणि सरतेशेवटी तो त्यांना सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ देईल.—स्तोत्र २३:६; २५:९; यशया ३०:२१; रोमकर १५:५.

जीवनात तडजोडी करण्याचा निर्णय घेऊन जे यहोवाची सेवा करू इच्छितात व त्या निर्णयाशी शेवटपर्यंत जडून राहतात त्यांना दिसून येईल की यहोवा आपण दिलेली सर्व अभिवचने पूर्ण करतो. यहोशवाच्या मार्गदर्शनानुसार वाग्दत्त देशांत गेलेल्या इस्राएली लोकांचा हाच अनुभव होता. यार्देन पार केल्यावर त्यांना अनेक परीक्षांना तोंड द्यावे लागले, युद्धे लढावी लागली आणि कठीण धडे शिकावे लागले. परंतु ही पिढी आपल्या पूर्वजांपेक्षा अर्थात ईजिप्तहून बाहेर आल्यावर रानांत मरण पावलेल्या आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक विश्‍वासू ठरली. म्हणूनच यहोवा या विश्‍वासू लोकांच्या पाठीशी राहिला आणि बायबलमध्ये यहोशवाच्या जीवनाच्या शेवटी विश्‍वासू लोकांच्या परिस्थितीविषयी असे म्हटले आहे, की “परमेश्‍वराने त्यांच्या पूर्वजांना वचन दिले होते त्याप्रमाणे त्याने त्यांना सर्वत्र स्वास्थ्य दिले. . . . परमेश्‍वराने इस्राएल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यांतली एकहि निष्फळ झाली नाही; त्या सर्व सिद्धीस गेल्या.” (यहोशवा २१:४४, ४५) आपण देखील, परीक्षांत असताना आणि इतर वेळी देखील यहोवावर पूर्ण भरवसा ठेवला तर असाच अनुभव घेऊ शकतो.

पण कोणत्या गोष्टींमुळे यहोवावरील आपला भरवसा कमकुवत होण्याची शक्यता आहे? येशूने एका गोष्टीविषयी सांगताना म्हटले: “कोणीहि दोन धन्याची चाकरी करू शकत नाही. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.” (मत्तय ६:२४) आपण यहोवावर भरवसा ठेवला तर, जगातील बहुतेक लोक ज्यांद्वारे सुरक्षा मिळवू पाहतात अर्थात भौतिक संपत्तीत सुरक्षा मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही. येशूने आपल्या अनुयायांना असा सल्ला दिला: “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा म्हणजे त्यांच्याबरोबर ह्‍याहि सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील.” (मत्तय ६:३३) भौतिक गोष्टींविषयी संतुलित दृष्टिकोन बाळगणारा व आपल्या जीवनात देवाच्या राज्याला प्रथम स्थान देणारा ख्रिस्ती उचित निवड करतो. (उपदेशक ७:१२) यासाठी त्याला कदाचित काही गोष्टी गमवाव्या लागतील. भौतिक गोष्टींचा त्याला त्याग करावा लागेल. पण शेवटी मात्र त्याला गोड फळे चाखायला मिळतील. यहोवा नेहमी त्याच्या पाठीशी राहील.—यशया ४८:१७, १८.

परीक्षांतून आपण काय शिकतो

‘यहोवा किती चांगला आहे हे चाखून’ पाहताना, जीवनात येणाऱ्‍या अनपेक्षित घटनांपासून आपले संरक्षण होत नाही; किंवा, सैतान आणि त्याच्या मानवी प्रतिनिधींकडून होणाऱ्‍या हल्ल्यांपासूनही आपले संरक्षण होत नाही. (उपदेशक ९:११) त्यामुळे एखाद्या ख्रिश्‍चनाचा प्रामाणिकपणा व दृढनिश्‍चय कसोटीस उतरवले जातात. पण यहोवा आपल्या उपासकांवर परीक्षा का येऊ देतो? पेत्राने एक कारण दिले; त्याने लिहिले: “तुम्ही आता थोडा वेळ, भाग पडले तसे निरनिराळ्या परीक्षामुळे दुःख सोसले; ह्‍यासाठी की, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करितात त्या सोन्यापेक्षा मूल्यवान असे जे तुमचे विश्‍वासाच्या परीक्षेत उतरणे ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्‍यास कारणीभूत व्हावे.” (१ पेत्र १:६, ७) होय, परीक्षांमुळे आपल्या विश्‍वासाचा दर्जा आणि यहोवाबद्दल आपल्याला असलेले प्रेम प्रदर्शित करण्यासाठी आपल्याला वाव मिळतो. शिवाय, यामुळे दियाबल सैतानाच्या टोमण्यांना व आरोपांना प्रतिउत्तर देता येते!—नीतिसूत्रे २७:११; प्रकटीकरण १२:१०.

परीक्षांमुळे आपल्याला इतर ख्रिस्ती गुण विकसित करायला देखील वाव मिळतो. उदाहरणार्थ, स्तोत्रकर्त्याच्या या शब्दांचा विचार करा: “[यहोवा] दीनाकडे लक्ष देतो; पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो.” (स्तोत्र १३८:६) आपल्यातील बहुतेकजण स्वभावतःच नम्र नसतात पण परीक्षांमुळे आपल्याला हा आवश्‍यक गुण स्वतःत विकसित करण्यास मदत मिळते. मोशेच्या दिवसांतील त्या प्रसंगाची आठवण करा जेव्हा इस्राएलमधील काही लोकांना आठवड्यामागून आठवडे, महिन्यामागून महिने मान्‍ना खात असल्यामुळे कंटाळा आला होता. मान्‍ना हे त्यांना चमत्कारिकरित्या पुरवले जात होते तरीपण ही त्यांच्यासाठी एक परीक्षाच होती. या परीक्षेमागचा उद्देश काय होता? मोशेने त्यांना सांगितले: “तुला लीन करावे व कसोटीस [लावावे] . . . म्हणून . . . मान्‍ना खाऊ घालून [यहोवाने] तुझे पोषण केले.”—अनुवाद ८:१६.

आपल्याही नम्रतेची अशीच परीक्षा घेतली जाऊ शकते. ती कशी? संस्थेत होणाऱ्‍या फेरफारांबद्दल आपली प्रतिक्रिया काय असते? (यशया ६०:१७) प्रचाराच्या व शिकवण्याच्या कार्याला आपण पूर्णपणे पाठिंबा देतो का? (मत्तय २४:१४; २८:१९, २०) ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकडून’ येणाऱ्‍या बायबल सत्यांचे स्पष्टीकरण आपण उत्सुकतेने स्वीकारतो का? (मत्तय २४:४५-४७; नीतिसूत्रे ४:१८) आधुनिक उपकरण, आधुनिक वस्त्र किंवा बाजारात आलेली गाडीची नवी मॉडेल घ्यायच्या दबावाचा आपण प्रतिकार करतो का? नम्र व्यक्‍तीच या सर्व प्रश्‍नांना होय असे उत्तर देऊ शकेल.—१ पेत्र १:१४-१६; २ पेत्र ३:११.

परीक्षांमुळे आपल्याला आणखी एक महत्त्वपूर्ण असलेला गुण अर्थात धीर उत्पन्‍न करायला मदत होते. शिष्य याकोबाने म्हटले: “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हांस ठाऊक आहे की, तुमच्या विश्‍वासाची पारख उतरल्याने धीर उत्पन्‍न होतो.” (याकोब १:२, ३) यहोवावर पूर्णपणे विसंबून यशस्वीरीत्या परीक्षांचा सामना करत राहिल्याने आपण अढळ, अविचल व सत्वनिष्ठ होतो. या जगाचे कोपिष्ट दैवत सैतान याच्या पुढच्या हल्ल्यांसाठी आपल्याला मजबुती मिळते.—१ पेत्र ५:८-१०; १ योहान ५:१९; प्रकटीकरण १२:१२.

परीक्षांबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगणे

देवाचा परिपूर्ण पुत्र येशू ख्रिस्त याच्यावरही पृथ्वीवर असताना अनेक परीक्षा आल्या आणि त्याने त्यांचा यशस्वीरीत्या सामना केल्याने त्याला उत्तम प्रतिफळ मिळाले. पौलाने लिहिले, की येशूने “जे दुःख सोसले तेणेकरून तो आज्ञाधारकपणा शिकला.” (इब्री लोकांस ५:८) येशू मृत्यूपर्यंत एकनिष्ठ राहिल्यामुळे यहोवाच्या नावाचे गौरव झाले आणि येशू मानवजातीसाठी खंडणी म्हणून आपल्या परिपूर्ण मानवी जीवनाचे मूल्य सादर करू शकला. यामुळे येशूवर विश्‍वास ठेवणाऱ्‍यांसाठी सार्वकालिक जीवनाचा मार्ग खुला झाला. (योहान ३:१६) येशू परीक्षांमध्ये विश्‍वासू राहिल्यामुळे तो आता आपला महायाजक आणि सिंहासनाधिष्ठीत राजा आहे.—इब्री लोकांस ७:२६-२८; १२:२.

आपल्याबाबतीत काय? परीक्षांमध्ये आपणही एकनिष्ठ राहिलो तर आपल्याला देखील अनेक आशीर्वाद मिळतील. स्वर्गीय आशा असलेल्यांबद्दल बायबल म्हणते: “जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपणावर प्रीति करणाऱ्‍यांना प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुगूट, परीक्षेत उतरल्यावर त्याला मिळेल.” (याकोब १:१२) पार्थिव आशा असलेल्यांना ही खात्री आहे, की ते जर शेवटपर्यंत विश्‍वासू राहिले तर त्यांना पृथ्वीवरील परादीसमध्ये सार्वकालिक जीवन मिळेल. (प्रकटीकरण २१:३-६) आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी विश्‍वासूपणे धीर दाखवल्याने यहोवाच्या नावाचे गौरव होते.

येशूच्या पावलांवर पाऊल ठेवून चालताना आपण हा भरवसा बाळगू शकतो, की या व्यवस्थीकरणात आपल्या समोर येणाऱ्‍या सर्व परीक्षांना आपण यशस्वीरीत्या तोंड देऊ शकतो. (१ करिंथकर १०:१३; १ पेत्र २:२१) ते कसे? ‘पराकोटीचे सामर्थ्य’ देणाऱ्‍या यहोवावर पूर्णपणे विसंबण्याद्वारे. (२ करिंथकर ४:७) अतिशय निष्ठुर परीक्षांना तोंड देऊनही पूर्ण विश्‍वासाने ईयोबाने म्हटले, की “त्याने मला पारखून पाहिले म्हणजे मी सोन्यासारखा निघेन.” तर मग ईयोबाप्रमाणे आपणही ठाम निश्‍चयी होऊ या.—ईयोब २३:१०.

[३१ पानांवरील चित्र]

येशूप्रमाणे आपणही परीक्षेत एकनिष्ठ राहून यहोवाच्या नावाचे गौरव करू या