“मी तीळमात्रही बदल कशात करणार नाही!”
जीवन कथा
“मी तीळमात्रही बदल कशात करणार नाही!”
ग्लॅडीस ॲलन यांच्याद्वारे कथित
मला कधीकधी विचारलं जातं, “तुम्हाला पुन्हा एकदा जीवनाची सुरवात करायला सांगितल्यास तुम्ही कशात बदल करणार?” यावर माझं प्रामाणिक उत्तर हेच आहे, की “मी तीळमात्रही बदल कशात करणार नाही!” मला असं का वाटतं ते मी तुम्हाला सांगू इच्छिते.
मी दोन वर्षांची होते तेव्हा म्हणजे १९२९ सालच्या उन्हाळ्यात माझे वडील, मॅथ्यू ॲलन यांना एक सुंदर अनुभव आला. त्यांना सध्या जिवंत असलेले कोट्यवधी लोक कधीही मरणार नाहीत! ही आंतरराष्ट्रीय बायबल विद्यार्थ्यांनी अर्थात आता ज्यांना यहोवाचे साक्षीदार म्हटले जाते त्यांनी प्रकाशित केलेली इंग्रजीतील एक पुस्तिका मिळाली. बाबांनी या पुस्तिकेची काही पानेच अगदी उत्सुकतेने वाचून काढल्यावर ते म्हणाले: “वा! काय सुंदर माहिती मला सापडलीय!”
त्यानंतर लगेच बाबांनी बायबल विद्यार्थ्यांकडून आणखी प्रकाशने मिळवली. शिकत असलेल्या गोष्टी शेजाऱ्यांना सांगण्यात त्यांनी मुळीच उशीर लावला नाही. पण आमच्या ग्रामीण भागात यहोवाच्या साक्षीदारांची एकही मंडळी नव्हती. नियमित ख्रिस्ती सहवास किती आवश्यक आहे हे बाबांनी ओळखल्यामुळे १९३५ मध्ये त्यांनी मंडळी असलेल्या ठिकाणी अर्थात कॅनडाच्या ओन्टारियो येथील ऑरेंजवील येथे संपूर्ण कुटुंबाला हलवले.
त्या दिवसांत, मुलांना मंडळीच्या सभांना बसण्याचे उत्तेजन दिले जात नसे; सभा चालू असताना सर्व प्रौढ आत बसायचे आणि मुलं बाहेर खेळत असायची. पण बाबांना हे आवडलं नाही. ते म्हणायचे, की “सभा जशा माझ्यासाठी चांगल्या आहेत तशा त्या माझ्या मुलांसाठीसुद्धा आहेत.” आम्ही नवीनच संगती करायला सुरवात केली होती तरीपण बाबांनी आम्हा सर्व मुलांना म्हणजे माझा मोठा भाऊ बॉब याला, माझ्या मोठ्या बहिणी एला आणि रूबी यांना आणि मला सभांना बसायला सांगितलं व आम्ही बसू लागलो.
लगेच आमचं पाहून इतर साक्षीदारांची मुलं देखील आत बसू लागली. सभांना उपस्थित राहणं, सभांमध्ये उत्तरं देणं, यांना आम्ही नेहमी महत्त्व दिलं आहे.बाबांना बायबलवर अतिशय प्रेम होतं; शिवाय, बायबलमध्ये गोष्टींवर नाटक करण्याची त्यांच्या अंगी अतिशय सुरेख कला होती. या नाटकांद्वारे त्यांनी आमच्या कोवळ्या मनांवर असे महत्त्वपूर्ण धडे गिरवलेत जे आजही मला चांगले आठवतात. त्यातला एक धडा म्हणजे, जे यहोवाच्या आज्ञेत राहतात त्या सर्वांना तो आशीर्वादित करतो.
बाबांनी आम्हाला आमच्या विश्वासाचे समर्थन करण्यासही शिकवले. आम्ही त्याचे खेळ खेळायचो. बाबा म्हणायचे, “माझा असा विश्वास आहे, की मी मेल्यावर स्वर्गात जाणार आहे. तर मी स्वर्गात जाणार नाही हे मला तुम्ही सिद्ध करून दाखवा.” ही शिकवण खोटी आहे हे सिद्ध करून दाखवण्यासाठी रूबी आणि मी कॉन्कर्डन्समध्ये शास्त्रवचने धुंडाळायचो. मग शास्त्रवचने वाचून दाखवल्यावर बाबा म्हणायचे, “छान! पण अजूनही माझी खात्री पटलेली नाही.” मग पुन्हा आम्ही कॉन्कर्डन्सकडे वळायचो. असे, बाबांना आम्ही दिलेली उत्तरे जोपर्यंत समाधानकारक वाटत नाही तोपर्यंत कित्येक तास चालायचे. यामुळे, रूबी आणि मी आपल्या विश्वासांचे स्पष्टीकरण देण्यात व आपल्या विश्वासाचे समर्थन करण्यात तरबेज झालो.
मनुष्याच्या भीतीवर मात
घरात आणि मंडळीच्या सभांमध्ये इतकं उत्तम प्रशिक्षण मिळूनही मी कबूल करते, की ख्रिस्ती या नात्याने काही गोष्टी मला अतिशय जड जायच्या. पुष्कळ तरुणांप्रमाणे मलाही इतरांपासून, खासकरून माझ्या वर्गमित्रांपासून वेगळे असे दिसायला आवडायचे नाही. माझ्या विश्वासाची पहिली परीक्षा होती, इनफर्मेशन मार्च.
इनफर्मेशन मार्च म्हणजे, बंधू भगिनींचा एक गट वेगवेगळे नारे लिहिलेले प्लाकार्ड घालून शहरांतील प्रमुख रस्त्यांवरून हळूहळू फिरायचे. सुमारे ३,००० लोकसंख्या असलेल्या आमच्या गावात सर्व लोक एकमेकांना ओळखायचे. अशाच एका इनर्मेशन मार्चच्या वेळी मी रांगेत शेवटी, “धर्म पाश आहे, थोतांड आहे,” असा नारा असलेले प्लाकार्ड घालून चालले होते. इतक्यात माझ्या वर्गातील काही मुलांनी मला पाहिलं आणि तेही मग माझ्या मागे मागे, “देव राजाचे रक्षण करो” हे गीत गात येऊ लागले. मी काय केलं असावं? चालत राहण्यासाठी मला शक्ती दे अशी यहोवाला कळकळीनं प्रार्थना केली. मार्च संपल्यानंतर मी लगेच राज्य सभागृहात जाऊन प्लाकार्ड देऊन घरी पळून जाण्याच्या बेतात होते. पण, मार्चची व्यवस्था पाहणाऱ्या बांधवानं मला सांगितलं, की दुसरा एक मार्च लगेच सुरू होणार आहे व त्यांना एक प्लाकार्ड घेण्यासाठी आणखी एका व्यक्तीची आवश्यकता होती. त्यामुळे मी पुन्हा मार्चसाठी गेले आणि या वेळेस आणखी कळकळीनं प्रार्थना केली. या सर्व वेळेपर्यंत, माझे वर्गमित्र कंटाळून घरी गेले होते. शक्तीसाठी मी प्रार्थना केली होती पण नंतर मी यहोवाचे आभार मानायला प्रार्थना केली!—नीतिसूत्रे ३:५.
आमचं घर पूर्ण-वेळेच्या सेवकांसाठी नेहमी खुलं असायचं. ते लोक आनंदी असायचे आणि त्यांचा पाहुणचार करायला आम्हाला खूप आवडायचे. मला आठवतं, आमच्या आईवडिलांनी नेहमी आम्हा मुलांना शक्य असेल तर पूर्ण-वेळेच्या सेवेला जीवनाचं करिअर बनवण्याचं उत्तेजन दिलं.
त्यांच्या उत्तेजनामुळे, १९४५ साली मी पूर्ण-वेळेच्या सेवेत उतरले. नंतर मी, लंडन, ओन्टारियो येथे माझी पायनियर बहीण, एला हिच्याबरोबर पायनियरींग करू लागले. तिथं, सेवेच्या एका नवीन पैलूविषयी मला सांगण्यात आले पण मला ते जमणार नाही असं मला वाटलं होतं. स्थानीय बारमध्ये जाऊन बांधव प्रत्येक टेबलावरील गिऱ्हाईकांना टेहळणी बुरूज आणि कन्सोलेशन (आता सावध राहा!) मासिकं सादर करायचे. आनंदाची गोष्ट म्हणजे हे कार्य शनिवारी दुपारी केलं जायचं, त्यामुळे धैर्यासाठी प्रार्थना करायला मला एक आठवडा मिळायचा! निश्चितच मला हे कार्य सोपं गेलं नाही, तरीपण ते प्रतिफळदायी होतं.
पण दुसऱ्या बाजूला पाहता, मी नात्सी छळछावण्यांतील आपल्या बांधवांच्या छळाविषयीची माहिती असलेल्या कन्सोलेशन मासिकांचे खास अंक, प्रमुख कॅनडीयन व्यापाऱ्यांना व मोठमोठ्या कॉर्पोरेशन्सच्या अध्यक्षांना द्यायला शिकले. इतक्या वर्षांपासून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे; की आपण जोपर्यंत शक्तीसाठी यहोवावर निर्भर राहतो तोपर्यंत तो आपल्या पाठीशी असतो. बाबा नेहमी म्हणायचे, जे त्याच्या आज्ञेत राहतात त्या सर्वांना यहोवा आशीर्वाद देतो.
क्यूबेकमध्ये सेवा करण्याच्या आमंत्रणाला प्रतिसाद देणे
जुलै ४, १९४० रोजी, कॅनडातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आली. कालांतराने बंदी उठवण्यात आली असली तरीसुद्धा, क्यूबेकच्या रोमन कॅथलिक प्रांतात यहोवाच्या साक्षीदारांचा छळ व्हायचा. देव, ख्रिस्त आणि स्वातंत्र्य यांबद्दल क्यूबेकचा जळजळता द्वेष सर्व कॅनडासाठी शरमेची गोष्ट आहे अशा कडक शब्दांत असलेल्या पत्रिकेचे वाटप करण्याची एक खास मोहीम आखण्यात आली; क्यूबेकमधील आपल्या बांधवांना दिल्या जाणाऱ्या गैरवागणुकीकडे लोकांचे लक्ष आकर्षित करणे हा या मोहिमेमागचा हेतू होता. यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य बंधू नेथन एच. नॉर माँट्रेल शहरातील अनेक पायनियरांना भेटले व आपण जे काही करणार आहोत त्याचा काय अर्थ होतो हे त्यांनी त्यांना समजावून सांगितले. बंधू नॉर यांनी आम्हाला सांगितले, की या मोहिमेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी त्यांना अटक करून तुरुंगात टाकले जाण्याची अपेक्षा करावी. त्यांचे बोलणे खरे ठरले. काही काळादरम्यान मला १५ वेळा अटक करण्यात आली होती. आम्ही क्षेत्र सेवेला जाताना सोबत टूथब्रश आणि कंगवा न्यायचो; असा विचार करून, की कदाचित आपल्याला आजची रात्र तुरुंगात घालवावी लागेल.
पहिल्यांदा आम्ही आमचं बहुतेक कार्य रात्रीच्या वेळी करायचो ज्यामुळे आम्ही होता होईल तितके लोकांच्या नजरेपासून दूर राहू शकू. मी एका बॅगेत पत्रिकांचा जादा साठा घ्यायचे आणि ही बॅग गळ्यात अडकवून वरून कोट घालायचे. पत्रिकांमुळे बॅग फुगलेली दिसायची; आणि बॅग माझ्या पोटाजवळ असल्यामुळे लोकांना वाटायचं, की मी गरोदर आहे. क्षेत्रात जाण्यासाठी मला स्ट्रीटकारनं प्रवास करावा लागायचा तेव्हा मला याचा फायदा व्हायचा. अनेक वेळा असं झालं, की मला “गरोदर” असल्याचं समजून पुष्कळ सभ्य पुरूष लगेच उठून त्यांची जागा द्यायचे.
हळूहळू मग आम्ही दिवसाही वितरण कार्य करू लागलो. तीन किंवा चार घरांमध्ये पत्रिका दिल्यानंतर आम्ही दुसऱ्या क्षेत्रात जायचो. बहुतेकदा सर्व काही सुरळीत व्हायचं. पण एखाद्या रोमन कॅथलिक पाळकाला आम्ही त्या भागात आल्याचं समजलंच तर आता काही तरी गडबड होणार अशी आम्ही अपेक्षाच करायचो. एकदा, एका पाळकानं ५०-६० लोकांच्या एका जमावाला आमच्याविरुद्ध भडकवलं; मोठी माणसं, मुलं आमच्यावर टमाटे आणि अंडी फेकू लागले. मग आम्ही एका ख्रिस्ती भगिनीच्या घरी आश्रय घेतला आणि त्या रात्री तिथंच जमिनीवर झोपलो.
क्यूबेकमधील फ्रेंच बोलणाऱ्या लोकांना प्रचार करण्यासाठी पायनियरांची अत्यंत गरज होती; त्यामुळे १९५८ सालच्या डिसेंबर महिन्यात रूबी आणि मी फ्रेंच भाषा शिकू लागलो. त्यानंतर मग आम्हाला तेथील फ्रेंच भाषेच्या अनेक क्षेत्रांत नेमण्यात आलं. प्रत्येक नेमणूकीत आम्हाला नवीन अनुभव यायचा. एका ठिकाणी, आम्ही दररोज आठ तास असे सलग दोन वर्ष घरोघरचे कार्य केले पण कोणीही दार उघडायला तयार नसत. लोक फक्त दारापर्यंत यायचे आणि आम्हाला बघून मग पडदा लावायचे. पण आम्ही हार मानली नाही. आणि आज, त्या शहरात दोन मंडळ्या आहेत ज्यांची भरभराट होत आहे!
सर्व मार्गांनी यहोवानं आम्हाला सांभाळलं
१९६५ साली आम्ही खास पायनियर म्हणून आमची सेवा सुरू केली. अशाच एका नेमणूकीत आम्हाला, १ तीमथ्य ६:८ येथील पौलाच्या शब्दांचा पूर्ण अर्थ समजला: “आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” खर्च भागवण्यासाठी आम्हाला खूपच काटकसर करावी लागायची. हीटर, घराचं भाडं, वीज आणि भोजन यासाठी आम्ही पैसे बाजूला काढून ठेवायचो. त्यातून संपूर्ण महिनाभरासाठी आम्हाला लागेल तसा खर्च करण्यासाठी आमच्याजवळ फक्त २५ सेंट उरायचे.
आमच्याकडे जितके पैसे होते तितक्यातच आम्हाला हीटरचे बील देता येत असल्यामुळे, रात्रीचे फक्त काही तास आम्ही हीटर वापरायचो. त्यामुळे आमच्या झोपण्याच्या खोलीतील तापमान केव्हाही १५ डिग्री सेल्सियसच्या वर गेले नाही; कधीकधी तर यापेक्षा कमी असायचे. अशातच एकदा, रूबीच्या बायबल विद्यार्थीनीचा एक मुलगा आमच्या घरी स्तोत्र ३७:२५ मधील शब्द आमच्याबाबतीत किती खरे ठरले: “नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतति भिकेस लागलेली मी पाहिली नाही.”
आला होता. आम्ही कशा मरणाच्या थंडीत राहात होतो ते कदाचित त्यानं घरी जाऊन आपल्या आईला सांगितलं असावं कारण, तेव्हापासून दर महिन्याला ती आम्हाला, हीटरमध्ये तेल घालून ते सतत चालू राहावे म्हणून तीनशे रुपये पाठवू लागली. अशाप्रकारे आम्हाला कशाचीही कमी भासली नाही. आम्ही श्रीमंत नव्हतो, पण लागणाऱ्या सर्व वस्तू आमच्याजवळ होत्या. कधी काही उरलंच तर आम्हाला तो आशीर्वादच वाटायचा.आम्हाला पुष्कळ विरोधाचा सामना करावा लागला तरीसुद्धा, मला, मी ज्यांच्याबरोबर बायबल अभ्यास केला अशा पुष्कळ लोकांना सत्याचे ज्ञान स्वीकारल्याचे पाहून आनंद मिळाला. त्यांपैकी काहींनी पूर्ण वेळेच्या सेवेला आपले करिअर बनवले; हे पाहून तर मी अधिकच आनंदी झाले.
नवीन आव्हानांना यशस्वीरीत्या तोंड देणे
कॉर्नवॉल, ओन्टारियो येथे आम्हाला आमची दुसरी नेमणूक १९७० साली मिळाली. कॉर्नवॉल इथं येऊन एक वर्ष झाल्यानंतर आईची तब्येत बिघडली. बाबा तर १९५७ साली गेले होते आणि माझ्या दोघा बहिणींनी व मी आळीपाळीने १९७२ साली आईच्या मृत्यूपर्यंत तिची काळजी घेतली. आमच्या खास पायनियर पार्टनर एला लिसिटझा आणि ॲन कोवालेन्को या दोघींनी या काळात आम्हाला खूप सांभाळून घेतले आणि त्यांनी आम्हाला प्रेमळ आधारही दिला. आमच्या अनुपस्थितीत त्यांनी आमचे बायबल अभ्यास चालवले आणि इतरही जबाबदाऱ्या सांभाळल्या. नीतिसूत्रे १८:२४ मधील शब्द किती खरे आहेत: “एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षांहि आपणास धरून राहतो.”
जीवनाचा मार्ग खरोखरच खूप खडतर आहे. यहोवाच्या प्रेमळ आधारामुळेच मी या मार्गात येणाऱ्या सर्व अडखळणांवर मात करू शकले आहे. मी अजूनही आनंदाने पूर्ण वेळेची सेवा करत आहे. १९९३ साली माझा भाऊ, बॉब वारला; त्याने २० पेक्षा अधिक वर्ष पायनियर कार्य केले आणि त्याची पत्नी डॉल हिच्याबरोबर १० वर्ष सेवा केली. माझी मोठी बहीण एला १९९८ साली मरण पावली; तिने ३० पेक्षा अधिक वर्ष पायनियरींग केली आणि शेवटपर्यंत तिच्यात पायनियर आत्मा होता. १९९१ साली माझ्या दुसऱ्या बहिणीला, रूबीला कॅन्सर असल्याचे सांगण्यात आले. तरीपण ती, तिच्या परीने सुवार्तेचा प्रचार करत राहिली. तिला विनोद करायची सवय होती; अगदी ती ज्या दिवशी सकाळी वारली त्या दिवशी म्हणजे सप्टेंबर २६, १९९९ रोजी मरायच्या आधी सुद्धा ती हसमुख होती. आता माझ्या बहिणी जिवंत नाहीत पण बंधूभगिनींचा
आध्यात्मिक परिवार आहे जो मला माझी विनोदी मनोवृत्ती कायम ठेवण्यास मदत करतो.मी माझ्या जीवनाकडे मागे वळून पाहते तर, मी काय बदल केले असते बरे? मी लग्न केलं नाही; पण मला असे प्रेमळ आईवडील, भाऊ व बहिणी लाभल्या ज्यांनी सत्याला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिलं. मी या सर्वांना पुनरुत्थानाच्या वेळी पाहण्यास आतुर आहे! माझ्या बाबांनी मला कशी घट्ट मिठी मारली आहे, मी आणि आई गळ्यात पडून कसे रडत आहोत आणि आईच्या डोळ्यातून अश्रू कसे वाहत आहेत हे दृश्य तर मला आताच दिसू लागलं आहे. आणि एला, रूबी, बॉब तर आनंदाने अक्षरशः उड्या मारतील.
तोपर्यंत, माझ्याजवळ जितकी शक्ती, ताकद उरली आहे तिचा उपयोग यहोवाची स्तुती व आदर करण्याची माझी इच्छा आहे. पूर्ण वेळेची सेवा म्हणजे अद्भुत, प्रतिफळदायी जीवन. यहोवाच्या मार्गांत चालणाऱ्यांबद्दल स्तोत्रकर्त्याने जे म्हटले तसेच ते आहे: “तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.”—स्तोत्र १२८:१, २.
[२६ पानांवरील चित्रे]
बाबांचे बायबलवर अतिशय प्रेम होते. आमच्या विश्वासाचे समर्थन करण्यास त्याचा उपयोग कसा करायचे ते त्यांनी आम्हाला शिकवले
[२८ पानांवरील चित्र]
डावीकडून उजवीकडे: रूबी, मी, बॉब, एला, आई व बाबा, १९४७ साली
[२८ पानांवरील चित्र]
पहिल्या रांगेत; डावीकडून उजवीकडे: १९९८ साली झालेल्या एका अधिवेशनात, मी, रूबी आणि एला