शेजारधर्म आहे कुठे?
शेजारधर्म आहे कुठे?
“आधुनिक समाजात शेजाऱ्याला स्थान नाही,”—बेन्जामिन डिस्रेली, १९ व्या शतकातील इंग्रज मुत्सद्दी.
वयस्कर क्यूबन लोकांनी जनकल्याणाचा एक नवीन मार्ग शोधून काढला आहे: शेजार मंडळ किंवा आजीआजोबांचे मंडळ असेही त्यांना म्हटले जाते. १९९७ च्या एका अहवालानुसार, ५ वयस्कर क्यूबन लोकांमधली १ व्यक्ती तरी या मंडळाची सदस्य होती; तेथे त्यांना सहवास लाभतो, आधार मिळतो आणि सुदृढ जीवनशैली जगण्याकरता व्यावहारिक मदत मिळते. वर्ल्ड-हेल्थ मासिकात म्हटले होते, “एखाद्या परिसरातील कौटुंबिक डॉक्टरांना लसीकरणाच्या मोहीमेसंबंधी काही मदत हवी असल्यास, ही [आजीआजोबांची मंडळे] सदा तयार असतात आणि कार्यक्षमही असतात.”
परंतु, दुःखाची गोष्ट म्हणजे आजकाल काळजी घेणारा समाज उरलेला नाही. पश्चिम युरोपमधील एका अपार्टमेंट बिल्डींगमध्ये राहणाऱ्या वोल्फगँग डर्क्सची एक दुःखद कहाणी ऐका. काही वर्षांआधी, द कॅनबेरा टाईम्सने वृत्त दिले की, वोल्फगँगच्या इमारतीत राहणाऱ्या १७ कुटुंबांना तो काही दिवसांपासून दिसत नसल्याचे लक्षात आले होते पण “त्याच्या दारावरची बेल वाजवण्याची तसदी मात्र कोणीही घेतली नाही.” शेवटी, घरमालक आला तेव्हा “त्याला टीव्हीसमोर बसलेला हाडांचा एक सापळा दिसला.” मांडीवर डिसेंबर ५, १९९३ तारखेच्या टीव्हीवरील कार्यक्रमांची यादी होती. वोल्फगँगला मरून तब्बल पाच वर्षे होऊन गेली होती. शेजाऱ्यांना एकमेकांबद्दल किती कमी चिंता आणि काळजी वाटते याचा हा हृदयद्रावक पुरावा आहे. म्हणूनच, द न्यू यॉर्क टाईम्स मॅगझीन यात एका निबंधकाराने लिहिले की त्याचा शेजारचा परिसर इतर परिसरांप्रमाणेच “परक्यांचा समाज” बनला होता. तुमच्या शेजारच्या परिसराचीही हीच गत आहे का?
काही ग्रामीण भागांमध्ये, आजही खरा शेजारधर्म अनुभवायला मिळतो आणि काही शहरी समाजांमध्ये देखील शेजाऱ्याबद्दल काळजी बाळगण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु, शहरात राहणाऱ्या अनेकांना स्वतःच्याच परिसरात एकटेपणा जाणवतो आणि सुरक्षित वाटत नाही. अनोळखीपणाच्या भिंतींमध्ये ते कुढत असतात. ते कसे?
अनोळखीपणाच्या भिंतींमध्ये
अर्थात, आपल्यातील बहुतेकांचे शेजारी अगदी आपल्या जवळपासच राहतात. टीव्हीचा प्रकाश, खिडक्यांमधील हलत्या सावल्या, बंद-चालू होणारे
दिवे, येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचा आवाज, दाराबाहेर ऐकू येणाऱ्या पावलांचा आवाज, दरवाजे उघडताना व बंद करताना होणारा चाव्यांचा आवाज ही सर्व शेजारचा परिसर “जागृत” असल्याची लक्षणे आहेत. परंतु, अगदी शेजारी शेजारी राहणारे लोक अनोळखीपणाच्या भिंतींमध्ये दडले जातात किंवा धकाधकीच्या जीवनात एकमेकांकडे दुर्लक्ष करतात तेव्हा शेजाऱ्यांमध्ये खरी आपुलकी राहात नाही. शेजाऱ्यांशी कसलाही संबंध ठेवायची गरज नाही, त्यांच्याप्रती उपकारबद्ध असायची गरज नाही असे लोकांना वाटेल. ऑस्ट्रेलियन बातमीपत्र हेराल्ड सन कबूल करते: “लोक आपल्या अगदी जवळच्या शेजाऱ्यांना ओळखत नाहीत, त्यामुळे सामाजिक बंधनांनी ते जखडलेले नाहीत. आता समाजात नावडत्या लोकांना सहजपणे दुर्लक्ष करता येऊ शकते किंवा त्यांना वाळीत टाकता येऊ शकते.”आज ही स्थिती निर्माण झालीय त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. आजच्या “स्वार्थी” जगात, आत्म-केंद्रित जीवनशैली जगणारे अनेकजण आता त्याचे परिणाम भोगत आहेत. (२ तीमथ्य ३:२) याची परिणती एकटेपणा आणि पारखेपणा यात झाली आहे. पारखेपणामुळे बेभरवसा निर्माण होतो, विशेषकरून शेजारपाजारात हिंसा आणि गुन्हेगारीचे सावट असते तेव्हा. आणि बेभरवशामुळे एकमेकांबद्दलची करुणा नष्ट होते.
तुमच्या परिसरात स्थिती कशीही असली तरी चांगले शेजारी समाजाकरता बहुमूल्य असतात हे तुम्ही निश्चितच मान्य कराल. सगळेजण जेव्हा एक समान ध्येय प्राप्त करायचा प्रयत्न करतात तेव्हा पुष्कळ काही साध्य केले जाते. चांगले शेजारी आशीर्वाद देखील ठरू शकतात. कसे हे पुढील लेखात सांगितले जाईल.