व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे”

“आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे”

“आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे”

“ऐकलल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ.”—इब्री लोकांस २:१.

१. लक्ष विचलित झाल्यामुळे कशाप्रकारे संकट ओढवू शकते याचे एखादे उदाहरण द्या.

दर वर्षी एकट्या अमेरिकेतच वाहन अपघातांत ३७,००० लोकांचा बळी जातो. तज्ज्ञ म्हणतात की वाहन चालकांनी रस्त्यावर नीट लक्ष दिले तर यांतील बरेच मृत्यू टाळता येण्यासारखे आहेत. काही चालकांचे रस्त्याच्या कडेवरील खुणा आणि जाहिरातफलक पाहून, तर काहींचे मोबाईल फोनवर बोलत असल्यामुळे लक्ष विचलित होते. काही चालक समोरच्या डॅशबोर्डवर खाद्यपदार्थ ठेवून गाडी चालवता चालवता खात असतात. वरील सर्व उदाहरणांत चालकाचे लक्ष विचलित झाल्यामुळे संकट ओढवू शकते.

२, ३. पौलाने इब्री ख्रिश्‍चनांना काय सल्ला दिला आणि त्याचा सल्ला उचित का होता?

मोटारींचा शोध लागण्याच्या जवळजवळ २,००० वर्षांआधी प्रेषित पौलाने दुसऱ्‍या एका संदर्भात लक्ष विचलित होण्याविषयी सांगितले ज्यामुळे काही इब्री ख्रिस्ती स्वतःवर संकट ओढवत होते. पौलाने या गोष्टीवर भर दिला की पुनरुत्थित येशू ख्रिस्ताला सर्व देवदूतांपेक्षा उच्च स्थान देण्यात आले आहे कारण तो देवाच्या उजव्या हाती विराजमान आहे. यानंतर प्रेषित पौलाने म्हटले: “ह्‍या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लाविले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ.”—इब्री लोकांस २:१.

येशूच्या संबंधात इब्री ख्रिश्‍चनांना ‘ऐकलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष लावण्याची’ का गरज होती? कारण येशूला ही पृथ्वी सोडून ३० वर्षे होत आली होती. धनी गेल्यानंतर काही इब्री ख्रिश्‍चन खऱ्‍या विश्‍वासापासून वाहवत चालले होते. त्यांच्या पूर्वीच्या उपासना पद्धतीमुळे अर्थात यहुदी धर्मामुळे त्यांचे लक्ष विचलित होत होते.

त्यांना विशेष लक्ष देण्याची गरज होती

४. काही इब्री ख्रिश्‍चनांना यहुदी धर्मात परतण्याचा मोह का झाला असावा?

पण एका ख्रिस्ती व्यक्‍तीला यहुदी धर्मात परतण्याचा मोह होण्याचे काय कारण असू शकत होते? याचे एक कारण म्हणजे नियमशास्त्राच्या अधीन असलेल्या उपासना पद्धतीत दृश्‍य गोष्टींचा समावेश होता. लोक याजकांना पाहू शकत होते, यज्ञांचा सुवास घेऊ शकत होते. पण काही बाबतीत ख्रिस्ती धर्म अतिशय वेगळा होता. ख्रिस्ती लोकांकरताही येशू ख्रिस्त हा मुख्य याजक होता पण तीन दशकांपासून त्याला पृथ्वीवर कोणीही पाहिले नव्हते. (इब्री लोकांस ४:१४) त्यांचेही एक मंदिर होते पण या मंदिराचे पवित्र स्थान थेट स्वर्गात होते. (इब्री लोकांस ९:२४) नियमशास्त्रातील सुंता शारीरिक होती, पण ख्रिस्ती लोकांची सुंता, “अध्यात्मिकदृष्ट्या जी अंतःकरणाची” ती होती. (रोमकर २:२९) त्यामुळे हिब्रू ख्रिश्‍चनांना ख्रिस्ती धर्म काहीसा अमूर्त स्वरूपाचा वाटला असेल.

५. येशूने स्थापन केलेली उपासना पद्धत नियमशास्त्रातील उपासना पद्धतीपेक्षा श्रेष्ठ होती हे पौलाने कसे दाखवले?

इब्री ख्रिश्‍चनांनी, ख्रिस्ताने स्थापित केलेल्या उपासना पद्धतीसंबंधी एक अतिशय अर्थसूचक वस्तूस्थिती समजून घेण्याची गरज होती. ही उपासना पाहिलेल्या गोष्टींवर नव्हे तर विश्‍वासावर आधारित होती आणि तरीसुद्धा ती संदेष्टा मोशे याच्याद्वारे देण्यात आलेल्या नियमशास्त्रापेक्षा कैक पटीने श्रेष्ठ होती. पौलाने लिहिले: “बकऱ्‍यांचे व बैलांचे रक्‍त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धि होईल इतके पवित्र करितात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्‍त आपली सद्‌सद्विवेकबुद्धि जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?” (इब्री लोकांस ९:१३, १४) होय, येशू ख्रिस्ताच्या खंडणी यज्ञार्पणावरील विश्‍वासायोगे प्राप्त होणारी पापांची क्षमा नियमशास्त्रानुसार अर्पण केल्या जाणाऱ्‍या बलिदानांमुळे मिळणाऱ्‍या पापमुक्‍तीपेक्षा बऱ्‍याच मार्गांनी श्रेष्ठ होती.—इब्री लोकांस ७:२६-२८.

६, ७. (अ) इब्री ख्रिश्‍चनांनी ‘ऐकलेल्या गोष्टींकडे विशेष लक्ष लावणे’ इतके अगत्याचे का होते? (ब) पौलाने इब्री लोकांना पत्र लिहिले तेव्हा जेरूसलेमच्या नाशाकरता किती काळ उरला होता? (तळटीप पाहा.)

इब्री ख्रिश्‍चनांनी येशू ख्रिस्ताविषयी ऐकलेल्या गोष्टींवर विशेष लक्ष देण्यामागे आणखी एक कारण होते. त्याने जेरूसलेमच्या नाशाविषयी भाकीत केले होते. येशूने म्हटले: “पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रु तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढितील, तुझा चहूंकडून कोंडमारा करितील, तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवितील, आणि तुझ्यामध्ये चिऱ्‍यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टि केल्याचा समय तू ओळखला नाहीस.”—लूक १९:४३, ४४.

हे केव्हा घडणार होते? येशूने नेमका दिवस व नेमकी घटका उघडपणे सांगितली नाही. उलट त्याने हे मार्गदर्शन दिले: “यरुशलेमेस सैन्यांचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा. त्या वेळेस जे यहूदीयांत असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे शिवारांत असतील त्यांनी तिच्या आत येऊ नये.” (लूक २१:२०, २१) येशूने हे सांगितल्यानंतरच्या ३० वर्षांत जेरूसलेममधील काही ख्रिस्ती लोकांना काळाचे भान राहिले नाही आणि त्यांचे लक्ष विचलित झाले. जणू ते रस्त्याकडे न पाहता इकडे तिकडे पाहू लागले होते. त्यांनी आपल्या विचारसरणीत फेरबदल न केल्यास त्यांच्यावर संकट ओढवणे निश्‍चित होते. त्यांना वाटत असो वा नसो, पण जेरूसलेमचा नाश ठरलेला होता! * पौलाचा सल्ला जेरूसलेममधील आध्यात्मिकरित्या झोपी गेलेल्या ख्रिश्‍चनांकरता जणू जागृत होण्याचा इशारा ठरला असेल.

आजच्या काळात ‘विशेष लक्ष लावणे’

८. देवाच्या वचनातील सत्यांकडे ‘विशेष लक्ष लावणे’ का गरजेचे आहे?

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांप्रमाणे आपणही देवाच्या वचनातील सत्याकडे ‘विशेष लक्ष लावण्याची’ गरज आहे. का? कारण आपल्या समोरही नाश येऊन ठेपला आहे, आणि हा नाश केवळ एका राष्ट्राचा नव्हे, तर सबंध व्यवस्थीकरणाचा असेल. (प्रकटीकरण ११:१८; १६:१४, १६) अर्थात, यहोवा नेमक्या कोणत्या दिवशी किंवा वेळी हा नाश आणेल हे आपल्याला माहीत नाही. (मत्तय २४:३६) पण आपण ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत हे स्पष्टपणे दाखवणाऱ्‍या बायबलमधील भविष्यवाण्या पूर्ण होताना आपण आपल्या डोळ्यांनी पाहिल्या आहेत. (२ तीमथ्य ३:१-५) तेव्हा, आपले लक्ष ज्यामुळे विचलित होऊ शकेल अशा सर्व गोष्टींपासून आपण सांभाळून राहिले पाहिजे. आपण देवाच्या वचनाकडे लक्ष देण्याची आणि सदोदित या काळाचे भान ठेवण्याची गरज आहे. असे केले तरच आपण “होणाऱ्‍या ह्‍या सर्व गोष्टी चुकवावयास . . . समर्थ” होऊ.—लूक २१:३६.

९, १०. (अ) आपण आध्यात्मिक गोष्टींकडे लक्ष देत आहोत हे आपण कसे दाखवू शकतो? (ब) देवाचे वचन आपल्या ‘पावलांकरता दिवा’ आणि ‘मार्गावर प्रकाश’ कोणत्या अर्थाने आहे?

या महत्त्वपूर्ण काळात आपण आध्यात्मिक गोष्टींकडे ‘विशेष लक्ष लावत’ आहोत हे आपण कसे दाखवू शकतो? एक मार्ग म्हणजे ख्रिस्ती सभा, संमेलने आणि अधिवेशने यांत नियमितपणे उपस्थित राहण्याद्वारे. तसेच आपण बायबलचा उत्कंठेने अभ्यास केला पाहिजे जेणेकरून त्याचा लेखक असलेल्या यहोवाशी आपल्याला अधिक जवळचा संबंध जोडता येईल. (याकोब ४:८) वैयक्‍तिक अभ्यास व सभांच्या माध्यमाने आपण यहोवाविषयी ज्ञान घेत राहिलो तर आपण स्तोत्रकर्त्याप्रमाणे ठरू, ज्याने देवाला म्हटले: “तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.”—स्तोत्र ११९:१०५.

१० बायबल आपल्या “मार्गावर प्रकाशासारखे” आहे कारण ते आपल्याला भविष्याकरता देवाच्या उद्देशांविषयी सांगते. पण ते आपल्या “पावलांकरता दिव्यासारखे” देखील आहे. दुसऱ्‍या शब्दांत, जीवनात पदोपदी येणाऱ्‍या क्लेशदायक समस्यांना तोंड देताना पुढचे पाऊल कसे उचलावे याविषयी ते आपल्याला सतर्क करते. म्हणूनच, आपण सह विश्‍वासू बांधवांसोबत शिकण्याकरता एकत्रित येतो तेव्हा, आणि वैयक्‍तिकरित्या देवाचे वचन वाचतो तेव्हा त्याकडे ‘विशेष लक्ष लावणे’ अतिशय महत्त्वाचे आहे. आपण आत्मसात केलेली माहिती आपल्याला सुज्ञ आणि हितकारक निर्णय घेण्यास मदत करेल आणि यामुळे आपण यहोवाला संतुष्ट करून त्याचे हृदय आनंदित करू शकतो. (नीतिसूत्रे २७:११; यशया ४८:१७) देवाच्या आध्यात्मिक तरतुदींचा पुरेपूर फायदा घेण्याकरता सभांमध्ये आणि वैयक्‍तिक अभ्यासादरम्यान आपण अधिक वेळापर्यंत लक्ष एकाग्र करण्याकरता कोणती पावले उचलू शकतो?

सभांमध्ये एकाग्रतेची क्षमता वाढवणे

११. ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष एकाग्र करणे कधीकधी अतिशय कठीण का जाते?

११ कधीकधी ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष एकाग्र करणे अतिशय कठीण जाते. एखादे बाळ रडू लागले किंवा कोणी उशिरा आल्यामुळे बसायला जागा शोधत असेल तर आपले लक्ष सहज विचलित होते. किंवा सबंध दिवस काम करून सभेला येतो तेव्हा आपण अगदी थकलेले असतो. व्यासपीठावरून भाषण देणारा बंधू काही खास चांगला वक्‍ता नसेल तर काही क्षणातच नकळत आपले मन भलत्याच विचारांत रमून गेलेले असते किंवा आपण चक्क डुलक्या घेत असतो! पण सभांमध्ये सादर केली जाणारी माहिती किती महत्त्वाची असते हे लक्षात घेता, मंडळीच्या सभांदरम्यान आपले लक्ष एकाग्र करण्याच्या क्षमतेत आपण सुधारणा केलीच पाहिजे. पण हे आपण कसे करू शकतो?

१२. सभांमध्ये लक्ष लावणे कशामुळे सोपे जाईल?

१२ आपण चांगली तयारी केली असल्यास सहसा सभांमध्ये लक्ष लावणे सोपे जाते. तेव्हा, ज्या विषयावर चर्चा केली जाणार आहे त्यावरती सभेला येण्याआधी विचार करण्याकरता तुम्ही काही वेळ बाजूला ठेवू शकता का? आठवड्याच्या बायबल वाचनाच्या नेमलेल्या अध्यायांतील काही भाग वाचून त्यावर मनन करण्याकरता दररोज केवळ काही मिनिटे दिल्यास पुरेसे आहे. वेळेचे थोडे समायोजन केल्यास आपण मंडळीच्या पुस्तक अभ्यासाची आणि टेहळणी बुरूज अभ्यासाची तयारी करण्याकरताही वेळ काढू शकतो. प्रत्येकाचे वेळापत्रक ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार असेल, पण एक गोष्ट मात्र निश्‍चित आहे: तयारी केल्यामुळे मंडळीच्या सभांमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्‍या साहित्याकडे लक्ष देणे आपल्याला सोपे जाईल.

१३. सभांमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्‍या साहित्यावर लक्ष एकाग्र करण्यास आपल्याला कशामुळे साहाय्य मिळेल?

१३ चांगली तयारी करण्याव्यतिरिक्‍त, काहींना असे आढळले आहे की राज्य सभागृहातील समोरच्या आसनांवर बसल्यामुळेही त्यांना अधिक लक्ष देण्यास मदत मिळते. वक्‍त्‌याकडे बघणे, वचन वाचले जात असताना आपल्या बायबलमध्ये ते उघडून वाचणे आणि भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वहीत लिहून घेणे, हे मन इतरत्र न भटकू देण्याचे इतर मार्ग आहेत. पण लक्ष एकाग्र करण्याच्या कोणत्याही उपायापेक्षा आपल्या मनाची तयारी करणे सर्वात महत्त्वाचे आहे. सभेत आपण का एकत्रित होतो, हे आपण आधी समजून घेतले पाहिजे. सहविश्‍वासू बांधवांसोबत एकत्र येण्याचा आपला मुख्य उद्देश यहोवाची उपासना करणे हा आहे. (स्तोत्र २६:१२; लूक २:३६, ३७) सभा एक महत्त्वपूर्ण मार्ग आहेत ज्यांद्वारे आपल्याला आध्यात्मिक पोषण मिळते. (मत्तय २४:४५-४७) शिवाय, सभांद्वारे आपल्याला ‘प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देण्याच्या’ अनेक संधी मिळतात.—इब्री लोकांस १०:२४, २५.

१४. सभेचे यश कशावर अवलंबून आहे?

१४ काहीजण सभेत सहभाग घेणाऱ्‍यांच्या कौशल्यावरून सभेचा दर्जा कसा होता हे ठरवतात. भाषण देणारे खूप निपुण वक्‍ते असतील तर सभा चांगली होती, वक्‍ते तितके परिणामकारक नसतील तर ती चांगली नव्हती असे समजले जाते. अर्थात, सभेत भाग सादर करणाऱ्‍यांनी परिणामकारक होण्याचा आणि श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेण्याचा शक्य तितका प्रयत्न केला पाहिजे हे कबूल आहे. (१ तीमथ्य ४:१६) पण आपण, म्हणजे ऐकणाऱ्‍यांनी अनावश्‍यक टीका करण्याची वृत्ती बाळगू नये. सहभाग घेणाऱ्‍यांचे कौशल्य महत्त्वाचे असले तरीसुद्धा सभा यशस्वी होण्याकरता ही एकच बाब कारणीभूत ठरत नाही. वक्‍ता किती चांगल्याप्रकारे भाषण देतो याकडे लक्ष देण्यापेक्षा आपण किती चांगल्याप्रकारे त्याकडे कान देतो याचा विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे असे तुम्हाला वाटत नाही का? आपण सभांना उपस्थित राहून, सादर केल्या जाणाऱ्‍या भागाकडे लक्ष देतो तेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार त्याची उपासना करत असतो. आणि यामुळेच सभा यशस्वी ठरते. आपण देवाचे ज्ञान घेण्यास उत्सुक असल्यास, आपल्याला सभांमधून लाभ होईल, मग वक्‍ता निपुण असो वा नसो. (नीतिसूत्रे २:१-५) तर मग आपण सभांमध्ये ‘विशेष लक्ष लावण्याचा’ शक्य तितका प्रयत्न करू या.

वैयक्‍तिक अभ्यासातून पुरेपूर लाभ मिळवा

१५. अभ्यास व मनन यांमुळे आपल्याला कशाप्रकारे फायदा होऊ शकतो?

१५ वैयक्‍तिक अभ्यास व मनन करताना ‘विशेष लक्ष लावल्यामुळे’ आपल्याला खूप फायदा होऊ शकतो. बायबल आणि ख्रिस्ती प्रकाशने वाचून त्यांवर विचार केल्यामुळे देवाच्या वचनातील सत्ये आपल्या हृदयात बिंबवण्याच्या अनेक बहुमोल संधी आपल्याला मिळू शकतात. परिणामस्वरूप आपल्या विचारसरणीवर व वर्तणुकीवर फार मोठा प्रभाव पडतो. किंबहुना, हे यहोवाची इच्छा करण्यात आनंद मानण्यास आपल्याला मदत करते. (स्तोत्र १:२; ४०:८) अभ्यासाचे हे सर्व फायदे मिळवण्याकरता आपण आपली एकाग्रता विकसित करणे गरजेचे आहे. आपले लक्ष किती सहज विचलित होते! फोनचा किंवा दुसरा कसलाही आवाज यांसारखे लहानसहान व्यत्यय आपले लक्ष विचलित करू शकतात. किंवा मुळातच आपल्याला जास्त वेळ लक्ष एकाग्र करण्याची सवय नसेल. आपण कदाचित फार उत्सुकतेने आध्यात्मिक अन्‍न ग्रहण करण्याकरता अभ्यासाला बसत असू, पण लवकरच आपले मन नकळत भलतीकडेच भरकटू लागते. देवाच्या वचनाचा वैयक्‍तिक अभ्यास करताना आपण कशाप्रकारे ‘विशेष लक्ष लावू’ शकतो?

१६. (अ) वैयक्‍तिक अभ्यासाकरता निश्‍चित वेळ ठरवणे का महत्त्वाचे आहे? (ब) तुम्ही देवाच्या वचनाच्या अभ्यासाकरता वेळ कशाप्रकारे बाजूला ठेवला आहे?

१६ अभ्यासाकरता सर्वात पोषक ठरेल असे वेळापत्रक आणि ठिकाण आपण निवडले पाहिजे. पण आपल्यापैकी बहुतेक लोकांना पुरेसा वेळ आणि निवांत अभ्यास करण्याचे ठिकाण क्वचितच सापडते. कधीकधी असे वाटू लागते जणू नदीच्या प्रवाहात एखादी सुकलेली काडी वाहत जावी त्याप्रमाणे दैनंदिन घडामोडींचा प्रवाह आपल्याला वाहून नेत आहे. तेव्हा, खरोखरच आपल्याला प्रवाहाविरुद्ध लढायचे आहे आणि एखादे लहानसे निवांत द्वीप शोधून काढायचे आहे. अभ्यासाची योग्य संधी येण्याची आपण वाट पाहात बसू शकत नाही. उलट आपण आपल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवून अभ्यासाकरता वेळ काढला पाहिजे. (इफिसकर ५:१५, १६) काहीजण पहाटे काही वेळ अभ्यासाकरता बाजूला ठेवतात कारण या वेळी कमीतकमी व्यत्यय येण्याची शक्यता असते. इतरांना संध्याकाळचा वेळ अधिक सोयीस्कर वाटतो. मुख्य मुद्दा असा, की देवाविषयी व त्याच्या पुत्राविषयी अचूक ज्ञान घेण्याच्या महत्त्वपूर्ण गरजेकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. (योहान १७:३) तर मग आपण वैयक्‍तिक अभ्यासाकरता वेळ ठरवण्याचा आणि त्या वेळेला जडून राहण्याचा निर्धार करू या.

१७. मनन म्हणजे काय आणि यामुळे आपल्याला कोणता फायदा मिळू शकतो?

१७ मनन, अर्थात अभ्यासातून आपण जे शिकलो त्यावर चिंतन करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. मनन केल्यामुळे आपल्याला देवाचे विचार छापील कागदावरून काढून आपल्या अंतःकरणावर मुद्रित करण्यास मदत मिळते. मनन केल्यामुळे आपल्याला बायबलच्या सल्ल्याचे कसे पालन करावे हे पाहायला मदत मिळते, जेणेकरून आपण ‘केवळ ऐकणारे नव्हे तर वचनाप्रमाणे आचरण करणारे’ होतो. (याकोब १:२२-२५) शिवाय, मनन केल्यामुळे आपल्याला यहोवाच्या अधिकाधिक जवळ येण्यास मदत मिळते. कारण यामुळे आपण त्याच्या गुणांवर आणि अभ्यासादरम्यान विचारात घेतलेल्या साहित्यातून त्याचे हे गुण कशाप्रकारे प्रकट होतात यावर विचार करायला शिकतो.

१८. परिणामकारकरित्या मनन करण्यासाठी कशाप्रकारची परिस्थिती असणे आवश्‍यक आहे?

१८ अभ्यास व मनन यांतून पुरेपूर फायदा मिळवण्यासाठी आपण सर्व विचलित करणाऱ्‍या गोष्टींपासून आपले मन मोकळे केले पाहिजे. मनन करताना नवीन माहिती आत्मसात करण्यासाठी आपण आधुनिक जीवनाच्या सर्व विकर्षणांपासून स्वतःला दूर नेले पाहिजे. असे करण्यासाठी पुरेशा वेळेची आणि एकांताची गरज आहे, पण देवाच्या वचनातील सत्यरूपी आध्यात्मिक अन्‍न व पाणी ग्रहण केल्यामुळे आपल्याला किती तजेला मिळतो!

१९. (अ) वैयक्‍तिक अभ्यासाच्या संबंधाने काहींना आपली एकाग्रता विकसित करण्यासाठी कशामुळे मदत मिळाली आहे? (ब) अभ्यासाप्रती आपली कशी मनोवृत्ती असावी आणि या महत्त्वाच्या कार्यातून आपल्याला कोणकोणते फायदे प्राप्त होतात?

१९ पण आपल्याला जास्त वेळ लक्ष एकाग्र करणे जमत नसेल आणि थोडा वेळ अभ्यास केल्यावर आपले मन आपोआप विचलित होत असेल तर काय करावे? काहींना असे दिसून आले आहे की सुरवातीला कमी वेळ अभ्यास करून हळूहळू हा वेळ वाढवत गेल्यामुळे लक्ष एकाग्र करण्याची त्यांची क्षमता वाढली आहे. आपले ध्येय लवकरात लवकर अभ्यास आटोपण्याचे नव्हे, तर बराच वेळ अभ्यासात रमण्याचे आहे. यासाठी आपण अभ्यास करत असलेल्या विषयाबद्दल गोडी निर्माण केली पाहिजे. आणि विश्‍वासू व बुद्धिमान दासाने पुरवलेल्या मुबलक साहित्याच्या साहाय्याने कोणत्याही विषयावर अधिक संशोधन करणे सहज शक्य आहे. ‘देवाच्या गहन गोष्टींचे’ बारकाईने परीक्षण करणे अत्यंत मोलाचे आहे. (१ करिंथकर २:१०) असे केल्यामुळे आपल्याला देवाविषयीच्या ज्ञानात वाढत जाण्याकरता आणि आपल्या ज्ञानेंद्रियांना अधिक विकसित करण्याकरता मदत मिळते. (इब्री लोकांस ५:१४) आपण देवाच्या वचनाचा मनःपूर्वक अभ्यास केला तर आपण ‘इतरांनाही शिकविण्यास योग्य’ असे होऊ.—२ तीमथ्य २:२.

२०. आपण यहोवा देवासोबत एक जवळचा नातेसंबंध जोडून तो कायम कसा राखू शकतो?

२० ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे आणि वैयक्‍तिक अभ्यास करणे यांमुळे आपल्याला यहोवासोबत एक जवळचा नातेसंबंध जोडण्यास आणि तो कायम ठेवण्यास बऱ्‍याच प्रमाणात मदत करू शकते. निश्‍चितच, यहोवासोबत असा जवळचा संबंध असल्यामुळेच स्तोत्रकर्त्याने म्हटले असेल: “अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करितो.” (स्तोत्र ११९:९७) तर मग, आपणही सभांना, संमेलनांना व अधिवेशनांना नियमित उपस्थित राहू या. आणि बायबल अभ्यास व मनन यांकरता आपण वेळ काढू या. अशाप्रकारे, देवाच्या वचनाकडे ‘विशेष लक्ष लावल्यामुळे’ आपल्याला समृद्ध आशीर्वाद प्राप्त होतील.

[तळटीप]

^ परि. 7 इब्री लोकांना लिहिलेले पत्र कदाचित सा.यु. ६१ मध्ये लिहिण्यात आले असावे. असे असल्यास, केवळ पाच वर्षांनंतर सेस्टियस गॅलसच्या सैन्याने जेरूसलेमला वेढा घातला. पण त्याच्या सैन्याने लवकरच माघार घेतली आणि यामुळे जागृत ख्रिश्‍चनांना पळून जाण्याची संधी मिळाली. यानंतर चार वर्षांनी जनरल टायटस याच्या नेतृत्वाखाली आलेल्या रोमन सैन्याने जेरूसलेम शहराला नष्ट केले.

तुम्हाला आठवते का?

• काही इब्री ख्रिश्‍चन खऱ्‍या विश्‍वासापासून का वाहवत चालले होते?

• आपण ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष कसे एकाग्र करू शकतो?

• वैयक्‍तिक बायबल अभ्यास व मनन यांपासून फायदा करून घेण्याकरता आपल्याला कशामुळे मदत मिळेल?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[११ पानांवरील चित्र]

इब्री ख्रिश्‍चनांनी जेरूसलेमच्या होणाऱ्‍या नाशाविषयी सतर्क राहण्याची गरज होती

[१३ पानांवरील चित्र]

आईवडील आपल्या मुलांना ख्रिस्ती सभांपासून फायदा करून घेण्यास मदत करू शकतात