व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खरे संत तुमची मदत कशी करू शकतात?

खरे संत तुमची मदत कशी करू शकतात?

खरे संत तुमची मदत कशी करू शकतात?

शास्त्रवचनांमध्ये, “संत” असा भाषांतरित केलेला ग्रीक शब्द काही अनुवादांमध्ये “पवित्र जण” अशाप्रकारे अनुवादित केला आहे. ही संज्ञा कोणाला लागू होत होती? ॲन एक्स्पोझिटरी डिक्शनरी ऑफ न्यू टेस्टामेंट वड्‌र्स यात दिल्यानुसार, “विश्‍वास करणारे यांच्यासंबंधाने वापरण्यात आलेले अनेकवचनी रूप सर्व विश्‍वास करणाऱ्‍यांना लागू होते; ते केवळ असाधारणपणे पवित्र असलेल्या किंवा असाधारण सत्कृत्ये केलेल्या मृत व्यक्‍तींना लागू होत नाही.”

त्याकरता, प्रेषित पौलाने सर्व प्रारंभिक ख्रिश्‍चनांना खरे संत किंवा पवित्र जन म्हटले. उदाहरणार्थ, सा.यु. पहिल्या शतकात त्याने एक पत्र “करिंथ येथील देवाच्या मंडळीस व तिच्यासुद्धा संपूर्ण अखयातील सर्व पवित्र जनांस” उद्देशून लिहिले होते. (२ करिंथकर १:१) नंतर, पौलाने “पवित्र जन [“संत,” NW तळटीप] होण्याकरिता बोलाविलेले रोम शहरांतील देवाचे प्रियजन ह्‍या सर्वांना” उद्देशून पत्र लिहिले. (रोमकर १:१) स्पष्टतः, हे पवित्र जन अद्याप मरण पावलेले नव्हते, किंवा इतर विश्‍वास करणाऱ्‍यांपेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे वेगळे केले गेलेले नव्हते. त्यांना कोणत्या आधारावर संत म्हणण्यात आले?

देवाने पवित्र केलेले

देवाचे वचन दाखवते की, लोक किंवा कोणतीही संस्था एखाद्या व्यक्‍तीला संत बनवू शकत नाही. शास्त्रवचन म्हणते: “[देवाने] आमच्या कृत्यांप्रमाणे नव्हे तर स्वतःच्या संकल्पाप्रमाणे व कृपेप्रमाणे आम्हाला तारिले व पवित्र पाचारणाने पाचारिले आहे.” (२ तीमथ्य १:९) पवित्र जन देवाच्या पाचारणाने, देवाच्या अपात्र कृपेनुसार आणि त्याच्या उद्देशानुरूप पवित्र ठरतात.

ख्रिस्ती मंडळीतील पवित्र जन ‘नव्या कराराचे’ भागीदार आहेत. येशू ख्रिस्ताने सांडलेल्या रक्‍ताने हा करार कायदेशीर झाला आणि त्यातील भागीदार पवित्र झाले. (इब्री लोकांस ९:१५; १०:२९; १३:२०, २४) देवाच्या नजरेत शुद्ध असलेले हे लोक “पवित्र याजकगण” आहेत आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करतात.—१ पेत्र २:५, ९.

मदतीसाठी व मध्यस्थीसाठी संतांना बोलवणे

“संत” आपल्या उपासकांना चमत्कारिक शक्‍ती देऊ शकतात या विश्‍वासामुळे कोट्यवधी लोक काही वस्तूंच्या माध्यमाने त्यांची पूजा करतात किंवा मध्यस्थीसाठी त्यांना प्रार्थना करतात. ही बायबलची शिकवण आहे का? डोंगरावरील प्रवचनात, येशूने आपल्या अनुयायांना देवाला प्रार्थना कशी करायची ते शिकवले: “ह्‍यास्तव तुम्ही ह्‍या प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” (मत्तय ६:९) प्रार्थना केवळ यहोवा देवालाच उद्देशून करणे योग्य आहे.

“संतांची” मध्यस्थी योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी काही तत्त्ववेत्ते, रोमकर १५:३० चे उदाहरण देतात; तेथे आपल्याला असे वाचायला मिळते: “बंधुजनहो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्‍न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हाला विनंती करतो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा.” विश्‍वास करणाऱ्‍या त्या लोकांनी पौलाला प्रार्थना करावी किंवा त्याच्या नावाद्वारे देवाकडे जावे असे तो त्यांना उत्तेजन देत होता का? नाही. बायबलमध्ये खऱ्‍या संतांच्या किंवा पवित्र जनांच्या वतीने प्रार्थना करण्यास उत्तेजन दिले असले तरी त्यांना किंवा त्यांच्या द्वारे प्रार्थना करण्यास देव आज्ञा देतो असे कोठेही आढळणार नाही.—फिलिप्पैकर १:१, ३, ४.

तथापि, देवाने आपल्या प्रार्थनांकरता एक मध्यस्थ नेमला आहे. “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे,” असे येशू ख्रिस्त म्हणाला. “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.” येशू असेही म्हणाला: “पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.” (योहान १४:६, १३, १४) येशूच्या नावाने अर्पण केलेल्या प्रार्थना यहोवा निश्‍चित ऐकेल असा आत्मविश्‍वास आपण बाळगू शकतो. येशूसंबंधी बायबल म्हणते: “ह्‍यामुळे ह्‍याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्‍यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे; कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे.”—इब्री लोकांस ७:२५.

येशू आपल्याकरता मध्यस्थी करायला तयार असताना ख्रिस्ती धर्मजगतातील उपासक सहसा प्रार्थना करताना “संतांचा” धावा का करतात? दि एज ऑफ फेथ या आपल्या पुस्तकात, इतिहासकार विल ड्यूरंट यांनी या प्रथेचा उगम कोठून आहे ते सांगितले. सर्वशक्‍तिमान देवाचे भय धरले जात होते व येशूकडे जाणे जास्त सोपे वाटत होते; अशा वेळी ड्यूरंट म्हणतात: “[येशूने] धन्य म्हटलेल्या गोष्टींकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यावर त्याच्याशी थेट बोलायला कोणी धजत नव्हते. त्यापेक्षा संत घोषित केल्यामुळे स्वर्गात निश्‍चित असलेल्या संतासमोर आपल्या प्रार्थना मांडणे आणि ख्रिस्तासोबत त्याने किंवा तिने मध्यस्थी करावी अशी विनंती करणे अधिक शहाणपणाचे वाटत होते.” ही चिंता रास्त आहे का?

बायबल आपल्याला शिकवते की, येशूकरवी ‘देव आपले आनंदाने स्वागत करतो आणि आपल्याला हमी मिळाल्यामुळे आपल्याला कसलीही भीती न बाळगता सरळ’ देवाला प्रार्थना करता येते. (इफिसकर ३:११, १२, सुबोध भाषांतर) आपल्या प्रार्थना सर्वशक्‍तिमान देवाला ऐकता येणार नाहीत इतका तो आपल्यापासून दूर नाही. स्तोत्रकर्त्या दावीदाने आत्मविश्‍वासाने प्रार्थना केली: “तू जो प्रार्थना ऐकतोस त्या तुझ्याकडे सर्व मानवजाति येते.” (स्तोत्र ६५:२) मृत “संतांच्या” वस्तूंद्वारे शक्‍ती देण्याऐवजी जे लोक यहोवाकडे विश्‍वासाने पवित्र आत्मा मागतात त्या सर्वांना तो देतो. येशूने असा तर्क केला: “तुम्ही वाईट असताहि तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्यावयाचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल”!—लूक ११:१३.

पवित्र जनांची भूमिका

पौलाची पत्रे ज्यांना उद्देशून लिहिली होती ते पवित्र जन अनेक शतकांआधी मरण पावले आणि कालांतराने त्यांना स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थान हा “जीवनाचा मुगूट” मिळाला. (प्रकटीकरण २:१०) यहोवा देवाच्या उपासकांना याची जाणीव आहे की, या खऱ्‍या संतांची पूजा केल्याने आजारपण, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक अस्थिरता, वार्धक्य किंवा मृत्यू यांपासून संरक्षण मिळू शकणार नाही. यास्तव तुम्ही असे विचाराल, ‘देवाच्या पवित्र जनांना आपली खरोखर काळजी आहे का? आपल्या वतीने त्यांनी कार्य करावे अशी आपण अपेक्षा करू शकतो का?’

दानीएलाने नमूद केलेल्या एका भविष्यवाणीत पवित्र जनांची प्रमुख भूमिका होती. सा.यु.पू. सहाव्या शतकात, त्याने एक चित्तथरारक दृष्टान्त पाहिला ज्याची पूर्णता आपल्या काळातही होते. समुद्रातून मानवी सरकारांना सूचित करणारे चार भयंकर श्‍वापदे बाहेर आली; मानवजातीच्या खऱ्‍या गरजा पूर्ण करण्यात ते असमर्थ ठरतात. दानीएल पुढे भविष्यवाणी करतो: “तथापि परात्पर देवाचे जे पवित्र जन त्यांस राज्य प्राप्त होईल; ते राज्य सर्वकाळ युगानुयुग, त्यांच्या ताब्यात राहील.”—दानीएल ७:१७, १८.

‘पवित्र जनांमध्ये दिलेल्या वतनाविषयी’ अर्थात स्वर्गात ख्रिस्तासोबत सहवारीस असण्याविषयी पौलानेही पुनरुच्चार केला. (इफिसकर १:१८-२१) येशूच्या रक्‍तामुळे १,४४,००० पवित्र जनांचे स्वर्गीय वैभवात पुनरुत्थान होण्याचा मार्ग मोकळा झाला. प्रेषित योहानाने म्हटले: “पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे; अशा लोकांवर दुसऱ्‍या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करितील.” (प्रकटीकरण २०:४, ६; १४:१, ३) दृष्टान्तात, योहानाने असंख्य स्वर्गीय प्राण्यांना गौरव प्राप्त झालेल्या येशूसमोर असे गाताना ऐकले: “तू आपल्या रक्‍ताने सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्‍यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत, आणि आमच्या देवासाठी त्यास राजे व याजक असे केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करितील.” (प्रकटीकरण ५:९, १०) हे ऐकून किती दिलासा मिळतो! या स्त्री-पुरुषांना स्वतः यहोवा देवाने काळजीपूर्वक निवडले आहे. शिवाय, त्यांनी पृथ्वीवर विश्‍वासूपणे सेवा केली आहे; मानवांनी अनुभवलेल्या जवळजवळ प्रत्येक समस्येचा प्रत्यय त्यांना आला आहे. (१ करिंथकर १०:१३) हे पुनरुत्थित पवित्र जन, किंवा संत कृपाळू आणि समजदार शासक असतील, आपल्या दुर्बलतांचा आणि मर्यादांचा ते विचार करतील अशी खात्री आपण बाळगू शकतो.

देवाच्या राज्यातील आशीर्वाद

देवाचे राज्य सरकार पृथ्वीवरील सर्व दुष्टाई आणि त्रास मिटवून टाकण्यासाठी लवकरच कारवाई करील. त्या वेळी, मानवांचा देवाशी पूर्वीपेक्षा अधिक घनिष्ट संबंध होईल. योहानाने लिहिले: “मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: ‘पाहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील.’” यामुळे मानवांना असंख्य आशीर्वाद प्राप्त होतील, कारण भविष्यवाणीत पुढे म्हटले आहे: “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसू टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:३, ४.

तो केवढ्या आनंदाचा समय असेल! परिपूर्ण ख्रिस्त येशूच्या आणि १,४४,००० पवित्र जनांच्या शासनाच्या परिणामांचे वर्णन मीखा ४:३, ४ येथील शब्दांमध्ये केले आहे: “[यहोवा] देशोदेशीच्या बहुत लोकांचा न्याय करील, दूर असलेल्या बलवान राष्ट्रांचा इनसाफ ठरवील, तेव्हा ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्यांच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत. ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही; कारण सेनाधीश परमेश्‍वराच्या तोंडची ही वाणी आहे.”

अशा आशीर्वादांमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण पवित्र जन देत आहेत. लाक्षणिक वधू असलेले हे खरे संत असे म्हणतात: “ये.” वचन पुढे म्हणते: “ऐकणाराहि म्हणो, ये. आणि तान्हेला येवो; ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.” (प्रकटीकरण २२:१७) “जीवनाचे पाणी” यात काय काय अंतर्भूत आहे? एक म्हणजे, देवाच्या उद्देशांविषयीचे अचूक ज्ञान. येशूने देवाला अशी प्रार्थना केली: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) हे ज्ञान, बायबलचा नियमित अभ्यास केल्यावर मिळू शकते. देवाच्या वचनाकरवी पवित्र जनांची खरी ओळख आपल्याला पटू शकते आणि त्यांचा उपयोग तो मानवजातीच्या अनंतकालिक लाभाकरता कशाप्रकारे करील हे आपल्याला शिकता येईल ही आनंदाची गोष्ट नाही का?

[४ पानांवरील चित्र]

पौलाने खऱ्‍या संतांना प्रेरित पत्रे लिहिली

[४, ५ पानांवरील चित्र]

येशूचे विश्‍वासू प्रेषित खरे संत किंवा पवित्र जन बनले

[६ पानांवरील चित्र]

येशू ख्रिस्ताद्वारे आपण आत्मविश्‍वासाने देवाला प्रार्थना करू शकतो

[७ पानांवरील चित्र]

पुनरुत्थित संत, किंवा पवित्र जन पृथ्वीवरती करुणामय शासक असतील