व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गतकाळात आणि आजच्या काळातही उपयोगी ठरलेले “सेप्टुअजिंट”

गतकाळात आणि आजच्या काळातही उपयोगी ठरलेले “सेप्टुअजिंट”

गतकाळात आणि आजच्या काळातही उपयोगी ठरलेले “सेप्टुअजिंट”

एक उच्च पदस्थ माणूस इथियोपियाहून जेरूसलेमला परत जात होता. वाळवंटातील रस्त्यावरून आपल्या रथात जात असताना तो एका धार्मिक ग्रंथाच्या गुंडाळीतून मोठ्याने वाचत होता. वाचलेल्या उताऱ्‍याचे स्पष्टीकरण देण्यात आले तेव्हा त्याच्या मनावर त्याचा इतका परिणाम झाला की त्या क्षणापासून त्याचे जीवन पूर्णपणे बदलले. (प्रेषितांची कृत्ये ८:२६-३८) हा माणूस, यशया ५३:७, ८ ही वचने बायबलच्या पहिल्या भाषांतरातून, अर्थात ग्रीक सेप्टुअजिंटमधून वाचत होता. या ग्रंथाने अनेक शतकांदरम्यान बायबलच्या संदेशाचा प्रसार करण्यात इतकी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, की या बायबलने जगाचा इतिहास बदलला, असे म्हटले जाते.

सेप्टुअजिंटचे लिखाण केव्हा आणि कोणत्या परिस्थितीत झाले? अशा भाषांतराची गरज का पडली? गत शतकांत हे कितपत उपयोगी ठरले आहे? आज सेप्टुअजिंट भाषांतरातून आपल्याला काही शिकायला मिळू शकते का?

ग्रीक भाषिक यहुद्यांकरता तयार केलेले

सा.यु.पू. ३३२ साली थोर सिकंदरने टायर नावाच्या फिनिशियन शहराला नेस्तनाबूत केल्यावर इजिप्तमध्ये प्रवेश केला तेव्हा लोकांनी मशीहा म्हणून त्याचे स्वागत केले. तेथे त्याने ॲलेक्सांद्रिया नावाचे शहर स्थापित केले; हे शहर प्राचीन जगात विद्येचे माहेरघर म्हणून नावारूपास आले. आपण विजय मिळवलेल्या राष्ट्रांत ग्रीक संस्कृतीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने सिकंदरने त्याच्या विस्तृत साम्राज्यात सर्वसामान्य ग्रीक भाषा (कीनी) प्रचारात आणली.

सा.यु.पू. तिसऱ्‍या शतकात ॲलेक्सांद्रियामध्ये यहुद्यांची लोकसंख्या बरीच वाढली होती. बॅबिलोनच्या बंदिवासानंतर पॅलेस्टाईनच्या बाहेर निरनिराळ्या वसाहतींमध्ये राहत असलेल्या यहुद्यांनी ॲलेक्सांद्रिया येथे स्थलांतर केले. या यहुदी लोकांना इब्री भाषेचे कितपत ज्ञान होते? मॅक्लिंटॉक आणि स्ट्राँग सायक्लोपिडिया यात असे सांगितले आहे: “बॅबिलोनच्या बंदिवासातून परतल्यानंतर यहुद्यांना प्राचीन इब्री भाषेचे तितके ज्ञान राहिले नव्हते आणि त्यामुळे पॅलेस्टाईनच्या सभास्थानांत मोशेच्या पुस्तकांतील उताऱ्‍यांचे खास्द्यांच्या भाषेत स्पष्टीकरण दिले जाई, ही वस्तुस्थिती सर्वज्ञात आहे . . . ॲलेक्सांद्रियातील यहुद्यांना तर इब्री भाषेचे त्याहूनही कमी ज्ञान असेल; त्यांच्या ओळखीची भाषा ॲलेक्सांद्रियन ग्रीक ही होती.” ॲलेक्सांद्रिया येथील वातावरण इब्री शास्त्रवचनांचे ग्रीक भाषेत अनुवाद करण्याकरता अगदी पोषक होते.

सा.यु.पू. दुसऱ्‍या शतकात हयात असलेल्या अरिस्टोब्युलस नावाच्या एका यहुद्याच्या लिखाणात इब्री कायद्याच्या एका आवृत्तीचे ग्रीक भाषेत भाषांतर करण्यात आल्याचा उल्लेख आहे; हे भाषांतर टॉलेमी फिलेडेल्फसच्या राज्यात पूर्ण करण्यात आले. (सा.यु.पू. २८५-२४६). अरिस्टोब्युलसने “कायदा” म्हटले तेव्हा तो कशाच्या संदर्भात बोलत होता याविषयी विद्वानांची अनेक मते आहेत. काहींच्या मते तो पेन्टेट्यूकच्या संदर्भात सांगत होता, तर इतरांच्या मते सबंध इब्री शास्त्रवचनांविषयी तो बोलत असावा.

पारंपरिक इतिहासानुसार, इब्री भाषेतून ग्रीक भाषेत करण्यात आलेल्या शास्त्रवचनांच्या या पहिल्या भाषांतरात ७२ यहुदी विद्वान सामील झाले होते. नंतर ७० ही संख्या अदमासे संख्या वापरली जाऊ लागली. म्हणूनच या भाषांतराला “७०” या अर्थाच्या शब्दावरून सेप्टुअजिंट नाव पडले आणि LXX ही रोमी लिपीतील ७० संख्या यास सूचित करण्याकरता वापरली जाते. सा.यु.पू. दुसऱ्‍या शतकाच्या समाप्तीपर्यंत इब्री शास्त्रवचनांतील सर्व पुस्तके ग्रीक भाषेत वाचणे शक्य झाले. अशारितीने सेप्टुअजिंट हे नाव सबंध इब्री शास्त्रवचनांच्या ग्रीक भाषेतील अनुवादाला सूचित करण्याकरता वापरले जाऊ लागले.

पहिल्या शतकात उपयोगी

येशू ख्रिस्ताच्या व त्याच्या प्रेषितांच्या काळापूर्वी व त्यांच्या काळादरम्यान ग्रीक भाषिक यहुदी सेप्टुअजिंटचा सर्रास वापर करत होते. सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी जेरुसलेम येथे एकत्रित झालेले अनेक यहुदी व यहुदी मतानुसारी आशिया, ईजिप्त, लिबिया, रोम आणि क्रेत या ठिकाणांहून—अर्थात ग्रीक भाषिक प्रदेशांतून आले होते. ते सेप्टुअजिंट या भाषांतराशीच परिचित असावेत यात शंका नाही. (प्रेषितांची कृत्ये २:९-११) अशारितीने हे भाषांतर पहिल्या शतकात सुवार्तेच्या प्रसारात सहायक ठरले.

उदाहरणार्थ कुरेनेकर, आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आशिया येथील लोकांशी बोलताना स्तेफनाने म्हटले: “योसेफाने, आपला बाप याकोब व आपले सगळे नातलग म्हणजे पंचाहत्तर माणसे ह्‍यांना [कनान देशातून] बोलावून घेतले.” (प्रेषितांची कृत्ये ६:८-१०; ७:१२-१४) उत्पत्ति यातील ४६ व्या अध्यायात इब्री भाषेतील शास्त्रवचनांत योसेफाच्या नातलगांची संख्या सत्तर सांगण्यात आली आहे. पण सेप्टुअजिंट भाषांतरात पंचाहत्तर ही संख्या सांगितली आहे. तेव्हा स्तेफनाने सेप्टुअजिंट भाषांतरातून हा उतारा दिला हे स्पष्टच आहे.—उत्पत्ति ४६:२०, २६, २७.

प्रेषित पौलाने त्याच्या दुसऱ्‍या व तिसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यांदरम्यान अनेक देवभीरू विदेश्‍यांना आणि “भक्‍तिमान हेल्लेणी” लोकांना सुवार्ता सांगितली. (प्रेषितांची कृत्ये १३:१६, २६; १७:४) या लोकांना सेप्टुअजिंटमधून देवाविषयी थोडेफार ज्ञान मिळाल्यामुळे ते देवाला भिऊ लागले किंवा त्याची उपासना करू लागले होते. या ग्रीक भाषिकांना प्रचार करताना पौलाने सेप्टुअजिंट भाषांतरातून अनेक उतारे उद्धृत केले अथवा सारांशरूपात सांगितले.—उत्पत्ति २२:१८; गलतीकर ३:८.

ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत इब्री शास्त्रवचनांतील ३२० वचने थेटपणे उद्धृत केलेली आहेत; सर्व मिळून एकूण ८९० उद्धृत केलेले उतारे आणि संदर्भ यात आहेत. यांपैकी बहुतेक सेप्टुअजिंटमधून घेतलेले आहेत. त्यामुळे इब्री हस्तलिखितांतून न घेता सेप्टुअजिंटमधून घेतलेले उतारे ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत सामील झाले. ही गोष्ट किती अर्थसूचक होती! येशूने भाकीत केले होते की राज्याची सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल. (मत्तय २४:१४) हे साध्य करण्यासाठी यहोवा त्याच्या प्रेरित वचनाचे सबंध जगातील लोकांना वाचता येण्याकरता निरनिराळ्या भाषांत अनुवाद व्हावा असे घडवून आणणार होता.

आजही उपयोगी

सेप्टुअजिंट भाषांतर आजही उपयोगी आहे कारण नंतर नक्कल केलेल्या इब्री हस्तलिखितांत नक्कलाकारांच्या हातून काही चुका असतील तर त्या उजेडात आणण्याकरता त्याचा उपयोग केला जातो. उदाहरणार्थ, उत्पत्ति ४:८ (ईजी-टू-रीड व्हर्शन) येथील अहवालात असे म्हटले आहे: “काइन आपला भाऊ हाबेल यास म्हणाला, ‘चल, आपण जरा शेतात जाऊ या.’ तेव्हा काइनाने हाबेलाला बाहेर शेतात नेले. तेव्हा काइनाने आपला भाऊ हाबेल यावर हल्ला केला व त्याला ठार मारले.”

“चल, आपण जरा शेतात जाऊ या,” हे पोटवाक्य सा.यु. दहाव्या शतकापासूनच्या इब्री हस्तलिखितांत आढळत नाही. पण जुन्या सेप्टुअजिंट हस्तलिखितांत आणि काही इतर पुरातन संदर्भात ते आढळते. इब्री हस्तलिखितांत, संभाषण सुरू होत असल्याचे सूचित करणारा शब्द आहे, परंतु त्यापुढचे बोललेले शब्द नाहीत. असे का घडले असावे? उत्पत्ति ४:८ या वचनात “शेतात” या शब्दाकरता असलेला इब्री शब्द, एकापाठोपाठ दोन पोटवाक्यांच्या शेवटी असल्यामुळे, मॅक्लिंटॉक व स्ट्राँगच्या सायक्लोपिडियात अशी शक्यता व्यक्‍त करण्यात आली आहे की “दोन्ही पोटवाक्यांच्या शेवटी येणाऱ्‍या . . . त्या [एकाच] शब्दामुळे इब्री नक्कलाकार गोंधळात पडला असेल.” अशारितीने, “चल, आपण जरा शेतात जाऊ या” हे पहिले पोटवाक्य त्या नक्कलाकाराने गाळून टाकले असेल. स्पष्टपणे, सेप्टुअजिंट आणि अजूनही अस्तित्वात असलेली इतर जुनी हस्तलिखिते इब्री मूळग्रंथाच्या नंतर केलेल्या नक्कलींतल्या चुका सिद्ध करण्यासाठी उपयोगी पडू शकतात.

दुसरीकडे पाहता सेप्टुअजिंटच्या प्रतींमध्येही चुका असू शकतात आणि काही वेळा ग्रीकमधील या चुका सुधारण्याकरता इब्री मूळग्रंथाची मदत घेतली जाते. अशारितीने इब्री हस्तलिखितांची ग्रीक व इतर भाषांतील अनुवादांशी तुलना केल्यावर भाषांतरातील तसेच नक्कल करताना झालेल्या चुका सापडतात व देवाचे वचन अचूक स्वरूपात आपल्याला वाचायला मिळते.

सध्या अस्तित्वात असलेल्या सेप्टुअजिंटच्या पूर्ण प्रती सा.यु. चवथ्या शतकाइतक्या जुन्या आहेत. या हस्तलिखितांत आणि यानंतरच्या प्रतींतही टेट्राग्रॅमटन अर्थात चार इब्री अक्षरांनी (YHWH) सूचित केले जाणारे यहोवा हे देवाचे नाव आढळत नाही. या प्रतींत, इब्री मूळग्रंथात जेथे कोठे टेट्राग्रॅमटन शब्द आला तेथे त्याऐवजी “देव” व “प्रभू” यासाठी असलेले ग्रीक शब्द घालण्यात आले आहेत. पण साधारण ५० वर्षांआधी पॅलेस्टाईन येथे लागलेल्या एका शोधामुळे या विषयावर आणखी प्रकाश टाकण्यात आला. मृत समुद्राच्या पश्‍चिम किनाऱ्‍याजवळ असलेल्या काही गुहांमध्ये शोधकार्य करताना एका गटाला १२ संदेष्ट्यांची (होशेय ते मलाखी) लिखाणे असलेल्या चामड्याच्या गुंडाळीचे काही तुकडे सापडले. ही लिखाणे सा.यु.पू. ५० पासून सा.यु. ५० या कालावधीतील होती. या पुरातन तुकड्यांत टेट्राग्रॅमटनच्या ऐवजी “देव” व “प्रभू” यांकरता असलेले ग्रीक शब्द वापरण्यात आलेले नव्हते. त्यामुळे सुरवातीच्या सेप्टुअजिंट भाषांतरात देवाचे नाव वापरण्यात आले होते ते निश्‍चितार्थाने स्थापित झाले.

१९७१ साली एक प्राचीन पपायरसच्या गुंडाळीतल्या (फुएड पपायरी २६६) काही तुकड्यांचे प्रकाशन करण्यात आले. सा.यु.पू. दुसऱ्‍या किंवा पहिल्या शतकाइतक्या जुन्या असलेल्या सेप्टुअजिंटच्या या भागांतून काय उजेडात आले? यात देखील देवाचे नाव राखण्यात आले होते. सेप्टुअजिंटच्या या आधीच्या अवशेषांतून याचा अगदी पक्का पुरावा मिळतो की येशू व त्याचे पहिल्या शतकातील शिष्य देवाच्या नावाशी परिचित होते आणि त्याचा वापर करत होते.

आज बायबल इतिहासातले सर्वाधिक अनुवाद झालेले पुस्तक आहे. मानवजातीतल्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना ते, निदान त्याचा काही भाग तरी स्वतःच्या भाषेत वाचण्याकरता उपलब्ध आहे. आपल्याला पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर या अचूक आधुनिक भाषेतील भाषांतराविषयी सर्वाधिक धन्यता वाटते, जे आज संपूर्ण किंवा त्याचा काही भाग ४० पेक्षा अधिक भाषांतून उपलब्ध आहे. संदर्भांसहित—पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषातंर यात शेकडो तळटीप संदर्भ आहेत, जे सेप्टुअजिंट आणि इतर प्राचीन हस्तलिखितांतून घेण्यात आले आहेत. खरोखर सेप्टुअजिंट हे आपल्या काळातल्या बायबल विद्यार्थ्यांकरताही रोचक आणि उपयोगी ठरले आहे.

[२६ पानांवरील चित्र]

शिष्य फिलिप्प याने ‘सेप्टुअजिंटमधील’ उतारा समजावून सांगितला

[२९ पानांवरील चित्रे]

प्रेषित पौल कित्येकदा ‘सेप्टुअजिंटमधून’ उतारे उद्धृत करत असे