व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जे तुम्ही शिकला ते आचरीत राहा

जे तुम्ही शिकला ते आचरीत राहा

जे तुम्ही शिकला ते आचरीत राहा

“माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले, व माझे जे ऐकले, पाहिले ते आचरीत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.”—फिलिप्पैकर ४:९.

१, २. सर्वसामान्यपणे, स्वतःला धार्मिक प्रवृत्तीचे समजणाऱ्‍या लोकांच्या जीवनात बायबल खरोखरच प्रभाव करत आहे का? स्पष्ट करा.

“धर्माचा उत्कर्ष पण नैतिकतेचा ऱ्‍हास.” नव्या प्रवृत्ती (इंग्रजी) नावाच्या बातमीपत्रकातील हा ठळक मथळा अमेरिकेत घेण्यात आलेल्या एका राष्ट्रीय सार्वमताच्या निष्कर्षाचा सारांश होता. या देशात चर्चला उपस्थित राहणाऱ्‍या आणि धर्माला आमच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे असे म्हणणाऱ्‍या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. पण सदर वृत्तात म्हटल्याप्रमाणे: “या संख्या प्रभावित करणाऱ्‍या जरूर आहेत पण धार्मिक विश्‍वासांचा लोकांच्या वैयक्‍तिक जीवनावर आणि सर्वसामान्यपणे समाजावर कितपत प्रभाव पडला आहे याविषयी बरेच अमेरिकन साशंक आहेत.”

ही परिस्थिती केवळ एका देशापुरती मर्यादित नाही. सबंध जगात बरेच लोक आपण बायबलच्या शिकवणुकी स्वीकारल्या आहेत आणि आपण धार्मिक प्रवृत्तीचे आहोत असे म्हणतात, पण ते शास्त्रवचनांना आपल्या जीवनावर खऱ्‍या अर्थाने प्रभाव करू देत नाहीत. (२ तीमथ्य ३:५) एका संशोधन गटाच्या प्रमुखाने म्हटले, “आम्ही अजूनही बायबलचा मनःपूर्वक आदर करतो, पण ते वाचण्याविषयी, त्याचा अभ्यास करण्याविषयी आणि त्याचे पालन करण्याविषयी म्हणाल, तर ते भूतकाळात जमा झाले आहे.”

३. (अ) खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या जीवनावर बायबलचा कसा प्रभाव पडतो? (ब) येशूचे अनुयायी फिलिप्पैकर ४:९ यातील पौलाच्या मार्गदर्शनाचे कशाप्रकारे पालन करतात?

पण खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. देवाच्या वचनातील सल्ल्याचे पालन केल्यामुळे त्यांचे विचार आणि आचरण बदलले आहे. आणि त्यांचे नवे व्यक्‍तिमत्त्व इतरांना सहज दिसून येते. (कलस्सैकर ३:५-१०) येशूच्या अनुयायांकरता बायबल हे कधीही वापरले न जाणारे, शो-केसमध्ये धूळ खात पडणारे पुस्तक नाही. उलट, प्रेषित पौलाने फिलिप्पैमधील ख्रिश्‍चनांना असे सांगितले: “माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले, व माझे जे ऐकले, पाहिले ते आचरीत राहा; म्हणजे शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.” (तिरपे वळण आमचे.) (फिलिप्पैकर ४:९) ख्रिस्ती लोक देवाच्या वचनातील सत्य केवळ स्वीकारत नाहीत. तर ते त्यानुसार आचरण करतात—कुटुंबात, नोकरीच्या ठिकाणी, मंडळीत आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांत ते बायबलच्या मार्गदर्शनाचे सतत पालन करतात.

४. देवाच्या नियमांनुसार आचरण करणे सोपे का नाही?

देवाच्या नियमांनुसार व तत्त्वांनुसार आचरण करणे सोपे नाही. आपण दियाबल सैतानाच्या प्रभावाखाली असलेल्या जगात राहात आहोत; बायबलमध्ये त्याला ‘ह्‍या युगाचे दैवत’ म्हटले आहे. (२ करिंथकर ४:४; १ योहान ५:१९) तेव्हा, यहोवा देवाला विश्‍वासू राहण्याच्या मार्गात अडथळा बनू शकेल अशा कोणत्याही गोष्टीपासून आपण सावध राहणे गरजेचे आहे. आपण कशाप्रकारे यहोवाला नेहमी विश्‍वासू राहू शकतो?

“सुवचनांचा नमुना” दृढपणे राखणे

५. “मला अनुसरावे” या येशूच्या विधानाचा काय अर्थ होतो?

शिकलेल्या गोष्टींनुसार आचरण करण्यात समाविष्ट असलेली एक गोष्ट म्हणजे सत्य न मानणाऱ्‍यांकडून विरोध झाला तरीही खऱ्‍या उपासनेचे एकनिष्ठपणे समर्थन करणे. शेवटपर्यंत धीर धरण्याकरता आपल्याला मेहनत करावी लागेल. येशूने म्हटले: “माझ्यामागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.” (मत्तय १६:२४) केवळ एक आठवडा, एक महिना किंवा एका वर्षापुरते आपल्याला अनुसरावे असे येशूने म्हटले नाही. तर “मला अनुसरावे” इतकेच त्याने म्हटले. त्याच्या या शब्दांवरून दिसून येते की येशूचे शिष्य होणे ही आपल्या जीवनातील केवळ एक अवस्था किंवा आज आहे आणि उद्या नाही अशाप्रकारचा तात्पुरता ध्यास नाही. खऱ्‍या उपासनेचे एकनिष्ठपणे समर्थन करणे म्हणजे, निवडलेल्या मार्गावर काहीही झाले तरी, विश्‍वासूपणे चालत राहणे. हे आपण कसे करू शकतो?

६. पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी पौलाकडून शिकलेल्या सुवचनांचा नमुना काय आहे?

पौलाने आपला सहकर्मी तीमथ्य याला म्हटले: “ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्‍वास व प्रीती ह्‍यामध्ये दृढपणे राख.” (२ तीमथ्य १:१३) पौलाचा असे म्हणण्यामागचा काय अर्थ होता? याठिकाणी “नमुना” याकरता वापरलेला ग्रीक शब्द मुळात कलाकाराने काढलेल्या रेखाचित्रालासूचित करतो. हे चित्र अगदी सुस्पष्ट नसले तरी त्यातील रेषा व आकार स्पष्ट असतात जेणेकरून जाणत्या व्यक्‍तीला सबंध चित्र कसे असेल हे समजू शकते. त्याचप्रकारे पौलाने तीमथ्याला व इतरांना शिकवलेला सत्याचा नमुना प्रत्येक संभाव्य प्रश्‍नाचे उत्तर सुस्पष्टपणे देण्याकरता तयार करण्यात आला नव्हता. पण तरीसुद्धा हा शिकवणुकींचा संचय पुरेसे मार्गदर्शन पुरवण्याकरता पर्याप्त आहे—तो एखाद्या रूपरेषेप्रमाणे आहे, ज्यावरून प्रामाणिक अंतःकरणाचे लोक यहोवा आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे समजू शकतात. अर्थात, देवाला संतुष्ट करण्यासाठी त्यांना या सुवचनांच्या नमुन्याला जडून राहणे अर्थात शिकलेल्या गोष्टींनुसार सातत्याने आचरण करत राहणे गरजेचे होते.

७. ख्रिस्ती लोक सुवचनांचा नमुना दृढपणे कसा राखू शकतात?

पहिल्या शतकात हुमनाय, आलेक्सांद्र व फिलेत ‘सुवचनांच्या नमुन्याशी’ सुसंगत नसलेल्या विचारांचे समर्थन करत होते. (१ तीमथ्य १:१८-२०; २ तीमथ्य २:१६, १७) सुरवातीचे ख्रिस्ती धर्मत्यागी लोकांच्या प्रभावात येऊन वाहवत जाण्याचे कशाप्रकारे टाळू शकत होते? प्रेरित लिखाणांचा लक्षपूर्वक अभ्यास करण्याद्वारे व त्यांनुसार आचरण करण्याद्वारे. पौलाच्या व इतर विश्‍वासू जनांच्या आदर्शानुरूप आचरण करणारे, त्यांना शिकवण्यात आलेल्या सत्याच्या नमुन्याच्या एकवाक्यतेत नसलेल्या कोणत्याही गोष्टीला लगेच ओळखून तिचा धिक्कार करण्यास समर्थ होते. (फिलिप्पैकर ३:१७; इब्री लोकांस ५:१४) ‘वादविवाद व शब्दयुद्ध ह्‍यांमुळे वेडे’ होण्याऐवजी ते सुभक्‍तीच्या योग्य मार्गावर प्रगती करत राहिले. (१ तीमथ्य ६:३-६) आपणही शिकलेल्या गोष्टींनुसार आचरण करण्याद्वारे असेच करत असतो. सबंध पृथ्वीवर यहोवाची सेवा करणारे लाखो लोक त्यांना शिकवण्यात आलेल्या बायबल सत्याचा नमुना दृढपणे राखत आहेत हे पाहून आपला विश्‍वास किती बळकट होतो.—१ थेस्सलनीकाकर १:२-५.

‘कल्पित कहाण्यांचा’ धिक्कार करा

८. (अ) सैतान आज आपला विश्‍वास नष्ट करण्याचा कसा प्रयत्न करतो? (ब) २ तीमथ्य ४:३, ४ येथे पौलाने कोणती ताकीद दिली आहे?

सैतान आपल्या मनात शिकलेल्या गोष्टींविषयी शंका उत्पन्‍न करण्याद्वारे आपला विश्‍वास कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो. पहिल्या शतकाप्रमाणे आज देखील धर्मत्यागी व इतरजण कमअनुभवी जणांचा विश्‍वास नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. (गलतीकर २:४; ५:७, ८) कधीकधी ते प्रसिद्धी माध्यमांचा उपयोग करून यहोवाच्या लोकांच्या कार्यपद्धतींविषयी किंवा हेतूंविषयी विपर्यस्त माहिती किंवा धडधडीत खोटी माहिती देखील पसरवतात. काहीजण सत्यातून भटकतील याची पौलाने ताकीद दिली होती. त्याने लिहिले: “ते सुशिक्षण ऐकूण घेणार नाहीत, तर आपल्या कानांची खाज जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवितील, आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील, व कल्पित कहाण्यांकडे वळतील, अशी वेळ येईल.”—२ तीमथ्य ४:३, ४.

९. पौलाने ‘कल्पित कहाण्यांविषयी’ सांगितले तेव्हा त्याच्या मनात काय असावे?

सुवचनांचा नमुना दृढपणे राखण्याऐवजी काहीजणांना ‘कल्पित कहाण्यांविषयी’ कुतूहल वाटू लागले होते. या कल्पित कहाण्या कशाविषयी होत्या? कदाचित पौलाच्या मनात तोबीत यांसारख्या बायबलच्या प्रेरित पुस्तकांच्या यादीत जोडण्यात आलेल्या मनःकल्पित कथा असाव्यात. * कल्पित कहाण्यांत सनसनाटी किंवा शंकास्पद अफवांचा देखील समावेश असू शकतो. याशिवाय, काहींची त्यांच्याच “स्वेच्छाचाराने,” अर्थात देवाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्‍यक नाही असे म्हणणाऱ्‍यांमुळे किंवा मंडळीत पुढाकार घेणाऱ्‍यांविरुद्ध टीका करणाऱ्‍यांमुळे वैचारिक फसवणूक झाली असावी. (३ योहान ९, १०; यहूदा ४) अडखळणास कारणीभूत ठरलेली कोणतीही गोष्ट असली तरीसुद्धा एक गोष्ट स्पष्ट होती, काहींना देवाच्या वचनातील सत्यापेक्षा खोट्या शिकवणुकी अधिक सोयीस्कर वाटू लागल्या होत्या. लवकरच त्यांनी शिकलेल्या गोष्टींनुसार वागण्याचे सोडून दिले आणि यामुळे त्यांचेच आध्यात्मिकरित्या नुकसान झाले.—२ पेत्र ३:१५, १६.

१०. सध्याच्या काळातील कल्पित कहाण्या कोणत्या आहेत आणि योहानाने सावध राहण्याच्या गरजेवर कशाप्रकारे भर दिला?

१० आज आपण कल्पित कहाण्यांनी वाहवत जाण्याचे टाळू शकतो; यासाठी आपण काय ऐकतो आणि वाचतो हे तपासून पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ, प्रसिद्धी माध्यमांत अनैतिकतेला बऱ्‍याच वेळा प्रोत्साहन दिले जाते. बरेच लोक अज्ञेयवादाचे किंवा सरळसरळ नास्तिकवादाचे समर्थन करतात. बायबलची टीका करणारे, ते देवाने प्रेरित केले आहे या दाव्याची थट्टा करतात. आणि आधुनिक काळातील धर्मत्यागी देखील ख्रिश्‍चनांचा विश्‍वास कमकुवत करण्यासाठी त्यांच्या मनात शंका उत्पन्‍न करण्याचा सतत प्रयत्न करतात. पहिल्या शतकातही खोट्या संदेष्ट्यांकडून असाच धोका होता; त्याविषयी प्रेषित योहानाने अशी ताकीद दिली होती: “प्रियजनहो, प्रत्येक आत्म्याचा विश्‍वास धरू नका, तर ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत ह्‍याविषयी त्यांची परीक्षा करा; कारण पुष्कळ खोटे संदेष्टे जगात उठले आहेत.” (१ योहान ४:१) त्याअर्थी आपण सावध राहण्याची गरज आहे.

११. आपण विश्‍वासात आहोत किंवा नाही हे तपासून पाहण्याचा एक मार्ग कोणता आहे?

११ यासंदर्भात पौलाने म्हटले: “तुम्ही विश्‍वासात आहा किंवा नाही ह्‍याविषयी आपली परीक्षा करा.” (२ करिंथकर १३:५) आपण सर्व ख्रिस्ती विश्‍वासांना जडून राहतो किंवा नाही हे ठरवण्याकरता स्वतःचे परीक्षण करण्याचा सल्ला प्रेषित पौलाने दिला. असंतुष्ट वृत्ती असणाऱ्‍यांच्या गोष्टींना आपण कान देत असल्यास आपण स्वतःचे प्रार्थनापूर्वक परीक्षण केले पाहिजे. (स्तोत्र १३९:२३, २४) आपल्याला यहोवाच्या लोकांच्या चुका शोधण्याची सवय आहे का? असल्यास, आपण असे का करतो? त्यांच्यापैकी कोणाच्या बोलण्याने वा वागण्याने आपले मन दुखावले आहे का? जर हे खरे असेल तर आपण त्या परिस्थितीविषयी खरोखर योग्य दृष्टिकोन राखत आहोत का? या व्यवस्थीकरणात आपल्याला तोंड द्यावे लागणारे कोणतेही संकट तात्पुरते आहे. (२ करिंथकर ४:१७) मंडळीत आपल्याला परीक्षेला तोंड द्यावे लागले तरीसुद्धा आपण देवाची सेवा का सोडून द्यावी? जर एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला वाईट वाटले असेल तर ती समस्या सोडवण्याकरता आपल्या हातात जे आहे ते करून बाकीचे यहोवाच्या हाती सोपवून देणेच सर्वात उत्तम ठरणार नाही का?—स्तोत्र ४:४; नीतिसूत्रे ३:५, ६; इफिसकर ४:२६.

१२. बिरुयातील लोकांनी कशाप्रकारे आपल्याकरता उत्तम उदाहरण मांडले?

१२ टीका करण्याऐवजी, वैयक्‍तिक अभ्यासातून व मंडळीच्या सभांतून शिकायला मिळणाऱ्‍या गोष्टींविषयी आपण आध्यात्मिकरित्या सुदृढ दृष्टिकोन बाळगू या. (१ करिंथकर २:१४, १५) आणि देवाच्या वचनाविषयी शंका घेण्याऐवजी शास्त्रवचनाचे बारकाईने परीक्षण करणाऱ्‍या बिरुयातील लोकांची मनोवृत्ती बाळगणे किती सुज्ञतेचे ठरेल! (प्रेषितांची कृत्ये १७:१०, ११) आपण कल्पित कहाण्यांचा धिक्कार करून सत्याला जडून राहण्याचा निर्धार करण्याद्वारे शिकलेल्या गोष्टींनुसार आचरण करत राहू या.

१३. आपण नकळत खोटी माहिती पसरवण्यात कशाप्रकारे सामील होऊ शकतो?

१३ कल्पित कहाण्यांचा आणखी एक प्रकार आहे ज्यापासून आपण सावध राहिले पाहिजे. बऱ्‍याचदा ई-मेलच्या माध्यमाने अनेक विलक्षण कहाण्या पसरवल्या जातात. अशा माहितीविषयी आपण सावधगिरी बाळगली पाहिजे, खासकरून ही माहिती मुळात कोणाकडून आली आहे हे आपल्या माहीत नसते तेव्हा. एखादा अनुभव किंवा गोष्ट एखाद्या सन्मानीय ख्रिस्ती बांधवाने पाठवलेली असेल तरीसुद्धा या व्यक्‍तीला विशिष्ट गोष्टीसंबंधी प्रत्यक्ष माहिती नसण्याची शक्यता आहे. म्हणूनच अशाप्रकारची संशयास्पद माहिती इतरांना सांगताना किंवा दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या ई-मेल पत्त्यावर पाठवताना आपण सावधगिरी बाळगणे आवश्‍यक आहे. निश्‍चितच आपण “देवहीन गोष्टी” किंवा “अनीतिच्या” गोष्टी पसरवण्यात सहभाग घेऊ इच्छित नाही. (१ तीमथ्य ४:७; ईजी-टू-रीड व्हर्शन) आपल्याला एकमेकांशी सत्य बोलण्याची आज्ञा देण्यात आली आहे त्याअर्थी नकळत का होईना, पण खोटी माहिती पसरवण्यात आपल्याला सामील करणाऱ्‍या गोष्टी टाळल्यास आपण सुज्ञतेने वागू.—इफिसकर ४:२५.

सत्यानुसार आचरण करण्याचे सकारात्मक परिणाम

१४. देवाच्या वचनातून शिकलेल्या गोष्टींनुसार आचरण केल्यामुळे कोणते फायदे प्राप्त होतात?

१४ वैयक्‍तिक अभ्यासातून व ख्रिस्ती सभांमधून शिकायला मिळालेल्या गोष्टींनुसार आचरण केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात. उदाहरणार्थ, आपल्यासोबत विश्‍वासात एका घरचे झालेल्यांशी आपले नातेसंबंध सुधारल्याचे कदाचित आपल्याला आढळेल. (गलतीकर ६:१०) बायबलच्या तत्त्वांचे पालन केल्यामुळे आपला स्वभाव सुधारेल. (स्तोत्र १९:८) शिवाय, आपण जे शिकतो त्याचे पालन केल्यामुळे आपण ‘देवाच्या शिक्षणाला शोभा आणतो’ आणि पर्यायाने इतरांनाही खऱ्‍या उपासनेकडे आकर्षित करतो.—तीत २:६-१०.

१५. (अ) एका तरुण मुलीने शाळेत साक्ष देण्याकरता कशाप्रकारे धैर्य एकवटले? (ब) या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला मिळाले?

१५ यहोवाच्या साक्षीदारांमध्ये अनेक तरुण आहेत जे वैयक्‍तिक अभ्यासातून व ख्रिस्ती प्रकाशनांतून तसेच मंडळीच्या सभांमध्ये नियमित उपस्थित राहिल्यामुळे शिकायला मिळालेल्या गोष्टींनुसार आचरण करतात. त्यांच्या उत्तम आचरणामुळे शिक्षकांना व शाळासोबत्यांना उत्तम साक्ष मिळते. (१ पेत्र २:१२) संयुक्‍त संस्थानांतील लेस्ली नावाच्या एका १३ वर्षांच्या मुलीचे उदाहरण घ्या. ती कबूल करते की तिला शाळेतल्या मुलांशी आपल्या विश्‍वासाबद्दल बोलणे कठीण जात होते. पण एके दिवशी हे बदलले. “लोक कशाप्रकारे काही वस्तू विकण्याचा प्रयत्न करतात याविषयी वर्गात चर्चा चालली होती. एका मुलीने हात वर करून यहोवाच्या साक्षीदारांचे उदाहरण दिले.” एक साक्षीदार या नात्याने लेस्लीची काय प्रतिक्रिया होती? ती सांगते, “मी माझ्या विश्‍वासाचे समर्थन केले. मला खात्री आहे की सगळ्यांना याचे आश्‍चर्य वाटले असेल, कारण मी सहसा शाळेत अगदी शांत असते.” लेस्लीने दाखवलेल्या या धैर्यामुळे काय परिणाम घडून आला? लेस्ली सांगते, “मी त्या विद्यार्थिनीला एक माहितीपत्रक आणि एक हस्तपत्रिका देऊ शकले कारण तिला आणखी काही शंका होत्या.” शिकलेल्या गोष्टींनुसार आचरण करणारी कोवळी मुले शाळेत साक्ष देण्याकरता धैर्य एकवटतात तेव्हा यहोवाला किती आनंद वाटत असेल!—नीतिसूत्रे २७:११; इब्री लोकांस ६:१०

१६. ईश्‍वरशासित सेवा प्रशालेमुळे एका तरुण साक्षीदार मुलीला कशाप्रकारे फायदा झाला?

१६ दुसरे उदाहरण एलिझबेथ हिचे आहे. ती सात वर्षांची होती तेव्हापासून माध्यमिक शाळेतील सर्व वर्षांदरम्यान जेव्हा जेव्हा ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत तिला नेमणूक मिळाली तेव्हा तेव्हा ती आपल्या शिक्षकांना राज्य सभागृहात सभेला येण्याचे निमंत्रण देत आली आहे. एखाद्या शिक्षकाला येता आले नाही तर ती शाळेनंतर थांबून आपल्या शिक्षकासमोर ते भाषण सादर करत असे. उच्च माध्यमिक शाळेतील शेवटल्या वर्षी एलिझबेथने ईश्‍वरशासित सेवा प्रशालेच्या फायद्यांविषयी दहा पानांचा एक रिपोर्ट तयार करून चार शिक्षकांसमोर तो सादर केला. तिला ईश्‍वरशासित सेवा प्रशालेचे एक भाषण नमुनेदाखल सादर करण्याची विनंती करण्यात आली तेव्हा तिने यासाठी “देवाने दुष्टाईला अनुमती का दिली” हा विषय निवडला. एलिझबेथला यहोवाच्या साक्षीदारांकरवी चालवल्या जाणाऱ्‍या ईश्‍वरशासित सेवा प्रशालेमुळे खूप फायदा झाला आहे. यहोवाच्या वचनातून शिकलेल्या गोष्टीनुसार आचरण करण्याद्वारे त्याचे गौरव करणाऱ्‍या असंख्य तरुण ख्रिश्‍चनांपैकी ती केवळ एक उदाहरण आहे.

१७, १८. (अ) प्रामाणिकतेविषयी बायबलमध्ये कोणता सल्ला देण्यात आला आहे? (ब) यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकाने दाखवलेल्या प्रामाणिकतेमुळे एका माणसावर कसा प्रभाव पडला?

१७ बायबल ख्रिश्‍चनांना सर्व व्यवहारांत प्रामाणिक असण्याचे मार्गदर्शन देते. (इब्री लोकांस १३:१८) बेईमानीमुळे आपला इतरांसोबतचा आणि मुख्य म्हणजे यहोवा देवासोबतचा नातेसंबंध नष्ट होऊ शकतो. (नीतिसूत्रे १२:२२) आपल्या विश्‍वसनीय आचरणामुळे आपण शिकलेल्या गोष्टींनुसार आचरण करत आहोत हे सिद्ध होते आणि यामुळे अनेक लोक यहोवाच्या साक्षीदारांचा अधिक आदर करू लागले आहेत.

१८ फिलिप नावाच्या, लष्करी सेवेत असलेल्या एका गृहस्थाचा अनुभव लक्षात घ्या. त्याच्या हातून सही केलेला एक कोरा धनादेश हरवला होता. शेवटी टपालाने तो त्याला परत करण्यात आला तोपर्यंत त्याच्या हे लक्षात आले नव्हते. हा धनादेश यहोवाच्या साक्षीदारांपैकी एकाला सापडला आणि सोबत पाठवलेल्या लहानशा पत्रात त्याने म्हटले होते, की आपल्या धार्मिक विश्‍वासांमुळेच प्रेरित होऊन आपण हा धनादेश परत पाठवत आहोत. फिलिपला आपल्या डोळ्यांवर विश्‍वासच बसेना. तो म्हणतो, “हा माणूस सहज मला ४,३२,००० रुपयांचा फटका देऊ शकला असता!” याआधी एकदा चर्चमध्ये त्याची टोपी चोरीला गेल्यामुळे त्याला खूप वाईट वाटले होते. नंतर असे दिसून आले की त्याच्याच ओळखीच्या एकाने ती टोपी घेतली होती, पण याप्रसंगी एका अनोळखी माणसाने लाखो रुपयांची किंमत असलेला त्याचा धनादेश परत केला होता! खरोखर प्रामाणिक ख्रिस्ती यहोवा देवाला गौरव आणतात!

शिकलेल्या गोष्टींनुसार आचरण करत राहा

१९, २०. आपण शिकत असलेल्या शास्त्रवचनीय गोष्टींनुसार वागल्यास आपल्याला कशाप्रकारे फायदा होईल?

१९ देवाच्या वचनातून शिकलेल्या गोष्टींनुसार आचरण करणाऱ्‍यांना अनेक फायदे प्राप्त होतात. शिष्य याकोबाने लिहिले: “जो स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमांचे निरीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता, कृति करणारा होतो व त्याला आपल्या कार्यांत धन्यता मिळेल.” (याकोब १:२५) होय, आपण शिकलेल्या शास्त्रवचनीय गोष्टींनुसार आचरण केल्यास आपल्याला खरा आनंद मिळेल आणि जीवनाच्या दबावांना अधिक चांगल्याप्रकारे तोंड द्यायला आपल्याला मदत मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला यहोवाचे आशीर्वाद आणि सार्वकालिक जीवन प्राप्त होईल!—नीतिसूत्रे १०:२२; १ तीमथ्य ६:६.

२० तर मग सातत्याने देवाच्या वचनाचा अभ्यास करण्याचा निर्धार करा. यहोवाच्या उपासकांसोबत नियमितरित्या एकत्रित व्हा आणि ख्रिस्ती सभांमध्ये सादर केल्या जाणाऱ्‍या माहितीकडे लक्ष द्या. जे तुम्ही शिकता त्याचे पालन करा, त्यानुसार आचरण करत राहा म्हणजे, “शांतिदाता देव तुमच्याबरोबर राहील.”—फिलिप्पैकर ४:९.

[तळटीप]

^ परि. 9 तोबीत हे कदाचित सा.यु.पू. तिसऱ्‍या शतकात लिहिण्यात आले असावे; यात तोबीयास नावाच्या एका यहुदी व्यक्‍तीची अंधविश्‍वासयुक्‍त कथा आहे. या माणसाला एका महाकाय मत्स्याचे हृदय, पित्ताशय व यकृत यांच्या साहाय्याने रोग बरे करण्याची आणि दुरात्मे घालवण्याची शक्‍ती होती असे यात सांगितले होते.

तुम्हाला आठवते का?

• ‘सुवचनांचा नमुना’ म्हणजे काय आणि आपण तो दृढपणे कसा राखू शकतो?

• कोणत्या ‘कल्पित कहाण्यांचा’ आपण धिक्कार करावा?

• देवाच्या वचनातून शिकलेल्या गोष्टींनुसार आचरण करणाऱ्‍यांना कोणते फायदे मिळतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१७ पानांवरील चित्र]

सुरवातीचे ख्रिस्ती धर्मत्यागी लोकांच्या शिकवणुकींनी वाहवत जाण्याचे कसे टाळू शकत होते?

[१८ पानांवरील चित्रे]

प्रसिद्धी माध्यमांतून, इंटरनेटच्या माध्यमातून अथवा आधुनिक काळातील धर्मत्यागी लोकांच्या माध्यमातून शंकेचे बीज पेरले जाऊ शकते

[१९ पानांवरील चित्र]

ज्यांची खात्री नाही अशा गोष्टी आपसात वितरित करणे सुज्ञतेचे नाही

[२० पानांवरील चित्रे]

कामाच्या ठिकाणी, शाळेत आणि इतरत्र यहोवाचे साक्षीदार देवाच्या वचनात वाचलेल्या गोष्टींचे पालन करतात