“तो मला संथ पाण्यावर नेतो”
“तो मला संथ पाण्यावर नेतो”
बायबल देशांतील उष्ण वातावरणात, मेंढरांना रोज पाणी लागते. त्यामुळे आपल्या कळपाला दररोज पाणी पाजण्याचे काम, मेंढपाळाच्या कामांपैकी महत्त्वाचे काम आहे. कधीकधी, मेंढपाळांना आपल्या कळपासाठी विहिरींतून पाणी शेंदून ते हौदात ओतावे लागते जेणेकरून सर्व मेंढरांना पाणी पिता येईल. (उत्पत्ति २९:१-३) पण, पावसाळ्यात खासकरून, लहान लहान प्रवाहांच्या व नद्यांच्या आसपासचा परिसर शांत, ‘हिरवागार’ होतो.—स्तोत्र २३:२.
एका चांगल्या मेंढपाळाला आपल्या कळपासाठी पाणी आणि कुरणं कुठे सापडतील हे माहीत असले पाहिजे. त्याला एखादे क्षेत्र चांगल्याप्रकारे माहीत असेल तर त्याची मेंढरे निश्चितच जिवंत राहतील. अनेक वर्षे यहुदाच्या डोंगरांमध्ये मेंढरे राखण्याचे काम केलेल्या दाविदाने, देवाकडून मिळणाऱ्या आध्यात्मिक मार्गदर्शनाची तुलना एका अशा मेंढपाळाबरोबर केली जो आपल्या मेंढरांना हिरव्यागार कुरणांकडे व जीवनप्रदायक पाण्याकडे नेतो. दावीद म्हणतो: “तो मला संथ पाण्यावर नेतो.”—स्तोत्र २३:१-३
अनेक वर्षांनंतर, यहोवाने यहेज्केल संदेष्ट्याद्वारे असेच एक उदाहरण दिले. मेंढपाळ जसे आपल्या मेंढरांना एकत्र आणतो तसेच देशांतील आपल्या लोकांना एकत्र आणण्याचे वचन यहोवाने दिले. त्याने अशी हमी दिली: “मी त्यांस . . . स्वदेशी परत आणीन; मी इस्राएलाच्या पर्वतावर, नाल्याजवळ . . . यांस चारीन.”—यहेज्केल ३४:१३
आपल्याला आध्यात्मिक पाणी देण्याची देखील यहोवा देवाला काळजी आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकात, देवाच्या राजासनातून ‘जीवनाच्या पाण्याच्या नदीविषयीचे’ वर्णन देण्यात आले आहे. (प्रकटीकरण २२:१) या नदीचे पाणी पिण्याचे सर्व लोकांना आमंत्रण दिले जात आहे. “ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो.”—प्रकटीकरण २२:१७.
ही जीवनाच्या पाण्याची लाक्षणिक नदी सार्वकालिक जीवनासाठी देवाने केलेल्या तरतूदींना सूचित करते. ‘एकच खरा देव व ज्याला त्याने पाठविले त्या येशू ख्रिस्ताचे’ ज्ञान घेण्याद्वारे कोणीही हे पाणी पिऊ शकतो.—योहान १७:३.