व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अंत जवळ येत असता अधिकाधिक आज्ञाधारक राहा

अंत जवळ येत असता अधिकाधिक आज्ञाधारक राहा

अंत जवळ येत असता अधिकाधिक आज्ञाधारक राहा

“राष्ट्रे [शिलोची] आज्ञांकित होतील.”उत्पत्ति ४९:१०.

१. (अ) गतकाळात यहोवाला आज्ञाधारक राहण्यात बऱ्‍याचदा काय समाविष्ट होते? (ब) आज्ञांकित होण्याविषयी याकोबाने कोणती भविष्यवाणी केली?

यहोवाचे आज्ञापालन करण्यात त्याच्या प्रतिनिधींनाही आज्ञाधारक राहणे समाविष्ट आहे. पूर्वीही आपल्या सेवकांनी आपल्या प्रतिनिधींना अर्थात स्वर्गदूत, कुलपिता, न्यायी, याजक, संदेष्टे आणि राजे यांना आज्ञाधारक राहावे अशी यहोवाने अपेक्षा केली होती. इस्राएलच्या राजांच्या सिंहासनाला तर यहोवाचे सिंहासन म्हणण्यात आले. (१ इतिहास २९:२३) पण दुःखाची गोष्ट म्हणजे, इस्राएलच्या बऱ्‍याच शासकांनी यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन केले आणि स्वतःवर व आपल्या प्रजेवरही संकट ओढवून घेतले. पण यहोवाने आपल्या एकनिष्ठ सेवकांना कोणत्याही आशेविना त्यागले नाही; तर त्याने एका अविनाशी राजाला सिंहासनाधिष्ट करण्याची प्रतिज्ञा करून त्यांचे सांत्वन केले; एक असा राजा ज्याला आज्ञांकित होण्यास नीतिमान जनांना आनंद वाटेल. (यशया ९:६, ७) कुलपिता याकोब मरणासन्‍न असताना त्याने या भविष्यातील शासकाविषयी असे भाकीत केले: “यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो [शिलो] येईपर्यंत ते त्याजकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.”—उत्पत्ति ४९:१०, तळटीप.

२. “शिलो” या शब्दाचा अर्थ काय आणि त्याच्या राज्यशासनात कोण सामील असतील?

“शिलो” हा इब्री भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ “ज्याचे आहे तो” असा होतो. होय, शिलोला राजवेत्र अर्थात शासन करण्याचा अधिकार आणि राजदंड अर्थात नेतृत्व करण्याकरता सत्ता प्राप्त होईल. शिवाय, त्याचे राज्यशासन केवळ याकोबाच्या वंशजांकरता नव्हे तर सर्व ‘राष्ट्रांकरता’ असेल. हे यहोवाने अब्राहामला दिलेल्या प्रतिज्ञेशी सुसंगत आहे: “तुझी संतति आपल्या शत्रूंची नगरे हस्तगत करील . . . पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ति २२:१७, १८) यहोवाने सा.यु. २९ साली नासरेथच्या येशूला पवित्र आत्म्याने अभिषिक्‍त करून या ‘संततीची’ ओळख खात्रीलायकपणे पटवून दिली.—लूक ३:२१-२३, ३४; गलतीकर ३:१६.

येशूचे प्रथम राज्य

३. येशू स्वर्गात गेल्यावर त्याला कोणते शासन देण्यात आले?

येशू स्वर्गात गेला तेव्हा त्याने लगेच सबंध जगातील लोकांवरील शासनाचे राजवेत्र हाती घेतले नाही. (स्तोत्र ११०:१) पण त्याला एक “राज्य” देण्यात आले व त्यातील प्रजा त्याच्या आज्ञेत होती. प्रेषित पौलाने या राज्याची ओळख करून देताना म्हटले: “[देवाने] आपल्याला [आत्म्याने अभिषिक्‍त केलेल्या ख्रिश्‍चनांना] अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले.” (तिरपे वळण आमचे.) (कलस्सैकर १:१३) अंधाराच्या सत्तेतून काढून टाकणे सा.यु. ३३ साली पेन्टेकॉस्टच्या दिवशी सुरू झाले जेव्हा येशूच्या विश्‍वासू अनुयायांवर पवित्र आत्मा ओतला गेला.—प्रेषितांची कृत्ये २:१-४; १ पेत्र २:९.

४. येशूच्या सुरवातीच्या शिष्यांनी आज्ञाधारकपणा कसा दाखवला आणि येशूने त्यांची सामूहिकरित्या कशाप्रकारे ओळख करून दिली?

‘ख्रिस्ताच्या वतीने वकिली करणारे’ या नात्याने आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या शिष्यांनी आज्ञाधारकपणे अशांना एकत्रित करण्यास सुरवात केली, की जे त्या आत्मिक राज्यात “बरोबरीचे नागरिक” होतील. (२ करिंथकर ५:२०; इफिसकर २:१९; प्रेषितांची कृत्ये १:८) शिवाय, यांना आपला राजा येशू ख्रिस्त याची संमती मिळवण्याकरता “एकचित्ताने व एकमताने जोडलेले” व्हायचे होते. (१ करिंथकर १:१०) सामूहिकरित्या ते ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ किंवा विश्‍वासू कारभारी होते.—मत्तय २४:४५; लूक १२:४२.

देवाच्या ‘कारभाऱ्‍याचे’ आज्ञापालन केल्यामुळे आशीर्वादित

५. प्राचीन काळापासून यहोवाने आपल्या लोकांना कशाप्रकारे शिकवले?

यहोवाने नेहमीच आपल्या लोकांकरता शिक्षकांची तरतूद केली. उदाहरणार्थ, यहुदी बॅबिलोनहून परतले तेव्हा एज्रा व इतर काही सुयोग्य पुरुषांनी केवळ लोकांना देवाचे नियमशास्त्र मोठ्याने वाचून दाखवले नाही तर “स्पष्टीकरणासहित” ते वाचले जेणेकरून देवाचे वचन ‘लोकांस समजले.’—नहेम्या ८:८.

६, ७. दास वर्गाने आपल्या नियमन मंडळाच्या माध्यमाने यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न कशाप्रकारे पुरवले आहे आणि दास वर्गाला अधीनता दाखवणे योग्य का आहे?

पहिल्या शतकात, सा.यु. ४९ साली सुंतेचा प्रश्‍न उपस्थित झाला तेव्हा त्या आरंभीच्या दास वर्गाने प्रार्थनापूर्वक या विषयावर विचारविनिमय करून शास्त्रवचनांच्या आधारावर निष्कर्ष काढला. त्यांनी आपला निर्णय पत्राद्वारे घोषित केला तेव्हा त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचे मंडळ्यांनी पालन केले आणि यामुळे त्यांना देवाचा समृद्ध आशीर्वाद प्राप्त झाला. (प्रेषितांची कृत्ये १५:६-१५, २२-२९; १६:४, ५) त्याचप्रमाणे आधुनिक काळातही विश्‍वासू दासाने आपल्या नियमन मंडळाच्या माध्यमाने ख्रिस्ती तटस्थता, रक्‍ताचे पावित्र्य आणि मादक पदार्थ व तंबाखूचा वापर यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर स्पष्टीकरण पुरवले आहे. (यशया २:४; प्रेषितांची कृत्ये २१:२५; २ करिंथकर ७:१) यहोवाने आपल्या लोकांना, आपले वचन व विश्‍वासू दास यांना आज्ञाधारक राहिल्यामुळे आशीर्वादित केले आहे.

दास वर्गाला आज्ञाधारक राहिल्यामुळे देवाचे लोक आपला स्वामी, येशू ख्रिस्त यालाही अधीनता दाखवतात. अशाप्रकारे अधीन राहणे या आधुनिक काळात अधिकच अर्थसूचक आहे कारण याकोबाने मरण्याआधी केलेल्या भविष्यवाणीनुसार येशूचा अधिकार वाढवण्यात आला आहे.

शिलो पृथ्वीचा यथान्याय शासक बनतो

८. ख्रिस्ताचा अधिकार कसा आणि केव्हा वाढवण्यात आला?

याकोबाने भाकीत केले होते की “राष्ट्रे” शिलोची “आज्ञांकित होतील.” स्पष्टपणे ख्रिस्ताचे शासन आत्मिक इस्राएलपुरते मर्यादित राहणार नाही. तर ते कोणाला सामावेल? प्रकटीकरण ११:१५ उत्तर देते: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करील.” (तिरपे वळण आमचे.) बायबलमधून दिसून येते की येशूला हा अधिकार भविष्यसूचक “सात काळ”—“परराष्ट्रीयांची सद्दी”—संपुष्टात आल्यावर अर्थात, १९१४ साली प्राप्त झाला. * (दानीएल ४:१६, १७; लूक २१:२४) त्या वर्षी, मशीही राजा या नात्याने ख्रिस्ताची अदृश्‍य “उपस्थिती” तसेच ‘शत्रूंवर प्रभुत्व करण्याचा’ त्याचा काळही सुरू झाला.—मत्तय २४:३, NW; स्तोत्र ११०:२.

९. येशूला राज्य मिळाले तेव्हा त्याने काय केले आणि याचा मानवजातीवर व खासकरून त्याच्या शिष्यांवर अप्रत्यक्षरित्या काय परिणाम झाला?

येशूला राज्य शासन मिळाल्यावर त्याची सर्वात पहिली कारवाई म्हणजे आज्ञाभंगाचे रूप अर्थात सैतान व त्याचे दुरात्मे यांना ‘पृथ्वीवर टाकून देणे.’ तेव्हापासून या दुष्टात्म्यांनी मानवांकरता अभूतपूर्व प्रमाणात अरिष्टे निर्माण केली आहेत, शिवाय यहोवाला आज्ञाधारक राहणे अतिशय कठीण जाईल अशाप्रकारचे वातावरण त्यांनी निर्माण केले आहे. (प्रकटीकरण १२:७-१२; २ तीमथ्य ३:१-५) किंबहुना, सैतानाच्या आत्मिक युद्धाचे मुख्य लक्ष्य “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे” यहोवाचे अभिषिक्‍त जन व त्यांचे सोबती अर्थात “दुसरी मेंढरे” यांना समाविष्ट करते.—प्रकटीकरण १२:१७; योहान १०:१६.

१०. बायबलमधील कोणत्या भविष्यवाण्यांच्या पूर्णतेमुळे सैतानाला खऱ्‍या ख्रिश्‍चनांविरुद्ध यश मिळणार नाही हे सिद्ध होते?

१० सैतान शेवटी यशस्वी होणारच नाही हे निश्‍चित आहे कारण हा ‘प्रभूचा दिवस’ असून येशूला “विजयावर विजय” मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. (प्रकटीकरण १:१०; ६:२) उदाहरणार्थ, तो १,४४,००० आत्मिक इस्राएलच्या शेवटल्या सदस्यावर शिक्का मारेल. तसेच, ‘सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे ह्‍यांच्यापैकी कोणाला मोजता आला नाही अशा मोठा लोकसमुदायाचे’ संरक्षण देखील करील. (प्रकटीकरण ७:१-४, ९, १४-१६) पण हे लोक आपल्या अभिषिक्‍त सोबत्यांप्रमाणे स्वर्गात न जाता, पृथ्वीवर येशूचे आज्ञाधारक प्रजाजन बनतील. (दानीएल ७:१३, १४) आज ते पृथ्वीवर आहेत ही वस्तुस्थितीच मुळात सिद्ध करते की शिलो खरोखरच ‘जगाच्या राज्याचा’ शासक आहे.—प्रकटीकरण ११:१५.

‘सुवार्ता मानण्याची’ हीच वेळ आहे

११, १२. (अ) सद्याच्या व्यवस्थीकरणाच्या अंतातून केवळ कोण बचावतील? (ब) “जगाचा आत्मा” आत्मसात करणाऱ्‍यांमध्ये कोणते गुण निर्माण होतात?

११ सार्वकालिक जीवन मिळवू इच्छिणाऱ्‍या सर्वांनी आज्ञाधारक राहण्यास शिकले पाहिजे कारण बायबल स्पष्टपणे म्हणते की, “जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत” ते देवाच्या सूड घेण्याच्या दिवशी बचावणार नाहीत. (२ थेस्सलनीकाकर १:८) पण सध्याचे दुष्ट वातावरण आणि बायबलच्या नियमांविरुद्ध बंडखोरी करण्याचा आत्मा यांमुळे सुवार्ता मानणे अधिकाधिक कठीण जाते.

१२ बायबलमध्ये, देवाविरुद्ध विद्रोह करण्याच्या प्रवृत्तीला “जगाचा आत्मा” म्हणण्यात आले आहे. (१ करिंथकर २:१२) लोकांवर याचा कसा परिणाम होतो याविषयी सांगताना प्रेषित पौलाने पहिल्या शतकातील इफिससच्या ख्रिश्‍चनांना असे लिहिले: “त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात ह्‍या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपति म्हणजे आज्ञा मोडणाऱ्‍या लोकांत आता कार्य करणाऱ्‍या आत्म्याचा अधिपति ह्‍याच्या धोरणाप्रमाणे चालत होता; त्या लोकांत आम्हीहि सर्व पूर्वी आपल्या दैहिक वासनांना अनुरूप असे वागलो, आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करीत होतो व स्वभावत: इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो.”—इफिसकर २:२, ३.

१३. ख्रिस्ती लोक जगाच्या आत्म्याचा प्रभावीपणे प्रतिकार कसा करू शकतात आणि यामुळे कोणते चांगले परिणाम प्राप्त होतात?

१३ आनंदाची गोष्ट म्हणजे इफिसकर ख्रिस्ती त्या आज्ञाभंजक आत्म्याचे गुलाम बनले नाहीत. तर देवाच्या आत्म्याला अधीन राहून आणि त्याचे विपुल व आरोग्यदायक फळ प्राप्त करण्याद्वारे ती देवाची आज्ञाधारक मुले बनली. (गलतीकर ५:२२, २३) त्याचप्रमाणे आज देखील देवाचा आत्मा—विश्‍वातील सर्वात सामर्थ्यशाली शक्‍ती—लाखो लोकांना यहोवाला आज्ञाधारक होण्यास मदत करत आहे जेणेकरून त्यांना ‘शेवटपर्यंत आशेची पूर्ण खातरी करून घेता यावी.’—इब्री लोकांस ६:११; जखऱ्‍या ४:६.

१४. येशूने शेवटल्या काळात राहणाऱ्‍या सर्व ख्रिश्‍चनांना त्यांच्या आज्ञाधारकतेची परीक्षा घेणाऱ्‍या विशिष्ट गोष्टींविषयी कशाप्रकारे सतर्क केले?

१४ हे देखील आठवणीत असू द्या, की आपल्याला शिलोचा सामर्थ्यशाली आधार आहे आणि आपल्या पित्यासोबत तो कोणाही दुरात्म्याला किंवा मानवाला आपल्या सहनशक्‍तीच्या पलीकडे आपल्या आज्ञाधारकतेची परीक्षा घेऊ देणार नाही. (१ करिंथकर १०:१३) किंबहुना, आपल्या आत्मिक लढाईत आपली मदत करण्यासाठी येशूने अशा विविध समस्यांचे सुस्पष्ट वर्णन केले ज्या आपल्याला या शेवटल्या काळात सोसाव्या लागू शकतात. हे त्याने सात पत्रांच्या माध्यमाने केले जी त्याने एका दृष्टान्तात प्रेषित योहानाला प्रकट केली. (प्रकटीकरण १:१०, ११) निश्‍चितच या पत्रांत त्या काळातील ख्रिश्‍चनांकरता महत्त्वपूर्ण सल्ला होता पण तो १९१४ पासून सुरू झालेल्या ‘प्रभूच्या दिवसात’ खासकरून लागू होतो. तेव्हा या संदेशांकडे आपण लक्ष देणे खरोखर किती महत्त्वाचे आहे! *

उदासीनता, अनैतिकता, भौतिकवाद टाळा

१५. इफिससच्या मंडळीत असलेल्या समस्येपासून आपणही सांभाळून राहणे का आवश्‍यक आहे आणि हे आपण कसे करू शकतो? (२ पेत्र १:५-८)

१५ येशूचे पहिले पत्र इफिससच्या मंडळीला उद्देशून लिहिलेले होते. या मंडळीला धीर धरण्याबद्दल शाबासकी दिल्यानंतर येशूने म्हटले: “तरी तू आपली पहिली प्रीति सोडली ह्‍याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे.” (प्रकटीकरण २:१-४) आज, एकेकाळी आवेशी असणारे काही ख्रिस्ती देवाबद्दल पूर्वी असलेले उत्साही प्रेम गमावून बसले आहेत. असे घडल्यामुळे एका व्यक्‍तीचा देवासोबतचा संबंध कमकुवत होऊ शकतो आणि म्हणून याकडे तातडीने लक्ष देणे आवश्‍यक आहे. असे प्रेम कशाप्रकारे पुन्हा प्रज्वलित करता येते? नियमित बायबल अभ्यास, सभांना उपस्थिती, प्रार्थना आणि मनन यांद्वारे. (१ योहान ५:३) अर्थात, याकरता बराच “प्रयत्न” करणे आवश्‍यक आहे पण शेवटी तो सार्थक ठरेल. (२ पेत्र १:५-८) प्रामाणिक आत्मपरीक्षण केल्यावर जर तुम्हाला आपले पूर्वीचे प्रेम थंडावले आहे असे जाणवले तर लगेच ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा; येशूच्या पुढील आग्रही सल्ल्याचे पालन करा: “तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर; व तू पश्‍चात्ताप करून आपली पहिली कृत्ये कर.”—प्रकटीकरण २:५.

१६. पर्गम व थुवतीरा येथील मंडळ्यांत कोणते आध्यात्मिकरित्या धोकेदायक कुप्रभाव अस्तित्वात होते आणि येशूने त्यांना दिलेला सल्ला आजही समर्पक आहे असे का म्हणता येईल?

१६ पर्गम व थुवतीरा येथील ख्रिश्‍चनांची त्यांचा विश्‍वासूपणा, धीर व आवेश यांकरता प्रशंसा करण्यात आली. (प्रकटीकरण २:१२, १३, १८, १९) पण तरीसुद्धा या मंडळ्यांत लैंगिक अनैतिकता आणि बआलाची उपासना करण्याद्वारे प्राचीन इस्राएलास भ्रष्ट करणाऱ्‍या बलाम व इजबेल यांच्याप्रमाणे दुष्ट प्रवृत्ती दाखवणाऱ्‍यांचा प्रभाव होता. (गणना ३१:१६; १ राजे १६:३०, ३१; प्रकटीकरण २:१४, १६, २०-२३) पण आपल्या काळाविषयी, ‘प्रभूच्या दिवसाविषयी’ काय? आजही तेच कुप्रभाव दिसून येतात का? होय, किंबहुना देवाच्या लोकांमधून बहिष्कृत केल्या जाण्यामागचे सर्वात मुख्य कारण अनैतिकता हेच आहे. तेव्हा, मंडळीच्या आत असो वा बाहेर, पण नैतिकरित्या भ्रष्ट करणाऱ्‍या सर्व व्यक्‍तींपासून आपण दूर राहणे अतिशय महत्त्वाचे आहे! (१ करिंथकर ५:९-११; १५:३३) शिलोचे आज्ञाधारक प्रजाजन होऊ इच्छिणाऱ्‍यांनी आक्षेपार्ह करमणूक, तसेच अश्‍लील पुस्तक-मासिके व इंटरनेटवरील साईट्‌स देखील आवर्जून टाळल्या पाहिजेत.—आमोस ५:१५; मत्तय ५:२८, २९.

१७. सार्दीस व लावदिकीया येथील मंडळ्यांचा दृष्टिकोन व मनोवृत्ती, येशूला त्यांच्या आध्यात्मिक स्थितीविषयी असलेल्या दृष्टिकोनापेक्षा कशी वेगळी होती?

१७ फार कमी व्यक्‍तींचा अपवाद वगळता सार्दीसच्या मंडळीची कशाबद्दलही प्रशंसा करण्यात आली नाही. ही मंडळी जिवंत आहे असे भासत होते किंवा तिच्याविषयी असे ‘म्हटले’ जात होते पण आध्यात्मिक गोष्टींविषयीची उदासीनता या मंडळीत इतकी काही फैलावली होती की येशूच्या नजरेत ती ‘मेलेली’ होती. सुवार्तेला ती केवळ वरवर मानत होती. किती लज्जास्पद दोषारोप! (प्रकटीकरण ३:१-३) लावदिकीया येथील मंडळीही काहीशा अशाच स्थितीत होती. “मी धन मिळविले आहे,” असे म्हणून ती भौतिक संपत्तीविषयी फुशारकी मारत होती, पण येशूच्या लेखी ती ‘कष्टी, दीन, दरिद्री, आंधळी व उघडीवाघडी’ होती.—प्रकटीकरण ३:१४-१७.

१८. एक व्यक्‍ती देवाच्या नजरेत आध्यात्मिकरित्या कोमट बनण्याचे कसे टाळू शकते?

१८ आज एकेकाळी विश्‍वासू असणारे ख्रिस्ती अशाच आज्ञाभंजक प्रवृत्तीचे अनुसरण करत आहेत. कदाचित जगाच्या आत्म्यामुळे त्यांना या शेवटल्या काळाच्या निकडीचे भान राहिलेले नाही आणि यामुळे बायबल अभ्यास, प्रार्थना, ख्रिस्ती सभा आणि सेवा यांसंदर्भात त्यांची मनोवृत्ती आध्यात्मिकरित्या कोमट अशी झाली आहे. (२ पेत्र ३:३, ४, ११, १२) अशांनी ख्रिस्ताच्या आज्ञांचे पालन करून आध्यात्मिक धनात गुंतवणूक करणे—‘अग्नीने शुद्ध केलेले सोने [ख्रिस्तापासून] विकत घेणे’ अत्यंत महत्त्वाचे आहे! (प्रकटीकरण ३:१८) हे अस्सल धन म्हणजे ‘सत्कर्माविषयी धनवान असणे; परोपकारी व दानशूर असणे’ होय. या खरोखर मोलवान धनाची गुंतवणूक केल्यामुळे आपण ‘खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल, असा साठा स्वतःसाठी करत असतो.’—१ तीमथ्य ६:१७-१९.

आज्ञाधारकतेबद्दल प्रशंसित

१९. स्मुर्णा व फिलदेल्फिया येथील ख्रिश्‍चनांना येशूने कशाविषयी शाबासकी दिली व काय निक्षून सांगितले?

१९ स्मुर्णा व फिलदेल्फिया या दोन मंडळ्या आज्ञाधारकतेचे आदर्श म्हणून ठळक दिसतात कारण येशूच्या पत्रांत त्यांच्याकरता काहीही ताडन नाही. स्मुर्णा मंडळीला तो म्हणतो: “तुझे क्लेश व तुझे दारिद्र्‌य मला ठाऊक आहे—तरी तू धनवान आहेस.” (प्रकटीकरण २:९) जगिक धनाची फुशारकी मिरवणाऱ्‍या पण आध्यात्मिक दृष्टीने दरिद्री असलेल्या लावदिकीया येथील लोकांपेक्षा ही मंडळी किती वेगळी आहे! अर्थात, ख्रिस्ताला विश्‍वासूपणा व आज्ञाधारकता दाखवणाऱ्‍यांना पाहून दियाबलाला आनंद झाला नाही. म्हणूनच येशू ताकीद देतो: “तुला जे काही सोसावे लागणार आहे त्याचे भय धरू नको; पाहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हापैकी कित्येकांस तुरूंगात टाकणार आहे; आणि तुमचे दहा दिवस हालअपेष्टांत जातील. मरेपर्यंत तू विश्‍वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुगूट देईन.” (प्रकटीकरण २:१०) त्याचप्रकारे फिलदेल्फिया मंडळीच्या लोकांना येशूने असे म्हणून शाबासकी दिली की: “तू माझे वचन पाळले [किंवा मला आज्ञाधारक राहिला] व माझे नाव नाकारले नाही. मी लवकर येतो; तुझा मुगूट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे ते दृढ धरून राहा.”—प्रकटीकरण ३:८, ११.

२०. आज लाखो जणांनी येशूचे वचन कशाप्रकारे पाळले आणि कशाप्रकारच्या परिस्थितीत राहूनही त्यांनी असे केले?

२० ‘प्रभूच्या दिवसात’ अर्थात १९१४ साली त्याची सुरवात झाल्यापासून विश्‍वासू शेषजन आणि दुसऱ्‍या मेंढरांतील त्यांचे सोबती जे आता लाखोंच्या घरात आहेत, त्यांनी सेवाकार्यात आवेशाने सहभाग घेण्याद्वारे आणि विश्‍वासूपणे टिकून राहण्याद्वारे येशूचे वचन पाळले आहे. पहिल्या शतकातील आपल्या बांधवांप्रमाणे त्यांच्यापैकी काहींनी ख्रिस्ताला आज्ञाधारक राहिल्यामुळे छळ सोसला; काहींना तुरुंगात व छळ छावण्यांत टाकण्यात आले. इतरांनी समृद्ध व धनलोभी वातावरणात राहूनही आपला “डोळा निर्दोष” राखून येशूचे वचन पाळले आहे. (मत्तय ६:२२, २३) होय, प्रत्येक वातावरणात आणि प्रत्येक परिस्थितीत खरे ख्रिस्ती आपल्या आज्ञाधारकपणामुळे सतत यहोवाच्या अंतःकरणास संतोषवितात.—नीतिसूत्रे २७:११.

२१. (अ) दास वर्ग कोणती आध्यात्मिक जबाबदारी पूर्ण करत राहतील? (ब) आपण खरोखर शिलोला आज्ञाधारक राहू इच्छितो हे आपण कसे दाखवू शकतो?

२१ मोठे संकट जवळ येत असता, ‘विश्‍वासू व बुद्धिमान दास’ यांचा निर्धार आहे की आपला स्वामी, ख्रिस्त याला, कोणतीही तडजोड न करता ते शेवटपर्यंत आज्ञाधारक राहतील. यात देवाच्या घराण्याकरता यथाकाळी आध्यात्मिक अन्‍न पुरवणे देखील समाविष्ट आहे. तेव्हा आपण यहोवाच्या अद्‌भुत ईश्‍वरशासित संघटनेविषयी व ती जे आज पुरवत आहे त्याविषयी सदोदित कदर बाळगू या. असे केल्यामुळे आपण शिलोला आज्ञाधारक आहोत हे दाखवतो. तो आपल्या सर्व आज्ञाधारक प्रजाजनांना सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ देईल.—मत्तय २४:४५-४७; २५:४०; योहान ५:२२-२४.

[तळटीपा]

^ परि. 8 ‘सात काळांविषयीच्या’ स्पष्टीकरणाकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान या पुस्तकातील अध्याय १० कृपया पाहा.

^ परि. 14 सर्व सात पत्रांच्या सविस्तर स्पष्टीकरणाकरता कृपया यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे! पुस्तकात पृष्ठ ३३ पासून पाहा.

तुम्हाला आठवते का?

• याकोबाने मरण्यापूर्वी केलेल्या भविष्यवाणीनुसार येशू कोणती भूमिका बजावणार होता?

• येशू हाच शिलो आहे हे आपण कसे ओळखतो आणि आपण कोणती प्रवृत्ती टाळली पाहिजे?

• प्रकटीकरणातील सात मंडळ्यांना लिहिलेल्या पत्रांत आपल्या काळाकरता समर्पक असलेला कोणता सल्ला सापडतो?

• स्मुर्णा व फिलदेल्फिया येथील प्राचीन मंडळ्यांचे आपण कशाप्रकारे अनुकरण करू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१८ पानांवरील चित्रे]

विश्‍वासू ‘कारभाऱ्‍याला’ आज्ञाधारक राहण्याबद्दल यहोवा आपल्या लोकांना आशीर्वादित करतो

[१९ पानांवरील चित्र]

सैतानाच्या कुप्रभावामुळे देवाला आज्ञाधारक राहणे एक आव्हान आहे

[२१ पानांवरील चित्रे]

यहोवासोबत दृढ नातेसंबंध आपल्याला त्याच्या आज्ञा पाळण्यास मदत करतो