आज्ञाधारक राहणाऱ्यांना यहोवा आशीर्वाद व संरक्षण देतो
आज्ञाधारक राहणाऱ्यांना यहोवा आशीर्वाद व संरक्षण देतो
“जो माझे ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीति नसल्यामुळे स्वस्थ असतो.”—नीतिसूत्रे १:३३.
१, २. देवाला आज्ञाधारक राहणे का महत्त्वाचे आहे? स्पष्ट करा.
मऊ पिवळ्या पिसांची गुबगुबीत गोजिरवाणी पिले गवतात दाणे शोधण्यात मग्न आहेत. वरती घिरट्या घालणाऱ्या घारीचे त्यांना जराही भान नाही. अचानक, कोंबडी मोठ्याने ओरडते आणि आपले पंख पसरते. आईचा हा इशारा मिळताच ही पिल्ले लगेच तिच्याकडे धाव घेतात आणि क्षणार्धात तिच्या पंखांखाली सुरक्षित लपून बसतात. घारीचा प्रयत्न निष्फळ होतो. * यातून कोणता धडा शिकायला मिळतो? आज्ञाधारकता जीवनदायक ठरते!
२ हा धडा आज ख्रिश्चनांकरता विशेषतः महत्त्वाचा आहे कारण सैतान देवाच्या लोकांना आपले सावज बनवण्याकरता पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करत आहे. (प्रकटीकरण १२:९, १२, १७) आपली आध्यात्मिकता नष्ट व्हावी व पर्यायाने यहोवाची संमती आणि सार्वकालिक जीवनाची आशा आपण गमवावी हेच त्याचे ध्येय आहे. (१ पेत्र ५:८) पण जर आपण देवाच्या समीप राहून त्याच्या वचनाच्या व त्याच्या संस्थेच्या माध्यमाने मिळणाऱ्या मार्गदर्शनाला लगेच प्रतिसाद दिला तर आपल्याला त्याचे संरक्षण मिळेल याची आपण खात्री बाळगू शकतो. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल.”—स्तोत्र ९१:४.
एक आज्ञाभंजक राष्ट्र बळी पडते
३. इस्राएलाने वारंवार आज्ञाभंग केल्यामुळे शेवटी काय परिणाम झाला?
३ इस्राएल राष्ट्र यहोवाला आज्ञाधारक राहिले तोपर्यंत यहोवाकडून त्यांचे संरक्षण व संभाळ होत राहिला. पण वारंवार हे लोक आपल्या निर्माणकर्त्याला सोडून, ज्या ‘निरर्थक वस्तूंपासून त्यांना काही लाभ व त्यांचा उद्धार’ होणे शक्य नव्हते अशा लाकडाच्या व दगडाच्या देवतांची उपासना करू लागायचे. (१ शमुवेल १२:२१) शतकानुशतके देवाविरुद्ध विद्रोह केल्यानंतर हे सबंध राष्ट्र धर्मत्यागात इतक्या खोलवर बुडाले की त्यांचे पुन्हा वर येणे अशक्य झाले. म्हणूनच येशूने दुःखाने म्हटले: “यरूशलेमे, यरूशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणाऱ्ये, व तुझ्याकडे पाठविलेल्यांस धोंडमार करणाऱ्ये! जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबाळांना एकवटावयाची कितीदा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती! पाहा, तुमचे घर तुम्हावर सोडले आहे.”—मत्तय २३:३७, ३८.
४. यहोवाने जेरुसलेमला त्यागले होते हे सा.यु. ७० साली कशाप्रकारे प्रत्ययास आले?
४ यहोवाने विश्वासघाती इस्राएल राष्ट्राला त्यागले याची सा.यु. ७० साली दुःखद प्रचिती आली. त्या वर्षी रोमी सैन्याने, गरुडाची आकृती असलेली आपली ध्वजे उंच फडकावीत जेरूसलेमवर झडप घातली आणि तेथे भयंकर प्रमाणात रक्त सांडले. त्या वेळी वल्हांडणाचा सण साजरा करण्यासाठी आलेल्या यहुद्यांमुळे शहर गजबजलेले होते. त्यांनी वाहिलेली असंख्य अर्पणे यहोवाची कृपा मिळवून देण्यास असमर्थ ठरली. ही दुःखद घटना, आज्ञाभंग करणाऱ्या शौल राजाजवळ शमुवेलाने काढलेल्या उद्गारांची आठवण करून देणारी होती: “परमेश्वराचा शब्द पाळिल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? १ शमुवेल १५:२२.
पाहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे; एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे.”—५. यहोवा कशाप्रकारच्या आज्ञाधारकतेची अपेक्षा करतो आणि अशाप्रकारची आज्ञाधारकता अशक्य नाही हे आपण कशावरून म्हणू शकतो?
५ आज्ञा पाळण्यावर यहोवा वारंवार जोर देत असला तरीसुद्धा अपरिपूर्ण मानवांच्या मर्यादांची त्याला पुरेपूर जाणीव आहे. (स्तोत्र १३०:३, ४) त्याला केवळ कशाची अपेक्षा आहे, तर प्रांजळ मनोभावाची आणि विश्वास, प्रीती आणि त्याला दुखवण्याबद्दल वाटणाऱ्या सुदृढ भीतीवर आधारित असलेल्या आज्ञाधारकतेची. (अनुवाद १०:१२, १३; नीतिसूत्रे १६:६; यशया ४३:१०; मीखा ६:८; रोमकर ६:१७) अशी ही आज्ञाधारकता अशक्य नाही हे ‘ख्रिस्तपूर्व साक्षीदारांच्या मोठ्या मेघाने’ साबीत करून दाखवले कारण त्यांनी अनेक भयंकर परीक्षांना, फार काय मृत्यूलाही तोंड देऊन आपली सचोटी टिकवून ठेवली. (इब्री लोकांस ११:३६, ३७; १२:१) या सर्वांनी यहोवाचे हृदय किती आनंदित केले! (नीतिसूत्रे २७:११) अर्थात असेही काहीजण होते की ज्यांनी सुरवात तर विश्वासूपणे केली पण आज्ञाधारकतेच्या मार्गावर ते टिकून राहू शकले नाहीत. यांपैकी एक होता प्राचीन यहुदाचा राजा योवाश.
वाईट संगतीला बळी पडलेला राजा
६, ७. यहोयादाच्या हयातीत योवाश कशाप्रकारचा राजा होता?
६ बालपणी राजा योवाश वध होण्यापासून थोडक्यात बचावला. तो सात वर्षांचा झाला तेव्हा महायाजक यहोयादाने त्याला लपवलेल्या ठिकाणातून धैर्याने बाहेर काढून राजा घोषित केले. एक पिता व सल्लागार या नात्याने देवभीरू यहोयादाने मार्गदर्शन केल्यामुळेच योवाश ‘यहोयादा याजक याच्या सर्व हयातीत परमेश्वराच्या दृष्टीने जे नीट ते करीत असे.’—२ इतिहास २२:१०-२३:१, ११; २४:१, २.
७ योवाशच्या चांगल्या कार्यांपैकी एक म्हणजे त्याने यहोवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला—असे करण्याची त्याला “मनसा होती.” त्याने या दुरुस्ती कार्यासाठी निधी उभारण्याकरता ‘मोशेने वहिवाट लावून दिल्याप्रमाणे’ यहुदा आणि यरुशलेम यातल्या लोकांपासून कर जमा करण्याची महायाजक यहोयादा यास आठवण करून दिली. यावरून दिसून येते की यहोयादाने या तरुण राजाला देवाच्या नियमशास्त्राचा अभ्यास करून त्याप्रमाणे वागण्याचे प्रोत्साहन दिले होते. यामुळे मंदिर व मंदिरातील पात्रांचे काम लवकरच पूर्ण झाले.—२ इतिहास २४:४, NW; ६, १३, १४; अनुवाद १७:१८.
८. (अ) योवाशच्या आध्यात्मिक अवनतीला कोणती गोष्ट मुख्यतः कारणीभूत ठरली? (ब) राजाची आज्ञाभंजक वृत्ती त्याला कोठवर घेऊन गेली?
८ पण दुःखाची गोष्ट म्हणजे योवाश शेवटपर्यंत आज्ञाधारक राहिला नाही. का? देवाचे वचन आपल्याला सांगते: “यहोयादा मरण पावल्यानंतर यहूदाच्या सरदारांनी राजाकडे जाऊन त्यास मुजरा केला व राजाने त्यांचे म्हणणे ऐकले. मग ते आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्या मंदिराचा त्याग करून अशेरा मूर्ति व इतर मूर्ति यांची उपासना करू लागले. या त्यांच्या अपराधामुळे परमेश्वराचा क्रोध यहूदावर व यरुशलेमेवर भडकला.” यहुदाच्या सरदारांच्या कुप्रभावामुळे राजाने देवाच्या संदेष्ट्यांकडेही दुर्लक्ष केले; यांपैकी एक होता यहोयादाचा पुत्र जखऱ्या ज्याने निर्भयतेने योवाश व इतर लोकांचे त्यांच्या आज्ञाभंजक वृत्तीमुळे ताडन केले. पण पश्चात्ताप करण्याऐवजी योवाशाने जखऱ्याला दगडमार करून जिवे मारिले. खरोखर योवाश किती भावनाशून्य आणि शिरजोर झाला होता—हे सर्व केवळ वाईट संगतीच्या प्रभावामुळे!—२ इतिहास २४:१७-२२; १ करिंथकर १५:३३.
९. योवाश व त्याच्या सरदारांचे शेवटी जे झाले त्यावरून आज्ञाभंग करणे किती मूर्खतेचे आहे हे कशाप्रकारे स्पष्ट होते?
९ यहोवाकडे पाठ फिरवल्यानंतर योवाश व त्याच्या दुष्ट २ इतिहास २४:२३-२५; २ राजे १२:१७, १८) यहोवाने इस्राएलला उद्देशून बोललेले हे शब्द किती खरे होते: “तू आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही आणि त्याच्या ज्या सर्व आज्ञा व विधि . . . तू काळजीपूर्वक पाळल्या नाहीत, तर पुढील सर्व शाप तुझ्यामागे येऊन तुला गाठतील”!—अनुवाद २८:१५.
सरदारांचे काय झाले? अराम्यांचे सैन्य—“फार थोडे लोक” यहुदावर चालून आले आणि त्यांनी “लोकांपैकी सरदार होते त्यांचा नायनाट केला.” त्यांनी राजाला त्याचे स्वतःचे व मंदिरातलेही सर्व सोनेरूपे त्यांच्या हवाली करण्यास भाग पाडले. योवाश जिवंत बचावला तरीसुद्धा, तो केवळ मनोबल गमवलेला एक रोगी झाला होता. याच्या काही काळानंतर त्याच्या स्वतःच्या सेवकांपैकी काहींनी कारस्थान रचून त्याचा वध केला. (आज्ञा पाळल्यामुळे बचावलेला एक चिटणीस
१०, ११. (अ) यहोवाने बारूखला दिलेल्या सल्ल्याकडे लक्ष देणे कशाप्रकारे सहायक ठरू शकते? (ब) यहोवाने बारूखला काय सल्ला दिला?
१० ख्रिस्ती सेवाकार्यात भेटणाऱ्या लोकांपैकी फार कमी लोक सुवार्तेविषयी आस्था दाखवत असल्यामुळे कधीकधी तुम्हाला हताश झाल्यासारखे वाटते का? जे श्रीमंत आहेत आणि ऐषारामात जगतात अशा लोकांबद्दल तुम्हाला थोडासा का होईना पण, हेवा वाटतो का? जर तुम्हाला असे वाटत असेल तर मग यिर्मयाचा चिटणीस बारूख याच्याविषयी आणि यहोवाने त्याला दिलेल्या प्रेमळ सल्ल्याविषयी थोडा विचार करा.
११ बारूख एक भविष्यसूचक संदेश लिहीत असताना यहोवाने अचानक त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. का? कारण बारूख आपल्या जीवनातल्या परिस्थितीविषयी खेद करू लागला होता आणि देवाची सेवा करण्याच्या त्याला मिळालेल्या खास बहुमानापेक्षाही अधिक चांगले काही मिळावे अशी अपेक्षा करू लागला होता. बारूखच्या वृत्तीत झालेला हा फरक पाहून यहोवाने त्याला सडेतोड परंतु प्रेमळ सल्ला दिला व म्हटले: “तू आपणासाठी मोठाल्या गोष्टींची वांच्छा करितोस काय? ती करू नको, पाहा, मी सर्व मानवांवर अरिष्ट आणीन, . . . पण जेथे जेथे तू जाशील तेथे तेथे तू जिवानिशी सुटशील.”—यिर्मया ३६:४; ४५:५.
१२. सध्याच्या व्यवस्थीकरणात आपण स्वतःकरता “मोठाल्या गोष्टींची” अपेक्षा का करू नये?
१२ यहोवाने बारूखला जे सांगितले त्यावरून त्याला यिर्मयासोबत आपली विश्वासूपणे व धैर्याने सेवा केलेल्या या भल्या माणसाबद्दल किती कळकळ वाटत होती हे तुम्हाला जाणवले का? त्याचप्रमाणे आजही या व्यवस्थीकरणात बरेच काही साध्य करण्यासारखे आहे असे समजणाऱ्यांविषयी व या मोहात पडणाऱ्यांविषयी यहोवाला मनापासून काळजी वाटते. पण आनंदाची गोष्ट म्हणजे बारूखप्रमाणे अशा लोकांपैकी अनेकांनी जबाबदार पदी असलेल्या आध्यात्मिक बांधवांच्या प्रेमळ सल्ल्याला प्रतिसाद दिला आहे. (लूक १५:४-७) होय, आपण सर्वांनी हे ओळखले पाहिजे, की या व्यवस्थीकरणात “मोठ्याला गोष्टींची” आस धरणाऱ्यांना भविष्यात काहीही लाभणार नाही. या लोकांना खरा आनंद तर सापडतच नाही पण सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे लवकरच हे जग व त्यातील वासना यांसोबत ते देखील नाहीसे होतील.—मत्तय ६:१९, २०; १ योहान २:१५-१७.
१३. बारूखच्या संदर्भातील अहवाल आपल्याला नम्रतेविषयी कोणता धडा शिकवतो?
१३ बारूखच्या संदर्भातील अहवाल आपल्याला आणखी एका चांगल्या गुणाविषयी अर्थात नम्रतेविषयी धडा शिकवतो. यहोवाने थेट बारूखशी न बोलता यिर्मयाच्या माध्यमाने त्याला सल्ला दिला, याकडे लक्ष द्या. यिर्मयाच्या काही दोषांविषयी किंवा स्वभावगुणांविषयी बारूखला चांगली माहिती असेल. (यिर्मया ४५:१, २) पण त्याने गर्विष्ठपणाला स्वतःवर प्रभुत्व करू दिले नाही तर मुळात सल्ला देणारा यहोवा आहे हे त्याने नम्रपणे ओळखले. (२ इतिहास २६:३, ४, १६; नीतिसूत्रे १८:१२; १९:२०) आपण कधी ‘एखाद्या दोषात सापडलो’ आणि देवाच्या वचनातून आवश्यक सल्ला आपल्याला देण्यात आला, तर आपणही बारूखप्रमाणे प्रौढ वृत्ती, आध्यात्मिक दृष्टिकोन आणि नम्रता दाखवली पाहिजे.—गलतीकर ६:१.
१४. आपले नेतृत्व करणाऱ्यांच्या आज्ञेत राहणे आपल्या हिताचे का आहे?
१४ आपण अशी नम्र मनोवृत्ती दाखवतो तेव्हा सल्ला देणाऱ्यांनाही मदत होते. इब्री लोकांस १३:१७ म्हणते: “आपल्या अधिकाऱ्यांच्या [“आपले नेतृत्व करणाऱ्यांच्या,” NW] आज्ञेत राहा व त्यांच्या अधीन असा; कारण आपणास हिशेब द्यावयाचा आहे हे समजून ते तुमच्या जिवांची राखण करितात; ते त्यांना आनंदाने करता यावे, कण्हत नव्हे; तसे झाल्यास ते तुमच्या हिताचे होणार नाही.” मेंढपाळकत्वाची ही कठीण जबाबदारी पार पाडण्याकरता धैर्य, बुद्धी आणि व्यवहारचातुर्यासारख्या आवश्यक गुणांसाठी वडील कित्येकदा यहोवाला कळकळीने विनंती करतात! आपण सदैव ‘अशांना मान देऊ या.’—१ करिंथकर १६:१८.
१५. (अ) यिर्मयाने बारूखवर कशाप्रकारे विश्वास व्यक्त केला? (ब) बारूखने नम्रपणे आज्ञापालन केल्यामुळे त्याला कोणते प्रतिफळ मिळाले?
१५ बारूखने आपल्या मनोवृत्तीत बदल केला हे स्पष्ट आहे कारण यिर्मयाने त्याच्यावर पुढचे आणि सर्वात आव्हानात्मक असे काम सोपवले—मंदिरात जाऊन यिर्मयाच्या सांगण्यानुसार त्याने लिहून घेतलेला न्यायदंडाचा संदेश वाचून दाखवण्याचे काम. बारूखने या आज्ञेचे पालन केले का? होय, त्याने “यिर्मया संदेष्ट्याच्या सांगण्याप्रमाणे . . . सर्व काही केले.” किंबहुना तोच संदेश त्याने जेरुसलेमच्या सरदारांनाही वाचून दाखवला; हे निश्चितच धैर्याचे काम होते. (यिर्मया ३६:१-६, ८, १४, १५) सुमारे १८ वर्षांनंतर बॅबिलोन्यांनी त्या शहराचा नाश केला तेव्हा केवळ यहोवाच्या इशाऱ्याकडे लक्ष देऊन “मोठाल्या गोष्टींची” वांच्छा करण्याचे सोडून दिल्यामुळे आपला बचाव झाला हे पाहून बारूखला किती कृतज्ञता वाटली असावी याची कल्पना करा.—यिर्मया ३९:१, २, ११, १२; ४३:६.
सैन्याच्या वेढ्यादरम्यान आज्ञाधारकपणा जीवनदायक
१६. सा.यु.पू. ६०७ साली जेरुसलेममधील यहुद्यांबद्दल यहोवाने कशाप्रकारे दया दाखवली?
१६ सा.यु.पू. ६०७ साली जेरुसलेमचा नाश झाला तेव्हा आज्ञाधारक जनांविषयी यहोवाची दया पुन्हा एकदा प्रत्ययास आली. सैन्याने वेढा घातलेला असताना अगदी आणीबाणीच्या परिस्थितीत यहोवाने यहुद्यांना म्हटले: “पाहा मी तुम्हास जीवनाचा मार्ग व मरणाचा मार्ग दाखवितो. या नगरात जो राहील तो तरवारीने, दुष्काळाने, मरीने मरेल; जो बाहेर जाऊन तुम्हास वेढा घालणाऱ्या खास्द्यांस मिळेल तो जगेल, जिवानिशी सुटेल.” (यिर्मया २१:८, ९) जेरुसलेमच्या रहिवाशांनी स्वतःच्या करणीमुळे नाश ओढवला होता तरीसुद्धा यहोवाने त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांना त्या निर्णायक घटकेलाही दया दाखवली. *
१७. (अ) यहोवाने यहुद्यांना ‘खास्द्यांना जाऊन मिळण्याची’ आज्ञा देण्यास यिर्मयाला सांगितले तेव्हा यिर्मयाच्या आज्ञाधारकतेची कोणत्या दोन मार्गांनी परीक्षा झाली? (ब) यिर्मयाच्या धैर्यवान आज्ञापालनापासून आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो?
१७ यहुद्यांना शरण जाण्यास सांगणे ही यिर्मयाच्या आज्ञाधारकतेची परीक्षा होती. एकतर त्याला देवाच्या नावाविषयी आवेश होता. शत्रूंनी आपल्या विजयाचे श्रेय निर्जीव मूर्तींना देऊन देवाच्या नावाचा अवमान करावा अशी त्याची इच्छा नव्हती. (यिर्मया ५०:२, ११; विलापगीत २:१६) शिवाय, लोकांना शत्रूला शरण जाण्यास सांगणे हे आपला जीव धोक्यात घालण्यासारखे होते हे यिर्मयाला माहीत होते कारण बरेच लोक त्याला राजद्रोही समजण्याची शक्यता होती. पण तो भीतीने मागे हटला नाही, तर त्याने आज्ञाधारकपणे यहोवाचे संदेश विदित केले. (यिर्मया ३८:४, १७, १८) यिर्मयाप्रमाणे आपणही लोकांना अप्रिय वाटेल असा संदेश सांगतो. याच संदेशाकरता लोकांनी येशूचा द्वेष केला. (यशया ५३:३; मत्तय २४:९) तेव्हा आपणही “मनुष्याची भीति” न बाळगता यहोवावर पूर्ण भरवसा ठेवून त्याच्या आज्ञांचे धैर्याने पालन करू.—नीतिसूत्रे २९:२५.
गोगच्या हल्ल्यादरम्यान आज्ञापालन
१८. भविष्यात यहोवाच्या लोकांच्या आज्ञाधारकतेची कशाप्रकारे परीक्षा घेतली जाईल?
१८ लवकरच, सैतानाचे सबंध दुष्ट व्यवस्थीकरण पूर्वी कधी न आलेल्या ‘मोठ्या संकटात’ नष्ट होईल. (मत्तय २४:२१) त्या काळाआधी आणि त्यादरम्यान निश्चितच देवाच्या लोकांना त्यांच्या विश्वासाच्या व आज्ञाधारकतेच्या अनेक मोठ्या परीक्षांना तोंड द्यावे लागेल. उदाहरणार्थ बायबल आपल्याला सांगते की सैतान “मागोग देशातील गोग” या भूमिकेत, ‘अभ्राने देश झाकावा तसा मोठा दळभार’ घेऊन यहोवाच्या सेवकांवर पूर्ण शक्तीनिशी हल्ला करेल. (यहेज्केल ३८:२, १४-१६) या शत्रूंपुढे अगदीच थोडके आणि निःशस्त्र असताना, यहोवाचे लोक आज्ञाधारक जनांना आश्रय देण्याकरता पसरलेल्या त्याच्या ‘पंखांखाली’ संरक्षण मिळण्याची आस धरतील.
१९, २०. (अ) तांबड्या समुद्राजवळ असताना इस्राएली लोकांचे आज्ञाधारक राहणे का अत्यंत महत्त्वाचे होते? (ब) तांबड्या समुद्राच्या अहवालावर प्रार्थनापूर्वक मनन करणे आपल्याला कशाप्रकारे फायदेकारक ठरू शकते?
१९ ही परिस्थिती आपल्याला इस्राएल राष्ट्र इजिप्तमधून बाहेर पडले तेव्हाच्या घटनेची आठवण करून देते. ईजिप्तवर दहा विनाशकारक पीडा आणल्यानंतर यहोवाने त्याच्या लोकांना वाग्दत्त भूमीकडे नेणाऱ्या सर्वात कमी अंतराच्या मार्गाने नव्हे तर तांबड्या समुद्राच्या दिशेने नेले. याठिकाणी त्यांना सहज अडचणीत आणून त्यांच्यावर हल्ला केला जाऊ शकत होता. लष्करी डावपेचांच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलणे विनाशकारक भासले असावे. त्या ठिकाणी तुम्ही असता तर तुम्ही मोशेच्या माध्यमाने यहोवाने जे सांगितले त्याचे पालन केले असते का? वाग्दत्त भूमी काहीशी वेगळ्या दिशेला आहे हे माहीत असूनही तुम्ही यहोवाने सांगितल्यानुसार तांबड्या समुद्राची वाट धरली असती का?—निर्गम १४:१-४.
२० निर्गम यातील १४ वा अध्याय वाचल्यास, यहोवाने कशाप्रकारे आपल्या सामर्थ्याचे अद्भुत प्रदर्शन करून आपल्या लोकांना वाचवले हे आपल्याला पाहायला मिळते. अशा अहवालांचा आपण निवांत अभ्यास करतो व त्यांवर मनन करतो तेव्हा आपला विश्वास किती बळकट होतो! (२ पेत्र २:९) बळकट विश्वास आपल्याला यहोवाच्या आज्ञांचे अशावेळीही पालन करण्याचे सामर्थ्य देतो, जेव्हा त्याच्या अपेक्षा मनुष्याच्या तर्काला न पटणाऱ्या असतात. (नीतिसूत्रे ३:५, ६) तेव्हा, आत्मपरीक्षण करा: ‘मी बायबल अभ्यास, प्रार्थना आणि मनन तसेच देवाच्या लोकांसोबत नियमित सहवास करण्याद्वारे आपला विश्वास मजबूत करण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहे का?’—इब्री लोकांस १०:२४, २५; १२:१-३.
आज्ञाधारकता आशा उत्पन्न करते
२१. यहोवाचे आज्ञापालन करणाऱ्यांना सध्याच्या काळात आणि भविष्यात कोणते आशीर्वाद मिळतील?
२१ जे लोक यहोवाला आज्ञाधारक राहण्याची आपल्या जीवनात सवय करून घेतात, ते नीतिसूत्रे १:३३ या वचनाची सत्यता आजही अनुभवतात: “जो माझे [आज्ञाधारकपणे] ऐकतो तो सुरक्षित राहतो, आणि अरिष्टाची भीति नसल्यामुळे स्वस्थ असतो.” (नीतिसूत्रे १:३३) हे सांत्वनदायक शब्द यहोवाच्या सूड घेण्याच्या दिवशी किती अद्भुतरित्या खरे ठरतील! येशूने तर आपल्या शिष्यांना सांगितले, “ह्या गोष्टींस आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.” (लूक २१:२८) स्पष्टपणे केवळ यहोवाला आज्ञाधारक राहणारेच या शब्दांचे आत्मविश्वासाने पालन करू शकतील.—मत्तय ७:२१.
२२. (अ) यहोवाच्या लोकांजवळ आत्मविश्वास बाळगण्याचे कोणते कारण आहे? (ब) पुढील लेखात कोणत्या विषयांवर चर्चा केली जाईल?
२२ विश्वास बाळगण्याचे आणखी एक कारण म्हणजे, “प्रभु परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे यांस कळविल्याशिवाय खरोखर काहीच करीत नाही.” (आमोस ३:७) आज यहोवा गतकाळात केल्याप्रमाणे संदेष्ट्यांना प्रेरित करत नाही; तर त्याने आपल्या घराण्याला यथाकाळी आध्यात्मिक अन्न पुरवण्याकरता एक विश्वासू व बुद्धिमान दास नेमला आहे. (मत्तय २४:४५-४७) तेव्हा या ‘दासाप्रती’ आज्ञाधारक मनोवृत्ती बाळगण्याची किती महत्त्वाची जबाबदारी आपल्यावर आहे! पुढच्या लेखात दिसून येईल की या आज्ञापालनावरून ‘दासाचा’ धनी येशू याच्याप्रती आपली मनोवृत्ती देखील दिसून येते. त्यालाच ‘सर्व राष्ट्रे आज्ञांकित होतील.’—उत्पत्ति ४९:१०.
[तळटीपा]
^ परि. 1 कोंबडीला सहसा लाजाळू पक्षी मानले जात असले तरी, एका प्राणी संरक्षण संस्थेनुसार, “कोंबडी आपल्या पिलांचे संरक्षण करण्याकरता मरेपर्यंत लढा देते.”
^ परि. 16 यिर्मया ३८:१९ या वचनावरून दिसून येते की बरेच यहुदी खास्द्यांकडे ‘फितून गेले’ आणि त्यांना बंदिवासात तर जावे लागले पण त्यांचा जीव वाचला. त्यांनी यिर्मयाच्या शब्दांना प्रतिसाद दिला होता का हे आपल्याला सांगण्यात आलेले नाही. पण त्यांचा जीव वाचल्यामुळे संदेष्ट्याच्या शब्दांची सत्यता सिद्ध झाली.
तुम्हाला आठवते का?
• इस्राएलने वारंवार आज्ञाभंग केल्यामुळे काय घडले?
• राजा योवाश याच्या संगतीमुळे त्याच्यावर त्याच्या लहानपणी आणि नंतरच्या जीवनात काय परिणाम झाला?
• बारूखकडून आपण कोणते धडे शिकू शकतो?
• सध्याच्या व्यवस्थीकरणाचा अंत जवळ येत असता, यहोवाच्या आज्ञाधारक लोकांना घाबरण्याचे कारण का नाही?
[अभ्यासाचे प्रश्न]
[१३ पानांवरील चित्र]
यहोयादाच्या मार्गदर्शनाखाली लहानगा योवाश यहोवाला आज्ञाधारक राहिला
[१५ पानांवरील चित्र]
वाईट संगतीच्या प्रभावामुळे योवाशने देवाच्या संदेष्ट्याचा वध केला
[१६ पानांवरील चित्र]
तुम्ही यहोवाच्या आज्ञेचे पालन करून त्याच्या अद्भुत तारक शक्तीचे प्रदर्शन पाहिले असते का?