व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

युद्धानंतरच्या वाढीला हातभार लावण्याची सुसंधी

युद्धानंतरच्या वाढीला हातभार लावण्याची सुसंधी

जीवन कथा

युद्धानंतरच्या वाढीला हातभार लावण्याची सुसंधी

फिलिप एस. हॉफमन यांच्याद्वारे कथित

दुसरे महायुद्ध नुकतेच, १९४५ सालच्या मे महिन्यात समाप्त झाले होते. त्या वर्षी डिसेंबर महिन्यात यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक प्रचार कार्याची देखरेख करणारे नेथन एच. नॉर आपले २५ वर्षीय सचीव मिल्टन जी. हेन्शल यांच्यासोबत डेन्मार्कला आले. या भेटीची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. या कार्यक्रमासाठी एक मोठे सभागृह खास भाड्याने घेण्यात आले होते. आम्हा तरुणांसाठी बंधू हेन्शल यांचे भाषण खासकरून उत्साहवर्धक होते कारण ते देखील आमच्या वयाचे होते आणि त्यांनी आपल्या भाषणाकरता पुढील विषय निवडला होता: “तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला स्मर.”—उपदेशक १२:१.

या भेटीदरम्यान आम्हाला जागतिक प्रचार कार्याच्या वाढीकरता केल्या जात असलेल्या रोमांचक योजनांविषयी आणि आम्हीही त्यात सहभागी होऊ शकतो अशी माहिती मिळाली. (मत्तय २४:१४) उदाहरणार्थ संयुक्‍त संस्थानांत तरुण स्त्रीपुरुषांना मिशनरी कार्याकरता प्रशिक्षित करण्यासाठी एक नवी प्रशाला सुरू करण्यात आली होती. मात्र बंधू नॉर यांनी जोर देऊन सांगितले की जर आम्हाला या प्रशालेकरता आमंत्रित करण्यात आले, तर आम्हाला “फक्‍त जाण्याचे तिकीट” मिळेल आणि प्रशालेनंतर आम्हाला कोठे नेमणूक मिळेल हे सांगता येणार नाही. हे कळल्यावरही आमच्यापैकी काहींनी अर्ज भरला.

दुसऱ्‍या महायुद्धानंतरचे अनुभव सांगण्याआधी मी १९१९ साली माझ्या जन्मानंतर घडलेल्या काही घटनांविषयी सांगू इच्छितो. त्या युद्धाच्या आधी आणि त्यादरम्यान घडलेल्या बऱ्‍याच घटनांनी माझ्या जीवनावर मोठा प्रभाव पाडला.

कुटुंबातल्या नावडत्या व्यक्‍तीकडून बायबलचे सत्य

मी आईचे पहिले मूल होतो. माझ्या वेळी गर्भवती असताना आईने प्रार्थना केली की मुलगा झाला तर त्याला ती मिशनरी बनू देईल. माझे थोरले मामा बायबल विद्यार्थी अर्थात त्याकाळचे यहोवाचे साक्षीदार होते पण आईच्या कुटुंबाच्या सदस्यांना हे मुळीच पसंत नव्हते. आमचे घर कोपनहेगनजवळ होते आणि बायबल विद्यार्थ्यांचे वार्षिक अधिवेशन असले की आई हमखास थॉमस मामाला आमच्याच घरी मुक्काम करण्याचे आमंत्रण द्यायची कारण मामाचे घर दूर होते. १९३० सालापर्यंत, बायबल विषयांसंबंधी मामाच्या अफाट ज्ञानामुळे आणि त्यांच्या तर्कशुद्ध युक्‍तिवादामुळे आईलाही खात्री पटली आणि ती सुद्धा बायबल विद्यार्थांसोबत सामील झाली.

आईला बायबलचा ध्यास होता. अनुवाद ६:७ येथील आज्ञेनुसार तिने ‘घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता’ मला व माझ्या बहिणीला बायबलविषयी शिकवले. काही काळानंतर मी घरोघरच्या प्रचार कार्यात भाग घेऊ लागलो. चर्चमध्ये शिकवल्या जाणाऱ्‍या, अमर आत्मा आणि नरकाग्नी यांसारख्या शिकवणुकींवर वादविवाद करायला मला खूप आवडायचे. या शिकवणुकी खोट्या आहेत हे मी बायबलमधून सहज सिद्ध करू शकत होतो.—स्तोत्र १४६:३, ४; उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४.

आमचे कुटुंब एक झाले

कोपनहेगन येथे १९३७ साली झालेल्या अधिवेशनानंतर यहोवाच्या साक्षीदारांच्या डेन्मार्क शाखा दफ्तरातल्या लिटरेचर डेपोमध्ये तात्पुरत्या मदतीची गरज होती. मी नुकताच एका वाणिज्य महाविद्यालयातला कोर्स संपवला होता; माझ्यावर विशेष जबाबदाऱ्‍याही नव्हत्या, त्यामुळे मी डेपोमध्ये मदत करण्याची तयारी दाखवली. डेपोमधले काम संपल्यावर मला शाखा दफ्तरात मदत करण्यास सांगण्यात आले. लवकरच मी घर सोडून कोपनहेगन येथे शाखा दफ्तरात राहायला आलो; अद्याप माझा बाप्तिस्माही झाला नव्हता. प्रौढ ख्रिस्ती बांधवांसोबत दररोजच्या सहवासामुळे मला आध्यात्मिक प्रगती करायला साहाय्य मिळाले. पुढच्या वर्षी, जानेवारी १, १९३८ रोजी मी यहोवाला केलेले समर्पण जाहीर करण्याकरता पाण्याचा बाप्तिस्मा घेतला.

एकोणीसशे एकोणचाळीस सालच्या सप्टेंबर महिन्यात दुसरे महायुद्ध सुरू झाले. मग एप्रिल ९, १९४० रोजी जर्मन सैन्याने डेन्मार्कचा कब्जा घेतला. डेनिश नागरिकांना वैयक्‍तिक स्वातंत्र्य देण्यात आल्यामुळे आम्ही आमचे प्रचार कार्य सुरू ठेवले.

यादरम्यान एक अद्‌भुत घटना घडली. बाबा सक्रियरित्या सेवा करणारे एकनिष्ठ साक्षीदार बनले. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. लवकरच जेव्हा चार इतर डेनिश बांधवांसोबत गिलियड प्रशालेच्या आठव्या वर्गाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले तेव्हा माझ्या सबंध कुटुंबाने मला जाण्याचे प्रोत्साहन दिले. १९४६ सालच्या सप्टेंबर महिन्यात सुरू झालेला पाच महिन्यांचा हा अभ्यासक्रम न्यूयॉर्क राज्यातील साउथ लॅन्सिंगपासून काही अंतरावर असलेल्या एका निसर्गरम्य कॅम्पसमध्ये पार पडला.

गिलियड आणि गिलियड-उपरांत प्रशिक्षण

गिलियडमध्ये नव्या मैत्री जोडण्याच्या भरपूर संधी मिळायच्या. एका संध्याकाळी मी इंग्लंडच्या हॅरल्ड किंग यांच्यासोबत कॅम्पसच्या परिसरात फेरफटका मारत होतो; प्रशिक्षण संपल्यानंतर आम्हाला कोठे पाठवले जाईल याविषयी आम्ही गप्पागोष्टी करत होतो. तेव्हा हॅरल्ड म्हणाले, “डोव्हरचे पांढरे पहाड मी पुन्हा कधी पाहणार नाही यावर मला विश्‍वास बसत नाही.” त्यांचे शब्द खरे ठरले, पण तब्बल १७ वर्षांनंतरच त्यांना या पहाडांचे पुन्हा दर्शन झाले; आणि या १७ वर्षांतील साडेचार वर्षे त्यांना चीनी कारागृहातल्या अंधारकोठडीत घालवावी लागली! *

पदवीदान समारंभानंतर मला संयुक्‍त संस्थानांतील टेक्सस राज्यात एक प्रवासी पर्यवेक्षक म्हणून यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांना आध्यात्मिक साहाय्य पुरवण्याकरता पाठवण्यात आले. बांधवांनी माझे अतिशय प्रेमाने स्वागत केले. टेक्ससच्या बांधवांना, नुकताच गिलियड प्रशालेतून पदवीधर होऊन आलेल्या माझ्यासारख्या तरुण युरोपियन बांधवाविषयी खूपच अप्रूप वाटले. पण टेक्सस येथे केवळ सात महिने सेवा केल्यानंतर मला ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात बोलवण्यात आले. येथे बंधू नॉर यांनी मला कार्यालयात काम करण्यास नेमले; मला सर्व विभागांतील कामाचे स्वरूप समजून घ्यायला सांगण्यात आले. डेन्मार्कला परतल्यानंतर, तेथेही सर्व काम ब्रुकलिनप्रमाणे करण्यासाठी मला या सर्व शिकलेल्या गोष्टींचा उपयोग करायचा होता. सबंध जगातील शाखा दफ्तरांतील कार्यात एकता आणून त्यांना अधिक कार्यक्षम बनवण्याचा यामागचा उद्देश होता. नंतर बंधू नॉर यांनी जर्मनीला माझी बदली केली.

शाखा दफ्तरांत सूचनांचे पालन करणे

जर्मनीतल्या वाइसबॅदन शहरात, १९४९ सालच्या जुलै महिन्यात मी आलो तेव्हा अनेक जर्मन शहरे अद्यापही पडीक अवस्थेत होती. प्रचार कार्यात पुढाकार घेणारे बंधू, हिटलरने १९३३ साली सत्तेवर आल्यापासून केलेल्या भयंकर छळाला तोंड दिलेले दिग्गज होते. यांपैकी काहींनी तर तुरुंगांत आणि छळ छावण्यांत आठ ते दहा वर्षे किंवा त्याहीपेक्षा अधिक वर्षे घालवली होती! अशा या यहोवाच्या सेवकांसोबत साडेतीन वर्षे सेवा करण्याची मला संधी मिळाली. त्यांचे अद्वितीय उदाहरण मला जर्मन इतिहासकार गाब्रिएला योनान यांच्या शब्दांची आठवण करून देते: “राष्ट्रीय समाजवादी हुकूमशाही राज्यात टिकून राहिलेल्या या अविचल ख्रिस्ती गटाचे उदाहरण नसते तर ऑश्‍विट्‌झ आणि हॉलोकॉस्ट सारख्या वस्तुस्थितींकडे पाहून, येशूच्या ख्रिस्ती शिकवणुकींनुसार चालणे शक्य आहे की नाही याविषयी आम्हाला शंका वाटली असती.”

डेन्मार्कमध्ये करत होतो तेच काम मी या शाखा दफ्तरातही करू लागलो: अर्थात संघटनेतील कामकाज पार पाडण्याची एक नवी, सबंध जगभरात वापरली जाणारी पद्धत शिकवणे. हे फेरबदल आपल्या कामात दोष दाखवण्यासाठी नव्हे तर सर्व शाखा दफ्तरांना मुख्यालयासोबत सुरळीतपणे सहकार्य करता यावे म्हणून करण्यात आले आहेत याची जर्मन बांधवांना जाणीव होताच त्या सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहकार्य केले.

१९५२ साली बंधू नॉरचे एक पत्र आले आणि त्यांनी मला स्वित्झर्लंड येथील बर्न शहरातील शाखा दफ्तरात जाऊन सेवा करण्याची सूचना दिली. तेथे जानेवारी १, १९५३ पासून शाखा पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्यासाठी मला नेमण्यात आले.

स्वित्झर्लंडमध्ये नवे आनंददायक कार्य

स्वित्झर्लंडला आल्यावर काही काळातच एका अधिवेशनात माझी एस्तरशी गाठ पडली आणि लवकरच आमची मागणी झाली. १९५४ साली ऑगस्ट महिन्यात बंधू नॉर यांनी मला ब्रुकलिन येथे येण्याची सूचना दिली आणि येथे एका नवीन, रोमांचक स्वरूपाच्या कामाविषयी मला सांगण्यात आले. सबंध जगात शाखा दफ्तरांची संख्या आणि आकार वाढल्यामुळे एक नवी व्यवस्था कार्यान्वित केली जात होती. सबंध जगाच्या क्षेत्राचे वेगवेगळ्या परिमंडलांत (झोन्स) विभाजन करण्यात आले; प्रत्येक परिमंडलात एक परिमंडल पर्यवेक्षक सेवा करणार होते. मला यांपैकी दोन परिमंडल नेमण्यात आले: युरोप आणि भूमध्य क्षेत्र.

ब्रुकलिनला धावती भेट दिल्यानंतर मी स्वित्झर्लंडला परतलो आणि झोन कार्याची तयारी करू लागलो. एस्तर व माझे लग्न झाले आणि तीसुद्धा स्वित्झर्लंडच्या शाखा दफ्तरांत माझ्यासोबत सेवा करू लागली. माझी पहिली यात्रा इटली, ग्रीस, सायप्रस, मध्य पूर्वेतील देश, उत्तर आफ्रिकेच्या समुद्रकिनाऱ्‍यालगतचे प्रदेश, स्पेन व पोर्तुगाल अशा एकूण १३ देशांची होती; या देशांतील मिशनरी गृहांना व शाखा दफ्तरांना मी भेटी दिल्या. यानंतर बर्नमध्ये काही काळ राहिल्यानंतर मी पुन्हा सोव्हिएत अंमलाखाली असलेल्या राष्ट्रांच्या पश्‍चिमेकडे असलेल्या सर्व युरोपियन देशांत प्रवास केला. लग्नाच्या पहिल्याच वर्षी मी ख्रिस्ती बांधवांची सेवा करण्याकरता सहा महिने घराबाहेर होतो.

परिस्थितीत बदल

१९५७ साली एस्तरला आमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य येणार असल्याची चाहूल लागली; शाखा दफ्तरात मुले असलेल्या कुटुंबांकरता सोय नसल्यामुळे आम्ही डेन्मार्कला परतायचे ठरवले. बाबांनी आमचे स्वागत केले. एस्तर आमच्या राकेल नावाच्या मुलीची आणि बाबांचीही काळजी घेऊ लागली आणि मी नवीनच बांधलेल्या शाखा दफ्तरातील कामकाजात मदत करू लागलो. मी मंडळीच्या पर्यवेक्षकांसाठी असलेल्या राज्य सेवा प्रशालेत प्रशिक्षक म्हणून आणि पूर्वीप्रमाणेच परिमंडल पर्यवेक्षक म्हणून सेवा करत राहिलो.

परिमंडल कार्यात बराच प्रवास करावा लागत असल्यामुळे मला बराच काळ माझ्या मुलीपासून दूर राहावे लागत असे. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. एकदा पॅरिसमध्ये लहानसे मुद्रणालय स्थापित करण्याच्या निमित्ताने मी काही काळ तेथे मुक्कामाला होतो. एस्तर आणि राकेल रेल्वेने गार द्युए नॉर येथे मला भेटायला आले. शाखा दफ्तरात काम करणारे लेओपॉल झॉन्ते आणि मी त्या दोघींना भेटायला म्हणून येथे आलो. राकेल ट्रेनच्या डब्याच्या पायरीवर उभी राहून आम्हा दोघांना न्याहाळू लागली. मग तिने एकदा माझ्याकडे आणि पुन्हा लेओपॉलकडे पाहिले आणि चक्क लेओपॉलला मिठी मारली!

आणखी एक महत्त्वाचा बदल वयाच्या ४५ व्या वर्षी माझ्या जीवनात झाला, जेव्हा मी माझ्या कुटुंबाची आर्थिकरित्या काळजी घेण्याकरता पूर्ण वेळेची सेवा सोडली. यहोवाच्या साक्षीदारांचा सेवक या नात्याने माझ्याकडे असलेल्या अनुभवाच्या बळावर मला एक निर्यात मॅनेजर म्हणून नोकरी मिळाली. त्याच कंपनीत जवळजवळ नऊ वर्षे सेवा केल्यावर आणि राकेलचे शिक्षण संपल्यावर आम्ही अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याकरता दिल्या जाणाऱ्‍या प्रोत्साहनाला प्रतिसाद द्यायचे ठरवले.

नॉर्वे येथे जाण्याची शक्यता पडताळून पाहताना मी नोकरी मिळण्याविषयी एका एजेन्सीला विचारले. उत्तर होकारात्मक नव्हते. ५५ वर्षांच्या गृहस्थाला कोण नोकरी देणार? तरीसुद्धा मी ऑस्लो येथील शाखा दफ्तराशी संपर्क साधला आणि मग द्रोएबाक नावाच्या गावाजवळ एक घर भाड्याने घेतले, हा विश्‍वास बाळगून की काही न काही काम नक्कीच मिळेल. आणि खरोखर एका ठिकाणी मला काम मिळाले आणि यानंतर नॉर्वे येथे राज्य सेवेचा अत्यंत आनंददायक काळ आम्ही अनुभवला.

आमची जवळजवळ सबंध मंडळी उत्तरेतील अद्याप नेमण्यात न आलेल्या क्षेत्रात कार्य करायला जायची तेव्हा आम्हाला अतिशय सुरेख अनुभव आले. आम्ही सर्वजण कॅम्पिंग साईट्‌सवर कॉटेज भाड्याने घ्यायचो आणि दररोज सभोवतालच्या सुंदर डोंगरांत विखुरलेल्या शेतमळ्यांना भेटी द्यायचो. या मनमिळाऊ लोकांना देवाच्या राज्याविषयी सांगताना आम्हाला खूपच आनंद वाटायचा. बऱ्‍याच साहित्याचे वाटप करण्यात आले, पण पुनर्भेटीसाठी मात्र पुढच्या वर्षापर्यंत थांबावे लागायचे. पण लोक आम्हाला विसरले नाहीत! पुढच्या वर्षी परतल्यावर जणू कुटुंबाचेच सदस्य बऱ्‍याच वर्षांनी घरी परतल्याप्रमाणे ते लोक कसे आम्हाला येऊन मिठी मारायचे याची एस्तर आणि राकेल अजूनही आठवण काढतात. नॉर्वे येथे तीन वर्षे राहिल्यानंतर आम्ही डेन्मार्कला परतलो.

कौटुंबिक जीवनाचे आशीर्वाद

लवकरच राकेलचे निल्स होइयो नावाच्या एका पूर्ण वेळेच्या आवेशी पायनियर सेवकाशी लग्न ठरले. लग्नानंतर निल्स आणि राकेल मुले होईपर्यंत पायनियर सेवा करत होते. निल्स केवळ एक चांगला पतीच नव्हे तर एक उत्तम पिता देखील आहे, तो खरोखर कुटुंबवत्सल आहे. एकदा पहाटेच त्याने आपल्या मुलाला समुद्रकिनाऱ्‍यावर सूर्योदय पाहायला नेले. एका शेजारच्या माणसाने मुलाला विचारले की तेथे जाऊन तुम्ही काय केले? तर त्याने उत्तर दिले: “आम्ही यहोवाला प्रार्थना केली.”

काही वर्षांनंतर एस्तरला आणि मला बेन्जमिन आणि नादिया या आमच्या दोन थोरल्या नातवंडांचा बाप्तिस्मा पाहण्याची सुसंधी मिळाली. निल्स देखील आमच्यासोबत होता. अचानक तो माझ्यासमोर उभा राहिला. माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, “खरे पुरुष रडत नाहीत म्हणतात.” पण पुढच्या क्षणीच आम्ही दोघे एकमेकांना बिलगून आनंदाश्रू गाळत होतो. ज्याच्यासोबत मी हसूही शकतो आणि रडूही शकतो असा जावई मिळाल्याचा मला किती आनंद वाटतो!

आजही परिस्थितीशी जुळवून घेणे

आणखी एक आशीर्वाद आम्हाला मिळाला, कारण एस्तर व मला डेन्मार्क शाखा दफ्तरात येऊन सेवा करण्याकरता बोलावणे आले. तोपर्यंत हॉलबेक येथे बरेच मोठे शाखा दफ्तर बांधण्याची तयारी सुरू होती. मला बांधकामाच्या कार्याची देखरेख करण्याचा बहुमान मिळाला. हे सबंध कार्य बिनपगारी स्वयंसेवकांनी केले. कडक हिवाळा असूनही १९८२ सालाच्या शेवटापर्यंत प्रकल्प जवळजवळ संपुष्टात आला होता आणि आम्ही सर्वजण आनंदाने एका मोठ्या आणि पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या शाखा दफ्तरात राहायला आलो!

मी लवकरच कार्यालयाच्या कामात गर्क झालो आणि या कामातून मला खूप समाधान मिळायचे. एस्तर टेलिफोन ऑपरेटर म्हणून काम करू लागली. पण कालांतराने तिच्या कंबरेची शस्त्रक्रिया करावी लागले आणि दीड वर्षानंतर पुन्हा तिची गॉल ब्लॅडरची शस्त्रक्रिया झाली. शाखा दफ्तरातील बांधवांनी आम्हाला खूप मदत केली पण आम्ही स्वतःच ठरवले की आम्ही शाखा दफ्तर सोडणेच आता सर्वांच्या दृष्टीने चांगले ठरेल. त्यामुळे आम्ही आमच्या मुलीच्या आणि कुटुंबाच्या मंडळीजवळ राहायला गेलो.

सध्या एस्तरची प्रकृती बरीच खालावली आहे. पण मी प्रामाणिकपणे म्हणू शकतो की एकत्र मिळून इतकी वर्षे सेवा करताना, बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेताना तिने मला सदोदित पाठिंबा व साथ दिली आहे. आरोग्याच्या समस्या असूनही आम्ही दोघेही प्रचार कार्यात थोडाबहुत सहभाग घेत आहोत. मी माझ्या जीवनाकडे वळून पाहतो तेव्हा माझे मन कृतज्ञतेने भरून येते आणि मला स्तोत्रकर्त्याचे हे शब्द आठवतात: “हे देवा, माझ्या तरुणपणापासून तू मला शिकवीत आला आहेस.”—स्तोत्र ७१:१७.

[तळटीपा]

^ परि. 15 टेहळणी बुरूज जुलै १५, १९६३ अंकातील पृष्ठे ४३७-४२ पाहा.

[२४ पानांवरील चित्र]

जर्मनी शाखेचे १९४९ साली बांधकाम सुरू असताना ट्रकमधून साहित्य उतरवताना

[२५ पानांवरील चित्र]

माझे सहकारी, छळ छावण्यांतून परत आलेले साक्षीदार होते

[२६ पानांवरील चित्रे]

एस्तर व मी आज आणि बर्न बेथेल मध्ये १९५५ साली ऑक्टोबर महिन्यात आमच्या लग्नाच्या दिवशी