राज्य सभागृहासाठी मान्यतेचे पदक
राज्य घोषकांचा वृत्तान्त
राज्य सभागृहासाठी मान्यतेचे पदक
फिनलंडच्या पर्यावरण मंत्रालयाने सन २००० हे “लँडस्केपिंगचे वर्ष” असे घोषित केले. याचे आयोजन करणाऱ्यांपैकी एकाने म्हटले की, “आपल्या दररोजच्या जीवनावर आणि स्वस्थ जीवनावर हिरव्यागार परिसराचा किती प्रभाव पडतो याची आठवण आपल्या सर्वांना करून देण्यासाठी या वर्षी रमणीय भूप्रदेशाचा विषय निवडण्यात आला आहे.”
जानेवारी १२, २००१ रोजी, फिनिश असोसिएशन ऑफ लँडस्केप इंडसट्रीजकडून फिनलंडमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात एक पत्र आले. त्या पत्रात असे म्हटले होते की, टिकुरिलातील यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहाच्या परिसराची उल्लेखनीय रचना आणि सुस्थितीत राखलेल्या बागेमुळे त्या वर्षी लँडस्केपिंगचे एक पदक त्या [राज्य सभागृहालाही] बहाल करण्यात आले होते. पत्रात पुढे असेही म्हटले होते की, “उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातही त्या परिसराचा सर्वसाधारण देखावा सुंदर, रमणीय आणि उत्कृष्ट दिसतो.”
फिनलंडच्या टाम्पेरमधील रोझंडाल हॉटेल येथे भरवण्यात आलेल्या समारंभात ४०० पेशेवाईक आणि व्यापाऱ्यांच्या समक्ष हे पदक यहोवाच्या साक्षीदारांना बहाल करण्यात आले. फिनिश असोसिएशन ऑफ लँडस्केपिंग इंडसट्रीजने वर्तमानपत्रात छापण्यासाठी एक बातमी देखील तयार केली ज्यात असे म्हटले होते: “देशातील विविध भागांमध्ये, यहोवाच्या साक्षीदारांची राज्य सभागृहे नेहमीच सुनियोजित पद्धतीची असतात. पर्यावरणाचा विचार करणाऱ्या प्रत्येक वाटसरूच्या हे लक्षात आल्याशिवाय राहत नाही. टिकुरिलातील संपूर्ण राज्य सभागृहच रमणीय बागेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. इमारत आणि विस्तृत अंगणामुळे शांतता आणि समतोल यांचे दर्शन घडते.”
फिनलंडमध्ये २३३ राज्य सभागृहे आहेत आणि त्यांपैकी बहुतेक सुंदर बागांमध्ये वसलेली आहेत. परंतु, ही खऱ्या उपासनेची आणि बायबल शिक्षणाची केंद्रस्थाने असल्यामुळे या ठिकाणांचे सौंदर्य वाढते. संपूर्ण जगभरातील ६० लाखांहून अधिक यहोवाच्या साक्षीदारांकरता राज्य सभागृह म्हणजे सर्वात प्रिय ठिकाण असते—मग ते विस्तृत असो किंवा आटोपशीर. म्हणून तर ते त्याला सुस्थितीत ठेवण्यास व त्याची काळजी घेण्यास उत्सुक असतात. राज्य सभागृहाचे दरवाजे तुमच्या परिसरातील सर्वांकरता खुले आहेत!