व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सत्याची आवड धरणारे युवक

सत्याची आवड धरणारे युवक

सत्याची आवड धरणारे युवक

“तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील?” असा प्रश्‍न एका इब्री स्तोत्रकर्त्याने हजारो वर्षांआधी विचारला. (स्तोत्र ११९:९) हा प्रश्‍न आजही महत्त्वाचा आहे कारण या जगात तरुणांसमोर अनेक समस्या आहेत. लैंगिक स्वैचारामुळे अनेक तरुणांना एड्‌सची लागण झाली आणि ही भयंकर लागण झालेली निम्मी अधिक तरुण मंडळी १५ ते २४ या वयोगटातली आहे. अंमली पदार्थांच्या गैरवापरामुळेही अनेक तरुणांचा अकाली मृत्यू होऊ लागला आहे. हिणकस संगीत, हिंसक व अनैतिक चित्रपट, टीव्हीचे कार्यक्रम आणि व्हिडिओ तसेच इंटरनेटवरील पोर्नोग्राफी यांचाही तरुणांवर अनिष्ट परिणाम घडत आहे. त्यामुळे, आज अनेक पालकांना व तरुणांनाही स्तोत्रकर्त्याने विचारलेला हा प्रश्‍न विचारप्रवर्तक वाटतो.

आपल्या प्रश्‍नाला स्वतः स्तोत्रकर्त्यानेच उत्तर दिले: “तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.” देवाचे वचन अर्थात बायबल तरुणांना उत्तम मार्गदर्शन पुरवते आणि ते अनुसरल्याने अनेक तरुण जीवनात यशस्वी ठरले आहेत. (स्तोत्र ११९:१०५) आपण काही तरुणांची उदाहरणे पाहू या ज्यांचे देवावर प्रेम आहे आणि जे आजच्या सुखविलासी व भौतिकवादी जगात आध्यात्मिकरित्या दृढ राहण्याचा प्रयत्न करतात.

पालकांच्या मार्गदर्शनाची ते कदर करतात

हाकोब इमान्युएल हा मेक्सिकोतील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात सेवा करण्याआधी काही वर्षांसाठी पूर्ण-वेळेच्या पायनियर सेवेत होता. देवाच्या सेवेबद्दल त्याला आवड कशी निर्माण झाली त्याची आठवण काढून तो म्हणतो: “माझ्या आईवडिलांचा सर्वात महत्त्वाचा प्रभाव होता; अर्थात काही अनुभवी आध्यात्मिक बांधव ज्यांच्यासोबत माझी मैत्री झाली त्यांनी देखील फार मदत केली. या सर्वांनी प्रचार कार्याबद्दल आवड निर्माण करण्यास मला प्रेरणा दिली. त्यांनी मला अगदी प्रेमाने योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन दिले; ते माझ्यावर दबाव आणताहेत असे मला कधीच जाणवले नाही.”

अनेक वर्षांपासून पूर्ण-वेळेच्या सेवेत असलेल्या डेव्हिडला आठवते की, तो व त्याचा भाऊ लहान असतानाच त्याच्या आईवडिलांनी खास पायनियरींग सुरू केल्यामुळे त्याच्यावर मोठा प्रभाव पडला. वडील वारल्यावरही त्याची आई खास पायनियर सेवेत टिकून राहिली. सुवार्तेचा प्रचार करता करता तिने त्यांची काळजीसुद्धा घेतली. डेव्हिड म्हणतो, “पायनियर बनण्यासाठी त्यांनी माझ्यावर कधीच जबरदस्ती केली नाही, पण कुटुंब या नात्याने आम्हाला पायनियरींग करण्यात इतकी मजा आली की तो सहवास आणि ते वातावरण यांमुळे मलाही तेच पाऊल उचलण्याची प्रेरणा मिळाली.” पालकांच्या उत्तम मार्गदर्शनाच्या आणि काळजीच्या महत्त्वाविषयी डेव्हिड म्हणतो: “दररोज रात्री, माझी आई फ्रॉम पॅरडाईज लॉस्ट टू पॅरडाईज रिगेन्ड या पुस्तकातून आम्हाला गोष्टी वाचून दाखवत असे. * आणि त्या गोष्टींचा आमच्या जीवनाशी इतक्या सुरेखपणे संबंध जोडायची की, आम्हाला आध्यात्मिक अन्‍न आवडू लागले.”

सभांबद्दल कदर

काही तरुणांना ख्रिस्ती सभांचे इतके मूल्य वाटत नाही. पालकांच्या सांगण्यावरून ते सभांना येत असतात. परंतु, त्यांनी सभेला येणे थांबवले नाही तर कालांतराने त्यांना सभा आवडू लागतील. आल्फ्रेथोचे उदाहरण घ्या; त्याने ११ वर्षांच्या वयात पूर्ण-वेळेच्या सेवेला सुरवात केली. तो कबूल करतो की, तो पाच वर्षांचा होता तेव्हा त्यांना सभांना जायला आवडायचे नाही कारण तेथे त्याला झोप यायची पण त्याचे आईवडील त्याला सभेत झोपू देत नव्हते. तो आठवून सांगतो: “मी मोठा होऊ लागलो तसे, मला सभांमध्ये रस वाटू लागला आणि लिहिणे-वाचणे जमू लागल्यावर तर मला आणखीनच बरे वाटू लागले कारण मला स्वतःच्या शब्दांमध्ये उत्तर देता येऊ लागले.”

सिन्टिया ही १७ वर्षांची नियमित पायनियर सांगते की, चांगल्या संगतीमुळे देवाच्या सेवेबद्दल आवड निर्माण करण्यास तिला सर्वाधिक मदत मिळाली. ती म्हणते: “बांधवांसोबत चांगले नातेसंबंध आणि सभांमध्ये नियमित उपस्थिती यांमुळे जगीक मित्रमैत्रिणींसोबत मी जास्त नव्हते आणि डिस्कोला जाणे यांसारख्या तरुणांच्या कार्यहालचालींमध्ये मी सामील नव्हते. सभांमधील टिपणी आणि अनुभव ऐकून यहोवाला माझे सर्वस्व देण्याची इच्छा माझ्यात निर्माण झाली आणि माझ्या मते, माझे तारुण्य हेच माझ्याजवळ असलेली सर्वोत्तम गोष्ट आहे. त्याचा वापर मी त्याच्या सेवेत करण्याचा निर्धार केला.”

परंतु ती कबूल करते: “एकेकाळी, माझा बाप्तिस्मा होण्याआधी मी गृहपाठाचे किंवा इतर शालेय कार्यहालचालींचे निमित्त सांगून सभा फार सहजपणे चुकवत होते. मी पुष्कळ सभा चुकवल्या आणि त्याचा माझ्यावर आध्यात्मिकरित्या परिणाम होऊ लागला. बायबलचा अभ्यास करत नसलेल्या एका मुलाशी माझी मैत्री झाली. पण यहोवाच्या मदतीने मी फार उशीर होण्याआधी माझ्यात सुधार केला.”

व्यक्‍तिगत निर्णय

यहोवाची सेवा पूर्ण-वेळ करत असलेला आणखी एक युवक, पाब्लो याला देवाच्या वचनातील सत्याविषयी आवड निर्माण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असे विचारल्यास तो म्हणतो: “माझ्या मते, दोन गोष्टी आहेत: नियमित व्यक्‍तिगत अभ्यास आणि प्रचारकार्यासाठी आवेश. माझ्या आईवडिलांनी मला यहोवाविषयीचे सत्य शिकवले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे; यापेक्षा आणखी कोणतीही उत्तम गोष्ट ते मला देऊ शकले नसते असे मला वाटते. पण तरीही, यहोवावर माझे प्रेम का आहे याची मला व्यक्‍तिगत खात्री असली पाहिजे. त्याकरता, बायबलच्या सत्याची ‘रुंदी आणि खोली’ जाणून घेण्याची आवश्‍यकता आहे. केवळ असे केल्यानेच यहोवाच्या वचनाबद्दल आपल्याला उत्कंठा निर्माण होऊन इतरांनाही त्याविषयी सांगण्यास आपल्याला प्रवृत्त करणाऱ्‍या ‘जळत्या अग्नीसारखी’ ती होईल. प्रचारकार्याचा तो आवेश सत्याची कदर अधिक वाढवत राहील.”—इफिसकर ३:१८; यिर्मया २०:९.

आधी उल्लेखिलेला हाकोब इमान्युएल याला यहोवाची सेवा करण्याच्या व्यक्‍तिगत निवडीचे महत्त्व देखील आठवते. तो म्हणतो की, त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर बाप्तिस्मा घेण्याची जबरदस्ती कधीच केली नाही. “मला वाटते की, ती सर्वात उत्तम गोष्ट होती कारण त्याचे चांगले परिणाम मला आता दिसू लागले आहेत. उदाहरणार्थ, माझी चांगली दोस्ती असलेल्या काही युवकांनी एकत्र बाप्तिस्मा घेण्याचा निर्णय घेतला. तसे पाहिल्यास यात काही चूक नव्हते, पण त्यांपैकी काहीजण फक्‍त भावनाविवश होऊन हा निर्णय घेत आहेत हे मला स्पष्ट दिसत होते आणि काही दिवसांनी राज्याच्या कार्यहालचालींबद्दल त्यांचा आवेश नाहीसा झाला. माझ्या आईवडिलांनी बाप्तिस्मा घेण्यासाठी माझ्यावर दबाव आणला नाही. तो माझा व्यक्‍तिगत निर्णय होता.”

मंडळीची भूमिका

काही तरुणांनी आईवडिलांच्या मदतीविना आपणहून देवाच्या वचनातील सत्य शिकले आहे. अशा परिस्थितीत योग्य ते करायला शिकणे आणि ते करत राहणे हे एक मोठे आव्हान असते.

सत्याचा आपल्याला किती फायदा झाला हे नोईला आठवते. लहानपणापासूनच तो संतापी आणि हिंसक वृत्तीचा होता. १४ वर्षांच्या वयात तो बायबलचा अभ्यास करू लागला तेव्हा, त्याच्या संतापी वृत्तीत फरक पडू लागला आणि त्याच्या आईवडिलांना याचा आनंद वाटला; त्या वेळी त्यांना बायबलबद्दल फार आस्था नव्हती. नोईने आध्यात्मिक प्रगती केली तशी त्याला देवाच्या सेवेत आपले आयुष्य अधिक उपयोगात आणण्याची इच्छा होती. आता तो पूर्ण-वेळेच्या सेवेत आहे.

आलेखांद्रोच्या आईवडिलांना आवड नसतानाही त्याला मात्र लहान असतानाच ख्रिस्ती सत्य आवडू लागले. सत्याबद्दल कदर व्यक्‍त करत तो म्हणतो: “मी एका पारंपरिक कॅथलिक घरात लहानाचा मोठा झालो. पण कम्युनिस्ट नास्तिकवादाकडे माझा कल वाढू लागला कारण अगदी लहानपणापासून माझ्या मनात घोळत असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे मला चर्चकडून मिळाली नाहीत. यहोवाच्या संघटनेने मला देवाविषयीचे ज्ञान घेण्यास मदत केली. हे ज्ञान माझ्याकरता अक्षरशः जीवनरक्षक ठरले कारण मी बायबलचा अभ्यास केला नसता तर मी कदाचित अनैतिकता, दारूबाजी किंवा अंमली पदार्थांचे सेवन यांत गोवलो गेलो असतो. कदाचित मी एखाद्या क्रांतिकारी गटातही सामील झालो असतो आणि त्याचा दुःखद परिणाम घडला असता.”

एखादा तरुण आपल्या आईवडिलांच्या आधाराविना सदोदित सत्याचा शोध करण्यात टिकून कसा राहू शकतो? स्पष्टतः, मंडळीतले वडील आणि इतरांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नोई म्हणतो: “मला कधीच एकटेपणा जाणवला नाही कारण यहोवा नेहमी माझ्या निकट होता. त्याचप्रमाणे, मला अनेक प्रेमळ बंधू आणि बहिणींकडून आधार मिळाला आहे जे माझे आध्यात्मिक पिता, माता आणि बांधव ठरले आहेत.” तो सध्या बेथेलमध्ये काम करतो आणि आपला वेळ देवाच्या सेवेत उपयोगात आणत आहे. त्याचप्रमाणे आलेखांद्रो म्हणतो: “एका गोष्टीसाठी मी सदोदित आभारी राहीन आणि ती म्हणजे मला अशा एका मंडळीची साथ लाभली ज्यातील वडील वर्गाने वैयक्‍तिक रूपात माझी काळजी घेतली. मी खासकरून आभारी आहे कारण मी १६ वर्षांचा असताना बायबलचा अभ्यास सुरू केला तेव्हा तरुणांमधील अस्वस्थपणाचा अनुभव मलाही आला. मंडळीतल्या कुटुंबांनी मला कधीही एकटे सोडले नाही. मला वेगवेगळे लोक आपल्या घरी बोलवायचे; मी त्यांच्या घरी जाऊ शकत होतो, त्यांच्यासोबत जेवू शकत होतो आणि मनमोकळेपणाने बोलूही शकत होतो.” आलेखांद्रो गेल्या १३ वर्षांपासून पूर्ण-वेळेच्या सेवेत टिकून राहिला आहे.

काहींना वाटते की, देवधर्म वयस्कांनी करायचा असतो. परंतु, अनेक तरुणांनी लहानपणीच बायबलचे सत्य शिकले व यहोवावर प्रेम करू लागले आहेत आणि त्याला विश्‍वासू राहिले आहेत. या युवकांसाठी स्तोत्र ११०:३ मध्ये नमूद केलेले दावीदाचे शब्द लागू करता येतील: “तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरुण तुला पहाटेच्या दहिंवरासारखे आहेत.”

सत्य शिकून त्याला धरून राहणे हे तरुणांकरता एक आव्हान आहे. अनेकजण यहोवाच्या संघटनेशी संलग्न राहिले आहेत, नियमितपणे सभांना उपस्थित राहत आहेत आणि बायबलचा परिश्रमाने अभ्यास करत आहेत हे पाहून किती आनंद होतो! असे केल्याने त्यांना देवाच्या वचनाबद्दल आणि त्याच्या सेवेबद्दल खरे प्रेम विकसित करता आले आहे!—स्तोत्र ११९:१५, १६.

[तळटीप]

^ परि. 6 यहोवाच्या साक्षीदारांनी १९५८ साली प्रकाशित केलेले; सध्या छापले जात नाही.