व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ख्रिश्‍चनांनी ईर्षावान असावे का?

ख्रिश्‍चनांनी ईर्षावान असावे का?

ख्रिश्‍चनांनी ईर्षावान असावे का?

ईर्षा—ख्रिश्‍चनांमध्ये हा गुण असला पाहिजे का? ख्रिस्ती या नात्याने आपल्याला, “प्रीति हे . . . ध्येय” ठेवण्याचे उत्तेजन देण्यात आले आहे; शिवाय, “प्रीति हेवा [“ईर्षा,” NW] करीत नाही,” असेही आपल्याला सांगण्यात आले आहे. (१ करिंथकर १३:४; १४:१) परंतु दुसरीकडे आपल्याला असेही सांगण्यात येते, की यहोवा “ईर्ष्यावान देव आहे” व “त्याचे अनुकरण करणारे” व्हा अशी आज्ञा देण्यात आली आहे. (निर्गम ३४:१४; इफिसकर ५:१) हा विरोधाभास का?

कारण, बायबलमध्ये “ईर्षा” असे भाषांतर करण्यात आलेल्या इब्री व ग्रीक शब्दाच्या अनेक अर्थछटा आहेत. त्यांचा वापर ज्या संदर्भात करण्यात आला आहे त्यानुसार त्यांचा सकारात्मक किंवा नकारात्मक अर्थ होऊ शकतो. जसे की, “ईर्षा” असे भाषांतरित केलेल्या इब्री शब्दाचा पुढीलप्रमाणे अर्थ होऊ शकतो: “अनन्य भक्‍तीचा अत्याग्रह; प्रतिस्पर्धा सहन न करणे; आवेश; कळकळ; हेवा [नीतिमान किंवा दुष्ट]; मत्सर.” इब्री शब्दाशी मिळत्याजुळत्या ग्रीक शब्दाचा देखील काहीसा असाच अर्थ होतो. हे शब्द, एखाद्या संशयित प्रतिस्पर्ध्याबद्दल किंवा आपल्यापेक्षा चांगल्या स्थितीत असलेल्या व्यक्‍तीबद्दल विकृत मनोवृत्ती, याला सूचित करू शकतात. (नीतिसूत्रे १४:३०) परंतु एखाद्या प्रिय व्यक्‍तीचे हानीपासून संरक्षण करण्याची इच्छा असणे हा देवाने मनुष्याला दिलेला गुण आहे आणि या गुणाच्या सकारात्मक प्रदर्शनाला देखील ईर्षा म्हणता येईल.—२ करिंथकर ११:२.

सर्वोत्कृष्ट उदाहरण

उचित प्रकारची ईर्षा दाखवण्याबाबतीत यहोवाने सर्वोत्कृष्ट उदाहरण मांडले आहे. त्याचे उद्देश शुद्ध व निर्मळ आहेत; कारण त्याला मुळात आपल्या लोकांचे आध्यात्मिक व नैतिक भ्रष्टतेपासून संरक्षण करण्याची इच्छा आहे. आपल्या प्राचीन लोकांना, ज्यांना लाक्षणिकरीत्या सीयोन असे संबोधले आहे, त्यांच्याविषयी बोलताना यहोवाने म्हटले: “सीयोनेसंबंधाने मी अतिशयित ईर्ष्यायुक्‍त झालो आहे; तिच्याकरिता संतप्त आवेशाने मी ईर्षायुक्‍त झालो आहे.” (जखऱ्‍या ८:२) आपल्या मुलांना कोणतीही इजा होऊ नये म्हणून एक प्रेमळ पिता जसा सतत सावधान असतो तसेच यहोवा देखील आपल्या सेवकांचे शारीरिक व आध्यात्मिक धोक्यापासून संरक्षण करण्यास सतत सावध असतो.

आपल्या लोकांच्या संरक्षणार्थ यहोवाने आपले वचन बायबल दिले आहे. यामध्ये, सुज्ञपणे चालता यावे म्हणून त्यांना उत्तेजन देण्यात आले आहे, शिवाय सुज्ञपणे चाललेल्या सेवकांची असंख्य उदाहरणे देखील त्यात आहेत. यशया ४८:१७ मध्ये म्हटले आहे: “तुला जे हितकारक ते मी परमेश्‍वर तुझा देव तुला शिकवितो; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याने तुला नेतो.” त्याची ईर्षा त्याला आपली काळजी करण्यास, आपल्यावर लक्ष ठेवण्यास प्रवृत्त करते ही किती सांत्वनदायक गोष्ट आहे! अशा या श्रेयस्कर मार्गाने तो ईर्षावान नसता, तर आपल्या कमअनुभवामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या इजा झाल्या असत्या. यहोवाची ईर्षा ही निश्‍चितच स्वार्थी नाही.

पण मग, ईश्‍वरी ईर्षा आणि अयोग्य ईर्षा यांत काय फरक आहे? हे माहीत करून घेण्यासाठी आपण मिर्याम आणि फीनहास यांच्या उदाहरणाचा विचार करू. कोणत्या गोष्टीमुळे ते कार्य करण्यास प्रवृत्त झाले ते पाहा.

मिर्याम व फीनहास

निर्गमनाच्या वेळी इस्राएली लोकांचे नेतृत्व मोशे व अहरोनाने केले; मिर्याम ही त्यांची मोठी बहीण होती. इस्राएली लोक रानांत होते तेव्हा मिर्यामला तिचा भाऊ मोशे याच्याबद्दल ईर्षा वाटू लागली. त्याविषयी बायबल अहवाल म्हणतो: “मोशेने कूशी लोकांतली एक स्त्री बायको केल्यामुळे मिर्याम व अहरोन त्याच्याविरुद्ध बोलू लागले. . . . ते म्हणाले, ‘परमेश्‍वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला?’” स्पष्टपणे, मिर्यामने मोशेविरुद्ध बंड करण्यात पुढाकार घेतला होता; कारण यहोवाने अहरोनाला नव्हे तर मिर्यामला, तिच्या अनादरणीय वर्तनासाठी एक आठवड्यासाठी कोडी केले.—गणना १२:१-१५.

कोणत्या कारणाने मिर्यामला मोशेविरुद्ध कार्य करायला प्रवृत्त केले? तिला खऱ्‍या उपासनेची काळजी असल्यामुळे व सहइस्राएली लोकांना संकटापासून वाचवण्याची इच्छा असल्यामुळे ती अशी वागली का? मुळीच नाही. मिर्यामने आपल्या मनात मोठा नावलौकिक व अधिकार मिळवण्याची चुकीची इच्छा वाढू दिली होती, असे दिसून येते. इस्राएलमध्ये ती संदेष्ट्री म्हणून सेवा करत असल्यामुळे लोक आणि खासकरून स्त्रिया तिचा खूप आदर करत असत. लाल समुद्रातून इस्राएलला चमत्कारिकरीत्या सुटका मिळाल्यानंतर तिनेच संगीताद्वारे व गीताद्वारे आनंद व्यक्‍त करण्यात पुढाकार घेतला होता. पण आता, एक संशयित प्रतिस्पर्धी अर्थात मोशेची पत्नी आपल्याला मिळत असलेला आदर हिरावून घेते की काय अशी मिर्यामला भीती वाटली असावी. स्वार्थी ईर्षेमुळे तिने यहोवाने नियुक्‍त केलेल्या मोशेविरुद्ध लोकांना भडकवले.—निर्गम १५:१, २०, २१.

याउलट, फीनहासच्या कार्यांमागे एक वेगळा हेतू होता. वचनयुक्‍त देशात प्रवेश करायच्या फक्‍त काही काळाआधी इस्राएल लोकांनी मवाबाच्या पठारावर तळ ठोकले तेव्हा, मवाबी व मिद्यानी स्त्रियांनी अनेक इस्राएली पुरूषांना फुसलावून त्यांना अनैतिक कार्ये व मूर्तीपूजा करायला लावली. छावणी शुद्ध करण्यासाठी व यहोवाचा जळजळता कोप थांबवण्यासाठी इस्राएलच्या न्यायाधीशांना, घृणित कार्य करणाऱ्‍या सर्व पुरूषांना ठार मारण्यास सांगण्यात आले. शिमोनी सरदार जिम्री याने तर बिनधास्तपणे, “इस्राएलाची सर्व मंडळी” जमली होती तेव्हा सर्वांसमक्ष कजबी नावाच्या एका मिद्यानी स्त्रीला अनैतिक कार्यासाठी छावणीत आणले. तेव्हा फीनहासने निर्णायक पाऊल उचलले. यहोवाच्या उपासनेबद्दल त्याला असलेल्या ईर्षेमुळे किंवा आवेशामुळे आणि छावणीत नैतिक शुद्धता टिकवून ठेवण्याच्या इच्छेमुळे प्रेरित होऊन त्याने व्यभिचार करणाऱ्‍यांना त्यांच्या छावणीत जाऊन ठार मारले. त्याच्या ‘ईर्षायुक्‍त क्रोधाबद्दल’ अर्थात ‘देवाविषयी ईर्षा’ दाखवल्याबद्दल त्याची प्रशंसा करण्यात आली. फीनहासच्या कार्यामुळे, आधीच २४,००० लोकांना गिळंकृत करणारी मरी थांबली व त्याच्या संततीला निरंतर याजकपद मिळेल असा यहोवाने त्याच्याबरोबर करार करून त्याला प्रतिफळ दिले.—गणना २५:४-१३; द न्यू इंग्लिश बायबल.

ईर्षेच्या या दोन उदाहरणांत कोणता फरक होता? मिर्यामने आपल्या भावाविरुद्ध स्वार्थी ईर्षेमुळे कार्य केले, पण फीनहासने ईश्‍वरी ईर्षेनुसार न्यायदंड बजावला. फीनहासप्रमाणे आपण देखील कधीकधी, यहोवाच्या नावासाठी, त्याच्या उपासनेसाठी व त्याच्या लोकांसाठी आपले मत उघडपणे व्यक्‍त करायला किंवा कार्य करायला प्रवृत्त झाले पाहिजे.

चुकीची ईर्षा

परंतु एखादी व्यक्‍ती चुकीची ईर्षा बाळगू शकते का? होय, बाळगू शकते. पहिल्या शतकातील यहुद्यांच्या बाबतीत ही सर्वसामान्य गोष्ट होती. त्यांनी ईर्षेने किंवा आवेशाने देवाने दिलेल्या नियमशास्त्राचे व परंपरांचे रक्षण केले. नियमशास्त्राचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नांत त्यांनी असंख्य तपशीलवार नियम व बंधने बनवली जी लोकांना ओझ्यासमान वाटू लागली. (मत्तय २३:४) मोशेच्या नियमशास्त्राऐवजी देवाने, ते नियमशास्त्र ज्याला चित्रित करत होते त्याला वास्तविकतेत अस्तित्वात आणले आहे, हे मान्य करता न आल्यामुळे किंवा मान्य करण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांच्या चुकीच्या ईर्षेने त्यांना येशू ख्रिस्ताच्या अनुयायांवर अनियंत्रित क्रोध व्यक्‍त करण्यास प्रवृत्त केले. एके काळी स्वतः चुकीच्या अर्थाने नियमशास्त्राविषयी ईर्षा बाळगणाऱ्‍या प्रेषित पौलाने दाखवून दिले, की नियमशास्त्राचे समर्थन करणाऱ्‍या लोकांना “देवाविषयी आस्था [“ईर्षा,” NW] [होती], परंतु ती यथार्थ ज्ञानाला अनुसरून” नव्हती.—रोमकर १०:२; गलतीकर १:१४.

शिवाय, ख्रिस्ती बनलेल्या अनेक यहुद्यांनासुद्धा, नियमशास्त्राबद्दलची अशी चुकीची ईर्षा बाळगण्याचे सोडून देण्यास कठीण गेले. आपल्या तिसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍यानंतर पौलाने, पहिल्या शतकातील नियमन मंडळाला राष्ट्रांच्या परिवर्तनाचा अहवाल दिला. तेव्हा हजारो यहुदी ख्रिश्‍चन “नियमशास्त्राभिमानी” होते. (प्रेषितांची कृत्ये २१:२०) ही गोष्ट, विदेशी ख्रिश्‍चनांना सुंता करण्याची गरज नाही हा निकाल नियमन मंडळाने देऊन अनेक वर्ष उलटल्यानंतरची आहे. नियमशास्त्राचे पालन करायचे की नाही यावरून निर्माण होणाऱ्‍या वादविषयांमुळे मंडळीमध्ये भांडण-तंटे होत होते. (प्रेषितांची कृत्ये १५:१, २, २८, २९; गलतीकर ४:९, १०; ५:७-१२) यहोवा आता आपल्या लोकांबरोबर कशाप्रकारे व्यवहार करत आहे याचे पूर्ण आकलन नसल्यामुळे काही यहुदी ख्रिश्‍चन आपलाच हेका चालवत होते आणि इतरांची टीका करत होते.—कलस्सैकर २:१७; इब्री लोकांस १०:१.

देवाच्या वचनावर दृढपणे आधारित नसलेली आपलीच मते किंवा मार्ग यांवर अडून राहण्याच्या प्रयत्नात ईर्षेचा तोच पाश आपणही टाळला पाहिजे. यहोवा आज आपल्याला योग्य माध्यमाद्वारे त्याच्या वचनाबद्दलची जी नवनवीन व सुधारित माहिती पुरवत आहे ती आपण स्वीकारली पाहिजे.

यहोवासाठी आवेश दाखवा

परंतु खऱ्‍या उपासनेत उचित प्रकारच्या ईर्षेला स्थान आहे. आपल्या नावलौकिकाबद्दलची किंवा हक्कांबद्दलची अनावश्‍यक चिंता आपण करत बसतो तेव्हा ही ईर्षा आपले लक्ष यहोवाकडे वळवते. ती आपल्याला देवाविषयीचे सत्य लोकांना सांगण्याचे आणि त्याच्या मार्गांचे व त्याच्या लोकांचे समर्थन करण्याचे विविध मार्ग शोधून काढण्यास प्रवृत्त करते.

अकीको नावाच्या यहोवाच्या साक्षीदारांतील एका पूर्ण-वेळेच्या सेविकेची, क्षेत्र सेवेत भेटलेल्या एका स्त्रीने खूप कठोरपणे टीका केली; या स्त्रीचा रक्‍ताविषयी असलेल्या देवाच्या नियमाबद्दल गैरसमज होता. परंतु अकीकोने व्यवहारचातुर्याचा उपयोग करून देवाच्या वचनाचे समर्थन केले; रक्‍त संक्रमणाशी संलग्न असलेल्या वैद्यकीय जटीलता आणि समस्या देखील तिने या स्त्रीला सांगितल्या. यहोवाविषयी काही सांगण्याच्या तीव्र इच्छेमुळे अकीकोने संभाषणाला एक वेगळे वळण दिले; या स्त्रीला निर्माणकर्त्याच्या अस्तित्वावर विश्‍वास नसल्यामुळेच ती अशा प्रकारचे आक्षेप घेत होती हे अकीकोने ताडले होते. त्यामुळे तिने त्या स्त्रीला समजावून सांगितले, की सृष्टी ही सृष्टीकर्त्यावर विश्‍वास ठेवण्यासाठी कशाप्रकारे पुरावा सादर करते. अकीकोच्या धैर्यशील समर्थनामुळे या स्त्रीच्या मनातील निराधार पूर्वग्रह तर दूर होऊ शकले, शिवाय, तिच्याबरोबर तिला बायबलचा अभ्यास देखील सुरू करता आला. पूर्वी चिडखोर असलेली ती स्त्री आज यहोवाची स्तुती करणाऱ्‍यांपैकी एक आहे.

खऱ्‍या उपासनेसाठी उचितप्रकारची ईर्षा किंवा आवेश आपल्याला आपल्या विश्‍वासाबद्दल, कामाच्या ठिकाणी, शाळेत, बाजारहाट करताना, आणि प्रवास करत असताना संधीच्या शोधात राहून लोकांबरोबर बोलण्यास प्रवृत्त करेल. जसे की, मिडोरीने आपल्या सोबत काम करणाऱ्‍यांबरोबर आपल्या विश्‍वासाबद्दल बोलण्याचा निश्‍चय केला आहे. तिच्याबरोबर काम करणाऱ्‍या चाळीशीत असलेल्या एका स्त्रीने एकदा तिला सांगितले की तिला यहोवाच्या साक्षीदारांबरोबर मुळीच बोलायला आवडत नाही. नंतर, एकदा असेच बोलता बोलता, या स्त्रीने दिवसेंदिवस बिघडत चाललेल्या आपल्या मुलीची तक्रार केली. मिडोरीने तिला तरूणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे * नावाचे पुस्तक दाखवले आणि तिच्या मुलीबरोबर या पुस्तकातून अभ्यास करण्याविषयी सुचवले. अभ्यास सुरू झाला परंतु ही स्त्री केव्हाही चर्चेसाठी बसली नाही. मिडोरीने या स्त्रीला यहोवाचे साक्षीदार—नावामागील संघटना* (इंग्रजी), हा व्हिडिओ दाखवण्याचे ठरवले. व्हिडिओ पाहिल्यावर या स्त्रीच्या मनातील अनेक चुकीच्या कल्पना दूर झाल्या. इतकेच नव्हे तर पाहिलेल्या गोष्टींनी प्रभावीत होऊन ती असेही म्हणाली, की “मलाही यहोवाच्या साक्षीदारांसारखं व्हायचंय.” ती देखील आपल्या मुलीबरोबर बायबलच्या अभ्यासासाठी बसू लागली.

ख्रिस्ती मंडळीत देखील उचित प्रकारच्या ईर्षेला स्थान आहे. उचित प्रकारच्या ईर्षेमुळे मंडळीमध्ये उबदार व आपुलकीचे वातावरण राहते आणि मंडळीतील प्रत्येकाला आपल्या आध्यात्मिक बांधवांना इजा पोहंचेल अशा प्रकारच्या हानीकारक प्रभावांचा जसे की हानीकारक चुगली, धर्मत्यागी लोकांसारखी विचारसरणी यांचा प्रतिकार करण्याची प्रेरणा मिळते. वडिलांना काही प्रसंगी चूक करणाऱ्‍यांची सुधारणूक करण्याची गरज भासते तेव्हा ईश्‍वरी ईर्षेमुळे आपण, त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देण्यास प्रेरित होतो. (१ करिंथकर ५:११-१३; १ तीमथ्य ५:२०) करिंथ मंडळीतील सहविश्‍वासूंबद्दल असलेल्या आपल्या ईर्षायुक्‍त भावनांबद्दल लिहिताना पौलाने म्हटले: “तुम्हाविषयीची माझी आस्था ईश्‍वरप्रेरित आस्था आहे; मी एका पतीबरोबर तुमचे वाग्दान केले आहे, अशा हेतूने की, तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.” (२ करिंथकर ११:२) तसेच, ईर्षा आपल्याला मंडळीतील सर्वांचे, तत्त्वांच्या बाबतीत, आध्यात्मिकतेच्या बाबतीत व नैतिक शुद्धतेच्या बाबतीत संरक्षण करण्यास प्रवृत्त करते.

होय, उचितप्रकारच्या भावनांनी प्रेरित झालेल्या ईर्षेचा—ईश्‍वरी ईर्षेचा—इतरांवर चांगला प्रभाव पडतो. यामुळे यहोवाची स्वीकृती मिळते आणि हा गुण आजच्या सर्व ख्रिश्‍चनांमध्ये दिसून आला पाहिजे.—योहान २:१७.

[तळटीप]

^ परि. 20 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले.

[२९ पानांवरील चित्रे]

फीनहासचे कार्य ईश्‍वरी ईर्षेवर आधारित होते

[३० पानांवरील चित्रे]

चुकीच्या ईर्षेचा पाश टाळा

[३१ पानांवरील चित्रे]

ईश्‍वरी ईर्षा आपल्याला, इतरांना आपल्या विश्‍वासांबद्दल सांगण्यास व आपले बंधूप्रेम टिकवून ठेवण्यास प्रवृत्त करते