बाल्कन राष्ट्रांत आनंदाचा काळ
बाल्कन राष्ट्रांत आनंदाचा काळ
सन १९२२. इन्सब्रुक, ऑस्ट्रिया येथे यहोवाच्या साक्षीदारांची अर्थात त्याकाळच्या अर्नेस्ट बायबल स्टूडंट्सची सभा सुरू होती. उपस्थितांमध्ये सर्बियाच्या वोज्वोदीना प्रांतातील अपाटीन गावात राहणारा फ्रान्ट्स ब्रांट नावाचा एक तरुण होता. वक्त्याने यहोवा, हे देवाचे नाव घेताच लोकांचा एक जमाव आरडाओरडा करू लागला, इतका की वक्त्याला पुढे बोलणे अशक्य झाले आणि सभा अर्ध्यातच संपवावी लागली. पण तेवढ्या वेळात फ्रान्ट्सने जे ऐकले होते त्याचा त्याच्या मनावर गहिरा प्रभाव पडला आणि त्याने राज्याच्या सुवार्तेची घोषणा करण्यास सुरवात केली. बाल्कन देशांपैकी एका देशात घडून आलेल्या रोमांचक आध्यात्मिक वाढीची अशी सुरवात झाली.
आज बऱ्याच लोकांना युगोस्लाव्हिया म्हटले की डोळ्यापुढे युद्ध आणि रक्तपाताचे चित्र उभे राहते. भयंकर कत्तली, असहाय निर्वासित, जमीनदोस्त झालेली घरे आणि केविलवाण्या अनाथ मुलांची आठवण होते. १९९१ पासून १९९५ पर्यंत बाल्कन द्वीपकल्पात चाललेल्या युद्धाच्या अतीव वेदना आणि दुःख शब्दांत व्यक्त करता येणार नाही. मानवी प्रयत्नांकरवी समृद्ध व निश्चिंत भविष्य मिळण्याचे लोकांचे सर्व स्वप्न धुळीस मिळाले. या युद्धामुळे भूतपूर्व युगोस्लाव्हियाचे रहिवाशी अजूनही आर्थिक संकट आणि दारिद्र्य सोसत आहेत. *
अशा संकटांना तोंड देत असताना, जगाच्या या भागात आनंदी लोक सापडण्याची कदाचित कोणीही अपेक्षा करणार नाही. कदाचित विचित्र वाटेल, पण अशाप्रकारचे आनंदी लोक खरोखर अस्तित्वात आहेत. २० वे शतक संपुष्टात येण्याच्या बेतात असताना त्यांनी विशेष आनंदाचा एक दिवस अनुभवला. पण या सर्व गोष्टींशी फ्रान्ट्स ब्रांट या सुरवातीला उल्लेख केलेल्या तरुणाचा काय संबंध होता?
बाल्कन राष्ट्रांत आध्यात्मिक वाढ
फ्रान्ट्स ब्रांटला नवीन सत्यांविषयी ऐकून इतका आनंद झाला की त्याने ही सुवार्ता पसरवण्याचा निश्चय केला. ऑस्ट्रियाच्या सरहद्दीजवळ स्लोव्हेनियाच्या मॅरिबोर नावाच्या एका शहरात त्याला न्हाव्याचे काम मिळाले आणि तो आपल्या ग्राहकांना प्रचार करू लागला. सहसा त्याचे ग्राहक केस कापून घेताना, त्याने सांगितलेले सर्वकाही गुपचुप ऐकून घ्यायचे. त्याच्या प्रयत्नांमुळे, १९२० दशकाच्या शेवटास मॅरिबोर येथे राज्य प्रचारकांचा एक लहानसा गट सुरू करण्यात आला. एका उपाहार गृहात बायबल आधारित भाषणे दिली जाऊ
लागली. कालांतराने या उपाहार गृहाला नोव्ही स्वेत (नवे जग) मत्स्याहारी उपाहार गृह असे उचित नाव देण्यात आले.कालांतराने, सुवार्ता सबंध देशात पसरली. या वाढीत “फोटो ड्रामा ऑफ क्रिएशन” (इंग्रजी), (चित्र व रेकॉर्डिंग्स असलेले आठ तासांचे सादरीकरण) या चित्रपटाचा महत्त्वाचा हातभार लागला. मग १९३० च्या दशकात जर्मनीत यहोवाच्या साक्षीदारांचा भयंकर छळ होऊ लागला तेव्हा युगोस्लाव्हिया येथील राज्य प्रचारकांच्या संख्येत जर्मनीहून पलायन करून आलेल्या जर्मन पायनियरांची भर पडली. त्यांनी स्वतःच्या सोयीची पर्वा न करता या देशातील डोंगराळ प्रदेशाच्या कानाकोपऱ्यांत जाऊन सुवार्तेचा प्रचार केला. सुरवातीला त्यांच्या संदेशाला कोणीही प्रतिसाद देईना. १९४० च्या दशकाच्या सुरवातीला केवळ १५० साक्षीदार क्षेत्र सेवेचा अहवाल देत होते.
१९४१ साली येथेही भयंकर छळ सुरू झाला आणि तो १९५२ पर्यंत चालला. शेवटी सप्टेंबर ९, १९५३ रोजी जेनरल टीटोच्या कम्युनिस्ट शासनाखाली यहोवाच्या साक्षीदारांची कायदेशीर नोंदणी झाली. तो किती आनंदाचा प्रसंग होता! त्या वर्षी सुवार्तेच्या प्रचारकांची संख्या ९१४ इतकी होती आणि त्यांची संख्या सातत्याने वाढत गेली. १९९१ सालापर्यंत प्रचारकांची संख्या वाढून ७,४२० झाली होती आणि त्या वर्षी १६,०७२ लोक स्मारकविधीला आले.
ऑगस्ट १६ ते १८, १९९१ या दरम्यान या देशातले यहोवाच्या साक्षीदारांचे पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय अधिवेशन क्रोएशियाच्या झाग्रेब शहरात संपन्न झाले. स्थानिक ठिकाणांहून आणि परदेशातून आलेल्यांना मोजल्यास १४,६८४ लोक या अधिवेशनाला उपस्थित राहिले. या अविस्मरणीय अधिवेशनाने यहोवाच्या लोकांना पुढे सोसाव्या लागणार असलेल्या परीक्षांसाठी तयार केले. क्रोएशिया व सर्बिया यांमध्ये असलेल्या नाक्यावरून पार झालेल्या सर्वात शेवटच्या गाड्या, अधिवेशनाला आलेल्या सर्बियन प्रतिनिधींना परत नेणाऱ्या बसेस होत्या. शेवटची बस पार होताच सरहद्द बंद करण्यात आली आणि युद्धाला सुरवात झाली.
यहोवाच्या लोकांना आनंदी होण्याची कारणे
युद्ध सुरू असतानाची वर्षे बाल्कन प्रदेशांतील यहोवाच्या साक्षीदारांकरता भयंकर परीक्षेचा काळ ठरला. पण तरीसुद्धा येथे यहोवाने आपल्या लोकांना उत्तम वाढीच्या रूपात आशीर्वाद दिल्यामुळे हे बांधव अत्यंत आनंदी आहेत. १९९१ सालापासून भूतपूर्व युगोस्लाव्हियाच्या प्रदेशातील राज्य प्रचारकांची संख्या ८० टक्क्यांहून जास्त वाढली आहे. २००१ साली प्रचारकांची अत्युच्च संख्या १३,४७२ इतकी होती.
झाग्रेब व बेलग्रेड (सर्बिया) येथील कार्यालयांतून सबंध भूतपूर्व युगोस्लाव्हियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या कामाची देखरेख केली जात होती. पण वाढ होऊ लागल्यामुळे, तसेच काही राजकीय उलाढालींमुळे लुब्ल्याना (स्लोव्हेनिया) व स्कोप्ये (मॅसेडोनिया) येथे नवीन कार्यालय स्थापित करण्याची गरज पडली; तसेच बेलग्रेड व झाग्रेब येथेही नवी कार्यालये स्थापित करण्यात आली. या कार्यालयांत जवळजवळ १४० सदस्य कार्य करतात. यांपैकी बहुतेकजण यहोवावर नितांत प्रीती असलेले अत्यंत आवेशी तरुण आहेत. त्यांत बहुतेकजण क्रोएशन, मॅसेडोनियन, सर्बियन आणि स्लोव्हेनियन भाषेत बायबल प्रकाशनांच्या भाषांतरात गुंतलेले आहेत. या भाषांतील यहोवाच्या साक्षीदारांची बहुतेक नियतकालिके व साहित्य सध्या मूळ इंग्रजी आवृत्तीसोबतच प्रकाशित होते हे किती आनंददायक आहे! ही प्रकाशने असंख्य लोकांना सांत्वन व आशा प्रदान करतात.
आणखी एक आनंददायक गोष्ट म्हणजे इतर देशांतील
अनेक पूर्ण वेळेच्या सेवकांकरवी दिले जाणारे निःस्वार्थ साहाय्य. अलीकडील वर्षांत कित्येक टुमदार राज्य सभागृहे बांधण्यात आल्यामुळे मंडळ्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. पण या बांधवांकरता याहीपेक्षा आनंददायक आशीर्वाद राखून ठेवले होते. कोणत्या अर्थाने?एक अभिनव प्रकल्प
बऱ्याच प्रचारकांना सतत वाटायचे, ‘आपल्याला कधी आपल्या भाषेत नवे जग भाषांतर मिळेल का?’ दर वर्षी, प्रांतीय अधिवेशनात याची घोषणा होण्याची ते वाट पाहत होते. पण या भाषांतील भाषांतर गट अलीकडेच स्थापन झाले होते, शिवाय मोजकेच अनुवादक होते; त्यामुळे इतका मोठा प्रकल्प कसा हाती घ्यावा हा प्रश्न होता.
सर्व बाबींचा विचार केल्यानंतर, नियमन मंडळाने एक संयुक्त प्रकल्प राबवण्यास संमती दिली; या प्रकल्पात कोएशियन, मॅसेडोनियन आणि सर्बियन भाषांतर गट एकजूटपणे कार्य करतील व माहितीची देवाणघेवाण करतील असे ठरले. या प्रकल्पात कोएशियन गट पुढाकार घेणार होता.
अत्यंत आनंदाचा दिवस
बाल्कन राष्ट्रांतील यहोवाचे साक्षीदार जुलै २३, १९९९ हा दिवस कधीही विसरणार नाहीत. “देवाचे भविष्यसूचक वचन” या मालिकेतील प्रांतीय अधिवेशने एकाच वेळी बेलग्रेड, सारायेवो (बॉस्निया-हर्जेगोवीना), स्कोप्ये आणि झाग्रेब येथे संपन्न होणार होती. हे अधिवेशन बेल्ग्रेडमध्ये घेता येईल किंवा नाही याची काही काळ शास्वती नव्हती कारण नेटो बॉम्बहल्ल्यांमुळे जाहीर सभा घेण्यास मनाई होती. पण अनेक महिन्यांच्या साशंकतेनंतर शेवटी एकमेकांना भेटण्याच्या आशेने बांधवांना किती आनंद झाला असेल याची कल्पना करता येते. पण वास्तविक परिस्थिती त्यांच्या सर्व अपेक्षांच्या पलीकडील होती.
शुक्रवारी दुपारी, चारही अधिवेशन शहरांत एक विशेष घोषणा करण्यात आली. अधिवेशनाला आलेल्या १३,४९७ प्रतिनिधींची उत्कंठा शिगेला पोचली होती. शेवटी, वक्त्याने क्रोएशन व सर्बियन भाषेत ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर अनावृत्त केले आणि मॅसेडोनियन भाषेतील भाषांतर प्रगतीपथावर असल्याची घोषणा केली तेव्हा उपस्थितांच्या आनंदाला पारावार उरला नाही. टाळ्यांच्या कडकडाटामुळे वक्त्याला घोषणा पूर्णपणे वाचणेही अशक्य झाले. सारायेवो अधिवेशनात तर बांधवांना इतके आश्चर्य वाटले की काही वेळ सभागृहात पूर्ण शांतता पसरली. यानंतर टाळ्यांचा जो कडकडाट झाला तो किती वेळापर्यंत थांबला नाही. बेलग्रेडमध्ये कित्येक बंधूभगिनींच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या आणि टाळ्यांच्या कडकडाटामुळे वक्त्याला घोषणा वाचताना बऱ्याच वेळा थांबावे लागले. सर्वजण आनंदाने प्रफुल्लित झाले होते!
ही देणगी अधिकच मोलाची ठरली कारण यहोवाच्या साक्षीदारांना एका क्रोएशन व सर्बियन बायबल भाषांतराकरता मुद्रण हक्क मिळवण्यात यश आले होते. अशारितीने, या दोन भाषांतील ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर त्या त्या भाषेतील इब्री शास्त्रवचनांच्या भाषांतरासोबत एकाच खंडात प्रकाशित करण्यात आले. तसेच सर्बियन भाषेतील बायबल रोमन आणि सिरिलिक या दोन्ही लिपींत मुद्रित करण्यात आले.
यहोवाकडून मिळालेल्या सर्व आशीर्वादांबद्दल व मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञ असणाऱ्या बाल्कन राष्ट्रांतील त्याच्या लोकांनी दाविदाच्या पुढील शब्दांची सत्यता अनुभवली आहे: “मृत्युछायेच्या दरीतूनहि मी जात असलो तरी कसल्याहि अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस.” आजही बऱ्याच संकटांना तोंड द्यावे लागत असले तरीही ‘परमेश्वराच्या आनंदाला आपला आश्रयदुर्ग’ बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे.—स्तोत्र २३:४; नहेम्या ८:१०.
[तळटीप]
^ परि. 3 भूतपूर्व युगोस्लाव्हियात सहा प्रजासत्ताक होते—बोस्निया-हर्जेगोविना, क्रोएशिया, मॅसेडोनिया, माँटनीग्रो, सर्बिया आणि स्लोव्हेनिया.
[२० पानांवरील चित्र]
मॅरिबोर, स्लोव्हेनिया येथील प्रचारकांचा पहिला गट दूरस्थ क्षेत्रात प्रचार करत असताना