व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवा तुमची काळजी घेतो

यहोवा तुमची काळजी घेतो

यहोवा तुमची काळजी घेतो

“[देवावर] तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.”—१ पेत्र ५:७.

१. कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीत यहोवा व सैतान एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे आहेत?

यहोवा व सैतान यांच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. ज्या व्यक्‍तीला यहोवाची ओढ आहे त्याला दियाबलाविषयी केवळ घृणा वाटते. हा फरक एका प्रमाणभूत संदर्भग्रंथात स्पष्ट करण्यात आला आहे. बायबलमधील ईयोब या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे सैतानाच्या कार्यांविषयी एन्सायक्लोपिडिया ब्रिटॅनिका (१९७०) यात असे म्हटले आहे: ‘सैतानाचे काम, पृथ्वीभर हिंडून ज्यांच्याविरुद्ध दोषारोप करता येतील अशा गोष्टी अथवा व्यक्‍ती धुंडाळणे हे आहे; त्याअर्थी त्याचे काम परमेश्‍वराच्या अगदी विरुद्ध आहे, कारण “परमेश्‍वराचे नेत्र” सबंध पृथ्वीचे निरीक्षण करतात आणि सर्व चांगल्या गोष्टींचे समर्थन करतात (२ इति. १६:९). मनुष्य कोणत्याही स्वार्थाविना चांगली कृत्ये करू शकतो हे सैतानाला मान्य नाही आणि त्यामुळे देवाच्या अधिकाराच्या अधीन आणि त्याने घालून दिलेल्या मर्यादेत राहून त्याच्या नियंत्रणाखाली मनुष्याची परीक्षा पाहण्याची त्याला परवानगी देण्यात आली आहे.’ खरोखर यहोवा व सैतान यांच्यात किती फरक आहे!—ईयोब १:६-१२; २:१-७.

२, ३. (अ) ईयोबाच्या अनुभवावरून “दियाबल” या शब्दाचा अर्थ कशाप्रकारे स्पष्ट होतो? (ब) सैतान आजही पृथ्वीवरील यहोवाच्या सेवकांवर दोषारोप लावत आहे हे बायबलमध्ये कशाप्रकारे स्पष्ट करण्यात आले आहे?

“दियाबल” हा शब्द एका ग्रीक शब्दापासून तयार झाला आहे ज्याचा अर्थ, “खोटे आरोप करणारा,” “निंदक” असा होतो. ईयोबाच्या पुस्तकातून असे दिसून येते की यहोवाचा विश्‍वासू सेवक ईयोब हा स्वार्थापोटी त्याची उपासना करतो असा आरोप सैतानाने लावला. त्याने म्हटले: “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो?” (ईयोब १:९) ईयोबाच्या पुस्तकातील अहवाल दाखवतो की सर्व परीक्षा सोसूनही ईयोबाचा यहोवासोबतचा संबंध अधिकाधिक घनिष्ठ झाला. (ईयोब १०:९, १२; १२:९, १०; १९:२५; २७:५; २८:२८) त्याच्या परीक्षा संपुष्टात आल्यानंतर त्याने देवाला म्हटले: “मी तुजविषयी कर्णोपकर्णी ऐकले होते. आता तर प्रत्यक्ष डोळ्यांनी मी तुला पाहत आहे.”—ईयोब ४२:५.

ईयोबाच्या काळानंतर सैतानाने देवाच्या विश्‍वासू सेवकांवर दोषारोप लावण्याचे थांबवले आहे का? नाही. प्रकटीकरणाचे पुस्तक दाखवून देते की सैतान या शेवटल्या काळातही ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांवर आणि साहजिकच त्यांच्या विश्‍वासू साथीदारांवर दोषारोप लावतच आहे. (२ तीमथ्य ३:१२; प्रकटीकरण १२:१०, १७) त्यामुळे खरे ख्रिस्ती या नात्याने आपण सर्वांनी आपली काळजी वाहणारा देव यहोवा याच्या अधीन होणे आणि मनःपूर्वक प्रीतीने प्रेरित होऊन त्याची सेवा करणे अत्यावश्‍यक आहे; अशाने आपण दाखवू की सैतानाचा आरोप खोटा आहे. शिवाय, असे केल्याने आपण यहोवाचे हृदय आनंदित करू शकतो.—नीतिसूत्रे २७:११.

यहोवा आपल्याला मदत करण्याचे मार्ग शोधतो

४, ५. (अ) सैतानाच्या अगदी उलट, यहोवा पृथ्वीवर काय पाहतो? (ब) यहोवाची कृपा आपल्याला अनुभवायची असेल तर आपले काय कर्तव्य आहे?

दियाबल सर्व पृथ्वीवर कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो. (ईयोब १:७, ९; १ पेत्र ५:८) याउलट, यहोवा त्याच्या मदतीची गरज असणाऱ्‍यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. हनानी संदेष्ट्याने राजा आसा याला सांगितले: “परमेश्‍वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो.” (२ इतिहास १६:९) सैतानाच्या द्वेषपूर्ण निरीक्षणात आणि यहोवाच्या प्रेमळ काळजीत किती फरक आहे!

यहोवा आपली प्रत्येक चूक पकडण्यासाठी आपल्या पाळतीवर राहात नाही. स्तोत्रकर्त्याने लिहिले: “हे परमेशा, तू अधर्म लक्षात आणिशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?” (स्तोत्र १३०:३) उत्तर स्पष्टच आहे: कोणीही नाही. (उपदेशक ७:२०) आपण पूर्ण अंतःकरणाने यहोवाच्या जवळ आलो तर त्याची नजर आपल्यावर राहील, आपले दोष दाखवण्यासाठी नाही तर आपल्या प्रयत्नांची दखल घेऊन, साहाय्य व क्षमेकरता आपल्या प्रार्थनांचे उत्तर देण्याकरता. प्रेषित पेत्राने लिहिले: “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांवर असतात, व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात; तरी वाईट करणाऱ्‍यावर परमेश्‍वराची करडी नजर आहे.”—१ पेत्र ३:१२.

६. दाविदाचे उदाहरण आपल्याकरता सांत्वनदायक आणि इशारेवजा कसे आहे?

दावीद अपरिपूर्ण होता आणि त्याने गंभीर पाप केले. (२ शमुवेल १२:७-९) पण त्याने यहोवाजवळ आपले मन मोकळे केले आणि मनःपूर्वक प्रार्थना करण्याद्वारे तो त्याच्या जवळ गेला. (स्तोत्र ५१:१-१२, उपरिलेखन) यहोवाने त्याची ही प्रार्थना ऐकून त्याला क्षमा केली, पण त्याच्या पापाचे दुष्परिणाम मात्र त्याला भोगावे लागले. (२ शमुवेल १२:१०-१४) हे आपल्याकरता सांत्वनदायक तर आहेच, पण यात एक ताकीद देखील आहे. आपण मनापासून पश्‍चात्ताप करतो तेव्हा यहोवा आपल्याला क्षमा करायला तयार असतो हे जाणून आपल्याला सांत्वन मिळते, पण पापांमुळे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात ही विचार करायला लावणारी वस्तुस्थिती आहे. (गलतीकर ६:७-९) आपल्याला यहोवाच्या जवळ यायचे असल्यास त्याला न आवडणाऱ्‍या सर्व गोष्टी आपण आवर्जून टाळल्या पाहिजेत.—स्तोत्र ९७:१०.

यहोवा आपल्या लोकांना आकर्षितो

७. यहोवा कशाप्रकारच्या लोकांना शोधतो आणि तो त्यांना कशाप्रकारे स्वतःकडे आकर्षितो?

दाविदाने एका स्तोत्रात असे लिहिले: “परमेश्‍वर थोर आहे तरी तो दीनाकडे लक्ष देतो; पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो.” (स्तोत्र १३८:६) त्याचप्रकारे दुसऱ्‍या एका स्तोत्रात असे म्हटले आहे: “परमेश्‍वर आमचा देव जो उच्च स्थळी राजासनारूढ आहे, जो आकाश व पृथ्वी ह्‍यांचे अवलोकन करण्यास लवतो, त्याच्यासारखा कोण आहे? तो कंगालास धुळीतून उठवितो, दरिद्र्‌यास उकिरड्यावरून उचलितो.” (स्तोत्र ११३:५-७) होय, या विश्‍वाचा सर्वसमर्थ निर्माणकर्ता पृथ्वीकडे पाहण्याकरता लवतो आणि त्याचे नेत्र “दीनाकडे,” ‘दरिद्र्‌याकडे’ आणि ‘सर्व अमंगळ कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करणाऱ्‍यांकडे’ असतात. (यहेज्केल ९:४) तो आपल्या पुत्राच्या माध्यमाने अशांना स्वतःकडे ओढून घेतो. पृथ्वीवर असताना येशूने म्हटले: “ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीहि माझ्याकडे येऊ शकत नाही; . . . पित्याने कोणाहि मनुष्याला तशी देणगी दिल्यावाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही.”—योहान ६:४४, ६५.

८, ९. (अ) आपण सर्वांनी येशूकडे येणे का गरजेचे आहे? (ब) खंडणीच्या तरतुदीबद्दल सर्वात विशेष काय?

सर्व मानवांनी येशूकडे येऊन त्याच्या खंडणी बलिदानावर विश्‍वास ठेवणे आवश्‍यक आहे कारण ते सर्व जन्मतःच पापी असून देवापासून दुरावलेले आहेत. (योहान ३:३६) त्यांचा देवासोबत समेट होणे आवश्‍यक आहे. (२ करिंथकर ५:२०) पापीजनांनी आपल्याशी समेट व्हावा म्हणून काहीतरी तरतूद करण्याची विनंती करीपर्यंत देव थांबला नाही. प्रेषित पौलाने लिहिले: “देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. . . . कारण आपण शत्रु असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला, तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेषेकरून तारले जाणार आहो.”—रोमकर ५:८, १०.

देव स्वतःच मानवांशी समेट करतो या महान सत्याला प्रेषित योहानानेही दुजोरा दिला; त्याने लिहिले: “देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला जगात पाठविले आहे, ह्‍यासाठी की, त्याच्या द्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे, ह्‍यावरून देवाची आपल्यावरील प्रीति प्रगट झाली. प्रीति म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीति केली असे नाही, तर त्याने तुम्हाआम्हावर प्रीति केली आणि तुमच्याआमच्या पापांचे प्रायश्‍चित्त व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले.” (१ योहान ४:९, १०) पुढाकार देवाने घेतला, मानवांनी नव्हे. “पापी,” इतकेच नव्हे तर “शत्रू” असलेल्यांविषयी इतके प्रेम व्यक्‍त करणाऱ्‍या देवाकडे तुम्ही आपोआपच आकर्षित होत नाही का?—योहान ३:१६.

यहोवाला शोधण्याची गरज

१०, ११. (अ) यहोवाचा शोध करण्याकरता आपण काय केले पाहिजे? (ब) सैतानाच्या व्यवस्थीकरणाविषयी आपली मनोवृत्ती कशी असावी?

१० अर्थात यहोवा आपल्याला त्याच्याकडे येण्याकरता भाग पाडत नाही. आपण “देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत चाचपडत त्याला कसे तरी प्राप्त करून घ्यावे. तो आपल्यापैकी कोणापासूनहि दूर नाही.” (प्रेषितांची कृत्ये १७:२७) आपण यहोवाच्या अधीन राहावे अशी अपेक्षा करण्याचा त्याचा हक्क आहे हे आपण ओळखले पाहिजे. शिष्य याकोबाने लिहिले: “देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल. देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापी जनहो, हात निर्मळ करा, अहो द्विबुद्धीच्या लोकांनो आपली अंतःकरणे शुद्ध करा.” (याकोब ४:७, ८) आपण दियाबलाचा विरोध करण्यास आणि देवाच्या बाजूने उभे राहण्यास कधीही मागेपुढे पाहू नये.

११ याचा अर्थ आपण सैतानाच्या दुष्ट व्यवस्थीकरणापासून दूर राहिले पाहिजे. याकोबाने असे लिहिले: “जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांस ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” (याकोब ४:४) याउलट जर आपण यहोवाशी मैत्री करू इच्छितो, तर मग सैतानाचे जग आपला द्वेष करेल अशी अपेक्षा आपण केली पाहिजे.—योहान १५:१९; १ योहान ३:१३.

१२. (अ) दाविदाने कोणते सांत्वनदायक शब्द लिहिले? (ब) यहोवाने संदेष्टा अजऱ्‍या याच्याद्वारे कोणती ताकीद दिली?

१२ सैतानाच्या जगाकडून जेव्हा आपल्याला छळ सोसावा लागतो, तेव्हा खासकरून आपण यहोवाला प्रार्थना करून त्याची मदत मागितली पाहिजे. दाविदाने अनेकदा यहोवाच्या सामर्थ्यशाली हाताकरवी तारण अनुभवले होते; आपल्या सांत्वनाकरता त्याने लिहिले: “जे कोणी त्याचा धावा करितात, जे खऱ्‍या भावाने त्याचा धावा करितात, त्या सर्वांना परमेश्‍वर जवळ आहे. तो आपले भय धरणाऱ्‍यांची इच्छा पुरवितो; व त्यांची आरोळी ऐकून त्यांना तारितो. परमेश्‍वर आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या सर्वांचे रक्षण करितो, पण सर्व दुर्जनांचा नाश करितो.” (स्तोत्र १४५:१८-२०) या स्तोत्रावरून आपल्याला दिसून येते, की आपल्यावर वैयक्‍तिक परीक्षा येतात तेव्हा यहोवा त्यातून आपल्याला सोडवू शकतो आणि “मोठ्या संकटातून” तो आपल्या लोकांचा सामूहिकरित्या बचाव करेल. (प्रकटीकरण ७:१४) आपण यहोवाच्या जवळ राहिलो तर तो देखील आपल्या जवळ राहील. ‘देवाच्या आत्म्याच्या’ प्रेरणेने संदेष्टा अजऱ्‍या याने लिहिलेले शब्द आपण एक सार्वत्रिक सत्य म्हणून स्वीकारू शकतो. “तुम्ही परमेश्‍वराच्या बरोबर राहाल तोवर तो तुमच्याबरोबर राहील; तुम्ही त्यास शरण जाल तर तो तुम्हास पावेल, पण तुम्ही त्यास सोडाल तर तो तुम्हास सोडील.”—२ इतिहास १५:१, २.

यहोवा आपल्याकरता वास्तविक असला पाहिजे

१३. यहोवा आपल्याकरता वास्तविक आहे हे आपण कसे दाखवू शकतो?

१३ प्रेषित पौलाने मोशेविषयी लिहिले की “जो अदृश्‍य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.” (इब्री लोकांस ११:२७) अर्थात मोशेने प्रत्यक्ष यहोवाला पाहिले नव्हते. (निर्गम ३३:२०) पण यहोवा त्याच्याकरता इतका वास्तविक होता, जणू तो त्याला प्रत्यक्ष पाहत आहे. त्याचप्रकारे ईयोबाच्या परीक्षा संपुष्टात आल्यावर तो आपल्या विश्‍वासाच्या नेत्रांनी यहोवाला अधिक स्पष्टपणे पाहू शकत होता; यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांवर परीक्षा येऊ देत असला तरीसुद्धा तो कधीही त्यांचा त्याग करत नाही हे त्याला स्पष्टपणे दिसून आले. (ईयोब ४२:५) हनोख व नोहा यांच्याविषयी असे म्हणण्यात आले की ते ‘देवाबरोबर चालले.’ ते या अर्थाने देवाबरोबर चालले की त्यांनी देवाला संतुष्ट करण्याचा आणि त्याच्या आज्ञांचे पालन करण्याचा नेहमी प्रयत्न केला. (उत्पत्ति ५:२२-२४; ६:९, २२; इब्री लोकांस ११:५, ७) हनोख, नोहा, ईयोब आणि मोशे यांना वाटत होता तितकाच जर यहोवा आपल्यालाही वास्तविक वाटत असेल तर आपोआपच आपण आपल्या सर्व मार्गांत ‘त्याचा आदर करू’ आणि तो ‘आपला मार्गदर्शक होईल.’—नीतिसूत्रे ३:५, ६.

१४. यहोवाला ‘चिकटून राहण्याचा’ काय अर्थ होतो?

१४ इस्राएल लोक प्रतिज्ञात देशात प्रवेश करण्याच्या बेतात असताना मोशेने त्यांना असा सल्ला दिला: “तुम्ही आपला देव परमेश्‍वर ह्‍याला अनुसरावे, त्याचे भय बाळगावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या, त्याची वाणी ऐकावी, त्याची सेवा करावी आणि त्यालाच चिकटून राहावे.” (अनुवाद १३:४) त्यांना यहोवाला अनुसरण्याची, त्याचे भय बाळगण्याची, त्याच्या आज्ञा पाळण्याची आणि त्यालाच चिकटून राहण्याची आज्ञा देण्यात आली होती. ‘चिकटून राहणे’ असे भाषांतर केलेल्या शब्दाविषयी एका बायबल अभ्यासकाने म्हटले, की “ही भाषा एका अत्यंत घनिष्ट नातेसंबंधाची सूचक आहे.” स्तोत्रकर्त्याने म्हटले: “परमेश्‍वराचे सख्य त्याचे भय धरणाऱ्‍याशी असते.” (स्तोत्र २५:१४) जर यहोवा आपल्याकरताही वास्तविक असेल आणि त्याला कोणत्याही प्रकारे कधीही न दुखवण्याइतकी जर आपली त्याच्यावर प्रीती असेल तर त्याच्यासोबत एक मोलवान घनिष्ट नातेसंबंध आपणही अनुभवू शकतो.—स्तोत्र १९:९-१४.

तुम्हाला यहोवाच्या काळजीची जाणीव आहे का?

१५, १६. (अ) स्तोत्र ३४ कशाप्रकारे दाखवून देते की यहोवा आपली काळजी वाहतो? (ब) आपल्याप्रती यहोवाच्या चांगुलपणाची कृत्ये आठवत नसल्यास आपण काय करावे?

१५ सैतानाची आणखी एक कुयुक्‍ती म्हणजे आपला देव यहोवा हा सतत त्याच्या विश्‍वासू सेवकांची काळजी घेतो या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करायला लावणे. इस्राएलचा राजा दावीद याला अतिशय धोक्याच्या क्षणीदेखील पूर्ण कल्पना होती की यहोवाचे संरक्षण त्याच्यासोबत होते. गथाचा राजा आखीश याच्यासमोर वेडेपणाचे सोंग करण्याची पाळी त्याच्यावर आली तेव्हा त्याने एक गीत, एक अत्यंत सुरेख स्तोत्र रचले ज्यात त्याने आपला विश्‍वास या शब्दांत व्यक्‍त केला: “तुम्ही माझ्याबरोबर परमेश्‍वराची थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूं या. मी परमेश्‍वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला; त्याने माझ्या सर्व भयांपासून मला सोडविले. परमेश्‍वराचा दूत त्याचे भय धरणाऱ्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करितो. परमेश्‍वर किती चांगला आहे ह्‍याचा अनुभव घेऊन पाहा; जो त्याच्यावर भाव ठेवितो तो पुरुष धन्य! परमेश्‍वर भग्नहृदयी लोकांच्या सन्‍निध असतो; अनुतप्त मनाच्या लोकांचा तो उद्धार करितो. नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्‍वर त्या सर्वांतून त्याला सोडवितो.”—स्तोत्र ३४:३, ४, ७, ८, १८, १९; १ शमुवेल २१:१०-१५.

१६ यहोवाच्या तारक शक्‍तीवर तुम्हाला पूर्ण विश्‍वास आहे का? त्याच्या देवदूतांच्या संरक्षणाची तुम्हाला जाणीव आहे का? यहोवा किती चांगला आहे याचा तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पाहिला आहे का? यहोवाने तुम्हाला चांगुलपणा दाखवला याची तुम्हाला जाणीव झाल्याचा प्रसंग तुम्हाला आठवतो का? आठवून पाहा. तुम्ही सेवाकार्यात अगदी थकून गेला, आता घरी परतावे असे वाटत असतानाच तुम्ही शेवटल्या घरी गेला तेव्हा तुम्हाला यहोवाचा चांगुलपणा अनुभवायला मिळाला का? कदाचित नेमक्या त्याच घरी तुमचे घरमालकाशी सुरेख संभाषण झाले असावे. तुम्हाला आवश्‍यक असलेली अधिक शक्‍ती आणि आशीर्वाद दिल्याबद्दल तुम्ही यहोवाचे आठवणीने उपकार मानले का? (२ करिंथकर ४:७) कदाचित तुम्हाला यहोवाने वैयक्‍तिकरित्या चांगुलपणा दाखवल्याचा एखादा विशिष्ट प्रसंग आठवत नसेल. कदाचित एका आठवड्याआधी, एका महिन्याआधी किंवा एका वर्षाआधीच्या घटनांचा तुम्ही विचार करत असाल. असे असल्यास, तुम्ही यहोवाच्या अधिक जवळ येण्याचा आणि त्याचे मार्गदर्शन व निर्देशन अनुभवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करू शकता का? प्रेषित पेत्राने ख्रिश्‍चनांना असा सल्ला दिला: “देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्‍यासाठी की, त्याने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” (१ पेत्र ५:६, ७) खरोखर तुम्हाला हे जाणून आश्‍चर्य वाटेल की तो तुमची किती काळजी वाहतो!—स्तोत्र ७३:२८.

यहोवाला शोधत राहा

१७. यहोवाला शोधत राहण्याकरता काय आवश्‍यक आहे?

१७ यहोवाशी आपला नातेसंबंध टिकवून ठेवणे ही एक नित्याची बाब असली पाहिजे. येशूने आपल्या पित्याला प्रार्थना करताना म्हटले: “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला, व ज्याला तू पाठविले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.” (योहान १७:३) यहोवा व त्याच्या पुत्राबद्दल ज्ञान घेण्याकरता सातत्याने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. ‘देवाच्या गहन गोष्टी’ समजून घेण्याकरता प्रार्थनेतून त्याची मदत आणि पवित्र आत्मा मागण्याची गरज आहे. (१ करिंथकर २:१०; लूक ११:१३) तसेच “यथाकाळी” आध्यात्मिक अन्‍न ग्रहण करण्याकरता आपल्याला ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाचेही’ मार्गदर्शन मिळणे आवश्‍यक आहे. (मत्तय २४:४५) याच दासाच्या माध्यमाने यहोवाने आपल्याला दररोज त्याचे वचन वाचण्याची, ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थित राहण्याची आणि ‘राज्याच्या सुवार्तेची’ घोषणा करण्यात उत्साही सहभाग घेण्याची आज्ञा दिली आहे. (मत्तय २४:१४) असे केल्याने आपण आपली काळजी वाहणाऱ्‍या यहोवा देवाचा शोध करत राहू शकतो.

१८, १९. (अ) आपण काय करण्याचा निर्धार केला पाहिजे? (ब) आपण खंबीरतेने दियाबलाचा विरोध केला आणि यहोवाचा शोध घेत राहिलो तर आपल्याला कोणता आशीर्वाद मिळेल?

१८ सैतान सर्व बाजूने यहोवाच्या लोकांविरुद्ध छळ, विरोध आणि दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. तो आपल्यातील शांती भंग करण्याचा आणि देवासमोर आपल्याला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करतो. आपण प्रामाणिक हृदयाच्या लोकांना शोधण्याचे आणि विश्‍वाच्या सार्वभौमत्वाच्या वादविषयात यहोवाच्या बाजूला येण्याकरता त्यांना मदत करण्याचे आपले काम सातत्याने करावे असे त्याला वाटत नाही. पण आपण यहोवाला विश्‍वासू राहण्याचा आपला निर्धार कायम ठेवला पाहिजे, या आत्मविश्‍वासाने की तो आपल्याला त्या दुष्टाच्या हातून सोडवील. देवाच्या वचनाला आपले मार्गदर्शन करू दिल्यास आणि त्याच्या दृश्‍य संस्थेसोबत उत्साहाने कार्य केल्यास आपण आश्‍वस्त राहू शकतो की तो नेहमी आपले साहाय्य करेल.—यशया ४१:८-१३.

१९ तेव्हा आपण सर्व दियाबलाच्या आणि त्याच्या डावपेचांविरुद्ध खंबीर राहून सतत आपला प्रिय देव यहोवा याचा शोध घेत राहू या. तो निश्‍चितच आपल्याला “दृढ व सबळ करील.” (१ पेत्र ५:८-११) अशारितीने, ‘सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या दयेची वाट पाहत असताना’ आपण कायम ‘स्वतःला देवाच्या प्रीतीत ठेवू शकतो.’—यहूदा २१.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• “दियाबल” या शब्दाचा काय अर्थ होतो आणि दियाबलाकरता हे नाव अगदी योग्य का आहे?

• पृथ्वीवरील लोकांकडे पाहण्याचा यहोवाचा दृष्टिकोन दियाबलापेक्षा कशाप्रकारे वेगळा आहे?

• यहोवाकडे येऊ इच्छिणाऱ्‍याने खंडणी बलिदानाचा स्वीकार का करावा?

• यहोवाला ‘चिकटून राहण्याचा’ काय अर्थ होतो आणि आपण कशाप्रकारे यहोवाला शोधत राहू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

इतक्या परीक्षा येऊनही, यहोवा आपली काळजी वाहतो ही गोष्ट ईयोबाने ओळखली

[१६, १७ पानांवरील चित्रे]

दररोज बायबलचे वाचन, ख्रिस्ती सभांना नियमित उपस्थिती आणि प्रचार कार्यात आवेशी सहभाग घेतल्याने यहोवा आपली काळजी वाहतो याची आपल्याला आठवण होते