व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

विदेशात मुलांचे संगोपन—अडचणी आणि प्रतिफळे

विदेशात मुलांचे संगोपन—अडचणी आणि प्रतिफळे

विदेशात मुलांचे संगोपनअडचणी आणि प्रतिफळे

कोट्यवधी लोक एखाद्या नवीन देशात, आपल्या जीवनाची नव्याने सुरवात करण्याच्या आशेने स्थलांतर करतात. सध्या युरोपमध्ये दोन कोटींहून अधिक परदेशी आहेत, अमेरिकेत राहणारे २.६ कोटींहून अधिक लोक परदेशात जन्मलेले आहेत तर ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येतील २१ टक्के लोक परगावी जन्मले आहेत. सहसा या विदेशी कुटुंबांना नवीन भाषा शिकण्यासाठी आणि नवीन संस्कृतीशी जुळवून घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

बहुतेक वेळा, मुले सहजासहजी नवीन देशातील भाषा शिकतात आणि नवीन भाषेत विचारही करू लागतात. मात्र त्यांच्या पालकांना शिकायला वेळ लागेल. मुले एखाद्या परक्या देशात लहानाची मोठी होतात तेव्हा भाषेतील अडचणींमुळे सुसंवादाला तडा जातो आणि तो सहजासहजी भरून काढण्यासारखा नसतो.

नवीन भाषेचा परिणाम केवळ मुलांच्या विचारसरणीवर पडत नाही तर नवीन देशातील संस्कृतीचा त्यांच्या भावनांवरही प्रभाव पडतो. पालकांना आपल्या मुलांच्या प्रतिक्रिया समजायला कठीण जाऊ शकते. त्यामुळे, आपल्या मुलांना “प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्‍या स्थलांतरित पालकांसमोर असाधारण आव्हाने उभी राहतात.—इफिसकर ६:४.

बुद्धी आणि अंतःकरण दोहोंना आकार देण्याचे आव्हान

ख्रिस्ती पालकांना आपल्या मुलांना बायबल सत्याची “शुद्ध वाणी” शिकवण्याची इच्छा आणि जबाबदारी देखील असते. (सफन्या ३:९) पण, मुलांना आपल्या पालकांच्या भाषेचे फक्‍त थोडेफार ज्ञान असेल आणि मुलांना अवगत असलेल्या भाषेत पालकांना आपले विचार नीट व्यक्‍त करता येत नसतील तर मुलांच्या अंतःकरणात ते यहोवाचा नियम कसा बिंबवू शकतील? (अनुवाद ६:७) मुलांना पालकांचे बोलणे समजत असेल पण ते बोलणे त्यांच्या मनाला भिडत नसेल तर मुले आपल्याच घरात अनोळखी बनतील.

पेड्रो आणि सॅन्ड्रा हे दक्षिण अमेरिकेतून ऑस्ट्रेलियात राहायला गेले आणि त्यांना आपल्या दोन किशोरवयीन मुलांना वाढवताना याच अडचणीला तोंड द्यावे लागते. पेड्रो * म्हणतात: “आध्यात्मिक गोष्टींविषयी चर्चा करताना हृदय आणि भावना गोवलेल्या असतात. गहन आणि अधिक अर्थपूर्ण विचार व्यक्‍त करण्यासाठी मोठा शब्दसंग्रह असण्याची गरज असते.” सॅन्ड्रा म्हणते: “आमच्या मुलांना आमच्या मातृभाषेची पक्की समज नसली तर त्यांच्या आध्यात्मिक जीवनावर याचा दुष्परिणाम होऊ शकतो. सत्याची गहन समज त्यांना मिळणार नाही आणि शिकत असलेल्या गोष्टींमागचे तत्त्व कळणार नाही. त्यांची आध्यात्मिक समज खुंटेल आणि यहोवासोबतच्या त्यांच्या नातेसंबंधावर याचा अनिष्ट परिणाम होईल.”

ज्ञानप्रकाशम आणि हेलन हे जोडपे श्रीलंकेतून जर्मनीत राहायला गेले आणि आता त्यांना दोन मुले आहेत. ते कबूल करतात: “आमच्या मते आमच्या मुलांनी जर्मन शिकता शिकता आपली मातृभाषाही शिकली पाहिजे. त्यांना आम्हाला त्यांच्या भावना स्पष्टपणे सांगता आल्या पाहिजेत व मनमोकळेपणाने बोलता आले पाहिजे.”

उरुग्वेतून ऑस्ट्रेलियात स्थलांतर केलेल्या मिगेल आणि कार्मेन यांनी म्हटले: “आमच्यासारख्या पालकांनी जास्त प्रयत्न केला पाहिजे. त्यांनी एकतर, आध्यात्मिक गोष्टी समजून त्या स्पष्ट करता येण्याइतपत नवीन भाषेवर स्वतः प्रभुत्व मिळवावे किंवा मुलांना आपली भाषा चांगल्याप्रकारे शिकवावी.”

कुटुंबाचा निर्णय

स्थलांतर करणाऱ्‍या कोणत्याही कुटुंबाच्या आध्यात्मिक आरोग्याकरता, ‘यहोवापासून शिक्षण घेण्यासाठी’ कोणती भाषा वापरावी हा निर्णय घेणे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. (यशया ५४:१३) कुटुंबाच्या मातृभाषेची मंडळी जवळपास असली तर या मंडळीच्या सभांना जाण्याचा निर्णय कुटुंब कदाचित घेईल. दुसऱ्‍या बाजूला पाहता, त्या देशामध्ये मुख्यतः बोलल्या जाणाऱ्‍या भाषेतील मंडळीत जाण्याचा ते निर्णय घेतील. कोणत्या गोष्टींच्या आधारे हा निर्णय घेतला जाईल?

थिमित्रिओस आणि पत्रुला यांनी सायप्रसमधून इंग्लंडला स्थलांतर केले आणि तेथे पाच मुलांचे संगोपन केले; त्यांनी जो निर्णय घेतला त्याचे कारण ते सांगतात: “सुरवातीला, आमचे कुटुंब ग्रीक मंडळीत जात होते. आम्हा पालकांना याची खूप मदत झाली परंतु आमच्या मुलांच्या आध्यात्मिक विकासाला हे अडखळण ठरत होते. त्यांना ग्रीक भाषेचे मूलभूत ज्ञान होते तरीपण त्यांना अगदी गहन मुद्दे समजत नव्हते. यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती अगदी मंदावली. कुटुंब या नात्याने आम्ही मंडळी बदलण्याचा निर्णय घेतला; एका इंग्रजी बोलणाऱ्‍या मंडळीत आम्ही गेलो आणि त्याचे आमच्या मुलांना झालेले चांगले फायदे अगदी लगेच दिसून आले. ते आध्यात्मिकरित्या बळकट झाले. मंडळी बदलण्याचा निर्णय घ्यायला आम्हाला फार जड गेले पण आमच्याबाबतीत तो सुज्ञ निर्णय ठरला.”

हे कुटुंब आपली मातृभाषा पूर्णपणे विसरले नाही आणि त्यांना अनेक फायदे प्राप्त झाले. त्यांची मुले म्हणतात: “अधिक भाषा येत असतील तर ते मोलाचे आहे. इंग्रजी ही आमची पहिली भाषा असली तरी ग्रीक येत असल्यामुळे आमचे कौटुंबिक नातेसंबंध, विशेषतः आजीआजोबांसोबतचे नातेसंबंध मजबूत आणि निकटचे झाले आहे. स्थलांतर करणाऱ्‍यांबद्दल आम्हाला सहानुभूतीशील असायला शिकायला मिळाले आणि दुसरी भाषा शिकण्याचे धैर्यही आम्हाला मिळाले. त्यामुळे, मोठे झाल्यावर अल्बेनियन भाषेच्या एका मंडळीला मदत करण्याकरता आम्ही दुसरीकडे राहायला गेलो.”

क्रिस्टोफर आणि मार्गारीटा देखील सायप्रसहून इंग्लंडला राहायला गेले आणि तेथे त्यांनी तीन मुलांचे संगोपन केले. त्यांनी ग्रीक भाषेच्या मंडळीत जाण्याचा निर्णय घेतला. एका ग्रीक भाषेच्या मंडळीत आता वडील या नात्याने कार्य करणारा त्यांचा मुलगा निकोस आठवून सांगतो: “आम्हाला नुकत्याच सुरू झालेल्या ग्रीक भाषेच्या मंडळीत जाण्याचे उत्तेजन देण्यात आले होते. कुटुंबातल्या सर्वांनी ही एक ईश्‍वरशासित नेमणूक म्हणून स्वीकारली.”

मार्गारीटा सांगते: “आमची दोन मुले, सात आणि आठ वर्षांची असताना त्यांनी ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत प्रवेश घेतला. आम्हाला त्यांच्या ग्रीक भाषेच्या तुटपुंज्या ज्ञानाविषयी चिंता होती. पण, मिळेल ती नेमणूक आम्ही कुटुंब मिळून पार पाडत होतो आणि त्यांना आपली भाषणे तयार करण्यात मदत करण्यासाठी आम्ही तासन्‌तास मेहनत घ्यायचो.”

त्यांची मुलगी जोॲन्‍ना म्हणते: “घरी एक फलक होता आणि त्यावर ग्रीक अक्षरे गिरवून बाबा आम्हाला ग्रीक शिकवत असल्याचे मला चांगले आठवते आणि आम्हाला ते नीट शिकून घ्यावे लागत होते. पुष्कळांना एखादी नवी भाषा शिकायला किती तरी वर्षं लागतात पण आई बाबांची मदत असल्यामुळे आम्ही जास्त वेळ न घेता ग्रीक शिकलो.”

काही कुटुंबे मातृभाषेतील मंडळीत जातील कारण पालकांना वाटेल की, “आध्यात्मिक ज्ञान” वाढवण्यासाठी व प्रगती करण्यासाठी त्यांना मातृभाषेत शिकवले जाण्याची गरज आहे. (कलस्सैकर १:९, १०; १ तीमथ्य ४:१३, १५) किंवा ते कुटुंब असा विचार करेल की, त्यांना येत असलेली भाषा स्थलांतर करणाऱ्‍या इतर लोकांना सत्य शिकवण्याकरता देणगी ठरू शकते.

दुसऱ्‍या बाजूला, एखाद्या कुटुंबाला वाटेल की, स्थलांतर केलेल्या देशाच्या मुख्य भाषेतील मंडळीत जाण्यात अधिक फायदा आहे. (फिलिप्पैकर २:४; १ तीमथ्य ३:५) कुटुंबाने एकत्र मिळून परिस्थितीचा विचार केल्यावर, याविषयी प्रार्थनापूर्वक निर्णय घेण्याची जबाबदारी कुटुंबाच्या मस्तकाची आहे. (रोमकर १४:४; १ करिंथकर ११:३; फिलिप्पैकर ४:६, ७) या कुटुंबांना कोणत्या सल्ल्यांचा फायदा होईल?

काही व्यावहारिक सल्ले

पेड्रो आणि सॅन्ड्रा, ज्यांचा आधी उल्लेख आला आहे, ते म्हणतात: “आमच्या घरात स्पॅनिश बोलण्याची सक्‍ती आम्ही केलीय म्हणजे आम्ही आमची मातृभाषा विसरणार नाही. हे पुष्कळदा कठीण जाते कारण आम्हाला इंग्रजी येते हे आमच्या मुलांना ठाऊक आहे. पण हा नियम आम्ही ठेवला नाही तर लवकरच आमच्या मुलांना स्पॅनिशमध्ये बोललेले कळणार नाही.”

मिगेल आणि कार्मेन (यांचाही उल्लेख आधी आला आहे) ते असा सल्ला देतात: “कुटुंबाने नियमित कौटुंबिक अभ्यास चालवला आणि प्रत्येक दिवशी मातृभाषेत दैनिक वचनाची चर्चा केली तर मुलांना फक्‍त भाषेचे मूलभूत ज्ञान राहणार नाही तर ते त्या भाषेत आध्यात्मिक कल्पनाही मांडायला शिकतील.”

मिगेल असेही म्हणतात: “साक्षकार्यात मुलांना आनंद वाटेल असा प्रयत्न करा. आमच्या क्षेत्रात एका मोठ्या शहराचा मोठा भाग आहे आणि आमचा पुष्कळसा वेळ आमची भाषा बोलणाऱ्‍या लोकांच्या भेटी घेण्यासाठी कारने प्रवास करण्यात जातो. या वेळेत आम्ही बायबलवर आधारित खेळ खेळतो आणि महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करतो. मी साक्षकार्याला बाहेर पडताना अशी योजना करतो की ज्यामुळे आम्हाला अनेक चांगल्या पुनर्भेटी देता येतील. दिवसाच्या शेवटी, आमच्या मुलांनी निदान एका अर्थपूर्ण संभाषणात भाग घेतलेला असतो.”

सांस्कृतिक विषमतेच्या आव्हानाचा सामना

देवाच्या वचनात युवकांना असे उत्तेजन दिले आहे: “माझ्या मुला, आपल्या बापाचा बोध ऐक, आपल्या आईची शिस्त सोडू नको.” (नीतिसूत्रे १:८) पण, बापाचा बोध आणि आईची “शिस्त” वेगळ्या संस्कृतीने प्रभावित असेल आणि मुले ज्या संस्कृतीत वावरतात ती वेगळी असेल तर अडचणी निर्माण होऊ शकतात.

अर्थात, आपल्या कुटुंबासाठी निर्णय घेणे हे प्रत्येक कुटुंबाच्या मस्तकावर अवलंबून आहे आणि त्याने इतर कुटुंबांकडे पाहून उगाच प्रभावित होण्याची गरज नाही. (गलतीकर ६:४, ५) तरीही, पालक आणि मुलांमध्ये चांगला सुसंवाद असेल तर नवीन चालीरिती स्वीकारायला सोपे जाईल.

विकसित देशांमध्ये प्रचलित असलेल्या अनेक चालीरीती किंवा पद्धती ख्रिश्‍चनांच्या आध्यात्मिक आरोग्याकरता हानीकारक आहेत. लैंगिक अनैतिकता, लोभ आणि बंडखोर वृत्ती यांना लोकप्रिय संगीत व मनोरंजन यातून प्रोत्साहन दिले जाते. (रोमकर १:२६-३२) आपल्याला भाषा समजत नाही म्हणून ख्रिस्ती पालक आपल्या मुलांच्या संगीत व मनोरंजनाच्या निवडीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी त्यागू शकत नाहीत. त्यांनी कडक नियम बनवले पाहिजेत. अर्थात हे सोपे नाही.

कार्मेन म्हणते: “आमची मुले जे संगीत ऐकतात त्याचे शब्द आम्हाला सहसा कळत नाहीत. गाणे ऐकायला छान वाटत असेल पण त्याच्या शब्दांचे दोन अर्थ होत असतील किंवा त्यात काही अनैतिक शब्द असतील तर आम्हाला कळणार नाही.” या परिस्थितीचा सामना त्यांनी कसा केला? मिगेल म्हणतात: “आमच्या मुलांना अनैतिक संगीताचे धोके समजावून सांगण्यात आम्ही पुष्कळ वेळ खर्च करतो आणि त्यांना यहोवाला पसंत होईल असे संगीत निवडायला मदत करतो.” होय, सतर्कता आणि समजूतदारपणा या गोष्टी संस्कृतीतील वेगळेपणाचा सामना करण्यासाठी आवश्‍यक आहेत.—अनुवाद ११:१८, १९; फिलिप्पैकर ४:५.

प्रतिफळ प्राप्त करणे

परदेशात मुलांचे संगोपन करण्यासाठी जादा वेळ आणि प्रयत्नाची गरज आहे, यात काहीच शंका नाही. पण पालकांना आणि मुलांनाही त्यांच्या प्रयत्नांसाठी जादा प्रतिफळ मिळू शकते.

अझाम आणि त्याची पत्नी सारा यांनी टर्कीतून जर्मनीत स्थलांतर केले आणि तेथे त्यांनी तीन मुलांचे संगोपन केले. त्यांचा थोरला मुलगा सध्या जर्मनीतल्या सेल्टर्स येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात सेवा करतो. अझाम म्हणतो: “मुलांकरता एक मोठा फायदा हा असतो की, त्यांना दोन्ही संस्कृतींसाठी आवश्‍यक असलेले गुण विकसित करता येतात.”

आन्टोन्यो आणि लुटोनाड्यो अंगोलातून जर्मनीला राहायला गेले आणि ते नऊ मुलांचे संगोपन करत आहेत. त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना लिंगाला, फ्रेंच आणि जर्मन या भाषा येतात. आन्टोन्यो म्हणतात: “अनेक भाषा बोलता येत असल्यामुळे आमच्या कुटुंबाला अनेक देशांच्या लोकांना साक्ष द्यायला मदत होते. यामुळे आम्हाला फार आनंद मिळतो.”

इंग्लंडला स्थलांतर केलेल्या एका जपानी दांपत्याच्या दोन मुलांना वाटते की, जपानी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा येत असल्याचा त्यांना खूप फायदा होतो. ही मुले म्हणतात: “दोन भाषा येत असल्यामुळे आम्हाला नोकरी मिळायला मदत झाली. इंग्रजी भाषेतील मोठ्या अधिवेशनांचा आम्हाला फायदा झाला आहे. त्याच वेळी, जास्त गरज असलेल्या जपानी भाषेतील मंडळीत राहण्याचा सुहक्क आम्हाला मिळाला आहे.”

तुम्ही यशस्वी होऊ शकता

भिन्‍न संस्कृतीच्या लोकांमध्ये राहून आपल्या मुलांचे संगोपन करण्याच्या आव्हानाला बायबल काळापासून देवाच्या सेवकांना तोंड द्यावे लागले आहे. मोशे ईजिप्तमध्ये लहानाचा मोठा झाला तरीपण त्याचे पालक यशस्वी ठरले. (निर्गम २:९, १०) कित्येक यहुदी लोकांच्या मुलांचे संगोपन बॅबिलोनमध्ये बंदिवासात असताना झाले तरीपण ते यरुशलेमेत जाऊन खरी उपासना पुनर्स्थापित करायला तयार होते.—एज्रा २:१, २, ६४-७०.

त्याचप्रमाणे, आजही ख्रिस्ती पालक यशस्वी ठरू शकतात. एका दांपत्याच्या मुलांनी म्हटले: “आमच्या आईबाबांच्या प्रेमळ काळजीमुळे आमच्या कुटुंबात खूप जवळीक आहे; त्यांच्याशी आम्ही नेहमी मनमोकळेपणाने बोलू शकलो आहोत. यहोवाची सेवा करणाऱ्‍या जगव्याप्त कुटुंबाचा भाग असण्याचा आम्हाला आनंद वाटतो.” इतर पालकांनाही आपल्या मुलांकडून असेच शब्द ऐकण्याचा आशीर्वाद मिळू शकतो.

[तळटीप]

^ परि. 7 काही नावे बदलण्यात आली आहेत.

[२४ पानांवरील चित्र]

घरी फक्‍त मातृभाषेत बोलल्याने मुलांना त्या भाषेचे मूलभूत ज्ञान मिळते

[२४ पानांवरील चित्र]

एका भाषेत बोलल्याने आजीआजोबा आणि नातवंडे यांमधले बंधन टिकून राहते

[२५ पानांवरील चित्र]

आपल्या मुलांसोबत बायबलचा अभ्यास केल्याने त्यांचे “आध्यात्मिक ज्ञान” वाढू शकते