व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“सैतानाला अडवा”

“सैतानाला अडवा”

“सैतानाला अडवा”

“सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.”—याकोब ४:७.

१. सध्याच्या जगाविषयी काय म्हणता येईल आणि अभिषिक्‍त जन व त्यांच्या सोबत्यांनी सावधगिरी बाळगण्याची का गरज आहे?

“देव नाहीसा झाला आहे, पण दियाबल मात्र अद्याप आहे.” आन्द्रे माल्रो नावाच्या फ्रेंच लेखकाचे हे शब्द आजच्या जगाच्या परिस्थितीला अगदी चपखल बसतात. आजकाल मनुष्य देवाच्या इच्छेनुसार कार्य करण्याऐवजी दियाबलाच्या कुयुक्‍त्‌यांनुसार अधिक कार्य करू लागला आहे. ‘ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांच्यासाठी सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्‌भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्‍यांनी’ माणसांना मार्गभ्रष्ट करण्याचा आज सैतानाचा प्रयत्न आहे. (२ थेस्सलनीकाकर २:९, १०) पण या “शेवटल्या काळात” त्याने खासकरून देवाच्या समर्पित सेवकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे आणि “देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूविषयी साक्ष देणारे” अभिषिक्‍त ख्रिस्ती यांच्याविरुद्ध तो लढत आहे. (२ तीमथ्य ३:१; प्रकटीकरण १२:९, १७) या साक्षीदारांनी आणि पृथ्वीवरील जीवनाची आशा असणाऱ्‍या त्यांच्या सोबत्यांनी आज विशेषकरून सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

२. सैतानाने हव्वेची कशाप्रकारे फसवणूक केली आणि प्रेषित पौलाने कशाविषयी भीती व्यक्‍त केली?

सैतान हा हाडाचा ठकबाज आहे. सर्पाची आड घेऊन त्याने हव्वेला असा विचार करण्यास ठकवले की देवापासून स्वतंत्र झाल्यास तिला अधिक आनंद मिळेल. (उत्पत्ति ३:१-६) यानंतर चार हजार वर्षे उलटल्यावर प्रेषित पौलाने अशी भीती व्यक्‍त केली की करिंथ येथील अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांपैकी काही सैतानाच्या डावपेचांना बळी पडतील. पौलाने लिहिले: “जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्‍यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.” (२ करिंथकर ११:३) सैतान लोकांची मने भ्रष्ट करून त्यांना विकृतपणे विचार करायला लावतो. जसे त्याने हव्वेला ठकवले त्याचप्रमाणे तो ख्रिस्ती लोकांनाही चुकीचा तर्कवाद करण्यास आणि असा विचार करण्यास भाग पाडू शकतो, की यहोवा व त्याच्या पुत्राला पसंत नसलेल्या एखाद्या गोष्टीवर त्यांचा आनंद अवलंबून आहे.

३. दियाबलापासून सुरक्षित राहण्याकरता यहोवाने कोणती तरतूद केली आहे?

सैतानाची तुलना एखाद्या पारध्याशी करता येईल जो बेसावध सावजांना अचानक धरण्याकरता पाश पसरून ठेवतो. सैतानाचे पाश टाळण्याकरता आपण ‘परात्पराच्या गुप्त स्थळी वसले’ पाहिजे, अर्थात त्या लाक्षणिक सुरक्षित स्थानी जेथे यहोवा आपले विश्‍वव्यापी सार्वभौमत्व स्वीकारणाऱ्‍यांना ठेवतो. (स्तोत्र ९१:१-३) आपल्याला ‘सैतानाच्या डावपेचांपुढे टिकाव धरता यावा’ म्हणून यहोवा आपल्या वचनाच्या, आत्म्याच्या आणि संघटनेच्या माध्यमाने जे संरक्षण पुरवतो त्याची आपल्याला अत्यंत गरज आहे. (इफिसकर ६:११) ‘डावपेच’ याकरता वापरलेल्या ग्रीक शब्दाचे भाषांतर “कुयुक्‍त्‌या” असेही करता येईल. यहोवाच्या सेवकांना बहकवण्याकरता दियाबल निरनिराळ्या कुयुक्‍त्‌या वापरतो यात शंका नाही.

सुरवातीच्या ख्रिश्‍चनांकरता सैतानाने रचलेले डावपेच

४. सुरवातीचे ख्रिस्ती कशाप्रकारच्या वातावरणात राहात होते?

सा.यु. पहिल्या व दुसऱ्‍या शतकात राहणारे ख्रिस्ती अशा एका काळात जगत होते जेव्हा रोमी साम्राज्य उत्कर्षाच्या कळसास पोचले होते. साम्राज्यातील शांतीपूर्ण परिस्थितीमुळे औद्योगिक भरभराट घडून आली. या समृद्धीमुळे सत्ताधारी वर्गाला बराच फावला वेळ मिळू लागला; शिवाय सामान्य जनतेने बंड करू नये म्हणून त्यांची मर्जी संपादण्यासाठी सत्ताधारी वर्गाने त्यांच्याकरताही भरपूर करमणूक उपलब्ध करून दिली. काही काळांत तर, जितके कामाचे दिवस होते तितक्याच सार्वजनिक सुट्या देखील होत्या. लोकांना अन्‍न आणि करमणूक देण्याकरता पुढारी सार्वजनिक निधीचा वापर करत होते. यामुळे लोक खाऊन पिऊन सुखी राहात आणि त्यांचे मनही रमलेले असत.

५, ६. (अ) रोमी नाट्यगृहांत व रंगमंडलांत वारंवार जाणे ख्रिस्ती लोकांकरता अयोग्य का होते? (ब) सैतानाने कोणती युक्‍ती लढवली आणि ख्रिस्ती लोक त्याचा हा पाश कसा टाळू शकत होते?

ही परिस्थिती ख्रिस्ती लोकांकरता धोकेदायक होती का? प्रेषितांच्या काळानंतरच्या काही जुन्या लेखकांच्या, उदाहरणार्थ टर्टुलियनच्या लिखाणातील संकेतांवरून असे दिसून येते की त्याकाळातील बहुतेक करमणुकीचे प्रकार ख्रिस्ती लोकांकरता आध्यात्मिक व नैतिकदृष्ट्या अत्यंत धोकेदायक होते. एकतर, त्याकाळातील बहुतेक सार्वजनिक सण आणि शर्यती निरनिराळ्या देव देवतांच्या सन्मानार्थ आयोजित केल्या जात होत्या. (२ करिंथकर ६:१४-१८) रंगभूमीवरील अनेक पारंपरिक नाटके देखील अत्यंत अनैतिक किंवा हिंसक स्वरूपाची असत. कालांतराने या पारंपरिक नाटकांचा लोकांना कंटाळा येऊ लागला आणि त्यांची जागा अश्‍लील मूकनाट्यांनी घेतली. प्राचीन रोममधील दैनंदिन जीवन (इंग्रजी), या पुस्तकात इतिहासकार जेरोम कारकोपीनो म्हणतात: “या नाटकांतील अभिनेत्रींना प्रेक्षकांपुढे संपूर्णतः विवस्त्र होण्याची परवानगी होती . . . मोठ्या प्रमाणात रक्‍त सांडले जायचे . . . राजधानीतल्या जनसामान्यांना पछाडलेल्या विकृत मनोवृत्तीचा या मूकनाट्यांनी पुरेपूर फायदा उचलला. लोकांना या धक्केदायक प्रदर्शनाची जराही किळस वाटत नव्हती कारण रंगमंडलांमधील भयंकर हिंसाचाराने केव्हाच त्यांना भावनाशून्य बनवले होते आणि त्यांच्या विचारसरणीला एक विकृत स्वरूप दिले होते.”—मत्तय ५:२७, २८.

रंगमंडलांत असिक्रिडक एकमेकांशी मृत्यूपर्यंत द्वंद्वयुद्ध करत. कधीकधी ते हिंस्र पशूंशी स्वतः मरेपर्यंत अथवा त्यांना मारेपर्यंत झुंज देत. मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्यांना आणि कालांतराने कित्येक ख्रिश्‍चनांना क्रूर प्राण्यांसमोर फेकून दिले जाई. त्या जुन्या काळातही सैतानाची युक्‍ती म्हणजे अनैतिकता आणि हिंसेची लोकांना सवय करून देणे; इतकी, की या गोष्टी अगदी नेहमीच्या वाटाव्यात, किंबहुना लोकांनी स्वतः त्यांची मागणी करावी. या पाशात न पडण्याचा एकच मार्ग म्हणजे या नाट्यगृहांपासून व रंगमंडलांपासून दूर राहणे हा होता.—१ करिंथकर १५:३२, ३३.

७, ८. (अ) ख्रिस्ती व्यक्‍तीने रथांच्या शर्यती पाहायला जाणे शहाणपणाचे का नव्हते? (ब) ख्रिश्‍चनांना पाशात पाडण्यासाठी सैतान रोमी स्नानगृहांचा कशाप्रकारे वापर करू शकत होता?

विस्तृत अंडाकृती क्रिडांगणांत आयोजित केल्या जाणाऱ्‍या रथांच्या शर्यती अतिशय रोमांचक होत्या यात शंका नाही पण त्या ख्रिस्ती लोकांकरता उचित नव्हत्या कारण या शर्यती पाहण्याकरता आलेले प्रेक्षक सहसा हिंसक व्हायचे. तिसऱ्‍या शतकातील एका लेखकानुसार प्रेक्षकांपैकी काहीजण हातघाईवर यायचे, तर कारकोपीनो यांच्यानुसार क्रिडांगणाच्या कमानींखाली “ज्योतिषी व वेश्‍यांचा धंदा चाले.” स्पष्टपणे, या रथांच्या शर्यती ख्रिश्‍चनांकरता नव्हत्या.—१ करिंथकर ६:९, १०.

सुप्रसिद्ध रोमी स्नानगृहांविषयी काय? स्वच्छतेकरता स्नान करण्यात अर्थातच काही गैर नव्हते. पण कित्येक रोमी स्नानगृहे म्हणजे अतिविशाल वास्तू होत्या ज्यांत मालीश करून घेण्याची दालने, जिमखाने, जुगार खेळण्याच्या खोल्या आणि उपाहार गृहे होती. खरे पाहता, स्त्रीपुरुषांनी स्नानगृहाचा वापर करण्याकरता वेगवेगळ्या वेळा ठरवून देण्यात आल्या होत्या; पण बऱ्‍याचदा स्त्रीपुरुषांना एकत्र स्नान करू दिले जात होते. क्लेमेंट ऑफ ॲलेक्झांड्रिया याने असे लिहिले: “या स्नानगृहांचा स्त्रीपुरुषांना खुशाल वापर करू दिला जातो; येथे ते नग्न होऊन उच्छृंखल कृत्ये करतात.” अशारितीने सैतान एका कायदेशीर सुविधेचा ख्रिश्‍चनांकरता सहज पाश म्हणून वापर करू शकत होता. सुज्ञ ख्रिस्ती अशा ठिकाणी जात नव्हते.

९. आरंभीच्या ख्रिश्‍चनांना कोणते पाश टाळावे लागले?

रोमी साम्राज्याच्या उत्कर्षाच्या काळात जुगार हा लोकांचा आवडता छंद होता. रथांच्या शर्यतींना न जाण्याद्वारे आरंभीचे ख्रिस्ती तेथे चालणारा पैजा लावण्याचा प्रकार टाळू शकत होते. पण पथिकाश्रमांच्या व खानावळींच्या मागच्या खोल्यांमध्येही बेकायदेशीरपणे जुगार चाले. जुगार खेळणारे एकमेकांच्या हातातील खड्यांच्या किंवा इतर वस्तूंच्या संख्येवर पैज लावत. जुगार लोकांच्या जीवनात एकप्रकारचा रोमांच आणत कारण यामुळे ते बसल्या बसल्या पैसा मिळवण्याचे स्वप्न पाहू शकत होते. (इफिसकर ५:५) शिवाय, या दारूच्या अड्ड्यांमध्ये काम करणाऱ्‍या मुली सहसा वेश्‍या असल्यामुळे लैंगिक अनैतिकतेचाही धोका होता. अशा रितीने, रोमी साम्राज्यातील शहरांत राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांकरता सैतानाने हे विविध मोहपाश उपयोगात आणले होते. आज परिस्थिती फारशी बदललेली आहे का?

आजच्या काळातील सैतानाचे मोहपाश

१०. आजची परिस्थिती रोमी साम्राज्यातील स्थितीशी कशी जुळते?

१० इतकी शतके उलटल्यावरही सैतानाचे डावपेच फारसे बदलेले नाहीत. करिंथच्या नीतिभ्रष्ट शहरात राहणाऱ्‍या ख्रिश्‍चनांवर “सैतानाचे वर्चस्व होऊ नये” म्हणून प्रेषित पौलाने त्यांना जोरदार सल्ला दिला. त्याने म्हटले, “[सैतानाचे] विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही.” (२ करिंथकर २:११) बऱ्‍याच विकसित देशांतील परिस्थिती रोमी साम्राज्याच्या समृद्धीच्या काळातील परिस्थितीसारखीच आहे. बऱ्‍याच लोकांजवळ भरपूर फावला वेळ आहे. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्‍या लॉटरीच्या शर्यती गरीब लोकांना श्रीमंत होण्याची आस दाखवतात. लोकांच्या मनोरंजनाकरता कोणालाही परवडेल अशाप्रकारचे भरपूर करमणुकीचे प्रकार उपलब्ध आहेत. स्टेडियम्सवर क्रीडाप्रेमींची गर्दी असते, सर्रास पैजा लावल्या जातात, कधीकधी जमाव आणि बऱ्‍याचदा खेळाडू हिंसक पावित्रा घेतात. लोक बीभत्स प्रकारचे संगीत ऐकतात तसेच रंगभूमीवर, चित्रपटसृष्टीत आणि टीव्हीच्या पडद्यावर अनैतिक चित्रण सर्रास दाखवले जाते. काही देशांत सॉना बाथ आणि गरम पाण्याच्या नैसर्गिक झऱ्‍यांतून स्नान करण्याची प्रथा लोकप्रिय आहे आणि या ठिकाणी स्त्रीपुरुष सर्रास एकत्र स्नान करतात; शिवाय काही समुद्रकिनाऱ्‍यांवर पूर्णपणे विवस्त्र झालेले स्त्रीपुरुष पाहायला मिळतात. ख्रिस्ती धर्माच्या सुरवातीच्या शतकांप्रमाणे, सैतान आजही देवाच्या सेवकांना जगिक करमणुकीच्या प्रकारांच्या माध्यमाने आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो.

११. दररोजच्या व्यापातून सुटून मौजमजा करण्याची इच्छा स्वाभाविक असली तरी तिच्यासोबत कोणते धोके जुळलेले आहेत?

११ आजच्या जगात सर्वजण तणावाखाली वावरतात, त्यामुळे अधूनमधून दररोजच्या व्यापापासून सुटका मिळवण्याची आणि मौजमजा करण्याची इच्छा स्वाभाविक आहे. पण ज्याप्रकारे रोमी स्नानगृहांतील काही प्रकार आरंभीच्या ख्रिस्ती लोकांकरता धोकेदायक होते त्याचप्रकारे काही आधुनिक पर्यटन सुविधा आणि काही हॉटेल्स व रिझॉर्ट आजच्या काळातील ख्रिश्‍चनांना अनैतिकतेच्या किंवा अतिमद्यपानाच्या जाळ्यात अडकवण्याचे सैतानी पाश ठरले आहेत. पौलाने करिंथ येथील ख्रिश्‍चनांना उद्देशून असे लिहिले: “फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते. नीतीमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका, कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही.”—१ करिंथकर १५:३३, ३४.

१२. आज यहोवाच्या सेवकांना पाशात अडकवण्यासाठी सैतान कोणत्या काही कुयुक्‍त्‌यांचा वापर करतो?

१२ हव्वेला अयोग्यप्रकारे विचार करायला लावण्याकरता सैतानाने कसा चतुराईने युक्‍तिवाद केला हे आपण आधीच पाहिले आहे. (२ करिंथकर ११:३) आज सैतान काही ख्रिश्‍चनांना बहकवण्याकरता त्यांना असा विचार करायला लावतो की यहोवाचे साक्षीदार चारचौघांसारखेच आहेत हे दाखवण्याकरता त्यांनी जगिक गोष्टी आचरल्या तर ते काही लोकांना ख्रिस्ती सत्याकडे आकर्षित करू शकतील. पण या प्रयत्नात कधीकधी ते बऱ्‍याच प्रमाणात ख्रिस्ती मर्यादा ओलांडून जातात आणि यामुळे लोकांना सत्यात आणण्याऐवजी उलटच परिणाम होतो. (हाग्गय २:१२-१४) सैतानाची आणखी एक कुयुक्‍ती म्हणजे समर्पित ख्रिश्‍चनांना, मग ते तरुण असोत वा वृद्ध, त्यांना दुटप्पी जीवन जगण्यास प्रेरित करण्याद्वारे ‘पवित्र आत्म्याला खिन्‍न करायला’ लावणे. (इफिसकर ४:३०) इंटरनेटच्या दुरुपयोगाद्वारे काहीजण या पाशाला बळी पडले आहेत.

१३. सहजगत्या दिसून न येणारी कोणती गोष्ट सैतानाच्या डावपेचांपैकी एक आहे आणि नीतिसूत्रांत देण्यात आलेला कोणता सल्ला याबाबतीत अगदी समर्पक आहे?

१३ सैतानाचा आणखी एक पाश म्हणजे सहजगत्या दिसून न येणारा प्रेतात्मावाद. कोणताही खरा ख्रिस्ती जाणूनबुजून पिशाच्चवाद किंवा भूतविद्या यात गुंतणार नाही. पण हिंसाचार व दूरचित्रवाणीवरील मालिका, व्हिडिओ गेम्स आणि हिंसा व गूढ प्रथांच्या बाबतीत असलेली लहान मुलांची पुस्तके आणि व्यंगचित्रांची पुस्तके यांसंबंधी देखील काहींनी तितकीशी सावधगिरी बाळगली नाही. प्रेतात्मवादाशी किंचितही संबंध असलेल्या कोणत्याही गोष्टीपासून दूर राहणेच श्रेयस्कर आहे. सुज्ञ नीतिसूत्र म्हणते: “कुटिल मनुष्याच्या मार्गांत काटे व पाश असतात; ज्याला जिवाची काळजी असते त्याने त्यापासून दूर राहावे.” (नीतिसूत्रे २२:५) सैतान ‘ह्‍या युगाचे दैवत’ असल्यामुळे अतिशय लोकप्रिय असणारी कोणतीही गोष्ट मुळात त्याचा एक पाश असू शकते.—२ करिंथकर ४:४; १ योहान २:१५, १६.

येशूने सैतानाला अडवले

१४. दियाबलाच्या पहिल्या मोहाचा येशूने कशाप्रकारे प्रतिकार केला?

१४ दियाबलाला अडवून त्याला दूर पळायला लावण्याच्या बाबतीत येशूने उत्तम उदाहरण आपल्यापुढे ठेवले. येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर आणि त्याने ४० दिवस उपवास केल्यावर सैतानाने त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. (मत्तय ४:१-११) उपवासानंतर साहजिकच येशूला भूक लागली असेल; सैतानाने याच गोष्टीचा फायदा उचलून त्याच्यावर पहिली परीक्षा आणली. त्याने येशूला एक शारीरिक गरज भागवण्याकरता त्याचा पहिला चमत्कार करण्याचे प्रोत्साहन दिले. पण येशूने अनुवाद ८:३ येथील शब्द उद्धृत करून स्वतःच्या स्वार्थाकरता आपल्या शक्‍तीचा उपयोग करण्यास नकार दिला आणि शारीरिक अन्‍नापेक्षा आध्यात्मिक अन्‍नाला प्राधान्य दिले.

१५. (अ) सैतानाने येशूला परीक्षेत पाडण्याकरता कोणत्या नैसर्गिक इच्छेचा गैरफायदा घेतला? (ब) देवाच्या सेवकांविरुद्ध आज सैतानाचा प्रमुख डावपेच कोणता आहे, पण आपण कशाप्रकारे त्याचा प्रतिकार करू शकतो?

१५ या मोहाच्या संबंधाने एक लक्षवेधक गोष्ट अशी, की दियाबलाने येशूला लैंगिक पाप करण्यास चिथावले नाही. या प्रसंगी, भुकेमुळे नैसर्गिकरित्या उत्पन्‍न होणारी अन्‍नाची ओढ ही येशूला मोहात पाडण्याकरता सैतानाला सर्वात परिणामकारक वाटली. आज दियाबल देवाच्या लोकांना मोहात पाडण्याकरता कोणते मार्ग अवलंबतो? तसे तर तो निरनिराळ्या मार्गांचा वापर करतो, पण यहोवाच्या लोकांची सचोटी भंग करण्याकरता त्याचा सर्वात मुख्य डावपेच म्हणजे लैंगिक मोह. येशूचे अनुकरण करण्याद्वारे आपण दियाबलाचा प्रतिकार करू शकतो व मोह टाळू शकतो. परीक्षेत असताना येशूने ज्याप्रकारे अचूक वचने मनात आणण्याद्वारे सैतानाचा प्रयत्न हाणून पाडला, त्याचप्रकारे आपल्यासमोर मोह येतात तेव्हा आपण उत्पत्ति ३९:९ आणि १ करिंथकर ६:१८ यांसारखी वचने आठवू शकतो.

१६. (अ) सैतानाने येशूला दुसऱ्‍यांदा कशाप्रकारे मोहात पाडण्याचा प्रयत्न केला? (ब) कोणत्या मार्गांनी आज सैतान आपल्यावर यहोवाची परीक्षा पाहण्याचा मोह आणू शकतो?

१६ यानंतर दियाबलाने येशूला मंदिराच्या भिंतीवरून उडी घेऊन, देव त्याचे देवदूत पाठवून संरक्षण करू शकतो अथवा नाही याची परीक्षा पाहण्याचे आव्हान केले. अनुवाद ६:१६ येथील शब्द उद्धृत करण्याद्वारे येशूने त्याच्या पित्याची परीक्षा पाहण्यास नकार दिला. आज सैतान आपल्याला कोणत्या मंदिराच्या भिंतीवरून निश्‍चितच उडी टाकायला लावणार नाही पण तो आजही आपल्यावर यहोवाची परीक्षा पाहण्याचा मोह आणू शकतो. पेहराव व श्रृंगाराच्या बाबतीत, कोणी हरकत घेत नाही तोपर्यंत जगिक पद्धतींचे अनुकरण करण्याचा आपल्याला मोह होतो का? आक्षेपार्ह करमणुकीच्या प्रकारांचा आस्वाद घेण्याचा आपल्याला मोह होतो का? होत असल्यास आपण यहोवाची परीक्षा घेत आहोत. अशाप्रकारचे विचार आपल्या मनात घोळत असल्यास सैतान आपल्यापासून दूर पळण्याऐवजी आपल्या भोवती घुटमळत राहील आणि आपल्याला त्याच्या बाजूने करून घेण्याचा सतत प्रयत्न करत राहील.

१७. (अ) दियाबलाने येशूला तिसऱ्‍या वेळी कशाप्रकारे मोहात पाडले? (ब) याकोब ४:७ आपल्या बाबतीत कशाप्रकारे खरे ठरू शकते?

१७ सैतानाने एकदा स्वतःला नमन करण्याच्या ऐवजात येशूला सर्व राज्ये देऊ केली तेव्हा पुन्हा एकदा येशूने वचनाचा संदर्भ देऊन त्याला अडवले आणि आपल्या पित्याच्या अनन्य उपासनेचे खंबीरतेने समर्थन केले. (अनुवाद ५:९; ६:१३; १०:२०) सैतान कदाचित आपल्याला जगाची राज्ये देणार नाही पण तो सतत आपल्याला भौतिक वस्तूंची चमकधमक दाखवून मोहात पाडण्याचा प्रयत्न करत असतो; एवढेच काय तर तो आपल्याला स्वतःचे असे लहानसे राज्य बनवण्याचे स्वप्न दाखवतो. आपणही येशूप्रमाणेच यहोवाला अनन्य उपासना देण्याद्वारे त्याच्या मोहाचा प्रतिकार करतो का? जर आपण असे केले तर येशूच्या बाबतीत जे घडले तेच आपल्याबाबतीतही घडेल. मत्तयाचा अहवाल सांगतो: “मग सैतान त्याला सोडून गेला.” (मत्तय ४:११) आपणही बायबलमधली समर्पक तत्त्वे आठवणीत आणून त्यांनुसार आचरण करण्याद्वारे सैतानाविरुद्ध खंबीर भूमिका घेतली तर तो आपल्याला सोडून जाईल. शिष्य याकोबाने लिहिले: “सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल.” (याकोब ४:७) एका ख्रिस्ती व्यक्‍तीने फ्रान्समधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला असे लिहिले: “सैतान खरोखर धूर्त आहे. माझी खूप इच्छा असूनही मला माझ्या भावनांवर आणि इच्छांवर ताबा ठेवणे खूप जड जाते. पण धैर्य व संयम यांसारख्या गुणांच्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे यहोवाच्या मदतीने मी आजपर्यंत सत्यात खंबीरपणे टिकून राहू शकलो.”

दियाबलाला अडवण्याकरता पूर्णपणे सुसज्ज

१८. कोणती आध्यात्मिक शस्त्रसामग्री आपल्याला दियाबलास अडवण्याकरता सुसज्ज करते?

१८ “सैतानाच्या डावपेचांपुढे [आपल्याला] टिकाव धरता यावा” म्हणून यहोवाने आपल्याकरता संपूर्ण आध्यात्मिक शस्त्रसामग्री पुरवली आहे. (इफिसकर ६:११-१८) सत्याकरता असलेले प्रेम जणू आपली कंबर कसेल अर्थात ख्रिस्ती कार्याकरता आपल्याला तयार करेल. यहोवाच्या नीतिमान दर्जांनुसार वागण्याचा आपला निर्धार जणू उरस्त्राण असल्याप्रमाणे आपल्या हृदयाचे रक्षण करेल. सुवार्ता आपण पायी चढवलेली असेल तर आपोआपच आपण नियमितरित्या प्रचार कार्यात सहभागी होऊ आणि यामुळे आध्यात्मिकरित्या आपल्याला सामर्थ्य आणि संरक्षण मिळेल. आपला मजबूत विश्‍वास एका मोठ्या ढालीप्रमाणे, ‘त्या दुष्टाच्या सगळ्या जळत्या बाणांपासून’ अर्थात त्याच्या कावेबाज हल्ल्यांपासून आणि मोहापाशांपासून आपले संरक्षण करेल. यहोवाच्या प्रतिज्ञेच्या पूर्णतेविषयी आपली दृढ आशा एखाद्या शिरस्त्राणाप्रमाणे आपल्या विचारांचे रक्षण करेल आणि आपल्याला मनःशांती देईल. (फिलिप्पैकर ४:७) आपण देवाच्या वचनाचा उपयोग करण्यात निपुण झाल्यास ते आपल्या हातात एखाद्या तरवारीप्रमाणे ठरेल ज्याच्या मदतीने आपण लोकांना सैतानाच्या आध्यात्मिक गुलामीतून मोकळे करू शकू. त्याच्या साहाय्याने आपण स्वतःचेही संरक्षण करू शकू ज्याप्रमाणे येशूवर मोह आले असता त्याने स्वतःचा बचाव केला होता.

१९. ‘दियाबलाला अडवण्याव्यतिरिक्‍त’ आणखी काय करणे आवश्‍यक आहे?

१९ ‘देवाची ही संपूर्ण शस्त्रसामग्री’ सतत धारण केल्यास आणि प्रार्थनेत लवलीन राहिल्यास, सैतानाने हल्ला केला तरीसुद्धा यहोवा आपल्याला सुरक्षित ठेवेल असा आत्मविश्‍वास आपण बाळगू शकतो. (योहान १७:१५; १ करिंथकर १०:१३) पण याकोबाने दाखवले की ‘दियाबलाला अडवणे’ पुरेसे नाही. त्यासोबत, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपण “देवाच्या अधीन” झाले पाहिजे कारण त्याला आपल्याविषयी काळजी आहे. (याकोब ४:७, ८) हे आपण कसे करू शकतो हे पुढील लेखात विचारात घेतले जाईल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• सुरवातीच्या ख्रिश्‍चनांना सैतानाचे कोणते मोहपाश टाळावे लागले?

• आज यहोवाच्या सेवकांना भुरळ पाडण्याकरता सैतान कोणत्या डावपेचांचा उपयोग करतो?

• येशूने दियाबलाच्या मोहांचा कशाप्रकारे प्रतिकार केला?

• कोणत्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीच्या साहाय्याने आपण दियाबलाला अडवू शकतो?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[८, ९ पानांवरील चित्र]

येशूने दियाबलाविरुद्ध खंबीर भूमिका घेतली

[१० पानांवरील चित्रे]

पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी हिंसक व अनैतिक करमणुकीच्या प्रकारांचा धिक्कार केला

[चित्राचे श्रेय]

The Complete Encyclopedia of Illustration/J. G. Heck