व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आम्ही आमच्या नेमणुकीत टिकून राहिलो

आम्ही आमच्या नेमणुकीत टिकून राहिलो

जीवन कथा

आम्ही आमच्या नेमणुकीत टिकून राहिलो

हर्मन ब्रुडर यांच्याद्वारे कथित

माझ्यासमोर दोन साधेसे पर्याय होते: फ्रेंच फॉरेन लिजनमध्ये पाच वर्षांसाठी सेवा किंवा मोरोक्कोत तुरूंगवास. पण या आणीबाणीच्या स्थितीत मी कसा आलो ते आधी मला तुम्हाला सांगायचंय.

माझा जन्म, जर्मनीतल्या ओपेन्यू येथे, पहिल्या महायुद्धाची सुरवात व्हायच्या फक्‍त तीन वर्षांआधी म्हणजे १९११ साली झाला. माझे आईबाबा, योसेफ आणि फ्रिडा यांना एकूण १७ मुलेमुली होत्या. त्यांपैकी माझा १३ वा नंबर.

माझ्या सर्वात जुन्या आठवणींपैकी एक म्हणजे, एकदा, आमच्या गावच्या मुख्य रस्त्यावरून एक लष्करी गट कवायत करत चालला होता. जवानांच्या कवायतीबरोबर वाजणारे संगीत मला इतके आवडले की मीसुद्धा संगीत वाजवणाऱ्‍यांच्या मागे मागे चालत स्टेशनपर्यंत गेलो; तिथं मी माझ्या बाबांना आणि इतर गणवेशधारी लष्करी पुरुषांना ट्रेनमध्ये चढताना पाहिले. ट्रेन सुटली तेव्हा प्लॅटफॉर्मवर असलेल्या काही बायका रडू लागल्या. ही घटना घडून थोडे दिवस उलटल्यावर, आमच्या पाळकांनी चर्चमध्ये एक लांबलचक भाषण दिले आणि चार पुरुषांची नावे वाचून दाखवली ज्यांनी देशासाठी लढताना आपले प्राण अर्पण केले होते. ते म्हणाले: “आता ते स्वर्गात आहेत.” माझ्या शेजारी उभी असलेली एक स्त्री बेशुद्ध पडली.

रशियन आघाडीवर लढत असताना बाबांना विषमज्वर झाला. ते घरी आले तेव्हा अगदीच अशक्‍त झालेले होते; घरी आल्याबरोबर त्यांना स्थानीय इस्पितळात दाखल करावं लागलं. आमच्या पाळकांनी मला सांगितलं, “कबरस्थानाशेजारच्या चॅपलमध्ये जा आणि ५० वेळा आमच्या स्वर्गीय बापा आणि ५० वेळा हेल मेरी म्हण. तुझे बाबा बरे होतील.” त्यांनी सांगितलं तसं मी केलं, पण दुसऱ्‍याच दिवशी बाबा गेले. मी वयानं लहानच होतो पण तरीसुद्धा मला युद्धाचा खूप कटू अनुभव आला होता.

सत्याची ओळख

युद्ध चालू असताना जर्मनीत काम मिळणं मुश्‍कील होतं. १९२८ साली शाळा सोडल्यावर मला स्वीत्झर्लंड, बेसील इथं कसंतरी माळ्याचं एक काम मिळालं.

बाबांप्रमाणे मीही कट्टर कॅथलिक होतो. मला भारतात कापुचीन भिक्षू व्हायचं होतं. पण माझा भाऊ, रिकर्ट, जो आतापर्यंत यहोवाचा साक्षीदार झाला होता त्याला हे कळलं तेव्हा तो खास माझ्यासाठी स्वीत्झर्लंडला माझी समजूत काढायला आला. त्यानं मला, लोकांवर आणि खासकरून धर्मगुरूंवर विश्‍वास ठेवण्याविषयी सावध केलं आणि मला बायबल वाचण्यास व फक्‍त त्याच्यावरच विश्‍वास ठेवण्याचं प्रोत्साहन दिलं. माझ्या मनात बऱ्‍याच शंका होत्या तरीपण मी एक नवा करार मिळवला आणि तो वाचू लागलो. हळूहळू मला समजू लागलं, की मी करत असलेले अनेक विश्‍वास बायबलच्या शिकवणींच्या एकमतात नव्हते.

१९३३ सालच्या एके रविवारी, मी जर्मनीत रिकर्टच्या घरी होतो तेव्हा, त्यानं माझी ओळख यहोवाचे साक्षीदार असलेल्या एका विवाहित जोडप्याशी करून दिली. मी बायबल वाचतो हे त्यांना समजल्यावर त्यांनी मला द क्रायसिस * नावाची एक पुस्तिका दिली. मध्यरात्र झाली तरीसुद्धा मी ती पुस्तिका वाचत राहिलो. आणि माझी खात्री पटली की मला सत्य गवसलं होतं!

बेसीलमधील यहोवाच्या साक्षीदारांनी मला शास्त्रवचनांचा अभ्यास * (इंग्रजी) याचे दोन खंड, काही मासिकं आणि प्रकाशनं दिली. मी जे काही वाचत होतो त्याचा माझ्यावर इतका प्रभाव झाला होता, की मी स्थानीय पाळकाला जाऊन सांगितलं की त्यांनी माझं नाव चर्चच्या नोंदवहीतून खोडून टाकावं. त्यांना माझा खूप राग आला. त्यांनी मला सांगितलं, की तुझा विश्‍वास कमी होत चालला आहे. पण वस्तुस्थिती तर अगदी उलट होती. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी खरा विश्‍वास करू लागलो होतो.

बेसीलचे बांधव त्या शनिवार-रविवारी, फ्रान्सच्या सीमेवर प्रचार करायला जाण्याची योजना करत होते. एका बांधवानं मला अगदी प्रेमानं समजावून सांगितलं, की मला त्या प्रचारकार्यासाठी बोलवण्यात आलेलं नाही कारण मी नुकताच मंडळीबरोबर सहवास ठेवू लागलो होतो. पण मला काही राहावत नव्हतं; मलाही प्रचारकार्यात भाग घ्यायची तीव्र इच्छा आहे, असं मी त्यांना सांगितलं. मग, दुसऱ्‍या एका वडिलांबरोबर बोलणी केल्यावर त्यांनी मला स्वीत्झर्लंडमध्येच एक क्षेत्र दिलं. रविवारी भल्या पहाटे मी माझ्या सायकलवरून बेसीलच्या जवळपास असलेल्या एका लहान गावाकडे, माझ्या बॅगेमध्ये ४ पुस्तकं, २८ मासिकं आणि २० माहितीपत्रकं घेऊन निघालो. मी पोहंचलो तेव्हा गावातील बहुतेक लोक चर्चमध्येच होते. तरीपण, ११ वाजेपर्यंत माझी बॅग रिकामी झाली.

मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे, असं मी बांधवांना सांगितल्यावर ते माझ्याशी गंभीरपणे काही विषयांवर बोलले, त्यांनी मला सत्याविषयी काही मर्मभेदक प्रश्‍न विचारले. यहोवाबद्दल आणि त्याच्या संघटनेबद्दल त्यांना असलेला आवेश, निष्ठा पाहून मी भारावून गेलो. हिवाळा असल्यामुळे एका बांधवानं मला, एका वडिलांच्या घरी एका बाथटबमध्येच बाप्तिस्मा दिला. त्या क्षणाला मला झालेला अवर्णनीय आनंद व मला मिळालेली एक प्रकारची आंतरिक शक्‍ती अजूनही आठवते. ही १९३४ सालची गोष्ट होती.

राज्य मळ्यावर काम

१९३६ साली, यहोवाच्या साक्षीदारांनी स्वीत्झर्लंड येथे थोडीशी जमीन विकत घेतल्याचे माझ्या ऐकण्यात आले. मी लगेच माळी म्हणून काम करण्याची तयारी दाखवली. आनंदाची गोष्ट म्हणजे, बर्नपासून सुमारे ३० किलोमीटर दूर असलेल्या श्‍टेफईसबर्ग येथील राज्य मळ्यावर काम करण्याचे मला आमंत्रणही मिळाले. मला जमेल तसे मी मळ्यावर काम करणाऱ्‍या इतरांना देखील मदत करत असे. बेथेलनं मला सहकारी आत्मा विकसित करण्याचं महत्त्व शिकवलं.

माझ्या बेथेल सेवेतलं एक वैशिष्ठ्य म्हणजे, १९३६ सालची बंधू रदरफोर्ड यांनी मळ्याला दिलेली भेट. मळ्यातल्या टमाट्यांचा आकार, भाजीपाल्याचा टवटवीतपणा पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. ते खूप प्रेमळ होते!

मळ्यावर काम करायला लागून मला फक्‍त तीनच वर्ष झाली होती तेव्हा, अमेरिकेतील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयाकडून आलेले एक पत्र सकाळी नाश्त्याच्या वेळी वाचून दाखवण्यात आलं. या पत्रात प्रचारकार्याच्या निकडीवर जोर देण्यात आला होता आणि परदेशात जाऊन पायनियर म्हणून सेवा करण्याचं आमंत्रण देखील देण्यात आलं. उशीर न लावता मी लगेच पुढे झालो. १९३९ सालच्या मे महिन्यात मला नेमणूक मिळाली—ब्राझील!

मी, राज्य मळ्याजवळच असलेल्या थन मंडळीत तेव्हा होतो. रविवारच्या दिवशी आमचा एक गट, थनपासून सायकलीनं दोन तासावर असलेल्या आल्प्समध्ये प्रचाराला जायचा. मार्गारिटा श्‍टायनरसुद्धा आमच्या गटात होती. माझ्या मनात अचानक एक विचार आला: येशूनं दोघादोघा शिष्यांना प्रचारासाठी पाठवले नव्हते का? मला ब्राझीलला नेमणूक मिळाल्याचं मी सहज मार्गारिटाला सांगितलं तेव्हा तिनंही जास्त गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्याची आपली इच्छा व्यक्‍त केली. जुलै ३१, १९३९ रोजी आमचं लग्न झालं.

एक अनपेक्षित मुक्काम

१९३९ सालच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आम्ही ल हाव्र, फ्रान्स येथून जहाजाने सँटोस, ब्राझीलसाठी निघालो. सर्व डबल बर्थ बुक झाले होते त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या केबीनमध्ये जागा मिळाली. आम्ही मार्गावर असतानाच बातमी मिळाली, की ग्रेट ब्रिटन आणि फ्रान्सनं जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले होते. ३० जर्मन प्रवाशांनी लगेच जर्मन राष्ट्रगीत गाऊन प्रतिकार दर्शवला. हे पाहून जहाजाच्या कप्तानाला इतका राग आला की त्यानं जहाजाची दिशा बदलून साफी, मोरोक्को इथं नेऊन जहाज थांबवलं. जर्मन प्रवासी कागदपत्रं असलेल्या प्रवाशांना जहाजावरून उतरण्यासाठी फक्‍त पाच मिनिटं देण्यात आली. त्यांत आम्ही देखील होतो.

मग संपूर्ण दिवसभर आम्हाला पोलिस स्टेशनात रखडत ठेवल्यानंतर एका खटाऱ्‍या बसमध्ये चढवून, सुमारे १४१ किलोमीटर दूर असलेल्या माराके येथील एका तुरुंगात नेण्यात आलं. आता खरी परीक्षा सुरू झाली. आमच्या कोठड्या गच्च भरल्या होत्या शिवाय त्यात फक्‍त अंधार होता. सार्वजनिक मुत्रालय म्हणजे, जमिनीत केलेले एक बीळ—जे सतत तुडूंब भरलेलं असायचं. आम्हाला प्रत्येकाला झोपण्यासाठी एक मळकटलेली गोणी देण्यात आली आणि रात्रीच्या वेळी तर उंदरं आमच्या पोटऱ्‍यांना चावायचे. दिवसातून दोनदा एका गंजलेल्या भगोल्यात आम्हाला जेवण दिलं जायचं.

एका लष्करी अधिकाऱ्‍यानं मला सांगितलं, की मी फ्रेंच फॉरेन लिजनमध्ये पाच वर्षांची सेवा केल्यास मला सोडण्यात येईल. मी नकार दिल्यामुळे मला २४ तासांसाठी एका भयंकर अवस्थेत ठेवण्यात आलं. मी त्याला काळा विजनवास म्हणेन. या अवस्थेत असताना मी बहुतेक वेळ प्रार्थना करण्यातच घालवला.

आठ दिवसांनंतर तुरुंग अधिकाऱ्‍यांनी मला मार्गारिटाला भेटण्याची परवानगी दिली. ती खूप अशक्‍त झाली होती आणि सतत रडत होती. तिला प्रोत्साहन देण्याचा मी होईल तितका प्रयत्न केला. आमची उलटतपासणी घेण्यात आली आणि ट्रेननं कॅसाब्लान्काला रवानगी करण्यात आली; तिथं मार्गारिटाला सोडण्यात आलं. आणि मला १८० किलोमीटर दूर असलेल्या पोर्ट ल्यूटे (आता केनिट्रा) इथल्या एका तुरुंग छावणीत पाठवण्यात आले. स्वीस दूतांनी मार्गारिटाला सुचवले की तिने स्वीत्झर्लंडला परतावे पण ती मला सोडून गेली नाही; ती एकनिष्ठपणे माझ्याबरोबरच राहिली. दोन महिन्यांसाठी मी पोर्ट ल्यूटे इथेच होतो; आणि ती दररोज माझ्यासाठी जेवण घेऊन कॅसाब्लान्काहून यायची.

एक वर्षाआधी यहोवाच्या साक्षीदारांनी, नात्सी राजवटीबरोबर साक्षीदारांचा कसलाही संबंध नाही याकडे लोकांचे लक्ष आकर्षित करण्यासाठी क्रोईट्‌सुग गेगन डॉस क्रिस्टन्टम (ख्रिस्ती धर्माविरुद्धचे धर्मयुद्ध) नावाची एक पुस्तिका प्रकाशित केली. मी तुरुंग छावणीत होतो तेव्हा, बर्नमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराने, आम्ही नात्सी नव्हे हे शाबीत करण्यासाठी फ्रेंच अधिकाऱ्‍यांना या पुस्तिकेची एक प्रत आणि त्यासोबत एक पत्र पाठवले. मार्गारिटानेसुद्धा एक छान काम केलं; तिनं सरकारी अधिकाऱ्‍यांना जाऊन भेटी दिल्या व आम्ही निर्दोष आहोत याची त्यांना खातरी पटवून देण्याचा प्रयत्न केला. सरतेशेवटी, १९३९ सालच्या शेवटी आम्हाला मोरोक्को सोडण्याची परवानगी मिळाली.

आम्ही पुन्हा ब्राझीलला जाण्यासाठी निघालो तेव्हा आम्हाला समजलं, की अटलांटिकमध्ये जर्मन पाणबुड्या जहाजांच्या जलमार्गावर हल्ला करीत आहेत आणि आम्ही त्यांचे खास लक्ष्य होतो. झामिक (इंग्रजीत जमायका) नावाचे आमचे जहाज तसे व्यापारी जहाज होते पण तरीसुद्धा जहाजाच्या पुढच्या निमुळत्या ठिकाणी आणि जहाजाच्या मागच्या बाजूला बंदुका बसवण्यात आल्या होत्या. दिवसा, जहाजाचा कप्तान जहाजाला नागमोडी वळणाने नेत आणि सतत स्फोटकांचा मारा करत असे. रात्रीच्या वेळी, जर्मन लोकांनी आम्हाला ओळखू नये म्हणून आम्ही पूर्णपणे काळोख करायचो. फेब्रुवारी ६, १९४० रोजी आम्ही सरतेशेवटी सँटोस, ब्राझीलच्या बंदरावर पोहंचलो तेव्हा आम्हाला किती हायसे वाटले; युरोप सोडून पाच महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर आम्ही एकदाचे ब्राझीलला पोहंचलो!

पुन्हा तुरुंगात

आमची पहिली प्रचाराची नेमणूक, रिओ ग्रांदे दो सूल याच्या दक्षिण ब्राझील प्रांतातील एका शहरात अर्थात माँन्टेनेग्रो ही होती. आमच्या आगमनाची खबर अर्थातच चर्च अधिकाऱ्‍यांना मिळाली होती. आम्ही प्रचार कार्य सुरू करून फक्‍त दोनच तास झाले होते, पोलिसांनी आम्हाला अटक केली, बायबल आधारित भाषणांचे आम्ही साठवलेले फोनोग्राफ रेकॉर्ड, आमच्या जवळचे सर्व साहित्य इतकंच काय तर मोरोक्कोत आम्ही विकत घेतलेली उंटाच्या कातड्याची बॅगसुद्धा त्यांनी हस्तगत केली. एक पाळक आणि जर्मन बोलणारा एक सेवक पोलिस स्टेशनमध्ये आमची वाट पाहत थांबले होते. मग एक पोलिस अधिकाऱ्‍याने, हस्तगत केलेल्या आमच्या ग्रामोफोनवर बंधू रदरफोर्डच्या भाषणाचे एक रेकॉर्ड लावले तेव्हा हे दोघंही ऐकत होते. बंधू रदरफोर्ड अर्थातच उघडपणे व सरळ बोलायचे! त्यांच्या भाषणात जेव्हा त्यांनी व्हॅटिकनचा उल्लेख केला तेव्हा मात्र ते पाळक लालबुंद झाले आणि पाय आपटत बाहेर गेले.

सांता मारीच्या बिशपांच्या विनंतीवर पोलिसांनी आमची बदली, राज्याची राजधानी पोर्टो अलेग्रे इथं केली. मार्गारिटाला काही दिवसांतच सोडण्यात आलं; तिनंही लगेच स्वीस दूतांचे साहाय्य घेतले. दूतांनी तिला स्वीत्झर्लंडला परतण्याचा सल्ला दिला. पुन्हा एकदा तिनं मला सोडून जाण्यास नकार दिला. मार्गारिटा ही नेहमी माझी एकनिष्ठ सहचरिणी राहिली आहे. तीस दिवसांनंतर माझी उलटतपासणी घेऊन मला सोडण्यात आलं. पोलिसांनी आमच्यासमोर दोन निवडी ठेवल्या: दहा दिवसांच्या आत राज्य सोडून जा किंवा “परिणाम भोगा.” मुख्यालयाच्या सूचनांप्रमाणे आम्ही रिओ दी झानेरूला गेलो.

“कृपया हे कार्ड वाचा”

ब्राझीलमध्ये आमचं काही इतकं चांगलं स्वागत झालं नव्हतं तरीसुद्धा आम्ही आनंदी होतो! कारण, आम्ही जिवंत होतो, आमची बॅग पुन्हा एकदा साहित्यांनी भरली आणि आता तर आम्हाला संपूर्ण रिओ दी झानेरूमध्ये प्रचार करायचा होता. पण पोर्तुगीज भाषेचं फार कमी ज्ञान असताना आम्ही प्रचार कार्य कसे करणार होतो? साक्ष कार्डाद्वारे! “पोर फेवोर ले एस्त कारतुन” (“कृपया हे कार्ड वाचा”) हे पोर्तुगीजमधलं पहिलं वाक्य आम्ही प्रचारकार्यात बोलायला शिकलो. आणि या कार्डानं काय कमाल केली! फक्‍त एका महिन्यातच आम्ही १,००० पेक्षा अधिक पुस्तकांचे वाटप केले. बायबल साहित्य स्वीकारलेल्या अनेक लोकांनी नंतर सत्यही स्वीकारलं. खरं तर, आम्हाला देता आली असती त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने आपल्या प्रकाशनांनीच प्रभावी साक्ष दिली होती. यावरून मला एका गोष्टीची सत्यता पटली, की आवड दाखवणाऱ्‍या लोकांच्या हातात आपली प्रकाशने देणे खरोखरच अत्यंत महत्त्वाचे आहे.

त्यावेळी रिओ दी झानेरू ही ब्राझीलची राजधानी होती आणि सरकारी इमारतींमधल्या लोकांनी आमचा संदेश छान ऐकून घेतला. मला, अर्थमंत्री आणि सशस्त्रबळाचे मंत्री यांना समक्ष भेटून साक्ष देण्याचा सुहक्क मिळाला. या प्रसंगी मला, यहोवाचा आत्मा कार्य करत असल्याचे अगदी स्पष्टपणे जाणवले.

एकदा, रिओच्या मध्यभागी असलेल्या एका चौकात प्रचार करत असताना, मी न्यायमहालात शिरलो. माझ्या आजूबाजूच्या पुरुषांनी काळे झगे घातले होते आणि मध्यभागी जणू काय अंत्यविधी चालला होता असे वाटत होते. मी एका मनुष्याकडे गेलो जो मला जरा वेगळा वाटत होता आणि त्याला माझे साक्षकार्ड दिले. इथं कोणतेही अंत्यविधी वगैरे चालले नव्हते. मी खरं तर एका न्यायालयीन प्रकरणात व्यत्यय आणला होता व वेगळा वाटणारा मनुष्य न्यायाधीश होते ज्यांच्याबरोबर मी खरं तर बोलत होतो. माझ्याकडे हसत हसतच त्यांनी रक्षकांना मला सोडून देण्याचा इशारा केला. आणि त्यांनी मग माझ्याकडे अगदी नम्रपणे मुले * (इंग्रजी), नावाचे पुस्तक स्वीकारले व वर्गणी दिली. मग मी जेव्हा बाहेर चाललो होतो तेव्हा एका रक्षकानं मला दारावरील ठळक अक्षरांत लिहिलेली पाटी दाखवली: प्रोबीडॉ ऑ एन्ट्राड डी पेसोआस एस्त्रानयास (अनाधिकृत लोकांस आत येण्यास मनाई आहे).

आणखी एक फलदायी क्षेत्र म्हणजे बंदर. एकदा मी एका नाविकाला भेटलो; त्याने समुद्रप्रवासाला निघण्याआधी काही प्रकाशने घेतली. नंतर आम्ही त्याला एका संमेलनात भेटलो. त्याच्या संपूर्ण कुटुंबाने सत्य स्वीकारले होते आणि तो स्वतःही उत्तम प्रगती करत होता. हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला.

पण, सर्वच वेळी सर्वकाही सुरळीत होत नसे. आमचा सहा महिन्यांचा व्हिसा संपला त्यामुळे कदाचित आम्हाला देश सोडून जाण्यास सांगितले जाऊ शकत होते. आमच्या परिस्थितीविषयी मुख्यालयाला लिहिल्यानंतर बंधू रदरफोर्ड यांनी आम्हाला पत्र पाठवून आम्हाला तिथंच राहण्याचे उत्तेजन दिले व पुढची कार्यवाही कशी करावी हे सांगितलं. आम्हाला ब्राझीलमध्ये राहण्याची इच्छा होती व एका वकीलाच्या मदतीनं आम्ही १९४५ साली कायमचा व्हिसा मिळवला.

दीर्घ-पल्ल्याची नेमणूक

पण, १९४१ साली आमचा मुलगा जॉनथन, १९४३ साली रुथ आणि १९४५ साली एस्तर या आमच्या मुलांचा जन्म झाला. आमच्या वाढत्या कुटुंबाच्या गरजा पुरवण्यासाठी मला नोकरी करावी लागली. आमच्या तिसऱ्‍या मुलीचा जन्म होईपर्यंत मार्गारिटाने पूर्ण-वेळेची सेवा केली.

अगदी सुरवातीपासूनच आम्ही कुटुंब मिळून शहरांतील चौकांत, रेल्वे स्टेशनवर, रस्त्यांवर आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रचार कार्य करायचो. शनिवारी रात्री आम्ही टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांचे वाटप करायचो; हे प्रसंग आम्हाला सर्वांना आवडायचे.

घरी, प्रत्येक मुलाला दररोजचे काम नेमून दिलेले होते. जॉनथनला शेगडी आणि स्वयंपाकघर स्वच्छ करायचं काम होतं. आणि मुलींना फ्रीज साफ करायचं, अंगण झाडायचं आणि आमच्या बुटांना पॉलिश करायचं काम होतं. यामुळे मुलांना व्यवस्थीत राहण्याचं वळण लागलं, स्वबळ विकसित करता आलं. आज, आमची मुलं कष्टाळू आहेत, आपापल्या घरांची, वस्तूंची चांगली काळजी घेतात; हे पाहून मार्गारिटा व मला खूप समाधान वाटतं.

मुलांनी सभांमध्ये शांत बसावे अशीही आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करायचो. सभा सुरू व्हायच्या आधी ते ग्लासभर पाणी पित असत, लघवीला जाऊन येत असत. सभेत, जॉनथन माझ्या डावीकडे बसायचा, रूथ माझ्या उजवीकडे, मग मार्गारिटा आणि तिच्या उजवीकडे एस्तर बसायची. यामुळे त्यांना लहानपणापासूनच सभेत लक्ष देण्याची व आध्यात्मिक अन्‍न ग्रहण करण्याची सवय लागली.

यहोवानं आमच्या प्रयत्नांना यश दिलं आहे. आमची तिन्ही मुलं विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत आहेत आणि प्रचारकार्यात आनंदाने भाग घेत आहेत. जॉनथन सध्या, रिओ दी झानेरूतील नोवू मेअर मंडळीत वडील म्हणून सेवा करत आहे.

१९७० सालापर्यंत तिन्ही मुलांची लग्न होऊन ती वेगळी राहू लागली होती; त्यामुळे मी व मार्गारिटाने जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्याचे ठरवले. आमचा पहिला मुक्काम मिनास गेरियास राज्यातील, पोसस डी कालडस येथे होता; इथं १९ राज्य प्रचारकांचा एक लहानसा गट होता. मी पहिल्यांदा त्यांच्या सभेचं ठिकाण पाहिलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं—खिडक्या नसलेलं व खराब अवस्थेतलं एक तळघर. लगेच, आम्ही एक चांगले राज्य सभागृह शोधू लागलो आणि आम्हाला एका चांगल्या वस्तीत एक आकर्षक इमारत मिळाली देखील. पूर्वीच्या सभागृहापेक्षा हे सभागृह किती उत्तम होते! साडेचार वर्षांनंतर, प्रचारकांची संख्या १५५ इतकी झाली होती. १९८९ मध्ये आम्ही रिओ दी झानेरूच्या ऑरॉरुऑम इथं राहायला गेलो; तिथं आम्ही नऊ वर्ष सेवा केली. या काळात आम्ही दोन नवीन मंडळ्या स्थापन होताना पाहिल्या.

नेमणुकीत टिकून राहिल्याचे प्रतिफळ

१९९८ साली तब्येतीमुळे व मुलांजवळ राहण्याच्या इच्छेमुळे आम्ही रिओ दी झानेरूतील साँऊ गोन्सालू इथं राहायला गेलो. इथं मी अजूनही मंडळीत वडील या नात्याने सेवा करतो. प्रचार कार्यांत नियमित भाग घेण्याचा आम्ही जमेल तितका प्रयत्न करतो. मार्गारिटाला जवळच्या एका सुपरमार्केटमध्ये येणाऱ्‍या लोकांना साक्ष कार्य करायला आवडते आणि मंडळीने आमच्या घराजवळ असलेले एक क्षेत्र आम्हाला प्रेमळपणे दिले आहे यामुळे आमची तब्येत साथ देईल त्याप्रमाणे आम्हाला सेवेत जाणे होते.

मार्गारिटाला आणि मला यहोवाचे समर्पित सेवक होऊन ६० पेक्षा अधिक वर्ष झाली आहेत. ‘अधिपती, वर्तमानकाळच्या गोष्टी, भविष्यकाळाच्या गोष्टी, बले, उंची खोली, किंवा दुसरी कोणतीहि सृष्ट वस्तू, ख्रिस्त येशू आपला प्रभु ह्‍याच्यामध्ये देवाची आमच्यावरील जी प्रीती आहे तिच्यापासून आम्हाला विभक्‍त करावयाला समर्थ होणार नाही,’ याचा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. (रोमकर ८:३८, ३९) शिवाय, एका परिपूर्ण पृथ्वीवर देवाच्या अद्‌भुत सृष्टीसोबत सार्वकालिक जीवनाची भव्य आशा असलेल्या ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ गोळा करण्याचे काम पाहण्याचा आम्हाला जो सुहक्क मिळाला आहे त्याचाही आम्हाला किती आनंद वाटतो! (योहान १०:१६) १९४० मध्ये आम्ही रिओ दी झानेरूत आलो तेव्हा तेथे २८ प्रचारकांची फक्‍त एकच मंडळी होती. आज, इथं २५० मंडळ्या आहेत आणि २०,००० पेक्षा अधिक राज्य प्रचारक आहेत.

असे अनेक प्रसंग आले जेव्हा पुन्हा आम्ही आमच्या कुटुंबाकडे युरोपला जाऊ शकलो असतो. पण यहोवाकडून आलेली आमची नेमणूक इथं ब्राझीलमध्ये होती. या नेमणूकीत आम्ही टिकून राहिल्याचा आम्हाला आजही किती आनंद वाटतो!

[तळटीपा]

^ परि. 11 यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले पण सध्या छापले जात नाही.

^ परि. 12 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित, पण सध्या छापले जात नाही.

^ परि. 33 यहोवाच्या साक्षीदारांद्वारे प्रकाशित, पण सध्या छापले जात नाही.

[२१ पानांवरील चित्र]

१९३० च्या शेवटी, स्वीत्झर्लंडमधील श्‍टेफईसबर्ग येथील राज्य मळ्यावर (मी अगदी डावीकडे आहे)

[२३ पानांवरील चित्र]

१९३९ साली, आमचं लग्न व्हायच्या काही दिवस आधी

[२३ पानांवरील चित्र]

१९४० च्या दशकातील कॅसाब्लान्का

[२३ पानांवरील चित्र]

कुटुंब या नात्याने प्रचार कार्य करताना

[२४ पानांवरील चित्र]

आज सेवेमध्ये नियमितरीत्या भाग घेताना