व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा”

“परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा”

“परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा”

“सर्वांस मान द्या. बंधुवर्गावर प्रीति करा.”—१ पेत्र २:१७.

१, २. (अ) एका बातमीपत्राच्या प्रतिनिधीने यहोवाच्या साक्षीदारांबद्दल काय लिहिले? (ब) यहोवाचे साक्षीदार सदोदित उत्तम आचरण राखण्याचा प्रयत्न का करतात?

बऱ्‍याच वर्षांपूर्वी, अमेरिकेतील अमारिलो, टेक्सस येथील एका बातमीपत्राच्या प्रतिनिधीने त्या भागातील वेगवेगळ्या चर्चेसला भेटी दिल्या आणि मग आपल्या पाहणीच्या आधारावर एक लेख लिहिला. एक गट ठळकपणे त्याच्या आठवणीत राहिला. तो म्हणतो: “तीन वर्षे न चुकता मी अमारिलो सिव्हिक सेंटर येथे संपन्‍न होणाऱ्‍या यहोवाच्या साक्षीदारांच्या वार्षिक अधिवेशनांना उपस्थित राहिलो. या लोकांमध्ये वावरताना मला एकदाही कोणी सिगारेट पेटवताना, बिअरचा कॅन फोडताना किंवा असभ्य भाषा बोलताना आढळला नाही. माझ्या अनुभवातले हे सर्वात स्वच्छताप्रिय, सुसंस्कृत, सभ्य पेहराव करणारे आणि मनमिळावू लोक आहेत.” यहोवाच्या साक्षीदारांबद्दल याच आशयाची मते अनेकदा प्रसिद्ध करण्यात आली आहेत. इतर विश्‍वासांचे लोक देखील सहसा साक्षीदारांबद्दल कौतुकाचे उद्‌गार का काढतात?

सहसा, देवाच्या लोकांची त्यांच्या उत्तम आचरणाबद्दल प्रशंसा केली जाते. जगातल्या लोकांचे आचारविचार दिवसेंदिवस खालावत आहेत, पण यहोवाचे साक्षीदार मात्र, उच्च आचारविचार राखणे हे आपले कर्तव्य, आपल्या उपासनेचा एक पैलू आहे असे मानतात. त्यांच्या कृतींवरून लोक यहोवाविषयी व त्यांच्या ख्रिस्ती बांधवांविषयी मत बनवतात; आणि त्यांच्या उत्तम आचरणामुळे ज्या सत्याविषयी ते प्रचार करतात त्याची शिफारस केली जाते याची त्यांना जाणीव आहे. (योहान १५:८; तीत २:७, ८) तर मग, आपण सदोदित उत्तम आचरण राखून यहोवा व त्याच्या साक्षीदारांचा नावलौकिक कशाप्रकारे टिकवून ठेवू शकतो आणि असे केल्यामुळे आपल्याला कशाप्रकारे फायदा होतो हे आता पाहू या.

ख्रिस्ती कुटुंब

३. ख्रिस्ती कुटुंबांचे कशापासून संरक्षण करण्याची गरज आहे?

कुटुंबात आपले आचरण कसे असावे यावर विचार करा. गेर्हार्ट बेझीर आणि अर्वीन के. शॉइक यांनी लिहिलेल्या दी नॉइन इनक्विसिटॉरन: रेलीज्यॉन्सफ्रायहाईट उन्ट ग्लॉउबनस्नाइट (इनक्विझिशनचे नवे प्रणेते: धार्मिक स्वातंत्र्य आणि धार्मिक असूया) या पुस्तकात असे म्हटले आहे: “[यहोवाचे साक्षीदार] कुटुंबाला खास संरक्षणीय गोष्ट समजतात.” हे विधान अगदी खरे आहे कारण आजच्या जगात खरोखर अशा कित्येक गोष्टी आहेत ज्यांपासून कुटुंबाचे रक्षण करण्याची गरज आहे. मुले “आईबापांस न मानणारी” झाली आहेत, व प्रौढ “ममताहीन” आणि “असंयमी” बनले आहेत. (२ तीमथ्य ३:२, ३) पती-पत्नींकरता घरे जणू रणभूमीप्रमाणे बनली आहेत, आईवडील मुलांशी एकतर दुर्व्यवहार किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत, आणि मुले आईवडिलांविरुद्ध विद्रोह करू लागली आहेत, ड्रग्सचे व्यसन आणि अनैतिकता यांत गुंतू लागली आहेत किंवा घर सोडून पळून जाऊ लागली आहेत. हे सर्वकाही ‘या जगाच्या आत्म्याच्या’ परिणामस्वरूप घडत आहे. (इफिसकर २:१, २) या आत्म्यापासून आपल्या कुटुंबांचे संरक्षण करण्याची गरज आहे. हे कसे करता येईल? कौटुंबिक सदस्यांकरता यहोवाच्या मार्गदर्शनाकडे व सूचनांकडे लक्ष देऊन.

४. ख्रिस्ती कुटुंबातील सदस्यांच्या एकमेकांप्रती कोणत्या जबाबदाऱ्‍या आहेत?

ख्रिस्ती जोडप्यांना जाणीव आहे की त्यांची एकमेकांप्रती काही भावनात्मक, आध्यात्मिक व शारीरिक कर्तव्ये आहेत. (१ करिंथकर ७:३-५; इफिसकर ५:२१-२३; १ पेत्र ३:७) ख्रिस्ती आईवडिलांवर त्यांच्या मुलांच्या संबंधाने काही गंभीर जबाबदाऱ्‍या आहेत. (नीतिसूत्रे २२:६; २ करिंथकर १२:१४; इफिसकर ६:४) तसेच ख्रिस्ती कुटुंबातील मुले मोठी होऊ लागतात तेव्हा ती देखील हे ओळखतात की आपलीही काही कर्तव्ये आहेत. (नीतिसूत्रे १:८, ९; २३:२२; इफिसकर ६:१; १ तीमथ्य ५:३, ४, ८) कौटुंबिक कर्तव्ये पूर्ण करणे सोपे नाही, त्याकरता प्रयास, दृढसंकल्प आणि प्रेमळ व आत्मत्यागी वृत्ती असणे आवश्‍यक आहे. पण कुटुंबातील सर्व सदस्य देवाने त्यांच्यावर सोपवलेली ही कर्तव्ये अधिक चांगल्याप्रकारे पार पाडतात तेव्हा ते एकमेकांकरता आणि मंडळीकरता एक वरदान ठरतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ते कुटुंब व्यवस्थेचा संस्थापक यहोवा देव याला गौरव आणतात.—उत्पत्ति १:२७, २८; इफिसकर ३:१५.

ख्रिस्ती बंधूसमाज

५. ख्रिस्ती बांधवांच्या सहवासामुळे आपल्याला कोणकोणते आशीर्वाद मिळतात?

ख्रिस्ती या नात्याने, आपल्याला मंडळीतल्या सहविश्‍वासू बांधवांच्याप्रती आणि एकंदर ‘जगातील सबंध बंधुवर्गात’ सामील असलेल्यांच्याप्रती देखील काही जबाबदाऱ्‍या आहेत. (१ पेत्र ५:९) मंडळीशी संबंध कायम ठेवणे हे आपल्या आध्यात्मिक आरोग्याकरता अतिशय महत्त्वाचे आहे. आपण ख्रिस्ती बांधवांसोबत संगती करतो तेव्हा आपल्याला प्रोत्साहन देणारा त्यांचा सहवास तसेच ‘विश्‍वासू व बुद्धिमान दासाकरवी’ पोषक आध्यात्मिक अन्‍न देखील प्राप्त होते. (मत्तय २४:४५-४७) आपल्यासमोर समस्या येतात, तेव्हा आपण शास्त्रवचनांतील तत्त्वांवर आधारित असलेला उपयुक्‍त सल्ला मिळवण्याकरता आपल्या बांधवांकडे जाऊ शकतो. (नीतिसूत्रे १७:१७; उपदेशक ४:९; याकोब ५:१३-१८) आपण अडचणीत असतो तेव्हा आपले बांधव आपल्याला वाऱ्‍यावर सोडून देत नाहीत. खरोखर, देवाच्या संघटनेत सामील झाल्यामुळे आपण धन्य झालो आहोत!

६. आपल्याला इतर ख्रिश्‍चनांच्याप्रतीही काही जबाबदाऱ्‍या आहेत हे पौलाने कसे दाखवले?

पण आपण मंडळीत केवळ मिळवण्याच्या उद्देशाने नसतो; आपल्यातर्फे काही देण्याचीही आपली जबाबदारी आहे. येशूने म्हटले: “घेण्यापेक्षा देणे ह्‍यात जास्त धन्यता आहे.” (प्रेषितांची कृत्ये २०:३५) प्रेषित पौलानेही त्याच्या पुढील शब्दांतून इतरांना देण्याच्या वृत्तीकडे लक्ष वेधले: “आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू; कारण ज्याने वचन दिले तो विश्‍वसनीय आहे; आणि प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.”—इब्री लोकांस १०:२३-२५.

७, ८. आपण आपल्या मंडळीतील आणि इतर देशांतील ख्रिस्ती बांधवांच्या प्रती दानशूर मनोवृत्ती कशाप्रकारे प्रदर्शित करतो?

मंडळीच्या सभांमध्ये आपण जेव्हाही उत्तरे देतो किंवा दुसऱ्‍या प्रकारे कार्यक्रमात सहभाग घेतो, तेव्हा आपण खरे तर “आपल्या आशेचा पत्कर” करत असतो. आपल्या या सहभागामुळे बांधवांना निश्‍चितच प्रोत्साहन मिळते. तसेच सभेच्या आधी व नंतर त्यांच्याशी संभाषण करतानाही आपण त्यांना प्रोत्साहन देतो. ही खरे तर मंडळीतल्या अशक्‍त, दुःखी आणि आजारी बांधवांना सांत्वन व दिलासा देण्याची उत्तम संधी आहे. (१ थेस्सलनीकाकर ५:१४) या मार्गांनी इतरांना देण्याच्या बाबतीत प्रामाणिक ख्रिस्ती अतिशय मोठ्या मनाचे आहेत; म्हणूनच आपल्या सभांना पहिल्यांदा येणाऱ्‍यांना आपल्यामध्ये असलेल्या प्रेमाची जाणीव होते आणि ते प्रभावित होतात.—स्तोत्र ३७:२१; योहान १५:१२; १ करिंथकर १४:२५.

पण आपले प्रेम केवळ आपल्याच मंडळीपुरते नाही. तर ते सबंध जगातल्या आपल्या बंधूवर्गाला सामावते. म्हणूनच, उदाहरणार्थ प्रत्येक राज्य सभागृहात, राज्य सभागृह निधी असे लिहिलेली एक दानपेटी असते. आपल्या मंडळीचे राज्य सभागृह कदाचित उत्तम स्थितीत असेल, पण आपल्याला माहीत आहे की इतर देशांतील आपल्या हजारो बांधवांजवळ सभांकरता एकत्र येण्याचे सुयोग्य ठिकाण नाही. राज्य सभागृह निधीला आपण हातभार लावतो तेव्हा आपण अशा बांधवाबद्दल, त्यांना ओळखत नसूनही, प्रेम व्यक्‍त करत असतो.

९. यहोवाचे साक्षीदार एकमेकांवर प्रीती करतात यामागे मुळात कोणते कारण आहे?

यहोवाचे साक्षीदार एकमेकांवर इतके प्रेम का करतात? असे करण्याची त्यांना येशूने आज्ञा दिली होती. (योहान १५:१७) त्यांना एकमेकांबद्दल असलेली प्रीती ही वैयक्‍तिकरित्या व सामूहिकरित्या त्यांच्यावर देवाचा आत्मा कार्य करत असल्याचा पुरावा आहे. प्रीती ही ‘आत्म्याच्याद्वारे निष्पन्‍न होणाऱ्‍या फळात’ समाविष्ट आहे. (गलतीकर ५:२२, २३) आज आपण अशा जगात राहतो जेथे ‘पुष्कळांची प्रीति थंडावली आहे,’ पण यहोवाचे साक्षीदार बायबलचा अभ्यास करतात, ख्रिस्ती सभांना उपस्थित राहतात आणि निरंतर देवाला प्रार्थना करतात तसतसे प्रेम व्यक्‍त करणे हा त्यांचा स्वभावगुण बनतो.—मत्तय २४:१२.

या जगात वावरताना

१०. जगाच्याप्रती आपल्यावर कोणती जबाबदारी आहे?

१० पौलाने “आशेचा पत्कर” करण्याविषयी जो उल्लेख केला त्यावरून आपल्याला आणखी एका जबाबदारीची आठवण होते. जाहीरपणे आपल्या आशेचा पत्कर करण्यात, जे लोक अद्याप आपले ख्रिस्ती बांधव नाहीत त्यांनाही सुवार्ता सांगण्याचे काम अंतर्भूत आहे. (मत्तय २४:१४; २८:१९, २०; रोमकर १०:९, १०, १३-१५) प्रचार कार्यातूनही इतरांना देण्याची वृत्ती दिसून येते. कारण या कार्यात भाग घेण्याकरता वेळ, शक्‍ती, तयारी, प्रशिक्षण आणि स्वतःच्या साधनसंपत्तीचा वापर करणे समाविष्ट आहे. पण पौलाने असेही लिहिले: “हेल्लेणी व बर्बर, ज्ञानी व अज्ञानी, ह्‍यांचा मी ऋणी आहे. ह्‍याप्रमाणे रोम शहरात राहणाऱ्‍या तुम्हालाहि सुवार्ता सांगण्यास मी अगदी उत्सुक आहे.” (रोमकर १:१४, १५) पौलाप्रमाणे आपणही हे ‘ऋण’ फेडताना कुचराई करू नये.

११. या जगाशी आपल्या संबंधावर कोणती दोन शास्त्रवचनीय तत्त्वे प्रभाव करतात पण तरीसुद्धा आपण काय ओळखतो?

११ आपले सहविश्‍वासू नसणाऱ्‍यांप्रती आपल्या इतरही काही जबाबदाऱ्‍या आहेत का? निश्‍चितच. अर्थात, “सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे,” हे आपल्याला माहीत आहे. (१ योहान ५:१९) तसेच, “मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत” असे येशूने आपल्या शिष्यांविषयी म्हटल्याचेही आपल्याला ठाऊक आहे. पण आपण या जगातच राहतो, यातच उदरनिर्वाह चालवतो आणि यातील सेवांचाही फायदा करून घेतो. (योहान १७:११, १५, १६) तेव्हा या जगाच्या संदर्भातही आपल्या काही जबाबदाऱ्‍या आहेत. त्या कोणत्या? प्रेषित पेत्राने या प्रश्‍नाचे उत्तर दिले. जेरूसलेमच्या नाशाच्या काही काळाआधी त्याने आशिया मायनर येथील ख्रिस्ती बांधवांना एक पत्र लिहिले आणि त्या पत्रातील एक उतारा आपल्याला या जगासोबत संतुलित संबंध राखण्यास सहायक ठरतो.

१२. कोणत्या अर्थाने ख्रिस्ती “प्रवासी व परदेशवासी” आहेत आणि त्याअर्थी त्यांनी कशापासून दूर राहावे?

१२ सुरवातीला, पेत्राने म्हटले: “प्रियजनहो, जे तुम्ही प्रवासी व परदेशवासी आहा त्या तुम्हास मी विनंती करितो की, जिवात्म्याबरोबर लढणाऱ्‍या दैहिक वासनांपासून दूर राहा.” (१ पेत्र २:११) खरे ख्रिस्ती आध्यात्मिक अर्थाने “प्रवासी व परदेशवासी” आहेत, कारण त्यांच्या जीवनाच्या केंद्रस्थानी त्यांची सार्वकालिक जीवनाची आशा आहे—आत्म्याने अभिषिक्‍त जनांना स्वर्गात आणि ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ भविष्यातील पृथ्वीवरील परादिसात. (योहान १०:१६; फिलिप्पैकर ३:२०, २१; इब्री लोकांस ११:१३; प्रकटीकरण ७:९, १४-१७) पण दैहिक वासना म्हणजे काय? दैहिक वासनांमध्ये श्रीमंत होण्याची इच्छा, मोठेपणाची हौस, अनैतिक लैंगिक वासना आणि “हेवा” व “लोभ” म्हणून वर्णन केलेल्या वासनांचा समावेश होतो.—कलस्सैकर ३:५; १ तीमथ्य ६:४, ९; १ योहान २:१५, १६.

१३. दैहिक वासना कशाप्रकारे आपल्या ‘जिवात्म्याबरोबर लढतात’?

१३ या वासना खरोखरच आपल्या ‘जिवात्म्याबरोबर लढतात.’ त्या देवासोबतचा आपला नातेसंबंध कमकुवत करतात आणि अशारितीने आपली ख्रिस्ती आशा (आपला ‘जिवात्मा’ अर्थात जीवन) धोक्यात आणतात. उदाहरणार्थ, आपण अनैतिक गोष्टींत रस घेतला तर मग स्वतःला “जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ” म्हणून कसे काय अर्पण करू शकू? भौतिकवादाच्या मोहाला आपण बळी पडलो तर आपण ‘पहिल्याने त्याचे राज्य मिळविण्यास झटत आहोत’ असे म्हणता येईल का? (रोमकर १२:१, २; मत्तय ६:३३; १ तीमथ्य ६:१७-१९) यापेक्षा चांगला मार्ग मोशेचे अनुकरण करण्याचा ठरेल, अर्थात जगाच्या मोहात पाडणाऱ्‍या गोष्टींकडे पाठ फिरवून देवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्रथम स्थान देणे. (मत्तय ६:१९, २०; इब्री लोकांस ११:२४-२६) जगासोबत संतुलित नातेसंबंध कायम ठेवण्यात हा कळीचा मुद्दा आहे.

‘उत्तम आचरण कायम ठेवणे’

१४. ख्रिस्ती या नात्याने आपण सदोदित उत्तम आचरण राखण्याचा का प्रयत्न करतो?

१४ आणखी एक महत्त्वाची सूचना पेत्राच्या पुढील शब्दांत सापडते: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्‍यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हांविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.” (१ पेत्र २:१२) ख्रिस्ती या नात्याने आपण इतरांकरता चांगले उदाहरण मांडण्याचा प्रयत्न करतो. शाळेत आपण मेहनतीने अभ्यास करतो. कामाच्या ठिकाणी, आपले वरिष्ठ अवाजवी अपेक्षा करतात असे वाटत असले तरीही आपण कष्टाळू आणि प्रामाणिक वृत्तीने काम करतो. विभाजित कुटुंबांत, विश्‍वासात असलेले जोडीदार ख्रिस्ती तत्त्वांचे पालन करण्याचा खास प्रयत्न करतात. हे सर्व सोपे नाही, पण आपल्याला माहीत आहे की आपल्या आदर्श वागणुकीमुळे यहोवा देवाला आनंद होतो आणि साक्षीदार नसलेल्यांवरही याचा चांगला परिणाम होतो.—१ पेत्र २:१८-२०; ३:१.

१५. यहोवाच्या साक्षीदारांच्या उच्च आचारविचारांची सर्वत्र दखल घेतली जाते हे आपल्याला कसे कळून येते?

१५ उच्च आदर्शांनुसार वागण्यात बहुतेक यहोवाचे साक्षीदार यशस्वी राहिले आहेत हे आतापर्यंत अनेक वर्षांदरम्यान त्यांच्यासंदर्भात लोकांनी केलेल्या विधानांवरून स्पष्ट दिसून येते. उदाहरणार्थ, इटलीच्या ईल टेम्पो या वृत्तपत्रात असे म्हणण्यात आले: “यहोवाच्या साक्षीदारांसोबत कार्य करणारे, त्यांचे प्रामाणिक कर्मचारी म्हणून वर्णन करतात; त्यांच्या विश्‍वासांविषयी त्यांना इतकी जबरदस्त खात्री असते की कधीकधी ते धर्मवेडे वाटतात, पण त्यांच्या नैतिक आचरणाबद्दल ते निश्‍चितच आदरास पात्र आहेत.” अर्जेंटिनाच्या ब्वेनास एअरीझ शहरातील हेराल्ड नामक वृत्तपत्रात असे म्हणण्यात आले: “कित्येक वर्षांपासून यहोवाच्या साक्षीदारांनी आपण कष्टाळू, सभ्य, काटकसरी आणि देवभीरू असल्याचे शाबीत केले आहे.” रशियन विद्वान, स्यरगिए ईव्हानिएनको यांनी म्हटले: “सबंध जगात यहोवाच्या साक्षीदारांची अत्यंत कायदेनिष्ठ लोक म्हणून ख्याती आहे; खासकरून कर भरण्यासंबंधी कधीही कुचराई न करण्याबद्दल त्यांनी नाव कमवले आहे.” झिंबाब्वे येथे यहोवाच्या साक्षीदारांनी त्यांच्या अधिवेशनाकरता वापरलेल्या एका मैदानाच्या व्यवस्थापकाने म्हटले: “मी कित्येक साक्षीदारांना जमिनीवर पडलेले कागदाचे तुकडे उचलताना आणि शौचालये स्वच्छ करताना पाहिले आहे. त्यांचे अधिवेशन संपल्यावर हे मैदान आधीपेक्षा जास्त स्वच्छ दिसते. तुमचे तरुण सदस्य मला अत्यंत सुस्वभावी आढळले. कधी वाटतं, सगळ्या जगात फक्‍त यहोवाचे साक्षीदार असते तर!”

ख्रिस्ती अधीनता

१६. जगातील अधिकाऱ्‍यांसोबत आपला कशाप्रकारचा नातेसंबंध आहे आणि का?

१६ पेत्र जगातील अधिकाऱ्‍यांसोबतच्या आपल्या नातेसंबंधाविषयीही भाष्य करतो. तो म्हणतो: “प्रभूकरिता तुम्ही, माणसांनी स्थापिलेल्या प्रत्येक व्यवस्थेच्या अधीन असा; राजा श्रेष्ठ, म्हणून त्याच्या अधीन; आणि अधिकारी हे वाईट करणाऱ्‍यांना शिक्षा करण्यासाठी व चांगले करणाऱ्‍यांची प्रशंसा करण्यासाठी त्याने पाठविलेले आहेत, म्हणून त्यांच्याहि अधीन असा. कारण देवाची इच्छा अशी आहे की, तुम्ही चांगले करीत राहून निर्बुद्ध माणसांच्या अज्ञानाला [“अविचारी बोलणे,” ईझी-टू-रीड] कुंठित करावे.” (१ पेत्र २:१३-१५) सुव्यवस्थित प्रशासनामुळे मिळणाऱ्‍या फायद्यांबद्दल आपण कृतज्ञ आहोत आणि पेत्राच्या मार्गदर्शनानुसार आपण त्याचे कायदेकानून पाळतो आणि विश्‍वासूपणे कर भरतो. देवाने सरकारांना कायदेभंग करणाऱ्‍यांना शिक्षा देण्याचा अधिकार दिला आहे याची आपल्याला जाणीव आहे, पण जगातील अधिकाऱ्‍यांच्या अधीन राहण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण “प्रभूकरिता” असे करतो. ही देवाची इच्छा आहे. शिवाय, बेकायदेशीर कृत्य केल्याबद्दल शिक्षा भोगून आपण यहोवाच्या नावावर कलंक आणू इच्छित नाही.—रोमकर १३:१, ४-७; तीत ३:१; १ पेत्र ३:१७.

१७. ‘निर्बुद्ध माणसे’ आपला विरोध करतात तेव्हाही आपण कशाविषयी आत्मविश्‍वास बाळगू शकतो?

१७ पण खेदाने म्हणावे लागते, की अधिकारपदी असलेले काही ‘निर्बुद्ध माणसे’ आपला छळ करतात किंवा इतर मार्गांनी आपला विरोध करण्याचा प्रयत्न करतात, उदाहरणार्थ आपली बदनामी करण्याचा सहेतूक प्रयत्न करण्याद्वारे. अर्थात, यहोवाच्या नियोजित वेळी त्यांचा प्रचार खोटा असल्याचे आपोआपच शाबीत होते आणि अशारितीने त्यांचे “अविचारी बोलणे” कुंठित होते. आपले आजवरचे ख्रिस्ती आचरण हाच सर्वात मोठा पुरावा आहे. म्हणूनच प्रामाणिक सरकारी अधिकारी सहसा चांगले लोक म्हणून आपली प्रशंसा करतात.—रोमकर १३:३; तीत २:७, ८.

देवाचे दास

१८. ख्रिस्ती या नात्याने आपण कशाप्रकारे आपल्या स्वतंत्रतेचा गैरवापर करण्याचे टाळतो?

१८ आता पेत्र एक ताकीद देतो, तो म्हणतो: “दुष्टपणा झाकण्यासाठी आपल्या स्वतंत्रतेचा उपयोग न करिता तुम्ही स्वतंत्र, तरी देवाचे दास, असे राहा.” (१ पेत्र २:१६; गलतीकर ५:१३) आज बायबलचे ज्ञान घेतल्यामुळे आपण खोट्या धर्माच्या शिकवणुकींपासून स्वतंत्र झालो आहोत. (योहान ८:३२) शिवाय, आपल्याजवळ इच्छा स्वातंत्र्य आहे आणि आपण स्वतःच्या मनानुसार निर्णय घेऊ शकतो. पण तरीसुद्धा आपण आपल्या स्वातंत्र्याचा दुरुपयोग कधीही करत नाही. मित्रमैत्रिणी, पेहराव, साजशृंगार, करमणुकीचे प्रकार इतकेच काय, तर खाण्यापिण्याच्या बाबतीतही निवड करताना आपण नेहमी हे आठवणीत ठेवतो की खरे ख्रिस्ती स्वतःच्या इच्छा तृप्त करत नाहीत तर ते देवाचे दास आहेत. आपल्या स्वतःच्या दैहिक वासनांचे किंवा या जगाच्या लोकप्रिय चालीरितींचे गुलाम असण्यापेक्षा आपण यहोवाची सेवा करण्याचे निवडतो.—गलतीकर ५:२४; २ तीमथ्य २:२२; तीत २:११, १२.

१९-२१. (अ) जगिक अधिकाऱ्‍यांबद्दल आपण कोणता दृष्टिकोन बाळगतो? (ब) काहींनी कशाप्रकारे “बंधूवर्गावर प्रीती” असल्याचे प्रदर्शित केले आहे? (क) आपली सर्वात महत्त्वाची जबाबदारी कोणती आहे?

१९ पेत्र पुढे म्हणतो: “सर्वांस मान द्या. बंधुवर्गावर प्रीति करा. देवाचे भय धरा. राजाचा मान राखा.” (१ पेत्र २:१७) यहोवा देव मानवांना विविध अधिकारपदांवर राहू देण्याची अनुमती देत असल्यामुळे आपण या अधिकाऱ्‍यांना योग्य आदर देतो. आपण त्यांच्यासाठी प्रार्थनाही करतो जेणेकरून आपल्याला आपले सेवाकार्य शांतीने व सुभक्‍तीसहित करता यावे. (१ तीमथ्य २:१-४) पण त्याचवेळेस आपल्याला आपल्या “बंधूवर्गावर प्रीति” आहे. आपण कधीही त्यांचे नुकसान होईल अशाप्रकारे नव्हे, तर नेहमी त्यांच्या भल्याकरता कार्य करतो.

२० उदाहरणार्थ, एका आफ्रिकी देशात जातीय हिंसाचाराने थैमान घातले होते, पण यहोवाच्या साक्षीदारांचे ख्रिस्ती आचरण या देशात ठळकपणे दिसून आले. स्वित्झर्लंडच्या रेफोरमीर्ते प्रेस्से या दैनिकात असे वृत्त प्रकाशित करण्यात आले: “१९९५ साली, ॲफ्रिकन राइट्‌स . . . [या मानवी हक्क संघटनेला सदर हिंसाचारात] एक यहोवाच्या साक्षीदारांचा अपवाद वगळता इतर सर्व चर्चेसचा सहभाग असल्याचे शाबित करता आले.” या दुःखद घटनांचे वृत्त बाहेरच्या जगात लोकांना कळताच, युरोपमधील यहोवाच्या साक्षीदारांनी त्या आपत्तीग्रस्त देशातील बांधवांकरता व इतरांकरता लगेच अन्‍नसामग्री आणि वैद्यकीय मदत रवाना केली. (गलतीकर ६:१०) त्यांनी नीतिसूत्रे ३:२७ यातील शब्दांनुसार कृती केली: “एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास, ते करण्यास माघार घेऊ नको.”

२१ पण जगातील कोणत्याही अधिकाऱ्‍यांना द्यावयाच्या आदरापेक्षा आणि आपल्या बांधवांना दाखवावयाच्या प्रीतीपेक्षाही अधिक महत्त्वाची एक जबाबदारी आपल्यावर आहे. ती कोणती? पेत्र म्हणतो: “देवाचे भय धरा.” कोणत्याही मानवापेक्षा आपली यहोवाच्या प्रती अधिक मोठी जबाबदारी आहे. असे का म्हणता येईल? आणि देवाप्रती असलेल्या जबाबदाऱ्‍यांची आपण जगिक अधिकाऱ्‍यांना द्यावयाच्या आदरासोबत कशी सांगड घालू शकतो? पुढील लेखात या प्रश्‍नांची उत्तरे दिली जातील.

तुम्हाला आठवते का?

• ख्रिश्‍चनांना कुटुंबात कोणत्या जबाबदाऱ्‍या असतात?

• कशाप्रकारे आपण मंडळीत इतरांना देण्याची प्रवृत्ती दाखवू शकतो?

• या जगाप्रती आपल्या कोणत्या जबाबदाऱ्‍या आहेत?

• उच्च आदर्शांनुसार आचरण केल्यामुळे कोणते काही चांगले परिणाम घडून येतात?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[९ पानांवरील चित्र]

ख्रिस्ती कुटुंब कशाप्रकारे आनंदाचा उगम ठरू शकते?

[१० पानांवरील चित्रे]

यहोवाचे साक्षीदार एकमेकांवर का प्रीती करतात?

[१० पानांवरील चित्रे]

आपण आपल्या बांधवांना ओळखत नसतानाही त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्‍त करू शकतो का?