व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शेवटल्या काळातील तटस्थ ख्रिस्ती

शेवटल्या काळातील तटस्थ ख्रिस्ती

शेवटल्या काळातील तटस्थ ख्रिस्ती

“जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.”योहान १७:१६.

१, २. आपल्या अनुयायांच्या जगासोबतच्या संबंधांविषयी येशूने काय म्हटले आणि त्याने जे म्हटले त्यावरून कोणते प्रश्‍न उपस्थित होतात?

परिपूर्ण मानव या नात्याने आपल्या जीवनाच्या शेवटल्या रात्री येशूने आपल्या शिष्यांच्या देखत बरीच लांब प्रार्थना केली. त्या प्रार्थनेत त्याने असे काहीतरी म्हटले जे सर्व खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या जीवनाचे वर्णन करते. आपल्या अनुयायांच्या संदर्भात त्याने म्हटले: “मी त्यांना तुझे वचन दिले आहे; जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाइटापासून राखावे अशी विनंती करितो. जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.”—योहान १७:१४-१६.

दोनदा, येशूने म्हटले की त्याचे अनुयायी या जगाचे नाहीत. शिवाय, जगापासून अलिप्त राहिल्यामुळे त्यांचे संबंध तणावपूर्ण राहतील—जग त्यांचा द्वेष करेल. पण तरीसुद्धा ख्रिश्‍चनांनी भयभीत व्हायचे नव्हते कारण यहोवा त्यांची काळजी घेईल असे येशूने म्हटले. (नीतिसूत्रे १८:१०; मत्तय २४:९, १३) येशूच्या शब्दांवर लक्ष दिल्यास साहजिकच काही प्रश्‍न उद्‌भवतात: ‘खरे ख्रिस्ती जगाचे नसण्यामागे कोणते कारण आहे? जगाचे नाहीत याचा काय अर्थ होतो? जर जग ख्रिश्‍चनांचा द्वेष करते तर मग ते जगाविषयी कशी मनोवृत्ती बाळगतात? खासकरून, जगाच्या शासनाकडे ते कोणत्या दृष्टीने पाहतात?’ या प्रश्‍नांची शास्त्रवचनीय उत्तरे मिळवणे महत्त्वाचे आहे कारण त्यांचा आपल्या सर्वांच्या जीवनावर परिणाम होतो.

“आपण देवापासून आहो”

३. (अ) कशामुळे आपण जगापासून अलिप्त होतो? (ब) हे जग ‘दुष्ट सैतानाला वश झाले आहे’ हे कशावरून शाबीत होते?

आपण या जगाचे असू शकत नाही यामागचे एक कारण म्हणजे आपला यहोवासोबत जवळचा संबंध आहे. प्रेषित योहानाने लिहिले: “आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) जगाविषयी योहानाने जे म्हटले ते अगदी खरे आहे हे आपण पाहतच आहोत. आजच्या जगात मोठ्या प्रमाणात होणारी युद्धे, गुन्हेगारी, क्रूरता, जुलूम, बेईमानी, आणि अनैतिकता ही देवाचा नव्हे, तर स्पष्टतः सैतानाचा प्रभाव असल्याचे शाबीत करते. (योहान १२:३१; २ करिंथकर ४:४; इफिसकर ६:१२) एखादी व्यक्‍ती यहोवाच्या साक्षीदारांत सामील होते तेव्हा अशी चुकीची कृत्ये करण्यास किंवा त्यांस मान्यता देण्यास ती कधीही तयार होणार नाही आणि त्यामुळे ती व्यक्‍ती जगाची नाही असे म्हणता येते.—रोमकर १२:२; १३:१२-१४; १ करिंथकर ६:९-११; १ योहान ३:१०-१२.

४. आपण यहोवाचे आहोत हे आपण कोणत्या मार्गांनी दाखवतो?

योहानाने म्हटले की जगाच्या उलट, ख्रिस्ती ‘देवापासून आहेत.’ यहोवाला आपले जीवन समर्पित करणारे सर्व त्याचे आहेत. प्रेषित पौलाने म्हटले: “जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो, आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो; म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहो.” (रोमकर १४:८; स्तोत्र ११६:१५) आपल्यावर यहोवाची मालकी असल्यामुळे आपण त्याची आणि केवळ त्याचीच उपासना करतो. (निर्गम २०:४-६) म्हणूनच खरा ख्रिस्ती जगिक कार्यांसाठी स्वतःला वाहून घेत नाही. आणि जरी तो राष्ट्रीय प्रतिकांचा आदर करत असला तरीसुद्धा तो कृतींद्वारे अथवा मनोवृत्तीद्वारेही त्यांची उपासना मात्र करत नाही. निश्‍चितच, क्रिडाजगतातील लोकप्रिय विजेत्यांचा किंवा आधुनिक जगातील इतर पूज्य समजल्या जाणाऱ्‍या व्यक्‍तिमत्त्वांचा तो भक्‍त बनत नाही. अर्थात, इतरांना आपल्या इच्छेप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे हे तो जाणतो आणि या अधिकाराचा आदर करतो पण तो स्वतः केवळ निर्माणकर्त्याची उपासना करतो. (मत्तय ४:१०; प्रकटीकरण १९:१०) हे देखील त्याला जगापासून वेगळे ठरवते.

“माझे राज्य या जगाचे नाही”

५, ६. देवाच्या राज्याला अधीन झाल्यामुळे आपण जगापासून कशाप्रकारे अलिप्त होतो?

ख्रिस्ती लोक ख्रिस्त येशूचे अनुयायी आणि देवाच्या राज्याची प्रजा आहेत आणि या कारणामुळे देखील ते या जगाचे नाहीत. पंतय पिलातापुढे येशूची चौकशी चालली असताना त्याने म्हटले: “माझे राज्य ह्‍या जगाचे नाही. माझे राज्य ह्‍या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.” (योहान १८:३६) राज्य ते माध्यम आहे ज्याकरवी यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण केले जाईल, त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन केले जाईल आणि त्याची इच्छा जशी स्वर्गात तशी पृथ्वीवरही केली जाईल. (मत्तय ६:९, १०) आपल्या सबंध सेवाकार्यादरम्यान येशूने राज्याच्या सुवार्तेची घोषणा केली आणि म्हटले की त्याचे अनुयायी या व्यवस्थीकरणाच्या अगदी शेवटापर्यंत ही घोषणा करत राहतील. (मत्तय ४:२३; २४:१४) १९१४ साली प्रकटीकरण ११:१५ येथील भविष्यसूचक शब्द पूर्ण झाले: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; आणि तो युगानुयुग राज्य करील.” लवकरच तो दिवस उजाडेल जेव्हा मानवजातीवर शासन करणारे एकमेव सरकार देवाचे स्वर्गीय राज्य असेल. (दानीएल २:४४) एका विशिष्ट समयी जगाच्या शासकांनाही या राज्याचे प्रभुत्व मान्य करणे भाग पडेल.—स्तोत्र २:६-१२.

हे सर्व लक्षात घेऊन आज खरे ख्रिस्ती देवाच्या राज्याला अधीन होतात आणि “पहिल्याने [देवाचे] राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यास झटा” या येशूचा मार्गदर्शनाचे ते पालन करतात. (मत्तय ६:३३) अर्थात, ज्या राष्ट्रात ते राहतात त्याच्याप्रती ते राष्ट्रद्रोही होत नाहीत पण आध्यात्मिक अर्थाने निश्‍चितच ते जगापासून वेगळे ठरतात. आज ख्रिश्‍चनांचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे, पहिल्या शतकाप्रमाणे ‘देवाच्या राज्याविषयी साक्ष देणे.’ (प्रेषितांची कृत्ये २८:२३) देवाने दिलेल्या या कार्यात अडथळा आणण्याचा कोणत्याही मानवी शासनाला हक्क नाही.

७. खरे ख्रिस्ती तटस्थ का राहतात आणि हे त्यांनी कशाप्रकारे दाखवले आहे?

आपल्यावर यहोवाची मालकी आहे, आपण येशूचे अनुयायी आणि देवाच्या राज्याची प्रजा आहोत हे ओळखून यहोवाच्या साक्षीदारांनी २० व्या व २१ व्या शतकातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लढायांत तटस्थ भूमिका घेतली आहे. त्यांनी कोणत्याही बाजूला आपला पाठिंबा दिला नाही, कोणाहीविरुद्ध शस्त्र उचलले नाहीत आणि कोणत्याही जगीक कार्याच्या प्रचारात सहभाग घेतलेला नाही. अतिशय बिकट विरोधाला तोंड देत असतानाही त्यांनी अतिशय उल्लेखनीय रितीने आपला विश्‍वास प्रदर्शित केला आणि अशारितीने त्यांनी १९३४ साली जर्मनीच्या नात्सी शासकांना सादर केलेल्या पुढील तत्त्वांनुसार आचरण केले: “आम्हाला राजकीय घडामोडींत काहीही स्वारस्य नाही पण आम्ही देवाने नेमलेला राजा ख्रिस्त याच्या शासनाखालील देवाच्या राज्याला पूर्णपणे समर्पित आहोत. आम्ही कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा किंवा नुकसान करणार नाही. पण जशी संधी मिळेल त्यानुसार शांतीने राहण्यात आणि सर्वांचे भले करण्यात आनंद मानू.”

ख्रिस्ताच्या वतीने वकील व दूत

८, ९. यहोवाचे साक्षीदार आज वकील व दूत कोणत्या अर्थाने आहेत आणि राष्ट्रांशी त्यांच्या संबंधांवर याचा कशाप्रकारे परिणाम होतो?

पौलाने स्वतःचे आणि अभिषिक्‍त सह ख्रिश्‍चनांचे वर्णन करताना म्हटले, की “देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करितो.” (२ करिंथकर ५:२०; इफिसकर ६:२०) १९१४ या सालापासून खासकरून आत्म्याने अभिषिक्‍त ख्रिश्‍चन देवाच्या राज्याच्या वतीने—ज्याचे ते “पुत्र” आहेत, वकिली करतात असे म्हणता येईल. (मत्तय १३:३८; फिलिप्पैकर ३:२०; प्रकटीकरण ५:९, १०) शिवाय, यहोवाने राष्ट्रांतून ‘दुसऱ्‍या मेंढरांचा’ “मोठा लोकसमुदाय” एकत्रित केला आहे; हे अभिषिक्‍त पुत्रांना वकिली करण्यात साहाय्य करणारे पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेले ख्रिस्ती आहेत. (प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६) या ‘दुसऱ्‍या मेंढरांना’ देवाच्या राज्याचे “दूत” म्हणता येईल.

एक वकील व त्याचे कर्मचारी ज्या देशात सेवा करतात तेथील राजकीय घडामोडींत दखल देत नाहीत. त्याचप्रकारे ख्रिस्ती देखील या जगाच्या देशांतील राजकीय कारभारांत तटस्थ राहतात. ते कोणत्याही राष्ट्रीय, जातीय, सामाजिक किंवा आर्थिक गटाची बाजू घेत नाहीत. (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) त्याऐवजी, ते ‘सर्वांचे बरे करतात.’ (गलतीकर ६:१०) यहोवाचे साक्षीदार तटस्थ राहत असल्यामुळे कोणीही प्रामाणिकपणे असे म्हणून त्यांचा संदेश नाकारू शकत नाही की ते एखाद्या जातीय, राष्ट्रीय किंवा जमातीय संघर्षात विरुद्ध पक्षाच्या बाजूला आहेत.

प्रीतीमुळे ओळखले जातात

१०. ख्रिस्ती व्यक्‍तीकरता प्रीती कितपत महत्त्वाची आहे?

१० वरील कारणांव्यतिरिक्‍त, खरे ख्रिस्ती जगाच्या कारभारांत तटस्थ राहण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांचा इतर ख्रिस्ती बांधवांशी असलेला संबंध. येशूने त्याच्या अनुयायांना म्हटले: “तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३५) ख्रिस्ती असण्याचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे बंधुप्रेम होय. (१ योहान ३:१४) ख्रिस्ती व्यक्‍तीचा इतर ख्रिस्ती बांधवांसोबतचा संबंध अतिशय घनिष्ट असतो कारण तो यहोवा व येशू यांच्यासोबत असलेल्या त्याच्या नातेसंबंधाशी संबंधित आहे. ही प्रीती केवळ आपल्या मंडळीतील बांधवांपुरतीच नसते. तर ती सबंध ‘बंधुवर्गाला’ सामावते.—१ पेत्र ५:९.

११. यहोवाच्या साक्षीदारांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्‍या प्रीतीमुळे त्यांच्या आचरणावर कशाप्रकारे परिणाम झाला आहे?

११ आज यहोवाचे साक्षीदार यशया २:४ येथील शब्द पूर्ण करण्याद्वारे आपल्या बंधुप्रेमाचा पुरावा देतात: “ते आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करितील, आपल्या भाल्याच्या कोयत्या करितील; यापुढे एक राष्ट्र दुसऱ्‍या राष्ट्रावर तरवार उचलणार नाही; ते इतःपर युद्धकला शिकणार नाहीत.” यहोवाकडून शिक्षण मिळाल्यामुळे खऱ्‍या ख्रिश्‍चनांचे देवासोबत व एकमेकांसोबत शांतीपूर्ण संबंध आहेत. (यशया ५४:१३) देवावर आणि आपल्या बांधवांवर प्रेम असल्यामुळे ते इतर देशांतील आपल्या सह उपासकांवर किंवा इतर कोणाविरुद्धही शस्त्र उचलण्याचा विचारही करू शकत नाहीत. त्यांची शांती आणि एकता त्यांच्या उपासनेचे आवश्‍यक घटक आहेत; त्यांच्यावर देवाचा आत्मा कार्य करत असल्याचा हा एक पुरावा आहे. (स्तोत्र १३३:१; मीखा २:१२; मत्तय २२:३७-३९; कलस्सैकर ३:१४) ते ‘शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतात व तिचे अवलंबन करतात’ कारण त्यांना जाणीव आहे की “परमेश्‍वराचे नेत्र नीतिमानांकडे असतात.”—स्तोत्र ३४:१४, १५.

जगाविषयी ख्रिश्‍चनांचा दृष्टिकोन

१२. जगातल्या लोकांविषयी यहोवाच्या कोणत्या मनोवृत्तीचे यहोवाचे साक्षीदार अनुकरण करतात आणि कसे?

१२ यहोवाने या जगाविरुद्ध प्रतिकूल न्यायदंड बजावला आहे पण जगातल्या सर्व व्यक्‍तींचा अद्याप त्याने न्याय केलेला नाही. हा न्याय तो येशूच्या माध्यमाने त्याच्या नियुक्‍त वेळी करेल. (स्तोत्र ६७:३, ४; मत्तय २५:३१-४६; २ पेत्र ३:१०) या दरम्यान, तो मानवजातीबद्दल अद्‌भुत प्रीती व्यक्‍त करत आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र देखील दिला जेणेकरून सर्वांना सार्वकालिक जीवनाची संधी मिळावी. (योहान ३:१६) ख्रिस्ती या नात्याने आपणही तारणाकरता देवाने केलेल्या तरतुदींबद्दल इतरांना सांगण्याद्वारे त्याच्या प्रेमाचे अनुकरण करतो; आणि आपल्या प्रयत्नांची सहसा कदर केली जात नाही तरीसुद्धा, आपण हे कार्य करण्याचे सोडत नाही.

१३. जगीक अधिकाऱ्‍यांसंबंधी आपण कशी मनोवृत्ती बाळगावी?

१३ जगातल्या शासकीय अधिकाऱ्‍यांविषयी आपण कशी मनोवृत्ती बाळगावी? पौलाने पुढील शब्द लिहिले तेव्हा त्याने या प्रश्‍नाचे उत्तर दिले: “प्रत्येक जणाने वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन असावे; कारण देवापासून नाही असा अधिकार नाही आणि जे [“सापेक्ष,” NW] अधिकार आहेत ते देवाने नेमलेले आहेत.” (रोमकर १३:१, २) मानव या “सापेक्ष” अधिकारपदांवर राहू शकतात ते केवळ सर्वसमर्थ देवाने त्यांना अनुमती दिली आहे म्हणून; त्यांचा अधिकार एकमेकांच्या तुलनेत कमी जास्त असू शकतो पण देवाच्या तुलनेत ते नेहमी खालच्या दर्जावर आहेत. ख्रिस्ती व्यक्‍ती जगीक अधिकाऱ्‍यांच्या अधीन राहतात कारण यहोवाला आज्ञाधारक राहण्यात हे अंतर्भूत आहे. पण देवाच्या अपेक्षा आणि मानवी सरकाराच्या अपेक्षांमध्ये तफावत निर्माण झाली तर?

देवाचे व कैसराचे कायदे

१४, १५. (अ) आज्ञापालनाच्या बाबतीत देवाच्या व मानवी अधिकाऱ्‍यांच्या अपेक्षांचा टकराव दानीएलने कशाप्रकारे टाळला? (ब) आज्ञापालनाचा प्रश्‍न टाळता येण्यासारखा नव्हता तेव्हा तीन इब्री तरुणांनी कोणती भूमिका घेतली?

१४ मानवी सरकारांना आणि देवाच्या अधिकाराला अधीनता दाखवताना समतोल साधण्याच्या बाबतीत दानीएल व त्याच्या तीन साथीदारांनी आपल्याकरता एक उत्तम उदाहरण पुरवले आहे. त्या चार इब्री तरुणांना हद्दपार करून बॅबिलोनला पाठवण्यात आले तेव्हा त्यांनी या देशातील कायदेकानूनांचे पालन केले आणि लवकरच त्यांना विशेष प्रशिक्षणाकरता निवडण्यात आले. या प्रशिक्षणामुळे भविष्यात यहोवाच्या नियमांचे उल्लंघन करण्याची पाळी येऊ शकते हे ओळखून दानीएलाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्‍यासोबत याविषयी चर्चा केली. परिणामस्वरूप, या चार इब्री तरुणांच्या विवेकबुद्धीबद्दल आदर दाखवून काही खास व्यवस्था करण्यात आल्या. (दानीएल १:८-१७) यहोवाचे साक्षीदार देखील दानीएलाच्या उदाहरणाचे अनुकरण करून, अनावश्‍यक समस्या टाळण्याकरता वरिष्ठ अधिकाऱ्‍यांना आपली भूमिका विचारपूर्वक समजावून सांगतात.

१५ पण, नंतर असा एक प्रसंग आला जेव्हा अधीनतेच्या बाबतीत देवाच्या व मानवी अधिकाऱ्‍यांच्या अपेक्षांचा टकराव टाळता येण्यासारखा नव्हता. बॅबिलोनच्या राजाने दूरा मैदानावर एक प्रचंड मूर्ती उभारली आणि सर्व उच्च अधिकाऱ्‍यांना, तसेच सुभ्यांच्या सर्व अधिकाऱ्‍यांना या मूर्तीच्या उद्‌घाटनाकरता येण्याची आज्ञा केली. एव्हाना, दानीएलच्या तीन मित्रांना बॅबिलोनच्या सुभ्यांचे अधिकारी म्हणून नेमण्यात आले होते, त्याअर्थी हा हुकूम त्यांनाही पाळायचा होता. कार्यक्रमाच्या विशिष्ट टप्प्यात, सर्व उपस्थितांना त्या मूर्तीसमोर दंडवत घालायचा होता. पण हे देवाच्या नियमाच्या विरोधात ठरेल याची त्या इब्री तरुणांना कल्पना होती. (अनुवाद ५:८-१०) त्यामुळे इतर सर्वजण खाली वाकले तेव्हा ते मात्र उभेच राहिले. राजाच्या हुकुमाचे पालन न केल्यामुळे त्यांनी अतिशय भयानक अशा मृत्यूला सामोरे जाण्याची जोखीम उचलली आणि केवळ देवाच्या चमत्कारामुळे त्यांचा जीव वाचला; पण यहोवाच्या आज्ञांचे उल्लंघन करण्याऐवजी मृत्यूला कवटाळणे त्यांनी पसंत केले.—दानीएल २:४९–३:२९.

१६, १७. प्रेषितांना प्रचार न करण्याचा हुकूम देण्यात आला तेव्हा त्यांनी काय उत्तर दिले आणि का?

१६ पहिल्या शतकात येशू ख्रिस्ताच्या प्रेषितांना जेरूसलेम येथील यहूदी धर्मपुढाऱ्‍यांसमोर हजर करण्यात आले आणि त्यांना येशूच्या नावाने प्रचार न करण्याची ताकीद देण्यात आली. त्यांनी काय उत्तर दिले? येशूने तर त्यांना सर्व राष्ट्रांत (ज्यात यहुदिया देखील समाविष्ट होते) शिष्य बनवण्याची आज्ञा दिली होती. तसेच त्याने जेरूसलेम व जगाच्या कानाकोपऱ्‍यात आपल्या नावाने साक्ष देण्यास सांगितले होते. (मत्तय २८:१९, २०; प्रेषितांची कृत्ये १:८) प्रेषितांना माहीत होते, की येशूच्या या आज्ञेतून यहोवाची त्यांच्याकरता असलेली इच्छा व्यक्‍त होत होती. (योहान ५:३०; ८:२८) म्हणूनच त्यांनी म्हटले: “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.”—प्रेषितांची कृत्ये ४:१९, २०; ५:२९.

१७ प्रेषितांची विद्रोही मनोवृत्ती नव्हती. (नीतिसूत्रे २४:२१) पण मानवी शासकांनी त्यांना देवाची इच्छा पूर्ण करण्यापासून रोखले तेव्हा, ‘आम्ही मनुष्यापेक्षा देवाची आज्ञा पाळली पाहिजे’ असे म्हणण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. येशूने म्हटले की आपण ‘कैसराचे ते कैसराला व देवाचे ते देवाला भरून द्यावे.’ (मार्क १२:१७) आपण एखाद्या मनुष्याच्या सांगण्यावरून देवाची आज्ञा मोडतो तेव्हा आपण जे देवाच्या हक्काचे ते मानवाला देत असतो. त्याऐवजी, आपण कैसराला जे द्यावयाचे ते सर्व देतो पण यहोवाचा सर्वोच्च अधिकारही ओळखतो. तो विश्‍वाचा सार्वभौम, निर्माणकर्ता, सर्व अधिकाराचा उगम आहे.—प्रकटीकरण ४:११.

आम्ही खंबीर राहू

१८, १९. आपल्या बांधवांपैकी बऱ्‍याचजणांनी कशाप्रकारे अनुकरणीय भूमिका घेतली आहे आणि आपण त्यांच्या उदाहरणाचे कशाप्रकारे पालन करू शकतो?

१८ सध्या, बहुतेक जगीक सरकारांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या तटस्थ भूमिकेला मान्यता दिली आहे आणि याकरता आपण कृतज्ञ आहोत. पण काही देशांत मात्र साक्षीदारांना भयंकर विरोध सहन करावा लागला आहे. सबंध २० व्या शतकात आणि आजपर्यंत आपल्या बांधवांनी आणि भगिनींनी अतिशय धैर्याने लढा दिला आहे; आध्यात्मिक अर्थाने त्यांनी ‘विश्‍वासासंबंधीचे युद्ध केले आहे.’—१ तीमथ्य ६:१२.

१९ आपणही त्यांच्यासारखे खंबीर कसे राहू शकतो? सर्वप्रथम आपण लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला विरोधाची अपेक्षा करूनच चालायचे आहे. विरोध होतो तेव्हा धक्का बसण्याचे किंवा आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. पौलाने तीमथ्याला ताकीद दिली: “ख्रिस्त येशूमध्ये सुभक्‍तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.” (२ तीमथ्य ३:१२; १ पेत्र ४:१२) सैतानाचा प्रभाव सर्वदूर असताना आपल्याला विरोध होणार नाही हे कसे शक्य आहे? (प्रकटीकरण १२:१७) जोपर्यंत आपण विश्‍वासू राहतो तोपर्यंत काहीजण ‘नवल वाटून आपली निंदा करतीलच.’—१ पेत्र ४:४.

२०. आपल्याला कोणत्या उत्साहवर्धक सत्यांची आठवण करून देण्यात येते?

२० दुसरी गोष्ट म्हणजे यहोवा व त्याचे स्वर्गदूत आपल्या पाठीशी असतील याची आपल्याला खात्री आहे. प्राचीन काळात अलीशाने म्हटले त्याप्रमाणे, ‘त्यांच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत.’ (२ राजे ६:१६; स्तोत्र ३४:७) कदाचित यहोवा त्याच्या उद्देशाच्या पूर्णतेकरता काही काळ आपल्यावर विरोधकांचा दबाव येऊ देईल. पण तरीसुद्धा त्या दबावाला तोंड देण्याकरता तो आपल्याला शक्‍ती देखील देतो. (यशया ४१:९, १०) काहींना तर जिवाला मुकावे लागले, पण याचे आपल्याला आश्‍चर्य वाटत नाही. येशूने म्हटले: “जे शरीराचा घात करितात पण आत्म्याचा घात करावयास समर्थ नाहीत त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्‍या दोहोंचा नरकात [“गिहेन्‍नात,” NW] नाश करावयास जो समर्थ आहे त्याला भ्या.” (मत्तय १०:१६-२३, २८) या व्यवस्थीकरणात आपण “परदेशवासी” आहोत. यात राहताना आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करून “खरे जीवन ते बळकट धरण्यास” अर्थात देवाच्या नवीन जगातील सार्वकालिक जीवन मिळवण्यास झटतो. (१ पेत्र २:११; १ तीमथ्य ६:१९) आपण देवाला विश्‍वासू राहतो तोपर्यंत कोणताही मानव आपल्याकडून ते प्रतिफळ हिरावून घेऊ शकत नाही.

२१. आपण कशाची सदैव जाणीव बाळगली पाहिजे?

२१ तेव्हा, यहोवा देवासोबत असलेल्या बहुमोल नातेसंबंधाची आपण सदोदित आठवण ठेवू या. ख्रिस्ताचे अनुयायी होण्याच्या आणि देवाच्या राज्याचे प्रजाजन होण्याच्या आशीर्वादाची आपण नेहमी कदर करू या. आपल्या बांधवांवर मनापासून प्रीती करू या आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्‍या प्रेमाचा आनंदाने स्वीकार करू या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण स्तोत्रकर्त्याच्या पुढील शब्दांचे पालन करण्याचा निर्धार करू या: “परमेश्‍वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर; परमेश्‍वराचीच प्रतिक्षा कर.” (स्तोत्र २७:१४; यशया ५४:१७) मग आपणसुद्धा, आधी होऊन गेलेल्या असंख्य ख्रिश्‍चनांप्रमाणे आपली आशा बळकट धरून—जगापासून अलिप्त असलेले विश्‍वासू व तटस्थ ख्रिस्ती या नात्याने खंबीर राहू शकू.

तुम्हाला स्पष्ट करता येईल का?

• यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधामुळे आपण कशाप्रकारे जगापासून वेगळे ठरतो?

• देवाच्या राज्याचे प्रजाजन या नात्याने आपण या जगात कोणत्या अर्थाने तटस्थ भूमिका घेतो?

• आपल्या बांधवांबद्दल असलेले प्रेम आपल्याला तटस्थ व जगापासून अलिप्त राहण्यास कशाप्रकारे मदत करते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

देवाच्या राज्याला अधीन झाल्यामुळे जगासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर कशाप्रकारे परिणाम होतो?

[१६ पानांवरील चित्र]

एक हुतू व तुत्सी आनंदाने एकमेकांसोबत काम करताना

[१७ पानांवरील चित्र]

यहुदी व अरबी ख्रिस्ती बांधव

[१७ पानांवरील चित्र]

सर्बियन, बोस्नियन आणि क्रोएशन ख्रिस्ती एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटताना

[१८ पानांवरील चित्र]

अधिकारी आपल्याला देवाच्या नियमाचे उल्लंघन करण्यास सांगतात तेव्हा कोणता मार्ग पत्करणे योग्य ठरेल?