सर्वांना हवी आहे प्रशंसा
सर्वांना हवी आहे प्रशंसा
तो दिवस त्या मुलीसाठी खूप छान होता. कधीकधी तिला सुधारणुकीची आवश्यकता लागायची, पण त्या विशिष्ट दिवशी मात्र ती अगदी शहाण्या मुलीसारखी चांगली वागली. पण, रात्री या मुलीच्या आईने तिला झोपी घातल्यावर तिला तिच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तिच्या आईने तिला याचे कारण विचारले तेव्हा ती मुसमुसतच म्हणाली: “मी आज चांगली वागले नाही का?”
हा प्रश्न ऐकून आईचे काळीज पिळवटले. आपल्या मुलीच्या चुका तिला पटकन दिसायच्या आणि ती तिला त्याबद्दल शिक्षासुद्धा करायची. पण त्या दिवशी, तिची मुलगी नीट वागायचा किती प्रयत्न करत आहे हे पाहूनसुद्धा तिने एका शब्दानेही तिची प्रशंसा केली नव्हती.
पण फक्त लहान मुलींनाच प्रशंसेची किंवा दिलाशाची आवश्यकता नसते. तर आपल्या सर्वांना देखील सल्ला व सुधारणुकीसोबतच प्रशंसेचीही तितकीच आवश्यकता आहे.
मनापासून कोणीतरी आपली प्रशंसा करते तेव्हा आपल्याला कसे वाटते? आपण खूष होऊन, तो संपूर्ण दिवस आपला आनंदात जात नाही का? कदाचित कोणाचे तरी आपल्याकडे लक्ष होते, कोणाला तरी आपली काळजी आहे, असे आपल्याला वाटते. यामुळे आपल्याला दिलासा मिळतो, की आपण जे काही करण्याचा प्रयत्न केला तो वाया गेला नाही आणि त्यामुळे आपण पुढे आणखी चांगल्याप्रकारे वागण्याचा प्रयत्न करतो. जी व्यक्ती मनापासून प्रशंसा करते तिच्या आपण जवळ जातो कारण काही तरी उत्तेजनात्मक बोलण्यासाठी ती वेळ काढते.—नीतिसूत्रे १५:२३.
प्रशंसा करण्याची आवश्यकता आहे, हे येशू ख्रिस्ताने ताडले होते. रुपयांच्या दृष्टान्तात, (स्वतः येशूला चित्रित करणारा) धनी दोन विश्वासू दासांची प्रशंसा करीत म्हणतो: “शाबास, भल्या व विश्वासू दासा.” किती हा जिव्हाळा! या दोन्ही दासांच्या क्षमता व साध्यता वेगवेगळ्या असतात आणि तरीसुद्धा त्यांना समप्रमाणात प्रशंसा मिळते.—मत्तय २५:१९-२३.
तेव्हा, त्या लहान मुलीच्या आईला आपण लक्षात ठेवू या. इतरांनी अश्रू ढाळेपर्यंत आपण प्रशंसा करण्यासाठी थांबून राहण्याची गरज नाही. उलट, आपण प्रशंसा करण्यासाठी संधींच्या शोधात असले पाहिजे. आणि, प्रत्येक प्रसंगी प्रामाणिक प्रशंसा करण्यासाठी आपल्याकडे पुरेसे कारण आहे.