व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपल्याला एकमेकांची गरज आहे

आपल्याला एकमेकांची गरज आहे

आपल्याला एकमेकांची गरज आहे

“आपण एकमेकांचे अवयव आहो.”—इफिसकर ४:२५.

१. एका ज्ञानकोशात मानवी शरीरासंबंधाने काय म्हटले आहे?

मानवी शरीर अद्‌भुत सृष्टीचे एक उदाहरण आहे! द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिया यात म्हटले आहे: “कधीकधी मानवी शरीराची यंत्राशी तुलना केली जाते—जगातले सर्वात आश्‍चर्यकारक यंत्र. अर्थात, मानवी शरीर वास्तवात यंत्र नाही, पण अनेक बाबतीत त्याची यंत्राशी तुलना केली जाऊ शकते. शरीरातही यंत्रासारखेच अनेक भाग असतात. आणि जसे यंत्राच्या प्रत्येक भागाचे काहीतरी विशिष्ट काम असते त्याचप्रमाणे शरीराचा प्रत्येक भाग एक विशेष कार्य करतो. पण सर्व भाग एकसाथ काम करतात आणि अशारितीने शरीर किंवा यंत्र सुरळीतपणे चालते.”

२. मानवी शरीर आणि ख्रिस्ती मंडळीत कोणत्या बाबतीत साम्य आहे?

होय, मानवी शरीरात अनेक भाग, किंवा अवयव आहेत आणि प्रत्येक अंग काहीतरी आवश्‍यक कार्य करते. शरीरातली एकही शीर, स्नायू अथवा इतर अवयव निरुपयोगी नाही. त्याचप्रकारे, ख्रिस्ती मंडळीतील प्रत्येक सदस्य मंडळीच्या आरोग्यात व सौंदर्यात भर घालू शकतो. (१ करिंथकर १२:१४-२६) अर्थात, मंडळीत कोणीही स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू नये, पण त्याचवेळेस कोणी स्वतःला तुच्छही लेखू नये.—रोमकर १२:३.

३. ख्रिस्ती बांधवांना एकमेकांची गरज आहे हे इफिसकर ४:२५ येथे कशाप्रकारे सूचित करण्यात आले आहे?

एकमेकांवर अवलंबून असणाऱ्‍या मानवी शरीराच्या विविध अंगांप्रमाणेच ख्रिस्ती बांधवांनाही एकमेकांची गरज आहे. प्रेषित पौलाने आत्म्याने अभिषिक्‍त असलेल्या सह विश्‍वासू बांधवांना सांगितले: “लबाडी सोडून देऊन तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या शेजाऱ्‍याबरोबर खरे बोला, कारण आपण एकमेकांचे अवयव आहो.” (इफिसकर ४:२५) ‘ख्रिस्ताचे शरीर’ अर्थात आत्मिक इस्राएलचे सदस्य ‘एकमेकांचे आहेत,’ आणि म्हणूनच ते एकमेकांशी प्रामाणिकपणे सुसंवाद करतात आणि एकमेकांना पूर्ण सहकार्य देतात. होय, त्यांच्यातील प्रत्येक सदस्य इतर सर्वांचा आहे. (इफिसकर ४:११-१३) पृथ्वीवरील जीवनाची आशा असलेले विश्‍वासू ख्रिस्ती देखील त्यांना पूर्ण सहकार्य देऊन आनंदाने त्यांच्यासोबत कार्य करतात.

४. नवीन लोकांना कोणकोणत्या मार्गांनी आपण मदत करू शकतो?

दर वर्षी, पृथ्वीवरील परादीसात जगण्याची आशा असलेल्या हजारो जणांचा बाप्तिस्मा होतो. मंडळीतील इतर सदस्य त्यांना ‘प्रौढतेप्रत जाण्याकरता’ आनंदाने साहाय्य करतात. (इब्री लोकांस ६:१-३) कधी बायबलमधून त्यांच्या प्रश्‍नांची उत्तरे देण्याद्वारे तर कधी सेवाकार्यात व्यावहारिक मार्गाने त्यांना मदत करण्याद्वारे ते असे करतात. आपण ख्रिस्ती सभांमध्ये नियमित सहभाग घेण्याच्या बाबतीत उत्तम उदाहरण ठेवण्याद्वारेही नव्या लोकांना मदत करू शकतो. त्यांच्यावर कठीण प्रसंग येतात तेव्हा, आपण त्यांना प्रोत्साहन किंवा सांत्वन देऊ शकतो. (१ थेस्सलनीकाकर ५:१४, १५) इतरांना ‘सत्यात चालण्याकरता’ मदत करण्याचे आपण मार्ग शोधले पाहिजेत. (३ योहान ४) आपण तरुण असो वा वयस्क, सत्याच्या मार्गात नुकतेच पदार्पण केलेले असोत वा अनेक वर्षांपासून या मार्गात चालणारे असोत, आपण सर्वजण आपल्या सहविश्‍वासू बांधवांच्या आध्यात्मिक प्रगतीला हातभार लावू शकतो—आणि त्यांना निश्‍चितच आपली गरज आहे.

त्यांनी मदतीचा हात पुढे केला

५. अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी पौलाला कशाप्रकारे साहाय्य केले?

ख्रिस्ती विवाहित जोडपी सहविश्‍वासू बांधवांना मदत करण्याद्वारे समाधान मिळवू शकतात. उदाहरणार्थ, अक्विल्ला व प्रिस्किल्ला (प्रिस्का) यांनी पौलाला मदत पुरवली. त्यांनी आपल्या घरात त्याचे स्वागत केले, त्याच्यासोबत तंबू बनवण्याचे काम केले आणि त्याला करिंथ येथे नवी मंडळी स्थापन करण्यास मदत केली. (प्रेषितांची कृत्ये १८:१-४) त्यांनी पौलाकरता आपला जीवही धोक्यात घातला; अर्थात हे नेमके कशाप्रकारे घडले हे स्पष्ट सांगितलेले नाही. ते रोममध्ये राहात होते तेव्हा पौलाने तेथे राहणाऱ्‍या बांधवांना असे सांगितले: “ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला ह्‍यांना सलाम सांगा; त्यांनी माझ्या जिवाकरिता आपला जीव धोक्यात घातला. त्यांचे आभार केवळ मीच मानतो असे नव्हे तर परराष्ट्रीयांच्या सर्व मंडळ्याहि मानतात.” (रोमकर १६:३, ४) अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांच्या पावलावर पाऊल ठेवून आधुनिक काळातही काही ख्रिस्ती, मंडळ्यांना व सहविश्‍वासू बांधवांना अनेक प्रकारे उत्तेजन देतात; कधीकधी तर, देवाच्या इतर सेवकांना क्रूर छळाला किंवा दुष्ट नराधमांच्या हातून मृत्यूला तोंड द्यावे लागू नये म्हणून ते स्वतःचा जीव धोक्यात घालतात.

६. अपुल्लोला कशाप्रकारे मदत देण्यात आली?

अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी इफिसकरांना येशू ख्रिस्ताविषयी अत्यंत कुशलतेने शिकवणाऱ्‍या अपुल्लो या ख्रिस्ती बांधवालाही मदत केली. त्या वेळी, अपुल्लो याला नियमशास्त्राच्या कराराविरुद्ध केलेल्या पापांबद्दल पश्‍चात्तापाकरता केवळ योहानाच्या बाप्तिस्म्याविषयी माहिती होती. अपुल्लोला मदतीची गरज आहे हे ओळखून अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांनी “त्याला देवाचा मार्ग अधिक स्पष्टपणे दाखविला.” कदाचित त्यांनी त्याला समजावून सांगितले असेल, की ख्रिस्ती बाप्तिस्म्यात पाण्याखाली पूर्णपणे बुडवणे आणि पवित्र आत्म्याचे दान मिळणे अंतर्भूत आहे. अपुल्लोने ही नवीन माहिती स्वीकारली. नंतर अखया प्रांतात “ज्यांनी कृपेच्या द्वारे विश्‍वास ठेवला होता त्यांना त्याने फार साहाय्य केले. कारण येशू हाच ख्रिस्त आहे, असे शास्त्रावरून दाखवून तो मोठ्या जोरदारपणाने सर्वांसमक्ष यहूद्यांचे खंडण करीत असे.” (प्रेषितांची कृत्ये १८:२४-२८) सहविश्‍वासू बांधवांनी सभांमध्ये दिलेली उत्तरे बऱ्‍याचदा आपल्याला देवाचे वचन अधिक चांगल्याप्रकारे समजण्यास मदत करतात. या बाबतीतही आपल्याला एकमेकांची गरज आहे.

भौतिक मदत पुरवणे

७. सहविश्‍वासू बांधव भौतिकरित्या गरजेत होते तेव्हा फिलिप्पैकरांनी काय केले?

फिलिप्पै येथील ख्रिस्ती मंडळीतील सदस्यांचे पौलावर खूप प्रेम होते आणि तो थेस्सलनीकात राहात असताना ते त्याच्या गरजेच्या वस्तू त्याला पाठवत असत. (फिलिप्पैकर ४:१५, १६) जेरूसलेमच्या बांधवांना गरज होती तेव्हा फिलिप्पैकरांनी ऐपत नसतानाही त्यांच्याकरता देणग्या देण्याची तयारी दाखवली. फिलिप्पै येथील बांधवांच्या या उत्तम मनोवृत्तीची पौलाने मनापासून कदर केली; त्याने इतर बांधवांना त्यांच्या आदर्शाचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला.—२ करिंथकर ८:१-६.

८. एपफ्रदीताने कशी मनोवृत्ती दाखवली?

पौल बंदिवासात होता, तेव्हा फिलिप्पैकरांनी त्याला केवळ भौतिक दानच नव्हेत तर आपला वैयक्‍तिक दूत एपफ्रदीत यालाही त्याच्याकडे पाठवले. पौलाने त्याच्याविषयी म्हटले: “माझी सेवा करण्यात तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्तसेवेसाठी [एपफ्रदीताने] आपला जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.” (फिलिप्पैकर २:२५-३०; ४:१८) एपफ्रदीत हा वडील होता अथवा सेवा सेवक हे आपल्याला सांगण्यात आलेले नाही. पण तो एक स्वार्थत्यागी मनोवृत्तीचा व इतरांना साहाय्य करण्यास उत्सुक असा ख्रिस्ती होता आणि पौलाला खरोखरच त्याची गरज होती. तुमच्या मंडळीतही एपफ्रदीतासारखा कोणी बांधव आहे का?

ते “आधार” होते

९. अरिस्तार्खने आपल्याकरता कोणता आदर्श ठेवला?

अक्विल्ला, प्रिस्किल्ला आणि एपफ्रदीत यांच्यासारख्या प्रेमळ भाऊ बहिणींची कोणत्याही मंडळीत मनापासून कदर केली जाते. आपले काही बांधव पहिल्या शतकातील अरिस्तार्ख नावाच्या ख्रिस्ती बांधवासारखे असू शकतात. तो व इतर काही जण आपले “आधार” आहेत असे पौलाने म्हटले; कदाचित त्यांनी पौलाला सांत्वन किंवा दैनंदिन कार्यांत व्यावहारिक मार्गांनी मदत केली असेल. (कलस्सैकर ४:१०, ११, ईझी-टू-रीड व्हर्शन) पौलाला मदत करण्याद्वारे अरिस्तार्ख कठीण काळात एक खरा मित्र ठरला. नीतिसूत्रे १७:१७ येथे वर्णन केलेल्या व्यक्‍तीसारखा तो ठरला: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.” आपण सर्वांनी देखील सहविश्‍वासू बांधवांचा “आधार” होण्याचा प्रयत्न करू नये का? खासकरून, संकटांना तोंड देणाऱ्‍यांच्या मदतीला आपण धावून गेले पाहिजे.

१०. पेत्राने ख्रिस्ती वडिलांकरता कोणता आदर्श मांडला?

१० विशेषतः ख्रिस्ती वडिलांनी आपल्या आध्यात्मिक बंधू भगिनींचा आधार होणे महत्त्वाचे आहे. ख्रिस्ताने प्रेषित पेत्राला सांगितले: “तुझ्या भावांस स्थिर कर.” (लूक २२:३२) पेत्र असे करू शकला कारण त्याने, विशेषतः येशूच्या पुनरुत्थानानंतर एखाद्या भक्कम दुर्गासारखे गुण प्रदर्शित केले. वडिलांनो, स्वेच्छेने आणि कोमलतेने असे करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा कारण तुमच्या सहविश्‍वासू बांधवांना तुमची गरज आहे.—प्रेषितांची कृत्ये २०:२८-३०; १ पेत्र ५:२, ३.

११. तीमथ्याच्या मनोवृत्तीविषयी मनन केल्यामुळे आपण काय शिकू शकतो?

११ पौलाच्या प्रवासातला सोबती तीमथ्य एक वडील होता आणि त्याला बांधवांबद्दल मनापासून कळकळ होती. त्याला स्वतःला काही आरोग्याच्या समस्या होत्या पण तरीसुद्धा त्याने मनःपूर्वक व दृढ विश्‍वासाने “सुवार्तेसाठी [पौलाबरोबर] सेवा केली.” म्हणूनच प्रेषित पौल फिलिप्पैकरांना असे म्हणू शकला की, “तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही.” (फिलिप्पैकर २:२०, २२; १ तीमथ्य ५:२३; २ तीमथ्य १:५) तीमथ्यासारखी मनोवृत्ती बाळगली, तर आपल्यासोबत यहोवाची उपासना करणाऱ्‍या आपल्या बांधवांकरता आपणही एक आशीर्वाद ठरू शकतो. अर्थात आपल्याला स्वतःचा मानवसुलभ कमकुवतपणा आणि विविध परीक्षांना तोंड द्यावे लागते; पण आपणही दृढ विश्‍वास आणि आपल्या आध्यात्मिक बंधुभगिनींबद्दल मनःपूर्वक काळजी दाखवू शकतो, नव्हे आपण दाखवली पाहिजे. त्यांना आपली गरज आहे हे आपण नेहमी आठवणीत असू द्यावे.

इतरांची काळजी घेणाऱ्‍या स्त्रिया

१२. दुर्कसच्या उदारणावरून आपण काय शिकू शकतो?

१२ इतरांची काळजी घेणाऱ्‍या देवभीरू स्त्रियांपैकी एक होती दुर्कस. तिचा मृत्यू झाला तेव्हा शिष्यांनी पेत्राला बोलावून घेतले आणि त्याला माडीवरच्या खोलीत नेले. तेथे “सर्व विधवा रडत उभ्या राहिल्या आणि दुर्कस त्यांच्याबरोबर होती तेव्हा ती जे अंगरखे व जी वस्त्रे करीत असे ती त्यांनी त्याला दाखवली.” दुर्कसचे पुनरुत्थान करण्यात आले आणि पुढेही ती “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर” राहिली असेल यात शंका नाही. आजच्या ख्रिस्ती मंडळीत दुर्कससारख्या स्त्रिया आहेत ज्या गरजू बांधवांकरता कपडे शिवत असतील किंवा इतर प्रेमळ मार्गांनी त्यांना मदत करत असतील. अर्थात त्यांची सत्कृत्ये प्रथमतः राज्याच्या वाढीसाठी आणि शिष्य बनवण्याच्या कार्यासाठी आहेत.—प्रेषितांची कृत्ये ९:३६-४२; मत्तय ६:३३; मत्तय २८:१९, २०.

१३. लुदियाने सह-ख्रिस्ती बांधवांबद्दल वाटणारी काळजी कशी व्यक्‍त केली?

१३ आणखी एक देवभीरू स्त्री जी इतरांची काळजी घेत असे, तिचे नाव लुदिया. सा.यु. ५० च्या सुमारास पौल फिलिप्पै शहरात प्रचार करण्यास आला तेव्हा मुळात थुवतीरा नगराची ही स्त्री तेथे राहात होती. लुदिया ही यहुदी मतानुसारी असावी, पण फिलिप्पै शहरात फार कमी यहुदी होते आणि सभास्थान तर नव्हतेच. लुदिया व इतर भक्‍तिमान स्त्रिया नदीकाठी उपासनेकरता एकत्र आल्या असताना प्रेषित पौलाने त्यांना सुवार्ता सांगितली. अहवालात असे म्हटले आहे: “तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले; मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, मी प्रभूवर विश्‍वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहा तर माझ्या घरी येऊन राहा. तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली.” (प्रेषितांची कृत्ये १६:१२-१५) लुदियाला इतरांकरता काही चांगले करण्याची इतकी उत्सुकता होती की तिने पौल व त्याच्या सोबत्यांना तिच्या घरी येऊन राहण्याचा आग्रह केला. प्रेमळ ख्रिस्ती अशाप्रकारे पाहुणचार दाखवतात तेव्हा आपण त्याची किती कदर बाळगतो!—रोमकर १२:१३; १ पेत्र ४:९.

तुम्हा बालकांचीही आम्हाला गरज आहे

१४. येशू ख्रिस्त लहान मुलांशी कसा वागला?

१४ ख्रिस्ती मंडळीची सुरवात देवाचा प्रेमळ, मायाळू पुत्र येशू ख्रिस्त याने केली होती. लोकांना त्याच्या सहवासात भीती वाटत नसे कारण तो प्रेमळ आणि सहानुभूतिशील होता. एकदा, काही लोक आपल्या बालकांना येशूजवळ आणू लागले तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यांना तेथून घालवून देण्याचा प्रयत्न केला. पण येशूने म्हटले: “बाळकांस माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी बाळकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही.” (मार्क १०:१३-१५) देवाच्या राज्याचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपण लहान मुलांप्रमाणे नम्र आणि ग्रहणशील असले पाहिजे. येशूने लहान मुलांना आपल्या जवळ घेऊन व त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्याविषयी प्रेम व्यक्‍त केले. (मार्क १०:१६) आज तुम्हा लहान बाळकांबद्दल काय? मंडळीत सर्वांचे तुमच्यावर प्रेम आहे आणि मंडळीला तुमचीही गरज आहे हे कधीही विसरू नका.

१५. लूक २:४०-५२ येथे येशूच्या जीवनाविषयी कोणती माहिती देण्यात आली आहे, आणि लहान मुलांकरता त्याने कोणता आदर्श घालून दिला आहे?

१५ लहान वयातच येशूने देवाविषयी व शास्त्रवचनांविषयी आवड असल्याचे दाखवले. तो १२ वर्षांचा असताना तो मरीया व योसेफ या त्याच्या आईवडिलांसोबत त्यांचे गाव नासरेथ येथून जेरूसलेमला वल्हांडण सणाकरता गेला. परत येताना मध्येच येशूच्या आईवडिलांना लक्षात आले की तो त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्‍या लोकांच्या समूहात नव्हता. त्याचा शोध घेतल्यावर शेवटी तो त्यांना मंदिराच्या यहुदी गुरूजनांमध्ये बसून त्यांना प्रश्‍न विचारताना आढळला. आपण मंदिरातच असू हे योसेफ व मरीया यांनी कसे ओळखले नाही याचे आश्‍चर्य वाटून तो त्यांना म्हणाला: “माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?” तो आपल्या आईवडिलांच्या सोबत घरी गेला, त्यांच्या आज्ञेत राहिला आणि बुद्धीने व शरीराने वाढत गेला. (लूक २:४०-५२) आपल्यामध्ये असलेल्या लहान मुलांकरता येशूने किती उत्तम उदाहरण मांडले! त्यांनी देखील त्याच्यासारखेच आपल्या आईवडिलांच्या आज्ञांचे पालन करून आध्यात्मिक गोष्टी शिकून घेण्यास उत्सुक असले पाहिजे.—अनुवाद ५:१६; इफिसकर ६:१-३.

१६. (अ) येशू मंदिरात साक्ष देत होता तेव्हा काही मुलांनी काय म्हणून गजर केला? (ब) लहान ख्रिस्ती मुलांना आज कोणती महान सुसंधी आहे?

१६ बालक या नात्याने तुम्ही शाळेत व आपल्या आईवडिलांसोबत घरोघरच्या सेवाकार्यात यहोवाविषयी साक्ष देत असाल. (यशया ४३:१०-१२; प्रेषितांची कृत्ये २०:२०, २१) येशू आपल्या मृत्यूच्या काही काळाआधी मंदिरात साक्ष देत होता आणि लोकांचे आजार बरे करत होता, तेव्हा काही मुलांनी त्याला पाहून असे म्हणून गजर केला: “दाविदाच्या पुत्राला होसान्‍ना!” हे ऐकून मुख्य याजक व शास्त्री रागावले आणि त्याला म्हणाले: “ही काय म्हणतात हे तू ऐकतोस काय?” येशूने उत्तर दिले, “हो, बाळके व तान्ही मुले ह्‍यांच्या मुखातून तू स्तुति पूर्ण करविली आहे हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?” (मत्तय २१:१५-१७) त्या मुलांप्रमाणेच मंडळीतल्या तुम्हा लहान मुलांना देखील देवाची व त्याच्या पुत्राची स्तुती करण्याची बहुमोल सुसंधी आहे. राज्य प्रचारक या नात्याने तुम्ही आमच्या सोबत कार्य करावे असे आम्हाला मनापासून वाटते, आम्हाला तुमची गरज आहे.

संकटे येतात तेव्हा

१७, १८. (अ) पौलाने यहुदियातील ख्रिस्ती बांधवांकरता वर्गणी गोळा करण्याची व्यवस्था का केली? (ब) यहुदीयातील विश्‍वासू बांधवांकरता गोळा केलेल्या ऐच्छिक अनुदानांमुळे यहुदी व गैरयहुदी ख्रिश्‍चनांवर काय परिणाम झाला?

१७ आपली परिस्थिती कशीही असो, पण खरे प्रेम आपल्याला कठीण प्रसंगांना तोंड देणाऱ्‍या आपल्या सह-ख्रिश्‍चनांना मदत करण्यास प्रेरित करेल. (योहान १३:३४, ३५; याकोब २:१४-१७) यहुदिया येथील बंधू-भगिनींबद्दल वाटणाऱ्‍या प्रेमामुळेच पौलाने त्यांच्याकरता अखया, गलतिया, मासेदोनिया आणि आशिया प्रांतात वर्गणी गोळा करण्याची व्यवस्था केली. जेरुसलेममधील शिष्यांवर छळ, दंगली आणि दुष्काळ यांसारख्या परीक्षा आल्यामुळेच कदाचित पौलाने त्यांना ‘दुःख,’ “संकटे” आणि “मालमत्तेची हानी” सोसावी लागली असे म्हटले असावे. (इब्री लोकांस १०:३२-३४; प्रेषितांची कृत्ये ११:२७–१२:१) म्हणूनच त्याने यहुदिया येथील गरीब बांधवांकरता एक निधी उभारण्याची तरतूद केली.—१ करिंथकर १६:१-३; २ करिंथकर ८:१-४, १३-१५; ९:१, २,.

१८ यहुदियातील पवित्र जनांकरता देण्यात आलेल्या ऐच्छिक देणग्यांमुळे हे साबीत झाले की यहोवाच्या यहुदी व गैरयहुदी उपासकांमध्ये एक बंधुत्वाचे नाते होते. या देणग्या देण्याद्वारे गैरयहुदी ख्रिश्‍चनांना त्यांच्या यहुदी सहउपासकांकडून मिळालेल्या आध्यात्मिक आशीर्वादांबद्दल कृतज्ञता दाखवण्याची चांगली संधी मिळाली. अशारितीने भौतिक व आध्यात्मिक या दोन्ही गोष्टींचे आदानप्रदान झाले. (रोमकर १५:२६, २७) आजही गरजू बांधवांकरता दिल्या जाणाऱ्‍या देणग्या पूर्णतः ऐच्छिक आणि प्रेमाने प्रवृत्त होऊन दिलेल्या असतात. (मार्क १२:२८-३१) या बाबतीतही आपल्याला एकमेकांची गरज आहे जेणेकरून समानता व्हावी आणि ‘ज्याने थोडे गोळा केले त्याचे काही कमी भरू नये.’—२ करिंथकर ८:१५.

१९, २०. विपत्ती येते तेव्हा यहोवाचे लोक कशाप्रकारे मदत पुरवतात याचे एक उदाहरण द्या.

१९ ख्रिश्‍चनांना एकमेकांची गरज आहे याची जाणीव ठेवून आपण विश्‍वासातल्या आपल्या बांधवांच्या मदतीला लगेच धावून येतो. उदाहरणार्थ, २००१ सालाच्या सुरवातीला एल साल्व्हाडोर येथे विनाशकारक भूकंप व भूघसरणी झाल्या तेव्हा काय घडले हे विचारात घ्या. एका वृत्तानुसार: “एल साल्व्हाडोरच्या सर्व भागांतील बांधवांनी साहाय्य पुरवले. ग्वातेमाला, अमेरिका आणि कॅनडाचे बांधवही आमच्या मदतीला आले. . . . फार कमी काळात ५०० पेक्षा जास्त घरे आणि ३ आकर्षक राज्य सभागृहे बांधण्यात आली. या आत्मत्यागी बांधवांच्या मेहनतीमुळे आणि सहकार्यामुळे फार मोठ्या प्रमाणात साक्ष देण्यात आली आहे.”

२० दक्षिण आफ्रिकेतील एका वृत्तानुसार: “मोझांबिकच्या बऱ्‍याच भागांना यंदा भयानक पुराचा तडाखा बसला आणि बऱ्‍याच ख्रिस्ती बांधवांनाही या विपत्तीचा परिणाम भोगावा लागला. मोझांबिकच्या शाखा दफ्तराने त्यांच्या बहुतेक गरजा भागवण्याची व्यवस्था केली. पण या गरजू बांधवांकरता चांगल्या स्थितीत असलेले वापरलेले कपडे पाठवावेत अशी आम्हाला त्यांनी विनंती केली. मोझांबिकच्या या बांधवांना पाठवण्याकरता आम्ही १२ मीटर लांबीचा कंटेनर भरून कपडे गोळा केले.” होय, या मार्गांनीही आपल्याला एकमेकांची गरज पडते.

२१. पुढील लेखात कशाविषयी चर्चा केली जाईल?

२१ आधी सांगितल्याप्रमाणे मानवी शरीरातील सर्व अवयव महत्त्वाचे आहेत. हेच ख्रिस्ती मंडळीच्या बाबतीतही खरे आहे. सर्व सदस्यांना एकमेकांची गरज आहे. त्यांनीही एकतेने कार्य करणे महत्त्वाचे आहे. हे कशामुळे शक्य होते याविषयी पुढील लेखात चर्चा केली जाईल.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• मानवी शरीर आणि ख्रिस्ती मंडळी यात काय साम्य आहे?

• सहविश्‍वासू बांधवांना भौतिक गरज होती तेव्हा आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी काय केले?

• ख्रिस्ती बांधवांना एकमेकांची गरज आहे आणि ते एकमेकांना साहाय्य करतात हे कोणत्या शास्त्रवचनीय उदाहरणांवरून दिसून येते?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१० पानांवरील चित्र]

अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांना इतरांची काळजी होती

[१२ पानांवरील चित्रे]

विपत्ती आल्यास, यहोवाचे लोक एकमेकांना व इतरांना मदत करतात