उपासना स्थळे आवश्यक आहेत का?
उपासना स्थळे आवश्यक आहेत का?
‘रंगीबेरंगी कपडे घालून देशाच्या विविध भागांतून आलेले हजारो भक्त, ढोलांच्या तालावर तथाकथित पूर्व-हिस्पॅनिक नृत्य करणारे इंडियन जमातीचे गट आणि जमावामधून मोठ्या मुश्कीलीने गुडघ्यांवर पुढे सरकत पूज्य स्थळी जाणारे धार्मिक ख्रिस्ती यांनी अंगण आणि बॅसिलिकाभोवतालचे रस्ते खचाखच भरले होते.’
असे एल इकोनोमिस्टा या बातमीपत्राने डिसेंबर २००१ सालाच्या जमावाचे वर्णन केले. त्या वेळी, सुमारे ३० लाख लोकांनी ग्वादलूपची कुमारी हिच्यावरील आपला विश्वास प्रदर्शित करायला मेक्सिको सिटीतील बॅसिलिकाला भेट दिली होती. रोममधील सेंट पीटर्स बॅसिलिका येथेही भक्तांची गर्दी जमते.
देवाची उपासना करण्याची इच्छा असलेल्या असंख्य लोकांना धार्मिक इमारतींबद्दल विशेष आदर वाटतो. ब्राझीलची मारिया म्हणते, “चर्चमध्ये गेल्यावर मला देवाच्या सान्निध्यात आल्यासारखे वाटायचे. ते एक पवित्र ठिकाण होते. माझा असा विश्वास होता की, चर्चला गेल्यावर आत्मा शुद्ध केला जातो आणि मासला गेले नाही व दर रविवारी पापांची कबुली दिली नाही तर मोठे पाप असते.” मेक्सिकोतील कॉन्स्वेलो म्हणते: “चर्चमध्ये पाऊल ठेवताच माझं अंतःकरण भरून यायचं; चर्चबद्दल माझ्या मनात खूप आदर होता. तिथं असताना मी जणू स्वर्गात आहे असं मला वाटायचं.”
काही लोकांना चर्चेस फार महत्त्वाची ठिकाणे वाटतात, पण इतरांना, उपासनेची स्थळे म्हणून त्यांची खरोखर आवश्यकता आहे का असे वाटते. चर्चमधील कमी उपस्थितीबद्दल पीटर सीबर्ट हे इंग्लंडमधील एक कॅथलिक पाळक म्हणतात: “[लोक] धर्मामधील आपल्या आवडीचे भाग निवडतात. पुष्कळसे म्हातारे लोक कॅथलिक आहेत आणि ते आपल्या विश्वासाप्रमाणे जीवन जगतात—पण तरुणांमध्ये ती कर्तव्याची भावना नाही.” लंडन येथील नोव्हेंबर २०, १९९८ च्या डेली टेलीग्राफमध्ये असे निरीक्षण करण्यात आले होते: “१९७९ सालापासून, नव्याने
सुरू करण्यात आलेल्या ४९५ व पुनर्बांधणी करण्यात आलेल्या १५० चर्चेसच्या तुलनेत १,५०० चर्चेस बंद पडली आहेत.”१९९७ साली, जर्मनीतील म्युनिक येथील झुएटडोईश झीटुंग बातमीपत्राने असा अहवाल दिला: “सिनेमागृहे आणि अपार्टमेंटमध्ये चर्चेसचे रूपांतर: भक्त राहिले नाहीत, उपासना स्थळांचे रूपांतर होत आहे. . . . नेदरलंड किंवा इंग्लंडमध्ये सर्वसामान्य बनलेली गोष्ट आता जर्मनीत होत आहे.” त्यात पुढे म्हटले होते: “गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये जर्मनीत सुमारे ३० किंवा ४० चर्चेसची विक्री झाल्याची उल्लेखनीय गोष्ट दिसून येते.”
देवाच्या उपासनेकरता धार्मिक इमारती खरोखर आवश्यक आहेत का? बॅसिलिका आणि शोभायमान चर्चेससारख्या इमारतींविषयी शास्त्रवचनांमध्ये काही उदाहरणे आहेत का? खऱ्या आणि जिवंत देवाच्या उपासनेकरता कोणत्या इमारतींचा उपयोग केला जात होता? त्यावरून उपासना स्थळांच्या गरजेविषयी आणि तेथे काय चालावे याविषयी आपल्याला काय शिकायला मिळते?