व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

एकत्र येणे सोडू नका

एकत्र येणे सोडू नका

एकत्र येणे सोडू नका

“आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा,” असे शास्त्रवचने म्हणतात. (इब्री लोकांस १०:२५) स्पष्टतः, “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष” देण्याकरता खऱ्‍या उपासकांवर एखाद्या उपासना स्थळी एकत्र जमण्याचे कर्तव्य आहे.—इब्री लोकांस १०:२४.

प्रेषित पौलाने वरील शब्द आपल्या सामान्य युगातील पहिल्या शतकात लिहिले तेव्हा, जेरूसलेममधील एक शानदार मंदिर यहूद्यांचे उपासना स्थळ होते. सभास्थाने देखील होती. येशूने “सभास्थानांत व मंदिरात सर्व यहूदी जमतात तेथे . . . शिक्षण दिले” होते.—योहान १८:२०.

पौलाने ख्रिश्‍चनांना एकमेकांना उत्तेजन देण्याकरता एकत्र यावे असे आर्जवले तेव्हा त्याच्या मनात एकत्र येण्याची कोणती ठिकाणे होती? ख्रिस्ती धर्मजगतातील धार्मिक इमारतींचे एखादे उदाहरण जेरूसलेममधील मंदिराच्या व्यवस्थेत दिसून येते का? तथाकथित ख्रिश्‍चनांना भव्य धार्मिक इमारतींची ओळख केव्हा करून देण्यात आली?

‘देवाच्या नामाप्रीत्यर्थ मंदिर’

देवाची उपासना करण्याच्या स्थळाविषयी, बायबलमधील निर्गम या पुस्तकात सर्वात पहिल्यांदा सूचना आढळतात. यहोवा देवाने त्याच्या निवडलेल्या लोकांना—इस्राएलांना—“निवासमंडप” किंवा “दर्शनमंडप” बांधण्याची सूचना दिली. कराराचा कोश आणि इतर अनेक पवित्र पात्रे तेथे ठेवायची होती. सा.यु.पू. १५१२ मध्ये बांधकाम पूर्ण झाल्यावर “परमेश्‍वराच्या तेजाने निवासमंडप भरून गेला.” तो वाहून नेता येण्याजोगा मंडप चारपेक्षा अधिक शतकांपर्यंत देवासन्मुख जाण्याच्या त्याच्या व्यवस्थेतील प्रमुख माध्यम होता. (निर्गम, अध्याय २५-२७; ४०:३३-३८) बायबलमध्ये या मंडपाला ‘परमेश्‍वराचे मंदिर’ म्हटले आहे.—१ शमुवेल १:९, २४.

नंतर, दावीद जेरूसलेममध्ये राजा बनला तेव्हा त्याने यहोवाच्या गौरवासाठी एक कायमचे मंदिर बांधण्याची तीव्र इच्छा प्रकट केली. परंतु, दावीद हा शूर योद्धा असल्यामुळे यहोवाने त्याला म्हटले: ‘तू माझ्या नामाने मंदिर बांधणार नाहीस.’ उलट, त्याने दावीदाचा पुत्र शलमोन याला आपले मंदिर बांधायला निवडले. (१ इतिहास २२:६-१०) सा.यु.पू. १०२६ मध्ये साडे सात वर्षांच्या बांधकामानंतर शलमोनाने मंदिराचे उद्‌घाटन केले. आणि यहोवाने या मंदिराबद्दल आपली पसंती व्यक्‍त करून म्हटले: “हे जे मंदिर तू बांधिले आहे त्यास माझे नाम सर्वकाळ राहावे म्हणून मी ते पवित्र केले आहे; माझी दृष्टि व माझे चित्त त्यावर सतत राहील.” (१ राजे ९:३) इस्राएली लोक विश्‍वासू राहतील तोपर्यंत देव त्या मंदिरावर आपली पसंती दाखवणार होता. पण ते योग्य मार्गापासून बहकले तर यहोवा त्या ठिकाणावरून त्याची पसंती काढून घेणार होता आणि ‘ते मंदिर उद्‌ध्वस्त होणार होते.’—१ राजे ९:४-९; २ इतिहास ७:१६, १९, २०.

कालांतराने, इस्राएली लोक खऱ्‍या उपासनेपासून दूर गेले. (२ राजे २१:१-५) “[यहोवाने] त्यांजवर खास्द्यांच्या राजाची स्वारी आणिली; . . . त्याने देवाचे मंदिर जाळून टाकिले, यरुशलेमेचा कोट पाडून टाकिला, तेथले वाडे आग लावून जाळिले व त्यातल्या सर्व चांगल्या पात्रांचा नाश केला. जे तरवारींच्या तडाख्यातून चुकून राहिले त्या सर्वांस तो राजा बाबेलास घेऊन गेला; पारसाचे राज्य स्थापित होईपर्यंत ते त्याचे व त्याच्या वंशजांचे दास होऊन राहिले.” बायबलप्रमाणे ही घटना सा.यु.पू. ६०७ मध्ये घडली.—२ इतिहास ३६:१५-२१; यिर्मया ५२:१२-१४.

यशया संदेष्ट्याने भाकीत केल्याप्रमाणे, देवाने बॅबिलोनच्या सत्तेपासून यहूद्यांची सुटका करण्यासाठी पर्शियाचा राजा कोरेश याला उभे केले. (यशया ४५:१) ७० वर्षे बंदिवासात राहिल्यावर, सा.यु.पू. ५३७ मध्ये ते मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी जेरूसलेमला परतले. (एज्रा १:१-६; २:१, २; यिर्मया २९:१०) बांधकामात दिरंगाई झाली आणि सरतेशेवटी सा.यु.पू. ५१५ साली ते पूर्ण झाले आणि देवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू झाली. हे बांधकाम शलमोनाच्या मंदिराइतके भव्यदिव्य नव्हते तरी ते सुमारे ६०० वर्षे टिकले. परंतु, या मंदिराची देखील अनावस्था झाली कारण इस्राएली लोकांनी यहोवाच्या उपासनेकडे दुर्लक्ष केले. येशू ख्रिस्त पृथ्वीवर आला तेव्हा राजा हेरोद त्या मंदिराची हळूहळू डागडुजी करून घेत होता. या मंदिराचे भविष्य काय होते?

‘चिऱ्‍यावर चिरा राहणार नाही’

जेरूसलेममधील मंदिराविषयी बोलत असताना येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “येथे चिऱ्‍यावर असा एकहि चिरा राहणार नाही की जो पाडला जाणार नाही.” (मत्तय २४:१, २) या शब्दांच्या एकवाक्यतेत, शतकानुशतके देवाच्या उपासनेचे केंद्रस्थान म्हणून ओळखले जाणारे ते ठिकाण, यहूद्यांचा विद्रोह मिटवण्यासाठी आलेल्या रोमी सैन्याने सा.यु. ७० मध्ये उद्‌ध्वस्त करून टाकले. * त्या मंदिराची पुनर्बांधणी कधीच झाली नाही. सातव्या शतकात, यहूद्यांच्या पूर्वीच्या उपासना स्थळाच्या ठिकाणी डोम ऑफ द रॉक ही मुस्लिमांची मस्जिद बांधण्यात आली आणि ती आजही अस्तित्वात आहे.

येशूच्या अनुयायांकरता उपासनेची कोणती व्यवस्था होती? यहुदी पार्श्‍वभूमी असलेले प्रारंभिक ख्रिस्ती, लवकरच नष्ट होणाऱ्‍या मंदिरात देवाची उपासना करणार होते का? गैर-यहुदी ख्रिस्ती देवाची उपासना कोठे करणार होते? ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक इमारती मंदिराची जागा घेणार होत्या का? एका शोमरोनी स्त्रीसोबत येशूचा जो संवाद झाला त्यावरून आपल्याला या बाबीसंबंधी समज मिळू शकते.

अनेक शतकांपासून शोमरोनी लोक शोमरोन येथील गेरीझीम पर्वतावरील एका मोठ्या मंदिरात देवाची उपासना करत आले होते. शोमरोनी स्त्री येशूला म्हणाली, “आमच्या पूर्वजांनी ह्‍याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे.” याच्या उत्तरात येशू म्हणाला: “बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्‍या डोंगरावर व यरुशलेमेतहि करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान.” यहोवाची उपासना करण्यासाठी मंदिराची इमारत लागणार नव्हती, कारण येशूने पुढे म्हटले: “देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.” (योहान ४:२०, २१, २४) प्रेषित पौलाने नंतर अथेनैकरांना सांगितले: “ज्या देवाने जग व त्यांतले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभु असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही.”—प्रेषितांची कृत्ये १७:२४.

यावरून स्पष्ट होते की, ख्रिस्ती धर्मजगताच्या धार्मिक इमारतींचा, ख्रिस्त-पूर्व काळातील मंदिराच्या व्यवस्थेशी काहीही संबंध नव्हता. शिवाय, पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांना अशा स्थळांची निर्मिती करण्याचे काहीच कारण नव्हते. परंतु, प्रेषितांच्या मृत्यूनंतर, पूर्वभाकीत केल्याप्रमाणे खऱ्‍या शिकवणींपासून बहकणे अर्थात धर्मत्याग घडला. (प्रेषितांची कृत्ये २०:२९, ३०) सा.यु. ३१३ साली, रोमन सम्राट कॉन्स्टंटाईनने ख्रिस्ती धर्म स्वीकारला असे म्हणतात; त्याच्या कित्येक वर्षांआधीपासूनच तथाकथित ख्रिस्ती येशूच्या शिकवणींपासून बहकले होते.

मूर्तिपूजक रोमन धर्म आणि “ख्रिस्ती धर्म” यांच्यात मिलाफ करण्यात कॉन्स्टंटाईनने हातभार लावला. दि एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका म्हणतो: “स्वतः कॉन्स्टंटाईनने रोममध्ये, सेंट पीटर, एस. पाओलो फ्युओरी ला म्युरा आणि एस. जोव्हानी इन लातेरानो या तीन भव्य ख्रिस्ती बॅसिलिकांच्या बांधकामाचे काम नेमले होते. त्याने . . . क्रॉसच्या आकाराची इमारतीची रूपरेषा निर्माण केली आणि तेच सबंध मध्ययुगात पश्‍चिम युरोपमधल्या चर्चेसचे प्रमाण ठरले.” आजही रोममधील पुनर्बांधणी केलेली सेंट पीटर्स बॅसिलिका, रोमन कॅथलिक चर्चचे प्रमुख स्थान समजले जाते.

“ख्रिस्त-पूर्व [मूर्तिपूजक] रोममधील काही सामान्य उपासना पद्धती आणि प्रकार चर्चने आत्मसात केले,” असे इतिहासकार विल ड्यूरंट म्हणतात. यामध्ये “बॅसिलिकाचे इमारतशास्त्र” याचा समावेश होता. १० व्या ते १५ व्या शतकांदरम्यान, चर्चेस आणि कॅथेड्रल्सचे बांधकाम एकदम जोराने होत होते आणि वास्तुकलेवर जास्त भर दिला जात होता. सध्या कलात्मक स्मारके मानल्या जाणाऱ्‍या ख्रिस्ती धर्मजगताच्या इमारती याच काळात अस्तित्वात आल्या होत्या.

चर्चमध्ये उपासना केल्याने लोकांना नेहमी आध्यात्मिक संतुष्टी आणि उत्तेजन प्राप्त होते का? ब्राझीलचा फ्रान्सीसको म्हणतो, “धर्मातल्या सर्व रटाळ व कंटाळवाण्या गोष्टी म्हणजे चर्च, हे समीकरण माझ्या मनात बसलं होतं. मास हा एक अर्थहीन, कंटाळवाणा समारंभ होता ज्यात माझ्या खऱ्‍या गरजा पूर्ण होत नव्हत्या. तो संपला की मला बरं वाटायचं.” पण, खऱ्‍या उपासकांना एकत्र मिळण्याची आज्ञा देण्यात आली आहे. एकत्र येण्याकरता त्यांनी कोणती पद्धत अनुसरावी?

‘त्यांच्या घरी जमणारी मंडळी’

एकत्र भेटण्याच्या ख्रिस्ती पद्धतीचा नमुना पहिल्या शतकातील उपासकांच्या परीक्षणावरून घेण्यात आला आहे. शास्त्रवचनांमधून दिसून येते की, ते सहसा लोकांच्या घरात एकत्र भेटत होते. उदाहरणार्थ, प्रेषित पौलाने लिहिले: “ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी, प्रिस्क व अक्विला ह्‍यांना सलाम सांगा; . . . जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाहि सलाम सांगा.” (रोमकर १६:३, ५; कलस्सैकर ४:१५; फिलेमोन २) “मंडळी” यासाठी असलेला ग्रीक शब्द किंग जेम्स व्हर्शन यासारख्या काही इंग्रजी अनुवादांमध्ये “चर्च” असा भाषांतरित करण्यात आला आहे. परंतु, हा शब्द, इमारतीला नव्हे तर एखाद्या विशिष्ट हेतूसाठी जमा झालेल्या लोकांच्या गटाला सूचित करतो. (प्रेषितांची कृत्ये ८:१; १३:१) खऱ्‍या ख्रिश्‍चनांच्या उपासनेकरता शोभायमान धार्मिक इमारतींची गरज नाही.

प्रारंभिक ख्रिस्ती मंडळींमध्ये सभा कशा भरवल्या जात होत्या? शिष्य याकोबाने, ख्रिस्ती सभेला सूचित करण्यासाठी सिनाघोघीन या ग्रीक शब्दाचे एक रूप वापरले आहे. (याकोब २:२) या ग्रीक शब्दाचा अर्थ “एकत्र आणणे” असा होतो आणि तो शब्द तसेच इक्लेसिया हा शब्द आलटून पालटून वापरले जाऊ लागले. परंतु, कालांतराने, तो शब्द सभा भरवली जाते त्या ठिकाणाला किंवा इमारतीला सूचित होऊ लागला. पहिल्या यहुदी ख्रिश्‍चनांना सभास्थानातील गोष्टींचा परिचय होता. *

वार्षिक सणावारांसाठी यहुदी लोक जेरूसलेममधील मंदिरांमध्ये एकत्र येत होते परंतु सभास्थाने ही यहोवाविषयी शिकण्यासाठी आणि नियमशास्त्राबद्दलचे शिक्षण घेण्यासाठी स्थानीय ठिकाणे होती. सभास्थानांमध्ये प्रार्थना व शास्त्रवचनांचे वाचन तसेच त्यावर चर्चा आणि उपदेश देणे हे होत असे. पौल आणि त्यासोबत इतर काहीजण अँटियोक येथील सभास्थानात गेले तेव्हा, “सभास्थानाच्या अधिकाऱ्‍यांनी त्यांना सांगून पाठविले की, बंधुजनहो, तुम्हाजवळ लोकांकरिता काही बोधवचन असले तर सांगा.” (प्रेषितांची कृत्ये १३:१५) पहिले यहुदी ख्रिस्ती एखाद्या घरात एकत्र भेटायचे तेव्हा त्यांच्यातही हीच पद्धत अनुसरली जात होती; त्यामुळे त्यांच्या सभांमध्ये शास्त्रवचनातील बोध आणि आध्यात्मिक उत्तेजन प्राप्त होत असे.

उत्तेजनाकरता मंडळ्या

प्रारंभिक ख्रिश्‍चनांप्रमाणे, आज यहोवाचे साक्षीदार बायबलमधून बोध प्राप्त करण्यासाठी व हितकर सहवासाचा लाभ घेण्यासाठी उपासनेच्या साध्यासुध्या स्थळी एकत्र जमतात. अनेक वर्षांकरता ते एखाद्याच्या घरात एकत्र जमत होते आणि आजही काही ठिकाणी असे केले जाते. पण आता त्यांच्या मंडळ्यांची संख्या ९०,००० च्या घरात गेली आहे आणि त्यांच्या एकत्र जमण्याच्या प्रमुख ठिकाणांना राज्य सभागृह म्हटले जाते. या इमारती भपकेबाज नसतात किंवा चर्चसारख्या देखील नसतात. त्या व्यावहारिक व आटोपशीर इमारती असतात जेथे १०० ते २०० लोकांच्या मंडळ्यांना साप्ताहिक सभांकरता एकत्र जमून देवाच्या वचनातून ऐकायला व शिकायला मिळेल.

यहोवाच्या साक्षीदारांच्या बहुतेक मंडळ्या आठवड्यातून तीन वेळा एकत्र जमतात. एका सभेत एखाद्या रोचक विषयावर जाहीर भाषण दिले जाते. त्यानंतर, टेहळणी बुरूज मासिकाच्या आधारे बायबलच्या एखाद्या विषयावर किंवा भविष्यवाणीवर अभ्यास केला जातो. आणखी एक सभा म्हणजे एक प्रशाला असते ज्यात बायबलचा संदेश सादर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतरच्या सभेत, ख्रिस्ती सेवाकार्यात विशेषकरून व्यावहारिक ठरणारे सल्ले दिले जातात. आठवड्यातून एकदा, साक्षीदार बायबल अभ्यासाकरता, लहान गट करून घरांमध्ये देखील एकत्र जमतात. या सर्व सभांमध्ये जनतेला प्रवेश असतो. येथे कधीही दान गोळा केले जात नाही.

आधी ज्याचा उल्लेख केला होता त्या फ्रॅन्सिसकोला राज्य सभागृहातील सभा अत्यंत फायदेकारक वाटल्या. तो म्हणतो: “माझी सर्वात पहिली सभा एका आटोपशीर इमारतीत शहराच्या मध्यभागी होती आणि तिचा माझ्या मनावर छाप पडला. तेथे आलेले लोक मैत्रीपूर्ण होते आणि त्यांच्यामधले प्रेम मला जाणवले. मला पुन्हा जायची उत्सुकता होती. किंबहुना, त्यानंतर मी एकही सभा चुकवलेली नाही. या ख्रिस्ती सभा प्रोत्साहनदायक आहेत आणि त्यामुळे माझी आध्यात्मिक गरज भागते. काही वेळा मी निराश असतो तेव्हा देखील मी राज्य सभागृहात जायचे सोडत नाही कारण मला खात्री असते की, घरी परतताना मला उत्तेजन मिळालेले असेल.”

यहोवाच्या साक्षीदारांच्या ख्रिस्ती सभांमध्ये तुम्हाला देखील बायबलचे शिक्षण, उभारणीकारक सहवास आणि देवाची स्तुती करण्याची संधी प्राप्त होईल. तुमच्या घराजवळच्या कोणत्याही राज्य सभागृहात उपस्थित होण्याचे हार्दिक आमंत्रण आम्ही तुम्हाला देतो. तेथे गेल्याचे तुम्हाला निश्‍चित समाधान मिळेल.

[तळटीपा]

^ परि. 11 रोमनांनी मंदिर पूर्णपणे जमीनदोस्त केले होते. द वेलिंग वॉल, जेथे अनेक यहुदी दूरदूरहून प्रार्थना करायला येतात तो मंदिराचा भाग नाही. तो केवळ मंदिराच्या अंगणाच्या भिंतीचा भाग आहे.

^ परि. 20 असे भासते की, सभास्थानांची सुरवात ७० वर्षांच्या बॅबिलोनी बंदिवासाच्या दरम्यान झाली जेव्हा मंदिर नव्हते किंवा बंदिवासातून परतल्यावर झाली जेव्हा मंदिराची पुनर्बांधणी चालू होती. पहिल्या शतकापर्यंत, पॅलेस्टाईनमधील प्रत्येक नगरात एक सभास्थान होते आणि मोठ्या शहरांमध्ये एकापेक्षा अधिक सभास्थाने होती.

[४, ५ पानांवरील चित्रे]

निवासमंडप आणि कालांतराने मंदिरे यहोवाच्या उपासनेची उत्तम केंद्रस्थाने ठरली

[६ पानांवरील चित्र]

रोममधील सेंट पीटर्स बॅसिलिका

[७ पानांवरील चित्र]

प्रारंभिक ख्रिस्ती खासगी घरांमध्ये एकत्र जमत होते

[८, ९ पानांवरील चित्रे]

यहोवाचे साक्षीदार खासगी घरांमध्ये आणि राज्य सभागृहांमध्ये ख्रिस्ती सभा भरवतात