व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

खांद्याला खांदा लावून सेवा करत राहा

खांद्याला खांदा लावून सेवा करत राहा

खांद्याला खांदा लावून सेवा करत राहा

“मी राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन, व परमेश्‍वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने [“खांद्याला खांदा लावून,” ईझी टू रीड व्हर्शन] करितील.”—सफन्या ३:९.

१. सफन्या ३:९ या वचनाच्या पूर्णतेत आज काय घडत आहे?

आज मितीला जगभरात जवळजवळ ६,००० भाषा बोलल्या जातात. याव्यतिरिक्‍त अनेक पोटभाषा किंवा विविध भाषांची स्थानिक रूपे देखील आहेत. अरबीपासून झुलूपर्यंत नानाविध भाषा बोलणाऱ्‍या लोकांमध्ये देवाने एक अद्‌भुत गोष्ट घडवून आणली आहे. त्याने सबंध जगातील लोकांना एकमेव शुद्ध भाषा शिकून तिच्यात बोलणे शक्य केले आहे. हे संदेष्टा सफन्याला केलेल्या एका प्रतिज्ञेच्या पूर्णतेत घडत आहे: “मी [यहोवा देव] राष्ट्रांस शुद्ध वाणी देईन, व परमेश्‍वराची सेवा घडावी म्हणून ते सर्व त्याच्या नामाचा धावा एकचित्ताने [“खांद्याला खांदा लावून”] करितील.”—सफन्या ३:९.

२. “शुद्ध वाणी” कशास सूचित करते आणि तिच्यामुळे काय शक्य झाले आहे?

“शुद्ध वाणी” ही देवाचे वचन बायबल यात सापडणाऱ्‍या सत्याला सूचित करते. खासकरून हे यहोवाच्या नावाचे पवित्रीकरण आणि त्याच्या सार्वभौमत्वाचे समर्थन करून मानवजातीकरता असंख्य आशीर्वाद आणणाऱ्‍या देवाच्या राज्याविषयीचे सत्य आहे. (मत्तय ६:९, १०) आध्यात्मिक अर्थाने ही पृथ्वीवरील एकमेव शुद्ध भाषा असल्यामुळे सर्व राष्ट्रांचे व जातीचे लोक ही भाषा बोलू शकतात. ही भाषा त्यांना “खांद्याला खांदा लावून” यहोवाची सेवा करण्यास मदत करते. अशारितीने ते एकजूटीने, “एकचित्ताने” त्याची सेवा करतात.

पक्षपाताला थारा नाही

३. यहोवाची एकतेने सेवा करणे कशामुळे शक्य होते?

खरे ख्रिस्ती या नात्याने आपल्यामध्ये अनेक भाषा बोलणारे बांधव एकमेकांसोबत सहकार्य करत आहेत याबद्दल आपण कृतज्ञ आहोत. आपण अनेक भाषांतून राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करत आहोत हे खरे आहे, पण मुळात आपण एकतेने देवाची सेवा करत आहोत. (स्तोत्र १३३:१) हे शक्य झाले आहे कारण आपण जगाच्या पाठीवर कोठेही राहात असलो तरीसुद्धा आपण एकाच शुद्ध वाणीत बोलतो आणि याद्वारे यहोवाला स्तुती आणतो.

४. देवाच्या लोकांमध्ये पक्षपात का असू नये?

देवाच्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा पक्षपात असू नये. प्रेषित पेत्राने सा.यु. ३६ साली विदेशी सेनाधिपती कर्नेल्य याच्या घरात प्रचार करत असताना ही गोष्ट अगदी स्पष्ट केली. त्याने म्हटले: “देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीति बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५) ही खरोखर एक वस्तुस्थिती असल्यामुळे ख्रिस्ती मंडळीत पक्षपात, गटबाजी किंवा तरफदारीच्या प्रवृत्तीला अजिबात थारा दिला जाऊ नये.

५. मंडळीत गट पडतील अशाप्रकारे वागणे का चुकीचे आहे?

राज्य सभागृहाला भेट दिल्यानंतर एका कॉलेज विद्यार्थीनीने म्हटले: “सहसा चर्चेसमध्ये एका विशिष्ट जातीचे अथवा वंशाचे सदस्य असतात. . . . यहोवाच्या साक्षीदारांमध्ये मात्र सर्वजण एकमेकांसोबत बसले होते, विशिष्ट गटांत नव्हे.” पण, प्राचीन करिंथच्या मंडळीत काही सदस्य फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते. असे करण्याद्वारे ते देवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्याला विरोध करत होते कारण देवाचा आत्मा एकता व शांतीचा पुरस्कर्ता आहे. (गलतीकर ५:२२) आपणही मंडळीत गट पाडण्याचा प्रयत्न केला तर ते पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाला विरोध केल्यासारखे होईल. तेव्हा, पौलाने करिंथकरांना दिलेला सल्ला आपण मनात नेहमी बाळगू या: “बंधुजनहो, आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्या नावाने मी तुम्हास विनंती करितो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे.” (१ करिंथकर १:१०) पौलाने इफिसकरांना लिहिलेल्या पत्रातही एकता राखण्यावर जोर दिला.—इफिसकर ४:१-६, १६.

६, ७. पक्षपातासंबंधी याकोबाने काय सल्ला दिला आणि त्याचे शब्द कशाप्रकारे आपल्याकरताही समर्पक आहेत?

ख्रिश्‍चनांना नेहमीच निष्पक्ष वृत्ती बाळगण्याची आज्ञा देण्यात आली. (रोमकर २:११) पहिल्या शतकातील मंडळीत काहीजणांचा श्रीमंतांकडे ओढा असल्यामुळे शिष्य याकोबाने असे लिहिले: “माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभु म्हणजे आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्‍याच्यावर विश्‍वास ठेवणारे तुम्ही तोंड पाहून वागू नका. सोन्याची आंगठी घातलेला व भपकेदार कपडे घातलेला एखादा माणूस तुमच्या सभास्थानांत आला, आणि भिकार कपडे पांघरलेला एक दरिद्रीहि आला: तुम्ही भपकेदार कपडे घातलेल्या इसमाकडे पाहून म्हणता ही जागा चांगली आहे, येथे बसा; आणि दरिद्र्‌याला म्हणता, तू येथे उभा राहा, किंवा माझ्या पदासनाजवळ खाली बैस; तर तुम्ही आपणांमध्ये भेदभाव ठेवता की नाही? आणि दुर्विचारी न्यायाधीश बनला की नाही?”—याकोब २:१-४.

सत्य न मानणारे श्रीमंत लोक सोन्याच्या अंगठ्या आणि भपकेदार कपडे घालून ख्रिस्ती सभेला आले आणि त्याच वेळेस काही गरीब लोकही भिकार कपडे पांघरून आले तर श्रीमंत लोकांना खास वागणूक दिली जायची. त्यांना ‘चांगली जागा’ दिली जायची, पण गरिबाला मात्र उभे राहण्यास किंवा कोणाच्या तरी पायाजवळ जमिनीवर बसायला सांगितले जायचे. पण देवाने तर पक्षपात न करता, येशूचे खंडणी बलिदान श्रीमंत व गरीब लोकांसाठीही पुरवले होते. (ईयोब ३४:१९; २ करिंथकर ५:१४) त्याअर्थी, यहोवाला संतुष्ट करण्याची आणि आपल्या बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून त्याची सेवा करण्याची आपली इच्छा असेल तर आपण पक्षपात करू नये किंवा ‘लाभांसाठी तोंडपुजेपणा करू नये.’—यहुदा ४, १६.

कुरकूर करण्याची प्रवृत्ती टाळा

८. इस्राएल लोकांच्या कुरकूर करण्याच्या प्रवृत्तीमुळे काय झाले?

आपली एकता टिकवून देवाची कृपा अनुभवत राहण्याकरता आपण पौलाच्या सल्ल्याचे पालन केले पाहिजे: “जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करिता करा.” (फिलिप्पैकर २:१४, १५) ईजिप्तच्या दास्यातून मुक्‍त झालेल्या विश्‍वासहीन इस्राएलांनी मोशे व अहरोन आणि अशारितीने यहोवा देवाच्याही विरोधात कुरकूर केली. यामुळे, केवळ विश्‍वासू यहोशवा व कालेबचा अपवाद वगळता, २० वर्षे व त्यापेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना प्रतिज्ञात देशात प्रवेश करता आला नाही आणि ते चाळीस वर्षे अरण्यात भटकतानाच मेले. (गणना १४:२, ३, २६-३०; १ करिंथकर १०:१०) कुरकूर करण्याची त्यांना किती मोठी किंमत चुकवावी लागली!

९. कुरकूर केल्यामुळे मिर्यामला काय भोगावे लागले?

कुरकूर करणाऱ्‍या सबंध राष्ट्राला काय भोगावे लागू शकते हे यावरून दिसून येते. पण कुरकूर करणाऱ्‍या व्यक्‍तींबद्दल काय? मोशेची बहीण मिर्याम तिचा भाऊ अहरोन याच्यासोबत मिळून अशाप्रकारे कुरकूर करू लागली: “परमेश्‍वर केवळ मोशेशीच बोलला आहे काय? आमच्याशी पण नाही का बोलला?” अहवालात पुढे म्हटले आहे की, “परमेश्‍वराने ते ऐकले.” (गणना १२:१, २) याचा काय परिणाम झाला? अशाप्रकारे कुरकूर करण्यात पुढाकार घेणाऱ्‍या मिर्यामचा देवाने पाणउतारा केला. कशाप्रकारे? ती कोडी बनली आणि शुद्ध होईपर्यंत म्हणजे सात दिवस तिला छावणीबाहेर राहावे लागले.—गणना १२:९-१५.

१०, ११. कुरकूर करण्याच्या प्रवृत्तीला नियंत्रणात न ठेवल्यास काय घडू शकते? उदाहरण द्या.

१० कुरकूर म्हणजे केवळ एखाद्या चुकीच्या गोष्टीची तक्रार करण्यापुरतेच मर्यादित नाही. कुरकूर करण्याची सवय असलेले सहसा स्वतःच्या भावनांना किंवा पदवीला खूप जास्त महत्त्व देतात आणि देवापेक्षा स्वतःकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. या प्रवृत्तीला नियंत्रणात न ठेवल्यास आध्यात्मिक बांधवांमध्ये फूट पडू शकते आणि खांद्याला खांदा लावून यहोवाची सेवा करण्याच्या प्रयत्नात ती एक बाधा बनू शकते. कारण कुरकूर करणारे सतत रडगाणे गातच राहतात आणि इतर सर्वांनी आपल्याला सहानुभूती दाखवावी अशी त्यांची अपेक्षा असते.

११ उदाहरणार्थ, एखादी व्यक्‍ती कदाचित विशिष्ट वडील ज्यापद्धतीने सभांमध्ये आपले भाग सादर करतात किंवा ज्यापद्धतीने ते आपल्या जबाबदाऱ्‍या पूर्ण करतात त्याविषयी टीका करेल. आपण या तक्रार करणाऱ्‍याचे ऐकले तर आपणही त्याच्यासारखाच विचार करायला लागू. तक्रारीचे बीज आपल्या मनात पेरण्यात आले त्याआधी कदाचित त्या वडिलांच्या काम करण्याच्या पद्धतीत आपल्याला काही गैर आढळले नसेल पण आता परिस्थिती बदलली आहे. कालांतराने, त्या वडिलांची कोणतीच कृती आपल्याला योग्य वाटणार नाही आणि आपण त्यांच्याविषयी तक्रार करण्यास सुरवात करू. अशाप्रकारची वागणूक यहोवाच्या लोकांच्या मंडळीत शोभत नाही.

१२. कुरकूर केल्यामुळे देवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर कसा परिणाम होऊ शकतो?

१२ देवाच्या कळपाचे पालन करण्याची जबाबदारी हाताळणाऱ्‍यांविषयी कुरकूर करणे हळूहळू आपल्याला चहाडी करण्यास प्रवृत्त करू शकते. अशाप्रकारे कुरकूर केल्यामुळे किंवा दोष लावल्यामुळे यहोवासोबतचा आपला नातेसंबंध कमकुवत होऊ शकतो. (निर्गम २२:२८) पश्‍चात्ताप न करणारे चहाडखोर देवाच्या राज्यात प्रवेश करणार नाहीत. (१ करिंथकर ५:११; ६:१०) शिष्य यहुदाने कुरकूर करणाऱ्‍यांविषयी असे लिहिले की ते “प्रभुत्व तुच्छ लेखतात व थोरांची निंदा करितात.” (यहूदा ८) या कुरकूर करणाऱ्‍यांना देवाची संमती मिळाली नाही आणि म्हणून त्यांचे दुष्ट आचरण आवर्जून टाळणेच सुज्ञपणाचे ठरेल.

१३. सर्वच तक्रारी चुकीच्या का नसतात?

१३ अर्थात, देव कोणतीच तक्रार ऐकून घेत नाही अशातला भाग नाही. सदोम व गमोरा यांच्याविषयीची “ओरड” ऐकून त्याने या दुष्ट शहरांचा नाश केला. (उत्पत्ति १८:२०, २१; १९:२४, २५) जेरुसलेममध्ये सा.यु. ३३ सालच्या पेन्टेकॉस्टनंतर लगेच “हेल्लेणी यहूद्यांची इब्री लोकांविरुद्ध कुरकूर सुरू झाली; कारण रोजच्या वाटणीत त्यांच्या विधवांची उपेक्षा होत असे.” त्यामुळे “बारा प्रेषितांनी” ही समस्या सोडवण्याकरता अन्‍नाची वाटणी करण्याच्या “कामावर” देखरेख करण्याकरता “सात प्रतिष्ठित पुरुष” नेमले. (प्रेषितांची कृत्ये ६:१-६) आजही वडिलांनी रास्त तक्रारींकडे ‘कानात बोटे घालू’ नयेत. (नीतिसूत्रे २१:१३) आणि सह उपासकांची टीका करण्याऐवजी वडिलांनी त्यांना प्रोत्साहन व उत्तेजन द्यावे.—१ करिंथकर ८:१.

१४. कुरकूर करण्याची प्रवृत्ती टाळण्याकरता कोणत्या गुणाची खास गरज आहे?

१४ आपण सर्वांनीच कुरकूर करण्याची सवय आवर्जून टाळली पाहिजे कारण ती आध्यात्मिकरित्या हानीकारक आहे. ही वृत्ती आपल्या एकतेला मारक ठरू शकते. त्याऐवजी आपण पवित्र आत्म्याला सदोदित आपल्यामध्ये प्रीती उत्पन्‍न करण्यास वाव देऊ या. (गलतीकर ५:२२) ‘प्रीतिच्या राजमान्य नियमाचे’ पालन करत राहिल्यामुळे आपण आपल्या बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून यहोवाची सेवा करत राहू शकू.—याकोब २:८; १ करिंथकर १३:४-८; १ पेत्र ४:८.

चहाडीपासून सांभाळून राहा

१५. गप्पागोष्टी आणि चहाडी यांत कशाप्रकारे फरक करता येतो?

१५ कुरकूर करण्याची सवय आपल्याला हानीकारक चहाडी करण्यास प्रवृत्त करू शकत असल्यामुळे आपण जे काही बोलतो ते नेहमी विचारपूर्वक बोलले पाहिजे. गप्पागोष्टी म्हणजे लोकांबद्दल आणि त्यांच्या व्यवहारांविषयी अनावश्‍यक चर्चा करणे. पण चहाडी मात्र एखाद्या व्यक्‍तीचे चांगले नाव खराब करण्याच्या हेतूने पसरवलेली खोटी माहिती असते. इतरांविषयी अशाप्रकारे बोलणे दुष्टपणाचे आणि देवाच्या तत्त्वांच्या विरोधात आहे. म्हणूनच देवाने इस्राएल लोकांना सांगितले होते: ‘आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नका.’—लेवीय १९:१६.

१६. गप्पागोष्टींत रमणाऱ्‍या काहींबद्दल पौलाने काय म्हटले आणि या सल्ल्याचा आपल्यावर कशाप्रकारे परिणाम झाला पाहिजे?

१६ गप्पागोष्टीही कधीकधी चहाड्यांचे रूप घेऊ शकत असल्यामुळे यांत रमणाऱ्‍यांचे पौलाने ताडन केले होते. मंडळीकडून दिल्या जाणाऱ्‍या मदतीस योग्य असणाऱ्‍या विधवांचा उल्लेख केल्यानंतर त्याने विधवांबद्दल सांगितले ज्या “घरोघर फिरून . . . आळशी होतात; आणि आळशी होतात इतकेच नव्हे, तर वटवट्या व लुडबुड्या होतात, आणि बोलू नये ते बोलतात.” (१ तीमथ्य ५:११-१५) चहाडीचे रूप घेणाऱ्‍या गप्पागोष्टींत रमण्याची वाईट सवय आपल्याला आहे असे एखाद्या ख्रिस्ती स्त्रीला आढळल्यास तिने पौलाच्या सल्ल्याचे पालन करावे, ज्याने म्हटले की “स्त्रिया गंभीर असाव्या, चहाड नसाव्या.” (१ तीमथ्य ३:११) अर्थात, ख्रिस्ती पुरुषांनीही हानीकारक गप्पागोष्टींपासून सावध राहिले पाहिजे.—नीतिसूत्रे १०:१९.

दोष काढू नका!

१७, १८. (अ) येशूने आपल्या बांधवाचे दोष दाखवण्याविषयी काय म्हटले? (ब) दोष दाखवण्याविषयीच्या येशूच्या शब्दांनुसार आपण कशाप्रकारे वागू शकतो?

१७ आपण कोणाची चहाडी करत नसलो तरीही इतरांचे दोष काढण्याची प्रवृत्ती टाळण्याकरता कदाचित आपल्याला मनःपूर्वक प्रयत्न करण्याची आवश्‍यकता असेल. येशूने अशा प्रवृत्तीची निंदा केली; त्याने म्हटले: “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारेच तुमचे दोष काढण्यात येतील आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणिता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहातोस? अथवा तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यांतले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.”—मत्तय ७:१-५.

१८ स्वतःच्याच डोळ्यात लाक्षणिक “मुसळ” असल्यामुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता नसताना आपण आपल्या भावाच्या डोळ्यातून “कुसळ” काढून त्याला मदत करण्याचे धाडस करू नये. किंबहुना, देव किती दयाळू आहे याची खरोखर जाणीव असल्यास आपल्याला आपल्या आध्यात्मिक भाऊ बहिणींचे दोष दाखवावेसे कधी वाटणार नाही. आपला स्वर्गीय पिता त्यांना जाणतो त्यापेक्षा अधिक चांगल्याप्रकारे आपण त्यांना जाणू शकतो का? म्हणूनच येशूने आपल्याला ताकीद दिली की “तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका.” स्वतःच्या अपरिपूर्णतांचा प्रामाणिकपणे विचार केल्यास आपण कधीही इतरांचे दोष काढण्यास धजणार नाही कारण असे करणे देवाच्या नजरेत अनीतिमान ठरेल.

दुर्बल परंतु आदरणीय

१९. आपण सहविश्‍वासू बांधवांबद्दल कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे?

१९ आपल्या बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून देवाची सेवा करण्याचा आपला निर्धार असल्यास, केवळ इतरांचे दोष काढण्याची प्रवृत्ती टाळणेच पुरेसे नाही. आपण त्यांना आदर दाखवण्यातही पुढाकार घेऊ. (रोमकर १२:१०) किंबहुना आपण स्वतःचे नव्हे तर त्यांचे भले कसे होईल याचा विचार करू आणि त्यांच्याकरता क्षुल्लक वाटणारी कामे देखील आनंदाने करू. (योहान १३:१२-१७; १ करिंथकर १०:२४) ही उत्तम मनोवृत्ती आपण कशाप्रकारे सदोदित बाळगू शकतो? त्यासाठी आपण नेहमी हे आठवणीत ठेवले पाहिजे की प्रत्येक विश्‍वासू व्यक्‍ती यहोवाच्या नजरेत मोलवान आहे आणि ज्याप्रकारे मानवी शरीरातील प्रत्येक अवयव एकमेकांवर अवलंबून आहे त्याचप्रकारे आपणा सर्वांनाही एकमेकांची गरज आहे.—१ करिंथकर १२:१४-२७.

२०, २१. दुसरे तीमथ्य २:२०, २१ यातील शब्द आपल्याकरता कशाप्रकारे अर्थपूर्ण आहेत?

२० तसे पाहिल्यास, सर्वच ख्रिस्ती नाजूक मातीच्या भांड्यांप्रमाणे आहेत व त्यांना एक महान संपत्ती सोपवण्यात आली आहे. (२ करिंथकर ४:७) यहोवाच्या स्तुतीकरता हे महान कार्य करायचे असल्यास आपण त्याच्यासमोर व त्याच्या पुत्रासमोर आदरणीय स्थितीत नेहमी राहिले पाहिजे. केवळ नैतिक व आध्यात्मिकरित्या शुद्ध राहिल्यानेच आपण देवाने वापरण्यालायक आदरणीय पात्र ठरू शकतो. याबाबतीत पौलाने लिहिले: “मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीहि असतात; त्यांपैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो. म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले, असे मानाचे पात्र होईल.”—२ तीमथ्य २:२०, २१.

२१ जे देवाच्या अपेक्षांप्रमाणे आचरण करत नाहीत ते “हलक्या कार्यासाठी” असलेली पात्रे आहेत. पण देवाला आवडणाऱ्‍या पद्धतीने वागल्यामुळे आपण “पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले . . . पात्र” ठरू. तेव्हा आपण सर्वांनी स्वतःला हे प्रश्‍न विचारावेत: ‘मी “मानाचे पात्र” आहे का? माझ्यामुळे सहविश्‍वासू बांधवांवर चांगला प्रभाव पडतो का? मी मंडळीत सह-उपासकांसोबत खांद्याला खांदा लावून कार्य करतो का?’

खांद्याला खांदा लावून सेवा करत राहा

२२. ख्रिस्ती मंडळीची तुलना कशासोबत केली जाऊ शकते?

२२ ख्रिस्ती मंडळी एखाद्या कुटुंबाप्रमाणे आहे. एखाद्या कुटुंबात जेव्हा सर्व सदस्य यहोवाची उपासना करतात तेव्हा साहजिकच त्या कुटुंबात प्रेमळ, सहकार्याचे आणि आनंदाचे वातावरण असते. कुटुंबातल्या सदस्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात पण त्या सर्वांनाच कुटुंबात मानाचे स्थान असते. मंडळीच्या बाबतीतही हेच खरे आहे. आपण सर्वजण वेगळे—आणि अपरिपूर्ण—आहोत, पण देवाने आपल्याला ख्रिस्ताद्वारे स्वतःकडे आकर्षिले आहे. (योहान ६:४४; १४:६) यहोवा आणि येशूचे आपल्यावर प्रेम आहे आणि एखाद्या एकजूट कुटुंबाप्रमाणे आपणही निश्‍चितच एकमेकांवर प्रेम केले पाहिजे.—१ योहान ४:७-११.

२३. आपण काय आठवणीत ठेवले पाहिजे आणि काय करण्याचा निर्धार केला पाहिजे?

२३ कुटुंबासारख्या ख्रिस्ती मंडळीत एकनिष्ठतेची अपेक्षा करणेही योग्य आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “प्रत्येक ठिकाणी पुरुषांनी राग व विवाद सोडून पवित्र [“निष्ठावान,” NW] हात वर करून प्रार्थना करावी अशी माझी इच्छा आहे.” (१ तीमथ्य २:८) अशारितीने, खिस्ती ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या “प्रत्येक ठिकाणी” केल्या जाणाऱ्‍या सार्वजनिक प्रार्थनेचा संबंध पौलाने निष्ठेशी जोडला. मंडळीत केवळ एकनिष्ठ पुरुषांनीच सार्वजनिक प्रार्थना करावी. अर्थात, देव आपल्या सर्वांकडून ही अपेक्षा करतो की आपण त्याला आणि एकमेकांनाही एकनिष्ठ राहावे. (उपदेशक १२:१३, १४) तेव्हा आपण सर्व मानवी शरीरातील अवयवयांप्रमाणे एकजूटपणे कार्य करण्याचा निर्धार करू या. यहोवाच्या उपासकांच्या कुटुंबातही आपण एकतेने सेवा करू या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आठवणीत ठेवू या, की आपल्याला एकमेकांची गरज आहे आणि आपण एकमेकांसोबत खांद्याला खांदा लावून यहोवाची सेवा करीत राहिलो तर आपल्याला त्याची संमती व आशीर्वाद मिळत राहतील.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

• यहोवाच्या लोकांना खांद्याला खांदा लावून त्याची सेवा करणे कशामुळे शक्य होते?

• ख्रिस्ती पक्षपाती वृत्ती का टाळतात?

• कुरकूर करण्यात काय गैर आहे असे तुम्हाला वाटते?

• आपण सहविश्‍वासू बांधवांचा आदर का करावा?

[अभ्यासाचे प्रश्‍न]

[१५ पानांवरील चित्र]

पेत्राने ओळखले की “देव पक्षपाती नाही”

[१६ पानांवरील चित्र]

देवाने मिर्यामचा पाणउतारा का केला हे तुम्हाला माहीत आहे का?

[१८ पानांवरील चित्र]

एकनिष्ठ ख्रिस्ती आनंदाने एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून यहोवाची सेवा करतात