व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“देवाच्या कळपाचे पालन करा”

“देवाच्या कळपाचे पालन करा”

“माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन”

“देवाच्या कळपाचे पालन करा”

“आमचं ऐकून घ्यायला आणि आम्हाला उत्तेजन मिळेल असं बायबलमधून काही दाखवायला तुम्ही नेहमी तयार असता.”—पॅमेला.

“आमच्यासाठी तुम्ही जे काही करता त्याबद्दल आभारी आहोत. यामुळे आमच्यावर खरोखरच खूप चांगला परिणाम होतो.”—रॉबर्ट.

आपल्या ख्रिस्ती मंडळीतील वडिलांच्या प्रशंसेखातर पॅमेला आणि रॉबर्ट वरीलप्रमाणे लिहायला प्रवृत्त झाले. संपूर्ण जगभरांतील देवाच्या सेवकांपैकी इतर लोक देखील, “देवाच्या कळपाचे पालन” करणाऱ्‍यांकडून त्यांना सतत मिळणारा आधार व काळजी यांबद्दल कृतज्ञ आहेत. (१ पेत्र ५:२) होय, यहोवाचे लोक, वडील जन त्यांच्यासाठी जे काही करतात आणि ज्या पद्धतीने करतात त्याबद्दल मनापासून गुणग्राहकता बाळगतात.

“प्रभूच्या कामात” करण्याजोगे पुष्कळ

ख्रिस्ती वडिलांवर अनेक जबाबदाऱ्‍या सोपवण्यात आल्या आहेत. (लूक १२:४८) मंडळीत सभांसाठी ते भाषणे तयार करतात आणि देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा जाहीरपणे प्रचार करण्यात देखील भाग घेतात. बंधूभगिनींना मेंढपाळ भेटी देण्याचे काम देखील या जबाबदाऱ्‍यांत समाविष्ट आहे. ज्यांच्याकडे खास लक्ष दिले पाहिजे—वृद्ध जन किंवा इतर लोक—अशा लोकांसाठी वडील जन वेळ काढतात; आणि हे सर्व ते स्वतःच्या कुटुंबाच्या आध्यात्मिक व आर्थिक कल्याणाकडे दुर्लक्ष न करता करतात. (ईयोब २९:१२-१५; १ तीमथ्य ३:४; ५:८) काही वडील राज्य सभागृहाच्या बांधकामात देखील मदत करतात. इतर काही, इस्पितळ सहकार्य समितीत किंवा रुग्ण भेट गटांत सेवा करतात. पुष्कळ जण संमेलनांमध्ये व अधिवेशनांमध्ये स्वयंसेवक म्हणूनही कार्य करतात. होय, वडिलांना “प्रभूच्या कामात” करण्याजोगे पुष्कळ आहे. (१ करिंथकर १५:५८) म्हणूनच तर वडिलांच्या हवाली करण्यात आलेले, मनापासून त्यांची कदर करतात.—१ थेस्सलनीकाकर ५:१२, १३.

सहख्रिश्‍चनांच्या घरी जाणारे अथवा इतर ठिकाणी आध्यात्मिकरीत्या त्यांना मजबूत करण्यासाठी नियमितरीत्या भेटी देणारे वडील उत्तेजनाचा एक स्रोत ठरतात. घरी वडील नसलेल्या टॉमसने म्हटले: “मला मंडळीतल्या वडिलांचा प्रेमळ आधार व उत्तेजन मिळालं नसतं तर, कदाचित मी आज यहोवाचा पूर्ण-वेळेचा सेवक नसतो.” एक-पालक कुटुंबात वाढलेले अनेक युवक कबूल करतात, की मंडळीतल्या वडिलांनी त्यांच्याकडे लक्ष दिल्यामुळे ते देवाबरोबर व्यक्‍तिगत नातेसंबंध जोडू शकले.

मंडळीतले वृद्ध जन देखील मेंढपाळ भेटींबद्दल कदर बाळगतात. ऐंशीत असलेल्या एका मिशनरी दांपत्याला दोन वडिलांनी भेट दिल्यानंतर या दांपत्याने असे लिहिले: “तुमच्या आनंददायक भेटीबद्दल आम्ही आपले आभार मानू इच्छितो. तुम्ही गेल्यानंतर, आमच्याबरोबर तुम्ही जी शास्त्रवचने वाचली ती पुन्हा आम्ही वाचून काढली. तुमचे प्रोत्साहनदायक शब्द आम्ही केव्हाही विसरणार नाही.” एका सत्तर वर्षांच्या विधवा भगिनीने वडिलांना लिहिले: “मी मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करत होते, आणि त्याने तुम्हा दोघांना माझ्या घरी पाठवले. तुमची भेट यहोवाकडून एक आशीर्वाद आहे!” तुमच्या मंडळीतल्या वडिलांनी तुम्हाला अलीकडेच दिलेल्या भेटीमुळे तुम्हाला फायदा झाला आहे का? निश्‍चितच, त्यांना सोपवलेल्या कळपाचे पालन करण्यासाठी ते करत असलेल्या प्रयत्नांची आपण सर्वजण कदर करतो!

देवाचे आणि ख्रिस्ताचे अनुकरण करणारे मेंढपाळ

यहोवा एक प्रेमळ मेंढपाळ आहे. (स्तोत्र २३:१-४; यिर्मया ३१:१०; १ पेत्र २:२५) आध्यात्मिक गरजा पूर्ण करणारा उत्तम मेंढपाळ म्हणून येशू ख्रिस्ताचे देखील उल्लेखनीय उदाहरण आहे. खरे तर, त्याला “उत्तम मेंढपाळ,” “महान मेंढपाळ,” “मुख्य मेंढपाळ” असे संबोधण्यात आले आहे. (योहान १०:११; इब्री लोकांस १३:२०; १ पेत्र ५:४) येशूचे शिष्य होऊ इच्छिणाऱ्‍या लोकांशी तो कशाप्रकारे वागला? त्याने त्यांना हे प्रेमळ आमंत्रण दिले: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.”—मत्तय ११:२८.

तसेच वडीलजनही कळपाला विसावा व संरक्षण देण्याचा प्रयत्न करतात. ते, “वाऱ्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा . . . रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया असा” होण्याचा प्रयत्न करतात. (यशया ३२:२) या दयाळू रक्षकांमुळे तजेला मिळतो, ते कळपाचा आदर मिळवतात आणि देवाची स्वीकृती देखील प्राप्त करतात.—फिलिप्पैकर २:२९; १ तीमथ्य ५:१७.

त्यांच्या पत्नींचा अमूल्य पाठिंबा

ख्रिस्ती वडील आणि या ख्रिस्ती वडिलांना त्यांच्या पत्नी देत असलेला अमूल्य पाठिंबा यांबद्दल देवाचे लोक त्यांचे आभार मानतात. पुष्कळदा या स्त्रियांना अनेक त्याग करावे लागतात. कधीकधी, या स्त्रियांना घरात एकटेच राहावे लागते कारण त्यांचे पती मंडळीच्या कामात किंवा मेंढपाळ भेटी देण्यात व्यस्त असतात. काही वेळा, मंडळीत तातडीची समस्या उद्‌भवते तेव्हा, या वडिलांना आपल्या व्यक्‍तिगत योजनांत फेरबदल करावे लागतात. “तरीपण, मी माझ्या पतीला सभांची तयारी करताना किंवा मेंढपाळ भेटी देण्यासाठी जाताना पाहते तेव्हा मी एक गोष्ट लक्षात ठेवते; ती म्हणजे, माझे पती यहोवाचं काम करत आहेत. मग मी त्यांना जमेल तितका पाठिंबा देते,” असे मिशेलने म्हटले.

शेरील नावाची भगिनी, जिचे पती देखील वडील आहेत ती म्हणते: “मला माहीत आहे, की मंडळीतल्या बंधूभगिनींना देखील वडिलांशी बोलायचे असल्यामुळे त्यांना जेव्हा त्यांच्याशी बोलावसं वाटतं तेव्हा ते बोलू शकतात, याची त्यांना जाणीव व्हावी अशी माझी इच्छा आहे.” मिशेल आणि शेरीलसारख्या पाठिंबा देणाऱ्‍या पत्नी, आपल्या पतींना देवाच्या मेंढरांची काळजी घेता यावी म्हणून त्याग करायला तयार आहेत. वडिलांच्या पत्नींची ही सहकार्य देण्याची मनोवृत्ती खरोखरच प्रशंसनीय आहे.

तरीपण, एका व्यस्त वडिलांनी आपल्या पत्नीच्या व मुलांच्या आध्यात्मिक व इतर गरजांकडे दुर्लक्ष करू नये. विवाहित वडिलांनी, ‘अदूष्य, एका स्त्रीचा पति असावे; त्यांची मुले विश्‍वास ठेवणारी असावीत. त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावीत.’ (तीत १:६) शास्त्रवचनांत ख्रिस्ती पर्यवेक्षकांकडून अपेक्षिले जाते त्या पद्धतीने वडिलांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे.—१ तीमथ्य ३:१-७.

व्यस्त वडिलांना, पाठिंबा देणारी पत्नी अमूल्य ठरते! हेच विचारशील विवाहित वडिलांना देखील वाटते. बायबल देखील असेच म्हणते: “ज्याला गृहिणी लाभते त्यास उत्तम लाभ घडतो.” (नीतिसूत्रे १८:२२) असे वडील, आपल्या बोलण्याद्वारे व कार्यांद्वारे आपल्या पत्नींची पूर्ण हृदयापासून प्रशंसा करतात. ही विवाहित ख्रिस्ती जोडपी, एकत्र मिळून कळकळीने प्रार्थना करतात व आनंददायक अभ्यास देखील करतात; परंतु या शिवाय ते समुद्रकिनाऱ्‍यावर, बागेत अथवा इतर ठिकाणी फिरायला जाण्यासाठी वेळ बाजूला काढतात. होय, आपल्या पत्नींची प्रेमळ काळजी घेण्यात वडिलांना आनंद वाटतो.—१ पेत्र ३:७.

देवाच्या कळपाचे निःस्वार्थपणे पालन करणारे वडील यहोवाच्या लोकांसाठी आध्यात्मिक तजेला देणारे स्रोत ठरतात. या खरोखरच, ‘मानवरूपी देणग्या,’ असून मंडळीसाठी एक आशीर्वाद आहेत!—इफिसकर ४:८, ११-१३.